प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे.
कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात. मिपावर सूक्ष्मकथा, शशक लिहल्या गेल्या आहेत, जात आहेत. यावर्षीच्या शशक स्पर्धेदरम्यान बऱ्याचजणांचं असं म्हणणं होतं की अशा छोट्या कथा नियमितपणे लिहल्या जायला हव्या. वाचकाच्या इच्छेला मान देऊन मी हे आव्हान स्विकारत आहे.
हजार शब्दांच्या आतील कथांचं नामकरण मी खालीलप्रकारे केलं आहे -
i) अर्ध्या शब्दापासून ते पन्नास शब्दांपर्यंतच्या कथांना सूक्ष्मकथा म्हणायचं. उदा : २८ सुक्ष्मकथा
ii) ५० ते ५०० शब्दांच्या कथांना कथुकल्या म्हणायचं (यात शतशब्दकथापण आल्या)
iii) ५०० ते १०० शब्दांच्या कथांना कथिका म्हणायचं उदा: मिपालियन्स (विज्ञानचुंबित कथिका)
अर्थात वाचक शब्द बघून कथा वाचत नाहीत तर कथानक बघून वाचतात आणि शब्दसंख्येच्या चौकटीत फारसं न अडकायला नको. पण कथेच्या आकाराचा अंदाज येण्यासाठी हे नामकरण.
आता उपक्रमाबद्दल सांगतो :
i) इथून पुढे मी कथुकल्या नावाची मालिका चालवणार आहे. याअंतर्गत दर शनिवारी दोन किंवा तीन कथुकल्या प्रकाशित केल्या जातील.
ii) त्यात कमीत कमी एक शतशब्दकथा असेल.
iii) सर्व कथाप्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल (सामाजिक, भयगूढ, विनोदी, विज्ञानरंजन, अद्भुतिका, विचित्रकथा, रहस्य,अनुवादित इत्यादी)
अर्थात तुमचा प्रतिसाद आणि शुभेच्छा माझ्यासाठी टॉनिक आहे. सो गेट सेट गो…
--------------------------------------------
--------------------------------------------
१. डॅमेज पीस (शशक)
गणेशोत्सवानिमित्त सगळी दुकानं सजली होती. सुबक, सुंदर, चकचकीत मुर्तींनी इंचनइंच व्यापला होता. लोक आनंदाने अन भक्तिभावाने बाप्पांच्या मुर्ती खरेदी करत होते.
त्या परिपूर्ण मुर्तींपासून जरा बाजूला सोंड तुटलेली एक मूर्ती ठेवलेली होती. दुकानभर भिरभिरणाऱ्या नजरा त्या मुर्तीवर पडण्याअगोदर सोंडेवर पडायच्या अन लगेचच दुसरीकडे वळायच्या.
बऱ्याच वेळाने –
“ही मूर्ती कितीला दिलीत?”
“साहेब, ती नका घेऊ. डॅमेज पीस आहे तो.”
“मला हीच हवीये. किंमत सांगा.”
“तशी शंभर रुपये आहे पण ही डॅमेज असल्यामुळे पन्नासच द्या.”
ग्राहकाने शंभरची नोट काढून दुकानदाराच्या हातावर ठेवली.
“शंभरच घ्या. पन्नास परत देऊ नका.”
दुकानदार ती मूर्ती घेऊन लंगडत चालणाऱ्या धडधाकट डोक्याच्या ग्राहकाकडे बराचवेळ भारावलेल्या नजरेने बघत राहिला.
--------------------------------------------
२. ती रात्र (शशक)
तो म्हातारा अन म्हातारी आपल्या नातवाला घेऊन लगबगीने चालले होते. पाऊस धो धो कोसळत होता. मिट्ट काळोखाला चिरत विजा कडाडत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने तांडव मांडलं होतं. पण ते थांबू शकत नव्हते, ठिकाणावर लवकरात लवकर पोहोचणं भाग होतं. हाडं जुनी असली तरी होती मजबूत. अंधार चिरत झपझप चालले होते दोघंही, आपल्याच तंद्रीत.
थोड्यावेळाने म्हातारीने मागे वळून पाहिलं… पण नातू कुठंही नव्हता. दोघं हवालदिल झाले, चारीदिशांना जंगजंग पछाडलं, समोरच्या वाड्यात जाऊन विचारपूस केली. पण काहीच फायदा झाला नाही.
अवसान गळालेला म्हातारा मटकन चिखलात बसला, म्हातारीचा हंबरडा विजांनी केव्हाच गिळून टाकला.
अन त्याचवेळी वाड्यावरच्या दगडी वाघाने आपल्या पंजांनी हळूच तोंडाला लागलेलं रक्त पुसलं.
----------------------------------------------
३. संघर्ष
तो सैतानी आवाज पुन्हा सुरू झाला, कानांच्या भुयारातून शिरून त्याने अंतर्मनावर आघात करायला सुरुवात केली. आधीचा अनुभव असला तरी प्रत्येकवेळी अनपेक्षित वाटणारा हा हमला. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीने जबरदस्त विरोध केला, संकटाला भीक घालू नकोस असं ओरडून सांगितलं. मला लढायचं होतं, नेहमीसारखं जिंकायचं होतं. मी मनाचा निश्चय केला अन पोटावर घासत पुढे सरकू लागलो. शरीराच्या हालचाली वेगाने होणं शक्यच नव्हतं. हातापायांमधलं त्राण हरवलं होतं पण इच्छाशक्ती प्रबळ होती. हळूहळू रांगत क्षणाक्षणाला कणाकणाने पुढे सरकत होतो मी. अजून थोडं अंतर अन या यातनेपासून कायमची सुटका. मी लटपटणाऱ्या हातांवर जोर देऊन स्वतःला कसंबसं वर उचललं… अगदी काही इंच. अखेर महत्प्रयासाने डोळे किलकिले करून पाहिलं अन एक हात शक्य तेवढा लांबवून त्याच्या मस्तकावर जोSरात चापट मारली. आवाज क्षणात बंद झाला.
