लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं.
प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते. आपण शिमला म्हणायचा अवकाश लगेचं अर्धांग केरळ म्हणतं.
त्यांत पुन्हा आपल्याला सुट्टी असते तेव्हा हवे ते हॉटेल ,रिसॉर्ट मिळत नसते आणि जेव्हा ते मिळते तेव्हा आपल्याला सुट्टी घेणे शक्य नसते. 'प्लॅनड लिव्ह' टाकणे आणि त्यानुसार सुट्टीचे वेळापत्रक आखून हॉटेल वगैरे बुक करून ठेवणे हा माझ्यासारख्यांसाठी मोठा दिव्य प्रकार आहे. मुळात कुठलीचं गोष्ट प्लॅनिंग करून करणे हे लै डेंजर काम असतंय.
लग्नानंतर पोरं सुद्धा प्लॅनिंग नुसार होऊ देणाऱ्या लोकांचं मला जाम कुतूहल वाटत आलेलं आहे. बोंबलत उंदडायचे प्लॅनिंग कसे करायचे हे अजून तरी मला कळलेले नाही.
रोजच्या रगाड्यातून आणि वेळापत्रकातून सुटका हाचं एकमेव हेतू असलेली सुट्टी परत वेळापत्रक आखुन
घालवण्यात काय मतलब ?
कुठल्या तरी टूर सोबत फिरायला जाणे हा अनुभव एकदाचं घेतला आणि त्या प्रकाराला कायमचा राम राम ठोकला. सकाळी लवकर उठून दिवसभर धावपळ करत प्रेक्षणीय(?) स्थळे पाहणे, टूर वाले सांगतील तिथे व मिळेल ते गपगुमान खाणे आणि रातच्याला हॉटेलवर जाऊन मगचं बूड टेकवणे हा असला प्रकार काय मला झेपत नाही.
माझी सुट्टीची एक आदर्श कल्पना आहे. साधारण एक भाग डोक्यात धरायचा आणि गाडी काढून तिकडे सुटायचं.
एखाद्या शांत निवांत गावाला जाऊन धडकायचं. दोन म्हणता चार वेळा चांगलं चुंगलं खाऊन पिऊन लोळत पडायचं.
गावाला समुद्रकिनारा असणे मस्ट (त्याचं काये आम्हा घाटी लोकांना समुद्राचं फार आकर्षण आहे).
निसर्गरम्य किनारे,आजूबाजूला हिरवीगार जंगले, अत्यंत तुरळक गर्दी आणि भरपेट जेवलेल्या अजगराप्रमाणे सुस्त पडलेले गांव हे कॉम्बिनेशन मला फार आवडते. सगळं कसं एकदम निवांत पाहिजे. आज काल बऱ्याच ठिकाणी हा निवांतपणाच मिळणे दुर्लभ झालेय. महाबळेश्वर वा तत्सम ठिकाणी निवांतपणा हुडकत जाणे म्हणजे वाळवंटात बर्फ पाहायला जाण्यासारखे आहे. कोकणात देखील बऱ्याचं किनाऱ्यांवर हीच बोंब झालेली आहे.
स्वप्नातल्या सगळ्या कल्पनांमध्ये एकदम फिट्ट बसणारा हा गाव मला अचानक अल्लाद्दिन ला जादूचा दिवा सापडावा तसा सापडला. असाचं गोव्यात कोळव्याच्या आजुबाजूला बोंबलत फिरत असताना अवचित 'कावेलोसिम' (गोवन बंधू भगिनींनी उच्चाराबद्दल माफ करावे) गाव हाताला लागले. अगदी 'लव ऍट फर्स्ट साईट' म्हणतात तसे एकदम पाहाताक्षणीचं हे गाव मला अतिप्रचंड आवडून गेले. हिरवळीने नटलेल्या टेकड्या,निसर्गरम्य गुळगुळीत रस्ते, दुतर्फा नारळांची उंचच उंच झाडे असे एकदम सर्वगुणसंपन्न म्हणावे तसे गांव. एकंदरीत गाव सुद्धा अतिशय स्वच्छ आणि टापटीप वाटले. घाटावरची खेडी त्यामानाने बरीचं अस्वच्छ असतात. गावात लोकवस्ती सुद्धा एकदम मोजकीचं. गावाच्या लोकसंख्येपेक्षा आलेले पर्यटक सुद्धा जास्त भरावेत,त्यांतले जवळपास सगळे परदेशी. गावात पोचलो तेव्हा कर्फ्यु लागलाय कि काय अशी शंका मनाला चाटून गेली.
