मोसाद - भाग ५

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
21 Jan 2016 - 12:35 am


.
मोसाद - भाग ४

मोसाद - भाग ५

मे १९६०, ब्युनोस आयर्स, अर्जेन्टिना. मोसादने आइकमनचं ११ मे या दिवशी अपहरण केलं आणि त्याला ब्युनोस आयर्स एअरपोर्टच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात ठेवलं. या बंगल्यात आइकमनकडून इतर फरारी नाझी युद्धगुन्हेगारांबद्दल जेवढी मिळवता येईल तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू होता. झ्वी आहारोनी, ज्याने आइकमनचं ब्युनोस आयर्समधलं घर आणि स्वतः आइकमनलाही शोधून काढलं होतं, तो आइकमनला दररोज प्रश्न विचारत असे.

एका दिवशी या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान आइकमनने ब्युनोस आयर्समधल्याच एका घराचा पत्ता आहारोनीला सांगितला आणि जेव्हा तिथे कोण राहतंय ते आहारोनीला कळलं तेव्हा त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. डॉ. जोसेफ मेंगेले. ऑशविट्झ मृत्यूछावणीतला यमदूत. त्याला तिथले लोक डॉ.डेथ याच नावाने ओळखत असत.

ऑशविट्झ मृत्यूछावणीचे तीन मुख्य भाग होते. पहिल्या भागात प्रशासकीय कार्यालय आणि तिथे राहणाऱ्या लोकांची निवासस्थानं होती. दुसरा भाग, जो बिर्केनाऊ इथे होता, तिथे ही कुप्रसिद्ध मृत्यूछावणी होती आणि तिसरा भाग, जो मोनोवित्झ या ठिकाणी होता, तिथे श्रमछावणी होती. ‘ बिर्केनाऊला पाठवणी ’ असा वाक्प्रचार तिथे रूढ होता. त्याचा अर्थ उघड होता आणि तो तसा होण्यात ज्यांनी हातभार लावला होता, त्यांच्यात प्रमुख होता डॉ. मेंगेले.

संपूर्ण पूर्व आणि मध्य युरोपातून ऑशविट्झमध्ये ज्यू येत होते. १९४३ पासून, म्हणजे मेंगेले तिथे काम करायला लागल्यापासून तिथे ज्यूंच्या नरमेधाची व्याप्ती आणि तत्परता, या दोन्ही गोष्टी वाढल्या होत्या. जवळजवळ ३००० ज्यू तिथे दररोज मारले जात होते आणि नाझी उच्चवर्तुळात या गोष्टीचं प्रचंड कौतुक झालं होतं. ऑशविट्झला इतर कुठल्याही मृत्यूछावणीपेक्षा जास्त संसाधनं मिळत होती आणि तिथला कमांडंट रुडॉल्फ होएस आणि मुख्य डॉक्टर मेंगेले या दोघांनाही पदकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कडक इस्त्रीचा सूट घातलेला मेंगेले ऑशविट्झ रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका मोठ्या फलाटाच्या बाजूला त्याच्या सहकारी डॉक्टरांसमवेत उभा राहात असे. हे रेल्वे स्टेशन मृत्यूछावणीतच होतं. गाडीतून उतरल्यावर सर्व लोकांना या फलाटावर घेऊन येत. मेंगेले आणि त्याचे सहकारी त्यांच्यामधल्या शारीरिकदृष्ट्या धट्टयाकट्ट्या लोकांना डावीकडे जायला सांगत. स्त्रिया, लहान मुलं आणि वृद्ध लोकांना उजवीकडे जायला सांगत असत. उजवीकडचा रस्ता सरळ गॅस चेंबरकडे जात असे. अनेक वेळा छावणीत आल्यावर जेमतेम दीड ते दोन तासांमध्ये लोकांना गॅस चेंबरमध्ये पाठवलं जात असे.

लहान मुलांमध्ये जर मेंगेलेला जुळी मुलं किंवा सोनेरी केस आणि निळे डोळे अशी ‘ आर्यन ’ वैशिष्ट्यं असलेली मुलं दिसली, तर अशा मुलांना वेगळं काढलं जात असे. त्यांच्यातल्या काही जणांना जर्मनीमध्ये किंवा नाझींनी पोलंडचं जर्मनीकरण करण्यासाठी तिथे मुद्दामहून आणलेल्या जर्मन कुटुंबांमध्ये पाठवलं जात असे. जुळ्या मुलांची वैशिष्ट्यं हा मेंगेलेच्या अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे या जुळ्या मुलांवर अनेक प्रयोग, कधी तर अघोरी म्हणावेत असे प्रयोग, केले जात. प्रयोगांनंतर त्यांना ठार मारलं जात असे. नाझी राजवटीमध्ये बुद्धिवंत लोकांना चढलेला ज्यू द्वेषाचा उन्माद आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी केलेले अत्याचार यांचं मेंगेले एक जितंजागतं प्रतीक होता.

जानेवारी १९४५ मध्ये सोविएत सैन्याने ऑशविट्झ मुक्त केलं. त्याच्या एक आठवडा आधी मेंगेले तिथून सटकला होता आणि १९४९ पर्यंत लपून छपून वावरत होता. त्याच्या कुटुंबाचा शेतकीविषयक यंत्रसामग्री विकण्याचा व्यवसाय होता आणि त्यांना युद्धाची झळ तेवढी लागलेली नव्हती. शिवाय युद्धोत्तर जर्मनीच्या पुनर्वसनामध्ये शेतीला महत्व होतंच. त्यामुळे मेंगेले कुटुंबावर हलाखीचे दिवस कधीही आलेले नव्हते आणि भूमिगत झालेल्या जोसेफ मेंगेलेला पैसे आणि इतर मदत करणं त्यांना सहज शक्य होतं. १९४९ मध्ये हेच पैसे वापरून मेंगेले इटलीमधल्या जेनोआ बंदरातून दक्षिण अमेरिकेच्या दिशेने निघून गेला. त्याच्या पत्नीने मात्र तिथे जायला नकार दिला आणि जर्मनीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. या कागदपत्रांवर मेंगेलेची सही आवश्यक होती, त्यामुळे ती अर्जेन्टिनामध्ये पाठवण्यात आली, आणि हे मोसादने शोधून काढलं. पण अर्जेन्टिनामध्ये नक्की कुठे ते त्यांना माहित नव्हतं आणि आता आइकमनने एक धागादोरा पुरवला होता.

१९ मे १९६० या दिवशी इझरेली विमानसेवा एल अॅलचं विमान ब्युनोस आयर्सला उतरलं. २० मे या दिवशी जेव्हा हे विमान परत जाणार होतं, तेव्हा त्यात आइकमन असणार होता. हे विमानं ब्युनोस आयर्सला उतरायच्या दोन दिवस आधी, म्हणजे १७ मे या दिवशी मोसाद एजंट्सनी मेंगेलेचा ब्युनोस आयर्समधला पत्ता शोधून काढला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेंगेले तिथे स्वतःच्याच नावाने राहात होता. आइकमनला शोधणाऱ्या झ्वी आहारोनीनेच हा पत्ता शोधून काढला होता, पण दुर्दैवाने मेंगेले तिथे नव्हता. तो आणि त्याचं कुटुंब सुट्टीवर गेलेलं होतं.

जेव्हा इसेर हॅरेलला हे समजलं, तेव्हा त्याने रफी एतानला बोलवून त्याच्यासमोर आपली योजना मांडली –
आइकमनबरोबर मेंगेलेलाही उचलायचं आणि इझराईलला घेऊन जायचं. पण एतानने त्याला नकार दिला. त्याच्या मते आइकमनच्या अपहरणामध्ये प्रचंड धोके होते आणि निव्वळ सुदैवाने आत्तापर्यंत कुठलाही प्रश्न उद्भवला नव्हता. शिवाय आइकमनला एकट्याला इझराईलला घेऊन जाणं तुलनेने सोपं होतं. त्याच्याबरोबर मेंगेलेसुद्धा असेल, तर हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात येऊन इझराईलची आंतरराष्ट्रीय बदनामी होण्याचा धोका जास्त होता. आइकमन अर्जेन्टिनामध्ये कुणाच्या अध्यात न मध्यात असा राहात होता, पण मेंगेले तोपर्यंत एक यशस्वी उद्योजक बनला होता. आइकमनच्या तुलनेत त्याला ओळखणारे लोकही जास्त होते.

शेवटी हॅरेललाही या योजनेमधले धोके जाणवले आणि त्याने माघार घेतली. तेव्हा एतानने त्याला एक ऑफर दिली – जर आइकमनला इझराईलमध्ये नेल्यावर ही बातमी एक आठवडा गुप्त राहू शकली, तर तो मेंगेलेला उचलणार होता. आइकमनच्या अपहरणासाठी मोसादने ब्युनोस आयर्समध्ये अनेक घरं आणि बंगले भाड्याने घेतले होते. एतान आणि अजून चार एजंट्स वेगळ्याच मार्गाने ब्युनोस आयर्समध्ये परत शिरणार होते आणि जर आइकमनच्या अपहरणाची आणि इझराईलमध्ये आगमनाची बातमी एक आठवडा गुप्त राहिली, तर तशाच प्रकारे मेंगेलेला उचलून एतान आणि इतर एजंट्स इझराईलला घेऊन आले असते आणि मग दोघांच्याही अपहरणाची बातमी जाहीर झाली असती. हॅरेलने हे मान्य केलं.

२० मेच्या रात्री आइकमनला घेऊन विमान उडालं. इंधन भरण्यासाठी विमानाचा पहिला थांबा ब्राझीलमध्ये रिओ डी जानिरोला होता. तेव्हा एतान, शालोम आणि मॉल्किन त्यातून उतरले आणि वेगळ्याच कागदपत्रांवर तिथून चिले देशातील सँतियागो इथे गेले. तिथून मग त्यांनी अर्जेन्टिनामध्ये परत प्रवेश केला. ब्युनोस आयर्समध्ये जाऊन मेंगेलेवर पाळत ठेवण्याची त्यांची योजना होती.

पण २२ मेच्या दिवशी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी आइकमन इझराईलच्या ताब्यात असल्याची घोषणा केली आणि ही बातमी जगभर पसरली. एतान आणि इतर एजंट्ससाठी आता ब्युनोस आयर्समध्ये जाऊन मेंगेलेला उचलणं ही अशक्य गोष्ट होती. ते ताबडतोब चिलेला परत गेले आणि तिथून इझराईलमध्ये गेले.

पंतप्रधानांनी आइकमनच्या अपहरणाची बातमी एक आठवडा गुप्त ठेवायला नकार दिला असं हॅरेलने रफी एतानला सांगितलं. पोलिस, कस्टम अधिकारी, एल अॅल अशा अनेकांना आइकमन इझराईलमध्ये आल्याचं माहित असल्यामुळे ही बातमी जर जाहीर होण्याच्या आधी पसरली तर देशाची बदनामी होईल. त्यापेक्षा आपण ते जाहीर करू असा बेन गुरियन यांचा युक्तिवाद होता.

