मोसाद - भाग २

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
23 Dec 2015 - 12:40 am


.
स्थापना झाल्यापासून लगेचचा काळ हा मोसादसाठी अनेक कारणांमुळे खडतर होता. सुरुवातीच्या काळात घडलेल्या दोन प्रकरणांमुळे मोसादची नाचक्की होऊ शकली असती पण संघटनेच्या आणि देशाच्या नेत्यांनी दाखवलेल्या धडाडी, निर्णयक्षमता आणि चिवटपणा या गुणांमुळे मोसादला या प्रसंगांमधून तावून सुलाखून बाहेर पडता आलं.
पहिलं प्रकरण म्हणजे इसेर बीरीचं. १९०१ मध्ये जन्मलेला इसेर बीरी हा हॅगन्हाचा सदस्य होता. १९४७ मध्ये तो हॅगन्हाची गुप्तचर संघटना असलेल्या ‘ शाई ‘ मध्ये भरती झाला आणि १९४८ मध्ये तिथे प्रमुखही झाला. उंच आणि सडपातळ असलेल्या बीरीच्या चेहऱ्यावर नेहमी एक खिन्न हसू असे. त्याच्या समर्थकांसाठी बीरी म्हणजे अत्यंत प्रामाणिक, अतिशय कमी गरजा असलेला पण कर्तव्यकठोर असा माणूस होता मात्र त्याच्या विरोधकांच्या मते तो अत्यंत महत्वाकांक्षी, निष्ठुर, आत्मकेंद्रित आणि असुरक्षित होता. हैफा शहरामध्ये त्याची स्वतःची एक बांधकाम साहित्य बनवणारी कंपनी होती. अर्थात, हा कंपनीचा मुख्य व्यवसाय जरी असला तरी कंपनी हॅगन्हासाठी छोटी शस्त्रंसुद्धा बनवत असे. बीरीची आर्थिक परिस्थिती चांगली होती, आणि तो त्याच्या पत्नी आणि मुलाबरोबर समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या बात गालीम नावाच्या गावात एका छोटेखानी बंगल्यात राहात असे.

शाईच्या प्रमुखपदी नेमणूक झाल्यावर बीरीवर सैनिकी हेतूंसाठी लागणारी गुप्त माहिती मिळवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्या वेळी पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी आणि पॅलेस्टिनी अरबांनी धुडकावून लावलेला होता आणि यादवी युद्धाला सुरुवात झालेली होती. इझराईलने मे १९४८ मध्ये स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केल्यावर शाई आणि हॅगन्हा या दोन्ही संघटना विसर्जित करण्यात आल्या. हॅगन्हाचं रुपांतर इझराईलच्या सैन्यदलात करण्यात आलं आणि शाईला नवीन नाव मिळालं – अमान. इझराईलची सैनिकी गुप्तचर संघटना. तिचं प्रमुखपद बीरीकडेच राहिलं.

त्यानंतर काही विचित्र आणि संपूर्ण देशाला हादरवणा-या घटना घडल्या. हैफा शहरापासून जवळ असलेल्या माउंट कार्मेल या ठिकाणी काही ट्रेकर्सना एक अर्धवट जळालेलं प्रेत मिळालं. कोणीतरी गोळ्या झाडून त्या माणसाची हत्या केलेली होती. प्रेताजवळ मिळालेल्या काही धागादो-यांवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्याचं नाव होतं अली कासीम आणि तो शाईच्या अरब हेरांपैकी एक होता. त्याच्या मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्यावर त्याला पूर्ण जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याजवळ बहुतेक पुरेसं पेट्रोल नसल्यामुळे कासीमचं प्रेत अर्धवटच जळलं होतं.

यानंतर काही आठवड्यांनी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनबरोबर एका अत्यंत महत्वाच्या आणि गुप्त अशा मीटिंगमध्ये बीरीने बेन गुरियनच्या मपाई या पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्यावर तो देशद्रोही आणि ब्रिटीशांचा एजंट असल्याचा गंभीर आरोप केला. या नेत्याचं नाव होतं अब्बा हुशी. हा आरोप ऐकल्यावर बेन गुरियनचं धाबं दणाणलं. पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईन ब्रिटीश साम्राज्याचा भाग होतं. तेव्हा झिओनिस्ट ज्यूंनी ज्यूंवर असलेल्या बंधनांविरुद्ध आवाज उठवला होता. ब्रिटिशांनीही त्यांचे हेर ज्यू समाजात घुसवण्याचा प्रयत्न केला होता. पण अब्बा हुशीसारखा मोठा नेता ब्रिटीशांचा हेर? बेन गुरियनची पहिली प्रतिक्रिया बीरीने केलेले सर्व आरोप धुडकावून लावण्याचीच होती. पण बीरीने ब्रिटीश हेरखात्याने अब्बा हुशीसाठी पाठवलेली दोन गुप्त पत्रं बेन गुरियनच्या समोर ठेवून अब्बा हुशीविरुद्ध बिनतोड पुरावा सादर केल्यावर त्यालाही काय बोलावं ते सुचेना.

त्याच सुमारास बीरीने ज्युल्स अॅमस्टर नावाच्या एका माणसाला अटक करण्याचा आपल्या सहाय्यकांना आदेश दिला. अॅमस्टर आणि हुशी हे जवळचे मित्र होते. अॅमस्टरला अटक झाल्यावर हैफापासून जवळ असलेल्या आत्लीत या ठिकाणी असलेल्या एका मिठाच्या खाणीवर ठेवण्यात आलं. तिथे मोजून ७६ दिवस त्याचा प्रचंड छळ करण्यात आला. कारण एकच. त्याने अब्बा हुशी देशद्रोही असल्याचं मान्य करावं. अॅमस्टर जरी अब्बा हुशीचा मित्र असला, तरी त्याला हुशीच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्याने आपल्याला कुठलीही माहिती असल्याचा इन्कार केला. त्याच्याकडून काही मिळत नाही हे समजल्यावर बीरीने त्याला सोडून द्यायचा आदेश दिला.