अतिशय सुंदर असा पांढऱ्या वाळूचा स्वच्छ किनारा आणि त्यावर भर डिसेंबर महिन्यात अजिबात नसलेले लोक पाहून तर मला आनंदाने वेडचं लागायचे बाकी राहिले होते. पहिल्यांदा गेलो तेव्हा किनाऱ्यावर मोजून पाच लोक हजर होते, त्यांतले आम्ही दोघं आणि तीन जीवरक्षक. बास्स. .लगेचं ठरवून टाकले कि उरलेल्या दिवसांचा तळ इथेचं टाकायचा.
शांतादुर्गेची मूर्ती पूर्वी याचं गावी होती म्हणे, इन्क्विझिशन च्या काळात हलवली गेली असे म्हणतात. या गावात 'साल' नदी समुद्राला येऊन मिळते.
तळ टाकायचा ठरवून तर टाकले होते पण कुठे ऐन वेळेला कुठे बुकिंग मिळेल का याची धाकधूक होतीचं.
गावात रॅडिसन, हॉलिडे इन, द लीला आणि डोना सिल्विया वगैरे मोजून चार पाचचं रिसॉर्ट आहेत.सगळीकडे जाऊन चौकश्या करायला सुरुवात केली.जवळपास सगळ्याचं ठिकाणी जागा उपलब्ध होती. 'द लीला गोवा' चे दर पाहिले आणि एक मिनिट देखील वाया न घालवता माघारी फिरलो. साला युरोप टूर होईल इतका एका दिवसाचा दर होता. त्यामानाने बाकीचे रिसॉर्ट बरेचं परवडेबल आहेत. गावाजवळ बरेचं सर्व्हिस अपार्टमेंट सुद्धा अतिशय स्वस्तात मिळतात पण त्यांना रिसॉर्ट ची सर नाही. मुख्य कारण म्हणजे सगळे रिसॉर्ट किनाऱ्याला लागून आहेत.
खाण्या पिण्यासाठी सुद्धा एवढ्या छोट्याश्या गावात मुबलक पर्याय उपलब्ध आहेत.
साल नदीच्या मुखापाशी 'फिशरमन्स व्हार्फ' रेस्टॉरंट आहे. जबरदस्त लोकेशन आणि अफलातून चवीचे जेवण हा संगम येथे जुळून येतो. आटोपशीर असा पण नानाविध कॉकटेल्स पुरवणारा लाकडी बार काउंटर आत घुसल्यापासून खुणावत राहतो. तिथले प्रॉन्स चे पदार्थ तर भयानक चविष्ट आहेत. जवळपासचं एक चायनीज रेस्टोरंट आहे ते सुद्धा चवीला उत्तम आणि अत्यंत वाजवी दरांत.
एका रात्री भूक लागल्यामुळे मी इकडे तिकडे भटकत असताना 'माईक्स प्लेस' म्हणून एक हॉटेल रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असते हा शोध लागला. काही खायला मिळेल का या उद्देशाने आत डोकावलो तर काही परदेशी पर्यटक मंडळी गाणी वगैरे म्हणत वेळ घालवत होती. आत गेलो आणि एक टेबल धरून उगाचं बसून राहिलो. मी बसलेला बघून थोड्या वेळाने हॉटेलचा मालक 'माईक' जवळ आला आणि काय हवे नको विचारपूस करू लागला. रात्री एकच्या आसपास त्यानी अप्रतिम चवीचा पोर्क राईस आणि गोवन फिश करी असा मेनू तयार करून दिला. तेव्हापासून कधीही कावेलोसिम ला गेलो कि 'माईक्स प्लेस' ला भेट देणे होतेचं.गावातल्या मुख्य रस्त्यावर संध्याकाळी एक दोन हातगाड्या लागतात. तळलेले मासे वगैरे खाण्यासाठी झकास स्पॉट आहे हा. प्रसिद्ध असे 'मार्टिन्स कॉर्नर' सुद्धा कावेलोसिम पासून जेमतेम पंधरा किमीवर आहे.