आइकमनच्या अपहरणाबद्दल जेव्हा मेंगेलेला समजलं तेव्हा तो ब्युनोस आयर्सच्या मार्गावर होता. आपल्याला असलेला धोका त्याला जाणवला आणि तो तिथूनच पराग्वे देशात पळून गेला. तिथे १९ वर्षांनी, फेब्रुवारी १९७९ मध्ये, समुद्रात पोहत असताना आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यामुळे तो बुडून मृत्यू पावला. त्याचं दफन वेगळ्या नावाने करण्यात आलं. पुढे डी.एन.ए. तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी त्याच्या अवशेषांवरून तो मेंगेलेच असल्याचं सिद्ध केलं.

--------------------------------------------------------------------------------

मार्च १९६२ मध्ये पंतप्रधान बेन गुरियननी इसेर हॅरेलला भेटायला बोलावलं. आता त्यांच्या भेटी नियमितपणे होत असत. पण ही भेट विशेष होती. हॅरेल आल्या आल्या त्याला बसायलाही न देता पंतप्रधानांनी प्रश्न विचारला – “मला सांग, या मुलाला तू शोधू शकशील का?”

त्यांनी कोणता मुलगा, काय मुलगा, त्याचं नाव काय वगैरे काहीही सांगितलं नाही, पण सांगायची गरज नव्हती. पंतप्रधान कोणाबद्दल बोलताहेत ते हॅरेलला अगदी व्यवस्थित माहित होतं. गेली दोन वर्षे हा इझराईलमधला एक ज्वलंत प्रश्न झाला होता. वर्तमानपत्रं, रेडिओ, टीव्ही, नेसेट – सगळीकडे हीच चर्चा चालू होती. देशातले पुरोगामी आणि नव्या विचारांचे ज्यू पुराणमतवादी आणि कट्टर ज्यूंच्या तोंडावर हाच प्रश्न पुन्हापुन्हा फेकत होते – योसेल कुठे आहे?

या प्रश्नातला योसेल म्हणजे योसेल शूशमाकर. फक्त आठ वर्षांचा असलेला एक छोटा मुलगा. इझराईलच्या होलोन शहरात राहणाऱ्या योसेलचं अपहरण झालं होतं, आणि या अपहरणात त्याच्या आजोबांचा, त्याच्या आईच्या वडिलांचा सक्रीय सहभाग होता. या आजोबांचं नाव होतं नाह्मान श्तार्क्स आणि तो अत्यंत कट्टर, पुराणमतवादी हासिदिक ज्यू होता. योसेलला अत्यंत कडक अशा परंपरागत ज्यू पद्धतीने वाढवण्याची श्तार्क्सची इच्छा होती आणि त्याचसाठी त्याने त्याच्या आईवडिलांकडून योसेलला स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. आणि आता हा मुलगा गायब झाला होता. त्याचा कुठल्याही प्रकारे माग लागत नव्हता.

जसजसे दिवस जात होते तसा इझराईलमधला असंतोष अधिकाधिक उग्र व्हायला लागला होता. एका घरातल्या प्रकरणाने आता देशव्यापी वादळाचं रूप घेतलं होतं आणि चिंतेची बाब ही होती की त्यामुळे देशातल्या नागरिकांचे सरळसरळ दोन गट झाले होते – पुराणमतवादी, कट्टर, कडवे ज्यू विरुद्ध नवमतवादी, पुरोगामी ज्यू. या प्रश्नाचं उत्तर जर लवकरात लवकर सापडलं नाही, तर हा संघर्ष यादवी युद्धाचं स्वरूप धारण करेल आणि इझराईलच्या शत्रूंसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी सार्थ भीती पंतप्रधानांना वाटत होती. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी हॅरेलकडे ही कामगिरी सोपवायचा निर्णय घेतला होता.

“तुमची जर तशी इच्छा असेल, तर मी प्रयत्न करतो,” हॅरेल म्हणाला. आपल्या ऑफिसमध्ये परत येऊन त्याने या कामगिरीसाठी एक नवीन फाईल उघडली. या कामगिरीचं सांकेतिक नाव असणार होतं ऑपरेशन टायगर कब. वाघाचा छावा!

योसेल हा एक गोड, खेळकर आणि मस्तीखोर मुलगा होता. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच. फक्त त्याचे आईवडील म्हणून त्याने चुकीच्या लोकांची निवड केलेली होती. हे योसेलचं नव्हे तर त्याच्या आजोबांचं, नाह्मान श्तार्क्सचं मत होतं. श्तार्क्स उंच आणि हाडांचा सापळा वाटावा एवढा बारीक होता. हासिदिक ज्यूंच्या पद्धतीप्रमाणे त्याने दाढी वाढवलेली होती. त्याचा चेहरा त्यामुळे जास्तच खंगलेला दिसे. डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा असल्यामुळे त्याचे भेदक डोळे कुणाच्या लक्षात येत नसत. त्याचा जन्म रशियामध्ये झाला होता. १९१७ च्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर रशियामधली चर्चेस, सिनेगॉग्ज आणि मशिदी या सगळ्यांवर कम्युनिस्टांचा निधर्मी वरवंटा फिरला आणि ख्रिश्चन धर्मगुरुंप्रमाणेच ज्यू राब्बायसुद्धा कम्युनिस्ट दडपशाहीला बळी पडले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रशिया आणि जर्मनी यांच्यात अनाक्रमणाचा करार झालेला होता आणि जर्मनीशी मैत्री दृढ करण्यासाठी रशियामध्येही ज्यूंना तुरुंगात आणि गुलागसारख्या छळछावण्यांमध्ये पाठवायला सुरुवात झाली होती. श्तार्क्सला असंच सैबेरियामधल्या तुरुंगात जावं लागलं. युद्धाचा संपूर्ण काळ त्याने गुलागमध्येच काढला. तिथे आत्यंतिक थंडीमुळे त्याला हिमदंश झाला आणि पायाची तीन बोटं गमवायला लागली, आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. एवढं होऊनही श्तार्क्सची स्वतःच्या धर्मावरची निष्ठा कायम होती. त्यात आता सोविएत रशियाबद्दलच्या आत्यंतिक तिरस्काराची भर पडली होती. १९५१ मध्ये त्याच्या सर्वात मोठ्या मुलाला के.जी.बी.च्या सैनिकांनी एका क्षुल्लक भांडणावरून भर रस्त्यात भोसकून ठार मारल्यावर हा तिरस्कार शिगेला पोचला होता. या मुलाव्यतिरिक्त श्तार्क्सला अजून तीन मुलं होती – शालोम आणि ओव्हादिया हे मुलगे आणि आयडा ही मुलगी. तिने आल्टर शूशमाकर नावाच्या एका शिंप्याशी लग्न केलं होतं. आयडा आणि आल्टर श्तार्क्सबरोबरच राहात होते. त्यांना झिना नावाची मुलगी होती.

१९५१ मध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर श्तार्क्स आणि त्याचं कुटुंब सोविएत रशिया सोडून पोलंडमध्ये गेलं. तिकडे ल्वोव्ह शहरात ते स्थायिक झाले. तिथेच १९५३ मध्ये आयडाने योसेलला जन्म दिला. तो ४ वर्षांचा असताना, म्हणजे १९५७ मध्ये शूशमाकर कुटुंब पोलंड सोडून इझराईलला निघून गेलं. त्याच्या एक वर्ष आधी श्तार्क्स, त्याची पत्नी आणि त्याचा शालोम श्तार्क्स हा मुलगा हे तिघे इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. दुसरा मुलगा ओव्हादिया हा इंग्लंडमध्ये स्थायिक झाला होता.

नाह्मान श्तार्क्सचं घर जेरुसलेमच्या मिआ शेरीम नावाच्या भागात होतं. हा जेरुसलेमचा अत्यंत कर्मठ ज्यूंनी भरलेला भाग होता, किंबहुना वेगळंच जग होतं असं म्हटलं तरी चालेल. बाहेरच्या, कुठल्याही पाश्चिमात्य शहराप्रमाणे असलेल्या इझराईलपेक्षा वेगळाच प्रकार होता हा. लांब, पायघोळ, काळे कोट किंवा कफ्तान घातलेले, डोक्यावर काळ्या टोप्या किंवा हॅट्स असलेले आणि दाढी वाढवलेले पुरुष; तशाच प्रकारचे कपडे घालणाऱ्या स्त्रिया, त्यांचे स्कार्फने झाकलेले काळे किंवा सोनेरी केस; येशिवा या ज्यू धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा; सिनेगॉग्ज; राब्बाय आणि त्यांचे दरबार, तिथे होणारे न्यायनिवाडे – असं वेगळंच वातावरण होतं तिथे. तिथल्या एका येशिवामध्ये शालोम श्तार्क्स शिक्षक म्हणून काम करत होता.

आयडा आणि आल्टर मिआ शेरीमपासून जवळ असलेल्या होलोन या शहरात राहायला गेले. नंतर काही महिन्यांनी आल्टरला तेल अवीवपासून जवळ असलेल्या एका तयार कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली. आयडा एका फोटोग्राफरची सहाय्यक म्हणून काम करायला लागली. परवडत नसतानाही त्यांनी एक घर विकत घेतलं पण त्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते देता देता दोघेही मेटाकुटीला आले. त्यामुळे त्यांनी झिनाला एका धार्मिक संस्थेत पाठवलं, जिथे तिच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय झाली. छोट्या योसेलला त्यांनी आयडाच्या आईवडिलांकडे ठेवलं.

आयडा आणि आल्टरसाठी इझराईलमधले हे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. दोघांनाही त्यांचे रशियामधले, तुलनेने आरामाचे दिवस आठवत होते. दोघेही आपल्या रशियामधल्या मित्रमंडळींशी संपर्क ठेवून होते आणि त्यांची पत्रं ते कधीकधी श्तार्क्सच्या पत्त्यावर मागवत असत. अशीच त्यांची काही पत्रं आणि त्यांच्या रशियामधल्या मित्रांची पत्रं श्तार्क्सच्या हातात पडली. त्याने असा समज करून घेतला की आपली मुलगी आणि जावई कदाचित रशियाला परत जाऊ शकतात आणि जाताना योसेललाही परत नेऊ शकतात. झालं. त्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये योसेलला त्याच्या आईवडिलांकडे सोपवायचं नाही असा मनोमन निश्चय केला.

