पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 5:00 am

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

हरवलेला's picture

22 Mar 2017 - 5:30 am | हरवलेला

छान

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 5:42 am | सत्यजित...

तत्काळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद...हरवलेला!

चतुरंग's picture

22 Mar 2017 - 5:56 am | चतुरंग

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

हा शेर आरपार गेला! लाजवाब!!

चतुरंग's picture

22 Mar 2017 - 5:59 am | चतुरंग

एक बारीकशी सूचना. ओळींच्या पुढे टिंबे देण्याची गरज फार क्वचित असावी.
अनेक ठिकाणी टिंबे दिल्याने शेरात व्यक्त झालेले विचार अधूरे आहेत की काय असे वाटून शेर विसविशीत व्हायची शक्यता वाटते.

मितान's picture

22 Mar 2017 - 6:53 am | मितान

सुंदर !!!!

वेल्लाभट's picture

22 Mar 2017 - 7:16 am | वेल्लाभट

अ फ ला तू न ! ! !
_/\_

केवळ क्लास

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 8:33 am | सत्यजित...

चतुरंगजी,मितानजी,अपूर्वजी मनापासून धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

22 Mar 2017 - 9:28 am | चांदणे संदीप

.

Sandy

चौकटराजा's picture

22 Mar 2017 - 9:45 am | चौकटराजा

साधारण पणे मला कवितेतील रचनेत काही चूक आहे का पहायची (वाईट) सवय आहे. पण आपली ही गजल एकदम परफेक्ट .पहिल्या शेरात पहिली ओळ ही प्रकाशाशी संबंधित आहे मग दुसरी ओळ एकदम गंध या संकल्पनेवर का ? हे विचारण्याचे कारण असे की बाकी सर्व शेर वाचले असता पहिली ओळ व दुसरी ओळ यात एकच विषय व त्याची दुसरी बाजू मांडली आहे. उदा. सुनसान बाजार व वादळ, काजवे व सूर्य . ई.
बाकी एक शेर माझ्या मानसिकतेशी जुळणारा आहे तो असा
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

अर्थात
सावन आये या ना आये जिया जब झूमे सावन है
तार मिले जब दिलसे दिले वही समय मनभावन है
ही ती मानसिकता .
आपल्या रचनेचा आनंद घेतला आहे ! असेच मस्त लिहित रहा !

चौकटराजा's picture

22 Mar 2017 - 9:47 am | चौकटराजा

पहिल्या ओळीत धग व दुसरीत शीतलता असे तर नाही ........ ? अंगार व केवडा....... अं ?

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 5:18 pm | सत्यजित...

दिलखुलास प्रतिसादाबद्दल खूप-खूप धन्यवाद अरुणजी!
माझ्या लेखनात सुधारणा होणार असेल तर रसिकांच्या सूचनांचे स्वागतच आहे!आवश्यकता वाटेल तेंव्हा तेंव्हा निःसंंकोचपणे कळवाल कृपया! पुनश्च धन्यवाद!
मतल्याबद्दल—
>>>पहिल्या ओळीत धग व दुसरीत शीतलता>>>मला असेच काही अपेक्षित होते!

अनन्त्_यात्री's picture

22 Mar 2017 - 9:53 am | अनन्त्_यात्री

सत्यजित, सुन्दर ग़ज़ल ! एक अप्रिय,अनाहूत पण मनापासून सल्ला देतोय .... तुझ्यातल्या खर्‍या कवीला न्याय देण्यासाठी तुला ग़ज़लच्या बेड्या तोडाव्या लागतील. कवितेच्या कोणत्याही आकृतीब॓धात वा मुक्तछ॓दातही झळाळून उठेल अशी तुझ्या प्रतिभेची जातकुळी आहे, ती ओळख !!!

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 5:37 pm | सत्यजित...

आ.उदयजी,
आपण माझ्या लेखणीबद्दल दाखवलेला विश्वास आणि सोबतच दिलेला सल्ला,हाती शुभेच्छा घेवून नव्या जबाबदारीप्रमाणे माझ्यासमोर उभे आहेत! आपण म्हणता तसे अधून-मधून इतर प्रकारांत लिहावयाचा प्रयत्न करुनही मनासारखे काही जमून येते असे वाटतच नाही! खरेतर सुरवात मुळी मुक्तछंदातूनच झालेली असली तरी माझ्याही नकळत,मराठी कवितेच्या या प्रकाराने एक प्रकारचे गारुडच घातले आहे मनावर!आपल्या सूचनेवर शक्य तेवढ्या त्वरेने लेखणी चालती होईल अशी स्वतःकडूनच अपेक्षा ठेवतो आहे!या प्रवासात मला आपल्या मार्गदर्शनाची गरज पडेलच!
आपला स्नेह मिळत राहीलच या अपेक्षेसह...
—सत्यजित

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2017 - 10:20 am | अत्रुप्त आत्मा

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

मुजरा घ्या मालक..!

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 5:55 pm | सत्यजित...

आ.आत्मबंधजी,
आपल्याकडून मिळालेली ही मनमोकळी दाद...ऊराशी कवटाळावी इतकी अल्हादक आहे!त्यासोबतच पुढील लेखनाचा हुरुप वाढवून आदेशीत करणारी आहे! खूप-खूप धन्यवाद!

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 11:31 am | संजय क्षीरसागर

पण फार छान नाही.

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

बहोत खूब!!

प्राची अश्विनी's picture

22 Mar 2017 - 12:14 pm | प्राची अश्विनी

सुरेख!!

सानझरी's picture

22 Mar 2017 - 2:48 pm | सानझरी

सुंदर!!

पैसा's picture

22 Mar 2017 - 5:59 pm | पैसा

सुंदर रचना!

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 6:00 pm | सत्यजित...

आ.संजयजी,
ही गझल म्हणावी तशी आपल्या अपेक्षेस उतरली नसतानाही आपण मोठ्या मनाने कौतुकच केलेत! अजून बेहतर लिहिण्याचा यत्न राहीलच...आपल्या शुभेच्छा कायम असू द्यात पाठीशी!

एस's picture

22 Mar 2017 - 6:01 pm | एस

छान कविता.

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 6:06 pm | सत्यजित...

संदीपजी,सौरा,प्राची अश्विनी,सानझरी,पैसा...आपले आणि सर्वच रसिक-प्रतिसादकांचे हार्दीक आभार!
आपला स्नेहांकीत,
—सत्यजित

संदीप-लेले's picture

22 Mar 2017 - 7:52 pm | संदीप-लेले

मनाप्रमाणे उतरली नाही, तरी एवढी सुंदर ! क्या बात है !

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2017 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

आणि
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

या ओळी विशेष आवडल्या.

सुमीत भातखंडे's picture

23 Mar 2017 - 11:55 am | सुमीत भातखंडे

.

शैलेन्द्र's picture

23 Mar 2017 - 4:52 pm | शैलेन्द्र

क्लास

सत्यजित...'s picture

23 Mar 2017 - 8:58 pm | सत्यजित...

एस,फुत्कार,सुहासजी,सुमीतजी,शैलेंद्रजी सर्वांचे धन्यवाद!