जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१७: बोलीभाषा सप्ताह समारोप

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
28 Feb 2017 - 11:27 am

1
.
नमस्कार मंडळी!

आपल्या मिपावर जागतिक मातृभाषा दिनाला म्हणजे २१ फेब्रुवारीला बोलीभाषा सप्ताह या आपल्या मातृभाषेच्या उत्सवाची सुरुवात झाली. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे असलेल्या तिच्या अनेक बोली लेख, कविता, कथांच्या स्वरूपात आपल्यापुढे येत गेल्या. जागतिक मराठी दिनाला म्हणजे २७ फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होत आहे. समारोप म्हणवत नाही, कारण ही अखंड तेवावी अशी ज्योत आहे.

मिपावर बोलीभाषा सप्ताहच करायचा असे का ठरले? गेल्या वर्षी जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने आपण बोलीभाषा सप्ताह करू ही कल्पना नीलकांतने मांडली. त्यामागे जो विचार होता तो यावर्षीच्या आवाहनाच्या धाग्यातही पुन्हा व्यक्त केला.

प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन होण्यासाठी त्यांचे नमुने, डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढ्यांना उपलब्ध असले पाहिजेत. या कार्याला मिपाचा हातभार म्हणून यापुढे दर वर्षी मिपावर जागतिक मराठी दिन हा बोलीभाषांतील/बोलीभाषा संबंधित लिखाण सादर करून साजरा करायचा, असे ठरले आहे. श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक याप्रमाणे बोलीभाषा सप्ताह हीसुद्धा मिपाची ओळख असेल.

आपण पहातो की मराठी दिनाला अनेक लोकांचे मराठी प्रेम अचानक जागृत होते आणि त्या दिवशी व्हॉट्स अ‍ॅपवर किंवा फेसबुकवर संदेश पाठवून आपले कर्तव्य केले की पुन्हा सगळे जैसे थे! त्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या बोलीचा किमान मराठीचा आग्रह सर्वांनी धरला तर? जागतिकीकरण आणि इंग्रजीच्या रेट्यात प्रादेशिक भाषांना टिकाव धरणे अवघड होत आहे, तिथे मुख्यत्वेकरून बोलण्यात असलेल्या आणि फारसे लिखित स्वरूप नसणार्‍या बोलीभाषांना काय भविष्य आहे? बोलीभाषा हा प्रमाणभाषेचा मोठा जीवनाधार आहे हे तसे सगळ्यांना कळते, पण त्याच बोलीभाषा टिकवण्यासाठी जेवढ्या प्रमाणात प्रयत्न व्हावेत तेवढे होत नाहीत. काही लोक जिद्दीने असे प्रयत्न करत आहेत. त्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. दर वर्षी मराठी भाषा मागे गेली का पुढे सरकली यावर निव्वळ चर्चा करत बसण्यापेक्षा जमेल तसे सर्वांनीच बोलीभाषा आणि प्रमाणभाषा फुलाव्या म्हणून प्रयत्न करू.

या संदर्भात काम करणार्‍या दोन संस्था, साईट्स यांची माहिती आता एवढ्यात मिळाली ती बोलीभाषा प्रेमी वाचकांच्या सोयीसाठी इथे देत आहे. एक म्हणजे तंजावर मराठी टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करणार्‍या Dakshini Marathi या संस्थेचे यूट्यूब चॅनेल आणि श्री प्रमोद कोनकर यानी चालवलेल्या कोकणमिडिया या साप्ताहिकाचे साउंड क्लाउडवर असलेले चॅनेल. या दोन्ही साईट्स्/चॅनेलवर बोलीभाषा प्रेमी, मराठी प्रेमी मंडळींना अनुक्रमे तंजावर मराठी आणि कोंकण विभागात बोलल्या जाणार्‍या अनेक बोलीभाषांचे नमुने वाचायला ऐकायला मिळतील. अभ्यासू तसेच आवड म्हणून ऐकू इच्छिणार्‍या मंडळींनी अवश्य लाभ घ्या. यावर्षी आपणही अनेक धाग्यांचे ऑडिओ उपलब्ध करून देण्यचा प्रयत्न करत आहोत. काहींचे काम झाले आहे. काहींवर काम होत आहे. लवकरच या सप्ताहात सादर झालेल्या लिखाणाचे बोलीभाषांचे बरेचसे ऑडिओ उपलब्ध असतील असे मी समजते.

