मोसाद - भाग १४

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
5 Apr 2017 - 12:29 am

मोसाद - भाग १३

मोसाद भाग १४

१९८० चं दशक हे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात मोठी उलथापालथ घडवणारं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तरीच्या दशकातले राजकीय नेते या दशकाच्या सुरुवातीला अंतर्धान पावले. १९७९ मध्ये इराणमध्ये घडून आलेल्या इस्लामिक क्रांतीमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन सरकारने ते संपूर्ण प्रकरण हाताळलं त्यामुळे जिमी कार्टर यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल अमेरिकेत असंतोष होता. तो जनतेने रोनाल्ड रीगन यांना निवडून देऊन दाखवून दिला. ब्रिटनमध्येही सततचे संप आणि हरताळ यांच्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. त्या लाटेवर स्वार होऊन काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मार्गारेट थॅचर पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. सोव्हिएत रशियामध्येही जनरल सेक्रेटरी लिओनिद ब्रेझनेव्ह यांचं निधन झालं आणि के.जी.बी.चे माजी प्रमुख युरी आंद्रोपोव्ह नवीन जनरल सेक्रेटरी बनले.

इझराईल आणि मोसाद यांच्यातही यावेळी बदल घडून येत होते. इसेर हॅरेलनंतर पहिल्यांदाच गुप्तचर सेवेत असलेला माणूस मोसादचा प्रमुख संचालक बनला होता. हॅरेलने तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान बेन गुरियन यांना सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या मायर अमितची संचालकपदी निवड करावी लागली होती. अमितनंतर संचालक झालेला झ्वी झमीर आणि त्याच्यानंतर त्या पदावर आलेला यित्झाक होफी हे दोघेही इझराईलच्या सैन्यदलातले अधिकारी होते आणि त्यांना हेरगिरीची काहीही पार्श्वभूमी नव्हती. तशी पार्श्वभूमी असलेला माणूस आता मोसादचं संचालकपद भूषवत होता. त्याचं नाव होतं नाहूम आदमोनी.
खरंतर यावेळीही इझरेली सैन्यदलातून आलेलाच माणूस मोसादचा संचालक बनला असता. त्याचं नाव होतं जनरल येकुतीएल आदाम. १९७६ च्या जगप्रसिद्ध एंटेबी विमान अपहरण प्रकरणात आदामने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. पण १९८२ मध्ये लेबेनॉनची राजधानी बैरूटमध्ये उफाळलेल्या संघर्षात आदाम अनपेक्षितरीत्या मारला गेला आणि आदमोनीची मोसाद संचालकपदी निवड झाली.

जवळपास २० वर्षानंतर आदमोनीसारखा प्रत्यक्ष अनुभव असलेला संचालक लाभल्यामुळे मोसादमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. त्याच्या कारकीर्दीत मोसाद नक्कीच नवीन शिखर गाठेल अशी सगळ्यांचीच रास्त अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र जे घडलं ते या अपेक्षेपेक्षा वेगळं होतं. १९८२ ते १९८९ या आदमोनीच्या काळात मोसादला तीन अशा प्रकरणांना सामोरं जावं लागलं, ज्यामुळे मोसादची कार्यपद्धती आणि मूल्यव्यवस्था यांच्यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली. आजही मोसादमध्ये त्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

पहिलं प्रकरण जोनाथन पोलार्डचं. टेक्सासमधल्या एका ज्यू कुटुंबात जन्माला आलेल्या पोलार्डची लहानपणापासूनच प्राचीन इझराईल, ज्यूंचा नाझीप्रणित वंशसंहार आणि अरब-इझराईल संघर्ष याबद्दल टोकाची मतं होती. कॉलेजमध्ये शिकत असताना तो जो भेटेल त्याला आपण अमेरिका आणि इझराईल यांचे दुहेरी नागरिक आहोत असं ऐकवत असे – असं काहीही नसताना. कसंबसं शिक्षण पूर्ण केल्यावर पोलार्डने सी.आय.ए. आणि अमेरिकन नौदलाच्या गुप्तचर शाखेमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. सी.आय.ए. मध्ये त्याला पॉलीग्राफ टेस्ट घ्यावी लागली आणि त्यात त्याने आपण १९७४ ते १९७८ या काळात ड्रग्ज घेत होतो असं मान्य केल्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. पण नौदलाने मात्र त्याचा अर्ज स्वीकारला आणि १९ सप्टेंबर १९७९ या दिवशी अमेरिकन नौदलाची गुप्तचर संस्था NIC मध्ये त्याची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली. त्याने बरीच खोटी माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. पण बरखास्तीऐवजी पोलार्डची बदली करण्यात आली. ही बदली झाल्यावर काही काळाने त्याची अॅव्हिएम सेला नावाच्या इझरेली विमानदलाच्या अधिकाऱ्याशी ओळख झाली. सेला त्यावेळी सुट्टीवर होता आणि न्यू यॉर्क विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पदवीसाठी अभ्यास करत होता.
सेला आणि पोलार्ड यांची चांगलीच घनिष्ठ मैत्री झाली. इझराईल हा दोघांना जोडणारा दुवा होताच. याच सुमारास पोलार्डने सेलाला आपण नक्की कोण आहोत आणि काय करतो हे सांगितलं. त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं की अमेरिकन नौदलाकडे अरब राष्ट्रांच्या नौदलाची बरीच माहिती आहे, कारण बहुसंख्य अरब नौदलांच्या युद्धनौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रं आणि विमानं ही रशियन बनावटीची होती. पण ही माहिती नौदलाने मुद्दामहून इझराईलपासून दडवलेली आहे. सेलाने ही माहिती इझरेली विमानदलाच्या गुप्तचर संस्थेला दिल्यावर तिथले तज्ञ विचारात पडले. त्यावेळी ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधान होत्या आणि अमेरिकेत रोनाल्ड रीगन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची आणि पर्यायाने त्यांच्या देशांच्या गुप्तचर संस्थांची मैत्री प्रसिद्ध होती आणि ब्रिटनच्या एम.आय. ६ आणि मोसादचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. मोसादमुळे ब्रिटन आणि अरब राष्ट्रांमधले संबंध बिघडण्याची शक्यता आहे यावर थॅचरबाईंचा ठाम विश्वास होता आणि त्यामुळे अमेरिकेचंही इझराईलबद्दल तसंच नकारात्मक मत झालं असणार असं मोसादला वाटत होतं आणि सेलाने दिलेल्या माहितीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा होतं.
अजून एक शक्यता होती. सी.आय.ए.ने अमेरिकेतून इझरेली हेरांना बाहेर काढण्यासाठी एखादी योजना कार्यान्वित केली असावी आणि त्यामुळे पोलार्डने सेलाशी मैत्री केली असावी. मोसाद आणि इझरेली विमानदलाच्या गुप्तचरांनी ही शक्यता आजमावून पाहायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सेलाला सूचना दिल्या. पण त्यांचा पोलार्डवरचा संशय अनाठायी असल्याचं थोड्याच काळात सिद्ध झालं. जून १९८४ मध्ये पोलार्डने सेलाला अमेरिकन नौदलाची गुप्त माहिती पुरवायला सुरुवात केली. पण त्या वर्षाच्या शेवटी तो पकडला गेला. तो दर शुक्रवारी ऑफिसमध्ये सामसूम असताना गुप्त माहिती बाहेर घेऊन जायचा. जेव्हा त्याच्या वरिष्ठांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी एफ.बी.आय.ला सूचित केलं आणि त्याप्रमाणे एफ.बी.आय.ने पोलार्डला अटक केली. त्याला अटक झाल्यावर त्याने एक परवलीचा शब्द वापरून आपल्याला अटक झाल्याचं आपल्या पत्नीला कळवलं. तिच्याकडून ते पोलार्डकडून माहिती घेणाऱ्या इझरेली अधिकाऱ्यांना समजलं आणि ताबडतोब ते अमेरिका सोडून निघून गेले. पोलार्डच्या पत्नीला मात्र अटक झाली.
पण अजूनही पोलार्ड कुणासाठी हेरगिरी करतो आहे ते एफ.बी.आय.ला समजलं नव्हतं. त्यांच्या सतत चाललेल्या प्रश्नोत्तरांपुढे अखेरीस त्याने शरणागती पत्करली आणि आपण इझराईलसाठी हेरगिरी करत असल्याचं मान्य केलं. सी.आय.ए. आणि मोसाद यांचे आधीच ताणलेले संबंध पोलार्ड प्रकरणामुळे अजून बिघडले. पोलार्ड इझराईलकडे गुप्त माहिती घेऊन आला होता आणि इझराईलने त्याला कुठल्याही प्रकारे अमेरिकेविरुद्ध हेरगिरी करायला प्रेरित केलं नव्हतं हे मोसादने पुनःपुन्हा सांगितलं पण सी.आय.ए.ने त्यावर विश्वास ठेवायचं नाकारलं. पुढे पोलार्डने त्याच्यावर चाललेल्या खटल्यात साक्ष म्हणून हेच सांगितल्यावर सी.आय.ए.चा राग थोडाफार कमी झाला.

