सर एक श्रावणाची बरसून काय गेली!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
15 May 2017 - 3:46 am

सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!

आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!

पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती
जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली!

वाचायचीच आहे,वाचू उद्या सकाळी...
चिठ्ठी कशी उश्याला,विसरुन माय गेली!

पेरुन जे उगवले वाहून जात होते...
जाईल बाप..आई,लागून हाय,गेली!

तो बापही जगाचा,निश्चल उभाच आहे
भक्ती भुकेजलेली अन् ठाय-ठाय गेली!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

सत्यजित...'s picture

15 May 2017 - 4:18 am | सत्यजित...

काफिया(बहुवचन-कवाफी) म्हणजे शेरातील यमक साधणारा शब्द! गझलेत असे यमकाचे शब्द योजत असताना, 'अलामत' (एक समान स्वरचिन्ह) सांभाळणे मात्र गरजेचे असते!
मतल्याच्या (गझलेचा पहिला शेर) दोन्ही ओळींमध्ये व त्यानंतर येणाऱ्या सर्व शेरांच्या किमान दुसऱ्या ओळींमध्ये कवाफी वापरणे अपेक्षित असते! ज्या गझलेच्या शेरांत असे यमक साधणारे दोन-दोन शब्द(कवाफी) लागोपाठ वापरले जातात,ती 'जुल्काफिया'गझल!

दुसरा शेर फारच विदग्ध करून जाणारा. गझल आवडली.

दुसरा आणि चौथा शेर सुरेख जमले आहेत.

पैसा's picture

16 May 2017 - 11:46 pm | पैसा

सुरेख! गझलेच्या प्रकारांची ओळख करून देत आहात हे अजून छान!

सतिश गावडे's picture

17 May 2017 - 12:12 am | सतिश गावडे

मी सहसा काव्य हा प्रकार गांभिर्याने घेत नाही. मात्र ही गझल खरंच अंतर्मुख करुन गेली.

दशानन's picture

17 May 2017 - 8:13 am | दशानन

सुरेख गझल!

पद्मावति's picture

17 May 2017 - 1:37 pm | पद्मावति

खरोखर सुन्दर.

स्पा's picture

17 May 2017 - 8:21 pm | स्पा

जबरदस्त

नूतन सावंत's picture

17 May 2017 - 8:24 pm | नूतन सावंत

सुरेख गझल

कपिलमुनी's picture

17 May 2017 - 8:27 pm | कपिलमुनी

मार्च ७
अप्रिल १२
आणि अर्ध्या मे मधे ७ अशा गझलधारांनी मिपाकरांना चिम्ब केल्यबद्दल धन्यवाद!

सत्यजित...'s picture

18 May 2017 - 2:58 am | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

प्रमोद देर्देकर's picture

18 May 2017 - 6:50 am | प्रमोद देर्देकर

चटका लावणारी गझल.

विशाल कुलकर्णी's picture

18 May 2017 - 10:22 am | विशाल कुलकर्णी

सुरेख गझल ...

सत्यजित...'s picture

19 May 2017 - 4:08 pm | सत्यजित...

प्रमोद,विशाल धन्यवाद!

शब्दबम्बाळ's picture

22 May 2017 - 6:22 pm | शब्दबम्बाळ

अत्यंत ताकदीची गझल... एक एक शेर अत्यंत विचारपूर्वक रचला आहे..
फार आवडली...

पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती
जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली!

सध्या उत्तमोत्तम कविता/गझल येत आहेत.. वाचायला छान वाटते, धन्यवाद! :)

सस्नेह's picture

23 May 2017 - 11:34 am | सस्नेह

खिन्न ! चटका लावणारी गझल !

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 12:47 pm | किसन शिंदे

अत्यंत सुरेख गझल. जवळ जवळ सगळीच कडवी आवडली.

सत्यजित...'s picture

25 May 2017 - 10:01 pm | सत्यजित...

शब्दबंबाळ,स्नेहांकिता,किसन शिंदे मनःपूर्वक धन्यवाद!