१९५९ च्या शेवटी आयडा आणि आल्टर यांचे चांगले दिवस सुरु झाले. आल्टरच्या फॅक्टरीला काही नवीन कंत्राटं मिळाली. आयडाही स्वतंत्रपणे फोटोग्राफर म्हणून काम करायला लागली. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी मुलांना आपल्याबरोबर आणायचं ठरवलं. जेव्हा आयडा त्याप्रमाणे जेरुसलेमला योसेलला आणायला गेली, तेव्हा नाह्मान श्तार्क्स आणि योसेल हे दोघेही तिथे नव्हते. “उद्या तुझा भाऊ शालोम तुझ्या मुलाला तुझ्याकडे पोचवेल,” आयडाच्या आईने तिला सांगितलं, “आत्ता ते दोघेही प्रार्थना करत असतील. तू त्यांच्या प्रार्थनेत व्यत्यय आणू नकोस.”

दुसऱ्या दिवशी शालोम एकटाच आयडाच्या होलोनमधल्या घरी आला, आणि त्याने आपल्या बहिणीला त्यांच्या वडिलांचा निरोप दिला – कुठल्याही परिस्थितीत योसेलला ते त्याच्या आईवडिलांकडे द्यायला तयार नव्हते. हादरलेली आयडा आल्टर आणि शालोमबरोबर त्याच दिवशी जेरुसलेमला गेली. तो दिवस शुक्रवार होता. पुढचा दिवस शनिवार. इझराईलमधला सार्वजनिक सुट्टीचा दिवस. त्याच दिवशी संध्याकाळी आयडा आणि आल्टर होलोनला परत जायला निघाले, तेव्हा आयडाच्या आईने योसेलला घेऊन जायला विरोध केला, “बाहेर खूप थंडी आहे,” ती म्हणाली, “ आज त्याला इथेच झोपू दे. उद्या आम्ही त्याला तुमच्या घरी पोचवू.” आयडा आणि आल्टर तयार झाले. तोपर्यंत छोटा योसेल झोपून गेला होता. त्याच्या अंगावर पांघरूण घालून आयडा तिथून निघून गेली. तो आपल्याला पुढची काही वर्षे दिसणार नाहीये हे जर तिला त्यावेळी समजलं असतं तर कदाचित ती योसेलला घेतल्याशिवाय घरी गेली नसती.

दुसऱ्या दिवशी आयडाने दिवसभर वाट पाहिली, पण योसेल घरी आला नाही. संध्याकाळी तिचा धीर खचला आणि तिने आणि आल्टरने जेरुसलेमचा रस्ता पकडला. म्हाताऱ्या श्तार्क्सने त्यांना घरात पाऊलसुद्धा टाकू दिलं नाही. आयडा आणि आल्टर यांच्या अश्रुपूर्ण विनंत्यांचा काहीही परिणाम झाला नाही.

त्यानंतर दोन-तीन वेळा आयडा आणि आल्टर श्तार्क्सच्या घरी गेले पण तो ना योसेलला परत करायला तयार होता, ना त्याचा ठावठिकाणा सांगत होता. शेवटी जानेवारी १९६० मध्ये त्यांनी कायद्याची मदत घ्यायचं ठरवलं. तेल अवीवच्या राब्बिनिकल कोर्टातून त्यांनी नाह्मान श्तार्क्ससाठी समन्स पाठवलं. त्याला श्तार्क्सने कचऱ्याची टोपली दाखवली. आयडा आणि आल्टर शूशमाकर यांच्या प्रदीर्घ आणि एखाद्या दुःस्वप्नासारख्या संघर्षाला आता कुठे सुरुवात होत होती.

राब्बिनिकल कोर्टाच्या समन्सचा उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर १५ जानेवारी १९६० या दिवशी इझराईलच्या सर्वोच्च न्यायालयाने नाह्मान श्तार्क्सला कोर्टात हजर होण्याचा आणि योसेलला एका महिन्याच्या आत त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला. आपण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ शकत नसल्याचा निरोप श्तार्क्सने त्याच्या वकिलामार्फत पाठवला.

१७ फेब्रुवारी १९६० या दिवशी शूशमाकर कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून पोलिसांकडे योसेलच्या अपहरणासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यात नाह्मान श्तार्क्सच्या अटकेची आणि योसेल जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याची मागणी केलेली होती. न्यायालयाने पोलिसांना योसेलचा शोध घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी त्याप्रमाणे शोधाला सुरुवात केली.

७ एप्रिल १९६० या दिवशी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं, ज्यात योसेल शूशमाकर सापडत नसल्याची आणि त्यामुळे पोलिसांना या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती करण्यात आली होती.
१२ मे १९६० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावली आणि नाह्मान श्तार्क्सच्या अटकेचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्याला अटक करण्यात आली.

श्तार्क्सने सोविएत रशियामधल्या गुलागमध्ये तुरुंगवास सहन केलेला असल्यामुळे इझरेली तुरुंगवास हा त्याच्यासाठी काहीच नव्हता. त्याला के.जी.बी. च्या मारहाणीने भरलेल्या प्रश्नोत्तरांचीसुद्धा सवय होती, त्यामुळे इझरेली पोलिसांना त्याने अजिबात दाद दिली नाही.

पोलिसांना एक गोष्ट समजून चुकली होती की श्तार्क्सने स्वतः योसेलला कुठेही लपवून ठेवलेलं नव्हतं, पण त्याला कर्मठ ज्यूंच्या नेटवर्कमध्ये अशा प्रकारे फिरवत ठेवलं होतं, की पोलिस चक्रावून गेले होते. त्यांना श्तार्क्सने असं सांगितलं होतं – जो पोलिसांचा तर्क होता – की योसेलचे आईवडील त्याला रशियामध्ये नेऊन ख्रिश्चन किंवा त्याहून वाईट म्हणजे कम्युनिस्ट बनवणार आहेत आणि त्यापासून त्याचं रक्षण करणं हे आपलं ईश्वरदत्त कार्य आहे. जेरुसलेमचा प्रमुख राब्बाय गिडिऑन फ्रँक – इझराईलमधला सर्वोच्च धार्मिक नेता – यानेही श्तार्क्सला आपला पाठिंबा जाहीर केला आणि सर्व कर्मठ ज्यूंना त्याची मदत करायचं आवाहन केलं.

२२ मे १९६० या दिवशी पंतप्रधान बेन गुरियन यांनी आइकमनला इझराईलमध्ये आणल्याची बातमी नेसेटच्या विशेष अधिवेशनात जाहीर केली. त्यानंतर मेच्या शेवटी जे नेसेटचं नियमित अधिवेशन होतं, त्यात योसेलचा विषय पहिल्यांदा मांडला गेला आणि संपूर्ण देशातल्या प्रसारमाध्यमांना एक मोठं खाद्य मिळालं. या प्रकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील हे सर्वात प्रथम उजव्या पक्षांच्या लक्षात आलं. विरोधी पक्षांमधला एक प्रभावी नेता श्लोमो लोरेंझने शूशमाकर आणि श्तार्क्स या दोन्ही कुटुंबात मध्यस्थ म्हणून काम करायची तयारी दाखवली. श्तार्क्स त्यावेळी तुरुंगात होता. लोरेंझने त्याच्याकडे एक करारनामा आणला, ज्यात असं म्हटलं होतं, की योसेलचे आईवडील त्याचं शिक्षण आणि पालनपोषण ज्या प्रकारे श्तार्क्स सांगेल, त्याच प्रकारे करतील, पण त्याने योसेल कुठे आहे हे सांगावं. श्तार्क्सने या करारावर सही करायचं एका अटीवर कबूल केलं – जर राब्बाय मेझीशने त्याला तसा आदेश दिला, तर आणि तरच तो या करारनाम्यावर सही करेल.

लोरेंझने राब्बाय मेझीशची जेरुसलेममध्ये भेट घेतली आणि त्याला हा प्रकार सांगितला. मेझीशनेही अट घातली – जर अपहरणकर्त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही असं सरकारने मान्य केलं, तरच तो असा आदेश देईल. लोरेंझने पोलिस प्रमुख जोसेफ नाहमियासची भेट घेऊन त्याला ही परिस्थिती सांगितली. नाहमियासने हे मान्य केलं आणि लोरेंझ मेझीशला हे सांगण्यासाठी परत जेरुसलेमला गेला, पण मेझीशने विचार बदलला होता. लोरेंझची सगळी मेहनत वाया गेली होती.

१२ एप्रिल १९६१ ला नाह्मान श्तार्क्सची तुरुंगातून प्रकृतीच्या कारणावरून सुटका करण्यात आली. सुटकेच्या वेळी त्याने योसेलच्या शोधासाठी पोलिसांना सहकार्य करायचं वचन दिलं होतं, पण ते त्याने पाळलं नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने परत त्याच्या अटकेचे आदेश दिले.

ऑगस्ट १९६१ मध्ये पोलिसांनी जेरुसलेमजवळ असलेल्या कोमेमिउत नावाच्या एका गावात धाड टाकली. हे गाव कर्मठ ज्यूंचं होतं आणि योसेलला तिथे लपवून ठेवलं असल्याचा पोलिसांना संशय होता. तपासानंतर हा संशय खरा असल्याचं लक्षात आलं, पण धाड टाकण्याआधीच योसेलला त्या गावातून बाहेर काढण्यात आलं होतं. डिसेंबर १९५९ मध्ये, म्हणजे आयडा आणि आल्टर यांनी योसेलला परत न्यायचं ठरवलं, तेव्हाच योसेलचा मामा शालोम श्तार्क्स त्याला या गावात घेऊन आला होता.

दरम्यानच्या काळात योसेलला गावातून बाहेर काढून दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि शालोम श्तार्क्सही आपल्या भावाप्रमाणेच इंग्लंडला निघून गेला होता. तिकडे तो लंडनमधल्या गोल्डर्स ग्रीन या भागात असलेल्या हासिदिक ज्यूंच्या एका वसाहतीत राहात होता. इझरेली पोलिसांच्या सांगण्यावरून स्कॉटलंड यार्डने शालोमला अटक केली, पण त्याने योसेलबद्दल आपल्याला काहीही माहित नाही, हेच सांगितलं.

आता इझराईलमध्ये हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. कर्मठ आणि पुरोगामी ज्यूंमध्ये चालू असलेली बोलाचाली आता हिंसक वळणावर पोचली होती. अनेक येशिवांवर हल्ले होऊन तिथल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्या गावासमोर मारहाण करणं, त्याचा बदला म्हणून कर्मठ ज्यूंनी बाकीच्यांना गावांमध्ये प्रवेशबंदी करणं असले प्रकार सुरु झाले होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार योसेल न मिळण्याचं कारण म्हणजे त्याचा मृत्यू झाला होता. पण त्या अनुषंगानेही कुठलेच पुरावे मिळत नव्हते. सगळीकडे संतापाचं, वैतागाचं आणि निराशेचं वातावरण होतं.

त्याच वेळी पंतप्रधान बेन गुरियन आणि मोसाद संचालक इसेर हॅरेल यांची भेट झाली होती.
------------------------------------------------------------------------------------

“मी जेव्हा ही कामगिरी स्वीकारली, तेव्हा आपण किती कठीण आणि किचकट गोष्ट स्वीकारत आहोत, याचा मला त्या वेळी अंदाज आला नाही.” – इसेर हॅरेल (त्याच्या चरित्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये).

