मोसाद - भाग ९

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
18 Mar 2016 - 12:54 pm


.

मोसाद - भाग ८

मोसाद - भाग ९

२७ फेब्रुवारी १९६५. पश्चिम जर्मनीमधल्या der Spiegel या नामवंत नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने दिलेली बातमी विचित्र होती – एका नाझी युद्धगुन्हेगाराचा ‘ जे कधीही विसरणार नाहीत ’ अशा लोकांनी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे देशाची राजधानी माँटेव्हिडिओ येथे काटा काढला होता.

der Spiegel च्या वार्ताहरांनी या फोनकडे कुणाचा तरी खोडसाळपणा म्हणून दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी der Spiegel सह पश्चिम जर्मनीमधल्या इतर अनेक वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या ऑफिसेसमध्ये एकाच वेळी काही पार्सल्स पाठवण्यात आली. या पार्सल्समध्ये हा नाझी युद्धगुन्हेगार, त्याची पार्श्वभूमी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फोटो होते. अशीच पार्सल्स माँटेव्हिडिओमध्येही पाठवण्यात आली होती.

८ मार्च १९६५ या दिवशी सकाळी उरुग्वेमधल्या पोलिसांनी माँटेव्हिडिओच्या कारास्को भागातल्या कार्टाजेना स्ट्रीटवर असलेल्या कासा क्युबेर्तिनी या बंद आणि रिकाम्या घरात एका शवपेटीत ठेवलेला एक मृतदेह मिळाला. मृत माणसाच्या कुटुंबीयांना तिथे आणण्यात आलं आणि त्यांनी ताबडतोब त्याची ओळख पटवली. हर्बर्ट्स झुकर्स. द बुचर ऑफ रिगा या नावाने कुप्रसिद्ध असलेला, जर्मनी आणि सोविएत रशिया या दोन्ही देशांमध्ये ज्यूंच्या हत्याकांडासाठी हवा असलेला आणि गेली २० वर्षे फरार असलेला क्रूरकर्मा.

लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया या तीन देशांना बाल्टिक देश म्हणून ओळखलं जातं. झुकर्स त्यातल्या लाटव्हियाचा नागरिक होता. १९३० च्या दशकात तो एक अत्यंत धाडसी वैमानिक म्हणून प्रसिद्ध होता. लाटव्हियाची राजधानी रिगा ते पश्चिम आफ्रिकेतल्या गँबिया देशाची राजधानी बंजुलपर्यंत आणि रिगापासून टोकियोपर्यंत अशा दोन लांब पल्ल्याच्या विमानोड्डाणांच्या पराक्रमामुळे तो सर्वांच्या नजरेत आला. सर्वात उल्लेखनीय गोष्ट ही की हे दोन्हीही पराक्रम त्याने ज्या विमानांनी केले, त्या विमानांची संरचना ही त्याची स्वतःची होती. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हार्मन पुरस्कारही मिळाला आणि त्याची तुलना विमानातून अटलांटिक महासागर सर्वप्रथम पार करणाऱ्या चार्ल्स लिंडबर्गबरोबर करण्यात आली. रिगाच्या म्युझियममध्ये त्याच्या विमानाची प्रतिकृती बघायला प्रचंड गर्दी होत असे.

राजकीयदृष्ट्या झुकर्स उजव्या विचारसरणीचा होता. पण त्याचे अनेक ज्यू मित्र होते. महायुद्धापूर्वी त्याने आपल्या विमानाने पॅलेस्टाईनलाही भेट दिली होती आणि तिथल्या झिओनिस्ट ज्यूंसमोर भाषण केलं होतं. त्यामुळे लाटव्हियामधले ज्यू त्याला आपला मित्र मानत होते.

युद्ध सुरु झाल्यावर मात्र सगळं बदलून गेलं. नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया यांनी १९३९ मध्ये पोलंडची फाळणी केली. त्याच्यानंतर १९४० मध्ये संभाव्य जर्मन आक्रमणापासून बचाव म्हणून रशियाने जबरदस्तीने आपलं सैन्य बाल्टिक देशांमध्ये घुसवलं. झुकर्ससारखे उजवे राष्ट्रवादी रशियनांच्या रडारवर होतेच. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पुढच्याच वर्षी, १९४१ च्या जूनमध्ये जर्मनीने सोविएत रशियावर आक्रमण केलं. त्यात बाल्टिक देश आणि बेलारूस (त्याला त्यावेळी श्वेत रशिया हे नाव होतं) हे भाग जर्मनांच्या टाचांखाली सर्वात पहिल्यांदा आले. झुकर्स आणि त्याच्यासारख्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.

लाटव्हियावर जर्मन नियंत्रण प्रस्थापित होताच झुकर्सच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून आला. तो थंडर क्रॉस नावाच्या एका फॅसिस्ट संघटनेचा सदस्य होता. या संघटनेचा मुख्य विरोध हा कम्युनिस्टांना होता. त्यांनी लाटव्हियामध्ये आलेल्या नाझींना कम्युनिस्टांची पाळंमुळं खणून काढण्यासाठी मदत करायचं ठरवलं. नाझींनी त्यांना अजून एक जबाबदारी दिली – लाटव्हिया ज्यू-मुक्त करणे. झुकर्स आता कट्टर ज्यू-विरोधी झाला होता. नाझींना खुश करण्यासाठी त्याने सर्वात पहिली कामगिरी जी केली ती पाहून निर्ढावलेले नाझीही हादरले. त्याने ३०० ज्यूंना एका स्थानिक सिनेगॉगमध्ये डांबलं आणि त्या सिनेगॉगला सरळ आग लावून दिली. सर्वच्यासर्व ३०० ज्यू – ज्यांच्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता – होरपळून मरण पावले.

या पहिल्याच कृत्याने रिगामध्ये झुकर्स आणि त्याच्या थंडर क्रॉस संघटनेची दहशत निर्माण झाली. युद्धापूर्वी अनेक ज्यू मित्र असल्यामुळे झुकर्सला ज्युबहूल लोकसंख्या असणारे भाग माहित होते. तिथे जाऊन जो कोणी सिनेगॉगमध्ये जात असेल किंवा तिथून बाहेर पडत असेल त्यांना गोळ्या घालून ठार मारणं, ज्यू वस्तीच्या मध्यभागी शेकोटी पेटवून त्यात लहान मुलांना फेकणं, ज्यू तरुणींवर सर्वांसमक्ष बलात्कार करणं असले प्रकार थंडर क्रॉसच्या गुंडांनी सुरु केले. झुकर्स त्यात अग्रभागी होता.

त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्याच्या आदेशावरून लाटव्हियाच्या पश्चिमेला असणाऱ्या कुल्दिगा सरोवरात १२०० ज्यूंना बुडवून मारण्यात आलं. त्याची सर्वात भयानक कामगिरी त्याने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पाडली. रिगा शहरातल्या आणि बाल्टिक देशांमधल्या ज्यूंना रिगामधल्या घेट्टोमध्ये कोंबण्यात आलं होतं. त्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी एस.एस. प्रमुख हेनरिक हिमलरने रिगा घेट्टो विसर्जित करायचा आदेश सोडला. या घेट्टोमधल्या २५,००० ज्यूंना रिगाच्या जवळ असणाऱ्या रम्बुला नावाच्या जंगलामध्ये नेऊन, विवस्त्र करून, गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

२२ जून १९४१ या दिवशी जर्मनीने सोविएत रशियावर आक्रमण केलं होतं. बरोबर तीन वर्षांनंतर त्याच दिवशी रशियाने जर्मन सैन्याला पश्चिमेकडे रेटण्यासाठी आणि रशियन भूमी मुक्त करण्यासाठी ऑपरेशन बाग्रातियान या नावाने प्रतिआक्रमण सुरु केलं. बेलारूस आणि बाल्टिक राष्ट्रांमधून जर्मन सैन्याला हाकलून लावून हे भाग मुक्त करणे हा या आक्रमणाचा प्राथमिक उद्देश होता. रशियन सैन्याने लाटव्हिया मुक्त केल्यावर आपलं काही खरं नाही, हे झुकर्सला समजलं होतंच. त्याने आपल्या कुटुंबियांना आधीच लाटव्हियाच्या बाहेर काढून दक्षिण अमेरिकेत पोहोचवलं होतं. १९४४ च्या उत्तरार्धात रशियन सैन्याने रिगा ताब्यात घेतल्यावर झुकर्स बनावट कागदपत्रांच्या मदतीने स्वीडनला आणि तिथून फ्रान्सला गेला आणि तिथून त्याने ब्राझीलमधल्या रिओ डी जानेरोला जाणारी बोट पकडली.

