सफर ग्रीसची: भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
14 Dec 2016 - 5:47 am

भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग ५ - पालामिडी किल्ला
भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो

२५ डिसेंबर २०१५, ग्रीसमधील पाचवा दिवस. ख्रिसमसची सुट्टी, त्यात आदल्या दिवशी खूप फिरणं झालं होतं; त्यामुळे सावकाश उठून निवांतपणे न्याहारी केली. आमची न्याहारी सुरू असताना होटेलच्या छोट्याश्या गल्लीत गावाचं बँडपथक आलं होतं. गावातल्या किमान तीन पिढ्या त्या पथकात असतील. होटेलच्या बाहेर त्यांनी थोडा वेळ वादन केलं. त्या इवल्याश्या गल्लीत होटेलच्या अगदी समोर एक घर होतं. पण त्या घराबाहेरही ख्रिसमसची गाणी वाजवण्यात आली. घरमालक स्वखुशीने पथकासाठी देणगी देत होते. आपल्याकडील दिवाळीच्या पोस्तासारखा हा प्रकार होता. गावातील लोकांच्या सहभागातून चालणार्‍या उपक्रमांसाठी पैसे उभे करण्याचा तो परंपरागत मार्ग होता.

आज नाफ्प्लिओतील शेवटचा दिवस. बुर्ट्झी बेटावर जायला इतके दिवस बोट मिळाली नव्हती. कालपासून बरेच पर्यटक आले होते. त्यामुळे आज बोट असेल तर बुर्ट्झीला अर्ध्या तासाची भेट आणि संध्याकाळी नाफ्प्लिओच्या प्रोमंनाडवर फेरफटका एवढाच कार्यक्रम होता. बाकीचा दिवस मोकळा होता.

आल्या दिवसापासून समुद्रापलीकडे दूर एका डोंगरावर असलेला किल्ला आम्हाला खुणावत होता. नाफ्प्लिओच्या किल्ल्यावरून, समुद्रतीरावरून, होटेलच्या खिडकीतून तो वाकुल्या दाखवित असे. मायसिनीहून नाफ्प्लिओला येतानाही उजवीकडे त्याचं दर्शन झालं होतं. गूगल अर्थच्या कृपेने तो किल्ला आर्गोस शहराबाहेर आहे, हे समजलं. ट्रिपअ‍ॅडवायझरवर या किल्ल्याविषयी काही माहिती नव्हती. थोडं खोदकाम केल्यावर किल्ल्यावर जाता येतं एवढं कळलं. तिकीट किंवा उघडण्याची वेळ वगैरे माहिती मिळाली नाही. होटेलच्या मालकांनाही त्याबद्दल ठाऊक नव्हतं. ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे तसंही किल्ला पाहायला मिळेल, असं वाटत नव्हतं. पण वेळ आहे तर किमान पायथ्यापर्यंत जाऊन येऊ, असा विचार करून निघालो.

लारिस्सा किल्ला: आर्गोसचे अक्रोपोलिस

नाफ्प्लिओहून बारा किलोमीटरवर आर्गोस हे ग्रीसच्या सगळ्यांत जुन्या शहरांपैकी एक शहर आहे. सुपीक जमीन असलेली ही जागा मायसिनीअन काळात अधिक विकसित झाली. २०,००० आसनक्षमता असलेल्या प्राचीन थिएटरचे अवशेष इथे आहेत. महाकवी होमरच्या इलियडमधील एक योद्धा डायोमीडचं हे राज्य. शहराबाहेरील एका डोंगरावर लारिस्सा हे आर्गोसचे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील अक्रोपोलिस आहे.

 किल्ल्यावरून दिसणारं नेटकं आर्गोस

नाफ्प्लिओहून निघाल्यावर आर्गोस येण्याआधी डावीकडे किल्ला दिसायला लागला. पण किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ला मागे टाकून शहरात शिरून दुसर्‍या बाजूला बाहेर पडलो. मग अर्ध्या डोंगराला वळसा घालावा लागला. थोडा चढ चढल्यावर एक ख्रिश्चन मोनॅस्टरी दिसली. गाडीने किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचलो. तिथे आणखी एकदोन गाड्या होत्या. पण मनुष्यप्राणी कोणी नव्हते. किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असावं. मोठं लोखंडी गेट हल्लीच लावलेलं असावं. आतमध्ये बरंच सामान पडलेलं दिसत होतं. आता काय करावं या विचारात पडेपर्यंत आणखी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या लोकांतील एक माणूस स्थानिक असावा. त्याच्याकडून किल्ला बघायला तिकीट नाही, एवढं कळलं. गेट बंद असताना आत कसं जायचं, हे विचारायची वेळच आली नाही. गेटच्या एका टोकाला गेट आणि किल्ल्याचा तट यांच्यामध्ये एकावेळी एक माणूस जाऊ शकेल एवढी फट होती. त्या फटीतून त्या लोकांच्या मागून आम्हीही एकदाचे किल्ल्यात शिरलो.

वेगवेगळ्या कालखंडांत झालेल्या बांधकामांच्या खुणा तटबंदीवर दिसत होत्या.




किल्ल्यावरची विहीर पाहून आतल्या आणखी एका भव्य तटबंदीतून आत गेलो.

या तटाच्या आत खूप बांधकाम आहे. हा बालेकिल्ला असावा. अवशेषांची डागडुजी, माहितीचे फलक लावणे असं काम सुरू असावं. बरंच सामान पडलेलं होतं. काही भिंतींचं काम पूर्ण झालेलं असावं. ते पाहून तिथल्या अनेक शत़कांच्या खुणा पुसून टाकून एक मेकअप केलेला कोराकरकरीत किल्ला तिथे शिल्लक राहील कि काय असं वाटलं.



  .

या किल्ल्यात बघण्यासारखं एवढं असेल याची येण्याआधी अजिबात कल्पना नव्हती. कोरिंथचं अक्रोपोलिस किंवा पालामिडी किल्ल्यासारखा हा किल्ला प्रसिद्ध का नसावा हे एक कोडंच आहे. पण इथवर येण्याचं सार्थक झालं हे मात्र नक्की. आणि नाफ्प्लिओतून क्षितिजावर दिसणार्‍या किल्ल्याचं लारिस्सा हे सुंदर नावही कळलं!

(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 9:04 am | प्रचेतस

जबरदस्त बांधकामं आहेत ही. इतकी वर्षे टिकलीत हे विशेष.
फोटो छान आलेत खूप.

फारच देखणे आलेत फोटो! वेगळंच ग्रीस पाहायला मिळत आहे! पुभाप्र.

पद्मावति's picture

14 Dec 2016 - 12:54 pm | पद्मावति

अतिशय सुरेख लेखमालीका.

वेगळंच ग्रीस पाहायला मिळत आहे! पुभाप्र.

+१

निशाचर's picture

14 Dec 2016 - 11:01 pm | निशाचर

@ प्रचेतस, सगळं बांधकाम दोनअडिच हजार वर्षे जुनं नसलं तरी काही भाग नक्कीच आहे. अर्थात संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यांना महत्त्व असल्यानेही कदाचित इतर वास्तूंपेक्षा किल्ले जास्त टिकून राहिले असतील. वेळोवेळी त्याकाळच्या राजवटींनी डागडुजी आणि नवी बांधकामंही केली आहेत.
थोडं अवांतरः प्राचीन ग्रीक वास्तूंमधे (माझ्या मते) सगळ्यात सुस्थितीत आहेत इटलीतील पेस्तुमची (Paestum) देवळे. ही देवळेही सुमारे अडिच हजार वर्षे जुनी आहेत.

@ एस आणि पद्मावति, खरं सांगायचं तर बेटं आणि बीचेससाठी ऑफ सीझन असल्यामुळे ग्रीसच्या या थोड्या वेगळ्या भागात फिरणं झालं.