[खो कथा] पोस्ट क्र. १

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
18 Mar 2017 - 11:32 am

गणरायाला वंदन करून खो कथेची नांदी करतो.

आधी लेखकांनी पाळावयाचे नियम स्पष्ट करतो ( याबाबत सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे)

१. प्रत्येक लेखकाने त्याची पोस्ट टाकून झाल्यावर दुसऱ्या लेखकाला खो द्यावा. कोणत्या क्रमाने कथा लिहायची हे ठरवल्या जाणार नाही. फक्त एका फेरीत एका लेखकाला दोनवेळा खो देऊ नये.

२. प्रत्येक पोस्टमध्ये कमीत कमी ५०० शब्द असावेत.

३. खो दिल्यानंतर ७२ तासांच्या आत पुढची पोस्ट टाकावी लागेल. (अर्थात ही कमाल मर्यादा झाली. यापेक्षा कमी वेळेत पोस्ट टाकणं अपेक्षित आहे)
ज्याला खो मिळालाय त्याला हे शक्य होणार नसेल तर त्याने/ तिने पटकन दुसऱ्या कुणालातरी खो द्यावा म्हणजे वेळ वाया जाणार नाही. ७२ तासांच्या आत पोस्ट न पडल्यास तो भिडू या कथेतून बाद होईल.

४. कोणत्याच भिडूने इतरांनी काय लिहावं याबाबत सुचना देऊ नये. आपल्या अपेक्षा सांगू नये. लेखक म्हणून प्रत्येकाला आपण स्वायत्तता देत आहोत.

५. सध्याच आपण कथेचं शिर्षक ठरवणार नाही. कथा पुर्ण झाल्यावर वाचकांना ते आपण सुचवायला सांगणार आहोत. थोडक्यात कथेचं शिर्षक वाचक ठरवतील.

६. कथा किती भागांमध्ये संपवायची हे कथेची दिशा आणि वाचकांचं मत पाहून ठरवलं जाईल.

-----------------------------------------------------
-----------------------------------------------------

भाग दुसरा

मला वाटलं होतं त्याप्रमाणे शशिकांतचा मृत्यू गूढ वगैरे काही नव्हता. त्याचा दहातल्या पाचजणांना येतो तसा हार्ट अटॅक येऊन एंड झाला होता. टेन्शन असं काहीच नव्हतं. सुखी कुटुंब, मोठ्या पगाराची नोकरी अन पार्ट्या करायला मित्र. पण जीवनाचा काय भरवसा. रात्री झोपायला गेला पण सकाळी उठलाच नाही. दुर्दैवी जीव, दुसरं काय.

पण मला आरशात त्याचाच चेहरा का दिसला ? योगायोग होता, भास होता की अजून काही ? कळायला मार्ग नव्हता. शेवटी जास्त विचार करायचा नाही असं मी ठरवून टाकलं.

शशिकांतचं क्रियाकर्म आटोपून त्याच दिवशी मला निघावं लागलं. थांबावंसं वाटत होतं पण आमचा ढेरपोट्या बॉस आग्यावेताळासारखाच मानगुटीवर बसला होता. "मी मेलो होतो" या सबबीशिवाय इतर कुठलंही कारण असेल तर सुट्टी मिळणार नाही असं त्याने कुत्र्यासारखं वसकावून सांगितलं. इन शॉर्ट, मला निघावं लागलं.