हॅरेलच्या मते ही कामगिरी स्वीकारण्यामागचं एकमेव कारण म्हणजे देशावर येऊ घातलेलं यादवी युद्धाचं संकट दूर करणं. जेव्हा त्याने ही कामगिरी स्वीकारली आहे, ही बातमी बाहेर पसरली, तेव्हा पोलिस तर अतिशय खुश झाले. नसती ब्याद गेली अशीच त्यांची भावना होती. शाबाक संचालक अमोस मॅनॉरचा मोसादने या सगळ्या फंदात पडण्यालाच विरोध होता आणि बरेच शाबाक आणि मोसाद ऑफिसर्स आणि एजंट्स त्याच मताचे होते कारण ही कामगिरी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असंच प्रत्येकाला वाटत होतं. जेव्हा मॅनॉर आणि हॅरेल यांची भेट झाली, तेव्हा मॅनॉरने हाच मुद्दा हॅरेलला सांगायचा प्रयत्न केला, की मोसादची निर्मिती इझराईलच्या सुरक्षेसाठी झालेली आहे, कौटुंबिक भांडणं सोडवण्यासाठी नाही. त्यावर हॅरेलचं हेच उत्तर होतं – जर एखादं कौटुंबिक भांडण देशाच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला धोकादायक ठरत असेल, तर त्यात पडून ते सोडवणं हे मोसादचं कर्तव्य आहे. यावर मॅनॉरकडे उत्तर नव्हतं. शिवाय त्या वेळी इझराईलच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत इसेर हॅरेल हा शेवटचा शब्द होता, त्यामुळे हे अधिकारी कुरकुरतच या कामगिरीत सामील झाले.

हॅरेलने यासाठी ४० जणांची एक टीम तयार केली. या टीममध्ये शाबाक आणि मोसादच्या हुशार एजंट्सशिवाय अनेक सामान्य नागरिकांचाही समावेश होता. काही कर्मठ ज्यूदेखील यात सामील झाले होते, कारण त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा दूरगामी धोका जाणवला होता.

या टीमचं पहिलं उद्दिष्ट होतं धार्मिक वर्तुळांमध्ये शिरकाव करून घेऊन काही माहिती मिळते का ते पाहणं. पण त्यात ते साफ अयशस्वी झाले. त्यांनी जेव्हा जेव्हा येशिवांमध्ये विद्यार्थी म्हणून जायचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना लगेच पकडलं आणि हाकलून दिलं.

इकडे हॅरेलने आत्तापर्यंतच्या तपासाची पूर्ण माहिती घेतली, सर्व कागदपत्रांचा अगदी सखोल अभ्यास केला आणि शेवटी हा निष्कर्ष काढला की योसेलला देशाबाहेर नेण्यात आलेलं आहे. पण कुठे?

त्याच सुमारास त्याला समजलेल्या एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. मार्च १९६२ मध्ये हासिदिक ज्यूंचा एक मोठा गट स्वित्झर्लंडहून इझराईलला आला होता. या गटात अनेक पुरुष, स्त्रिया आणि मुलांचा समावेश होता. हा गट त्यांच्या राब्बायच्या अंत्यसंस्कारांसाठी त्याची शवपेटिका घेऊन आला होता. हॅरेलने जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये चौकशी केली, तेव्हा त्याला असं कळलं की या राब्बायने पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीत आपलं दफन व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती. मग हे एवढे लोक इथे कशासाठी आले होते? हॅरेलच्या मनात असा संशय आला, की हे कदाचित योसेलला सहजपणे देशाबाहेर काढता यावं म्हणून इझराईलमध्ये आलेले असावेत. इझराईलमध्ये आलेल्या सर्वांची माहिती त्याच्याकडे आल्यावर त्याने आपल्या एजंट्सना त्यांच्या मागावर पाठवलं. या एजंट्सनी स्वित्झर्लंडमधल्या येशिवांमध्ये जाऊन इझराईलमध्ये आलेल्या आणि तिथून स्वित्झर्लंडला परत गेलेल्या प्रत्येक मुलाची पाहणी केली. हे उघडपणे करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या एजंट्सनी चक्क त्या येशिवांमध्ये दीड-दोन महिने स्वैपाकी, पोर्टर, इस्त्रीवाला अशी कामं केली. पण योसेलचा काहीही माग तिथे लागला नाही.

आता हॅरेल संपूर्णपणे या प्रकरणात उतरला. बाकीची सगळी कामं त्याने बाजूला ठेवली आणि याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. पॅरिसमध्ये आपलं हेडक्वार्टर्स बनवून त्याने आपले लोक इतरत्र पाठवायला सुरुवात केली. फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, ब्रिटन, हॉलंड, स्वित्झर्लंड, स्पेन या सगळ्या देशांत, अगदी मोरोक्को, अल्जेरिया आणि कॅनडा इथेही त्याचे लोक जाऊन आले. त्यांचं एकच काम होतं. कर्मठ ज्यूंच्या वस्त्या शोधून काढून तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारे शिरकाव करायचा आणि योसेलबद्दल चाचपणी करायची. कितीही छोटा धागादोरा मिळाला तरी तो सोडायचा नाही. तो पॅरिसमध्ये हॅरेलकडे पाठवायचा. तिथे स्वतः हॅरेल आणि त्याचे सहाय्यक हे सगळे धागेदोरे एकत्र जुळवून एखाद्या जिग-सॉ कोड्यासारखं त्यातून काही चित्र बनतंय का ते पाहात होते. मोसादच्या सर्वश्रेष्ठ एजंट्सपैकी एक असलेल्या येहुदिथ निसियाहूने तर शालोम श्तार्क्सच्या सासूच्या घरात काम करून, तिथून प्रशस्तीपत्र घेऊन त्याच्या लंडनमधल्या घरात नोकरी मिळवली होती. इझराईलच्या बाहेर कर्मठ ज्यूंची सर्वात मोठी वसाहत लंडनमध्येच होती. या वसाहतीचं नाव होतं सात्मार. इथे प्रामुख्याने पूर्व युरोपातल्या रोमानिया, हंगेरी, बल्गेरिया आणि अर्थातच रशिया इथून आलेले ज्यू होते. इथेच हॅरेलला एका अत्यंत धार्मिक जोडप्याविषयी समजलं. या जोडप्याने अचानक उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात एक घर भाड्याने घेतलं होतं. त्याने ताबडतोब एक टीम या जोडप्याच्या मागावर पाठवली.

आणि त्याच्याकडे एकामागोमाग एक नकारात्मक बातम्या यायला लागल्या.

बेलफास्टला गेलेल्या टीमने त्या जोडप्यावर एक महिनाभर नजर ठेवली पण त्यांना काहीही सापडलं नाही. हे जोडपं खरोखरच धार्मिक जोडपं होतं आणि ते उत्तर आयर्लंडमध्ये फक्त सुट्टीसाठी गेले होते. येहुदिथलाही शालोम श्तार्क्स किंवा त्याचा लंडनमध्येच असलेला भाऊ ओव्हादिया श्तार्क्स यांच्याकडून काहीही समजू शकलं नव्हतं. येशिवांमध्ये गेलेल्या एजंट्सचं धार्मिक ज्ञान चांगलंच सुधारलं होतं, पण योसेल कुठे आहे याचा काहीही पत्ता लागला नव्हता. सर्वात वाईट अवस्था झाली होती ती सात्मार वसाहतीत शिरकाव करू पाहणाऱ्या एजंट्सची. तिथल्या लोकांनी ताबडतोब ते कोण आहेत ते ओळखलं आणि त्यांना सरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं. इझरेली राजदूताला स्वतःचं वजन खर्च करून त्यांना तुरुंगातून बाहेर काढावं लागलं.

पॅरिसमध्ये आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हॅरेलने घेतलेल्या बैठकीत या सगळ्या एजंट्सनी सरळ हात वर केले. हा मुलगा शोधून काढणं अशक्य आहे असंच सर्वांचं मत होतं.

पण हॅरेल हार मानायला तयार नव्हता. त्याचा चिवट आणि जिद्दी स्वभाव त्याला हार मानू देत नव्हता. सगळ्या एजंट्सनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यावर तो उलट नव्या जोमाने या कामगिरीमागे लागला. आणि लवकरच त्याला एक अंधुकसा प्रकाशाचा किरण दिसला.

पॅरिसमधला मोसाद प्रतिनिधी होता याकोव्ह कारोझ. एखाद्या कॉलेज प्रोफेसरसारखा दिसणारा कारोझ हॅरेलबरोबरच रात्रंदिवस या प्रकरणासाठी काम करत होता. एप्रिलच्या शेवटी त्याने हॅरेलसाठी एक बातमी आणली होती.
ही बातमी आली होती बेल्जियममधल्या अँटवर्प शहरातून. हिऱ्यांच्या व्यापारासाठी अँटवर्प जगद्विख्यात आहेच. हा व्यापार काही ज्यू कुटुंबांमध्ये अनेक शतकं वंशपरंपरागत चालू आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या ज्यूंनी नाझींना खंडणी देऊन बेल्जियममधल्या अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय ज्यूंचा जीव वाचवला होता आणि नाझीविरोधी भूमिगत चळवळींना गुप्तपणे आर्थिक मदतही केली होती. मायर या नावाने वावरणाऱ्या एका मोसाद एजंटने या ज्यू कुटुंबांच्या वर्तुळात प्रवेश मिळवला होता. त्याला तिथे असं समजलं होतं की हे सगळे हिरे व्यापारी त्यांच्या व्यापारातल्या कुठल्याही अडचणीच्या वेळी राब्बाय इत्झीकेल या धर्मगुरूचा सल्ला घेतात आणि त्याने दिलेला निर्णय हा त्यांच्यासाठी एखाद्या कायद्याप्रमाणेच असतो. राब्बाय इत्झीकेलच्या निकटवर्तीयांकडून मायरला या व्यापाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धात केलेल्या कामगिरीविषयी समजलं होतं.