पोलार्ड प्रकरणामुळे मोसादची ढासळलेली पत सावरण्याची संधी मोसादला लगेचच मिळाली, पण त्यामुळे आदमोनीच्या कारकीर्दीतल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली. हे प्रकरण म्हणजे इराणगेट किंवा इराण- काँट्रा प्रकरण. १९८० मध्ये निवडून आलेले रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष रीगन १९८४ मध्ये परत निवडून आलेले होते. त्यांच्या कारकीर्दीत अमेरिकेचं परराष्ट्रीय धोरण आक्रमक झालेलं होतं. रीगन यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख होता. या जाहीरनाम्यानुसार अमेरिकेला जगात दोन शत्रू होते – कम्युनिझम आणि इस्लामी मूलतत्ववाद. कम्युनिझमचं प्रतीक म्हणजे अर्थातच सोव्हिएत रशिया आणि इस्लामी मूलतत्ववादाचं तेव्हा असलेलं प्रतीक म्हणजे इराण. (त्यावेळी ओसामा बिन लादेन अमेरिकन शस्त्रांच्या मदतीने अफगाणिस्तानात रशियन सैनिकांशी लढत होता आणि अल कायदाचा जन्म व्हायचा होता.) इराणमध्ये १९७९ मध्ये आयातुल्ला खोमेनीच्या नेतृत्वाखाली झालेल्या इस्लामिक क्रांतीमध्ये इराणची राजेशाही उलथली गेली होती. इराणचा शहा हा अमेरिकन शस्त्रांचा मोठा ग्राहक होता. तो आणि इराकचा सद्दाम हुसेन यांच्यात आखाती राष्ट्रांमधली अमेरिकन शस्त्रं समसमान वाटली गेलेली होती. आता ही शस्त्रं खोमेनीच्या सैनिकांच्या हातात होती. अमेरिकन वकिलातीला ४४४ दिवस वेढा घालून इराणच्या नवीन सरकारने अमेरिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते दाखवून दिलेलं होतंच. त्याशिवाय लेबेनॉनमध्ये हेझबोल्लाह हा दहशतवादी गट प्रबळ होता. हा शियापंथीयांचा गट होता आणि त्याला शियापंथीय इराणचा पूर्ण पाठिंबा होता. अमेरिकन अधिकाऱ्यांचं अपहरण करणं आणि त्यांना हालहाल करून ठार मारणं यात हेझबोल्लाहचा हातखंडा होता. १९८४ मध्ये त्यांनी सी.आय.ए.च्या बैरुट स्टेशनचा प्रमुख विल्यम बकलीचं अपहरण करून त्याला ठार मारलं होतं. त्यामुळे अमेरिकेने इराणवर आणि इराणला शस्त्रास्त्रं विकण्यावर कडक निर्बंध घातलेले होते.
त्याच सुमारास अमेरिकेच्या अगदी जवळ – उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या संयोगभूमीमधल्या एका छोट्या देशात एक वेगळंच नाट्य आकाराला येत होतं. या देशाचं नाव होतं निकाराग्वा. १९७९ मध्ये निकाराग्वामध्येही क्रांती घडून आलेली होती आणि तिथे अमेरिकन मदतीवर अनिर्बंध राज्य करणाऱ्या हुकुमशहा अनास्तासिओ सामोझाची राजवट डाव्या मार्क्सिस्ट क्रांतिकारकांनी उलथून टाकलेली होती. या क्रांतिकारकांच्या दलाचं नाव होतं सँडिनिस्ता आणि त्यांचा प्रमुख होता होजे डॅनियल ओर्तेगा. ओर्तेगाला अर्थातच क्युबा आणि सोव्हिएत रशिया यांचा पाठिंबा होता. अमेरिकेच्या एवढ्या जवळ कम्युनिस्ट राजवट स्थापन होणं हे अर्थातच रीगन सरकारला सहन होण्यासारखं नव्हतंच. १९५९ मध्ये क्युबामध्ये क्रांती होऊन अमेरिकेच्या अगदी जवळ – जेमतेम १०० मैल – कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं होतं. निकाराग्वा तर क्युबापेक्षाही जवळ होता. तिथली कम्युनिस्ट क्रांती जवळच्या ग्वाटेमाला, बेलीझ, एल साल्वाडोर इत्यादी देशांमध्ये पसरण्याचा धोका होता. या देशांमध्ये अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध होते. त्यामुळे रीगन सरकारने निकाराग्वावरही अनेक निर्बंध लादले आणि गुप्तपणे निकाराग्वामधली सँडिनिस्ता राजवट खिळखिळी करून टाकायचे प्रयत्न सुरु केले. निकाराग्वामध्ये सर्व लोकांचा अर्थातच ओर्तेगाला पाठिंबा नव्हता. त्यामुळे सी.आय.ए. ने ओर्तेगा आणि सँडिनिस्ता-विरोधी लोकांना एकत्र आणून त्यांना गनिमी युद्धाचं प्रशिक्षण देण्याची आणि त्यांना ओर्तेगाविरोधी उठाव करण्यासाठी मदत करायची योजना आखली. १९८४ मध्ये रीगन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. निकाराग्वामध्येही निवडणुका झाल्या. एखाद्या कम्युनिस्ट देशात स्वतंत्र वातावरणात निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ होती. या निवडणुकांमध्ये सँडिनिस्तांना बहुमत मिळालं आणि ओर्तेगा निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष झाला. तो लोकशाही पद्धतीने निवडून आलेला असल्यामुळे आणि या निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र वातावरणात झालेल्या असल्याचं प्रमाणपत्र संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेलं असल्यामुळे अमेरिकेला उघडपणे काही करता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे अमेरिकन काँग्रेसने (संसद) निकाराग्वामधल्या सरकारविरुद्ध कारवाई करण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यायला नकार दिला. इकडे सी.आय.ए. ने गनिमी सैनिकांना – यांना काँट्रा असं नाव होतं – प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. पण पैसे नसल्यामुळे हे प्रशिक्षण संपुष्टात येण्याची शक्यता होती. तेव्हा रीगन सरकारमधल्या काही हिकमती लोकांनी एक शक्कल लढवली. त्यावेळी इराण आणि इराक यांच्यातलं युद्ध ऐन भरात होतं आणि इराक शस्त्रांस्त्रांमध्ये वरचढ असल्यामुळे इराणला भारी पडत होता. रशिया अफगाणिस्तानमध्ये अडकलेला असल्यामुळे इराणला रशियाकडून शस्त्रं मिळण्याची शक्यता खूपच कमी होती आणि रशियाचीही इराणला शस्त्रं विकण्याची इच्छा नव्हती. इराणजवळ असलेल्या कझाकस्तान, अझरबैजान इत्यादी मुस्लीमबहुल संघराज्यांमध्ये इराण आपली इस्लामिक क्रांती पसरवेल अशी सार्थ भीती रशियाला वाटत होती. एकूण काय, तर इराणला शस्त्रांची गरज होती. या लोकांनी इराणला शस्त्रं विकून ते पैसे काँट्रा गनिमांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्याचा तिरपागडा मार्ग शोधून काढला. त्यांना उघडपणे तर हे करता येणं शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांनी त्याकामी इझराईलची मदत घ्यायचं ठरवलं. इझराईलला पोलार्ड प्रकरणामुळे सी.आय.ए. आणि मोसाद यांच्यात निर्माण झालेलं संशयाचं वातावरण लवकरात लवकर पूर्वपदाला आणायचं होतं, त्यामुळे त्यांनीही त्याला होकार दिला. शिवाय अमेरिकेचा अजून एक हेतू होता. हेझबोल्लाह दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या अमेरिकन नागरिकांची सुटका. इझराईलला हेझबोल्लाह लेबेनॉनमध्ये शिरजोर व्हायला नको होते, त्यामुळे तेही या हेतूशी सहमत झाले.
नोव्हेंबर १९८६ मध्ये अश शीरा नावाच्या लेबनीज मासिकाने हे प्रकरण उघडकीस आणलं. इराणच्या सैन्यातल्या मेहदी हशेमी नावाच्या अधिकाऱ्याचा त्यांनी संदर्भ दिला होता. जेव्हा हे घडलं तेव्हा अशी प्रकरणं उघडकीला आल्यावर जे होतं तेच झालं. त्यात भाग घेणाऱ्यांची प्रचंड बदनामी झाली. राष्ट्राध्यक्ष रीगनना देशाला उद्देशून भाषण करावं लागलं आणि या प्रकरणाची कबुली द्यावी लागली. पुढे रीगन यांच्या राजवटीत उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉर्ज बुश सीनियर यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत या प्रकरणातल्या बऱ्याच लोकांना आपले खास अधिकार वापरून माफी दिली.

पण ही दोन्ही प्रकरणं काहीच नाहीत असं तिसरं आणि अजून सनसनाटी प्रकरण म्हणजे मोर्देचाई वानुनू. “ मी हेर आहे “ असं एखाद्या मोठ्या फलकावर लिहून जाहीर करणं ही एकच गोष्ट कदाचित वानुनूने केली नसेल. बाकी सगळे चाळे त्याने स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी केले.

वानुनू इझराईलच्या दिमोना येथे असलेल्या अणुभट्टी प्रकल्पात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. दिमोना हा इझराईलचा अत्यंत गुप्त, महत्वाचा आणि तितकीच कडक सुरक्षा असलेला प्रकल्प होता. विशेष म्हणजे तिथे नक्की काय चालतं याबद्दल इझरेली सरकार आणि प्रसारमाध्यमं या दोघांनीही मौन बाळगलं होतं. परदेशी वर्तमानपत्रांची, विशेषतः अरब आणि रशियन वर्तमानपत्रांची मात्र इझराईल अण्वस्त्रं विकसित करत असल्याची पूर्ण खात्री होती.

दिमोनामध्ये नोकरी मिळणं सोपं नव्हतं. तिथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही माणसाला असंख्य अर्ज भरावे लागत आणि तितक्याच असंख्य प्रश्नोत्तरांना तोंड द्यावं लागत असे. त्यांनी या अर्जांमध्ये लिहिलेल्या पार्श्वभूमीची इझरेली प्रतीहेरगिरी संस्था शाबाककडून कसून तपासणी होत असे, आणि या सगळ्या चाचण्या समाधानकारकरीत्या पूर्ण करणारे लोकच दिमोनामध्ये पाय ठेवू शकायचे आणि या चाचण्या आणि सुरक्षा तपासणी हे त्यांना दिमोनामध्ये नोकरी मिळायला लागल्यानंतरही चालू राहात असे.

वानुनूने दिमोनाबद्दल वर्तमानपत्रांत आलेली जाहिरात वाचून अर्ज केला, त्याची कसून तपासणीही करण्यात आली आणि त्यानंतर त्याला तिथे नोकरी मिळाली. नंतर जेव्हा त्याची कृत्यं उघडकीला आली तेव्हा मोसादने याच गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते वानुनूला दिमोनामध्ये नोकरी मिळायलाच नको होती.

वानुनू कट्टर डाव्या विचारसरणीचा पाईक होता. त्याचे अनेक अरब मित्र होते आणि ते चक्क कम्युनिस्ट होते. त्यांच्यातले बरेच जण राका नावाच्या राजकीय पक्षाचे सभासद होते. हा पक्ष मार्क्सिस्ट विचारांचा होता आणि त्याचा झिओनिस्ट विचारसरणीला कडवा विरोध आणि पॅलेस्टिनी अरबांच्या मागणीला पाठिंबा होता. त्यांनी आयोजित केलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये आणि प्रचारफेऱ्यांमध्ये वानुनू नेहमी सहभागी होत असे. त्यांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये घोषणा देत असताना त्याचे अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या सरळसरळ इझराईलविरोधी सभांमध्ये वानुनू भाषणही करत असे. त्याने त्या अनुषंगाने अनेक वर्तमानपत्रांना मुलाखतीही दिल्या होत्या.
एवढंच असतं तरी एकवेळ ठीक होतं, पण वानुनूच्या छोटेखानी फ्लॅटमध्ये राकाच्या जहालवादी नेत्यांना मुक्तद्वार होतं. ते नियमितपणे तिथे राहात असत. वानुनू बेन गुरियन विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिकत असताना त्याची त्याच्या टोकाच्या विचारांबद्दल ख्याती होती.

तो हुशार नक्कीच होता, पण त्याची वृत्ती धरसोडपणाची होती. डावी विचारसरणी अंगीकारण्याआधी तो कट्टर उजव्या विचारसरणीचं पालन करत होता आणि अरबविरोधी भाषणं करणाऱ्या राब्बाय कहानचा समर्थक होता. नंतर त्याने अतिउजव्या हातेचीया पक्षाला पाठिंबा दिला, पण निवडणुकीत लिकुड पक्षाला मत दिलं आणि शेवटी तो डाव्या पक्षांमध्ये सामील झाला. त्याच्या म्हणण्यानुसार १९८२च्या लेबेनॉन युद्धामुळे त्याचं राजकीय मतपरिवर्तन झालं होतं. तो जरी इतर लोकांबरोबर असला तरी त्याचे मित्र फारच कमी होते आणि आपण मूळचे मोरोक्कन ज्यू असल्यामुळे आपल्याविरुद्ध नेहमी भेदभाव केला जातो अशी त्याची ठाम धारणा होती. जेव्हा त्याला इझरेली विमानदलाची चाचणी पार करता आली नाही तेव्हा त्याची ही धारणा अजून पक्की झाली. विमानदलाऐवजी त्याची निवड अभियांत्रिकी दलामध्ये करण्यात आली. तिथून राजीनामा देऊन तो बाहेर पडला आणि मग त्याने तेल अवीवमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करायला सुरुवात केली. ते मध्येच सोडून तो बीरशेबा शहरात राहायला गेला आणि तिथल्या विद्यापीठात त्याने अर्थशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर त्याने तेही सोडून दिलं आणि तो तत्वज्ञानाचा विद्यार्थी बनला. मग त्याने मांसाहार सोडून दिला आणि तो कट्टर शाकाहारी बनला.

काही गोष्टी मात्र त्याने सोडल्या नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैशांची लालसा. त्याच्या वर्गमित्रांना त्याबद्दल त्याचं कौतुक वाटत असे. तो त्यांना नेहमी सांगत असे की त्याची काहीही काम न करता केवळ स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायची इच्छा आहे. आपल्या डायरीमध्ये त्याने स्टॉक मार्केट, तत्वज्ञान आणि इंग्लिश भाषा तीन गोष्टी प्राधान्याने आणि या क्रमाने शिकायच्या आहेत असं लिहिलं होतं. पैसे कमावण्याच्या आपल्या हौसेपायी त्याने अनेक ‘ वेगळी ’ कामं केली होती, उदाहरणार्थ नग्न मॉडेल, टेस्टिंग ड्रायव्हर वगैरे.

या सगळ्या गोष्टींचा सरकारशी, किंवा दिमोना अणुभट्टी प्रकल्पाशी काहीही संबंध नव्हता पण राकाशी संबंध ठेवणं किंवा पॅलेस्टिनी अरबांशी घसट असणं या नक्कीच विचार करण्यासारख्या गोष्टी होत्या. पण काही करण्याऐवजी शाबाक अधिकाऱ्यांनी त्याला भेटायला बोलावलं आणि या ‘ उचापती ’ थांबवायला सांगितलं आणि त्याला सूचना दिली गेली आहे असं लिहिलेल्या एका कागदावर सही करायला सांगितलं. वानुनूने सही वगैरे काहीही केली नाही आणि आपल्या उचापतीही थांबवल्या नाहीत.

दिमोना प्रकल्प इझराईलच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यामुळे शाबाकने तिथल्या अधिकाऱ्यांकडे वानुनूच्या पार्श्वभूमीबद्दल एक अहवाल पाठवला. त्यांनी तो अहवाल आपल्या दप्तरांमध्ये बंद करून ठेवला. विषय संपला. त्यावर नंतर काहीही कारवाई झाली नाही. वानुनूवर निदान पाळत ठेवायला हवी होती. पण तेही झालं नाही. हे फार गंभीर दुर्लक्ष होतं आणि अनेक लोकांनी आपलं कर्तव्य न बजावल्यामुळे पुढच्या घटना घडल्या असं आज म्हणावं लागेल.

इकडे वानुनू आपल्या राजकीय ‘उचापती ’ अगदी सुखेनैव करत होता. त्याला कुणीही कुठल्याही प्रकारे हटकत नव्हतं. दिमोनामध्ये अनेक विभाग होते. त्यातल्या इन्स्टिट्यूट २ या अत्यंत गुप्त विभागात वानुनू तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. दिमोनामध्ये काम करणाऱ्या २७०० लोकांपैकी फक्त १५० जणांना या विभागात प्रवेश होता. वानुनूकडे दोन बॅजेस होते – एक दिमोना प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी आणि दुसरा या इन्स्टिट्यूट २ मध्ये येण्यासाठी.

बाहेरून जर कुणीही पाहिलं असतं तर दिमोना म्हणजे एक दुमजली इमारत दिसली असती आणि तिथे कुठलीतरी गोदामं आहेत असाच पाहणाऱ्याचा समज झाला असता. पण चौकस लोकांच्या लक्षात आलं असतं की या इमारतीमध्ये लिफ्ट आहे आणि दुमजली इमारतीला लिफ्ट कशासाठी हवी असा प्रश्नही त्यांना पडला असता. ही लिफ्ट वर नाही तर खाली जाण्यासाठी होती. इझरेली सरकारने दिमोनाची उभारणी करताना ७ मजले जमिनीच्या खाली बनवले होते आणि बाहेरून हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं, अगदी संपूर्ण पृथ्वीची दिवसातून अनेक वेळा प्रदक्षिणा करणाऱ्या अमेरिकन आणि रशियन उपग्रहांच्याही नाही.