निघेपर्यंत अंधार पडू लागला होता. मधे एका धाब्यावर गाडी थांबवून मी पोटात इंधन टाकलं अन निघालो. बाहेर वारा मंद वाहत होता. सोबतीला किशोरचे दर्दभरे नगमे होते. अर्धा रस्ता कसा पार पडला कळालंसुद्धा नाही. उरलेलं अंतर कापलं की घरी जाऊन अंथरुणावर कोसळायचं एवढंच उद्दिष्ट समोर होतं.
अन... एका वळणावर अचानक गाडीचे लाईट बंद पडले. समोर काळाकुट्ट अंधार पसरला. मी रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन थांबवली. अवघड रस्ता, काळीशार रात्र अन त्यातच दृष्टीहीन बनलेली माझी गाडी. दहा वर्षांपासून कार चालवतो पण बिघडली की मला दुरुस्त फिरूस्त करायला जमत नाही. इथून दूरदूरपर्यंत कुठलंच गॅरेज नव्हतं. मी मनातल्या मनात गाडीला अन X डू नशिबाला शिव्या देऊ लागलो. उद्या ऑफिसला जाण्यासाठी आज घरी पोहोचणं भाग होतं. माझ्याकडे जर पर्शियन जादूगारासारखा जादूचा गालिचा असता तर त्यावर बसून आत्ता उडून गेलो असतो. पण तो ऑप्शन नव्हता. मी गुपचूप कारखाली उतरून एखाद्या वाहनाची वाट पाहू लागलो. मोठं वाहन असलं तर त्याच्या टेललॅम्पच्या उजेडात मी सहज पुढे सरकलो असतो.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा वाहता हायवे असूनसुद्धा एकही वाहन दिसत नव्हतं .पंधरा वीस मिनीट निघून गेले, अर्धा तास झाला पण साधं चिटपाखरुही नाही. कंटाळून शेवटी मी गाडीत बसलो अन सहज चाळा म्हणून त्या चेटक्याने दिलेला आरसा बाहेर काढला (आजकाल चोवीस तास तो आरसा माझ्याजवळ असतो.) स्वतः चं प्रतिबिंब पाहण्यासाठी मी गाडीतला लाईट ऑन केला... अन काय आश्चर्य ! आरशावर प्रकाश पडताक्षणी तो शतपटींनी अॅम्प्लीफाय झाला अन डोळ्यांत घुसला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी आरसा दूर फेकला. डोळे चोळून थोड्या वेळाने नजर सरावली, अजूनही प्रकाश बाहेर पडतच होता. मला एक कल्पना सुचली. आरसा उचलून मी डॅशबोर्डजवळ ठेवला; क्षणात त्या तिलस्मी प्रकाशाने दहाबारा फुट रस्ता झक्क उजळून टाकला. हे का झालं, कसं झालं हा विचार करण्याच्या भानगडीत मी पडणार नव्हतो. टॉप गेअर टाकून मी सनान गाडी पळवंत निघालो.

तब्बल अर्ध्या तासाच्या प्रवासात एखादा रस्ता सुतासारखा सरळ राहू शकतो का? तर नाही. मुंबई नाशिक रोड तर अजिबातच नाही. पण गेल्या अर्ध्या तासापासून माझी गाडी कुठेही वळण न घेता सरळ चालत होती. एवढ्या वेळात ओव्हरटेक करणारी एकही गाडी दिसली नाही की अंगावर धावून येणारा ट्रक नजरेस पडला नाही. ओळखीच्या खुणासुद्धा नाहीत. चारीबाजुनी मन सुन्न करणारी भयाण गूढता अन फक्त कधीच न संपणारा एकसुरी सरळ रस्ता. घाबरट, पळपुटा अशा शिव्या मला अजून बायकोनेसुद्धा दिलेल्या नाहीत. याचा निर्विवाद अर्थ असा की मी निडर आहे. म्हणून मी हिंमत धरून पुढे जात होतो. पण माझी ## तेव्हा फाटली जेव्हा मे महिन्याच्या त्या रात्री नाशिक मुंबई हायवेवर (खरंच मी तिथे होतो का?) चक्क बर्फ पडायला सुरुवात झाली! गारगोट्या नाहीत- हिमालयात पडतो तसा मऊसूत बर्फ आणि अंग गोठवून टाकणारी थंडी !! गाडी बंद करण्याचा किंवा चालत्या गाडीतून उडी मारण्याचा सल्ला मेँदुने दिला पण मनाला मात्र कुणीतरी खेचून नेऊ लागलं. मी संमोहित झाल्यासारखा गाडी चालवत होतो .अलगदपणे तरंगणारं बर्फ अन गारुडी आइण्यातून बाहेर पडणारा हिरवट प्रकाश...रस्ता कधी संपूच नये; मग तो नरकात नेणारा असला तरी चालेल.