अॅमस्टरच्या अटकेनंतर घडलेली एक घटना हा तर कळस होता. ३० जून १९४८ या दिवशी तेल अवीवच्या गजबजलेल्या बाजारात कॅप्टन मायर तुबियान्स्की हा सैन्यातला एक अधिकारी आपल्या कुटुंबियांसमवेत खरेदी करत होता तेव्हा अचानक अमानच्या लोकांनी त्याला अटक केली आणि ते त्याला बेथ गिझ नावाच्या एका नुकत्याच इझरेली सैन्याच्या ताब्यात आलेल्या एका अरब खेड्यात घेऊन गेले. अमानला असा संशय होता की तुबियान्स्कीने जेरुसलेममध्ये त्याची नियुक्ती झालेली असताना इझरेली सैन्याच्या हालचालींविषयी अत्यंत गुप्त माहिती एका ब्रिटीश नागरिकाला दिली होती. हा नागरिक ट्रान्सजॉर्डनचा हेर होता आणि त्याने ती माहिती जॉर्डेनियन सैन्याला दिली होती. त्यामुळे जॉर्डेनियन सैन्याच्या तोफखान्याने इझरेली सैन्यावर अगदी अचूक हल्ला चढवला होता आणि इझरेली सैन्याचं मोठं नुकसान – मनुष्यबळ आणि साधनसामग्री या दोन्हीच्या अनुषंगाने – झालं होतं. तिथल्या तिथे कोर्ट मार्शल करून तुबियान्स्कीवर हे गंभीर आरोप करण्यात आले. त्याला त्याच्या बचावासाठी काहीही बोलण्याची संधी देण्यात आली नाही. कोर्ट मार्शलच्या नियमांप्रमाणे (इझरेली सैन्याने हे नियम ब्रिटीश सैन्याच्या नियमांप्रमाणे बनवलेले होते) आरोपी अधिकाऱ्याला आपल्या एखाद्या सह-अधिकाऱ्याला आपला वकील म्हणून नियुक्त करण्याचा हक्क होता. पण तुबियान्स्कीला हा हक्क नाकारण्यात आला. त्याच्यावर अरबांसाठी हेरगिरी करून देशद्रोह ठेवण्याचा आरोप ठेण्यात आला, तो सिद्ध झालाय असं जाहीर करण्यात आलं आणि त्याला वरच्या कोर्टात अपील करण्याची संधी वगैरे काहीही न देता मृत्युदंड देण्यात आला. एवढंच नाही, तर तो लगेच अंमलातही आणण्यात आला. बेथ गिझ ताब्यात घेणाऱ्या इझरेली सैनिकांमधून दहा जणांना फायरिंग स्क्वाड म्हणून निवडण्यात आलं आणि बाकीच्या सैनिकांसमोर त्यांनी तुबियान्स्कीला गोळ्या घातल्या. आपण कोणावर गोळ्या झाडतोय आणि का हेही त्या दहा सैनिकांना माहित नव्हतं. (आजतागायत इझराईलमध्ये नाझी क्रूरकर्मा अॅडॉल्फ आइकमन सोडला तर मृत्युदंड देण्यात आलेला मायर तुबियान्स्की हा एकमेव माणूस आहे.)

तुबियान्स्कीच्या कोर्ट मार्शल आणि मृत्युदंडामुळे आणि ज्या प्रकारे हा सगळा प्रकार झाला, त्यामुळे इझरेली सैन्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला. सरकारने ताबडतोब चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांना अली कासीमची हत्या, अब्बा हुशीविरुद्ध हेरगिरीचे पुरावे मिळणे आणि तुबियान्स्कीचं कोर्ट मार्शल यांच्यात एक गोष्ट समान आढळली. इसेर बीरी. अली कासीम हा अरब लीगचा डबल एजंट किंवा दुहेरी हेर असल्याच्या केवळ संशयावरून बीरीने त्याची हत्या करवली होती. कासीम दुहेरी हेर असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता, तरीही.

अब्बा हुशीविरुद्ध पुरावे मिळणे हेही बीरीचंच कारस्थान होतं. बीरी आणि हुशी यांच्यात अमानच्या प्रमुखपदावरून चढाओढ होती. बीरीला हे प्रमुखपद मिळालं, पण हुशी आपल्याविरुद्ध कारवाया करेल आणि आपलं पद धोक्यात येईल या भीतीने बीरीने त्याला अडकवलं. जी पत्रं अब्बा हुशीच्या देशद्रोहाचा पुरावा म्हणून बीरीने बेन गुरियनच्या टेबलवर ठेवली होती, ती नकली होती, बनावट होती, सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे अमानमधल्या नकली कागदपत्रं बनवण्यात उस्ताद असलेल्या एका अधिकाऱ्याने बीरीला ही पत्रं बनवून दिली होती. या अधिकाऱ्याला जेव्हा तुबियान्स्कीच्या कोर्ट मार्शलबद्दल समजलं तेव्हा त्याला बीरीचा संशय आला आणि त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर आपल्या कृत्याची कबुली दिली. तुबियान्स्की निर्दोष असल्याचा पुरावा जरी मिळाला नसला तरी त्याच्यावर ठेवलेल्या आरोपाची पुनर्तपासणी केल्यावर असं आढळून आलं की ज्या दिवशी जॉर्डेनियन तोफखान्याने जेरुसलेमवर हल्ला केला असा आरोपपत्रात उल्लेख होता, त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे जॉर्डेनियन सैन्याने संपूर्ण दिवस युद्धबंदीचे निर्देश दिलेले होते. त्या दिवशी हल्ला तर सोडाच, एकही जॉर्डेनियन सैनिक आपल्या बराकीतून बाहेर पडलेला नव्हता.

बीरीच्या कृत्यांविरुद्ध एवढे पुरावे मिळाल्यावर बेन गुरियनने कारवाई करायचा निर्णय घेतला. बीरीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर सैनिकी आणि मुलकी अशा दोन्हीही कोर्टांमध्ये खटला चालवण्यात आला. दोन्हीकडे आरोप सिद्ध झाल्यावर त्याला अमानच्या प्रमुखपदावरून आणि इझरेली सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं, आणि त्याने आधी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला फक्त एक दिवसाच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

बीरीचेही पाठिराखे होतेच. या लोकांनी जेव्हा पंतप्रधान बेन गुरियनची भेट घेऊन बीरीसाठी रदबदली करायचा प्रयत्न केला, तेव्हा बेन गुरियनने त्यांना फक्त एकाच वाक्यात उत्तर दिलं – इझराईल म्हणजे सोविएत रशिया नव्हे.
या प्रकरणामुळे इझराईलच्या नेत्यांना एक मोठा धडा मिळाला, की अनिर्बंध सत्तेसाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे एक वटहुकुम काढून सर्व गुप्तचर संस्था या पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या अंतर्गत आणण्यात आल्या. बीरीच्या अनुभवामुळे नव्याने स्थापन झालेल्या मोसादच्या संचालकपदासाठी बेन गुरियनने काळजीपूर्वक एक असा माणूस निवडला, जो बीरीएवढाच अनुभवी होता पण त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज होती, अरेबिक भाषेवर प्रभुत्व होतं आणि पडद्यामागे राहून सूत्रं हलवण्याची आवड होती. शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे बेन गुरियनचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. या माणसाचं नाव होतं रूव्हेन शिलोह. डेव्हिड बेन गुरियनच्या बुद्धिबळातला वजीर!