गेल्या वर्षीही या कल्पनेला सर्व वाचक लेखकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याचवेळी अशी मालिका किंवा सप्ताह दर वर्षी घ्यावा अशी विनंती काही वाचकांकडूनच आली आणि मराठी दिनाच्या निमित्ताने असा काही उपक्रम करणे हे अतिशय योग्य वाटल्याने यापुढे दर वर्षी हा उपक्रम करू असा विचार झाला. त्यानुसार पुन्हा यावर्षीही आपण बोलीभाषा सप्ताह साजरा केला. यावर्षीही त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी सर्व लेखक वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! मराठीसोबतच कोंकणीचेही दोन नमुने या सप्ताहात सादर झाले. भाषा आणि बोली यातील संबंध तसेच प्राकृत भाषांबद्दल अतिशय माहितीपूर्ण लेख आपल्याला वाचायला मिळाले.

ज्यांना ज्यांना विनंती केली त्या सर्वांनी अगदी आपुलकीने बोलीभाषा सप्ताहासाठी आपले लिखाण पाठवले यासाठी माझ्याकडून तसेच मिपाकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार! काहीजणांनी उत्स्फूर्तपणे आवाहनाच्या धाग्यानंतर असे लिखाण पाठवले. सर्वांनीच अतिशय उत्तम लिखाण आपापल्या व्यस्त कार्यक्रमातून केले आहे. त्यासाठी त्यांचे सर्वांचे मी इथे कौतुक किंवा आभार करणे हे फार अपुरे आहे. तरीही इथे दोन सदस्यांचा खास उल्लेख करते. एक म्हणजे श्री हैयो हैयैयो. यांनी श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन् यांच्याशी संपर्क साधून तंजावर मराठीतील एक कथा आपल्यासाठी देवनागरीत टंकन करून उपलब्ध करून दिली. यानिमित्ताने श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन् हे मिपा परिवाराशी कायमचे जोडले गेले. तसेच सचिन७३८ यांनी हुबळी, मैसूर भागातील बोलीत अतिशय उत्साहाने लिखाण केले. तंजावर मराठीबद्दल आपण निदान ऐकलेले असते. पण मैसूर शिकारपूर भागातील मराठी बोलीबाबत कधी कानावरही आलेले नाही. अशी बोली आहे हे आपल्याला यानिमित्ताने समजले.

लेखांची आकर्षक सजावट आणि बॅनर यासाठी मूनशाईन आणि मराठी दिनाच्या बॅनरसाठी अभ्या.. यांना धन्यवाद! कालच्या दैनिक लोकमतमधे मिपातर्फे आयोजित बोलीभाषा सप्ताहाची दखल घेऊन मोठी बातमी आली आहे. यासाठी दैनिक लोकमत तसेच श्री राम शिनगारे यांना धन्यवाद!

1

आणि शेवट सर्वात महत्त्वाचे म्हणजे आभार तुम्हा वाचक रसिकांचे. तुम्हीच हा सप्ताह यशस्वी केलात! बोलीभाषात लिखाण आता एखाद्या सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर चालू ठेवू आणि अशाच उत्साहाने आता पुन्हा भेटू पुढच्या वर्षी जागतिक मराठी दिनाला! धन्यवाद!!
.
1

संस्कृतीवाङ्मयविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2017 - 12:24 pm | प्राची अश्विनी

अत्यंत देखणा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संमं आणि सर्व लेखकांचं कौतुक!