मुळात या भागातले रस्ते इतके नयनसुखद आहेत कि पंधरा वीस किमी जेवण्यासाठी जाऊन यायला काहीचं वाटत नाही. गोव्याला भेट देणाऱ्या बऱ्याचं जणांचे आकर्षण असलेल्या बागा बीचवरचा 'टिटो'ज क्लब' ची या गावात सुद्धा एक शाखा आहे. फरक इतकाचं कि गर्दी अत्यंत कमी असते. आतापर्यंतच्या अनुभवातून मला उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोवा अधिक भावलेला आहे.
मनमुराद आळस उपभोगणे, खाण्या पिण्याची चंगळ करणे आणि सुशेगाद पडून राहणे हे सर्व करता येण्यासारखे 'स्वप्नातले गांव' अखेर मला सापडलेचं.
एकंदरीतच सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी हे 'कावेलोसिम' एकदा अनुभवाचं.
प्रतिक्रिया
14 Sep 2016 - 12:15 pm | यशोधरा
केळोशीबद्दल लिहिलंय का तुम्ही? छान लिहिलंय.
14 Sep 2016 - 12:20 pm | प्रीत-मोहर
यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच म्हणतात :(
14 Sep 2016 - 12:22 pm | यशोधरा
कावेसोशी!!??!! हम्म्म...
14 Sep 2016 - 1:41 pm | गणामास्तर
प्रिमोतै आणि यशोतै,स्थानिक उच्चार आणि सध्याचा प्रचलित उच्चार यांत काही तरी गडबड असणार हे अगोदरचं लक्षात आले होते म्हणून लेखातचं माफी मागून मोकळा झालो होतो :)
योग्य उच्चार सांगितल्याबद्दल धन्स.
14 Sep 2016 - 1:46 pm | यशोधरा
ते पोर्तुगीज धाटणीचे उच्चार आहेत. मला वाटते ख्रिश्चन लोकांमध्ये तेच अधिक प्रचलित असावेत परंतु हिंदू जनता ( की अख्रिश्चन म्हणू) स्थानिक उच्चार करत असावी. गोव्याला गेल्यावर एक फेरी केळोशीला असतेच. फार टुमदार असे अजून तरी हिरवे राहिलेले गाव फार आवडते.
14 Sep 2016 - 2:24 pm | प्रीत-मोहर
कावेलोशी. सॉरी ग टायपो झाला
14 Sep 2016 - 2:31 pm | यशोधरा
तेच ते गं. :) केळोशी म्हणायचं सोडून ही नावे कशाला प्रचलित करुन ठेवतात, कोण जाणे.
14 Sep 2016 - 2:42 pm | पैसा
ते पोर्तुगीज स्पेलिंगमुळे. ते स्पेलिंगची 'क्यू' ने सुरुवात करत ना. आणि एक पाहिलंय जिथे फॉरेनर टुरिस्ट जास्त येतात , तिथे चुकीची नावे जास्त प्रचलित होतात. फोंड्याच्या जवळपास हा प्रकार दिसणार नाही. वेर्णाचे मूळ नाव वरेण्यपूर तसे केळोशीचे मूळ नाव कर्दळीपूर म्हणे.
14 Sep 2016 - 3:11 pm | सूड
मध्यंतरी मित्रमंडळ गोव्याला जाऊन आल्यानंतर ठिकाणांची नावं पोर्वरीम, पंजीम अशी काहीशी उच्चारल्यानंतर झालेला आमचा संवाद आठवला.
15 Sep 2016 - 9:39 am | प्रीत-मोहर
हो ना, देवनागरीत लिहीताना पर्वरी आणि पणजी लिहितो. उच्चारतो पण तसच. मात्र पोर्तुगीज पगडा आहे स्पेलिंग वर .
15 Sep 2016 - 10:48 am | गॅरी ट्रुमन
गोव्यातील काहीकाही ठिकाणांची मूळ नावे समजली. उदाहरणार्थ Mandrem म्हणजे मांद्रे, Loutolim म्हणजे लोटली,Benaulim म्हणजे बाणावली, Canacona म्हणजे काणकोण इत्यादी. पण काही ठिकाणांच्या मूळ नावाचा अजिबात अंदाज आलेला नाही. उदाहरणार्थ Sanguem, Curchorem, Quepem, Curtorim, Sanquelim,Salcette इत्यादी ठिकाणांची मूळ नावे काय असतील याचा उलगडा होऊ शकलेला नाही. Marcaim म्हणजे मडकई का?