झुकर्सने एक गोष्ट अजून केली जी इतर नाझी युद्धगुन्हेगारांनी केली नाही. त्याने मिरियम कित्झनर नावाच्या एका ज्यू मुलीला नाझींपासून वाचवलं होतं आणि रिओला जाताना तो तिला बरोबर घेऊन गेला होता. एक अस्सल ज्यू मुलगी बरोबर असल्यामुळे रिओला पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यावरही झुकर्सचा कोणालाही संशय आला नाही. रिओमध्ये पोचल्यावर त्याने आपल्या कुटुंबाला तिकडे बोलावून घेतलं. मिरियमला रिओमधल्या स्थानिक ज्यू संस्थांमधून भाषणांची आणि तिचे युद्धातले अनुभव सांगण्याची अनेक आमंत्रणं यायला लागली होती. या कार्यक्रमांसाठी झुकर्स तिच्याबरोबर जात असे. या कार्यक्रमांमध्ये मिरियम कसा झुकर्सने नाझींपासून आपला जीव वाचवला, याचं वर्णन करत असे. त्यामुळे झुकर्सबद्दल रिओमधल्या ज्यू लोकांमध्ये आदराची भावना निर्माण झाली. त्याचा फायदा घेऊन त्याने रिओमध्ये एक ट्रॅव्हल एजन्सी आणि एअर टॅक्सी कंपनी चालू केली. त्याला त्यासाठी रिओमधल्या श्रीमंत ज्यूंनी भांडवल पुरवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना त्याने स्वतःचं नाव बदललं नव्हतं. त्याचं असं सगळं व्यवस्थित चालू असताना एक अनपेक्षित घटना घडली.

मिरियमला एका व्याख्यानाचं आणि त्याच्याच जोडीने तिथे असलेल्या पार्टीचं आमंत्रण आलं होतं. पार्टीच्या आयोजकांची झुकर्सनेही बोलावं अशी इच्छा होती. मिरियमच्या भाषणानंतर झुकर्स बोलणार होता. तिचं भाषण अपेक्षेपेक्षा जास्त लांबलं आणि झुकर्सच्या भाषणाची वेळ येईपर्यंत त्याने भरपूर दारू ढोसली होती. त्यामुळे तो जेव्हा बोलायला उभा राहिला, तेव्हा तो नशेतच होता आणि मिरियमने एवढा वेळ घेतल्यामुळे वैतागलेला होता. बोलता बोलता त्याने मिरियमला आणि तिच्यावरून ज्यूंना शिव्या द्यायला सुरुवात केली आणि धुंदीत असतानाच आपण आणि आपल्या नाझी मित्रांनी कसं ज्यूंना मारलं आणि रम्बुला जंगलात आपण २५,००० ज्यूंच्या हत्येत कसे सहभागी होतो त्याचं अगदी रसभरीत वर्णन केलं.

झुकर्सच्या ज्यू मित्रांना जबरदस्त धक्का बसला. साधारण त्याच वेळी सर्व दोस्त राष्ट्रांमध्ये आणि सोविएत रशियाच्या अंमलाखाली असलेल्या पूर्व युरोपियन कम्युनिस्ट देशांमध्ये नाझी युद्धगुन्हेगार आणि त्यांना सहकार्य करणारे स्थानिक लोक यांच्यावर खटले चालू होते. आपल्यामुळे नाझीवाद नष्ट झाला हे दाखवायची खुमखुमी असल्यामुळे स्टॅलिनने या सगळ्या खटल्यांचं कामकाज कव्हर करण्यासाठी पाश्चात्य पत्रकारांना परवानगी दिली होती. लाटव्हिया सोविएत रशियाचा भाग असल्यामुळे राजधानी रिगामध्ये चालू असलेल्या खटल्यांचा वृत्तांत सगळ्या जगभर प्रसारित होत होता. रिगा घेट्टो आणि रम्बुला हत्याकांड यासंदर्भात फ्रेडरिक जेकेल्न नावाच्या एस.एस. अधिकाऱ्यावर चालू असलेल्या खटल्यात त्याला स्थानिक लोकांपैकी कोणी मदत केली, असा प्रश्न विचारला असता त्याने हर्बर्ट्स झुकर्स हे नाव घेतलं होतं. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्येही झुकर्सचं नाव आणि त्याची कृत्यं सर्वांना समजली. तो युद्धापूर्वी त्याच्या विमानविषयक पराक्रमांसाठी प्रसिद्ध होता. त्याचे फोटो ठिकठिकाणी प्रसिद्ध झाले होते. एका सुप्रसिद्ध वैमानिकाचा नाझींचा सहकारी आणि फरारी युद्धगुन्हेगार होईपर्यंत झालेला अधःपात ही सनसनाटी स्टोरी होती. त्यामुळे पाश्चात्य वृत्तपत्रांनीही झुकर्सच्या फोटोसकट लेख छापले.

रिओमध्ये ही बातमी पोहोचल्यावर झुकर्सला रिओमध्ये राहणं अशक्य होतं. मिरियमनेही त्याच्याबरोबर कुठलाही कार्यक्रम करायला किंवा इतर कुठलाही संबंध ठेवायला नकार दिला. झुकर्स रिओ शहर सोडून त्याच्या एका उपनगरात राहायला गेला. इथे ज्यू वस्ती जवळजवळ नव्हतीच. पण रिओमधल्या ज्यूंना त्याच्याबद्दल समजल्यावर त्यांनी त्याच्या ऑफिसवर मोर्चा काढला. या मोर्च्यात असलेल्या काही गरम रक्ताच्या ज्यू तरुणांनी ऑफिसमधल्या फाईल्स आणि बाकी सामान रस्त्यावर आणून जाळलं आणि ऑफिसची प्रचंड नासधूस केली. झुकर्सला पोलिसांच्या संरक्षणात रिओ सोडून जवळपास साडेचारशे किलोमीटर्स दूर असलेल्या साओ पावलोला जावं लागलं.

झुकर्सकडे थोडेफार पैसे होते. त्यांचा भांडवल म्हणून वापर करून त्याने परत एकदा स्वतःचा एअर टॅक्सी व्यवसाय सुरु केला. पण आता त्याचा पूर्वीचा आत्मविश्वास लयाला गेला होता. आपला मृत्यू एखाद्या ज्यू माणसाच्या हातून होणार आहे याची त्याला सतत भीती वाटायला लागली होती. साओ पावलोच्या सर्व पोलिस स्टेशन्समध्ये त्याने आपला संशयास्पद रीत्या मृत्यू झाला तर जे लोक जबाबदार असू शकतील अशा लोकांची एक यादी दिली होती. या यादीवरचे सर्व लोक रिओमधले प्रतिष्ठित ज्यू आणि झुकर्सचे एकेकाळचे मित्र आणि भांडवलदार होते. त्याने त्याचं साओ पावलोमधलं घर एखाद्या किल्ल्यासारखं कडेकोट बनवलं होतं. १९६० मध्ये मोसादने अॅडॉल्फ आइकमनला अर्जेन्टिनामधून उचललं आणि इझराईलला नेऊन त्याच्यावर खटला भरून त्याला फाशी दिलं. त्यानंतर झुकर्सची भीती अजूनच वाढली. त्याने आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेवर जास्तीतजास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. अर्जेन्टिनापासून ब्राझील काही लांब नव्हता.