तेव्हा त्यांनी मायरला एका स्त्रीविषयी सांगितलं होतं. सोनेरी केस आणि निळे डोळे असणारी ही स्त्री अतिशय सुंदर होती. ती मुळात फ्रेंच कॅथॉलिक होती पण गेस्टापोच्या तावडीतून फ्रान्समधल्या ज्यूंना वाचवण्यासाठी तिने अनेक धोकादायक कामगिऱ्या पार पाडल्या होत्या. या कामात राब्बाय इत्झीकेलसुद्धा सहभागी होता. ही स्त्री त्याच्या व्यक्तिमत्वाने इतकी प्रभावित झाली की तिने आपला धर्म सोडून ज्यू धर्म स्वीकारला. आता सध्या ती या हिरे व्यापाऱ्यांच्या सिंडिकेटसाठी काम करत होती. त्यांच्या कामासाठी ती जगभर फिरत असे. त्यात इझराईलचाही समावेश होता. तिच्या पहिल्या लग्नापासून तिला क्लॉड नावाचा मुलगा होता आणि त्यानेही ज्यू धर्म स्वीकारला होता आणि स्वित्झर्लंडमधल्या येशिवामध्ये काही वर्षे शिकल्यानंतर तो आता जेरुसलेममधल्या एका नामांकित धार्मिक शाळेत शिकत होता. पण सध्या ती कुठे आहे, हे या व्यापाऱ्यांपैकी कुणालाच माहित नव्हतं.

मायरकडून हे ऐकताना त्याने सांगितलेल्या एका वाक्याने हॅरेलने कान टवकारले – “या व्यापाऱ्यांच्या मते ही स्त्री एकमेवाद्वितीय आहे. ती कर्मठ ज्यूंचं नियमबद्ध जग आणि हिऱ्यांचं झगमगीत जग या दोन्हीही ठिकाणी सारख्याच सहजतेने वावरू शकते.”

हॅरेलसाठी इतकं पुरेसं होतं. जर या कर्मठ ज्यूंनी योसेलचं अपहरण करून त्याला इझराईलबाहेर काढलं असेल आणि त्याला परत अशा प्रकारे गायब केलं असेल, की मोसादच्या अत्यंत हुशार एजंट्सनाही त्याचा सुगावा लागू शकत नसेल, तर त्यांना नक्कीच कोणत्यातरी अनुभवी व्यक्तीने मदत केलेली आहे. आणि ही फ्रेंच स्त्री, जी या दोन परस्परविरोधी जगांमध्ये सारख्याच सहजतेने वावरतेय, ती याच्या पाठीमागे असण्याची दाट शक्यता आहे. जसजसा हॅरेल यावर विचार करत गेला, तसतसा आपला हा विचार बरोबर असल्याचं त्याला आतून जाणवायला लागलं आणि त्याने बाकीचे सगळे धागेदोरे सोडून देऊन या स्त्रीवर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेतला. तिचा मुलगा इझराईलमध्ये असल्याचं त्याला समजलं होतंच. आपल्याला समजलेली सगळी माहिती त्याने इझराईलमध्ये कळवली आणि या स्त्रीच्या मुलाला शोधून काढायला सांगितलं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे हे काम एका दिवसात झालं. या मुलाचं नाव त्याने धर्म बदलल्यावर एरिअल असं ठेवलं गेलं होतं. त्याच्या आईचं मूळ फ्रेंच नाव होतं मॅडेलिन फेरेल आणि ज्यू धर्म स्वीकारल्यावर तिचं नाव होतं रूथ बेन डेव्हिड.

तिच्याविषयी माहिती गोळा करायला हॅरेलने सुरुवात केली. जे समजलं ते खूपच रोचक होतं. तिचा जन्म फ्रान्समध्ये एका धार्मिक कॅथॉलिक कुटुंबात झाला होता. पॅरिसच्या सोर्बोन विद्यापीठातून तिने उच्च शिक्षण घेतलं होतं आणि शिक्षण पूर्ण केल्यावर तिच्या कॉलेजमधल्या हेन्री नावाच्या प्रियकराशी लग्न केलं होतं. तिच्या मुलाचा जन्म दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर झाला होता आणि फ्रान्सचा जून १९४० मध्ये पाडाव झाल्यानंतर ती कॉर्सिकन क्रांतिकारकांच्या मॅक्विस या नाझीविरोधी भूमिगत चळवळीत सहभागी झाली होती. त्याच वेळी ती बेल्जियममधल्या हिरे व्यापारी असलेल्या ज्यूंच्या संपर्कात आली होती आणि राब्बाय इत्झीकेलच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन तिने ज्यू धर्म स्वीकारला होता.

कदाचित त्यामुळेच १९५१ मध्ये हेन्री आणि तिचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तिने जर्मनीच्या आल्सेस प्रांतातल्या एका ज्यू राब्बायबरोबर दुसरं लग्न केलं होतं आणि तिच्या मुलासह तिघेही इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. पण इझराईलमध्ये ती आणि तिचा पती यांच्यात काही मुद्द्यांवरून कडाक्याची भांडणं झाली होती आणि तिचा लगेचच दुसरा घटस्फोट झाला होता.

कदाचित त्यामुळेच ती जास्तीतजास्त कर्मठतेकडे झुकली होती आणि जेरुसलेममध्ये राब्बाय मेझीशच्या संपर्कात आली होती. मेझीशचं नाव योसेलच्या अपहरणाच्या संदर्भात आधी आलं होतं. त्याने सुरुवातीला नाह्मान श्तार्क्सला योसेलला सोडून द्यायचा आदेश द्यायचं कबूल केलं होतं पण आयत्या वेळी आपला शब्द फिरवला होता. त्याचं कारण काय असावं याचा अंदाज हॅरेलला आला होता, पण अजूनही त्याला काही निश्चित समजत नव्हतं.

मॅडेलिन उर्फ रूथचा पत्ता म्हणजे फ्रान्समधलं एक्स ले बेन्स या पॅरिसच्या जवळ असलेल्या एका छोट्या शहरातलं एक ज्यू स्त्रियांसाठी असलेलं वसतिगृह होतं. तिच्याबद्दल चौकशी करताना हॅरेलच्या हातात तिने इझराईलला दिलेल्या भेटींविषयी माहिती पडली. तिने गेल्या काही वर्षांत इझराईलला दोनदा भेट दिली होती. दुसऱ्या वेळी तिने इझराईल २१ जून १९६० या दिवशी सोडला होता आणि त्यावेळी तिच्याबरोबर तिची क्लॉडिन नावाची ७-८ वर्षांची छोटी मुलगी होती. दोघीही अलइटालियाच्या फ्लाईटने तेल अवीवहून झुरिकला गेल्या होत्या. पण त्याच वेळी तिचा मुलगा एरिअल इझराईलमध्येच होता. मग ही मुलगी कोण होती?

आपण योग्य मार्गावर आहोत याची आता हॅरेलला खात्री पटली होती. तिला शोधून काढायचा आदेश त्याने आपल्या एजंट्सना दिला.

याकोव्ह कारोझ आणि इतर एजंट्स त्याप्रमाणे एक्स ले बेन्स इथे गेले आणि त्यांना ती तिथे दिसली. ती तिथे एखादी गाडी थांबवून पॅरिसला जाणार का असं विचारत होती. तिला लिफ्ट देण्यासाठी एजंट्सनी गाडी वळवण्याआधीच ती दुसऱ्या एका गाडीतून निघून गेली.

एजंट्सनी आता एक्स ले बेन्समध्ये चौकशी करायला सुरुवात केली पण त्यांच्या हातात काही लागलं नाही. शेवटी त्यांनी तिच्या वसतिगृहातल्या खोलीत गुपचूप शिरून काही मिळतं का ते बघायचं ठरवलं. आणि इथे त्यांच्या प्रयत्नांना फळ आलं. रुथ बेन डेव्हिडच्या वडिलांचं एक जुनं, मोठं घर फ्रान्सच्या ऑर्लिन्स शहरात होतं. हा भाग फ्रान्समधला अत्यंत सुंदर भाग समजला जातो. रूथ हे घर विकू इच्छित होती. तिने वर्तमानपत्रांत त्याच्याबद्दल जाहिरातीसुद्धा दिल्या होत्या. एजंट्सनी तिने जाहिरातीत दिलेल्या पोस्ट बॉक्स नंबरवर एक पत्र पाठवलं. त्याआधी त्यांनी एका ज्यू रिअल इस्टेट एजंटकडून तिच्या घराची किंमत जाणून घेतली आणि तिला या पत्रात तिला हव्या असलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असल्याचं सांगितलं. तिनेही या पत्राला उत्तर पाठवलं. ती या व्यवहाराला तयार होती. २१ जून १९६२ या दिवशी पॅरिसमधल्या एका मोठ्या हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटून हा सगळा व्यवहार पूर्ण करायचं ठरलं.
हॅरेलने त्याच वेळी तिच्या मुलाला, एरिअलला इझराईलमध्ये अटक करायची आणि तिच्यावर दबाव आणायचा असं ठरवलं होतं. एरिअलला योसेलबद्दल बऱ्याच गोष्टी माहित असण्याची शक्यता होती. त्यामुळे फ्रान्समध्ये रूथ आणि इझराईलमध्ये तिचा मुलगा अशा दोघांकडून माहिती मिळवून आपल्याला योसेलबद्दल नक्की काय ते कळू शकेल अशी अटकळ हॅरेलने बांधली होती.

२१ जून १९६२ या दिवशी सकाळी १० वाजता पॅरिसच्या हॉटेल लॉबीमध्ये एका अत्यंत देखण्या आणि आपलं सौंदर्य उठून दिसेल असे कपडे घातलेल्या एका स्त्रीने प्रवेश केला. दोन एजंट्स तिथे तिची वाट पाहात होते. त्यांनी पत्रात आपण ऑस्ट्रियन व्यापारी आहोत आणि कंपनी गेस्टहाऊस म्हणून आपल्याला हे घर घ्यायचं आहे असं सांगितलं होतं. दोघेही अस्खलित जर्मन बोलत होते आणि मॅडेलिन उर्फ रूथलाही जर्मन बोलता येत होती. त्यामुळे त्यांनी लगेचच आपला व्यवहार संपवला.

या दोन व्यापाऱ्यांसाठी एकच अडचण होती. त्यांच्या वकिलाला काहीतरी दुसरं काम निघाल्यामुळे तो तिथे येऊ शकला नव्हता. आपण त्याच्या घरी जाऊन सगळ्या कायदेशीर बाबी निपटून टाकू असं दोघा ऑस्ट्रियनांपैकी एकाने सुचवलं. त्याचं घर पॅरिसच्या जवळच शान्तिली इथे होतं.

तिघेही त्यांच्या गाडीने शान्तिलीला पोचले. याकोव्ह कारोझ वकील म्हणून उभा होता. ती त्याच्या ऑफिसमध्ये आल्यावर एजंट्सनी दरवाजा लावून घेतला आणि तिला ती इझरेली एजंट्सच्या कैदेत असल्याचं सांगितलं. ती मटकन खुर्चीवर बसली.

त्याच वेळी जेरुसलेममध्ये तिच्या मुलाला, एरिअलला अटक करण्यात आली.