(गोवा अतिप्रचंड आवडणारा) ट्रुमन
15 Sep 2016 - 11:04 am | यशोधरा
Sanguem - सांगे, Curchorem - कुडचडें, Quepem- कुपें, Sanquelim - साखळी, Salcette - साष्टी
15 Sep 2016 - 11:11 am | प्रचेतस
Salcette - साष्टी का साळशेत??
आणि साष्टी हे गाव होते का प्रांत?
मुंबईत पण साळशेत नावाचे एक बेट होते असं ऐकलंय.
15 Sep 2016 - 11:20 am | यशोधरा
साष्टी/ सासष्टी हे मी ऐकले आहे.
साळशेत हे नाव ऐकलं नाहीये, असू शकेल. पैताई वा प्रीमो अधिक योग्य सांगू शकतील.
15 Sep 2016 - 12:26 pm | पैसा
साळशेत तालुका. सा(स)ष्टी प्रांत. सहासष्ठ गावे असलेला म्हणून बहुधा. बाकी बारदेश, तीसवाडी अशीच नावे आहेत. कुंपे आता केंपे म्हणून जास्त प्रचलित आहे.
गोव्यातली गावांची आणि प्रांतांची अनेक नावे मुंबई आणि रत्नागिरीच्या आसपास सुद्धा सापडतात.
15 Sep 2016 - 12:18 pm | गॅरी ट्रुमन
धन्यवाद यशोताई.
मुंबईत साळशेत नावाचे बेट होते की साष्टी नावाचे? इतिहासात इंग्रजांना वडगाव (की सालबाईच्या) लढाईनंतर तहात साष्टी बेट मिळाले असे काहीसे वाचल्याचे आठवते. अर्थात एकाच नावाची दोन गावे असू शकतातच. अमेरिकेत लिंकन नावाची तीन-चारशे गावे-शहरे नक्कीच असतील तेव्हा भारतात साष्टी नावाची दोन ठिकाणे असायला काहीच हरकत नाही :)
15 Sep 2016 - 1:22 pm | यशोधरा
ही पहा एक लिंक, इथे गोव्यातील गावांची जुनी व नवीन नावे दिली आहेत.
गोव्यातील गावे
15 Sep 2016 - 1:25 pm | पैसा
अतिशय उपयोगी लिंक आहे.
15 Sep 2016 - 2:14 pm | प्रीत-मोहर
कुपे नाही ग केपें
15 Sep 2016 - 2:17 pm | प्रीत-मोहर
मागे कधीतरी स्पेलिंग बदल केलेत साखळी च -sankhali आणि केंपें च kepem अशी
15 Sep 2016 - 11:10 am | यशोधरा
Curtorim - हे बहुतेक कुठ्ठाळे, साष्टी तालुक्यातले असले तर.
15 Sep 2016 - 12:28 pm | पैसा
Curtorim म्हणजे कुडतरी. cortalim म्हणजे कुट्ठाळी. जुने नाव कुशस्थळी.
15 Sep 2016 - 12:31 pm | यशोधरा
ओह, अच्छा! धन्यवाद पैतै. :)
27 Sep 2016 - 2:49 pm | प्रदीप
दैवताचे देऊळ तिथे सुरूवातीस होते. मग पोर्तुगीजांनी जबरदस्तीने 'त्यांच्या आगमनाच्या आनंदाखातर' जबरदस्तीने धर्मांतरे करण्यास सुरू केल्याने, काही सजग हिंदू भक्तांनी देव तिथून उठवून, ते आता आहेत तेथे, म्हणजे प्रियोळ येथे आणले व देऊळ तिथे पुनः वसवले.
16 Sep 2016 - 12:27 am | साहना
https://github.com/IndiaWikiFiles/Goa/wiki/Konkani-and-Marathi-Names-of-...
14 Sep 2016 - 12:16 pm | सुबोध खरे
फाऊल
फोटो कुठाय?
कशावरून कावेळोशी ला गेला होतात?
14 Sep 2016 - 12:16 pm | गॅरी ट्रुमन
फोटु कुठेत हो गणामास्तर?