दाणS S...गाडीच्या छपरावर काहीतरी आदळलं... आरसा खाली पडून खळsकन फुटला. प्रकाश क्षणात छूमंतर. सगळीकडे अंधारच अंधार.सगळं अंग बधिर झालं, ओरडायला गेलो तर सगळी बाराखडी घशात गोठली. अंधाराच्या पलीकडे बघण्यासाठी मी डोळ्यावर शक्य तेवढा ताण दिला. पण अंधाराच्या विवरात मी हरवत गेलो; खोल खोल जात राहिलो.

झटक्यात डोळे उघडले. पाठीखाली काहीतरी मऊ लागंत होतं अन डोळ्यांसमोर होतं बेडरुमचं पांढरंशुभ्र छत. मी माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये, माझ्याच बेडरुममधल्या पलंगावर होतो! - नाईटड्रेसमध्ये, व्यवस्थित चादर पांघरलेला. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटलेला होता.

बापरे !काय विचित्र स्वप्न होत. नाशिकहून केव्हा आलो, काय मला काहीच आठवत नव्हतं. डोकही जाम दुखतं होतं तो आरसा आल्यापासून हे सगळं झालंय. संध्याकाळी जाउन तोंडावरच मारतो त्या चेटक्याच्या. मी आळोखे पिळोखे दिले आणि टेबलाकडे पाहिलं. घड्याळ सकाळचे नऊ वाजल्याचं दाखवत होतं. तो खडुस बॉस आता मला फाडून खाणार.

मी बायकोला आवाज दिला, घरभर फिरलो पण घरात कुणीच नव्हतं.
"आता ही कुठे गेली सकाळी सकाळी ?"मी करवादलो.

अवघ्या अर्ध्या तासात कसाबसा तयार होऊन मी बाहेर पडलो. गाडीचा दरवाजा उघडून आत बसलो खरा, पण घाईगडबडीत दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत. एक, माझ्या गाडीच्या छतावर मऊसूत बर्फाचा थर साचला होता अन दुसरं…

मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!
-------------------------------------------

[खो कथा] पोस्ट क्र. २

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

खूप छान, शेवटचा ट्विस्ट भारी आहे, फुलवायला वाव आहे.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

18 Mar 2017 - 12:45 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मी जव्हेरगंज यांना खो देत आहे. त्यांनी कथेचा पहिला भाग लिहावा.

जव्हेरगंज's picture

18 Mar 2017 - 2:36 pm | जव्हेरगंज

भारीच की!!!

सुरूवात झाली तर!

पहिला भाग लिहितो!

संजय पाटिल's picture

18 Mar 2017 - 5:13 pm | संजय पाटिल

प्रतिक्षेत आहे...

अभ्या..'s picture

18 Mar 2017 - 5:33 pm | अभ्या..

नाईस इस्टार्ट, नाईस खो.
मला जव्हेरभाव कीती डीग्रीत कथा फिरवतेत त्याची भयाण उत्सुकता आहे.

प्रियाभि..'s picture

19 Mar 2017 - 1:25 am | प्रियाभि..

जव्हेरभौ आपल्या रांगडी श्टाईल मधी द्या दणका..
आणि खो घ्यायला तयारच बसलोय बरंका!

प्राची अश्विनी's picture

18 Mar 2017 - 12:52 pm | प्राची अश्विनी

सही आहे.