वानुनू बरेच वेळा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असे. त्याला दिमोनाच्या संपूर्ण ढाच्याची माहिती होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अनेक ऑफिसेस आणि एक मोठा कॅफेटेरिया होता. तळमजल्यावरच्या काही गेट्समधून युरेनियमच्या मोठाल्या कांबी खाली असलेल्या अणुभट्टीकडे पाठवल्या जात असत. हा भाग आतल्या बाजूला होता. इथेही काही ऑफिसेस होती आणि प्रयोगशाळा होत्या. त्याच्याखाली असलेल्या (जमिनीखालच्या पहिल्या) मजल्यावर असंख्य पाईप आणि व्हॉल्व्हज होते. त्याच्या खालच्या मजल्यावर संपूर्ण प्रकल्पाचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष होता आणि तिथे एक मोठी, खुली गच्ची होती. या गच्चीला गोल्डाची बाल्कनी (Golda’s Balcony) असं नाव होतं. दिमोना आणि तिथलं काम बघायला येणाऱ्या पाहुण्यांना जास्तीत जास्त इथपर्यंत प्रवेश होता. याच्या पुढे फक्त काही तंत्रज्ञ आणि इझराईलमधले अतिमहत्वाचे लोक एवढेच येऊ शकायचे. या मजल्याच्या खालच्या मजल्यावर युरेनियमवर काम होत असे. त्याच्या खाली या प्रकल्पातली सर्वात मोठी जागा होती. ती एकटीच तीन मजल्यांएवढी होती. इथे युरेनियमपासून अणुभट्टीत निर्माण होणारं प्ल्युटोनिअम वेगळं केलं जात असे. त्याच्या खालच्या मजल्यावर धातुशास्त्र विभाग आणि प्रयोगशाळा होती. इथे अण्वस्त्रांच्या विविध भागांवर काम होत असे. त्याच्या खाली असलेल्या शेवटच्या मजल्यावर आण्विक कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणारा विभाग होता.

जेव्हा एखादी अणुभट्टी कार्यरत असते तेव्हा जी रासायनिक प्रक्रिया होते, त्यात प्ल्युटोनिअम निर्माण होतं आणि ते युरेनियम रॉडस् किंवा कांबींवर जमा होतं. ते युरेनियमपासून वेगळं करावं लागतं आणि मग त्याचा वापर अण्वस्त्रनिर्मितीसाठी होतो. या सगळ्याची वानुनूला दिमोनामध्ये काम करत असताना माहिती झाली.
एके दिवशी, काहीही कारण नसताना वानुनू इन्स्टिट्यूट २ मध्ये आपला कॅमेरा घेऊन आला. त्याच्या बॅगमध्ये इतर अभ्यासाच्या पुस्तकांबरोबर हा कॅमेराही होता. जर त्याला सुरक्षारक्षकांनी त्याबद्दल विचारलं असतं तर आपण हा कॅमेरा समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेलो होतो आणि तो बॅगमधून काढायचा राहून गेला असं सांगायचं त्याने ठरवलं होतं, पण त्याला कुणीही हटकलं नाही आणि त्याने हा कॅमेरा आपल्या लॉकरमध्ये ठेवून दिला. जेवणाच्या सुट्टीमध्ये तो हा कॅमेरा घेऊन जमिनीखालच्या मजल्यांवर गेला आणि त्याने तिथल्या प्रयोगशाळा, साधनसामग्री आणि मिळतील त्या गोष्टींचे फोटो काढायला सुरुवात केली. जिथे फोटो काढता आले नाहीत, तिथे त्याने चित्रं काढली. त्याचं नशीब एवढं जोरावर होतं की त्याला कोणत्याही पहारेकऱ्याने, तंत्रज्ञाने किंवा अधिकाऱ्याने हे करताना पाहिलं नाही. तो तिथल्या ऑफिसेसमध्ये जाऊन बिनदिक्कत अत्यंत महत्वाची आणि गोपनीय कागदपत्रं बघत असे, पण हे करताना कधीही तो पकडला गेला नाही. त्याच्या वरिष्ठांना अर्थातच हे काहीही माहित नव्हतं. त्यांच्या मते तो शांत, गंभीर आणि कष्टाळू कर्मचारी होता.

१९८५ च्या शेवटी वानुनूची दिमोनामधली नोकरी संपुष्टात आली. मजा म्हणजे त्याचा वानुनूच्या राजकीय मतांशी किंवा कृत्यांशी काहीही संबंध नव्हता. इझरेली सरकारने दिमोनाला अर्थसहाय्य करण्यात हात थोडा आखडता घेतल्यामुळे हे झालं होतं. त्याला जायला सांगण्यात आलं पण त्याचबरोबर त्याला त्याच्या वार्षिक पगाराच्या दीडपट रक्कम देण्यात आली आणि आठ महिन्याचा पगारही विशेष बाब म्हणून देण्यात आला. पण, पुन्हा एकदा त्याचा राग आणि वैताग हे उफाळून आले होते. त्याने आता कुठेतरी लांब, देशाबाहेर जायचं ठरवलं. बहुतेक कायमचं. तसेही जवळपास १ कोटीहून जास्त ज्यू इझराईलच्या बाहेरच राहात होते. एकाने काहीही फरक पडला नसता. त्याने त्याचा फ्लॅट आणि गाडी विकली, बँकेतून सगळे पैसेही काढून घेतले आणि तो देशाबाहेर निघून गेला.

यावेळी तो ३१ वर्षांचा होता. याआधी त्याने युरोप आणि अमेरिका पाहिली होती. आता त्याला पूर्वेकडच्या देशांबद्दल कुतूहल होतं. त्याच्या बॅकपॅकमध्ये त्याने दिमोनामध्ये जे फोटो काढले होते, त्यांच्या दोन फिल्म्स होत्या. तो सर्वप्रथम ग्रीसला गेला, तिथून रशियाला, तिथून नेपाळ आणि मग थायलंड. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये त्याला एक इझरेली मुलगी भेटली आणि तो तिला ‘ पटवायच्या ’ मागे लागला. त्याने स्वतःचं नाव ‘ मोर्डी ’ असं सांगितलं आणि हेही सांगितलं की तो डाव्या विचारांचा, जगात शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणारा प्रामाणिक माणूस आहे आणि कदाचित तो कधीही परत इझराईलला जाणार नाही. थायलंडमध्ये एका बुद्धमंदिरात जाऊन भारावलेल्या वानुनूने बौद्ध धर्म स्वीकारायचाही विचार केला होता.

काठमांडूनंतर वानुनू व्हिएतनाम, लाओस, इंडोनेशिया,मलेशिया वगैरे देशांमध्ये गेला आणि शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये आला. आता त्याच्याजवळचे पैसे संपत आले होते, त्यामुळे त्याने सिडनी शहरात थोडंफार काम केलं. पण त्याचा एकाकीपणा अजूनच वाढला होता. इथे त्याला कुणीही ओळखत नव्हतं. एके रात्री तो सिडनीच्या अत्यंत गलिच्छ भागात फेरफटका मारत होता. हा भाग चोऱ्या, लूटमार, वेश्या आणि ड्रग्ज यांच्यासाठी प्रसिद्ध होता. पण त्याची प्रसिद्धी अजून एका चांगल्या कारणासाठीही होती. सेंट जॉर्ज चर्च. निरुद्देश भटकताना वानुनू चर्चमध्ये जाऊन पोचला आणि तिथे त्याची ओळख अँग्लिकन धर्मगुरू जॉन मॅकनाईटशी झाली. वानुनूला घराची आणि आपलेपणाची गरज आहे हे मॅकनाईटच्या लगेचच लक्षात आलं आणि त्याने वानुनूला चर्चमध्ये आश्रय दिला. काही दिवसांनी – १७ ऑगस्ट १९८६ या दिवशी मोर्देचाई वानुनूने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याला नवीन नावही मिळालं - जॉन क्रॉसमन. माराकेशमध्ये जन्मलेल्या आणि तोपर्यंत ज्यू धर्माचं पालन करत असणाऱ्या वानुनूसाठी हा एक मोठाच बदल होता. जरी मधल्या काळात तो धर्मापासून दूर गेला होता, तरी सर्वसाधारण ज्यू मुलांप्रमाणे त्याचं बालपण हे ज्यू संस्कारांमध्येच गेलं होतं. ते सगळं सोडून एक वेगळा धर्म स्वीकारणं ही वानुनूसाठी फार मोठी गोष्ट होती. पण हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला नव्हता, तर भावनेच्या भरात, आजूबाजूला काहीही निश्चित नसताना गोंधळलेल्या परिस्थितीत घेतलेला होता. चर्चऐवजी जर तो एखाद्या मशिदीत गेला असता किंवा बौद्ध मंदिरात गेला असता तर तो कदाचित मुस्लीम किंवा बौद्ध बनून बाहेर आला असता. पण एक गोष्ट नक्की होती. ज्यू धर्माकडे पाठ फिरवून त्याने आता इझराईलकडेही पाठ फिरवली होती. इझराईलबद्दलच्या या रागामुळे त्याच्या हातून त्याने पुढे जे काही केलं ते घडलं.

नवीन धर्म स्वीकारल्यानंतर वानुनूला चर्चमध्ये अनेक मेळाव्यांमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. अशाच एका भेटीत त्याने आपण इझराईलमध्ये काय करत होतो हे सांगितलं, दिमोना अणुप्रकल्पाचं वर्णन केलं आणि आपल्या फोटोंचा एक स्लाईड शो दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याच्या श्रोत्यांना तो काय बोलतोय आणि कशाबद्दल बोलतोय ते काहीही समजलं नाही. ते त्याच्याकडे शून्य नजरेने बघत बसले. पण या श्रोत्यांमध्ये एक माणूस होता, ज्याचं लक्ष या बातमीने वेधून घेतलं होतं. त्याचं नाव होतं ऑस्कर ग्वेरेरो . ग्वेरेरो मूळचा कोलंबियाचा होता. वानुनूप्रमाणे तोही भटक्या होता, पण तो स्वतःला मुक्त पत्रकार म्हणवत असे. दोघांची ओळख झाली. तेव्हा दोघांनाही पैशांची गरज होती. त्यामुळे ते चर्चच्या भिंती आणि कुंपण रंगवायचं काम करत होते आणि चर्चमध्ये एकाच खोलीत राहात होते. वानुनूच्या फोटोंचं महत्व समजलेला ग्वेरेरो हा पहिला माणूस होता. त्याने वानुनूच्या मनात पैसे आणि प्रसिद्धी यांचं बीज पेरलं.

तोपर्यंत वानुनूजवळचे पैसे संपुष्टात आले होते. त्यामुळे त्याला पैशांची गरज तर होतीच. पण आपण आपल्या प्रसिद्धीचा वापर ज्यू आणि अरब यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी करू शकतो हा विचार त्याच्या मनात आता बळावू लागला. त्याची मूळ योजना अशी नव्हती. खरं सांगायचं तर त्याच्याजवळ आपल्या फोटोंचं नक्की काय करायचं याची काहीही योजना नव्हती. निदान इझराईल सोडून जाताना तरी. पण आता त्याच्यासमोर एक निश्चित उद्दिष्ट होतं – शांतता प्रस्थापित करणं आणि जगाला इझराईलच्या अण्वस्त्रांबद्दल सावध करणं. जसजसे दिवस जात होते, तसा तो स्वतःला इझराईलच्या अणुकार्यक्रमाविरुद्ध लढणारा एकाकी योद्धा या रूपात बघायला लागला होता. पण त्याला हीसुद्धा जाणीव होती की ज्याक्षणी तो हे फोटो प्रकाशित करेल, त्याक्षणी त्याच्यासाठी इझराईलला परत जाण्याचे सगळे दोर कायमचे कापले जातील. तिथे त्याची देशद्रोही म्हणून निर्भर्त्सना होईल.

पण पैसे आणि प्रसिद्धी यांची ओढही तितकीच जबरदस्त होती. वानुनू आणि ग्वेरेरो सिडनीच्या आडरस्त्यावर असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये गेले आणि त्यांनी तिकडे हे फोटो ब्लो अप स्वरुपात डेव्हलप केले आणि मग ऑस्ट्रेलियन नियतकालिकं, वर्तमानपत्रं आणि अमेरिकन नियतकालिकांच्या ऑस्ट्रेलियन ऑफिसेसमध्ये जाऊन हे फोटो विकायचा प्रयत्न केला. पण कोणीही त्यांना दाद दिली नाही. हा लाजाळू दिसणारा, मुश्किलीने एक – एक वाक्य अडखळत बोलणारा माणूस आपल्या हातात इझराईलचं सर्वात मोठं रहस्य घेऊन उभा आहे यावर कोणाचाही विश्वास बसतच नव्हता.

