जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१७: बोलीभाषा सप्ताह समारोप
.
नमस्कार मंडळी!
आपल्या मिपावर जागतिक मातृभाषा दिनाला म्हणजे २१ फेब्रुवारीला बोलीभाषा सप्ताह या आपल्या मातृभाषेच्या उत्सवाची सुरुवात झाली. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे असलेल्या तिच्या अनेक बोली लेख, कविता, कथांच्या स्वरूपात आपल्यापुढे येत गेल्या. जागतिक मराठी दिनाला म्हणजे २७ फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होत आहे. समारोप म्हणवत नाही, कारण ही अखंड तेवावी अशी ज्योत आहे.
मिपावर बोलीभाषा सप्ताहच करायचा असे का ठरले? गेल्या वर्षी जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने आपण बोलीभाषा सप्ताह करू ही कल्पना नीलकांतने मांडली. त्यामागे जो विचार होता तो यावर्षीच्या आवाहनाच्या धाग्यातही पुन्हा व्यक्त केला.
प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन होण्यासाठी त्यांचे नमुने, डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढ्यांना उपलब्ध असले पाहिजेत. या कार्याला मिपाचा हातभार म्हणून यापुढे दर वर्षी मिपावर जागतिक मराठी दिन हा बोलीभाषांतील/बोलीभाषा संबंधित लिखाण सादर करून साजरा करायचा, असे ठरले आहे. श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक याप्रमाणे बोलीभाषा सप्ताह हीसुद्धा मिपाची ओळख असेल.आपण पहातो की मराठी दिनाला अनेक लोकांचे मराठी प्रेम अचानक जागृत होते आणि त्या दिवशी व्हॉट्स अॅपवर किंवा फेसबुकवर संदेश पाठवून आपले कर्तव्य केले की पुन्हा सगळे जैसे थे! त्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या बोलीचा किमान मराठीचा आग्रह सर्वांनी धरला तर? जागतिकीकरण आणि इंग्रजीच्या रेट्यात प्रादेशिक भाषांना टिकाव धरणे अवघड होत आहे, तिथे मुख्यत्वेकरून बोलण्यात असलेल्या आणि फारसे लिखित स्वरूप नसणार्या बोलीभाषांना काय भविष्य आहे? बोलीभाषा हा प्रमाणभाषेचा मोठा जीवनाधार आहे हे तसे सगळ्यांना कळते, पण त्याच बोलीभाषा टिकवण्यासाठी जेवढ्या प्रमाणात प्रयत्न व्हावेत तेवढे होत नाहीत. काही लोक जिद्दीने असे प्रयत्न करत आहेत. त्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. दर वर्षी मराठी भाषा मागे गेली का पुढे सरकली यावर निव्वळ चर्चा करत बसण्यापेक्षा जमेल तसे सर्वांनीच बोलीभाषा आणि प्रमाणभाषा फुलाव्या म्हणून प्रयत्न करू. या संदर्भात काम करणार्या दोन संस्था, साईट्स यांची माहिती आता एवढ्यात मिळाली ती बोलीभाषा प्रेमी वाचकांच्या सोयीसाठी इथे देत आहे. एक म्हणजे तंजावर मराठी टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करणार्या Dakshini Marathi या संस्थेचे यूट्यूब चॅनेल आणि श्री प्रमोद कोनकर यानी चालवलेल्या कोकणमिडिया या साप्ताहिकाचे साउंड क्लाउडवर असलेले चॅनेल. या दोन्ही साईट्स्/चॅनेलवर बोलीभाषा प्रेमी, मराठी प्रेमी मंडळींना अनुक्रमे तंजावर मराठी आणि कोंकण विभागात बोलल्या जाणार्या अनेक बोलीभाषांचे नमुने वाचायला ऐकायला मिळतील. अभ्यासू तसेच आवड म्हणून ऐकू इच्छिणार्या मंडळींनी अवश्य लाभ घ्या. यावर्षी आपणही अनेक धाग्यांचे ऑडिओ उपलब्ध करून देण्यचा प्रयत्न करत आहोत. काहींचे काम झाले आहे. काहींवर काम