जुन्या जेरुसलेम शहरात एका राब्बायच्या (ज्यू धर्मगुरू) घरी जन्माला आलेला रूव्हेन शिलोह हा मोसादचा पहिला संचालक. नेहमी कडक इस्त्रीचा सूट घालणारा आणि टापटीपीने राहणारा शिलोह इझराईलच्या निर्मितीआधी बरीच वर्षे इराकमध्ये एक पत्रकार आणि शिक्षक म्हणून राहात होता आणि तिथून त्याने ब्रिटीशांशी संधान बांधून हॅगन्हाची दोन कमांडो युनिट्स उभारली होती. यातलं एक युनिट हे प्रामुख्याने जर्मनीतून आलेल्या ज्यूंचं होतं. त्यांनी जर्मन शस्त्रास्त्रं वापरण्याचं आणि नाझी सैन्याप्रमाणे लढण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या वेळी दोस्त राष्ट्रांच्या सेना जर्मनीमध्ये इटली, फ्रान्स आणि पोलंड इथून शिरण्याचा प्रयत्न करत होत्या पण जर्मन प्रतिकार हा अत्यंत प्रखर होता. या कमांडो युनिट्सनी जर्मनीमध्ये जाऊन नाझी सैन्यात गोंधळ माजवून पुढे येणाऱ्या दोस्तांच्या सैन्याला वाट सुकर करून देण्याचं काम केलं होतं. दुसरं युनिट हे अरेबिक भाषेत पारंगत असलेल्या आणि अरब सैनिकांप्रमाणे लढण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या ज्यूंचं होतं. त्यांनी पॅलेस्टाईनमधल्या यादवी युद्धात आणि नंतर इझराईल निर्माण झाल्यावर अरब लीगशी झालेल्या युद्धात मोठीच कामगिरी बजावलेली होती. स्वतः शिलोहने सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये जाऊन अरब लीगच्या सैन्याचा पूर्ण बॅटल प्लॅन पळवून आणलेला होता.

गुप्तता या गोष्टीने शिलोह पछाडलेला आहे असे त्याचे मित्र आणि विरोधक हे दोघेही म्हणायचे. त्याच्यावरून मोसादमध्ये एक विनोद होता, की तो दररोज आपल्या घरून ऑफिसमध्ये येतानासुद्धा इतकी गुप्तता पाळतो, की ड्रायव्हरने जर विचारलं की कुठे जायचंय तर शिलोहचं उत्तर असतं, “गुप्ततेच्या कारणांमुळे मी ते तुला सांगू शकत नाही!”

१९४९ च्या डिसेंबरमध्ये मोसादची औपचारिक स्थापना करण्यात आली पण सुरुवातीपासूनच या नवीन संघटनेला अडचणींचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्रालयाच्या राजकीय विभागाचे लोक हे प्रामुख्याने अमेरिका किंवा ब्रिटन यासारख्या देशांमध्ये राहून आलेले लोक होते. मोसादच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पाळायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी पंतप्रधान बेन गुरियनच्या मध्यस्थीने हे ‘ बंड ‘ शमवण्यात आलं. जे अधिकारी मोसादच्या आदेशांचं उल्लंघन करतील किंवा त्यांचं पालन करणार नाहीत, त्यांना सरळ नोकरीवरून बडतर्फ करण्याची ताकीद देण्यात आली.

१९५१ मध्ये मोसादच्या पहिल्यावहिल्या ऑफिसर्सची बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली. या ऑफिसर्सना मोसादच्या परिभाषेत असलेला शब्द म्हणजे कात्सा (katsa). या बॅचसमोर शिलोहने त्याच्या मनातली मोसादची संकल्पना मांडली – कुठल्याही देशाच्या गुप्तचर संस्था जे काम करतात, ते तर आपण करणारच आहोत, पण त्याशिवाय आपल्यावर अजून एक जबाबदारी आहे, ती म्हणजे जगभरात पसरलेल्या ज्यू धर्मीयांचं संरक्षण.

मोसादने त्याच अनुषंगाने जगभरात जिथे जिथे ज्यू धर्मीय स्थानिक राजवटींचा अन्याय सहन करत आहेत, तिथे तिथे शस्त्रांचं वाटप, ती कशी चालवायची याचं प्रशिक्षण, अगदीच गरज भासली तर तिथल्या लोकांना इझराईलमध्ये आणण्याची व्यवस्था करणं अशा स्वरूपाच्या अनेक कामगिऱ्या केलेल्या आहेत. पण सर्वात पहिली अशा स्वरुपाची कामगिरी करतानाच मोसादला एक जबरदस्त फटका बसला.

२२ मे १९५१, बगदाद, इराक. बगदादमधला रशीद स्ट्रीट हा रस्ता म्हणजे भली मोठी बाजारपेठ. याच रस्त्यावर ओरोस्दी बाक नावाचं एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर होतं. या स्टोअरच्या पाश्चिमात्य कपड्यांच्या विभागात आसद नावाचा एक तरुण नेकटाईजच्या काउंटरवर सेल्समन म्हणून उभा होता. आसद पॅलेस्टाईनहून आलेला निर्वासित होता. बगदादमध्ये येण्याआधी तो एकर शहरात राहात होता. मार्च १९४८ मध्ये हॅगन्हाच्या सैनिकांनी एकर शहरातून अरबांना हुसकावून लावलं आणि आसद आणि त्याच्या कुटुंबाला घराबाहेर पडावं लागलं. तिथून बगदादला जाण्याआधी आसदला काही पैशांची गरज होती आणि अचानक एक संधी त्याच्यासमोर चालून आली. त्याचा एक दूरचा भाऊ एकरच्या सैनिकी गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये काम करत असे. तो अचानक आजारी पडला आणि त्याने आसदला त्याच्या जागी जायची विनंती केली. या ऑफिसचा ताबा आता इझरेली सैनिकांकडे होता आणि त्यांना कॉफी आणि इतर खाद्यपदार्थ देणं हे आसदचं काम होतं. त्यामुळे त्याने त्या ऑफिसमध्ये अनेकवेळा फेऱ्या मारल्या होत्या आणि अनेक अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना कॉफी आणि खाद्यपदार्थ नेऊन दिले होते.