या सगळ्या नादात त्याचं त्याच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होतं, आणि शेवटी त्याचा परिणाम दिसायला लागलाच. त्याने चालू केलेले जवळपास सर्व व्यवसाय तोट्यात गेले आणि त्याची आर्थिक स्थिती बरीच खालावली.
इकडे युरोपमध्ये वेगळंच नाट्य आकाराला येत होतं. १ सप्टेंबर १९६४ या दिवशी पॅरिसमध्ये दोन मोसाद एजंट्स भेटले. एक होता यित्झाक सारीद. दुसऱ्याचं नाव होतं योस्की यारीव्ह. सारीद मोसादच्या सीझरिआ नावाच्या ऑपरेशन्स टीमचा सदस्य होता, तर यारीव्हची नुकतीच सीझरिआचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मोसादचा ऑपरेशन्स प्रमुख रफी एतान आता मोसादच्या युरोप विभागाचा प्रमुख झाला होता. त्याच्या जागी यारीव्ह आला होता.

यारीव्हने सारीदला त्यांच्या भेटीची पार्श्वभूमी सांगितली. काही महिन्यांच्या कालावधीमध्ये पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या संसदगृहांमध्ये एक विधेयक मांडलं जाणार होतं. या विधेयकाद्वारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या सर्व गुन्ह्यांबद्दल जी कारवाई होणार होती, त्यावर कालमर्यादा आणण्यात येणार होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर एक ठराविक कालावधी उलटून गेल्यावर महायुद्धादम्यान केलेला गुन्हा, मग तो कितीही नृशंस असला तरीही, गुन्हा राहणार नव्हता. अनेक लपूनछपून राहणाऱ्या नाझींना त्यामुळे समाजासमोर येऊन उजळ माथ्याने, जणू काही घडलंच नव्हतं, अशा प्रकारे राहणं शक्य होणार होतं. या विधेयकामागचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या सरकारांना आपला भूतकाळ विसरायचा होता. जर्मन अत्याचारांमुळे भरडल्या गेलेल्या बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स यासारख्या देशांमध्येही नाझी युद्धगुन्हेगारांचा पाठपुरावा करून त्यांना न्यायालयासमोर आणून शिक्षा देण्यासंबंधी उदासीन वातावरण होतं. आइकमनचं अपहरण आणि त्याच्या खटल्यामुळे नाझीविरोधी मोहिमांना थोडीफार गती मिळाली होती, पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सगळीकडे दिसत होता. इझराईलच्या राजकीय वर्तुळामध्येही त्यामुळे अस्वस्थता होती. आइकमनसारखी एखादी जबरदस्त घटना घडल्याशिवाय नाझींच्या कृत्यांची भयानकता जगासमोर येणार नाही असं इझरेली नेत्यांना आणि सुरक्षाव्यवस्थेला वाटत होतं. मोसादला जरी पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्हीही देशांमध्ये हे विधेयक मांडण्यापासून कोणाला रोखता येणार नव्हतं, तरीही त्याला मंजुरी मिळून त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये यासाठी जे होऊ शकतील ते सगळे प्रयत्न करायचं मोसादने ठरवलं होतं, आणि त्याचसाठी एखाद्या मोठ्या आणि फरार नाझी युद्धगुन्हेगाराला लक्ष्य बनवण्याचा निर्णय संचालक मायर अमितने घेतला होता. त्याला आइकमनप्रमाणे इझराईलमध्ये आणून खटला भरून शिक्षा देणं आता शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला ठार मारणं आणि त्याची बातमी आणि त्या अनुषंगाने त्या गुन्हेगाराच्या गुन्ह्यांची माहिती जगभरात पसरवणं हा मोसादचा हेतू होता. मोसादच्या दक्षिण अमेरिकेमधल्या एका प्रतिनिधीने नाव सुचवलं होतं – हर्बर्ट्स झुकर्स. द बुचर ऑफ रिगा. रिगाचा कसाई.

यारीव्हने या कामासाठी सारीदची नियुक्ती केली होती. सारीद अत्यंत हुशार होता आणि आइकमनच्या अपहरणाच्या मोहिमेतल्या शेवटच्या टप्प्यात सहभागी होता. पण त्याच्याकडे ही कामगिरी सोपवण्याचं केवळ हेच कारण नव्हतं. सारीदचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब चेल्मनो मृत्यूछावणीतल्या गॅस चेंबरमध्ये मारलं गेलं होतं. तो कसाबसा जीव वाचवून पॅलेस्टाईनपर्यंत पोचला होता. महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी इजिप्तचं जर्मन सैन्यापासून संरक्षण करण्यासाठी जी पॅलेस्टाईन रेजिमेंट उभारली होती, त्यात त्याचा समावेश होता. एल अलामेनच्या निर्णायक लढाईमध्ये तो जर्मन सैन्याविरुद्ध लढलादेखील होता. त्याला आता वीसपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलेली असली, तरीही सारीदच्या मनातला नाझींविषयी असलेला संताप कमी झालेला नव्हता.

ही भेट झाल्यावर साधारण एक आठवड्यानंतर सारीद पॅरिसहून रेल्वेने अॅमस्टरडॅमला आला. अँटन कुन्झल या नावाने त्याने तिथल्या एका आलिशान हॉटेलमध्ये चेक-इन केलं. नंतर त्याने तिथल्या स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याच नावाने एक पोस्ट बॉक्स भाड्याने घेतली. तिथून तो अॅमरो बँकेच्या शाखेत गेला आणि तिथे एक अकाउंट उघडून त्याने त्यात ३००० डॉलर्स एवढी रक्कम जमा केली. मग एका स्क्रीन प्रिंटरच्या दुकानात जाऊन त्याने अँटन कुन्झल या नावाने काही बिझनेस कार्ड्स आणि इतर स्टेशनरी छापून घेतली. यामध्ये तो रॉटरडॅममधल्या एका गुंतवणूकविषयक सल्ला देणाऱ्या कंपनीचा संचालक असल्याचा उल्लेख होता. तिथून तो ब्राझीलच्या वकिलातीत गेला आणि तिथे त्याने ब्राझीलचा पर्यटक व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला. तिथून तो एका डॉक्टरच्या दवाखान्यात गेला, स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि एकदम निरोगी असल्याचं प्रमाणपत्र घेऊन तो तिथून एका चष्म्याच्या दुकानात गेला. त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण होती, पण तरीही त्याने डोळ्यांचा नंबर जाणून घेण्यासाठी जी टेस्ट असते, त्यात खोटी उत्तरं दिली. परिणामी त्याला एकदम जाड भिंगांचा चष्मा घ्यायला लागला.

दुसऱ्या दिवशी स्वित्झर्लंडमधल्या झुरिकमध्ये त्याने क्रेडिट स्विस बँकेत एक अकाउंट उघडला आणि त्यात ६००० डॉलर्स जमा केले. तिथून तो पॅरिसला गेला. तिथे त्याने एका मेक-अपचं सामान विकणाऱ्या दुकानातून एकदम जाड मिशा आणि भुवयांची जोडी विकत घेतली आणि एका सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन पूर्णपणे नवा माणूस – अगदी जाड भिंगांच्या चष्म्यासकट – बनून तो बाहेर आला. एका फोटो स्टुडीओमध्ये जाऊन त्याने या नवीन चेहऱ्याचे फोटो काढून घेतले. त्याच दिवशी तो अॅमस्टरडॅमला परत गेला.

