[खो कथा] पोस्ट क्र. १
----------------------------------
भाग पहिला
रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. बाजारतळावर ही गर्दी. लिंबाच्या झाडाखाली बरीच म्हातारी कोतारी बसलेली. तमाशाचा फडावर एक उफाड्याची बाई गल्ल्यावर बसलेली दिसली आणि आजचा मुक्काम सार्थकी लागणार याची मला खात्रीच पटली. येताळबाबाचा बुटका डोंगर चढायला बराच वेळ लागला. धापा टाकत तिथला लिंबू सोडा पिल्यावर नवचैतन्यात न्हाऊन निघालो.
उंच टेकडीवर जांभळाची आणि चिंचेची मुबलक झाडे होती. बघावं तिकडे त्यांच्यावर चिरगुटे बांधलेली आढळली. गार सावलीत शेंदूर फासलेले दहाबारा येताळबाबा ठाम उभे होते. मधल्या भव्य मुर्तीसमोर हात जोडून मी "आज तरी हूं दी बाबा" अशी गळ घातली. सव्वा रूपया काढून दगडावर ठेवला. कपाळावर बुक्का फासून घेतला. अनवाणी प्रदक्षिणा मारायला मग मी मोकळा.
मोबाइलवर '11PM' अशी धडक बातमी मिळाली अन डोंगर उतारावर आमचा वेग आपसुकच वाढला. पण आता कुठे चार वाजले होते. घटकाभर डोंबाऱ्याचा खेळ बघावा म्हटलं पण तो ही संपला होता. मग खुशाल बसलो लिंबाच्या झाडाखाली दाढीवाल्या बुवाचं किर्तन ऐकत. टाळ, मृदुंग आणि ढोलकीच्या आवाजात ही म्हातारी माणसं बरंच इरसाल बोलून जातात. 'आतल्या' विनोदांना काताचा बकणा भरून हसतात. एका म्हाताऱ्यानं मला सुपारी दिली खायला. मग मी पान मागून घेतलं आणि त्यावर चुना माखून तोबरा भरला. अशी किर्तने यापुढे चुकवायला नकोत. बराच 'माल' असतो याच्यात. यालातर 'आध्यात्मिक तमाशा'च म्हटलं पाहिजे.
रात्र झाल्यावर जरा बरं वाटलं. बाजारतळावरची गर्दीही हटत चालली होती. लांब नळीच्या टूपा सगळीकडं पेटल्या होत्या. जिलबी आणि भज्याचा घाणा मात्र अजूनही कायम होता. कुठे 'सोय' होतेय का बघत मी विचारणा केली. देशी काय आपल्याला चालली नाही. ती तमाशावाली बाई अजूनही गल्ल्यावर बसून गल्ली दाखवत होती. किर्तनाने कर्ण तृप्त झाले होते आता नेत्र तृप्त करण्याच्या इराद्याने मी बराच वेळ तिथे उभारलो. शेवटी कांदाभजी खातखात रस्त्याला लागलो.
चौकात आल्यावर खिशातल्या 'की'नं गाडी पॉकपॉक केली. दरवाजा उघडून आत बसल्यावर अजूनही न दिसलेले ते दृश्य नजरेस पडलं. तमाशाच्या फडाच्या मधल्या उंच टोकावर एक लेझर बीम दिमाखानं झळकत होता. त्याचा हाय वोल्टेज झोत आभाळाला जाऊन थडकला होता. आपल्याही घरावर असाच एक झोत असावा असं मला वाटून गेलं. तो हास्यास्पद विचार झटकून मी गाडीचा झोत सुरू केला.
गाडी पळाय लागली. धूर काढून जळाय लागली. एका हातानं स्टेअरींग पकडून मी थोडी का होईना 'मळाय' घेतली.
फाट्यावर एक ट्रक आडवा गेला. मग जरा स्लो केली. रामगल्लीतून जातजात दत्ताच्या देवळामागं पार्क केली. हायवे इथून फारसा लांब नव्हता. थंडगार वाऱ्यात हुडहुडी भरत होती. नाशिकला मी काय पहिल्यांदाच आलो नव्हतो. दर आमुशा पोर्णिमा इकडंच साजरी व्हायची. त्र्यंबकेश्वर तर त्यासाठीच खास राखीव होतं. पण आता गिराण लागल्यासारखं सगळं बदललं होतं. रामगल्लीत दरोडेखोरासारखं घुसावं लागत होतं. वर रातभर जागणं आणि उघड्यावर मुक्काम. हालहाल व्हायचे.