शान्तिलीमध्ये रुथ आणि जेरुसलेममध्ये एरिअल यांना एजंट्सनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. रुथ उर्फ मॅडेलिन सुरुवातीच्या धक्क्यातून पुष्कळच सावरली होती. याकोव्ह कारोझ आणि व्हिक्टर कोहेन या दोघा एजंट्सनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण ती काहीही सांगायला तयार नव्हती. तिला गोंधळवून टाकण्यासाठी कोहेन आणि कारोझ तिला वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारत होते पण तीही या खेळात मुरलेली होती. जर्मन गेस्टापोच्या डोळ्यांदेखत ज्यूंना फ्रान्समधून बाहेर काढायचा तिला अनुभव होता त्यामुळे इझरेली एजंट्सच्या प्रश्नांना ती शांतपणे तोंड देत होती. तासामागून तास गेले पण एजंट्स तिच्याकडून योसेलबद्दल काहीही वदवून घेऊ शकले नाहीत. शेवटी तिला गोंधळात पडण्यासाठी कोहेनने तिच्याशी इतर विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यामुळे तिचा विरोध थोडाफार कमी होईल असं त्याला वाटत होतं. कारोझने त्याच वेळी तिच्यावर वाट्टेल ते आरोप करायला सुरुवात केली, जेणेकरून ती विचलित होईल. पण तसं काहीही झालं नाही. तिच्या तोंडून बाहेर पडणारी कुठलीही माहिती एजंट्स नोंद करून ठेवत होते आणि इझराईलला पाठवत होते – तिथे एरिअलला प्रश्न विचारणाऱ्या एजंट्सच्या मदतीसाठी.

एरिअलच्या प्रश्नोत्तरांमधून मात्र एजंट्सना बरीच माहिती मिळाली. तिथे त्यांनी त्याला त्याच्या आईने फ्रान्समध्ये एजंट्सना सगळी माहिती पुरवलेली आहे, असं खोटं सांगितलं. त्याचाही त्यावर विश्वास बसला आणि त्याने योसेलबद्दल त्याला असलेली सगळी माहिती द्यायचं कबूल केलं, पण त्याआधी त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या आईसाठी त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही अशी हमी मागितली.

अमोस मॅनॉरने स्वतः अॅटर्नी जनरलशी बोलून ही हमी दिल्यावर एरिअलने बोलायला सुरुवात केली. योसेलला त्याच्या आईनेच स्वतःची मुलगी म्हणून इझराईलच्या बाहेर काढलं होतं. त्यासाठी त्याचा क्लॉडिन फेरेल या नावाने पासपोर्ट बनवण्यात आला होता. इझराईलच्या बाहेर पडल्यावर रूथने योसेलला स्वित्झर्लंडला नेऊन एका येशिवामध्ये ठेवलं होतं. त्याच्यापुढे काय झालंय आणि आत्ता सध्या योसेल कुठे आहे, त्याबद्दल एरिअलला काहीही माहित नव्हतं.
एरिअलने सांगितलेली ही माहिती शान्तिलीला पाठवण्यात आली. इकडे रुथला तिच्या मुलाला जेरुसलेममध्ये अटक झाली आहे, हे माहितच नव्हतं. जेव्हा ते तिला सांगण्यात आलं तेव्हा ती निःस्तब्ध झाली. त्याने सगळं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला कदाचित जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते हेही तिला सांगण्यात आलं. एरिअलला असं काहीही होणार नाही, याची हमी मिळालेली होती, पण ते जर रुथला सांगितलं, तर त्याचा उलटा परिणाम होईल असं एजंट्सना वाटलं, म्हणून त्यांनी तिला खोटंच सांगितलं.

तिने एक क्षणभर एजंट्सकडे पाहिलं आणि ती थंडपणे म्हणाली, “तुम्ही त्याला फासावर लटकवलं तरी हरकत नाही. तो माझा मुलगा नाही. माझा मुलगा मला मेला.”

हे उत्तर ऐकून एजंट्स हादरले. ही स्त्री असामान्य आहे आणि कुठल्याही धमक्यांचा तिच्यावर परिणाम होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं.

शान्तिलीमधली प्रश्नोत्तरं स्वतः इसेर हॅरेल पाहात आणि ऐकत होता. आता आपण सगळी सूत्रं हातात घ्यायची वेळ आलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं.

इतका वेळ तिचं आणि तिच्या वागणुकीचं निरीक्षण केल्यावर एक गोष्ट हॅरेलच्या लक्षात आली होती की या स्त्रीवर भीती, धमक्या, दबाव यांचा काहीही परिणाम होणार नाही. ती मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर होती. तिच्या मुलाला काही झालं तरी तिला फरक पडत नव्हता. त्यामुळे तोही मुद्दा निकालात निघाला होता. आता फक्त एकच गोष्ट तिचं मन बदलवू शकत होती. नैतिकता आणि सदसदविवेकबुद्धी. त्याच मुद्द्यावरून तिच्याशी बोलायचं हॅरेलने ठरवलं. ती जरी कट्टर ज्यू असली, तरी तिचा जन्म अशा कर्मठ ज्यू घरात झाला नव्हता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धर्म महत्वाचा असा विचार ती करणार नाही असा हॅरेलचा अंदाज होता.

“मी इसेर हॅरेल. मी इझराईलच्या सरकारकडून आलोय,” हॅरेलने अत्यंत काळजीपूर्वक बोलायला सुरुवात केली, “तुझ्या मुलाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्हाला तुझ्याविषयी बरीच माहिती आहे. तुला अशा परिस्थितीत आम्हाला आणावं लागलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुझी इझराईलच्या सरकारच्या वतीने माफी मागतो. तू आमच्या धर्मात प्रवेश केलेला आहेस. ज्यू धर्म आणि इझराईल या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असू शकत नाहीत. योसेलच्या अपहरणाने इझराईलच्या पायालाच धक्का लागलेला आहे. संपूर्ण देशभर धार्मिक, पुराणमतवादी ज्यूंबद्दल असंतोष आणि संतापाची भावना आहे. यादवी युद्धही भडकू शकतं. आणि या सगळ्याला एक प्रकारे तू जबाबदार असशील. जर उद्या त्या मुलाला काही झालं, तो आजारी पडला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांना तोंड देऊ शकशील तू आणि तुझे सहकारी? तू स्वतः एक आई आहेस. उद्या तुझ्या मुलाला असं उचलून नेलं आणि तुझ्यापासून दूर नेलं – का, तर तू ज्या प्रकारे तुझ्या मुलाला वाढवलं आहेस ते त्यांना पसंत नाही – तर कसं वाटेल तुला? आमचा धर्माशी आणि धार्मिक लोकांशी कुठल्याही प्रकारे वाद नाही. आम्हाला फक्त तो मुलगा हवाय. एकदा तो आमच्या हातात आला, की तू आणि तुझा मुलगा स्वतंत्र असाल.”

रुथ बेन डेव्हिडच्या मनातलं द्वंद्व तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एक आई आणि स्त्री एका बाजूला आणि एक कट्टर, कर्मठ ज्यूधर्मीय एका बाजूला. सगळे एजंट्स श्वास रोखून बसले होते. ही योसेलला शोधून काढण्याची शेवटची संधी आहे, हे सर्वांनाच जाणवलं होतं.

शेवटी तिने हॅरेलच्या नजरेला नजर मिळवली, “याची काय खात्री आहे, की तुम्ही इझराईलचे प्रतिनिधी आहात? मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू?”

तिच्यावरची नजर अजिबात न हटवता हॅरेलने आपल्या जॅकेटच्या खिशातून आपला पासपोर्ट काढून तिच्या हातात दिला. तिने तो लक्षपूर्वक पाहिला, परत दिला आणि मान खाली घातली.

“तो मुलगा गार्टनर नावाच्या कुटुंबाकडे आहे. १२६, पेन स्ट्रीट, ब्रुकलीन, न्यूयॉर्क. ते त्याला यांकेल या नावाने हाक मारतात.”

हॅरेल उठून उभा राहिला, “धन्यवाद. ज्या क्षणी तो आम्हाला मिळेल, त्या क्षणी तू आणि तुझा मुलगा यांची सुटका होईल.”

जेव्हा ही माहिती इझराईलच्या न्यूयॉर्कमधल्या वकिलातीमध्ये कळवण्यात आली, तेव्हा एक नवाच प्रश्न उभा राहिला. गार्टनर कुटुंब राहात असलेला भाग ब्रुकलीनमधला कर्मठ ज्यूंचा भाग होता. त्याच वर्षी कॉंग्रेसच्या, म्हणजे अमेरिकेच्या संसदेच्या निवडणुका होत्या आणि हा भाग म्हणजे जवळजवळ एक लाख मतदार होते. त्यामुळे जेव्हा स्थानिक पोलिसांची मदत घ्यायचा प्रयत्न इझरेली अधिकाऱ्यांनी केला, तेव्हा त्यांनी सरळ हात वर केले. निरुपायाने एफ.बी.आय.ची मदत घ्यायचं इझरेली अधिकाऱ्यांनी ठरवलं. एफ.बी.आय.ने १०० टक्के खात्री असल्याशिवाय कुठलीही कारवाई करायला नकार दिला. जेव्हा इझरेली अधिकाऱ्यांनी स्वतः खात्री करून घेण्याची तयारी दाखवली, तेव्हा एफ.बी.आय. त्यालाही तयार होईना.

शेवटी वैतागून हॅरेलने अमेरिकेतला इझराईलचा राजदूत अॅव्हरम हार्मनला फोन केला आणि आपल्याला अमेरिकेचा अॅटर्नी जनरल आणि राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडींचा भाऊ रॉबर्ट केनेडीशी बोलू द्यावं अशी मागणी केली. त्याची अर्थातच रॉबर्ट केनेडीशी बोलायची इच्छा नव्हती, पण या धमकीचा परिणाम होईल असं त्याला वाटलं होतं, कारण जेव्हा आइकमनच्या अपहरणाची बातमी जगजाहीर झाली, तेव्हा इझराईलचं कौतुक करणाऱ्यांमध्ये रॉबर्ट केनेडी पहिला होता.

शेवटी एफ.बी.आय.ने खात्री करून घेतली आणि योसेलला तिथून बाहेर काढून इझरेली अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.
४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. १९६२ मध्ये तो इझराईलनेपण साजरा केला. त्या दिवशी योसेलला घेऊन इझरेली अधिकारी तेल अवीवमध्ये परत आले. जवळजवळ अडीच वर्षांनी आयडा आणि योसेल भेटले.

आइकमनच्या यशस्वी अपहरणानंतर इसेर हॅरेलच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला. त्याच्या सहकाऱ्यांनी तो त्याच्या पॅरिसमधल्या ऑफिसमध्ये काम करत असताना ज्या पलंगावर झोपायचा, त्या पलंगाला योसेल्स बेड असं नाव दिलं होतं. त्याला त्यांनी तोच पलंग भेट म्हणून दिला. त्याचबरोबर ऑपरेशन टायगर कबची आठवण म्हणून एक वाघाच्या पिल्लाचं खेळणंही दिलं, जे हॅरेल शेवटपर्यंत पेपरवेट म्हणून वापरत असे.