दुसऱ्या दिवशी ब्राझीलच्या वकिलातीत जाऊन त्याने ब्राझीलचा पर्यटक व्हिसा मिळवण्यासाठी केलेला अर्ज तिथे नेऊन दिला. अर्जासोबत असलेल्या ऑस्ट्रियन पासपोर्टवर त्याचा चष्मा लावलेला फोटो होता आणि नाव तेच होतं – अँटन कुन्झल.

अॅमस्टरडॅम ते साओ पावलो अशी फ्लाईट नसल्यामुळे कुन्झलने रिओचं तिकिट काढलं. तो या संपूर्ण काळात ज्या कोणाला भेटला होता, त्या प्रत्येक माणसाला त्याने आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं. तो एक अत्यंत यशस्वी बिझनेसमन असल्याचं वातावरण त्याने जाणूनबुजून निर्माण केलं होतं. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे त्याच्या या दाव्यावर कोणाचाही सहज विश्वास बसला असता.

१० सप्टेंबर १९६४ या दिवशी कुन्झल रिओला जाणाऱ्या विमानात बसला. तो त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीमुळे उत्तेजित झाला होतंच, पण त्याचबरोबर त्याच्या मनावर प्रचंड दडपण आलेलं होतं. त्याला परदेशात जाऊन स्वतःच्या जिवाची २४ तास भीती असणाऱ्या आणि त्यामुळे अत्यंत सावध असणाऱ्या एका क्रूरकर्म्याबरोबर मैत्री करायची होती, आणि मग त्याच माणसाला ठार मारायचं होतं. झुकर्सला कमी लेखून चालणार नव्हतं. एखादी छोटीशी चूकही प्राणघातक ठरली असती.

संपूर्ण विमानप्रवासात आपलं लक्ष कामगिरीवर केंद्रित करण्यासाठी कुन्झल झुकर्सच्या तावडीतून जीव वाचवून निसटलेल्या ज्यूंचे अनुभव वाचत होता. एस.एस. अधिकारी फ्रेडरिक जेकेल्न, ज्याने आपल्या साक्षीत झुकर्सचं नाव घेतलं होतं, त्याने ज्यूंना मारण्यासाठी ‘सार्डिन पॅकिंग ’ नावाची एक अमानुष पद्धत शोधून काढली होती. यात एक मोठा खड्डा खणला जात असे. बहुतेक वेळा ज्या ज्यूंना मारण्यासाठी आणलं जात असे, त्यांच्याचकडून हा खड्डा खोदून घेतला जाई. खड्डा पुरेसा खोल झाला, की ज्यूंच्या एका रांगेला त्याच्या काठावर उभं करण्यात येई आणि त्यांच्या मानेत गोळी घालून त्यांची प्रेतं या खड्ड्यात पाडली जात. ही रांग संपली की पुढच्या रांगेतल्या ज्यूंना उभं केलं जाई. त्यांचे मृतदेह या आधी मारलेल्या ज्यूंच्या अंगावर पडत. त्यामुळे कोणी समजा येनकेनप्रकारेण गोळीपासून बचावला, तरी खड्ड्यात घुसमटून मरत असे. खड्ड्यात प्रेतांची रास होऊन खड्डा भरला, की मग त्यावर डिझेल किंवा पेट्रोल ओतून सगळी प्रेतं जाळली जात आणि त्यांची राख नव्याने तिथे मरण्यासाठी आलेल्या ज्यूंना साफ करावी लागत असे. पुरुष, स्त्रिया, मुलं – कोणाच्याही बाबतीत नाझी भेदभाव करत नसत. जेकेल्नचा लाटव्हियामधील रम्बुला आणि युक्रेनमधील बाबी यार अशा दोन मोठ्या हत्याकांडांमध्ये सहभाग होता. रम्बुलामध्ये जेकेल्न हजर होता, पण प्रत्यक्ष हत्या झुकर्स आणि त्याच्या थंडर क्रॉस संघटनेतल्या लोकांनी केल्या होत्या. रम्बुलामधून वाचलेल्या एका ज्यू स्त्रीने लाटव्हियामध्ये जाऊन जेकेल्नविरुद्ध साक्ष दिली होती. तिनेही झुकर्सचं वर्णन केलं होतं. जेकेल्नला ३ फेब्रुवारी १९४६ या दिवशी रशियनांनी फासावर लटकवलं होतं, पण झुकर्स अजूनही जिवंत होता.

कुन्झल उर्फ सारीदने एक खूणगाठ मनाशी पक्की बांधली होती, की जर तो झुकर्सला सरळ जाऊन भेटला, तर त्याला नक्कीच संशय येईल. त्यामुळे रिओला पोचल्यावर त्याने लगेच साओ पावलोला न जाता काही दिवस रिओमध्येच घालवले. त्याचा पर्यटक व्हिसा होताच. त्यामुळे रिओमधली अनेक प्रेक्षणीय स्थळं त्याने पाहिली. ब्राझीलमध्ये त्यावेळी वसंतऋतू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होतीच. पर्यटक म्हणून रिओमध्ये वावरत असतानाच त्याची पर्यटन व्यवसायातल्या अनेक लोकांशी – सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या – ओळख झाली. रिओच्या स्थानिक पर्यटन मंत्र्यालाही तो भेटला आणि त्याने आपण ब्राझीलच्या पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करायला उत्सुक आहोत असं सांगितलं आणि रिओ आणि साओ पावलो या दोन शहरांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत हेही सांगितलं. ज्या लोकांना तो भेटला होता, त्या प्रत्येकाकडून शिफारसपत्र घ्यायला तो विसरला नाही.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कुन्झल साओ पावलोला गेला. तिथल्या एका मरीनामध्ये झुकर्सच्या कंपनीच्या मालकीची एक जेट्टी आहे, असं त्याला मोसादच्या ब्रीफिंगमध्ये सांगण्यात आलं होतं. ती जेट्टी शोधून काढायला त्याला अजिबात वेळ लागला नाही. जेट्टीच्या जवळ काही छोट्या बोटी आणि लाँचेस होत्या. त्याच्याचजवळ एक सी प्लेन होतं आणि त्याच्याबाजूला एक उंच, सडपातळ पण दणकट असा एक माणूस पायलटच्या पोशाखात उभा होता. कुन्झलने त्याला फोटोवरून ताबडतोब ओळखलं – हर्बर्ट्स झुकर्स.

त्याच्याकडे न जाता कुन्झल जेट्टीपासून थोड्या दूर असलेल्या तिकिट खिडकीपाशी गेला. तिथे एक सुंदर तरुणी तिकिटं विकत होती. ती झुकर्सच्या मोठ्या मुलाची पत्नी आहे, हे कुन्झलला त्यावेळी माहित नव्हतं. त्याने साओ पावलोमधल्या पर्यटन व्यवसायाबद्दल तिला विचारलं. तिला त्याबद्दल काही खास माहिती नव्हती. तिने झुकर्सकडे निर्देश करून कुन्झलला त्याला भेटायला सांगितलं.

कुन्झल झुकर्सच्या दिशेने गेला, आणि त्याने स्वतःची ब्राझीलमधल्या पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणारा एक ऑस्ट्रियन गुंतवणूकदार अशी ओळख करून दिली. झुकर्स कुन्झलच्या प्रश्नांना तुटकपणे उत्तरं देत होता. कुन्झलने त्याच्या विमानातून साओ पावलो शहरावरून एक फेरफटका मारायची इच्छा प्रदर्शित केली. त्या दिवशी कोणी इतर लोक नसल्यामुळे झुकर्स आणि कुन्झल यांना विमानामध्ये आणि नंतर जेट्टीवर भरपूर गप्पा मारता आल्या. कुन्झल गोष्टीवेल्हाळ होताच. बोलता बोलता त्याने झुकर्सला आपण युद्धात रशियन आघाडीवर लढलो असल्याचं सांगितलं. झुकर्सकडे युद्धातले अनेक किस्से आणि गोष्टी होत्या. तो बोलत असताना कुन्झल त्याचं निरीक्षण करत होता. झुकर्सचा पायलटचा गणवेश बऱ्यापैकी जुना वाटत होता. विमानातल्या सीट्स फाटलेल्या होत्या. काहींमधून स्पंज बाहेर आला होता. एकंदरीत त्याचं काही बरं चाललेलं नाही हे समजून येत होतं.