मी देवळाच्या कठड्यावर बसलो. मोबाईलवर स्टॅटस घेतला. उत्तर काही आले नाही. सालं हे नेहमीचंच लचांड. ऐनवेळी पार्टी माघार घेते. हात हलवत परत जावं लागलं तर पुन्हा कधी इकडं फिरकायचं नाही. हे खूप वेळा ठरवून झालं होतं. पण पुन्हा बोंबलत इकडं यावंच लागायचं.
सिगरेट फुकत मग बराच वेळ घालवला. शेवटी त्या घराकडं जायचंच ठरवलं. एव्हाना बारा वाजून गेले होते. चंद्रप्रकाशाचं चांदणं रस्त्यावर विखुरलं होतं. बरीचशी घरे आणि तीव्र वीजेचे दिवे. अंधार शोधणं तसं अवघडंच होतं.
ते दुमजली घर एखाद्या बेडकाप्रमाणे दबा धरून बसलं होतं. नेहमीप्रमाणेच तिथे सामसूम असेल वाटलं होतं. पण तिथे तर भरपूर गाड्या उभ्या होत्या. असंख्य लोकं मांडी घालून खाली ओट्यावर बसली होती. एका भिताडाजवळ उभा राहून मीही त्यांच्यात मिसळलो. दबक्या आवाजात 'वाईट झालं', 'चांगला हुता', 'अलिकडं पिणं वाढलं हुतं' अशा काही चर्चा कानावर पडल्या. मी मनात चरकलो. नाही म्हटलं तरी धडकीच भरली.
शशिकांतला म्हणे लागलीच दवाखान्यात हलवला होता. मी जरा आत डोकावून पाहिलं. सोफ्यावर शालू जाम टेन्शनमध्ये दिसत होती. तिची अवस्था मला पाहवली नाही. क्षणभरच तिने माझ्याकडे बघितले. मग अनोळखी असल्यासारखी पुन्हा खाली बघत बसली. नाही म्हटले तरी डोळ्यात दोन थेंब घेऊन मी त्या घरातून बाहेर पडलो.
दत्ताच्या देवळाजवळ आल्यावर मी अजून एक सिगारेट पेटवली. कठड्यावर बसून बराच विचार केला. काहितरी गूढ घडलं असणार नक्की. तिकडं परत जाणं मला योग्य वाटलं नाही. थंडगार वाऱ्यात तिथंच पसरलो. झोप कधी लागली कळलंच नाही.
गुहा. गुहेत गुहा. तिच्यात अजून एक गुहा. शेवटच्या गुहेत आरसेच आरसे. आणि आरश्यांच्या आड लपलेला महंमद खुदीराम. साला चेटूक करतो.
मी म्हणालो, "केवड्याला दिला?"
तो म्हणाला, "खाली टाक. फुटला तर पाच हजार. नाहितर फुकट"
चांगला धंदाय साल्याचा. मी पाकिटातून हजाराच्या पाच नोटा बाहेर काढून ठेवल्या.
"काम तर करंल ना?"
त्यानं नुसतीच दाढी कुरवाळली.
उंच हातात धरून मी आरसा खाली फेकला. धप्प आवाज आला. पण फुटला अजिबात नाही. च्यायला. लूटला साल्याला. फुकटचं आपण काय सोडणार नाय. आरसा घ्यायला खाली वाकलो तर...
भल्या पहाटे मोबाईलच्या आवाजानं मी जागा झालो. दत्ताच्या देवळात झोपलो तरी कसली विचित्र स्वप्नं पडतात. डोळे चोळत पटांगणात आलो. दोन हात वर करून कडकडून आळस दिला. सकाळ होत आली होती. हापश्यावर जाऊन तोंड धुतलं. दूर बांधावर एक चिता धडधडत होती. मी मोबाईल बघितला. शालूने एक मॅसेज पाठवला होता. तो पाहून मी हादरलोच.
"काल मी त्याला तुझ्याविषयी सगळं सांगितलं. आणि तो..."
बापरे!
-----
मला वाटलं होतं त्याप्रमाणे शशिकांतचा मृत्यू गूढ वगैरे काही नव्हता. त्याचा दहातल्या पाचजणांना येतो तसा हार्ट अटॅक येऊन एंड झाला होता.
