रुपाली :
गप्पा चांगल्या रंगात आल्या हुत्या अन तितक्यात वस्ताद्या कडमडला. कोण बेणं मेलंय सांगायलेबी तयार नवता हरामी. फौजदार लागोलाग लटांबर घीऊन निघून गेला.
काय त्या चारचार गाड्या, रायफली अन हवालदार.
इतक्यात कोणी आपल्याला पहायला यील वाटलंच नव्हतं. आबा म्हणत होते शिक्षण हुदे मग लग्नाचं पाहू. अन काल एकदम बॉम्बच टाकला. सकाळचे जेवणं झाल्यावर त्यांनी डिक्लेयर करून टाकलं की उद्या रुपीला पहायला एक पोरगा येणार हाये. तालुक्यात इन्स्पेक्टर हाये…पक्की सरकारी नोकरी, पाण्याखालची पन्नास एक्कर जमीन, मोक्याच्या जागी दोनचार प्लॉट अन बंगला. तालेवार पार्टी. लय खुश होता आबा, आयच्यापण चेहऱ्यावर चमक आली.
"काय नाव म्हण्लं पोराचं ?" तिनं विचारलं.
"यशवंतराव दांडगे पाटील. सखाबा बुढ्याचा नातू."
"कोण सखाबा हो, सगळी शेती फूकून तालुक्याले पळून गेलं होतं ते का?"
"हा तेच. पण जगनरावनं, म्हंजे बुढ्याच्या पोरानं नाव काढलं, मोठाल्या फॅक्टऱ्या उघडल्या, बक्कळ पैका कमवला. पोरालेबी शिकवून इन्स्पेक्टर केलं."
मग काय, आय राजीखुशी तयार झाली.
मी नेहमीसारखी शिक्षणाची ढाल पुढं केली तर आबा म्हणले की आता साखरपुडा करू अन लग्न सहा महिन्यानंतर. माझी बोलतीच बंद झाली.
पुढचं पुढं पाहू या इचारानं मी होकार दिला.
दुसऱ्या दिवशी, नाही नाही म्हणत आसतानापण नानीनं मला लग्नातल्या घोडीसारखं सजवलं. विक्याला कसं समजलं काय माहीत, सकाळपासून चारदा घिरट्या घालून गेलं टोणगं. देवदासवानी थोबाड झालं होतं त्याचं. पण मी काय त्याले भीक घातली न्हाई.
दुपार झाली तरी आलं नाय पोरगं. रट्टावून जेवून झोपी गेले. हालग्या अन लेझीमच्या आवाजानं जाग आली. पाह्यते त काय, पोलिसाच्या दोन डंगऱ्या जिपा अन रायफलीवाले साताठ हवालदार. पोरगी पाहायले आलं का एनकाउंटर करायले आलं येडं.
थोड्या वेळानं आशी पळत आली अन म्हणे पाव्हणे वर येतायेत तुह्याशी बोलायले. हाये का आता. लयच कंडेल दिसतंय काट्टं.
आलं अन गारेगार हवा खात बसलं सोप्यावर.मी दरवाजाच्या फटीतून लपून पाह्यलं, एवढं काही वाईट दिसत नव्हतं, बॉडीगीडी तर लय भारी होती. तिथंच ठरवलं, याले घोळात घ्यायचं. सगळं झाल्यावर मास्तरचा काटा काढायले याच्यापेक्षा जबरी बकरू भेटलं नसतं. झालीच तर थोडी मजाबी करून घेता आली आसती.
चहाचा ट्रे उचलला अन जमिनीकडं नजर लावून खोलीत गेले. जवळ गेले तर झिणझिण्याच आल्या नाकाला. ज्वाला मिरचीच्या शेतात लोळून आला का काय हा ?
"फौजदार सायेब, बाकी कायबी म्हणा, तुमाला बघितल्यावर ठसकाच लागला बघा मला." मी हासत हासत म्हंले.
त्याला काही बोलताच आलं नाही पुढं. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. एवढा रूबाबदार फौजदार अन पोरीशी बोलायला फाटते. कोराच हाये की काय आजुन !
"रुपालीजी, घर छान हाये तुमचं...आवडलं."
मी ठेवणीतलं हासले. असं हासलं की माझ्या गालावर झकास खळी पडते अन मी सेक्सीबिक्सी दिसते हे मला माहीत होतं.
"फक्त घरंच आवडलं का अजून काही ?" मी पायाच्या अंगठ्याकडं नजर ठेवून बोलले.
त्याला इशारा कळला हे नशीब.
"घरापेक्षा तुम्ही जास्त आवडल्या."
मी लय भारी लाजले.
गप्पा चांगल्या रंगात आल्या हुत्या अन तितक्यात वस्ताद्या कडमडला.
-------------
रातीचे साडेअकरा वाजले होते. गावकुसाबाहेर असलेल्या मास्तरच्या घराला अजून जाग होती. उन्हाळा असूनपण दरवाजे खिडक्या बंद होत्या. आतल्या खोलीत दोन खुर्च्या समोरासमोर मांडल्या होत्या. मधात ठेवलेल्या लाकडी स्टुलावर दोन भरलेले ग्लास, अन प्लेटीत चिकन कंटकीच्या तंगड्या होत्या. पोटभर पिऊनपण कोणाला जास्त चढली नव्हती.
"त्या रांडीच्या रूपीचा कावा मला चांगलाच ठाऊक आहे. ती कोणाकोणासोबत झोपती याचीपण खबर हाय. खजिना भेटला की तिला चकण्यातल्या खड्यासारखा बाजूला फेकणार हाय मी." मास्तर चिकनपीस वरचं मास ओरबाडंत बोलला.
"खजिना भेटल तव्हा भेटंल पण लय मजा मारली राव तू."