कुन्झलने ताबडतोब बोलण्याची दिशा बदलली. त्याने आपल्या कंपनीने युरोप आणि मध्यपूर्व आशियामध्ये विकसित केलेल्या पर्यटन प्रकल्पांचं वर्णन केलं आणि तसंच काही आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये करायचं आहे असं सांगितलं, आणि या प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी आपल्याला जो विश्वासू माणूस लागेल, तो कुठे मिळेल असं झुकर्सला विचारलं. झुकर्सनेही स्वतःचं नाव लगेचच सांगितलं नाही.

त्याक्षणी कुन्झल उठला, “ मी निघतो. तुम्ही खूप कामात असणार. तुम्हाला त्रास देण्यासाठी माफ करा.”

झुकर्सही उठला आणि त्याने कुन्झलला थांबवलं, “अजिबात नाही. मला तुमच्या या प्रकल्पामध्ये रस आहे. तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा माझ्या घरी या!” कुन्झलला तेच हवं होतं. झुकर्स त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एखाद्या संधीच्या शोधात होता. ती संधी म्हणजे आपण आहोत हे त्याच्या मनावर ठसवण्यात आपण यशस्वी झालो आहोत अशी कुन्झलची खात्री पटली होती. मासा गळाला लागला होता, किंवा निदान गळाभोवती घिरट्या घालत होता. आता दोर हळूहळू खेचणं हे अत्यंत कौशल्याचं काम होतं.

त्याच रात्री आपल्या खोलीतून कुन्झलने इझराईलला एक गुप्त संदेश पाठवला – झुकर्सचे दिवस मोजायला सुरुवात झालेली आहे.

झुकर्सनेही त्या रात्री आपल्या डायरीमध्ये त्याला ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्या यादीत एक नाव लिहिलं – अँटन कुन्झल.

एका आठवड्यानंतर कुन्झल झुकर्सला भेटायला त्याच्या घरी आला. झुकर्सचं घर साओ पावलोच्या मध्यमवर्गीय भागात होतं. घर जरी साधं असलं तरी त्याच्याबाजूचा आणि खुद्द घरामधला बंदोबस्त अत्यंत कडेकोट आहे, हे कुन्झलला समजून चुकलं. त्याला झुकर्सला तसंही त्याच्या घरात आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर मारायचं नव्हतंच. झुकर्सने कुन्झलला संपूर्ण घर दाखवलं आणि आपला शस्त्रांचा खाजगी संग्रहदेखील. “स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते मला माहित आहे,” तो कुन्झलला हसतहसत म्हणाला. त्याच्यामागची गर्भित धमकी कुन्झलला जाणवली. पण त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला.

यानंतर एका आठवड्याने झुकर्सचा कुन्झलला अचानक फोन आला. झुकर्सने त्याला ब्राझीलमधल्या एका ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यात दोन दिवसांच्या सहलीवर यायचं आमंत्रण दिलं होतं. हे एवढं अचानक घडलं की कुन्झलला इझरेली वकिलातीत किंवा इतर कोणाशीही संपर्क साधून स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करायला वेळ मिळाला नाही.

दोघेही या सहलीवर गेले. झुकर्स प्रचंड खुशीत होता. कुन्झल तितकाच हादरला होता. आपण या सहलीवरून जिवंत परत येत नाही, झुकर्स बहुतेक आपल्याला या सहलीत संपवणार असं त्याला वाटायला लागलं होतं. पण झुकर्ससमोर त्याला तसं वागताही येत नव्हतं.

या सहलीदरम्यान अचानक झुकर्सला कुन्झलची नेमबाजी किती चांगली आहे ते बघायची लहर आली. त्याने कुन्झलला तसं आव्हान दिलं. त्याला बहुतेक कुन्झलचा रशियन आघाडीवर लढल्याचा दावा तपासून पाहायचा होता. सुदैवाने कुन्झल एक उत्कृष्ट नेमबाज होता, त्यामुळे तो झुकर्सची खात्री पटवू शकला. त्याला त्याच वेळी ठार मारावं असा विचार कुन्झलच्या मनात आला होता, पण तो ब्राझीलच्या ज्या भागात होता, त्याची त्याला काहीच माहिती नव्हती. शिवाय झुकर्सच्या कुटुंबियांना तो कुठे आणि कोणाबरोबर गेलाय हे माहित असणारच होतं. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असती आणि कुन्झल पकडला गेला असता, तर सगळंच मुसळ केरात गेलं असतं.

याच सहलीदरम्यान अजून एक प्रसंग घडला. संध्याकाळची वेळ होती. कुन्झल आणि झुकर्स एका भल्या मोठ्या शेतजमिनीला लागून असलेल्या घनदाट जंगलात होते. झुकर्स पूर्वी कधीतरी इथे शिकारीसाठी आला होता, असं त्याने कुन्झलला सांगितल्यावर कुन्झलचं विचारचक्र चालू झालं. कोणाची शिकार? ब्राझीलमध्ये नदीतल्या मगरींच्या कातडीला प्रचंड मागणी असल्यामुळे तशा मगरींची शिकार करायचा झुकर्सचा विचार होता. कुन्झलने हे ऐकल्यावर त्याच्या मनात भीती दाटून आली. बहुतेक आपल्याला मारून आणि मगरींना खायला घालून पुरावा नष्ट करायचा झुकर्सचा डाव असावा. पण तो महत्प्रयासाने शांत राहिला. शक्यतो झुकर्सच्या बाजूने किंवा पाठी चालायचा तो प्रयत्न करत होता. अचानक त्याच्या बुटात एक अणकुचीदार दगड घुसला. त्या दगडाने कुन्झलच्या बुटाचा एक खिळा निघाला आणि त्याने कुन्झलला दुखापत झाली.

पुढे चालणाऱ्या झुकर्सच्या जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्याने आपल्या खिशातून पिस्तुल काढलं. झालं, संपलं आता - कुन्झलच्या डोक्यात विचार आला. तो पूर्णपणे निःशस्त्र होता. त्याच्याबरोबर असलेल्या माणसाने पूर्वी अनेकांना मारलं होतं. अजून एकाला मारायला त्याला विचार करावा लागला नसता. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला पळून जाणंसुद्धा शक्य नव्हतं.

पण झुकर्सने ते पिस्तुल कुन्झलच्या हातात दिलं, “ याच्या दस्त्याने तो खिळा बुटामध्ये नीट ठोक,” तो म्हणाला.
त्या रात्री ते दोघेही तंबूमध्ये झोपले. झुकर्सने त्याच्या उशीखाली पिस्तुल ठेवल्याचं कुन्झलने पाहिलं. ऐन मध्यरात्री झुकर्स आपल्या उशीखालचं पिस्तुल काढतोय हे त्याला दिसलं. त्याचा श्वास रोखला गेला, पण कुन्झल पिस्तुल घेऊन बाहेर लघुशंकेला गेलेला पाहिल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ते परत साओ पावलोला परत गेले, तेव्हा कुन्झलने सुटकेचा निःश्वास सोडला.

पुढचा आठवडा कुन्झलने झुकर्सला जवळजवळ दररोज भेटून साओ पावलोमधल्या वेगवेगळ्या रेस्तराँ, बार्स आणि नाईटक्लब्जमध्ये जायचा सपाटा लावला. झुकर्सची या सगळ्या ठिकाणी जाताना होणारी अधाशी नजर त्याने बरोब्बर हेरली होती. एकेकाळी, जेव्हा झुकर्सचा व्यवसाय चांगला चालत होता, तेव्हा अशा ठिकाणी जाणं हे त्याच्यासाठी काही विशेष नव्हतं. पण आता त्याची आर्थिक स्थिती ढासळलेली होती. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी अप्राप्य झाल्या होत्या.