अन मी पुन्हा गांड वर करून झोपी गेलो.
---------------------------------------------
--------------------------------------------
चित्रे: जालावरून साभार
प्रतिक्रिया
4 Apr 2017 - 3:39 am | आषाढ_दर्द_गाणे
क्या बात है! वाट पाहण्यात येईल! शुभेच्छा!
आणि तुम्ही कोणत्या वाचकांच्या इच्छेला मान देताहात ते माहीत नाही, पण त्या अनाम वाचकांना शाबासकी!
लेखास लावलेल्या Tags पैकी 'शब्दक्रीडा' हा सार्थ ठरवला आहात!
वरील तीनही कथा आवडलेल्या आहेत हेवेसांन.
सूक्ष्म शंका:
आधीच पोटावर सरपटत होतात ना, मग हे आसन कसे जमवलेत?
की इथे 'गांड वर करून झोपणे' असा वाक्प्रचार वापरलाय?
4 Apr 2017 - 7:03 am | अॅस्ट्रोनाट विनय
कोणत्या वाचकांच्या इच्छेला मान देताहात ते माहीत नाही
>> ता. क. : अर्थात माझीही इच्छा होतीच ; )
हे आसन कसे जमवलेत
>> सराव सराव सराव :))
4 Apr 2017 - 11:30 pm | आषाढ_दर्द_गाणे
ऍस्ट्रोनॉट लोकांना हठयोगही शिकवतात हे माहीत नव्हते!
5 Apr 2017 - 12:26 am | अॅस्ट्रोनाट विनय
शिकावाच लागतो. स्पेशच्या प्रवासात लय गरजेचं आसतो हठयोग. निर्वात पोकळीत शांततेत झोपायला वरील आसन कामात पडतं
4 Apr 2017 - 6:05 am | कंजूस
काही न पटणाय्रा तार्किक चुका टाळायला हव्यात. कलाटणी देण्याच्या हेतूने ते विसरायला नको. लेखन बरं आहे. दर शनिवारी नवीन चारपाच? बराच श्टॅाक दिसतोय. खौटुंबिक गुंतावळा नकोच ,तो टिव्हीवरच्या मालिकांत ठूसठूसून भरलेला असतो.
4 Apr 2017 - 10:11 am | अॅस्ट्रोनाट विनय
खौटुंबिक खतेवर फूली मारून टाकतो
4 Apr 2017 - 7:17 am | रातराणी
एवढ्या कथा! ग्रेटच आहात की! :)
4 Apr 2017 - 8:06 am | एमी
२ आवडली. ३ तर फारच आवडली. काही लहान मुलं ढुंगण वर करुन झोपतात ते फारच मजेशीर दिसतं :-D.
छान उपक्रम आहे. शुभेच्छा!
सामाजिक, भयगूढ, विनोदी, विज्ञानरंजन, अद्भुतिका, विचित्रकथा, रहस्य,अनुवादित इत्यादी >> याखेरीज यंगअडल्ट, न्वार, धडाडीच्या नायिका (चांगल्या, वाईट) हे प्रकारदेखील येऊद्या. मआंजावरचं लेखन पाहुन 'माझी पापडलोणची करणारी आजीपणजीचुलतसासूमावशी' याच्याबाहेर स्त्रियांबद्दल काही फारसे लिखाण होत नाही असे वाटू लागले आहे :->
खौटुंबिक गुंतावळा नकोच ,तो टिव्हीवरच्या मालिकांत ठूसठूसून भरलेला असतो. >> अगदी अगदी.
15 Apr 2017 - 9:10 am | पिलीयन रायडर
अगदी अगदी!
4 Apr 2017 - 10:04 am | अॅस्ट्रोनाट विनय
मआंजावरचं लेखन पाहुन 'माझी पापडलोणची करणारी आजीपणजीचुलतसासूमावशी' याच्याबाहेर स्त्रियांबद्दल काही फारसे लिखाण होत नाही असे वाटू लागले आहे
>> +१
4 Apr 2017 - 10:08 am | अॅस्ट्रोनाट विनय
याखेरीज यंगअडल्ट, न्वार, धडाडीच्या नायिका (चांगल्या, वाईट) हे प्रकारदेखील येऊद्या.
>> हम्म. सांस्कृतिक घुसळण होणं आवश्यक आहे ; )
4 Apr 2017 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा
@दुकानदार ती मूर्ती घेऊन लंगडत चालणाऱ्या धडधाकट डोक्याच्या ग्राहकाकडे बराचवेळ भारावलेल्या नजरेने बघत राहिला.››› __/\__
4 Apr 2017 - 11:07 am | जव्हेरगंज
+१
मस्त जमलीय!!!
4 Apr 2017 - 11:45 am | अॅस्ट्रोनाट विनय
सर्वांचे आभार _/\_
4 Apr 2017 - 12:08 pm | चिनार
यास्ट्रोनाट भाऊंकडे लय स्टोऱ्यांचा माल पडेल हाय वाट्टे गड्या...
लय मजा येनार...
4 Apr 2017 - 12:09 pm | चिनार
पहिली स्टोरी लय जबराट
15 Apr 2017 - 7:37 am | हकु
पहिली आणि तिसरी कळली. आवडली सुद्धा. छान.