त्या दिवशी आपल्या काउंटरमागे उभं राहून ग्राहकांना न्याहाळताना आसदला अचानक एक ओळखीचा चेहरा दिसला. पहिल्यांदा आपल्याला भास झाला असावा असं त्याला वाटलं पण नंतर त्याने त्या माणसाला दोन-तीन वेळा त्याच्यासमोरून जाताना पाहिलं, त्याचा आवाज ऐकला आणि त्याची खात्री पटली. त्याने या माणसाला इझरेली सैन्याच्या गणवेशात पाहिलं होतं. एकरमधल्या सैनिकी गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये. आसदच्या काउंटरवर फोन होता. तो उचलून त्याने सरळ पोलिसांना फोन लावला आणि आपण एका इझरेली सैन्याच्या अधिकाऱ्याला बगदादमध्ये पाहिल्याचं सांगितलं.

इझरेली सैन्याधिकारी म्हटल्यावर पोलिस ताबडतोब आले आणि त्यांनी त्या माणसाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या माणसाला अटक केली. हा दुसरा माणूस उंच, बारीक आणि जाड भिंगांचा चष्मा लावणारा होता. त्याने पोलिसांना आपलं नाव निसीम मोशे असं सांगितलं आणि आपण ज्युईश कम्युनिटी सेंटरमध्ये एक सामान्य कारकून आहोत आणि या माणसाला शहर दाखवतोय असं सांगितलं. पोलिस दोघांनाही हेडक्वार्टर्समध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी दोघांनाही वेगळं केलं आणि पोलिसांच्या ठरलेल्या पद्धतीने ‘ विचारपूस ’ करायला सुरुवात केली. निसीम मोशे आपली कथा बदलायला तयार नव्हता. त्याला जे कोणी विचारतील त्यांना तो आपण क्म्युनिटी सेंटरमध्ये कारकून आहोत आणि या दुसऱ्या माणसाने शहर फिरून दाखवणार का असं विचारलं आणि चांगले पैसे द्यायचं कबूल केलं – ही एकच कथा ऐकवत होता. शेवटी वैतागून इराकी पोलिसांनी त्याला उलटं टांगून मारहाण आणि विचारपूस करायला सुरुवात केली. तो तरीही काहीही सांगत नव्हता आणि त्या दुसऱ्या माणसाबद्दल त्याला काहीही माहिती नव्हतं.

एका आठवड्यानंतर पोलिसही वैतागले आणि त्यांनी निसीम मोशेला सोडून दिलं. इकडे तो दुसरा माणूस, ज्याला आसदने ओळखलं होतं, तो आपलं नाव इस्माईल साल्हून आहे आणि आपण इराणी आहोत असं सांगत होता. त्याच्याकडे इराणी पासपोर्टही होता. पण इराकी पोलीसही मूर्ख नव्हते. एकतर तो इराणी दिसत नव्हता आणि त्याला अस्खलित अरेबिक येत होती पण फारसी भाषेचा गंधही नव्हता. शेवटी त्यांनी आपला हुकुमाचा एक्का काढला. आसद आणि त्याला तुरुंगात समोरासमोर आणलं. आसदला पाहिल्यावर या स्वतःला इस्माईल म्हणवणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला आणि त्याने आपण कोण आहोत याची कबुली द्यायला सुरुवात केली.

त्याचं नाव होतं येहुदा तागार. तो इझरेली सैन्यात कॅप्टनच्या हुद्द्यावर होता. इराकी पोलिस त्याला त्याच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्यासमोर त्यांनी त्याच्या घराची कसून झडती घेतली आणि त्यात त्यांच्या हाताला घबाड लागलं. बगदादमध्ये अनेक वर्षांपासून अनेक ज्यू आणि इझरेली संघटना आणि हेरगिरी नेटवर्क्स कार्यरत होती. त्यातल्या काहींचा उद्देश हा इराकमधून ज्यूंना बाहेर काढून इझराईलमध्ये पोचवणं हा होता. काही नेटवर्क्स इराक, इराकी सैन्य आणि राजकीय परिस्थिती यांच्यावर लक्ष ठेवून होती आणि या संदर्भात माहिती मिळवणं, जमलं तर इराकी जनतेमधून इझराईलसाठी काम करू शकतील असे लोक हेरणं, त्यांचे कच्चे दुवे शोधून काढून त्यांना इझराईलसाठी काम करायला भाग पाडणं – अशी अनेक कामं आतापर्यंत बिनबोभाट चालली होती. काही नेटवर्क्स तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून कार्यरत होती. या सगळ्यांची माहिती असलेली एक फाईल इराकी पोलिसांना तागारच्या घरात सापडली. आता तागारचं तर काही खरं नव्हतंच पण बगदादमधल्या सगळ्या ज्यूंचा जीवही धोक्यात होता, कारण त्या फाईलमध्ये असा स्पष्ट उल्लेख होता, की काही अजून महत्वाची कागदपत्रं आणि इतर माहिती ही बगदादच्या मध्यभागात असणाऱ्या मासुदा शेम्तोव्ह सिनेगॉगमध्ये होती. तसाही इराकचा इझराईल आणि ज्यू यांच्यावर राग होताच. अरब लीगमधल्या देशांना इझराईलवर हल्ला करायला इराकनेच भरीला पाडलं होतं. युद्धबंदी झालेली असताना ‘अजून युद्ध संपलेलं नाही, आणि इझराईलच्या अंतापर्यंत संपणारही नाही ‘ असं इराकी नेत्यांनीच ठणकावलं होतं. त्यामुळे आता इराकमधल्या आणि विशेषतः बगदादमधल्या ज्यूंची अवस्था बिकट होणार होती.

सर्वात मोठा विरोधाभास हा होता, की येहुदा तागारला बगदादमध्ये पाठवण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोसादला बगदादमधली ही सगळी नेटवर्क्स तात्पुरती बंद करायची होती. त्यांचा आढावा घेऊन मग ती परत चालू करायची की नाही याचा निर्णय मोसादमधले वरिष्ठ घेणार होते, पण त्याच्या आधीच तागार पकडला गेला होता.