ऑस्ट्रेलियामध्ये काही होत नाही हे पाहिल्यावर ग्वेरेरोने युरोपमध्ये प्रयत्न करायचं ठरवलं. थोडेफार पैसे उसने घेऊन तो स्पेन आणि इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रांकडे गेला आणि इथे त्याला आशेचा किरण दिसला. लंडनमधल्या संडे टाईम्स या वृत्तपत्राने त्याच्या माहितीमध्ये रस दाखवला. पण ते एकदम पुढे जायला तयार नव्हते. नुकताच त्यांना एक मोठा फटका बसला होता. त्यांनी वाजतगाजत छापलेली हिटलरची दैनंदिनी म्हणजे एक मोठा बनाव असल्याचं नुकतंच उघडकीला आलं होतं. त्यामुळे वानुनूचे फोटो आणि इतर माहिती छापण्याआधी त्यांना त्याच्या अस्सलतेची पूर्ण खात्री करून घ्यायची होती.

दरम्यान वानुनूचे आपले फोटो ऑस्ट्रेलियामध्ये छापायचे प्रयत्न चालूच होते. त्याच्याबद्दल संशय आल्याने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनमधल्या एका निर्मात्याने ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधल्या इझरेली वकिलातीमध्ये संपर्क साधला आणि त्यांना वानुनूबद्दल विचारलं. त्यांच्याकडून ही बातमी हारेत्झ या प्रसिद्ध इझरेली वृत्तपत्रासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराला मिळाली. त्याने ती बातमी हारेत्झच्या तेल अवीव ऑफिसला कळवली. त्यांनी जेव्हा ती इझराईलमध्ये छापली, तेव्हा भूकंप झाला. पोलार्ड आणि इराणगेट प्रकरणं इझराईलच्या बाहेर घडली होती आणि इझरेली नागरिकांचा त्यात काही संबंध नव्हता. पण इथे इझराईलचा एक नागरिक, ज्याने इतक्या गुप्त अणुप्रकल्पावर काम केलं होतं, तो आता त्या प्रकल्पाची गुप्तता संपुष्टात आणू पाहात होता. वानुनूबद्दलच्या इतर आक्षेपार्ह गोष्टीही मोसादला आत्ताच समजल्या. प्रचंड मोठी चूक झालेली आहे आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा झालेला आहे यावर सर्वांचंच एकमत झालं होतं, पण आता वेळ घालवून चालणार नव्हतं. कुठल्याही परिस्थितीत वानुनूला थांबवणं गरजेचं होतं. मोसाद संचालक आदमोनीने स्वतः यात लक्ष घालायचं ठरवलं आणि वानुनूला अटक करण्याच्या ऑपरेशनची सुरुवात केली. या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं ऑपरेशन कानिउक.

आदमोनीने ताबडतोब सीझरिआ कमांडोंचं एक युनिट ऑस्ट्रेलियाला रवाना केलं, पण ते तिकडे पोचल्यावर त्यांना समजलं की वानुनू त्याआधीच पळालाय. जेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना समजलं की तो इंग्लंडला गेलाय.

ग्वेरेरोने लंडनमध्ये संडे टाईम्सला दिलेल्या फोटोंनी संडे टाईम्सच्या लोकांचं कुतूहल नक्कीच चाळवलं गेलं होतं. त्यांनी थिओडोर टेलर आणि फ्रँक बार्नाबी या दोघा अणुशास्त्रज्ञांकडून ग्वेरेरोकडे असलेल्या फोटोंची सत्यता पडताळून पाहिली होती. टेलर आणि बार्नाबी या दोघांनीही हे फोटो अस्सल असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे आपल्या हातात घबाड आलेलं आहे याची त्यांना खात्री पटली होती. आता त्यांना वानुनूला भेटायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपला एक स्टार पत्रकार पीटर हाऊनम याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं. वानुनूला भेटल्यावर हाऊनमचीही त्याच्या फोटोंच्या सत्यतेबद्दल खात्री पटली. मुख्य म्हणजे तो वानुनूला भेटून त्याच्या प्रांजळपणामुळे खूपच प्रभावित झाला. ग्वेरेरोने लंडनमध्ये वानुनू इझरेली शास्त्रज्ञ असल्याची लोणकढी थाप मारली होती, पण आपण फक्त तंत्रज्ञ होतो हे वानुनूने स्वतःहून हाऊनमसमोर कबूल केलं.

ग्वेरेरोला बाजूला सारून वानुनू आणि हाऊनम सिडनीहून लंडनला गेले. लंडनला पोचल्यावर संडे टाईम्सच्या लोकांनी वानुनूची कसून उलटतपासणी केली. त्याने आपल्याला होती ती सगळी माहिती सांगितलीच, आणि शिवाय काही महत्वाच्या गोष्टीही सांगितल्या, ज्या तोपर्यंत जगात कुणालाही माहित नव्हत्या – इझरेली सरकारशिवाय. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इझराईल न्यूट्रॉन बॉम्ब विकसित करत आहे – ज्यामुळे लोक मरण पावतील, पण इमारती आणि वाहनांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. त्याने इन्स्टिट्यूट २ मध्ये कशा प्रकारे बॉम्बची जुळणी केली जाते तेही अगदी सविस्तर सांगितलं.

हे सगळं सांगत असताना एकीकडे वानुनू प्रचंड दडपणाखाली होता. इझराईल, विशेषतः मोसाद एजंट्स त्याचं अपहरण करतील आणि त्याला ठार मारतील अशी त्याला सारखी भीती वाटत होती. संडे टाईम्सच्या लोकांची आतापर्यंत त्याच्या आणि त्याच्या फोटोंच्या खरेपणाबद्दल पूर्णपणे खात्री पटली होती, त्यामुळे त्यांनी त्याला शांत करण्याचे आणि त्याचं मन रिझवण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला जे पैसे त्यांनी देऊ केले होते, तेही अफाट होते. निव्वळ त्याची कथा आणि फोटो यांच्यासाठी एक लाख डॉलर्स; त्याची कथा आणि फोटो प्रकाशित झाल्यावर संडे टाईम्सचा जो वाढलेला खप असेल, त्यातले ४० टक्के आणि जर त्याच्या कथेवर पुढे पुस्तक छापलं गेलं, तर त्या पुस्तकाच्या विक्रीच्या २५ टक्के. त्यांनी त्याला हेही सांगितलं की संडे टाईम्सचा मालक रुपर्ट मरडॉकच्या मालकीची ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स ही चित्रपट कंपनी या कथेवर चित्रपटही बनवण्याचा विचार करत आहे आणि कदाचित सुप्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी नीरो त्यात वानुनूची भूमिका करेल.

हे सगळं ठीक होतं, पण त्याला सगळे ऐषोआराम देत असताना संडे टाईम्सच्या लोकांना त्याची एक गरज समजू शकली नाही – सेक्स. वानुनूच्या आयुष्यात तोपर्यंत कोणतीही स्त्री आलेली नव्हती आणि तो स्त्रीसहवासाचा भुकेला होता. पण ती एक गोष्ट सोडून बाकी सगळं त्यांनी त्याला देऊ केलं. तो इतका घायकुतीला आलेला होता की दिसेल त्या मुलीकडे तो सेक्सची मागणी करत होता. संडे टाईम्सची पत्रकार रोवेना वेब्स्टरला वानुनूची मुलाखत घ्यायची होती. त्या एका तासात त्याने तिला त्याच्याबरोबर झोपण्याची अक्षरशः विनवणी केली. तिने अर्थातच ती झिडकारली. संडे टाईम्सच्या लोकांनी त्याची मागणी किमान अंशतः जरी पूर्ण केली असती, तरी पुढे ज्या घटना घडल्या, त्या घडल्या नसत्या.

मोसाद आपल्या मागावर आहे ही वानुनूची भीतीही अनाठायी नव्हती. संडे टाईम्सच्या लोकांनी वानुनूची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी एका पत्रकाराला इझराईलमध्ये पाठवलं. त्याने इझराईलमध्ये वानुनूची चौकशी करायला सुरुवात केल्यावर शाबाकच्या लोकांना समजलं. ताबडतोब शाबाक आणि मोसाद यांच्या दोन टीम्स लंडनमध्ये उतरल्या. त्यातल्या एका टीमचं नेतृत्व मोसादचा उपसंचालक शब्ताई शावितकडे होतं, तर दुसऱ्या टीमची धुरा सीझरिआचा प्रमुख बेनी झीवी सांभाळत होता.

मोसादच्या दोघा एजंट्सनी प्रेस फोटोग्राफर बनून संडे टाईम्सच्या इमारतीवर पाळत ठेवली. काही दिवसांनी त्यांना वानुनू दिसला. त्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो जिथे जात होता, तिथे मोसादचे एजंट्स त्याच्या मागावर होते. त्याच्यासाठी त्यांनी एक खास तंत्र वापरलं होतं. हे तंत्र आईकमनला अर्जेन्टिनामधून इझराईलमध्ये आणणाऱ्या टीमचा सदस्य असलेल्या झ्वी माल्किनने विकसित केलं होतं. त्यानुसार ज्याचा पाठलाग करायचा आहे, तो माणूस कुठे जाऊ शकेल याचा अंदाज मोसाद एजंट्स बांधायचे आणि त्या ठिकाणी आधीच पाळत ठेवायचे. वानुनूच्या बाबतीत हे तंत्र १०० टक्के अचूक ठरलं.

२४ सप्टेंबर १९८६ या दिवशी वानुनू फेरफटका मारायला लंडनच्या प्रसिद्ध लिस्टर स्क्वेअर भागात आला होता. तो त्याच्या हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर चार्लीज एंजल्स ही मालिका खूप आवडीने पाहात असे. त्यातली फराह फॉसेट ही अभिनेत्री त्याला आवडत असे. आणि आता लिस्टर स्क्वेअरमध्ये फिरत असताना त्याला बऱ्यापैकी तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी एका वर्तमानपत्रांच्या स्टॉलजवळ उभी असलेली दिसली. तो तिच्याकडे टक लावून बघत असताना तिने त्याच्याकडे पाहिलं – अर्थपूर्णरीत्या बराच वेळ पाहिलं आणि मग ती वर्तमानपत्र विकत घेऊन निघून गेली. वानुनूने विरुद्ध दिशेला जायचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय त्याला तिच्याकडे घेऊन गेले. सगळं धैर्य एकवटून त्याने तिच्याशी बोलायची पर्वानिगी मागितली. ती गोड हसली, आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तिचं नाव सिंडी हानिन होतं. ती ज्यू होती, आणि अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया शहरात तिचं एक ब्युटी पार्लर होतं. लंडनमध्ये ती सुट्टीवर आली होती.

वानुनू सावध झाला. गेले काही दिवस तो प्रचंड तणावाखाली होता. संडे टाईम्सचे लोक त्याचे फोटो छापत नव्हते. त्याऐवजी ते त्याला सारखे प्रश्न विचारत होते. शिवाय त्यांनी त्याला हेही सांगितलं होतं, की त्याचे फोटो प्रकाशित करण्याआधी ते इझरेली वकिलातीमध्ये जाऊन इझरेली सरकारची या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे, ते विचारणार आहेत. तसं करायची काय गरज आहे, हा प्रश्न त्याला पडला होता. जेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, की पत्रकारितेच्या जगात नेहमीच दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन मग ते छापलं जातं, तेव्हा त्याचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते आपल्याला मोसादच्या हवाली करणार अशी भीती त्याच्या मनात सतत होती.
आणि आता ही सिंडी अचानकपणे त्याच्या समोर आली होती.

“ तू मोसादकडून आली आहेस का?” त्याने तिला हसतहसत विचारलं.
“नाही,” ती म्हणाली, “ मोसाद म्हणजे काय?”

तो जरा शांत झाला. तिने त्याला त्याचं नाव विचारलं.

“ जॉर्ज.” तो म्हणाला. त्याला संडे टाईम्सच्या लोकांनी हॉटेलमध्ये याच नावाने ठेवलं होतं.
ती परत गोड हसली, “ काहीतरीच काय! तू जॉर्ज नाहीस.”

त्याचा हात पकडून ती त्याला जवळच्या एका कॅफेमध्ये घेऊन गेली. तिकडे त्याने तिला आपलं खरं नाव सांगितलं आणि आपण लंडनला का आलोय तेही सांगितलं. अगदी संडे टाईम्सच्या नावासकट. तिने ताबडतोब त्याला अमेरिकेला येऊन तिथे न्यूयॉर्क टाईम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट सारख्या ख्यातनाम वृत्तपत्रांमध्ये त्याचे फोटो द्यायचं सुचवलं. पण ते त्याला ऐकू येत नव्हतं. तो फक्त एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या लक्षात यायच्याआधीच तो तिच्या प्रेमात पडला होता. अगदी सपशेल, केळीच्या सालीवरून घसरून पडल्यासारखा!

त्यानंतर तो तिला आणि ती त्याला सोडायला तयार नव्हते. दोघेही लंडन शहरात भटकले, त्यांनी नाटकं आणि चित्रपट पाहिले आणि हे सगळं चालू असताना तिने त्याला आपली असंख्य चुंबनं घेऊ दिली. पण त्याला जे हवं होतं, त्यासाठी मात्र ती तयार नव्हती. तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, की तिच्या हॉटेलमध्ये ती तिच्या रूममध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर राहाते आहे, त्यामुळे त्यांना तिच्या रूममध्ये भेटणं शक्य नाही. ती त्याच्या हॉटेल रूमवर यायलाही तयार नव्हती. तू तयार नाहीयेस, तू इतक्या तणावाखाली आहेस की तुला ते जमणार नाही असं तिने त्याला अनेक वेळा ऐकवलं होतं.