किसन शिंदे's picture

18 Mar 2017 - 1:13 pm | किसन शिंदे

भारीये बॉस. मला वाटतं असे फिक्शन भाग लिहीण्यात जव्हेरभौ पटाईत आहेत. तस्मात खो योग्य ठिकाणी दिलेला आहे असं वाटतं.

ज्योति अळवणी's picture

18 Mar 2017 - 1:21 pm | ज्योति अळवणी

खो चा concept. झक्कास मजा येईल.

कथा देखील मस्त खुलवली आहे

उगा काहितरीच's picture

18 Mar 2017 - 5:49 pm | उगा काहितरीच

आत्ता एक भाग वाचून कंसेप्ट इंटरेस्टिंग आहे असं वाटतंय ! जव्हेरभाऊ चा बाडि पंखा आहे , सो नंतरच्या (म्हणजे पहिल्या ) भागाची उत्सुकता आहे. All the best जव्हेरभौ !

निशाचर's picture

18 Mar 2017 - 5:57 pm | निशाचर

मस्त कल्पना!
हा भाग आवडला. वाचायला मजा येणार!

Ranapratap's picture

18 Mar 2017 - 6:45 pm | Ranapratap

होऊन जाऊदे जव्हेरभाऊ जोरदार बॅ टिंग

अॅस्ट्रोनाट विनय's picture

18 Mar 2017 - 7:14 pm | अॅस्ट्रोनाट विनय

हा भाग सर्वांना आवडला हे बघून आनंद जाहला.

Fantasy ( अद्भुतिका) हा प्रकार मराठीत सर्वाधिक दुर्लक्षित राहिला आहे. त्याकडे अजूनही बालसाहित्य म्हणूनच पाहिलं जातं ही चिंतनीय बाब आहे.

याच कारणामुळे खो कथेकरीता हा प्रकार निवडला. उत्तम अद्भुतिका तयार होणार यात शंका नाही.
So...Stay tuned to FM मिपा

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Mar 2017 - 8:12 am | अॅस्ट्रोनाट विनय

अर्थात बाकी लेखक त्यांना हवं तसं वळण देऊ शकतात म्हणून कथाप्रकार बदलूही शकतो. :))

दीपक११७७'s picture

18 Mar 2017 - 8:02 pm | दीपक११७७

मस्त लिहिला आहे हा भाग पुढिल भागाची उत्सुकता...

एस's picture

18 Mar 2017 - 8:58 pm | एस

झक्कास!

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2017 - 9:42 pm | पिलीयन रायडर

वा! आवडलाच हा भाग!

आणि आता इतर लेखक त्याला आपापल्या शैलीमध्ये कसे वळण देतात हे पहाणे रोचक असेल.

तुम्ही एकदम काही तरी फ्रेश सुरु केलंत मिपावर. मस्त वाटतंय!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Mar 2017 - 8:17 am | अॅस्ट्रोनाट विनय

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2017 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवात तर मस्तच झाली ! आता जव्हेरजंग यांच्या लेखणीतून काय बाहेर येतेय त्याची उत्सुकता आहे ! आंदो !!

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Mar 2017 - 10:56 pm | लॉरी टांगटूंगकर

आवडते आहे. हा भाग मस्तच. अजून लांबला असता तरी चाललं असतं.
जव्हेर भाऊंच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे.

प्रियाभि..'s picture

19 Mar 2017 - 10:16 am | प्रियाभि..

अजून एक सुचवावसं वाटतं..कथेला नाव दिलं तर बरं होईल

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Mar 2017 - 10:53 am | अॅस्ट्रोनाट विनय

एरवी आपण एकट्याने कथा लिहायला घेतो तेव्हा संपुर्ण कथानक डोक्यात असतं. त्यामुळे पुर्ण कथेची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करेल / चपखल बसेल असं शिर्षक आपण देऊ शकतो.
परंतु इथे कथा संपल्याशिवाय ते शक्य होणार नाही. एकदोन पोस्टच्या आधारावर आपण ते द्यायला जाऊ अन नंतर कथेचा नूर पुर्ण बदलला तर ? म्हणून शिर्षक मागे ठेवलंय.