तागार बगदादमध्ये यायच्या आधी या सगळ्या नेटवर्क्समधला समन्वय साधणारा जो अधिकारी होता, त्याचं नाव होतं झाकी हवीव. हे अर्थातच खरं नाव नव्हतं. त्याचं खरं नाव होतं मोर्देचाई बेन पोरात. त्याचा जन्म इराकमध्ये झाला होता आणि तो इझराईलच्या निर्मितीपूर्वी शाईमध्ये काम करत होता. तागार बगदादला जाण्यापूर्वी बेन पोरात इझराईलला परत गेला होता. त्याचं कारण थोडं नाजूक होतं. त्याला आणि त्याच्या प्रेयसीला लग्न करायचं होतं. पण शिलोहने कसंबसं त्याचं मन वळवून त्याला एका शेवटच्या कामगिरीसाठी बगदादला पाठवलं होतं आणि आता तो पकडला जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

इकडे त्या फाईलच्या आधाराने इराकी पोलिस आणि हेरखात्याने संपूर्ण इझरेली नेटवर्क उध्वस्त करायला सुरुवात केली. अनेक ज्यू पकडले गेले. काही जण कोठडीतल्या मारामुळे मरण पावले. ज्यांना जगायचं होतं, त्यांनी नाईलाजाने त्यांना असलेली माहिती पोलिसांना दिली. त्यांच्यामुळे पोलिसांनी बगदादमध्ये अनेक ठिकाणी धाडी घालून कागदपत्रं हस्तगत केली आणि अनेक ज्यू हेरांना अटक केली. शेम्तोव्ह सिनेगॉगमध्ये शस्त्रांचा मोठा साठ दडवलेला होता. १९४१ मध्ये इराकी सरकारने त्यांचे मित्र असलेल्या नाझी जर्मनीच्या चिथावणीवरून ज्यूंविरुद्ध कारवाया सुरु केल्या होत्या. त्यात १७९ ज्यू मरण पावले होते, दोन हजारांहून जास्त जखमी झाले होते, हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले होते. पुन्हा जर असं झालं तर त्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून इराकमधल्या झिओनिस्ट ज्यूंनी शस्त्रं जमा करून ठेवायला सुरुवात केली होती. ती आता इराकी पोलिसांच्या हातात पडली होती. त्यांची संख्या बघून पोलिसांचेही डोळे विस्फारले – ४३६ हातबॉम्ब, ३३ मशीन पिस्तुलं, १८६ रिव्हॉल्व्हर्स, ९७ मशीनगन्स, ३२ धारदार गुप्त्या आणि २५००० काडतुसं!

इराकी पोलिसांच्या या दमनसत्रात एका माणसाचा उल्लेख वारंवार होत होता. झाकी हवीव. फार कमी लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं. पण हा माणूस होता कोण? आणि कुठे होता तो? शेवटी इराकी पोलिसांच्या एका हुशार डिटेक्टिव्हच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने ज्यांनी झाकी हवीवला प्रत्यक्ष पाहिलं होतं, त्या सर्वांना बोलावून त्यांच्याकडून त्याचं वर्णन परत एकदा ऐकलं आणि एक धक्कादायक निष्कर्ष काढला – निसीम मोशे म्हणून जो माणूस सुरुवातीला पोलिसांनी पकडला होता, तोच झाकी हवीव आहे. ताबडतोब निसीम मोशेने पोलिसांना दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी धाड टाकली. तिथे अर्थातच कोणीही नव्हतं. पोलीस वेडेपिसे झाले. संपूर्ण इझरेली नेटवर्क आपल्या इशाऱ्यांवर नाचवणारा माणूस त्यांच्या हातात आला होता, पकडलाही गेला होता पण....!

झाकी हवीवच्या शोधात सगळी पोलिस यंत्रणा कामाला लागली. बगदादशिवाय बसरा, फालुजा इत्यादी ज्यूबहूल शहरांमध्येही हवीवचा शोध सुरु झाला. पण तो कुठेही सापडला नाही, आणि त्याचं कारण म्हणजे तो अशा ठिकाणी होता, जिथे शोधायचं कुणाच्या मनातही येणार नाही. बगदादमधला तुरुंग!

पोलिसांनी तागारबरोबर निसीम मोशे उर्फ झाकी हवीव उर्फ मोर्देचाई बेन पोरातला अटक केली होती, पण एका आठवड्यानंतर त्याला सोडून दिलं होतं. तो घरी आल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावला, “दरवाजा उघड. पोलिस!” हा आपला शेवट असल्याचा विचार बेन पोरातच्या मनात आला. घराला मागून सटकण्यासाठी दरवाजा, खिडकी वगैरे काहीही नव्हतं आणि पकडल्यावर सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाणारे होते – फाशीच्या तख्तावर. त्याने मन घट्ट केलं आणि दरवाजा उघडला. बाहेर पोलिस उभे होते. त्याला अटक होत असल्याचं त्यांनी सांगितल्यावर त्याने कारण विचारलं.

“काही विशेष नाही,” त्या पोलिसांमधला एकजण म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी तू एका मोटरसायकलला तुझ्या गाडीने ठोकलं होतंस, आठवतं का? आता कपडे घाल आणि आमच्याबरोबर चल.”

बेन पोरातचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. तो या अपघाताविषयी विसरून गेला होता. त्याला कोर्टाकडून दंड भरण्याचा आदेश आला होता, आणि त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता त्याच्या अटकेचा आदेश आला होता. पोलिस त्याला तिथून घेऊन सरळ कोर्टात गेले. तिथे न्यायाधीशांनी त्याला दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली. त्यामुळे बगदादमध्ये त्याला शोधायला इराकी पोलिस आकाशपाताळ एक करत असताना तो चक्क तुरुंगात होता.

दोन आठवडे पूर्ण झाल्यावर पोलिस निसीम मोशेला (ते त्याला त्याच नावाने ओळखत होते) हेडक्वार्टर्समध्ये घेऊन चालले होते. इराकी कायद्यांनुसार त्याच्या बोटांचे ठसे घेणं आणि त्याचा फोटो काढून तो पोलिस रेकॉर्डमध्ये ठेवणं गरजेचं होतं. हे झालं तर आपण संपलो याची बेन पोरातला जाणीव होती. झाकी हवीवसाठी चालू असलेला शोध त्याच्या कानांवर आलेला होताच. त्याला घेऊन दोन पोलिस शिपाई हेडक्वार्टर्सकडे जात होते. हा रस्ता बगदादमधल्या शुर्जा सुक या सुप्रसिद्ध आणि गजबजलेल्या बाजारातून जात होता.. तिथे गर्दीचा फायदा घेऊन बेन पोरात त्याच्याबरोबर असलेल्या दोन्ही शिपायांना चकवून पळून गेला. त्या शिपायांना अर्थातच तो कोण आहे हे माहित नव्हतं, आणि तशीही त्याची शिक्षा संपली होती. त्यामुळे त्या शिपायांनी त्याचा पाठलाग करायचा अजिबात प्रयत्न केला नाही. जेव्हा त्यांनी हेडक्वार्टर्समध्ये जाऊन हे सांगितलं, तेव्हा तिथे जवळजवळ भूकंप झाला. परत एकदा झाकी हवीव पोलिसांच्या हातून निसटला होता.

तेल अवीवमध्ये बेन पोरातच्या वरिष्ठांचं या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष होतं. त्यांनी तो इराकमध्ये जातानाच त्याला तिथून बाहेर काढायची योजना बनवलेली होती. तो बगदादमध्ये त्याच्या एका अरब मित्राच्या घरात लपून बसला होता. त्याच वेळी मोसादने इराकमधून ज्यूंना बाहेर काढण्याची एक जबरदस्त योजना कार्यान्वित केलेली होती.