"तूपण घे पिळून, उसात लय रस शिल्लक हाये."
दोघंजण पिवळीजरत बत्तीशी दाखवत फीदीफीदी हासले. हाडकाचा कणोरा घशात गेल्यानं पाव्हण्याले ठसका लागला. मास्तरनं दिलेलं पाणी त्यानं तहानलेल्या रेडकावानी घटाघटा पिऊन टाकलं.
"त्या सखारामनं खरोखर आत्महत्या केली आसंन का ?"
"बायली काय माहीत. आपल्या हद्दीत येत न्हाय हा एरिया. मी कहून उरावर घीऊ नसत्या कटकटी."
मास्तर काही जास्त बोलला नाही.
"मास्तुरड्या, त्यो नकाशा दावणार होता न तू ?"
"अरे हाव गड्या, विसरलोच."
मास्तरनं कोपरीच्या आत घुसाडलेला पिवळसर कागद भायेर काढला. इन्स्पेक्टरनं तो लगेच हिसकावुन घेतला.
"यशा, नकाशातलं तुला काही शेट्टं समजणार न्हाइ आण हिकडं."
"तू हाये न बिरबलाची औलाद, सांग काय अर्थ लागला." तो नकाशा परतवंत बोलला.
"असं समज की तिजोरीची एक किल्ली गायब आहे अन ती गावल्याशिवाय आतला मालाचं दर्शन होणार नाही.”
"म्हंजे ?"
"हे पाह्य."
असं म्हणून मास्तरनं नकाशा समोर धरला. हे आहेत तीन चिन्ह."
इन्स्पेक्टर आता दारू प्यायचं विसरून लक्षपूर्वक ऐकू लागला होता.
"हे पहिलं चिन्ह...शिंगावाल्या घोड्याचं तोंड. ही आहे विक्याची पिढीजात निशाणी. दुसरं चिन्ह पांढऱ्या लांडग्याचं तोंड. ही पुजाऱ्याच्या घराण्याची निशाणी. प्रत्येक घराण्याच्या काही परंपरा अन चालीरीती असतात. त्यानुसार या चिन्हांचा वापर घेत पुढं जावं लागतं. आता हे तिसरं चिन्ह पाह्य....गुरकावणाऱ्या लाल वाघाचं तोंड.याचा अर्थ लागंना म्हणून काम अडलंय.”
“मग आता रं ?”
"त्या चिन्हाचा मी लावतो तपास. तू फक्त रूपीवर फोकस कर. तीनं खजिन्याचा दुसरा कागद दाबून ठेवलाय."
"बायली चिंताच नको करू. कोणती गोष्ट कोणाकडून कशी काढायची या यशवंतरावाला चांगलंच ठावं हाये."
“जे ब्बात. इस बातपर हो जाये और एक पेग.”
आनंदानं फुदकत फुदकत दोघांनीपण अजून दोनदोन पेग मारले. नंतर इन्स्पेक्टर यशवंतराव छाती ताणून बाहेर आला अन अंधारात पार्क केलेल्या एन्फिल्डवर टांग टाकून पसार झाला.
सातआठशे मीटर लांब आल्यावर धरणाच्या पूलावर गाडी आली. दहा बंद लाईट पार केल्यावर अकरावा खांबा लागला . त्याच्यावरचा लाईट संत्र्या कलरचा उजेड फेकत होता. यशवंतरावनं आजूबाजूला पाहिलं अन गाडी थांबवली. खाली बऱ्याच खोलवर आटत चाललेलं पाणी अंधारात डुचमळत होतं. थंडगार वाऱ्याच्या झुळका मुजोरासारख्या फटकारत होत्या.
त्यानं हळूच आपलं शर्ट वर केलं. कमरेच्या चार बोटं वर गुरकावणाऱ्या वाघाचं लालभडक तोंड गोँदलेलं होतं.
-------------------------------------------
प्रतिक्रिया
21 Apr 2017 - 9:25 pm | Ranapratap
मस्त टर्न दिला, पण भाग थोडे लवकर टाका. कथेचा ग्रामीण टच कायम ठेवला आहे. पु भा प्र
22 Apr 2017 - 12:11 am | रातराणी
कथा तिथेच तिथेच फिरत आहे असं वाटतंय, प्रत्येक जण नवीन भाग लिहिताना पुन्हा नव्याने पात्र परिचय करून देत असल्यासारखं वाटतंय. तेवढं टाळता आलं तर झकास!
22 Apr 2017 - 8:02 am | सुखी
Rashomon effect सारखी चाललीये
22 Apr 2017 - 8:40 am | पुंबा
मस्त ट्विस्ट. पण मास्तर आणि यशवंतरावची युती कशी झाली म्हणायची? अन आता ह्याच पात्रांत खेळावं लागणार आहे? मज्जा येणारंय. पुढचा खो कोणाला?
24 Apr 2017 - 10:41 am | बापू नारू
छान लेख जमलाय ,स्टोरी परत रूट वर आली.
24 Apr 2017 - 5:24 pm | अॅस्ट्रोनाट विनय
धन्यवाद
24 Apr 2017 - 6:30 pm | प्राची अश्विनी
छान चाललीय कथा.
3 May 2017 - 12:49 pm | पुंबा
अरे, खो कुणाला दिलाय? आणि कधि येणारंय नवी कथा?
9 May 2017 - 11:13 pm | भिंगरी
खो खो चा खेळ संपला वाटतं.
15 May 2017 - 9:53 am | सुखी
लाल भडक वाघ्याच्या तोंडचं के झाला पुढे?
27 May 2017 - 3:48 pm | एमी
याचा पुढचा भाग कधी?
29 May 2017 - 11:06 am | पुंबा
++११
का आम्ही नाद सोडावा?
:p