शेवटचा डाव's picture

19 Mar 2017 - 1:30 pm | शेवटचा डाव

झोपताना खडुस बाँसचे पोंगे मनात सुद्दा राहणार नाही .मनात एकच गोष्ट राहील खोकथेचा पुढील भाग काय ट्विस्ट घेऊन येतोत .
भन्नाट कल्पना

शैली पूर्णपणे बदलल्यामुळे एकजीवपणा जातोय. अशा प्रयोगांत एकच नॅरेटर ठेवून त्याचं नॅरेशन बदलत्या शैलीच्या अनेक लेखकांनी लिहीण्यापेक्षा प्रत्येक लेखकाने एकेक वेगळा नॅरेटर (पात्र) साकारणं आणि एकाच गोष्टीच्या अनेक बाजू त्या त्या पात्रांच्या नजरेतून दाखवणं असा फॉर्मॅट ठेवणं जास्त चांगलं ठरतं. प्रत्येकाच्या शैलीला कन्सिस्टन्सी मिळते.

शिवाय कथेला एकाच दिशेत काळाचा एक अक्ष असतो. अशावेळी दुसरा भाग आधी लिहून मग पहिला लिहीण्याने तो अक्षही बिघडतो. पोस्टचं टायटल "१" असेल आणि आत भाग "२" असेल तर आणखी गोंधळ उडतो.

अजूनही काही सूक्ष्म समस्या या प्रयोगात येतात. इच्छा असल्यास सांगतो.

अर्थात प्रयोगाचं कौतुक आहेच. किंबहुना म्हणूनच मत द्यावंसं वाटलं.

अभ्या..'s picture

19 Mar 2017 - 4:29 pm | अभ्या..

दॅटस इट गविराज,
मला पण परफेक्ट ह्याच समस्या जाणवलेल्या होत्या. एकच प्रसंग बेस ठेऊन त्यातील वेगवेगळ्या पात्रानुसार साकारणे हा फॉर्म्याट सगळ्यात बेस्ट. त्यात जेवढे विचार स्वातंत्र्य मिळते तेवढे इथे नाही. स्वातंत्र्य घेतले की कंटीन्युटी जाते. टाईम लाईन काय एकवेळ अ‍ॅडजस्ट करता येईल पण सगळेच स्वातंत्र्य सगळ्याच सहभागींना दिले की अ‍ॅबसर्ड कायतरी तयार होणार. एकजण कलर पेन्सीलने पोर्ट्रेट करतोय, दुसरा वॉटरकलरात लॅन्डस्केप करतोय, शेवटचा अ‍ॅक्रेलिकमध्ये कंपोझीशन करतोय असली पेन्टींग बघायला ना आवडतात ना करायला.

जव्हेरगंज's picture

19 Mar 2017 - 4:40 pm | जव्हेरगंज

एकच प्रसंग बेस ठेऊन त्यातील वेगवेगळ्या पात्रानुसार साकारणे हा फॉर्म्याट सगळ्यात बेस्ट. >>>>ही जबरी आयड्या आहे. करायला पायजे!!

काल रात्रीच गिरिश कुलकर्णीचा मराठी 'हायवे' पाह्यला.
डोस्क्यात फिट्टच बसला राव पिक्चर.
कॅरिकेचर राव कॅरिकेचर.
एकाच टाईमलाईनला मेंटेन करणार्‍या गाड्या. वेगवेगळा स्पीड, आपापल्या कथा सांभाळणार्‍या वेगवेगळ्या माणसांचा हायवे.
.
थॅन्क्स गाववाले.

पुंबा's picture

20 Mar 2017 - 12:11 pm | पुंबा

ज ब री.. आता दुसरा व तिसरा भाग वाचतो पटकन.