इझराईलमधून आलेल्या कोणत्याही विमानाला इराकमध्ये प्रवेश नव्हता, पण त्या वेळी बगदादमधल्या श्रीमंत इराकी लोकांमध्ये सुट्टीसाठी सायप्रसला जायची फॅशन होती. त्यामुळे सायप्रसची राजधानी निकोशिया आणि बगदाद यांना जोडणाऱ्या अनेक फ्लाईट्स होत्या. सायप्रसच्या सरकारी विमानसेवेच्या लोकांशी संधान बांधून मोसादने या विमानांमधून अनेक ज्यूंना बगदाद ते निकोशिया आणि तिथून तेल अवीव असं इझराईलमध्ये आणलं होतं. आता बेन पोरातलाही तसंच बाहेर काढायची त्यांची योजना होती.
१२ जून १९५१ च्या रात्री बेन पोरात एकदम उंची सूट घालून बाहेर पडला. त्याच्या मित्रांनी त्याच्या कपड्यांवर अरक नावाच्या स्थानिक दारूच्या बाटल्या ओतल्या होत्या. त्यामुळे पोरातच्या अंगप्रत्यंगातून अरकचा डोकं उठवणारा वास येत होता. झोकांड्या खात पोरात जात असताना त्याच्या जवळ एक टॅक्सी येऊन थांबली आणि पोरात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर जाऊन कोसळला आणि झोपून गेला. उलटसुलट गाडी चालवत ड्रायव्हरने ती बगदाद विमानतळाच्या जवळ आणली. तिथे पोरात बाहेर उतरला. विमानतळाच्या कुंपणाची तार एके ठिकाणी कापलेली होती. तिथून तो आतमध्ये शिरला आणि एका ठिकाणी लपून बसला. इकडे रनवेवर विमान उडायच्या तयारीत होतं. विमानाने टेक ऑफ साठी धावायला सुरुवात केली. अचानक पायलटने दिव्यांचे प्रखर झोत कंट्रोल टॉवरच्या दिशेने वळवले. हा बेन पोरातसाठी इशारा होता. तो आपल्या जागेवरून पुढे धावत आला. विमानाने आता जमीन सोडली होती, पण त्याची मागची एक झडप अजून उघडी होती. अर्थातच कंट्रोल टॉवरमधल्या लोकांचे डोळे अजूनही त्या प्रखर प्रकाशाने दिपले होते. त्यामुळे तिथून बाहेर आलेला दोर आणि त्याला लटकलेला बेन पोरात त्यांना दिसू शकले नाहीत. त्याला आत ओढून घेऊन झडप बंद झाली आणि विमान निकोशियाकडे झेपावलं. बगदादवरून उडत जाताना विमानाच्या दिव्यांची तीन वेळा उघडझाप झाली आणि बगदादमधल्या एका इमारतीच्या गच्चीवर जमलेल्या काही लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांचा मित्र सुखरूपपणे इझराईलच्या मार्गावर होता.
बेन पोरातने इझराईलमध्ये परत गेल्यावर आपल्या प्रेयसीशी लग्न केलं आणि मोसादमधून निवृत्त झाल्यावर राजकारणात प्रवेश केला. पुढे तो पंतप्रधान मेनॅचम बेगिन यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीही झाला.
बगदादमध्ये राहिलेले ज्यू इतके नशीबवान नव्हते. झाकी हवीव उर्फ बेन पोरात पळून गेल्याचं इराकी पोलिसांच्या लक्षात आल्यावर ज्यूंचा छळ अजूनच वाढला. इकडे तागार आणि इतर २१ ज्यूंवर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला. बगदादमधले दोन मोठे ज्यू व्यापारी – शालोम सालाच आणि योसेफ बात्झरी हे त्या २१ ज्यू आरोपींमध्ये होते. खटला संपल्यावर या दोघांनाही मृत्युदंड देण्यात आला.
तागारवर खटला चालू होण्याआधी एकदा त्याला भल्या पहाटे अडीच वाजता झोपेतून उठवलं गेलं. त्याच्या छोट्या कोठडीत बरेच पोलिस उभे होते. “तुला आत्ता फासावर चढवायचा हुकुम आहे आम्हाला!” त्यातला एक तागारला थंडपणे म्हणाला.
“पण खटला अजून चालू व्हायचाय. त्याशिवाय तुम्ही कसं काय मला फाशी देताय?” तागार म्हणाला.
“अच्छा? आम्हाला तुझ्याबद्दल सगळं माहित आहे. तू इझरेली आहेस, हेर आहेस. अजून काही माहित असण्याची गरज नाही.”
त्यांनी कुठूनतरी एक राब्बायपण शोधून काढला होता. त्याने तागारला धीर दिला. पण भीतीऐवजी तागार बुचकळ्यात पडला होता. पहाटे साडेतीन वाजता ते त्याला वधस्तंभाकडे घेऊन गेले. जिथे प्रत्यक्ष फाशी दिलं जाणार होतं, तिथे जाण्याआधी एका खोलीत त्याच्याकडून अनेक कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या. त्यानंतर तिथे उभ्या असणाऱ्या जल्लादाने त्याच्या बोटातल्या अंगठ्या आणि घड्याळ या गोष्टी काढून घेतल्या. मग तो त्याला आत, जिथे वधस्तंभ होता, तिथे घेऊन गेला. तिथे त्याला एका खालच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाज्यावर उभं करण्यात आलं. जल्लादाने त्याला स्वतःकडे पाठ करून उभं केलं होतं. त्याचे हात पाठीमागे बांधलेले होतेच. त्याच्या पायांना जड पिशव्या बांधण्यात आल्या. त्याच्या डोक्यावर काळा बुरखा घालण्याआधी जल्लादाने त्याला शेवटची इच्छा विचारली. तागारने आपला मृतदेह इझराईलला पाठवण्यात यावा असं सांगितलं आणि काळा बुरखा घालून घ्यायला नकार दिला. जल्लादाने आता त्या खोलीत हजार असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पाहिलं. तागारने डोळे घट्ट मिटून घेतले..... आणि अचानक तो अधिकारी आणि त्याच्याबरोबर असलेले बाकीचे पोलिस अधिकारीही त्या खोलीतून निघून गेले. जल्लाद अरेबिकमध्ये शिव्या घालत असल्याचं तागारने ऐकलं. तो एवढी मेहनत करून फाशी न दिल्यामुळे त्याला जे पैसे मिळणार नव्हते, त्याबद्दल वैतागला होता. त्याने तागारचे हात बेड्यांमधून सोडवले आणि त्याच्या पायांना बांधलेल्या पिशव्याही तिथून काढल्या. त्या क्षणी हा सगळा बनाव असल्याचं तागारच्या लक्षात आलं. मृत्यूच्या एवढ्या जवळ गेल्यावर तो दयेची याचना करेल आणि आपल्याला अजून काही माहिती देईल अशी पोलिसांची अपेक्षा होती. पण तागारने तोंडही उघडलं नव्हतं.
पुढे खटला झाल्यावर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सालाच आणि बात्झरी यांना मात्र इराकने सोडलं नाही. दोघेही फासावर लटकले.
जवळजवळ ९ वर्षांनी एक अकल्पित घडलं. तागारला शिक्षा झाली, तेव्हा इराकमध्ये राजेशाही होती. १९५८ मध्ये सैन्यप्रमुख अब्दुल करीम कासीम याने उठाव घडवून आणून सत्ता काबीज केली. याच्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९६० मध्ये त्याच्या जवळच्या साथीदारांनी त्याला उडवण्याची योजना आखली होती. या योजनेची कुणकुण मोसादला लागल्यावर त्यांनी कासीमला सावध केलं आणि त्याच्याबरोबर सौदा केला – येहुदा तागारच्या मोबदल्यात हा कट करणाऱ्यांची नावं. कासीमने हे मान्य केलं आणि १९६० मध्ये, तब्बल ९ वर्षांनी येहुदा तागारची मुक्तता झाली. जेव्हा तो तेल अवीवच्या विमानतळावर उतरला तेव्हा अनेक लोक त्याच्या स्वागतासाठी जमले होते. आपल्याला एखादा अस्थिपंजर झालेला, डोळे खोल गेलेला, वयापेक्षा जास्त म्हातारा दिसणारा माणूस भेटेल अशी अनेकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात एक हसतमुख, सडपातळ आणि चालीत यत्किंचितही फरक न पडलेला एक माणूस त्यांना सामोरा आला.
“ तू एवढ्या वर्षांत वेडा कसा नाही झालास?” त्याला त्याच्या एका मित्राने विचारलं.
“कारण तुम्ही मला तिथून बाहेर काढाल याची मला खात्री होती!” तागार शांतपणे म्हणाला.
तागारने नंतरही मोसादच्या अनेक कामगिऱ्यांमध्ये भाग घेतला आणि तिथून निवृत्त झाल्यावर तो हैफा विद्यापीठात प्राध्यापक झाला.
रूव्हेन शिलोहचा झाकी हवीव आणि येहुदा तागारच्या प्रकरणाशी तसा काहीही संबंध नव्हता, पण त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याने १९५२ मध्येच राजीनामा दिला होता. त्याच्या जागी पंतप्रधान बेन गुरियनने एका अशा माणसाची नेमणूक केली जो पुढच्या काही वर्षांत एक जिवंत दंतकथा बनला आणि ज्याने मोसादचा दरारा आणि दबदबा संपूर्ण जगभर प्रस्थापित केला. त्याचं नाव होतं इसेर हॅरेल!