त्याच्या पुढच्या आठवड्यात कुन्झलने झुकर्सला उरुग्वेची राजधानी माँटेव्हिडिओला बोलावलं. त्याच्या कंपनीला साओ पावलोमधली ऑफिसेस खूप महाग वाटली होती आणि त्यामुळे तुलनेने स्वस्त असलेल्या माँटेव्हिडिओमध्ये आपलं ऑफिस असावं असा त्यांचा विचार आहे असं कारण कुन्झलने दिलं होतं.

झुकर्सला संशय येऊ नये म्हणून कुन्झल स्वतः आधी तिथे गेला. आता या मोहिमेमधली सर्वात महत्वाची वेळ आली होती. जर झुकर्स माँटेव्हिडिओला आला नसता, तर या सगळ्या योजनेवर आणि मेहनतीवर पाणी पडलं असतं. झुकर्ससुद्धा द्विधा मनःस्थितीत होता. त्याच्या कुटुंबियांचं आणि पोलिसांचंही त्याने जाऊ नये असंच म्हणणं होतं. शेवटी आपल्या जुन्या संपन्न आयुष्याकडे जाण्याची संधी सोडता कामा नये असा विचार करून झुकर्स माँटेव्हिडिओला आला. कुन्झलच्या आणि इतर इझरेली एजंट्सच्या डोक्यावरचं मोठं दडपण दूर झालं होतं. ऑफिससाठी जागा पाहण्याच्या नावाखाली कुन्झलने झुकर्सचं चांगलंच आदरातिथ्य केलं. आठवडा संपल्यावर आपल्याला युरोपमध्ये परत जावं लागेल असं सांगून कुन्झल माँटेव्हिडिओहून व्हिएन्ना आणि तिथून पॅरिसला गेला आणि झुकर्स ब्राझीलला परत गेला.

पॅरिसमध्ये कुन्झल आणि यारीव्ह यांनी झुकर्सच्या मृत्यूची योजना आखायला सुरुवात केली. झुकर्सला माँटेव्हिडिओमध्येच उडवावं या मुद्द्यावर दोघांचं एकमत होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे उरुग्वेमध्ये मृत्युदंड नव्हता आणि ब्राझीलमध्ये होता. झालंच तर ब्राझीलमध्ये स्थानिक पोलिस झुकर्सच्या बाजूचे होते. उरुग्वेमध्ये तसं काही नव्हतं. शिवाय, उरुग्वेमध्ये ज्यूंची संख्या अगदीच कमी होती, आणि फॅसिस्ट संघटनादेखील नव्हत्या. त्यामुळे झुकर्सच्या मृत्यूनंतर ज्यूंना त्रास झाला नसता. ब्राझीलमध्ये ज्यू भरपूर होते आणि फॅसिस्ट आणि नवनाझी संघटनादेखील होत्या.

झुकर्सला मारण्यासाठी जी टीम यारीव्हने बनवली होती, त्यात पाच एजंट्सचा समावेश होता. यारीव्ह स्वतः या टीमचा प्रमुख होता. बाकीचे सदस्य होते – झीव्ह अमित (मोसाद संचालक मायर अमितचा पुतण्या), अॅरी कोहेन, एलीझेर शॅरॉन आणि अँटन कुन्झल उर्फ यित्झाक सारीद. कुन्झलप्रमाणे शॅरॉनकडेही ऑस्ट्रियन पासपोर्ट होता आणि त्याच्यावर त्याचं नाव होतं ओस्वाल्ड टॉसिग.

या टीमचे सगळे सदस्य उरुग्वेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आले. सर्वात पहिल्यांदा टॉसिग आला. त्याने एक हिरवी फोक्सवॅगन गाडी भाड्याने घेतली आणि कासा क्युबेर्तिनी हे घरही भाड्याने घेतलं. हे घर कारास्को या गजबजलेल्या भागात होतं. यारीव्हने त्याच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली होती – झुकर्सच्या मापाची शवपेटी बनवून घ्यायची.
सगळे येऊन पोहोचल्यावर कुन्झलने झुकर्सला परत एकदा माँटेव्हिडिओला यायचं आमंत्रण दिलं. झुकर्सने परत एकदा पोलिसांचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सल्ला घेतला. सर्वांचं मत यावेळीही तेच होतं – त्याने जाऊ नये. त्याच्या जीवाला धोका असू शकतो. गेल्या वेळी तो नशिबाने वाचला. या वेळी कदाचित असं होणार नाही.

शेवटी झुकर्सने जाण्याचा निर्णय घेतला. आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो याबद्दल त्याला विश्वास होताच. शिवाय कुन्झल हा आपले जुने आणि चांगले दिवस परत येण्याच्या मार्गावरची एक शिडी आहे याबद्दल त्याची आता खात्री पटली होती आणि आपल्या भीतीपायी एवढी चांगली संधी हातची जाऊ द्यायला झुकर्स तयार नव्हता.

२३ फेब्रुवारी १९६५ या दिवशी झुकर्स माँटेव्हिडिओच्या विमानतळावर विमानातून उतरला. कुन्झल त्याच्या स्वागतासाठी गाडी घेऊन तिथे गेला होता. झुकर्सला संशय येऊ नये म्हणून कासा क्युबेर्तिनीकडे येण्याआधी कुन्झलने झुकर्सला ऑफिससाठी पाहून ठेवलेल्या दोन-तीन जागांवर नेलं आणि तिथल्या लोकांशी झुकर्सची ओळख कंपनीच्या दक्षिण अमेरिका ऑपरेशन्सचे प्रमुख अशी करून दिली. झुकर्सही त्यामुळे खुश झाला आणि थोडा सैलावला.

शेवटी साधारण संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दोघेही कासा क्युबेर्तिनीपाशी आले. टॉसिगची हिरवी फोक्सवॅगन तिथे उभी होती आणि तिचे सगळे दरवाजे आणि काचा बंद होत्या. याचा अर्थ टीमचे सगळे सदस्य आत घरात होते आणि कुन्झलची आणि त्यांच्या शिकारीची वाट पाहात होते. बाजूच्या घरामध्ये दुरूस्तीचं काम चालू होतं. तिथल्या कामगारांच्या ठोकाठोकीचा एकसुरी आवाज येत होता.

दरवाजा उघडून कुन्झल आत गेला आणि तोपर्यंत प्रवासाने आणि नंतरच्या फेरफटक्याने थोडा दमलेला झुकर्स आत आला. तो आत येण्याचीच वाट पाहात असलेल्या कुन्झलने ताबडतोब दरवाजा बंद केला.

आतमधलं दृश्य मोठं विलक्षण होतं. यारीव्ह, कोहेन, अमित आणि शॅरॉन हे चौघेही तिथे अंधारात उभे होते. प्रत्येकाच्या अंगावर फक्त एक अर्धी चड्डी होती. झुकर्स सहजासहजी स्वतःला मारू देणार नाही, थोडीतरी झटापट होणारच आणि त्यात कपडे रक्ताने खराब होऊ नयेत हा यामागचा हेतू होता.

झुकर्सला काही कळून त्याने दरवाज्याकडे वळायच्या आत चौघांनी त्याच्यावर झडप घातली. अमितने त्याचा गळा धरला, यारीव्हने तोंडावर हात दाबून धरले आणि बाकीच्या दोघांनी त्याचे दोन्हीही हात धरायचा प्रयत्न केला.
झुकर्स त्यावेळी ६५ वर्षांचा होता, पण तो फिट होता आणि स्वतःच्या जीवासाठी लढत होता. त्याने प्रतिकार केला. एका बाजूला तो दरवाज्याकडे झेपावत होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचे हात धरणाऱ्या माणसांना ढकलत होता. यारीव्हने त्याच्या तोंडावर दाबून धरलेल्या हाताला तो जोरात चावला. यारीव्ह वेदनेने कळवळत मागे झाला आणि त्याने झुकर्सच्या तोंडावरचा हात काढून घेतला. याच दरम्यान कुन्झलने त्याच्या सुटाच्या खिशातून एक उझी मशीनपिस्तुल काढलं आणि त्याला सायलेन्सर लावून झुकर्सच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या.