नंतर अचानक तिने त्याला सुचवलं, “ तू माझ्याबरोबर रोमला का येत नाहीस? माझी बहीण तिथे राहते. तिचं तिथे स्वतःचं घर आहे. आपण तिथे मस्त मजा करू. तुला तिथे तुझ्या सगळ्या तणावपूर्ण गोष्टींचा विसर पडेल.”

वानुनूसाठी रोम म्हणजे पूर्णपणे अनोळखी भाग होता. त्यामुळे त्याने नकार दिला. पण ती रोमला जाणारच होती. तिने स्वतःसाठी बिझनेस क्लास तिकीटसुद्धा काढलं होतं. तिला न भेटण्याच्या विचाराने वानुनू कासावीस झाला आणि शेवटी त्याने तिच्याबरोबर यायला होकार दिला. तिने लगोलग त्याच्यासाठीसुद्धा बिझनेस क्लासचं तिकीट विकत घेतलं. “ मला नंतर पैसे दे,” असं तिच्याकडून ऐकल्यावर वानुनूच्या मनात कुठलीही शंका राहिली नव्हती.

जर त्याचं डोकं ठिकाणावर असतं तर त्याला यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला असता. एक मुलगी त्याला रस्त्यात भेटते काय, त्याच्याबरोबर मैत्री करते काय आणि त्याला रोमला आपल्याबरोबर यायचं आमंत्रण देते काय. एवढंच नाही, तर त्याचं तिकीटही ती काढते – तेही बिझनेस क्लासचं महागडं तिकीट. शिवाय ती त्याच्याबरोबर लंडनमध्ये सेक्सचा अनुभव घ्यायला तयार नव्हती, पण रोममध्ये मात्र तिची त्याला हरकत नव्हती. हा नक्कीच विचित्र प्रकार होता. पण हे लक्षात येण्याएवढं भान आणि संयम वानुनूकडे नव्हता. मोसादमधल्या मानसशास्त्रज्ञांनी त्याच्या व्यक्तिमत्वाचा इतका बारीक अभ्यास केला होता, आणि त्याला नक्की कशाने गळाला लावता येईल याबद्दलचे त्यांचे आडाखे इतके अचूक होते, की एखाद्या कळसूत्री बाहुल्यासारखा वानुनू त्यांना हवं तसं वागत गेला.

वानुनूने सिंडीबद्दल पीटर हाऊनमला सांगितलं होतं. त्याच्यासारख्या मुरब्बी पत्रकाराला लगेचच संशय आला. त्याने वानुनूला थांबवायचा प्रयत्न केला पण वानुनूच्या डोक्यावर सिंडीचा अंमल आता पूर्णपणे चढला होता. आणि खरं सांगायचं तर केवळ सिंडीबरोबर झोपण्यासाठी म्हणून वानुनू लंडन सोडून रोमला जाईल असं हाऊनमला वाटलं नाही.

सिंडीने रोमला जायचा विषय काढण्यामागचं कारण साधं होतं. मोसादला लंडनमध्ये काहीही करायचं नव्हतं. इझराईलचे पंतप्रधान शिमॉन पेरेस यांना मार्गारेट थॅचर आणि एम.आय. ५ यांच्याशी कुठल्याही परिस्थितीत पंगा घ्यायचा नव्हता. जोनाथन पोलार्ड प्रकरण होतंच. शिवाय काही महिन्यांपूर्वी पश्चिम जर्मनीमध्ये तिथली प्रतीहेरगिरी संस्था बीएफव्हीला एका टेलिफोन बूथमध्ये आठ ब्रिटिश पासपोर्ट असलेली एक बॅग सापडली होती. त्याचबरोबर त्या बॅगच्या मालकाचा पत्ताही मिळाला होता. हा माणूस बॉनमधल्या इझरेली वकिलातीत काम करत होता. जेव्हा हे उघड झालं तेव्हा ब्रिटन आणि पश्चिम जर्मनी या दोन्ही देशांच्या सरकारांचा राग अनावर झाला. आपण ब्रिटन आणि जर्मनी यांच्या भूमीवर काहीही करणार नाही असं वचन मोसादला द्यायला लागलं. पण इटलीची परिस्थिती वेगळी होती. इटालियन गुप्तचर संस्था सिस्मीबरोबर मोसादचे चांगले संबंध होते. सिस्मीचा प्रमुख अॅडमिरल फुल्व्हियो मार्टिनी आणि मोसाद संचालक नाहूम आदमोनी हेही एकमेकांचे वैयक्तिक मित्र होते. जोपर्यंत मोसाद इटालियन नागरिकांना हात लावत नाही तोपर्यंत सिस्मीला त्यांनी इटालियन भूमीवर काहीही केलं तरी फरक पडत नव्हता.

३० सप्टेंबर १९८६ या दिवशी ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाईट ५०४ ने सिंडी आणि मोर्डी एकमेकांच्या हातात हात गुंफून रोमच्या दिशेने रवाना झाले. तिथे ती इटालियन प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता उतरले. विमानतळावर एक भलामोठा हसतमुख इटालियन माणूस त्यांच्या स्वागतासाठी एक तितकाच भलामोठा पुष्पगुच्छ घेऊन हजर होता. तो त्यांना सिंडीच्या बहिणीच्या फ्लॅटवर न्यायला आला होता. वानुनूचं सिंडीबरोबर झोपायचं स्वप्न पूर्ण व्हायच्या अगदी जवळ होतं. सिंडीलाही बहुतेक त्याची जाणीव झाली होती. ती वानुनूची असंख्य चुंबनं घेऊन त्याला उत्तेजित करत होती.

त्यांची गाडी एका छोट्या बंगल्यासमोर थांबली. एका तरुण मुलीने बंगल्याचं दार उघडलं. वानुनू इतका उतावीळ झाला होता की तो काहीही विचार न करता बंगल्यात शिरला. तो आत शिरल्यावर त्या मुलीने बंगल्याचं दार लावून घेतलं आणि दोन धटिंगणांनी बेसावध वानुनूवर झडप घातली आणि त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जमिनीवर पाडलं. ते त्याचे हातपाय बांधत असताना त्या मुलीने त्याला एक इंजेक्शन दिलं आणि वानुनू बेशुद्ध झाला.

त्याला ताबडतोब एका फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये घालून इटलीच्या उत्तरेकडे नेण्यात आलं. हा प्रवास अनेक तास चालला. वानुनू बेशुद्धच होता. तो जरा शुद्धीवर यायची चिन्हं दिसायला लागली, की ती मुलगी त्याला परत एक इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होती. ला स्पेझिया बंदरात हा ट्रक पोचल्यावर वानुनूला पहाटेच्या अंधारात एका स्ट्रेचरवर घट्ट बांधून एका स्पीडबोटवर बसवण्यात आलं. ही स्पीडबोट भूमध्य समुद्रात वेगाने प्रवास करत आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीमध्ये तापुझ नावाच्या इझरेली मालवाहू जहाजाकडे आली. वानुनूला स्पीडबोटीवरून तापुझवर चढवण्यात आलं आणि एका केबिनमध्ये डांबण्यात आलं. तापुझने लगेचच इझराईलचा मार्ग पकडला.

इझराईलच्या अश्केलॉन बंदराच्या जवळ आल्यावर तापुझने नांगर टाकला आणि किनाऱ्यावर संदेश पाठवला. वानुनूला इझरेली तटरक्षक दलाच्या युद्धनौकेवर हलवण्यात आलं आणि ही नौका त्याला इझराईलच्या किनाऱ्यावर घेऊन आली. किनाऱ्यावर आणल्यावर शाबाक अधिकाऱ्यांनी त्याला रीतसर अटक केली आणि लॉकअपमध्ये हलवलं.

वानुनूला अटक झाली असली, तरी इझराईलच्या आण्विक रहस्यांचा भेद मोसादला थांबवता आला नाही. वानुनूला अश्केलॉनच्या तुरुंगात पोलीस प्रश्न विचारत असताना संडे टाईम्सने त्याने काढलेले दिमोना अणुप्रकल्पाचे फोटो आणि त्याने त्यांना दिलेली माहिती प्रकाशित करायला सुरुवात केली. ती संडे टाईम्सबरोबरच जगभरातल्या इतर वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्येही प्रकाशित झाली.

या सर्व प्रकाशित माहितीमधून काढण्यात आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तोपर्यंत इझराईलकडे १० ते २० प्राथमिक स्वरूपाचे अणुबॉम्ब असतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण वानुनूच्या माहितीमुळे हे उघड झालं की इझराईलकडे तब्बल १५० ते २०० अत्याधुनिक अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता होती. त्याचबरोबर इझराईल हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूट्रॉन बॉम्बसुद्धा बनवू शकतो हेही उघडकीस आलं.

ही माहिती उघड झाल्याचं पोलिसांनी वानुनूला तुरुंगात सांगितल्यावर त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागली. त्याला सिंडीचीही काळजी वाटत होती. त्याला त्या बंगल्यात पाठवल्यानंतर ती गायब झाली होती आणि त्याला नंतर आयुष्यात कधीही भेटणार नव्हती, हे त्याला त्यावेळी माहित नव्हतं.

ब्रिटनमध्ये ब्रिटिश वृत्तपत्रांनी मोसादवर वानुनूला लंडनमधून उचलल्याचा आरोप केला. ब्रिटनच्या संसदेमध्ये ब्रिटिश खासदारांनी इझराईलवर कारवाई करायची सरकारकडे मागणी केली. शेवटी इझराईलने वानुनू आपल्या ताब्यात असल्याचं आणि त्याच्यावर खटला चालणार असल्याचं जाहीर केलं. तोपर्यंत नोव्हेंबर महिना उजाडला होता. वानुनूनेही अजून एक मोठा स्टंट केला. त्याला तुरुंगातून कोर्टात नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीत तो मागे बसला होता. समोर पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचा मोठा जमाव होता. अचानक वानुनूने आपल्या हाताचा तळवा गाडीच्या काचेवर आपटला. त्यावर vanunu m was hijacked in rome, itl, 30.0.86. 21.00. come to rome by fla ba 504 हे शब्द लिहिलेले होते. पोलिसांच्या काही लक्षात यायच्या आत अनेकजणांनी त्याचा आणि त्याच्या हाताच्या तळव्याचा फोटो काढला होता. हे फोटो जगभर छापून आले.

वानुनूचं मोसादने रोममध्ये अपहरण केलं आणि लंडनपासून रोमपर्यंत तो स्वतःच्या इच्छेने गेला होता हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश जनमत जरा शांत झालं. इटालियन सरकारनेही तोंडदेखला निषेध व्यक्त केला.

वानुनूवर खटला चालवण्यात आला आणि न्यायालयाने हेरगिरी आणि देशद्रोह हे त्याच्यावर ठेवलेले आरोप मान्य केले आणि त्याला दोषी ठरवून १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. खटला चालू असताना त्याच्या वकिलांनी तो हेर किंवा देशद्रोही नसून अण्वस्त्रविरोधी कार्यकर्ता असल्याचा बचाव मांडला होता. संपूर्ण जगभर असलेल्या वानुनूच्या चाहत्यांना आणि आपापल्या देशांत अण्वस्त्रविरोधी भूमिका घेणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनाही वानुनू हा आपला नायक आणि आदर्श वाटत होता. संपूर्ण जगभर या कार्यकर्त्यांनी इझराईलच्या वकिलातींच्या बाहेर इझराईलविरुद्ध निदर्शनं केली होती आणि वानुनूला सोडून देण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने मात्र हा सगळं बचाव फेटाळून लावला. न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार वानुनू चिडलेला आणि गोंधळलेला होता. जर त्याची दिमोनामधली नोकरी गेली नसती, तर कदाचित त्याने काढलेले फोटो जगासमोर आले नसते. दिमोनामध्ये काम करत असताना त्याने इझरेली अणुप्रकल्पाविरुद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. त्याने देश सोडून बाहेर गेल्यावर लगेचच आपला लढा चालू केला नाही. त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्कर ग्वेरेरो भेटला आणि या फोटोंचा वापर करून कसे पैसे कमावता येतील हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने त्यांचा वापर करायचा निर्णय घेतला.

पण अर्थात जगभरातल्या भोळ्याभाबड्या लोकांसाठी वानुनू त्यांचा नायक होता आणि इझरेली सरकार आणि मोसाद हे खलनायक. एका अमेरिकन कुटुंबाने त्याला दत्तकसुद्धा घेतलं होतं – त्याचं स्वतःचं कुटुंब हयात असताना. अनेकांनी त्याला शांततेसाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक देण्याची शिफारस केलेली आहे.

१८ वर्षांनी – २००४ मध्ये वानुनूची सुटका झाली. तुरुंगात असताना त्याला एकांतवासातही ठेवण्यात आलं होतं असं त्याने कैदेतून मुक्त झाल्यावर दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं. इझराईलमध्ये ज्यू गुन्हेगारांना मृत्यूदंड देण्याची पद्धत नसल्यामुळे आपल्याला इझरेली सरकारने जिवंत ठेवलेलं असल्याचंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावर मोसाद किंवा इझरेली सरकार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

आज वानुनू स्वतःला जॉन क्रॉसमन याच नावाने संबोधित करतो. त्याने २०१५ मध्ये क्रिस्टीन योकिमसेन या स्त्रीशी लग्न केलं आणि आज तो जेरुसलेममधल्या एका चर्चमध्ये राहतो. त्याने नॉर्वे, स्वीडन आणि आयर्लंड या देशांना त्याला आश्रय देण्याची विनंती केली होती, पण ती मान्य झाली नाही.