क्रमशः

संदर्भ
१. Gideon’s Spies – by Gordon Thomas
२. Mossad: The greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. The Israeli Secret Services – by Frank A. Clements
४. The History of Mossad – by Antonella Colonna Vilaci

मोसाद - भाग ३

इतिहासलेख

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

23 Dec 2015 - 1:03 am | कपिलमुनी

हा भाग वेगवान झालाय
मजा आली

सौन्दर्य's picture

23 Dec 2015 - 3:26 am | सौन्दर्य

खूप सुंदर वर्णन. नावं थोडी वेगळी आणि अपरिचित असल्यामुळे लक्षात ठेवायला कठीण जातात, पण प्रत्येक प्रसंगातील नाट्य मात्र अंगावर रोमांच आणतं. एकदम त्या काळात फिरतोय असे वाटते.

अप्रतिम लेखन! सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले! लिहित राहा!

रामपुरी's picture

23 Dec 2015 - 3:40 am | रामपुरी

वाचतोय... पु भा प्र

एक एकटा एकटाच's picture

23 Dec 2015 - 7:43 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

सोत्रि's picture

23 Dec 2015 - 7:44 am | सोत्रि

बोकाभाई, शॉल्लीट.

एकदम सरस मालिका आहे! लगे रहो!! पुभाप्र!!!

- (हेरगिरी करण्याची आस असलेला) सोकाजी

नाखु's picture

23 Dec 2015 - 8:38 am | नाखु

दिस सार्थकी लागला...

बोका लिखाण पारायणी नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Dec 2015 - 8:39 am | कैलासवासी सोन्याबापु

एकच नंबर!! मोसाद कश्या परिस्थिती मधुन तावुनसुलाखुन तयार झाली आहे ते वाचायला लैच भारी वाटते

rahul ghate's picture

23 Dec 2015 - 8:54 am | rahul ghate

भाग २ पण आवडला !!

पु भा प्र.

राहुल

सुरस आणि चमत्कारिक! पुभाप्र पुभाप्र!!

सुबोध खरे's picture

23 Dec 2015 - 9:49 am | सुबोध खरे

दुर्दम्य आकांक्षा आणि प्रखर देशभक्ती असलेल्या या माणसाना सलाम.
सुंदर आणि ओघवते लेखन

किसन शिंदे's picture

23 Dec 2015 - 10:02 am | किसन शिंदे

जबराट! वाचताना सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राह्यले. हे सगळं.अगदी फिल्मी स्टाईल आहे राव. यावर एखादा चित्रपट निघाला आहे काय?
बाकी वाचकाला गुंगवून ठेवण्याची विलक्षण हातोटी आहे तुमच्या लिखाणात.

पगला गजोधर's picture

23 Dec 2015 - 10:08 am | पगला गजोधर

ib

पगला गजोधर's picture

23 Dec 2015 - 10:13 am | पगला गजोधर

rs

सुधांशुनूलकर's picture

23 Dec 2015 - 10:29 am | सुधांशुनूलकर

दुसरा भागही मस्त. वेगवान घटनाक्रम.

पगला गजोधर's picture

23 Dec 2015 - 10:38 am | पगला गजोधर

d

अभ्या..'s picture

23 Dec 2015 - 7:08 pm | अभ्या..

मोसादमध्ये भव्य कपाळ ही इलिजिबिलेटी मानली जाते का? विचार करुन करुन सार्‍यानाच एकाच पध्दतीचे टक्कल पडते का?
(सगळे अगदी एका फॅमिलीतले दिसताहेत म्हणून म्हणले ;) )

अजया's picture

26 Dec 2015 - 5:33 pm | अजया

काय नजर आहे!