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2017 - 12:24 pm | प्राची अश्विनी

अत्यंत देखणा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संमं आणि सर्व लेखकांचं कौतुक!

बबन ताम्बे's picture

28 Feb 2017 - 12:35 pm | बबन ताम्बे

ह्या उपक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमांसाठी आपले, मिपा संपादक मंडळाचे व सजावटकारांचे मनःपुर्वक आभार.
अनेक बोलीभाषांची यावेळी ओळख झाली. सर्व लेखकांचे देखील आभार.

पद्मावति's picture

28 Feb 2017 - 12:41 pm | पद्मावति

सुंदर उपक्रम.

वेल्लाभट's picture

28 Feb 2017 - 12:43 pm | वेल्लाभट

भरगच्च असा हा उपक्रम होता, बोलीभाषांमधलं उत्कृष्ठ लेखन वाचकांसमोर आलं, ते साजेशा पद्धतीने मांडलं गेलं, मराठी भाषेचा, तिच्या बोलींचा मिपाकडून झालेला हा सार्थ गौरव म्हटला पाहिजे.
या उपक्रमाचे आयोजक, त्यासाठी आपला हातभार लावलेले सगळे जण, त्याचा आत्मा ठरलेले सर्व लेखक, व अर्थातच मिपाकर, मिपाबाह्य वाचक या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचं प्रचंड कौतुक.

जितक्या जास्त बोली, तितकी भाषेची खोली
असं म्हणतो, आणि मिपाकर असल्याचा अभिमान व्यक्त करतो.

वाह! मजा आली.

फार सुंदर उपक्रम होता हा. निरनिराळ्या बोलींचा गोडवा चाखायला मिळाला. अश्या उपक्रमांमुळे आपली मायमराठी अधिक सहिष्णूपणे बहरेल.
सर्व आयोजक, संपादक आणि लेखक यांचे आभार.

अत्यंत सुंदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. पुढल्या वेळीही नक्कीच लिहायला आवडेल आणि यावर्षीच्या मैसूर आणि तंजावर मराठीप्रमाणे, आणखी काही बोली असतील तर पुढल्या वेळी वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवू.

आनंदयात्री's picture

28 Feb 2017 - 10:00 pm | आनंदयात्री

या यशस्वी उपक्रमाबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. मिपासदस्य नसणाऱ्या अनेकांनी आवर्जून हा अंक आवडल्याचे सांगितले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2017 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपक्रम... मिपाच्या फेट्यातला अजून एक मानाचा तुरा म्हणावे असा !

सस्नेह's picture

1 Mar 2017 - 4:34 pm | सस्नेह

अतिशय रोचक, भरगच्च आणि यशस्वी उपक्रम ! मराठीच्या इतक्या बहिणी अन भाऊ आहेत, हे मराठी माणसालासुद्धा माहिती नाहीय. सगळ्याच बोलींची मजेदार ओळख झाली यातून. धन्यवाद !

सतिश गावडे's picture

1 Mar 2017 - 4:50 pm | सतिश गावडे

अतिशय चांगला उपक्रम होता हा. एकाच आठवड्यात एकाच भाषेच्या एव्हढ्या बोली भाषांमध्ये लेखन प्रसिद्ध होणे ही अनोखी घटना आहे.

या लेखांमध्ये आगरी भाषेतील लेख नव्हता. ठाणे, नवी मुंबई आणि उत्तर रायगड या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या या बोलीभाषेतूनही लेखन व्हावे असे वाटते.

आगरी भाषेतील लेख नव्हता.

हे मला सप्ताह चालू असताना विचारावंसं वाटत होतं. म्हटलं संपल्यावर बघू. एक ब्रिटिश टिंग्या सोडता इथे कोणी आगरीत लिहीलेलं आठवत नाही.

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2017 - 4:52 pm | प्रीत-मोहर

हा उपक्रम खूप आवडता मिपा उपक्रम आहे. यंदाच्या वर्षी इतके बोलीवैविध्य पाहता आणि वाचता आले धन्यु पैताई आणि मिपा!!