मोसादच्या लोकांना त्याच्या कमकुवत दुव्याचा सुगावा कसा लागला त्याची कथा एकदम मनोरंजक आहे. इराणगेट प्रकरणात सहभागी असलेल्या अरी बेन मेनाशे नावाच्या एका माजी मोसाद एजंटने १९९१ मध्ये हे जाहीर केलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मोसादने आपल्या हस्तकांना वानुनू राहात असलेल्या हॉटेलमध्ये वेटर्स आणि हाउसकीपिंगच्या लोकांमध्ये घुसवलं होतं. त्यांच्याचकडून त्याला चार्लीज एंजल्स मधली फराह फॉसेट आवडत असल्याचं मोसादला समजलं आणि तिच्याशी दिसण्यात साधर्म्य असणाऱ्या सिंडीला त्यांनी त्याच्या मागावर सोडलं. शिवाय त्याला गोंधळात पाडण्यासाठी आणि संडे टाईम्सच्या लोकांच्या मनात त्याच्याविषयी संशय निर्माण करण्यासाठी मोसादने अजून एक युक्ती केली होती. त्यांनी संडे टाईम्सचं प्रतिस्पर्धी वृत्तपत्र असलेल्या संडे मिरर या वृत्तपत्राच्या पत्रकारांना वानुनूशी संपर्क साधून त्याला संडे टाईम्सच्या वरचढ ऑफर द्यायला सांगितलं. हे जेव्हा संडे टाईम्सच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वानुनूला अजून कडेकोट बंदोबस्तात ठेवायला सुरुवात केली. स्त्रीसहवास नसल्यामुळे आधीच कावलेल्या वानुनूसाठी ही शेवटची काडी होती. आणि मग त्यांनी सिंडी आणि त्याची भेट घडवून आणली. संडे मिररचा मालक आणि संचालक रॉबर्ट मॅक्सवेल हा मोसादचा हस्तक होता.

वानुनूला रोममध्ये आणणारी सिंडी ही कोण होती? तिचं खरं नाव होतं शेरील बेन तोव्ह. सिंडी हानिन हे जे आपलं नाव तिने वानुनूला सांगितलं होतं, ते तिच्या बहिणीचं नाव होतं. शेरील मूळची अमेरिकन होती आणि अमेरिका आणि इझराईल यांची दुहेरी नागरिक होती. वयाच्या सतराव्या वर्षी ती अमेरिकेतून इझराईलला आली आणि प्रथम इझरेली सैन्यात आणि नंतर मोसादमध्ये दाखल झाली. वानुनूच्या अपहरणानंतर तिला मोसादमधून राजीनामा द्यावा लागला कारण पीटर हाऊनमने तिचे काही फोटो काढले आणि प्रकाशित केले होते. आज ती तिच्या पतीबरोबर ओरलँडो, फ्लोरिडा इथे निवृत्त आयुष्य जगते आहे.

क्रमशः

संदर्भ –
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements

इतिहासलेख

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2017 - 12:39 am | पिलीयन रायडर

एक नंबर! वाचते नंतर पण मोसाद पाहुन अत्यंत सुखद धक्का बसला आहे!!!

राघवेंद्र's picture

5 Apr 2017 - 1:19 am | राघवेंद्र

मस्त झाला आहे भाग !!!

व्वाह्ह... पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!

पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद. आता निवांत वाचेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2017 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच दिवसांनी हा भाग आला... पण तितकाच जबरदस्त आहे !

अरे वा वा ! धन्यवाद बोकाभाऊ.
आता निवांत वाचतो.

पैसा's picture

5 Apr 2017 - 10:08 am | पैसा

एक्सलंट!!

इरसाल कार्टं's picture

5 Apr 2017 - 10:34 am | इरसाल कार्टं

खूप वाट बघितली तेराव्या भागानंतर, अधाश्यासारखा वाचून काढा. खूप छान

इरसाल कार्टं's picture

5 Apr 2017 - 11:06 am | इरसाल कार्टं

*काढला

मनिमौ's picture

5 Apr 2017 - 10:38 am | मनिमौ

बर्याच दिवसांनी मोसाद दिसला तो आधाशासारखा वाचून काढला

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2017 - 11:44 am | अत्रन्गि पाउस

+1

रमता जोगी's picture

5 Apr 2017 - 11:26 am | रमता जोगी

काय सुंदर लिहीलंय. हा पुढचा भाग खूप मोठ्या अंतराने आल्यासारखा वाटतोय.

मार्मिक गोडसे's picture

5 Apr 2017 - 11:28 am | मार्मिक गोडसे

नेहमीप्रमाणेच जबरदस्त भाग.

कापूसकोन्ड्या's picture

5 Apr 2017 - 12:42 pm | कापूसकोन्ड्या

संडे मिररचा मालक आणि संचालक रॉबर्ट मॅक्सवेल हा मोसादचा हस्तक होता.

बाप रे

माझीही शॅम्पेन's picture

5 Apr 2017 - 12:56 pm | माझीही शॅम्पेन

क्या बात है , बोका शेठ मजा आली वाचून साधारण ह्या सत्य घटनेत मोसाद हारल्या सारखी झालीये
..
---
खरच भारतात मोसाद सारखी एखादी देशाअभिमनी संघटना असायला हवी होती __/\__

अद्द्या's picture

5 Apr 2017 - 1:28 pm | अद्द्या

जबरदस्त झालाय हा भाग हि..

मी मागे केलेली विनंती परत करतो..

आपल्या देशातल्या संस्थे वर हि काही लिहिता आलं तर बघा

जगप्रवासी's picture

5 Apr 2017 - 2:30 pm | जगप्रवासी

बऱ्याच दिवसांनी मोसाद वाचायला मिळालं, मज्जा आली बोका भाऊ.
खूब जियो और लिखते रहो

गणामास्तर's picture

5 Apr 2017 - 2:39 pm | गणामास्तर

लेखाची तारीख तीन तीनदा बघून नवाच भाग आल्याची खात्री करून घेतली आणि धन्यवाद द्यायला प्रतिसाद लिहायला घेतला.
आता वाचतो निवांत. .

रांचो's picture

5 Apr 2017 - 2:43 pm | रांचो

+१

धडपड्या's picture

5 Apr 2017 - 6:36 pm | धडपड्या

+2

मी-सौरभ's picture

5 Apr 2017 - 4:51 pm | मी-सौरभ

पु. भा. प्र.

जव्हेरगंज's picture

5 Apr 2017 - 7:34 pm | जव्हेरगंज

Nivaant vaachto..

Opera browser madhun marathi typayla problem???

आदूबाळ's picture

5 Apr 2017 - 7:49 pm | आदूबाळ

वेल्कम बॅक बोकाभाऊ!

एस's picture

5 Apr 2017 - 7:49 pm | एस

पुभाप्र.

अमित खोजे's picture

5 Apr 2017 - 8:05 pm | अमित खोजे

बऱ्याच दिवसांनी मोसाद चे नाव वाचून आनंद झाला न लगेच सगळं लेख वाचून काढला. मोसाद तर आपल्यासाठी फेवरीट झालाय बगा.

बोका भाऊ खूप दिवसांनी मोसाद बघून आनंद झाला..
मस्तच झालाय हाही भाग..नेहमीप्रमाणेच..

यश राज's picture

5 Apr 2017 - 8:19 pm | यश राज

मोसाद ची खुप दिवसांपासून वाट पाहत होतो. नेहमी प्रमाणे उत्तम लेख

सुबोध खरे's picture

5 Apr 2017 - 8:22 pm | सुबोध खरे

अतिशय सुरेख लेखन (नेहमीप्रमाणेच)
बाकी मोसाद कडून इतका हलगर्जी पणा अजिबात अपेक्षित नाही.

माझीही शॅम्पेन's picture

6 Apr 2017 - 6:08 pm | माझीही शॅम्पेन

डॉक्टर साहेब , तुम्ही पण वजनाचा काटा जरा पुढे सरकावा की :)

पद्मावति's picture

5 Apr 2017 - 9:54 pm | पद्मावति

नेहमीप्रमाणेच मस्त.

अनिंद्य's picture

6 Apr 2017 - 11:59 am | अनिंद्य

रोचक
पु.भा.प्र.

जबरदस्त मोसाद आणि तुमचे लिखाण दोन्हीही...

आनंदयात्री's picture

7 Apr 2017 - 12:53 am | आनंदयात्री

"सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असते" या वाक्याची प्रचिती देणारी हि लेखमाला. या भागात ९०च्या दशकात पोचलीये. अजून दोन दशकात काय काय झालेय हे वाचायची उत्सुकता आहे. बोकाशेठ पुभाप्र आहे.

दीपक११७७'s picture

7 Apr 2017 - 7:18 pm | दीपक११७७

मजा आली वाचताना, छान लिहिलं बोकाभाऊ

पुंबा's picture

8 Apr 2017 - 9:22 am | पुंबा

केवळ अप्रतिम..

vikrammadhav's picture

8 Apr 2017 - 10:31 pm | vikrammadhav

काही वर्षांपूर्वी एक डॉक्युमेंट्री पाहिल्याचं आठवतंय , त्यात ती बिल्डिंग पण दाखवली होती. एक दोन कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला दाखवला होता ते प्रचंड दबावाखाली होते. वर उल्लेख केलेले त्याचे दत्तक आई वडील अमेरिकेतून त्याला भेटायला आले होते, त्यांना सुद्धा बराच प्रयत्न करावा लागला होता. मला वानूनू हे नांव आठवत नव्हतं !!! आत्ता इथे वाचून सिंडी आणि वानूनू दोघांचे फोटो गुगलून बघितले ,

नेहमीप्रमाणे जबरदस्त वगैरे वगैरे!
मोसादसाठी लाॅग इन करायला लावलेसच!
मोसादसाठी कायपन ;)

प्राध्यापक's picture

12 Apr 2017 - 3:42 pm | प्राध्यापक

खर तर हा विषयच उत्कंठा वाढविणारा आहे. आणि त्यात तुमचा अभ्यास पूर्ण व प्रदीर्घ लेख. अप्रतिम लेखन..... शुभेच्छा

स्वाती दिनेश's picture

13 Apr 2017 - 8:14 pm | स्वाती दिनेश

खूप दिवसांनी मोसाद .. बघितल्या बघितल्या लगेच वाचून काढला हा भाग..
स्वाती

उत्तम .. तुमचे लेखन वेगल्या च विश्वात घेउन जाते...पुभाप्र

लिंक :- http://www.loksatta.com/lekha-news/the-most-amazing-raw-operations-1458640/

काळोखातल्या झुंजारकथा

कुलभूषण जाधव हे ‘रॉ’चे गुप्तचर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा इन्कार भारताने अधिकृतपणे केला आहे, तर या आरोपांत तथ्यही असू शकते असे प्रसारमाध्यमे म्हणत आहेत. देशप्रेमी नागरिकांना प्रसारमाध्यमांवर संतापण्यासाठी आणखी एक निमित्त देणाऱ्या या प्रकरणाच्या आधीही भारताने अधिकृतपणे काही इन्कार केले होते. पण म्हणून ‘रॉ’ने आपले काम थांबवले होते असेही नाही.. ते सुरूच होते आणि देशाच्या परराष्ट्रनीतीला यश देणाऱ्या काही कथा त्या कामातूनच घडत होत्या..