कर्मठ, कडव्या ज्यूंच्या संघटना एखाद्या गुप्तचर संघटनेपेक्षा कमी नाहीत हे हॅरेलला समजलं होतंच. त्यामुळे अशा लोकांनाही मोसादमध्ये एजंट्स म्हणून भरती करायचा त्याने निर्णय घेतला. त्याची सुरुवात तो रुथ बेन डेव्हिड उर्फ मॅडेलिन फेरेलपासून करणार होता. केवळ तिच्या एका चुकीमुळे – ती योसेलला मुलीच्या वेशात इझराईलबाहेर घेऊन जात असताना तिचा मुलगा इझराईलमध्येच असणं – ती पकडली गेली. पण तिच्या व्यक्तिमत्वामुळे आणि निष्ठेमुळे हॅरेल एवढा प्रभावित झाला, की त्याने तिला मोसादमध्ये यायची ऑफर द्यायचं ठरवलं होतं, पण त्याआधीच ती गायब झाली. या घटनेनंतर ३ वर्षांनी मोसाद एजंट्सना ती जेरुसलेममध्ये सापडली. त्यावेळी तिने नेतुराई कार्ता या कडव्यांमध्येही कडव्या असलेल्या ज्यू पंथाच्या प्रमुखाशी, राब्बाय अॅमराम ब्लाऊशी लग्न केलेलं होतं.

योसेलने शिक्षण पूर्ण झाल्यावर इझरेली सैन्यात प्रवेश केला. नंतर त्याने आयबीएम साठी काम केलं आणि सध्या तो इझराईलमध्ये निवृत्त जीवन जगतो आहे आणि आपल्या फावल्या वेळात तो कर्मठ ज्यू आणि पुरोगामी ज्यू यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी व्याख्यानं आणि इतर कार्यक्रम आयोजित करतो.

क्रमशः

मोसाद - भाग ६

संदर्भ:

The History of Mossad – by Antonella Colonna Vilaci

Mossad: The Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar Zohar & Nissim Mishal

Gideon’s Spies – by Gordon Thomas.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

21 Jan 2016 - 12:57 am | संदीप डांगे

धन्यवाद! मस्त जमलाय!

पुभाप्र..

अर्धवटराव's picture

21 Jan 2016 - 1:53 am | अर्धवटराव

काय कमिटमेण्ट आहे राव या एजण्ट्सची आपल्या कामाबद्दल. हॅट्स ऑफ.
बोका शेठ... तुमचं वाचन आणि लेखन लैच दांडगं आहे राव.

इष्टुर फाकडा's picture

21 Jan 2016 - 2:05 am | इष्टुर फाकडा

सर्वप्रथम, तुमच्या चिकाटीला सलाम. आणि या लेखमालेसाठी खुपच धन्यवाद !

शलभ's picture

21 Jan 2016 - 3:42 pm | शलभ

+१११११

बाबा योगिराज's picture

21 Jan 2016 - 4:29 am | बाबा योगिराज

उत्तम. हा एकच शब्द.

पुभाप्र.

अत्रन्गि पाउस's picture

21 Jan 2016 - 8:25 am | अत्रन्गि पाउस

एक जाणवले कि ह्या सगळ्यासाठी जो प्रचंड पैसा लागेल तो त्यांना उपलब्ध होताच पण ह्या लोकांचे नैतिक चारित्र्य अत्यंत उच्च दर्जाचे असावे ....
तसे बघितले तर एक लहान मुलगा ...त्याचे नाहीसे होणे हे इतक्या जगड्व्याळ पसाऱ्यात खरे तर मामुली ...पण नाही ...आकाशपाताळ एक करून इप्सित साध्य ....
तथापि मोसादला इतका वेळ झुलवणारे लोक त्यांच्यात आहे त्यांच्याही धैर्य, निष्ठा, चिकाटी आणि बुद्धीला कडक सलाम ...
वा बुवा !!!

कविता१९७८'s picture

21 Jan 2016 - 8:37 am | कविता१९७८

वाह,नेहमीप्रमाणे अतिशय अभ्यासपुर्ण लेख

अभिजितमोहोळकर's picture

21 Jan 2016 - 8:39 am | अभिजितमोहोळकर

जोरदार सलाम

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 8:46 am | कैलासवासी सोन्याबापु

बोक्याभाऊ एक प्रश्न,

ज्यु धर्मात आजवर फ़क्त ज्यु बाय बर्थ असू शकतो असे ऐकले होते म्हणजे धर्मांतरण ही पद्धत ज्युज मधे नसल्याचे ऐकिवात होते पण मग रूथ बेन डेविड ही "कन्वर्ट" कशी होऊ शकली? ह्यावर काही सांगू शकाल का?

असंका's picture

21 Jan 2016 - 9:56 am | असंका

+१

अनुप ढेरे's picture

21 Jan 2016 - 2:08 pm | अनुप ढेरे

माहिती चूक आहे. हे वाचा.
https://en.wikipedia.org/wiki/Conversion_to_Judaism

झोरॅष्ट्रियन धर्मात कंन्वर्ट होऊन जाता येत नाही. तिथे तुम्ही बाय बर्थ झोरॅष्ट्रियन असावं लागतं. ( आत्ता आत्ता फक्त आई झोरॅष्ट्रियन असली तरी चालेल असा बदल केला आहे बहुधा.) झोरॅष्ट्रियन धर्मात कर्मठ लोकांना धर्म = वंश असं ठेवायचं आहे.

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 2:12 pm | पगला गजोधर

ज्युदाइजम म्हणायचे का तुम्हाला ?
झोरॅष्ट्रियन म्हणजे पारशी नं ????

झोरॅष्ट्रियन म्हणजे पारशी नं ????

ऑल्मोस्ट हो. पण भारतात हाटेलवाले इराणी लोक (गुडलक, वहुमन सारखे) म्हणून जे संबोधले जातात तेही याच धर्माचे असतात.

झोरॅष्ट्रियन म्हणजेच पारशी आहेत...

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 2:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

ऑलमोस्ट म्हणजे?? जुडाइसम क्रिश्चियनिटी इस्लाम हे सेमिटिक किंवा अब्राह्मैक धर्म म्हणवतात राया, ज़ोरस्ट्रिअनिस्म किंवा पारशी धर्म हा अब्राहमिक धर्म आहे का? माझ्यामते नसावा (डिटेल्स काढून अभ्यास करावा लागेल), फ़क्त दिसायला मिडल ईस्टर्न ट्रेट आहेत पारशी अरब अन ज्यु लोकांत बाकी काही संबंध नसावा

ऑल्मोस्ट म्हणजे भारतात पारसी + इराणी (हाटेलवाले) हे दोघेही झोरॅष्ट्रिअयन आहेत. झोरॅष्ट्रिअयन म्हणजे केवळ पारसी नाहीत.

हा अब्राहमिक धर्म नाही. आगीची पूजा करतात. अग्यारीमध्ये. ( अग्यारीत केवळ प्युअर ब्लडवाल्यांना प्रवेश असतो म्हणे.) इराण + इराक भागात पस्रलेला होता. ग्रेट पर्शिअन एंपायरचा हा धर्म होता. अरब काँक्वेस्ट नंतर तिथून भारतात एक लॉट आला. (त्या लॉटच्या डिसेंडंट्सना पारसी म्हणतात बहुधा.) वैदिक धर्माशी थोडफार साधर्म्य आहे याचं. वैदिक संस्कृत आणि यांची जुनी भाषा यात सिमिलॅरिटी आहेत म्हणे. मनोबा/वल्ली प्रकाश टाकू शकती जास्तं.

इराणला पर्शिआ म्हणूनही संबोधतात, म्हणून पर्शियातून आलेल्यांना पारसी असा अपभ्रंश होवून म्हणत असावे.
झोरॅष्ट्रियन म्हणजेच पारशी आहेत...

Zoroastrianism is the ancient, pre-Islamic religion of Persia (modern-day Iran). Zoroastrianism is one of the world's oldest monotheistic religions. It was founded by the Prophet Zoroaster in ancient Iran approximately 3500 years ago. It survives there in isolated areas but primarily exists in India, where the descendants of Zoroastrian Persian immigrants are known as Parsis, or Parsees.

रेफ १

रेफ २

z

अनुप ढेरे's picture

21 Jan 2016 - 2:51 pm | अनुप ढेरे

भारतात दोन प्रकारचे झोरॅष्ट्रिअन लोक आहेत. पारसी (हे साधारण हजारवर्षापूर्वी आले) आणि इराणी (हे दिड-दोनशे वर्षापूर्वी आले)
हे वाचा.
http://www.dnaindia.com/lifestyle/report-irani-or-parsi-what-s-the-diffe...
आणि
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/What-sets-Zoroastrian-Irani...

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 3:12 pm | पगला गजोधर

धर्म एक, पण भारतात कधी आले तो काळ वेगळा वेगळा.....

वर धर्मावरुन चर्चा चालु होती म्हणुन, आम्हि त्याना एक (एकाच धर्माचे अश्या अर्थी) म्हणत होतो...

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Jan 2016 - 2:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

तेच म्हणतो.

ह्यांच्यात आणि पारशी मंडळीत जन्मानेच सामील होता येते असे ऐकलेले.

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 11:05 am | पगला गजोधर

धार्मिक कट्टरतेपाई देशासमोर किती दूरगामी संकटे उभी राहू शकतात, देशाच्या सुरक्षायंत्रणांची वेळ/शक्ती कशी वृथा खर्च होते…
धार्मिक कट्टरतेपाई सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात कश्या प्रकारे ढवळाढवळ होवू शकते, याचे एक उदाहरण म्हणून, हा लेखं काही तथाकथित धर्ममार्तंन्डानी जरूर अभ्यासावा ….

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 11:59 am | कैलासवासी सोन्याबापु

+१ इजराइल मधे तरी एकाच धर्मातील कट्टर अन मवाळ असा तिढा होता आपल्याकडे हा प्रॉब्लेम झाला तर अजस्त्र होईल शेकडो धर्म परंपरा १४००+ भाषा , रीतिरिवाज, त्यातल्या हजारो हजार वर्षापासुनची "मेल्टिंग पॉट ऑफ़ कल्चर्स एथनीसिटी अन सिविलाइज़ेशन" अशी बांधणी ही एक जमेची बाजु धरता थोड़े बरे आहे पण त्याला धक्का लागता काही म्हणता काही होऊ शकते

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 12:20 pm | पगला गजोधर

इजराइल मधे तरी एकाच धर्मातील कट्टर अन मवाळ असा तिढा होता

आम्ही म्हणू तोच खरा धर्म,
आम्ही इंटरप्रीट करू तोच त्याचा अन्वयअर्थ,
आम्ही म्हणू तीच संस्कृती,
आम्ही म्हणू तीच राष्ट्रभक्ती,
आम्ही म्हणू तीच आहारपद्धती,
आम्ही म्हणू तीच वेशभूषापद्धती,
आम्ही म्हणू तेच दैवत,
आम्ही म्हणू तोच धर्मग्रंथ,
आम्ही म्हणू तिथेच त्याच्याशीच लग्न….ही अशी विकृत मानसिकता असलेले, आज सिरियातही आहेत आणि भारतातही …

तुमच्या आमच्या सुदैवाने ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, आगरकर, कर्वे….
अश्यांच्या विचार चौकटीवरून प्रेरित महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ आंबेडकर यांचे मार्गदर्शन, स्वातंत्र्योत्तर काळात नवभारत घडवताना देशाला मिळाले,
म्हणून भारताचा …सिरीया झाला नाही.