मायमराठी च्या सेवेचा हा उपक्रम मिपाची ओळख बनावा.

ओसु's picture

1 Mar 2017 - 5:45 pm | ओसु

अतिशय सुंदर उपक्रम.
ह्या वेळेस अजून काही मराठी भाषा समजल्या. त्यांचे ध्वनी मुद्रण म्हणजे भाषेची अतिशय जवळून ओळख !!
सर्व लेखक, संपादक आणि उपक्रमासाठी साह्य करणाऱ्यांचे खूप खूप आभार.

पिशी अबोली's picture

2 Mar 2017 - 1:54 pm | पिशी अबोली

रोज 2 अशा गतीने चवीचवीने वाचतेय.

एक तर अगदी शुद्ध मराठी, किंवा 'ग्रामीण' त्यातपण सतत 'बी, लय, व्हय' असले काही शब्द, आणि काही क्रियापदाची झरवलेली रूपं टाकली की झालं, अशा दोनच प्रकारची मराठीची रूपं बघायची सवय झाली होती. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे इतक्या प्रकारचं लेखन करता येऊ शकतं, ही जाणीवच काहीच्याकाही सुखद आहे.

सर्व संबंधितांचे आभार. लिहून घेतल्याबद्दल पैतैचे विशेष आभार.

विशेषांकातील सर्व लेख वाचले.
आवडले.
या विशेषंकासाठी मेहनत घेणार्यांचे आभार आणी अभिनंदन.!

अभिजीत अवलिया's picture

5 Mar 2017 - 5:25 pm | अभिजीत अवलिया

उत्तम उपक्रम होता हा.

मोदक's picture

5 Mar 2017 - 6:03 pm | मोदक

+११

अभ्या..'s picture

5 Mar 2017 - 6:14 pm | अभ्या..

+१
दक्षिणी मराठीसाठी विशेष आभार.

मित्रहो's picture

5 Mar 2017 - 7:46 pm | मित्रहो

सुंदर उपक्रम झाला,
एका बाजूला मराठी वाचनारे आणि बोलनारे कमी झाले असे म्हणत असताना बोलीभाषेतले वीस ते पंचवीस लेख मिपावर एका सप्ताहात आले. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. मराठीच नव्हे तर बोलीभाषा सुद्धा जगू शकतील अशीच आशा अशा उपक्रमातून निर्माण होते.

नवीन बोलीभाषा वाचायला मिळाल्या. सर्व संबंधितांचे आणि लेखकांचे आभार.

'ग्रामीण' त्यातपण सतत 'बी, लय, व्हय' असले काही शब्द, आणि काही क्रियापदाची झरवलेली रूपं

मला स्वतःला लिहिताना हीच भिती वाटत असते. कितीही म्हटले तरी बोलीभाषा बोलनाऱ्यांशी संपर्क कमी येतो. त्यामुळे चित्रपटात ऐकलेली किंवा पुस्तकात वाचली तीच बोलीभाषा व्हायची भिती असते. बरेच शब्द आठवत नाही.

सस्नेह's picture

6 Mar 2017 - 11:28 am | सस्नेह

चित्रपट आणि बऱ्याच उथळ साहित्यात ओढून-ताणून बळे बळे लिहिलेली ग्रामीण बोली वाचताना दाताखाली खडे आल्यासारखे वाटते.
ज्या त्या भागात बरीच वर्षे वास्तव्य असलेल्यांना मात्र बोलीची ओढाताण करायची गरज पडत नाही. ती सतत कानावर पडत असल्याने सहज लेखणीतून उतरते.

सपे-पुणे-३०'s picture

6 Mar 2017 - 11:39 am | सपे-पुणे-३०

अतिशय उत्तम उपक्रम होता हा !
ह्या निमित्ताने मराठीच्या बऱ्याच वेगवेगळ्या बोलीभाषांची ओळख झाली.