प्रतिक्रिया
19 Mar 2017 - 12:25 pm | Ranapratap
एकदम झक्कास, पुढचा खो कोणाला?
19 Mar 2017 - 12:32 pm | जव्हेरगंज
धन्यवाद!
पुढचा खो मी 'प्राची अश्विनी' यांना देत आहे. त्यांनी कथेचा तिसरा भाग लिहावा.
19 Mar 2017 - 1:13 pm | प्राची अश्विनी
भारी लिहिलय.
खो स्विकरलाय. :)
चु.भू.द्या.घ्या.
19 Mar 2017 - 1:46 pm | अॅस्ट्रोनाट विनय
जबरी. गुढ वाढत चाललंय. स्वप्न आणि सत्य यांच्या सीमारेषेवरचा खेळ रंगत चाललाय.
पुढे काय होणार वाचायला उत्सुक
19 Mar 2017 - 2:21 pm | शेवटचा डाव
कथा सुरवात सुंदर आहे पण काहितरी मिसींग असल्यासारख वाटतय.
शोधु तिसर्या भागात
19 Mar 2017 - 2:26 pm | गवि
उत्तम प्रयोग.
फक्त काळाचा अक्ष सांभाळला नाही तर कथा खालीलप्रमाणे बनते. सलगतेत कथेचं एक सौंदर्यस्थळ असतं.
आणखी एक टाळण्यासारखी समस्या..
प्रत्येक जण बॅटिंगला आला की एस्टॅब्लिश होण्यासाठी नव्याने वेळ घेतो. त्यामुळे कथासूत्र सलग पुढे सरकण्याऐवजी प्रत्येकाच्या नव्याने केलेल्या वातावरणनिर्मितीत जास्त वेळ अडकतं.
20 Mar 2017 - 7:02 am | संजय पाटिल
बाकि भाग उत्तम!
20 Mar 2017 - 12:19 pm | पुंबा
++११
गवि, तुम्ही आहात ना खो खो मध्ये.
22 Mar 2017 - 1:43 pm | वाचूका
हे बाकी खरे आहे...
19 Mar 2017 - 2:29 pm | ज्योति अळवणी
पहिल्या भागाच्या सुरवातीला थोडी गावरान भाषा आहे आणि दुसऱ्या भागात शहरी मराठी आहे हे थोडं खटकलं.
पण पहिला भाग मस्त जबरी बसला आहे. दुसऱ्या भागाची पक्कड न सोडता... जव्हेरगंजजी खूप मस्त लिहिता. Hats off
आता 3 भाग लवकर येऊ दे
19 Mar 2017 - 2:44 pm | ज्योति अळवणी
पहिल्या भागाच्या सुरवातीला थोडी गावरान भाषा आहे आणि दुसऱ्या भागात शहरी मराठी आहे हे थोडं खटकलं.
पण पहिला भाग मस्त जबरी बसला आहे. दुसऱ्या भागाची पक्कड न सोडता... जव्हेरगंजजी खूप मस्त लिहिता. Hats off
आता 3 भाग लवकर येऊ दे
19 Mar 2017 - 3:00 pm | प्रियाभि..
जव्हेरभौची श्टाईल हाये ती..
बाकी जसं वाटलं होतं तसंच है.. अप्रतिम
कथेला नाव पाहीजे ब्बा..मग एका वाटेने जाईल कथा
19 Mar 2017 - 5:15 pm | शलभ
आरसा
बाकी प्रयोग मस्त..
19 Mar 2017 - 9:51 pm | Rahul D
कथेचे नाव प्रतिबिंब...
19 Mar 2017 - 9:55 pm | गवि
कथेचं नाव..
वाजे पाऊल..
20 Mar 2017 - 10:34 am | जव्हेरगंज
प्रतिसाद्कांचे आभार!!!!
20 Mar 2017 - 12:20 pm | पुंबा
कुतुहल जाम वाढलंय.. मस्त जव्हेरगंजभौ
20 Mar 2017 - 12:42 pm | mayu4u
>> ते दुमजली घर एखाद्या बेडकाप्रमाणे दबा धरून बसलं होतं.
टिपिकल जव्हेरभौ!
20 Mar 2017 - 12:51 pm | वरुण मोहिते
सहीच
22 Mar 2017 - 2:27 pm | पैसा
हा पण भाग मस्त!