जानेवारी १९७१.
अजून बांगलादेश युद्धाला तोंड फुटायचे होते. वातावरणात जबरदस्त तणाव होता. अशा काळात ती संपूर्ण देशास हादरवून टाकणारी घटना घडली.
दोन काश्मिरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या ‘गंगा’ या विमानाचे अपहरण केले. श्रीनगरहून जम्मूकडे निघालेले हे विमान. दहशतवाद्यांनी एक पिस्तुल आणि हातबॉम्ब यांचे भय दाखवून पळवले. लाहोरला नेले. चार कर्मचारी आणि २६ प्रवाशांना ओलीस ठेवले.
हा ‘आयएसआय’चा मोठाच विजय होता. कारण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे हे दहशतवादी वस्तुत: आयएसआयचेच एजंट होते. त्यातल्या एकाचे नाव हाशीम कुरेशी. त्याला आयएसआयनेच प्रशिक्षित केले होते. अश्रफ कुरेशी या चुलतभावाला सोबत घेऊन त्याने ही कामगिरी केली होती. त्यांची मागणी होती अल-फतह संघटनेच्या ३६ दहशतवाद्यांची सुटका करण्याची. पण अशा धमक्यांपुढे भारत कदापि झुकणार नाही, असे इंदिरा गांधी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली होती.
तिकडे पाकिस्तानात मात्र आनंदोत्सव सुरू होता. जे कंदहार विमान अपहरणाच्या वेळी झाले, तसेच तेव्हाही झाले होते. हाशीम कुरेशीला स्वातंत्र्यसैनिक म्हणून डोक्यावर घेतले जात होते. लाहोर विमानतळावर कोणत्याही आडकाठीशिवाय त्याला फिरू दिले जात होते. तो पत्रकारांना मुलाखती देत होता. दुसऱ्या दिवशी त्याने पाकिस्तानकडे एक मागणी केली- झुल्फिकार अली भुट्टो यांना भेटण्याची. पाकिस्तानी नेते वरवर या घटनेचा निषेध करीत असताना भुट्टो मात्र त्याच्या मागे उभे राहिले होते. ते अगदी विमानाजवळ जाऊन त्याला भेटले.
त्यानंतर हाशीमने अचानक सर्व प्रवाशांची सुटका केली. पण अपहरणनाटय़ संपले असे वाटत असतानाच अचानक त्या विमानाला आग लागली. ती आयएसआयने लावली की हाशीमने बॉम्बस्फोट करून ते उडवले, हे काही समजले नाही. पण काहीही झाले तरी आयएसआयने भारताचे नाक कापले होते.
चिडलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ही घटना नेली. पाकिस्तान कसा दहशतवाद्यांना मदत करतो ते दाखवून दिले. आता पाकिस्तानवर काही तरी कारवाई करणे आवश्यकच होते. अखेर इंदिरा गांधी यांनी ‘नाईलाजा’ने एक आदेश दिला. पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातली.
त्या काळातील वृत्तपत्रे पाहिली तर लक्षात येईल, की या प्रकरणावरून तेव्हाही सामान्य जनतेने सरकारवर टीका केली होती. नेहमीप्रमाणे शेपटीघालू धोरणच हे. भारताचे हे दुबळेपण पाहून सच्च्या देशभक्तांचे रक्त सळसळणारच. नेहरू-गांधी घराण्याच्या शांततावादी धोरणामुळेच पाकिस्तान असे धाडस करू शकते, असे कोणालाही वाटणारच. पण..
आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते ते तसेच असते असे नसते. यात भारताचे नाक वगैरे काहीही कापले गेले नव्हते. तर हे ‘गंगा अपहरण प्रकरण’ म्हणजे भारताचा मोठा विजय होता. ‘रॉ’च्या शीरपेचातील एक लखलखता तुरा होता. कारण या सगळ्या अपहरणनाटय़ाचा सूत्रधार होती ‘रॉ’आणि दिग्दर्शक होते आर. एन. काव.
घडले होते ते असे, की जानेवारी १९७१च्या दुसऱ्या आठवडय़ात सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी या हाशीम कुरेशीला सीमेवर घुसखोरी करताना पकडले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आयएसआयच्या या योजनेची माहिती दिली. योजना साधी नव्हती. त्यांना नुसतेच विमान अपहरण करायचे नव्हते. तर राजीव गांधी ज्या विमानाचे पायलट असतील तेच विमान पळवायचे होते. इंदिरा गांधी यांना कोंडीत पकडण्याचा हा डाव होता.
ही माहिती तातडीने रॉचे प्रमुख आर. एन. काव यांना कळविण्यात आली. याचे एक कारण म्हणजे हाशीम हा आता आयएसआयसाठी काम करीत असला, तरी तो मूळचा रॉचा एजंट होता. रॉनेच त्याला पाकव्याप्त काश्मिरात पाठवले होते. पण तेथे जाऊन तो बिघडला. आयएसआयसाठी काम करू लागला.
काव यांना हे समजताच त्यांनी पाकिस्तानवरच हा डाव उलटविण्याचे ठरवले. त्यासाठी इंदिरा गांधी यांची मंजुरी घेतली आणि त्यांनी हाशीम कुरेशीला फितवले. आताही त्याने अपहरणाची योजना पार पाडायचीच होती, पण ती काव यांनी आखून दिल्याप्रमाणे. विमान कसे पळवायचे, मागण्या कोणत्या करायच्या, लाहोरमध्ये काय बोलायचे, कोणाला भेटायचे हे सगळे ठरवून देण्यात आले होते.
हे सगळे कशासाठी करण्यात आले होते?
हेतू दोन होते. एक म्हणजे- पाकिस्तानला दहशतवादी समर्थक ठरवणे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानच्या युद्धतयारीत खोडा निर्माण करणे. बांगलादेशात पाकिस्तानहून लष्कर पाठविण्याचा एक मार्ग होता हवाई. तोच या अपहरणाच्या निमित्ताने भारताने बंद केला.
तर याला म्हणतात ‘रॉ’!
*****
‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग. भारताची केवळ परराष्ट्रांत हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना.
नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणामुळे ही संघटना सध्या चर्चेत आहे. हल्ली रॉवर चित्रपटही येऊ लागले आहेत. ते तद्दन फिल्मी असले तरी त्यामुळे या संघटनेबद्दल लोकमानसात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण जेम्स बॉण्डपद्धतीच्या त्या चित्रपटांतून रॉ म्हणजे नेमके काय हे कसे कळावे? तसाही एकंदरच रॉबद्दलच्या खऱ्या माहितीचा दुष्काळच आहे. जगभरात ‘सीआयए’, ‘मोसाद’, ‘केजीबी’ यांसारख्या संघटनांबद्दल जेवढे लिखाण झाले आहे, या संघटनांच्या गुप्तचरांनी जेवढे लिखाण केले आहे, त्याच्या तुलनेत रॉबद्दलचे लिखाण नगण्यच म्हणावे लागेल. रॉचे बी. रमण, आर. के. यादव, मेजर जनरल व्ही. के. सिंग, अमर भूषण तसेच मलय कृष्ण धर अशा काही अधिकाऱ्यांनी लिहिलेली पाच-सात पुस्तके वगळता रॉबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. खरे तर आपल्यापेक्षा पाकिस्तानी माध्यमांत रॉबद्दल अधिक लिहून आले आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी घटनेत त्यांना रॉचा हात दिसतो. किंबहुना तहरिक-ए-तालिबान ही संघटनासुद्धा रॉनेच उभारली असा तेथील लोकप्रिय षड्यंत्र सिद्धांत आहे. तो अर्थातच प्रोपगंडाचा भाग असतो. सर्वच देश तो करीत असतात. परंतु रॉसारख्या संस्थांबद्दलच्या अधिकृततेच्या जवळ जाणाऱ्या माहितीच्या अभावामुळे झाले असे, की आपणा भारतीयांच्या मनात देशाची एक विचित्र दुबळी प्रतिमा तयार झाली.
खरे तर, शत्रूराष्ट्र हे आक्रमक आहे, अनैतिक आहे; आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे. आंतरराष्ट्रीय संकेत पाळणारा आहे, अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायात असणे हे फायद्याचेच असते. ते नैतिक बळ गमावणे हे परराष्ट्र धोरणातील अपयश मानले जाते. म्हणूनच गुप्तचरांच्या कारवायांबद्दल बढाया मारायच्या नसतात. आम्ही आता अमुकतमुक करणार आहोत, असे सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांतून बोलायचे नसते. ते बोलून हानी होते ती नैतिक बळाची. याचा अर्थ आपण काय करतो आहोत किंवा केले, याची माहिती अन्य राष्ट्रांना नसतेच असे नाही. एकमेकांच्या गुप्तचरांना फितवण्याचे, त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्याचे प्रकार सर्वच देश करीत असतात. त्यापासून रॉसुद्धा मुक्त नाही. रॉचे अशोक साठे सीआयएच्या संपर्कात होते. मेजर आर. एस. सोनी आयएसआयसाठी काम करीत होते. अलीकडचे सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे रवींद्र सिंग यांचे. हे रॉमधील मोठे अधिकारी. पण पैशाच्या लोभाने ते सीआयएला सामील झाले. हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. पण ते सीआयएच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी मोठय़ा चलाखीने त्यांना नेपाळमार्गे अमेरिकेला हलविले. तेथे त्यांना नवी ओळख देण्यात आली. अशा प्रकारे अगदी तथाकथित मित्रराष्ट्रही एकमेकांवर हेरगिरी करीत असतात. आता आपल्याकडील अनेकांना असे वाटते की माध्यमांतून गुप्तचरांबद्दल काही बोलणे म्हणजे शत्रूराष्ट्राला माहिती पुरवणे. कुलभूषण जाधव प्रकरणात हे पाहायला मिळाले. आता गुप्तचर संघटनांना एकमेकांबद्दलची माहिती वर्तमानपत्रांतील बातम्यांतून मिळते असे वाटणे हा बावळटपणाच. या अशा सामूहिक बावळटपणामुळे देशाचे नुकसानच होते. अखेर आपले सरकार काहीच करीत नाही, ते दुबळे आहे, आपल्या गुप्तचर संस्था कमजोर आहेत, अशी जनभावना तयार होणे हे काही राज्यव्यवस्थेसाठी फायद्याचे नसते. ती हानी टाळायची असेल तर गुप्तचर संस्थांचा इतिहास नागरिकांसमोर येणे आवश्यक असते.
*****
रॉच्या इतिहासाला आरंभ होतो तो २१ सप्टेंबर १९६८पासून. १९६२ आणि ६५च्या युद्धात शत्रूंची पुरेशी गोपनीय माहिती मिळविण्यात इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)ला आलेल्या अपयशामुळे, परराष्ट्रांत हेरगिरी करणारी वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. त्याची जबाबदारी त्यांनी सोपविली रामेश्वर नाथ काव यांच्याकडे.
कोण होते हे काव?
ते तेव्हा ‘आयबी’चे संयुक्त संचालक होते हे झालेच, पण ते त्याहून उंच होते. संगीतक्षेत्रातील मंडळी गुरूचे नाव निघताच कानाच्या पाळीला आदरभावाने हात लावतात. हेरगिरीच्या विश्वात काव यांचे हेच स्थान आहे. भारतीय गुप्तचरांचे पितामहच ते. ‘लिजंड’ म्हणावेत अशी माणसे कमीच असतात. ते त्यातील एक होते. आणि हे मत केवळ भारतीयांचेच नव्हते. १९८२ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन गुप्तचर प्रमुख काऊंट अलेक्झांडर दे मॅरेन्चे यांनी ७०च्या दशकातील जगातील पाच सर्वोत्तम गुप्तचर प्रमुखांत काव यांची गणना केली होती. थोरले जॉर्ज बुश हे सीआयएचे प्रमुख होते. तेही काव यांचे चाहते. एकदा अमेरिका भेटीत त्यांनी काव यांना एक भेटवस्तू दिली होती. तो होता घोडय़ावर बसलेल्या अमेरिकन काऊबॉयचा छोटासा पुतळा. का, तर रॉच्या गुप्तचरांना ‘कावबॉइज्’ म्हणतात म्हणून. त्या पुतळ्याची मोठी प्रतिकृती आज रॉच्या मुख्यालयात दिमाखाने उभी आहे.
आज रॉच्या नावावर ज्या काही मोठय़ा अभिमानास्पद कामगिऱ्या सांगितल्या जातात, त्यात काव यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची आणि बऱ्यापैकी गवगवा झालेली कामगिरी म्हणजे बांगलादेश निर्मितीची. आपल्या हे लक्षातच येत नसते, की आपण त्या युद्धात पाकिस्तानचा नुसताच पराभव केलेला नाही, तर त्या देशाची फाळणी केली आहे. त्यात जेवढे लष्कराचे श्रेय आहे, तेवढेच रॉ (आणि आयबी)चेही श्रेय आहे. काय केले होते रॉने?
बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान असताना तेथे जगातील एक मोठी बंडखोर संघटना उभारली. तिचे नाव मुक्तिफौज. नंतर तिला मुक्तिवाहिनी म्हणण्यात येऊ लागले. तिचे दोन भाग होते- नियमित वाहिनी आणि गोना वाहिनी. ही गोना वाहिनी अधिक खतरनाक होती. रॉच्या गुप्तचरांनी या वाहिनीतील बंडखोरांना घातपाताचे प्रशिक्षण दिले होते. याशिवाय रॉने आणखी एक दहशतवादी संघटना तयार केली होती. तिचे नाव कादर वाहिनी. टायगर सिद्दिकी या नावाने ओळखला जाणारा बंडखोर नेता अब्दुल कादर सिद्दिकी हा तिचा नेता होता. रॉचे गुप्तचर आणि या बंडखोर फौजा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. ‘मिशन रॉ’मधील माहितीनुसार, साधारणत: मार्च ते ऑगस्ट १९७१ या काळात मुक्ती वाहिनीच्या बंडखोरांनी १५ ते २० हजार पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले होते. याबद्दल नंतर बोलताना पाकिस्तानचे लेफ्ट. जनरल नियाझी म्हणाले होते, ‘‘त्यांनी आम्हाला आंधळे आणि बहिरे करून टाकले होते.’’ रॉला मिळालेले हे प्रमाणपत्रच!
बांगलादेश मुक्तिसंग्रामात रॉने मोठे काम केले होते, हे तसे अनेकांना माहीत असते. ही कामगिरी होती पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची. पण रॉने देश जोडण्याचेही महत्त्वाचे कार्य केले आहे. सिक्कीमच्या विलीनीकरणाचे बरेचसे श्रेय द्यावे लागेल ते रॉला. सिक्कीमचे तत्कालीन राजे पाल्देन थोंडून नामग्याल, त्यांची अमेरिकन पत्नी होप कूक यांच्या सिक्कीमला स्वतंत्र ठेवण्याच्या सर्व कारवाया हाणून पाडत इंदिरा गांधी यांनी हे राज्य भारतात सामील करून घेतले. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.
एकीकडे चीन आणि दुसरीकडे अमेरिका यांचा प्रचंड दबाव होता. सिक्कीमची राणी होप कूक ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धोरणी बाई. तिच्या आडून सीआयए काम करीत होती. पुढे १९७२ मध्ये जेव्हा सिक्कीममध्ये निवडणुका लागल्या, तेव्हा तेथे भारतविरोधी भावना भडकाविण्यासाठी तिने सीआयएला थेट मैदानात उतरविले होते. राजा आणि त्याच्या पक्षाला मदत करण्यासाठी ‘युसिस’चे तत्कालीन संचालक होल्डब्रूक ब्रॅडली हे गंगटोकमध्ये तळ ठोकून होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच कलकत्त्यातील अमेरिकी वकिलातीतील सीआयएचे एक अधिकारी पीटर बुले हे राजाला भेटून आले होते. तेव्हा तेथे सामना जसा राजेशाही विरुद्ध लोकशाही असा होता; तसाच तो सीआयए विरुद्ध रॉ असाही होता. रॉने तेथील लोकशाहीवादी नेत्यांना एकत्र आणले. त्यांना सर्व प्रकारची मदत केली. तेथील लेप्चा-भुतिया जमातीचे काझी ल्हेन्डूप दोर्जी हे प्रतिष्ठित नेते. ते राजाच्या विरोधात होते. त्याला रॉने खतपाणी घातले. त्यांची पत्नी एलिसा मारिया. ही मूळची बेल्जियमची. तिचा आणि होप कूक हिचा छत्तीसचा आकडा. होप कूकचा वापर सीआयए करीत होती. रॉच्या अधिकाऱ्यांनी मग एलिसा मारिया हिला हाताशी धरले. तिला सिक्कीममधून तडीपार करण्यात आले. तेव्हा कालिपाँगमध्ये ती राहू लागली. तेथे रॉने तिला सर्व प्रकारची मदत केली. हेरगिरीचा मोठा आखाडाच सिक्कीममध्ये त्या काळात रंगला होता. एकीकडे राजाचे दमनयंत्र आणि दुसरीकडे रॉने भडकाविलेले आंदोलन यांत अखेर विजय भारताचाच झाला.
श्रीलंकेतील अल्पसंख्याक हिंदू तमिळी वर्षांनुवर्षे सिंहलींचे अत्याचार सहन करीत असत. त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या कल्पनेला इंदिरा गांधी यांचा पूर्ण पाठिंबा होता. अशा आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत विचार करण्यासाठी त्यांनी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, त्यात काव हेही होते. ‘एलटीटीई’ही हिंदू तमिळींची दहशतवादी संघटना हे या समितीचेच अपत्य. पुढे ही योजना फसली. परंतु रॉ कोणत्या स्तरावर कारवाया करीत असते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
पाकिस्तान हे तर रॉचे नेहमीचेच लक्ष्य. पाकची आयएसआय ईशान्य भारत, काश्मीर आणि पंजाबात फुटीरतावादी कारवाया करीत असताना, रॉही त्यांना तशाच प्रकारचे प्रत्युत्तर देत होती. पाकिस्तानातील ‘जिये सिंध’ ही चळवळ त्याचेच फलीत. त्या काळात पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनी सिंध प्रांतांतील घरांवर स्वतंत्र ध्वज लावलेले दिसत. मोरारजी देसाई यांनी १९७७ मध्ये रॉच्या या कारवाया थांबविल्या. पण पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पाकिस्तानी दहशतवादाला जशाच तसे उत्तर देण्याचे धोरण आखले. जिये सिंध, मुहाजिर कौमी मुव्हमेंट, बलुचिस्तानातील स्वातंत्र्यवादी चळवळ यांना खतपाणी घालण्याचे काम रॉनेच केल्याचे सांगितले जाते. रॉच्या काही अधिकाऱ्यांच्या मते, तेथे रॉच्या एजंटांनी अनेक घातपाती कारवायाही केल्या आहेत. राजीव गांधी यांच्या आदेशावरून रॉने पाकिस्तानचे खलिस्तानवादी मनसुबे हाणून पाडण्यासाठी हेरगिरीविरोधी दोन पथके (सीआयटी-एक्स आणि सीआयटी-जे) स्थापन केली होती. त्याकाळात भारतातील दहशतवादी हल्ल्यांना लाहोर, कराची आणि मुल्तानमधील हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले जात होते. ही पथके गुजराल सरकारच्या काळात गुंडाळण्यात आली. अर्थात सरकारी पातळीवरून आपण हे सारे नेहमीच नाकारत आलो आहोत. मात्र पाकिस्तानातील सामरिक विश्लेषक लेफ्ट. जन. अमजद शोएब यांच्यावर विश्वास ठेवायचा, तर पाकिस्तानातील राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमे यांच्यात रॉने मोठय़ा प्रमाणावर शिरकाव केला आहे. एवढेच नव्हे, तर लष्करातही रॉचे अनेक एजंट आहेत. त्यातील काहींना अटकही झाली आहे. पाकिस्तानमध्ये अंदाधुंदी माजविणे, त्याला आर्थिकदृष्टय़ा कमजोर करण्यासाठी रॉ काम करीत आहे. यात खरोखरच तथ्य आहे का? हा प्रोपगंडाचाही भाग असू शकतो. एक मात्र खरे, की रॉ अशा प्रकारचे काम करू शकते. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र कौशिक.
हा राजस्थानातील तरुण. त्याला रॉने हेरले. दोन वर्षे हेरगिरीचे प्रशिक्षण दिले. मुस्लिम धर्म- संस्कृतीचे, उर्दू भाषेचे शिक्षण दिले. अगदी सुंता करून त्याला पक्का मुस्लिम बनविले. बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे देऊन १९७५ मध्ये त्याला पाकिस्तानात पाठविले. तो तेथे सैन्यात सामील झाला. वरच्या पदावर गेला. लग्नही केले त्याने तेथे. दोन मुले झाली त्याला. अनेक वर्षे त्याने तेथून रॉसाठी हेरगिरी केली. आयबीचे माजी संचालक मलय कृष्ण धर यांच्यानुसार, तो तेथे हनीफ या नावाने वावरत होता. पण अखेर तो पकडला गेला. त्याचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यातच तो आजारी पडला. मेंदूवर परिणाम झाला त्याच्या. १९९८ पर्यंत आपण त्याचे अस्तित्व नाकारले होते. अखेर पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाने पाकिस्तानी तुरुंगातून त्याला शोधून काढले, तेव्हा कुठे आपण ते स्वीकारले. पण पाकिस्तानी तुरुंगातच तो मृत्यू पावला.
अशा अनेक कहाण्यांनी रॉचा इतिहास समृद्ध आहे. कहाण्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, मॉरिशसपासून, सेशल्स, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या. त्यातील काही उघड झाल्या. अनेक गुलदस्त्यात आहेत. त्या समजतील, न समजतील, पण एक मात्र खरे की ज्या काही गोष्टी रॉअधिकाऱ्यांच्या पुस्तकांतून आपल्यासमोर आल्या आहेत, त्यातून आपणही काही कमी नाही, हेच दिसते. येता-जाता इस्रायलचे उदाहरण देणारे आपण, त्यावरून आपल्या सरकारांना नावे ठेवणारे आपण.. पडद्याआड काय चाललेले असते याचा अनेकदा पत्ताही नसतो आपल्याला. त्यातूनच मग अनेक गैरसमज कुरवाळत बसतो.. देशाच्या दौर्बल्याचे, शांततावादी धोरणाचे. त्यातील काही दूर व्हावेत म्हणून या ‘रॉ’च्या झुंजार कथा..
संदर्भ-
The Kaoboys of R&AW – Down Memory Lane : B. Raman, Lancer Publishers, 2013
Mission R&AW : R. K. Yadav, Manas Publications, 2014
India’s External Intelligence : Maj. Gen. V. K. Singh, Manas Publications, 2013
Intelligence – An Insider’s View : Ashok Karnik, FINS, 2015
Operation Triple X : M. K. Dhar, Manas Publications, 2012 (Novel)
RAW agents operate in various Pakistani departments, organisations : dawn.com/news/1277853