प्रचंड सहमती.
14 Sep 2016 - 12:21 pm | प्रीत-मोहर
सुंदर गाव आहे हे. आम्ही बरेचदा जातो. माझ्या आणि नवर्याचे असे दोघांचे सर या गावात राहतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जाणं होतच. स्वच्छता आणि हिरवीगार टेकाडं अजुन आहेत या गावात. ती तशीच टिकुन रहावीत.
14 Sep 2016 - 12:22 pm | झुमकुला
पुढच्या वेळी सुट्ट्यांची काळजी करू नका मास्तर, अट फक्त एकच, पुढच्या वेळी आम्हाला घेऊन जायचं.
14 Sep 2016 - 12:25 pm | सतिश गावडे
परवाच ऐकले होते तुमच्याकडून या गावाबद्दल. या धाग्यात फोटो पाहता आले असते तर उत्तम झाले असते. :)
14 Sep 2016 - 12:27 pm | इरसाल
ते फिशरमन बद्द्ल आपल्या खादाड गविंनी आधीच लिहुन ठेवलेय मिपावर !
छान जावे लागेल म्हणजे एकदा.
14 Sep 2016 - 12:28 pm | इरसाल
तुम घाटी, मय घाटी,
तुम घाटी, मय घाटी,
तुम तो जाके आये ना भो,
अभी हमारी बारी है जानेकी .......समुद्रकाठी !!!!!!
14 Sep 2016 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लिहिलंय ! पण फोटो नसल्याने मिपाकर त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे ;) लवकर टाका फोटो, अजिबात आळस न करता :)
14 Sep 2016 - 1:31 pm | प्रचेतस
कधी जायचं मास्तुरे?
14 Sep 2016 - 1:50 pm | गणामास्तर
इतक्या वेळा जाऊनसुद्धा जास्त फोटो वगैरे काढण्यात विशेष वेळ घालवावा वाटलं नाही, आळस हेचं कारण आणि हापिसातून लिहिताना हातासरशी फोटो नव्हते.
तरी सुद्धा घरी गेल्यावर शोधून जे काही आहेत ते टाकतो.
14 Sep 2016 - 2:36 pm | टवाळ कार्टा
ट्रिप प्लानिंग वगैरे करायचा आळस असेल तर ते काम माझ्याकडे दे...गाडी बुकिंगपासून रुम बुकिंगपर्यंत सगळे करून देतो...एकूण किंमतीच्या ५% माझे कमिशन म्हणजे रु.१०००/- वर रु.५०/-
14 Sep 2016 - 2:41 pm | पथिक
छान माहिती.
14 Sep 2016 - 2:48 pm | पैसा
छान लिहिलंय!
14 Sep 2016 - 5:51 pm | पुंबा
जाणार म्हणजे जाणार इथे.. फोटो टाका की मास्तर..
15 Sep 2016 - 9:12 am | हलकट बाब्या
मास्तुरे फोटू टाका की.. नाही तर तुमच्या दिव्यदृष्टीने आम्हाला पण कावलोसिम दर्शन घडवा..
आत्ताच जानार .. हितनंच जानार.. .. ... ;)
15 Sep 2016 - 9:26 am | चंपाबाई
छान
15 Sep 2016 - 10:38 am | गॅरी ट्रुमन
सर्व फोटू प्रचंड आवडले गेले आहेत. विशेषतः तो फेसाळणार्या लाटांचा (वरून दुसरा) आणि समुद्रकिनार्याजवळील झाडांचा (वरून चौथा) खूपच मस्त. संध्याकाळच्या वेळी अस्त होणारा सूर्य तर अगदीच अप्रतिम पकडला आहे त्या फोटोमध्ये. समुद्रकिनार्यावरची वाळू किती मऊ असेल आणि अशा ठिकाणी शॅकमध्ये बसून फ्रेंच फ्राईज खायला (आमची उडी त्याहून फार जास्त जात नाही) किती मजा आली असेल याचा अंदाज इथे मुंबईत बसून नुसता तो शेवटचा फोटो बघून आला!!
ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
15 Sep 2016 - 10:51 am | टवाळ कार्टा
फोटो???