अजुनतरी.....

सुबोध खरे's picture

21 Jan 2016 - 12:47 pm | सुबोध खरे

आम्ही म्हणू तोच खरा धर्म,
आम्ही इंटरप्रीट करू तोच त्याचा अन्वयअर्थ,
आम्ही म्हणू तीच संस्कृती,
आम्ही म्हणू तीच राष्ट्रभक्ती,
आम्ही म्हणू तीच आहारपद्धती,
आम्ही म्हणू तीच वेशभूषापद्धती,
आम्ही म्हणू तेच दैवत,
आम्ही म्हणू तोच धर्मग्रंथ,
याला ज्यांचा विरोध त्यांचे तलवारीने पारिपत्य
असे लोक भरपूर जास्त आहेत.

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 2:07 pm | पगला गजोधर

ज्यांचा विरोध त्यांचे तलवारीने पारिपत्य

किंवा पिस्तुलातून गोळी सुद्धा......

रेफरन्स: महात्मा गांधी, डॉ दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी …

महासंग्राम's picture

23 Jan 2016 - 12:32 pm | महासंग्राम

साहेब तलवारीने पारिपत्य दोन्ही बाजूने होते जरा बाकीचे पण रेफरन्स द्या कि. वाईट प्रवृत्ती एका बाजुक्डेच आहे असे नाहि.

पगला गजोधर's picture

24 Jan 2016 - 3:44 pm | पगला गजोधर

म्हणुनच

ही अशी विकृत मानसिकता असलेले, आज सिरियातही आहेत आणि भारतातही

वाईट प्रवृत्ती एका बाजुक्डेच आहे असे नाहि. यासाठीच
सिरिया (ईसीस) व भारत अशी रेफरन्स लाइन ...

अदि's picture

21 Jan 2016 - 11:49 am | अदि

लेख!!

अद्द्या's picture

21 Jan 2016 - 12:34 pm | अद्द्या

जबरदस्त. . नेहमी प्रमाणेच

जबरदस्त. . नेहमी प्रमाणेच

हेच्च बोल्तो..!!

सुबोध खरे's picture

21 Jan 2016 - 12:44 pm | सुबोध खरे

जबरदस्त मालिका
--/\--
साष्टांग दंडवत.

पिलीयन रायडर's picture

21 Jan 2016 - 1:33 pm | पिलीयन रायडर

एकतर केवळ गैरसमजाने की आपली मुलगी आणि जावाई नातवाला रशियात नेतील, आजोबांनी किती मोठा घोळ घालुन ठेवला. ह्यातही आपल्या नातवावर आधी आईचा हक्क सुद्धा मान्य न करणे हा तर कर्मठपणाचा कळस!! ह्या लोकांचे नेटवर्क काय जबरदस्त असते हे हा भाग वाचुन कळाले.

मला तर पासपोर्ट आणि त्यासाठी आपण जी कागदपत्र वगैरे देतो, ते सगळं हास्यास्पदच वाटायला लागलय!!

फार वाट बघायला लावलीत ह्यावेळी.. पुभाप्र!

मला तर पासपोर्ट आणि त्यासाठी आपण जी कागदपत्र वगैरे देतो, ते सगळं हास्यास्पदच वाटायला लागलय!!

अक्षरश:

अजया's picture

21 Jan 2016 - 1:42 pm | अजया

बोकोबा विशेषणं संपली. दंडवत घ्यायला लागा आता_/\_!

सामान्य वाचक's picture

21 Jan 2016 - 2:32 pm | सामान्य वाचक

खूप दिवसांनी पुढचा भाग टाकलात
हा हि भाग खूपच छान झाला आहे

नरेश माने's picture

21 Jan 2016 - 2:44 pm | नरेश माने

एकदम थरारक आहे ही मालिका. हेरगिरी म्हणजे काय याची थोडीफार कल्पना करता येतेय.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Jan 2016 - 2:49 pm | घाशीराम कोतवाल १.२

खुप दिवसानी मिपा वर आलो आनी एक सुरेख लेखमाला वाचनात आली
लिहित रहा बोका शेट

मयुरMK's picture

21 Jan 2016 - 2:49 pm | मयुरMK

__/\__

भुमी's picture

21 Jan 2016 - 2:53 pm | भुमी

तुमच्या अभ्यासू लिखाणाला! अप्रतिम लेखमालिका!

खुप सुरेख चाललिय लेखमाला !

नया है वह's picture

21 Jan 2016 - 2:55 pm | नया है वह

नेहमी प्रमाणेच प्रचंड आवडला!

मालोजीराव's picture

21 Jan 2016 - 3:07 pm | मालोजीराव

३,००,००० ज्यू लोकांच्या हत्याकांडात सहभागी नाझी युध्दगुन्हेगार ऑस्कर ग्रोनिंग !

nazi

पैसा's picture

21 Jan 2016 - 3:14 pm | पैसा

झकास लिहिलंय! नाहीतर आपल्याकडे पोलीस अधिकारी ड्रग्जचा सौदा करायला जातात आणि अतिरेक्यांच्या तावडीत सापडतात म्हणे!

पद्मावति's picture

21 Jan 2016 - 6:09 pm | पद्मावति

वाह, हा भागही मस्तं जमलाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2016 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बोकोबा _/\_

आता पुढचा भाग लौकर येउ देत.

नेहमी प्रमाणेच उत्तम भाग. आणि नेहमी प्रमाणेच आमचाही __/\__

मी-सौरभ's picture

21 Jan 2016 - 8:14 pm | मी-सौरभ

_/\_

राँर्बट's picture

21 Jan 2016 - 9:03 pm | राँर्बट

बोकोबा,

लेख अप्रतिम जमला आहे.

दुसर्‍या महायुद्धावर अनेक डॉक्युमेंट्रीज नेटफ्लिक्सवर आहेत. यातल्या एका एपिसोडमध्ये सर्वात प्रथम ऑशवित्झमध्ये आल्यावर स्वतःची ओळख करुन देताना खुद्दं मेंगेलाने स्वतःच्या नावाचा उच्चार 'मेंगेला' असा केला आहे.

"मेंगेला. जोसेफ मेंगेला."

(रच्याकने मला ते पहिल्यांदा ऐकताना मंगूला वाटलं होतं!)

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 10:01 pm | प्रचेतस

भन्नाट

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 10:03 pm | यशोधरा

थरारक आहेत हे सगळे किस्से.

जव्हेरगंज's picture

21 Jan 2016 - 11:30 pm | जव्हेरगंज

उत्तम !

रुथ बेन डेव्हिड ही बाई म्हणजे कहरच होती की राव!!!

प्रवास's picture

22 Jan 2016 - 11:20 pm | प्रवास

लेखमाला अतिशय आवडली !

लेखमाला तुफान आवडली आहे. अजून येऊ द्यात.

नाखु's picture

23 Jan 2016 - 8:43 am | नाखु

दंडवत बाकी काही नाही.

ज्यू धर्म आणि इझराईल या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असू शकत नाहीत. योसेलच्या अपहरणाने इझराईलच्या पायालाच धक्का लागलेला आहे. संपूर्ण देशभर धार्मिक, पुराणमतवादी ज्यूंबद्दल असंतोष आणि संतापाची भावना आहे. यादवी युद्धही भडकू शकतं. आणि या सगळ्याला एक प्रकारे तू जबाबदार असशील. जर उद्या त्या मुलाला काही झालं, तो आजारी पडला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांना तोंड देऊ शकशील तू आणि तुझे सहकारी? तू स्वतः एक आई आहेस. उद्या तुझ्या मुलाला असं उचलून नेलं आणि तुझ्यापासून दूर नेलं – का, तर तू ज्या प्रकारे तुझ्या मुलाला वाढवलं आहेस ते त्यांना पसंत नाही – तर कसं वाटेल तुला? आमचा धर्माशी आणि धार्मिक लोकांशी कुठल्याही प्रकारे वाद नाही. आम्हाला फक्त तो मुलगा हवाय. एकदा तो आमच्या हातात आला, की तू आणि तुझा मुलगा स्वतंत्र असाल.”

याबद्दल कडक सलाम

बोकेश यांचा पंखा नाखु

संदीप डांगे's picture

23 Jan 2016 - 11:51 am | संदीप डांगे

नाखुकाकांशी बाडीस...

___/\___

महासंग्राम's picture

23 Jan 2016 - 12:36 pm | महासंग्राम

फुल ओंन बाडीस

पगला गजोधर's picture

24 Jan 2016 - 3:51 pm | पगला गजोधर

योसेलच्या अपहरणाने इझराईलच्या पायालाच धक्का लागलेला आहे. संपूर्ण देशभर धार्मिक, पुराणमतवादी ज्यूंबद्दल असंतोष आणि संतापाची भावना आहे. यादवी युद्धही भडकू शकतं. आणि या सगळ्याला एक प्रकारे तू जबाबदार असशील. जर उद्या त्या मुलाला काही झालं, तो आजारी पडला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांना तोंड देऊ शकशील तू आणि तुझे सहकारी? तू स्वतः एक आई आहेस. उद्या तुझ्या मुलाला असं उचलून नेलं आणि तुझ्यापासून दूर नेलं – का, तर तू ज्या प्रकारे तुझ्या मुलाला वाढवलं आहेस ते त्यांना पसंत नाही – तर कसं वाटेल तुला? आमचा धर्माशी आणि धार्मिक लोकांशी कुठल्याही प्रकारे वाद नाही. आम्हाला फक्त तो मुलगा हवाय. एकदा तो आमच्या हातात आला, की तू आणि तुझा मुलगा स्वतंत्र असाल.

DEADPOOL's picture

23 Jan 2016 - 9:16 am | DEADPOOL

कोपरापासुन!

प्रतिक कुलकर्णी's picture

25 Jan 2016 - 8:50 am | प्रतिक कुलकर्णी

जबरदस्त अफाट आहे..
तुमचा आभ्यास आणि लेखनशैलीला दंडवत --/\--

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 12:14 pm | बोका-ए-आझम
सुचिता१'s picture

17 Apr 2017 - 8:31 pm | सुचिता१

अप्रतीम !!! वेगवान घटनाक्रम खुप च छान रंगवला आहे. धनयवाद !