झुकर्सचं शरीर एकदम ढिलं पडलं. त्याच्या डोक्यातून आणि शरीरावर झालेल्या इतर जखमांतून वाहणारं रक्त, त्याच्याशी झुंजणाऱ्या टीमच्या सदस्यांच्या अंगाला लागलेलं रक्त असा एकच चिखल तिथे झाला होता. त्यातल्या त्यात कुन्झलच्या अंगावर स्वच्छ कपडे होते. त्याने बाहेर जाऊन बागेत असलेल्या मोठ्या नळाला एक होजपाईप जोडला आणि जिथे जिथे रक्ताचे डाग पडले होते ते भाग धुवून काढले.

यारीव्हच्या मूळ योजनेनुसार ते झुकर्सला बंदी बनवणार होते आणि त्याला त्याच्यावरचे आरोप ऐकवणार होते. तो कशासाठी आणि कुणाच्या हातून मरतोय हे त्याला समजायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांनी झुकर्सच्या शारीरिक ताकदीचा बांधलेला अंदाज सपशेल चुकल्यामुळे हे होऊ शकलं नाही. पण झुकर्स मरण पावल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असं म्हणता येत होतं.

झुकर्सचा मृतदेह एजंट्सनी शवपेटीत ठेवला. त्याला उरुग्वेच्या बाहेर घेऊन जायची त्यांची योजना असावी असा पोलिसांचा समज व्हावा यासाठी हे केलं गेलं.

त्यानंतर त्यांनी तिथे एक टंकलिखित पत्र ठेवलं. त्याचा मजकूर साधारण असा होता – या माणसाने, ज्याचं नाव हर्बर्ट्स झुकर्स आहे, त्याने २५,००० पेक्षा जास्त ज्यूंची सामुहिक हत्या केलेली आहे. त्यामुळे त्याला ‘जे कधीही विसरणार नाहीत’ अशा लोकांनी ही मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. पत्रावर त्याच दिवशीची – २३ फेब्रुवारी १९६५ ही तारीख होती.

बाजूच्या घरात चालू असलेल्या ठोकाठोकीमुळे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीच्या आवाजामुळे कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष गेलेलं नव्हतं.

सगळ्या एजंट्सनी त्याच दिवशी उरुग्वेहून चिले आणि तिथून अमेरिकेत आणि तिथून युरोपच्या दिशेने प्रस्थान केलं. ते सुरक्षित असल्याची खात्री पटल्यावर एका मोसाद एजंटने २७ फेब्रुवारी १९६५ या दिवशी der Spiegel या जर्मन नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये निनावी फोन करून ही बातमी दिली.

झुकर्सच्या मृत्यूनंतर उरुग्वे आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या पोलिसांनी अँटन कुन्झलचं झुकर्सच्या कॅमेऱ्यातल्या फिल्मवर असलेलं छायाचित्र सगळीकडे जारी केलं. झुकर्सच्या कुटुंबाची कुन्झलच खुनी आहे याबद्दल इतकी खात्री होती, की त्यांनी ब्राझीलमधल्या कोर्टात कुन्झलला इझराईलमधून प्रत्यार्पित करावं याबद्दल याचिका दाखल केली, जी यथावकाश पुराव्याअभावी फेटाळण्यात आली.

झुकर्सला मारण्याचा मूळ उद्देश अपेक्षेपेक्षा जास्त सफल झाला. पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि इटली या देशांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान झालेल्या नाझी अत्याचारांबद्दल जे खटले चालवले जातील, त्यांच्यावर कोणतीही कालमर्यादा असणार नाही, हे स्पष्ट केलं आणि ही कालमर्यादा निश्चित करणारी विधेयकं मागे घेण्यात आली. त्यामुळेच क्लाउस बार्बीसारख्या क्रूरकर्म्यांवर १९८० च्या दशकातही खटला दाखल होऊ शकला.

क्रमशः

संदर्भ –
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-
Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements

काही प्रताधिकारमुक्त फोटो -

हर्बर्ट्स झुकर्स

हर्बर्ट्स झुकर्स

फ्रेडरिक जेकेल्न

फ्रेडरिक जेकेल्न

अँटन कुन्झल उर्फ यित्झाक सारीद

अँटन कुन्झल उर्फ यित्झाक सारीद

मोसाद - भाग १०

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मार्गी's picture

18 Mar 2016 - 1:37 pm | मार्गी

अतिशय जोरदार!!!

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2016 - 1:39 pm | पिलीयन रायडर

थरारक!!! ह्यावेळी लवकर भाग टाकल्याबद्दल धन्यवाद!

प्रचेतस's picture

18 Mar 2016 - 1:41 pm | प्रचेतस

हा भागही खूप चित्तथरारक.
ह्या हर्बर्ट्स झुकर्सबद्दल आधी काहीच माहित नव्हतं.

बाकी कालच मोसादचा माजी डायरेक्टर मीर दागानचं (२००२-२०११) आजारपणानं निधन झालं ही बातमी आज वाचली.

नि३सोलपुरकर's picture

18 Mar 2016 - 2:23 pm | नि३सोलपुरकर

"बाकी कालच मोसादचा माजी डायरेक्टर मीर दागानचं (२००२-२०११) आजारपणानं निधन झालं ही बातमी आज वाचली."

बाकी ती बातमी वाचताच मिपावरील ह्या लेखमालेची आठवण झाली .

मार्मिक गोडसे's picture

18 Mar 2016 - 2:29 pm | मार्मिक गोडसे

झुकर्सनेही त्या रात्री आपल्या डायरीमध्ये त्याला ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्या यादीत एक नाव लिहिलं – अँटन कुन्झल.

ह्या वाक्याने अंगावर काटाच आला. पक्का धूर्त माणूस.

त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण होती, पण तरीही त्याने डोळ्यांचा नंबर जाणून घेण्यासाठी जी टेस्ट असते, त्यात खोटी उत्तरं दिली. परिणामी त्याला एकदम जाड भिंगांचा चष्मा घ्यायला लागला

.
असं डोळ्याच्या डॉ.ना फसवता येत नाही. चुकीच्या नंबरच्या चष्म्याने वावरण्यास उलट अधिक त्रास होतो. मग त्याने असं का केलं असेल?

मोदक's picture

18 Mar 2016 - 2:38 pm | मोदक

जबरदस्त..!!!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!

स्पा's picture

18 Mar 2016 - 2:44 pm | स्पा

झुकर्स>>>>>

साल्याला फारच सुखद मरण आले , दोनच गोळ्यांमध्ये
अशा माणसांना भयानक तडपवून वर्षानुवर्षे आत्यंतिक छळ करून , हाल हाल करून मारायला हवे

अद्द्या's picture

18 Mar 2016 - 2:58 pm | अद्द्या

मस्तच

अत्रन्गि पाउस's picture

18 Mar 2016 - 2:59 pm | अत्रन्गि पाउस

अप्रतिम !!

नाखु's picture

18 Mar 2016 - 4:51 pm | नाखु

थरारक पण इतका सहज मृत्यु या क्रूरकर्म्याला नव्हता पाहिजे. त्याला किमान कळायला पाहिजे होते मारणारे आणि पापाचा घडा वाचणारे जमल्यास त्याचे निवेदन ( अर्थात त्या वेळेस टेप रेकॉर्डरचा शोध लागला होता का माहीत नाही) आणि कबुली त्याच्या नराधम साथीदारांचे नावा सहीत.