एनिग्मा's picture

25 Apr 2017 - 3:04 am | एनिग्मा

बोकांचे लेखन अर्थातच नेहेमी प्रमाणे उत्तम झाले आहे पण गणेशचा 'रॉ ल लेख वाचून अजूनच मज्जा आली. आपली हेर संस्था नेहेमीच कार्यरत आहे पण आपल्याला ते कधी कोणी सांगत नाही आणि तिथेच आपल्या लोकांचा गैरसमज होतो. थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपण आपल्या हेर कथा बाहेर आणायला हव्यात. ते राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टीने चांगले आहे.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2017 - 5:00 am | पिलीयन रायडर

अत्यंत सहमत!

बोका-ए-आझम's picture

25 Apr 2017 - 10:48 am | बोका-ए-आझम

पण RAW आणि IB यांच्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न (रामन आणि धर यांच्या पुस्तकांमध्ये या मुद्द्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे) हा आहे की या दोन्हीही संस्था अत्यंत बंदिस्त आहेत. त्यांच्यावर संसदेचं कुठल्याही प्रकारे नियंत्रण नाही. CIA जशी काँग्रेसला आणि मोसाद जशी नेसेटला उत्तरदायी आहे, तसे IB आणि RAW नाहीत. परिणामी त्यांचा वापर अनेकदा तत्कालीन पंतप्रधानांच्या राजकीय महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी होतो. IB चा सिक्कीमच्या संदर्भात १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता सरकारने कशा प्रकारे वापर करुन घेतला - विशेषतः गृहमंत्री चरणसिंग यांनी - याचा उल्लेख एम.के.धर यांच्या Open Secrets मध्ये आहे. असं असल्यामुळे या कथा बाहेर येणं कधीकधी फार दुरापास्त होतं.

जुइ's picture

28 Apr 2017 - 12:17 am | जुइ

हाही भाग नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक झाला आहे.

diggi12's picture

28 Apr 2017 - 11:28 pm | diggi12

भाऊ पुढला भाग कधी ?

रामदास२९'s picture

19 May 2017 - 12:25 pm | रामदास२९

बोक्या भौ .. पुधचा लेख केव्हा?

सोमनाथ खांदवे's picture

25 Jun 2017 - 7:20 pm | सोमनाथ खांदवे

जबरदस्त मलिका होती

सोमनाथ खांदवे's picture

25 Jun 2017 - 7:20 pm | सोमनाथ खांदवे

जबरदस्त मलिका होती

नया है वह's picture

26 Jun 2017 - 7:46 pm | नया है वह

भाऊ पुढला भाग कधी ?

गुल्लू दादा's picture

7 Aug 2017 - 8:01 am | गुल्लू दादा

लवकर टाका कृपया।।

diggi12's picture

2 Nov 2017 - 9:36 pm | diggi12

पुढचा भाग़ कधी ?

@बोका-ए-आझम
खूप धन्यवाद ही मोसादची लेख मालिका सुरु केल्याबाद्दल.
नुकताच Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service " पुस्तक वाचले आणि तुमचे लेख पण परत वाचून काढले :)
मिसळ पाव वर अशा मालिका वाचल्यावर खरंच खूप अभिमान वाटतो मिपाकर असल्याचा.
तुमच्या नवीन लेखाची आतुरतेने वाट पाहत आहोत आम्ही मिपाकर आणि तुम्हाला नवीन लेखासाठी शुभेच्छा.

अथांग आकाश's picture

16 Oct 2018 - 11:52 pm | अथांग आकाश

जबरदस्त लेख मालिका!

.

सुबोध खरे's picture

17 Oct 2018 - 11:14 am | सुबोध खरे

हे वानूनू प्रकरण दिसते आहे तितके साधे सोपे नाही.
वानूनू कडे मोसादचे इतके अक्षम्य दुर्लक्ष होईल असे स्वीकारणे कठीणच होते.
आता ३० वर्षानंतर "आपल्या शत्रुंना इस्रायलकडे अणुबॉम्ब आहे हे सांगून घाबरवून सोडायचे (nuclear deterrence) या रणनीतीचा भाग म्हणून वानूनू कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले" असे उघडकीस आले आहे.(१९७३ नंतर अरब इस्रायल युद्ध झालेले नाही आणि इस्रायल कडे अणुबॉम्ब आहे हि माहिती असल्यामुळे कदाचित कोणतेही अरब राष्ट्र १९८६ नंतर त्यांच्यावर हल्ला करण्यास धजावले नसावे)
आणि या रणनीतीचा सूत्रधार दुसरे तिसरे कोणीही नसून इस्रायलचे पंतप्रधान श्री शिमोन पेरेस हेच असावे असं दिसते.
जिज्ञासूंनी खालील दुवा पूर्णपणे वाचून पाहावा
https://www.haaretz.com/israel-news/.premium.MAGAZINE-did-israel-rig-the...

श्वेता२४'s picture

17 Oct 2018 - 3:01 pm | श्वेता२४

अण्वस्त्रप्रकल्प हा प्रत्येक राष्ट्राचा अत्यंत संवेदनशील विषय असताना त्याबाबतीत इतका हलगर्जीपणा होईल यावर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे. तसेच त्यावेळी सीसीटीव्हीसारखी प्रणाली नव्हती का? शिवाय कॅमेराने एवढे फोटो काढेपर्यंत कुणाच्याच काही कसं लक्षात आले नाही . तसेच वानूनूच्या मित्रमंडळींबद्दलही कल्पना असताना त्याच्यावर पाळत ठेवावीशी वाटली नाही यावरुन खरे सरांच्या वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे.