भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग ५ - पालामिडी किल्ला
पालामिडी किल्ला फिरून होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पूर्ण दिवस मोकळा होता. होटेलला जाऊन थोडा वेळ घालवला. पण itchy feet शांत बसू देईनात. मग नाफ्प्लिओपासून जवळच टोलो हे लोकप्रिय बीच रिझॉर्ट आहे. तिकडे थोडं फिरू आणि दुपारचं जेवण करू असा विचार करून निघालो. तिथे पोहोचायला गाडीने जेमतेम दहा मिनीटे लागली. गावातून जाणारा मुख्य रस्ता आणि समुद्र यांच्यामध्ये एकमेकांना खेटून होटेल्सची पलटण उभी होती. गावात शिरताना लागलेली एकदोन उपहारगृहं सोडली तर सगळा शुकशुकाट दिसत होता. इकडे यायची अभिनव कल्पना नक्की कोणाची होती आणि/किंवा त्या कल्पनेचं खापर दुसर्यावर कसं फोडता येईल, हा विचार दोन्ही डोक्यांत सुरू झाला होता. आणखी थोडं पुढे जाऊन बघू असं म्हणतम्हणत आम्ही गावाबाहेर पडलोही! फळांनी लगडलेल्या संत्र्याच्या बागा दिसू लागल्या. आणि अचानक रस्त्याच्या कडेला कोणी ग्रीक गॉड/गॉडेस ने (take your pick) मंद स्मित करत वगैरे... पण असं काहीही झालं नाही...
तर रस्त्याच्या कडेला प्राचीन असिनीची (Ancient Asine) दिशा दाखविणारा बाण दिसला आणि पुढेच असिनीची टेकडीही. असिनी टोलोच्या इतकं जवळ आहे, हे ठाऊक नव्हतं. असिनीला पाहण्यासारखं काही विशेष नाही, म्हणून ते आमच्या यादीत नव्हतं. ईथवर आलो आहोत तर जाऊन बघू असा विचार केला. थोडं चढून गेल्यावर एक नवीनच बांधलेलं ऑफिस लागलं आणि त्यात एक वयस्कर रखवालदारही होते. त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता, पण आम्हाला बघून त्यांना झालेला आनंद कळायला भाषेची गरज नव्हती. तसेही डिसेंबरमध्ये असे किती पर्यटक इकडे फिरकत असतील!
प्राचीन असिनी
असिनीचे अवशेष तीन वाजेपर्यंत उघडे होते आणि प्रवेशशुल्क नव्हतं. माहितीपत्रक घेऊन आत गेलो.
समुद्रकिनारी कास्ट्राकी नावाच्या टेकडीवर असिनी या प्राचीन अक्रोपोलिसचे अवशेष आहेत. सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून इथे मानवाची वस्ती होती. असिनीचा उल्लेख होमरच्या ट्रोजन युद्धातही येतो. त्याकाळी असिनी हे आर्गोस (Argos) या राज्याचा भाग होतं. आर्गोसचा राजा डायोमिडसच्या ट्रॉयला जाणार्या नौका टोलो बंदरातून निघाल्या होत्या.
ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात आर्गोस आणि स्पार्टाच्या युद्धात स्पार्टाची बाजू घेतल्याने नाफ्प्लिओसारखं असिनीसुद्धा आर्गोसच्या राजाने उद्ध्वस्त केलं. त्यानंतर असिनीच्या लोकांनी असिनी नावाचंच दुसरं शहर स्पार्टाच्या राज्यात वसवलं. आता अस्तित्वात असलेलं बरंचसं बांधकाम ख्रिस्तपूर्व ३०० सालादरम्यान मॅसेडोनियाच्या डेमेट्रिअस राजाने केलेले आहे.
.
पूर्वेच्या बुरुजाचे पत्थर आणि तिथून दिसणारा नजारा
रखवालदारबाबांकडून कुठे काय पाहायचं वगैरे काहीच माहिती मिळाली नव्हती. इतस्ततः पसरलेल्या दगडधोंड्यांतून फिरत एकेकाळचं समृद्ध अक्रोपोलिस डोळ्यांसमोर उभं करायला कल्पनाशक्ती पणाला लागत होती. पण हे Acropolis with a view असणार, एवढं मात्र नक्की!
एका ठिकाणी वाईन बनवायची Press Installation दिसली. तिथे दिलेल्या माहितीनुसार पायांनी दाबून द्राक्षांचा लगदा बनवून मग लाकूड, वजनासाठी दगड इत्यादी वापरून बनविलेल्या प्रेसने रस काढला जात असावा. जमिनीत गोल किंवा चौकोनी टाक्या बसविलेल्या असत, ज्यात द्राक्षांचा रस किंवा इतर द्रवपदार्थ गोळा होत असे.
टेकडीला अर्धीअधिक प्रदक्षिणा घातल्यावर आधी लांब दिसणारी समुद्रातील बेटं बरीच जवळ वाटायला लागली. उजवीकडे टोलोचा किनारा दिसत होता.
टोलोला परत जाईपर्यंत ग्रीकांची दुपारच्या जेवणाची वेळ झाली असावी. थोडा पोटोबा करून बीचवर मस्त भटकलो. निळंशार शांत पाणी बघून डोळे निवत होते. पण पाणी इतकं थंड की त्यात पाऊल टाकणं शक्य नव्हतं.
नाफ्प्लिओला संध्याकाळपर्यंत बरेच ग्रीक पर्यटक येवून पोहोचले होते. 'आमच्या' निवांत नाफ्प्लिओलाच ही माणसं गर्दी करायला का आली, असं वाटून गेलं. समुद्रतीरी असलेले कॅफे आणि पब्ज गजबजले होते. तो गलबला नको म्हणून पहिल्या दिवशी जेवलेल्या एका छोट्या टॅवर्नात रात्री जेवायला गेलो.
एका कुटुंबाने चालविलेल्या त्या टॅवर्नात पारंपारिक जेवण मिळायचं. आम्ही दुसर्यांदा तिथे गेल्याने जवळचे मित्र वगैरे असल्यासारखं आमचं स्वागत झालं! त्या कुटुंबातले आजोबा हीटरजवळच्या टेबलवरून उठून आम्हाला तिथे बसायला सांगत होते. फक्त त्यांनाच आठदहा शब्द इंग्रजी बोलता येत होतं; त्यांनी बहुधा खलाश्याचं काम केलेलं असावं. त्यांच्याशी हातवार्यांनी थोड्या गप्पा मारल्या. हाउस वाईन, झुकिनीची भजी, चिकन सुवलाकी आणि बाळकांदे घातलेला सश्याचा स्ट्यू असं मस्त जेवण झालं. डेझर्ट नको म्हटल्यावर आग्रहाने फळं समोर ठेवण्यात आली.
.
जेवल्यावर पाय मोकळे करणं भाग होतं. रात्री भटकायला मला आवडतंच. त्यात नाफ्प्लिओसारखं रोमँटिक शहर चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालं असेल तर क्या कहने!
(क्रमशः)
प्रतिक्रिया
19 Nov 2016 - 3:48 am | पद्मावति
खूप सुंदर सफर. फार आवडतेय ही लेखमाला.
19 Nov 2016 - 7:58 am | अजया
सुंदर फोटो आणि वर्णन.
19 Nov 2016 - 2:01 pm | यशोधरा
सुरेख! किती निळेशार पाणी आहे!
19 Nov 2016 - 3:55 pm | इशा१२३
फार सुंदर फोटो!निळाई सुखावतेय.
19 Nov 2016 - 5:51 pm | एस
अतिशय सुंदर! निळाई मनमोहक आहे.
22 Nov 2016 - 3:20 am | निशाचर
पद्मावति, अजया, यशोधरा, इशा१२३ आणि एस, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
तिथल्या आभाळाची आणि पाण्याची निळाई कशी मनात रुतत जाते, खरंच कळत नाही.