कडक सलाम तुमच्या लेखनशैलीला आणि व्यासंगाच्या वेडाला..

दहा चिखल-धुराळी धागे मिपाकर का सहन करतो, त्याला ही मालीका उत्तर आहे.

नितवाचक नाखु

नया है वह's picture

18 Mar 2016 - 4:55 pm | नया है वह

मस्त लेखमाला!

राजाभाउ's picture

18 Mar 2016 - 5:37 pm | राजाभाउ

नेहमी प्रमाणे ज ब र द स्त.

सुबोध खरे's picture

18 Mar 2016 - 7:34 pm | सुबोध खरे

+१००

आरामात मेला म्हातारा होऊन दोन गोळ्यांमध्ये :(
मिपावरच्या सर्वोत्तम मालिकांपैकी एक मोसाद आहे यात तुम्ही शंकाच ठेवलेली नाही!
धन्यवाद.

एकनाथ जाधव's picture

18 Mar 2016 - 6:40 pm | एकनाथ जाधव

पु.भा.प्र.

संदिप एस's picture

18 Mar 2016 - 7:24 pm | संदिप एस

मिपावरच्या सर्वोत्तम मालिकांपैकी एक मोसाद आहे यात तुम्ही शंकाच ठेवलेली नाही!
धन्यवाद.>> +११११११११

राघवेंद्र's picture

18 Mar 2016 - 10:29 pm | राघवेंद्र

मिपावरच्या सर्वोत्तम मालिकांपैकी एक मोसाद आहे यात तुम्ही शंकाच ठेवलेली नाही!

होबासराव's picture

18 Mar 2016 - 7:54 pm | होबासराव

.

स्वीट टॉकर's picture

18 Mar 2016 - 7:57 pm | स्वीट टॉकर

एकदा वाचायला लागलं की अजिबात थांबता येत नाही. येत राहू द्यात!

स्पार्टाकस's picture

18 Mar 2016 - 9:28 pm | स्पार्टाकस

बोक्या,

नाझी हंटर्स ही नेटफ्लिक्सवर असलेली डॉक्युमेंट्री पाहिली नसल्यास नक्की पहा. या डॉक्युमेंट्रीचा एक पूर्ण भाग या हर्बट चकर्स (उल्लेख असाच आहे त्यात) वर आणि मोसादने त्याला टपकवण्याच्या केलेल्या या ऑपरेशनवर आहे. त्यात अँटन कुन्झेलचा इंटरव्ह्यूही आहे.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2016 - 12:23 pm | अत्रन्गि पाउस
अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 12:21 am | अभ्या..

जबरदस्त.
असे गाठून मारायाच्याच शिक्षेला पात्र होते हे.
मोसाद मोसाद है भौ.

मी-सौरभ's picture

19 Mar 2016 - 2:20 am | मी-सौरभ

आवडेश

आणि ना खु काकांशी सहमत

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2016 - 2:28 am | श्रीरंग_जोशी

या लेखमालिकेतील इतर भागांप्रमाणेच हा ही भाग उत्तम आहे.

आपल्यासारख्याच इतर माणसांना इतक्या मोठ्या प्रमाणात क्रुरपणे मारून कुठल्याही अपराधभावनेशिवाय हर्बर्ट्स झुकर्सरासखी माणसे जगूच कशी शकतात हा प्रश्न ही मालिका वाचताना पडत राहतो :-( .

सामान्य वाचक's picture

19 Mar 2016 - 9:00 am | सामान्य वाचक

या इसमाबद्दल ऐकले नव्हते

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 9:37 am | सतिश गावडे

ही लेखमाला वाचताना वाटते की ज्यू धर्मीय हा मानवी इतिहासातील सर्वात दुर्दैवी मानवी समूह असावा.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:47 pm | मितभाषी

धन्या असे का वाटते?

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:50 pm | मितभाषी

उद्या कदाचित भारतातही मोसादसारखी टिम तयार होउ शकते.
आणि ती कोणाच्या विरोधात असेल ते सर्वविदीत आहे.

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2016 - 2:05 pm | टवाळ कार्टा

आहेत....अफ्रिकन्स

फारच छान. धन्यवाद बोकेभाउ !

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 6:03 pm | जव्हेरगंज

खणखणीत हो बोकाभाऊ!!

पुभाप्र !!

रंगासेठ's picture

21 Mar 2016 - 3:55 pm | रंगासेठ

हा पण भाग मस्त झालाय.

अभिजित - १'s picture

22 Mar 2016 - 1:07 pm | अभिजित - १

मस्त ..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2016 - 11:32 pm | निनाद मुक्काम प...

यहुदी वंशात गांधी जन्मले नाही हे त्याचे सुदैव आहे
कृरकार्म्यास देहांतशासन देणे त्यातही त्याच्या मानवी मुल्ये अधिकाराविषयी बाष्कळ गप्पा न मारणाऱ्या यहुदी वंशाचा मला अभिमान वाटतो .
मोदिजी ह्या वर्षी त्याच्या पवित्र भूमीला भेट देतील तेव्हा भारताशी त्यांचे नाते अजूनच घट्ट होईल ह्यातच शंकाच नाही
मालिका मस्त चालली आहे .

जयंत कुलकर्णी's picture

24 Mar 2016 - 3:18 pm | जयंत कुलकर्णी

आज सगळे भाग एकदम वाचून काढले. मस्त........ हे सर्व माहीत असले तरीही तुमच्या लेखणीमुळे मजाच आली...आणि यातच तुमच्या लेखनाचे यश आहे.....

बोका-ए-आझम's picture

24 Mar 2016 - 6:25 pm | बोका-ए-आझम

तुमच्याकडून शाबासकी मिळाली! लिहिल्याचं सार्थक झालं!

पैसा's picture

24 Mar 2016 - 6:57 pm | पैसा

इतक्या लोकांना जिवे मारून कोणीही वीस वर्षे सुखात कसा राहू शकतो हे कळत नाही.

इष्टुर फाकडा's picture

24 Mar 2016 - 10:53 pm | इष्टुर फाकडा

धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

25 Mar 2016 - 10:46 am | सुधीर कांदळकर

एवढी सुंदर, थरारक, रोमांचकारी, खिळवून ठेव्अणारी लेखलामा.

पुभाप्र.

पक्षी's picture

25 Mar 2016 - 11:20 am | पक्षी

अतिशय थरारक

पद्मावति's picture

28 Mar 2016 - 2:26 pm | पद्मावति

मिपावरच्या सर्वोत्तम मालिकांपैकी एक मोसाद आहे यात तुम्ही शंकाच ठेवलेली नाही!

..खरंय अगदी.

स्नेहश्री's picture

28 Mar 2016 - 3:28 pm | स्नेहश्री

पुढच्या भागाची वाट बघत आहे.

urenamashi's picture

29 Mar 2016 - 8:55 pm | urenamashi

Ekadam Sahiiiii.....

हकु's picture

7 Apr 2016 - 5:56 pm | हकु

झुकर्सनेही त्या रात्री आपल्या डायरीमध्ये त्याला ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्या यादीत एक नाव लिहिलं – अँटन कुन्झल.

हे वाचताना जाम मजा आली!!!

अरिंजय's picture

7 Apr 2016 - 11:29 pm | अरिंजय

संपुर्ण लेखमालाच अप्रतिम आहे. विषय पण जबरदस्त आहे. भारतामध्ये मोसादसारख्या संघटनेची गरज आहेच. आम्ही काम करायला तयार आहोत. पुढील भाग येणार आहेत का? वाट बघतोय.

बोका-ए-आझम's picture

8 Apr 2016 - 9:05 am | बोका-ए-आझम
rahul ghate's picture

10 Apr 2016 - 10:42 am | rahul ghate

खरच ज्यू लोकांच्या सहनशीलता , धाडस व आपल्या धर्म चा जाज्वल्य अभिमान तीन हि गोस्तीना सलाम .