पिलीयन रायडर's picture

23 Dec 2015 - 10:43 am | पिलीयन रायडर

उत्कंठावर्धक!!!! भरपुर वाट पाहिली ह्या भागाची!!

पुभाप्र!

sagarpdy's picture

23 Dec 2015 - 11:41 am | sagarpdy

मस्त
पु भा प्र

मार्मिक गोडसे's picture

23 Dec 2015 - 12:01 pm | मार्मिक गोडसे

मस्तच.

कुठल्याही देशाच्या गुप्तचर संस्था जे काम करतात, ते तर आपण करणारच आहोत, पण त्याशिवाय आपल्यावर अजून एक जबाबदारी आहे, ती म्हणजे जगभरात पसरलेल्या ज्यू धर्मीयांचं संरक्षण.

“कारण तुम्ही मला तिथून बाहेर काढाल याची मला खात्री होती!” तागार शांतपणे म्हणाला.

इझराईली ज्युंचा डीएनए असा असतो.

पगला गजोधर's picture

23 Dec 2015 - 12:06 pm | पगला गजोधर

दुसऱ्याच्या घरात मुल जन्मल्याचा आनंदाच्या जिवावर, आपण छाती काढून कोणी मिरवून, स्वतःचे हसे करून घेवू नये….

मार्मिक गोडसे's picture

23 Dec 2015 - 12:22 pm | मार्मिक गोडसे

आपल्या डीएनए च्या जवळपास गुण असणार्‍या दुसर्‍या डीएनए चे कौतुक वाटले तर त्यात गैर ते काय?

एस's picture

23 Dec 2015 - 12:03 pm | एस

वाचतोय!

सामान्य वाचक's picture

23 Dec 2015 - 12:11 pm | सामान्य वाचक

मांडणी पण मस्त
मोसाद आणि एकुणात इस्रायेल ची वट जास्त असण्याला USA आणि युरोप चा हि मोठा हातभार आहे
सरळ आणि बाकीच्या अशा बर्याच मार्ग नि होणारे funding पण पाठीशी आहेच

भुमी's picture

23 Dec 2015 - 1:11 pm | भुमी

उत्कंठावर्धक लेख. पु.भा.प्र.

नया है वह's picture

23 Dec 2015 - 2:07 pm | नया है वह

प्रचंड आवडले!

पुभाप्र!

सुरेख लेखमला सुरू आहे. वाचतोय..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!

पद्मावति's picture

23 Dec 2015 - 2:46 pm | पद्मावति

मस्तं!
पु.भा.प्र. आहेच.

आदिजोशी's picture

23 Dec 2015 - 4:13 pm | आदिजोशी

पटापट लिहा. नव्या भागासाठी जास्त वाट पहायला लाऊ नका.

सस्नेह's picture

23 Dec 2015 - 4:37 pm | सस्नेह

जबरदस्त रोमहर्षक कथा.

अभिजित - १'s picture

23 Dec 2015 - 4:56 pm | अभिजित - १

मस्त !!

बाबा योगिराज's picture

23 Dec 2015 - 5:25 pm | बाबा योगिराज

मस्त, भेष्ट. आवड्यास.

DEADPOOL's picture

23 Dec 2015 - 6:56 pm | DEADPOOL

इसेर हॅरेल!
सीक्रेट स्पीच!

कारण तुम्ही मला तिथून बाहेर काढाल याची मला खात्री होती!”

इश्वास भौ. इश्वास.
अत्युच्च दर्जाची तयारी.
आभार बोकेशा, सुंदर लेखमालेसाठी. (नावे थोडी कन्फ्यूज करताहेत पण ओके)

श्रीरंग_जोशी's picture

24 Dec 2015 - 1:57 am | श्रीरंग_जोशी

पहिल्या भागाने वाढवलेल्या उत्कंठेला या भागाने पुरेपूर न्याय दिला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2015 - 2:02 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त रंगात आली आहे ही लेखमाला !

बर्‍याच इझ्रेली राजकीय नेत्यांची पार्श्वभूमी पाहता, "त्यांच्यात इतकी देशभक्ती कशी ठासून भरली आहे ?" हा प्रश्नच उपस्थित होत नाही !

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 9:04 am | प्रचेतस

प्रचंड वेगवान.
उत्कंठावर्धक लेखनशैलीमुळे प्रचंड वाचनीय झालाय हा भाग.

उमेश येवले's picture

24 Dec 2015 - 3:31 pm | उमेश येवले

उत्कंठावर्धक,जबरदस्,लेखमाला !

टुकुल's picture

24 Dec 2015 - 4:44 pm | टुकुल

खुपच सुंदर.. हे सर्व लिहिण्यासाठी केलेल्या अभ्यासाला आणी लेखन शैलीला दंडवत !!

--टुकुल

अन्या दातार's picture

24 Dec 2015 - 5:31 pm | अन्या दातार

थरारक आणि वेगवान मांडणी. पुभाप्र

पैसा's picture

25 Dec 2015 - 7:52 pm | पैसा

अतिशय थरारक!!

जुइ's picture

25 Dec 2015 - 8:42 pm | जुइ

खूप थरारक आणि उत्कंठावर्धक लेख मालिका. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

25 Dec 2015 - 8:49 pm | यशोधरा

सुरेख!

मार्गी's picture

25 Dec 2015 - 10:55 pm | मार्गी

जोरदार बोका ए आझम जी! :) पु. भा. प्र.

इशा१२३'s picture

26 Dec 2015 - 3:42 pm | इशा१२३

मस्त!मस्त!पुभाप्र...

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Dec 2015 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही भाग अतिशय उत्कंठावर्धक आहेत.
पुढील भाग लवकरात लवकर वाचायला मिळावा ही अपेक्षा
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

28 Dec 2015 - 2:45 pm | प्राची अश्विनी

उत्कंठावर्धक ! पुढचा भाग लवकर टाका.

कविता१९७८'s picture

6 Jan 2016 - 3:59 pm | कविता१९७८

छान, हा ही भाग अतिशय अभ्यासपुर्ण आणि उत्कंठावर्धक.

इसेर बिरी हाच खरा अपराधी आणि
निसीम मोशे हाच झाकी हवीव हे वाचून खरंच एखादा चित्रपट बघत असल्याचा भास झाला.

सुंदर व खिळवून ठेवणारी लेखमालिका.धनवान, माहिती मनोरंजनाने भरलेली मालिका.भरभर पूरण कराविशी वाटते पण रसिकतेने आस्वादही घ्यायचाय, दोन्ही पुरे होणार नाही, आस्वाद घेत वाचतेय.

nutanm's picture

17 Apr 2021 - 9:47 am | nutanm

धनवान--ज्ञान. autocorrection ने वाट्टेल ते type. पूरण----पूर्ण