होत आहे. लवकरच या सप्ताहात सादर झालेल्या लिखाणाचे बोलीभाषांचे बरेचसे ऑडिओ उपलब्ध असतील असे मी समजते. गेल्या वर्षीही या कल्पनेला सर्व वाचक लेखकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याचवेळी अशी मालिका किंवा सप्ताह दर वर्षी घ्यावा अशी विनंती काही वाचकांकडूनच आली आणि मराठी दिनाच्या निमित्ताने असा काही उपक्रम करणे हे अतिशय योग्य वाटल्याने यापुढे दर वर्षी हा उपक्रम करू असा विचार झाला. त्यानुसार पुन्हा यावर्षीही आपण बोलीभाषा सप्ताह साजरा केला. यावर्षीही त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी सर्व लेखक वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! मराठीसोबतच कोंकणीचेही दोन नमुने या सप्ताहात सादर झाले. भाषा आणि बोली यातील संबंध तसेच प्राकृत भाषांबद्दल अतिशय माहितीपूर्ण लेख आपल्याला वाचायला मिळाले. ज्यांना ज्यांना विनंती केली त्या सर्वांनी अगदी आपुलकीने बोलीभाषा सप्ताहासाठी आपले लिखाण पाठवले यासाठी माझ्याकडून तसेच मिपाकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार! काहीजणांनी उत्स्फूर्तपणे आवाहनाच्या धाग्यानंतर असे लिखाण पाठवले. सर्वांनीच अतिशय उत्तम लिखाण आपापल्या व्यस्त कार्यक्रमातून केले आहे. त्यासाठी त्यांचे सर्वांचे मी इथे कौतुक किंवा आभार करणे हे फार अपुरे आहे. तरीही इथे दोन सदस्यांचा खास उल्लेख करते. एक म्हणजे श्री हैयो हैयैयो. यांनी श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन् यांच्याशी संपर्क साधून तंजावर मराठीतील एक कथा आपल्यासाठी देवनागरीत टंकन करून उपलब्ध करून दिली. यानिमित्ताने श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन् हे मिपा परिवाराशी कायमचे जोडले गेले. तसेच सचिन७३८ यांनी हुबळी, मैसूर भागातील बोलीत अतिशय उत्साहाने लिखाण केले. तंजावर मराठीबद्दल आपण निदान ऐकलेले असते. पण मैसूर शिकारपूर भागातील मराठी बोलीबाबत कधी कानावरही आलेले नाही. अशी बोली आहे हे आपल्याला यानिमित्ताने समजले. लेखांची आकर्षक सजावट आणि बॅनर यासाठी मूनशाईन आणि मराठी दिनाच्या बॅनरसाठी अभ्या.. यांना धन्यवाद! कालच्या दैनिक लोकमतमधे मिपातर्फे आयोजित बोलीभाषा सप्ताहाची दखल घेऊन मोठी बातमी आली आहे. यासाठी दैनिक लोकमत तसेच श्री राम शिनगारे यांना धन्यवाद!
आणि शेवट सर्वात महत्त्वाचे म्हणजे आभार तुम्हा वाचक रसिकांचे. तुम्हीच हा सप्ताह यशस्वी केलात! बोलीभाषात लिखाण आता एखाद्या सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर चालू ठेवू आणि अशाच उत्साहाने आता पुन्हा भेटू पुढच्या वर्षी जागतिक मराठी दिनाला! धन्यवाद!!
.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
अत्यंत देखणा उपक्रम यशस्वी
अत्यंत देखणा उपक्रम यशस्वी
धन्यवाद पै ताई.
सुंदर उपक्रम.
भरगच्च असा हा उपक्रम होता,
फार सुंदर उपक्रम होता हा.
अत्यंत सुंदर उपक्रम यशस्वीपणे
या यशस्वी
सुंदर उपक्रम... मिपाच्या
अतिशय रोचक, भरगच्च आणि
अतिशय चांगला उपक्रम होता हा.
आगरी भाषेतील लेख नव्हता.
हा उपक्रम खूप आवडता मिपा
अतिशय सुंदर उपक्रम
रोज 2 अशा गतीने चवीचवीने
विशेषांकातील सर्व लेख वाचले.
उत्तम उपक्रम होता हा.
+११
+१
सुंदर उपक्रम
+१
अतिशय उत्तम उपक्रम होता हा !