15 Sep 2016 - 11:01 am | लोनली प्लॅनेट
मस्त लिहिलंय रे मी फोटो जालावर शोधले पण मिळाले नाहीत
15 Sep 2016 - 11:10 am | अजया
वाखु साठवली आहे.डिसेंबरात मोकळे गोव्यातले देखणे गाव म्हंटल्यावर एकदम आनंद झाला!
15 Sep 2016 - 11:24 am | अभ्या..
द. गोवा हे भारी आहे असे अनुभवी मत नोंदवून मी खाली बसतो.
15 Sep 2016 - 2:24 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला.
अजयासारखीच वा खु सा..
येथे नक्की जावेसे वाटते आहे, कधी जमते ते पाहू.
स्वाती
15 Sep 2016 - 11:17 pm | रातराणी
छान लिहलय.
15 Sep 2016 - 11:52 pm | साहना
सदर गावांचे नाव केळशी आहे.
16 Sep 2016 - 12:08 am | अभ्या..
ते शिवरायांचे गुरु बाबा याकूतांचे केळशी का?
16 Sep 2016 - 12:09 am | अभ्या..
श्रध्दास्थान असे म्हणले तरी चालेल, उगी वादाला तोंड नको.
16 Sep 2016 - 12:28 am | साहना
काही माहिती नाही केळशी नावाची अनेक गांवे कोंकणात आहेत.
19 Sep 2016 - 11:02 am | नन्दादीप
ते केळशी दापोली - रत्नागिरी मधल... हे गोयंचा केळोशी....
16 Sep 2016 - 2:50 am | संदीप डांगे
गणामास्तर, लै भारी... फोटो न काढण्याची फिलोसोफी आवडली. स्वप्नातलं गाव स्वप्नातच बरं... फोटोत तितकंसं उतरत नाही कधीकधी!
16 Sep 2016 - 11:54 pm | निओ
मनमुराद आळस उपभोगणे.. :)
19 Sep 2016 - 1:36 am | गामा पैलवान
सगळ्यात भेजातोड नाव म्हणजे Pernem. ह्याचा उच्चार पेडणे असा कधीतरी होईल काय?
-गा.पै.
19 Sep 2016 - 6:43 pm | आदूबाळ
... आणि Arpora = हडफडे.
28 Sep 2016 - 5:20 pm | प्रीत-मोहर
आबा अजुन भरपूर भयंकर स्पेलिंगे असलेली गावे आहेत :( लिस्ट देईन जमल तर
19 Sep 2016 - 12:17 pm | सस्नेह
मस्ताड लिहिलंय ! केळोशी बघायची प्रचंड उत्सुकता जागी झालीय.
19 Sep 2016 - 11:18 pm | नीलमोहर
वर्णन वाचून उत्सुकता वाढलीय, जावंच लागेल इथे,
27 Sep 2016 - 2:29 pm | टर्मीनेटर
मास्तर कुठे राहिला होतात तुम्ही? मी नोव्हेंबर मध्ये जायचा प्लॅन करतोय.
27 Sep 2016 - 2:37 pm | गणामास्तर
खरडवही मध्ये देतो हॉटेल्स चे नंबर आणि पत्ते.
27 Sep 2016 - 2:41 pm | हलकट बाब्या
मास्तर .. आम्हाला पन द्या की .. !!
28 Sep 2016 - 9:10 pm | अभ्या..
बाब्या लका, खरडवहीत लिहिले काय आन गावात पोस्टर लावले काय. एकच असतंय. सगळ्याना दिसतंय.
व्यनिबिनी केला तर जरा प्रायवसी म्हणायची.
28 Sep 2016 - 6:02 pm | कंजूस
आवो मास्तर समदे फोटु हाफचड्डीतले आहेत असं लिवा मग नाय विचारणार फोटु कुटाय? नावांची चर्चा करून काय गोवा दाखवतसा होय?गोवा अन हिमालयच्या धाग्यावर अर्धे प्रतिसाद "आमचोच गाव त्यों" .र्हाऊ द्या काटा तसाच.
आमी जाऊन तरी करनार काय गोंयात? कढीभात?
28 Sep 2016 - 6:45 pm | यशोधरा
=))
बेबिन्का, दोदोल, सांदणं, पातोळ्या, मत्स्याहार, मांसाहार, पोर्तुगीज चिकनची रेसीपी - chicken Cafreal, Kulkuls, आणि अनेक असतील. गोडात आणि शाकाहारी र्श्प्यापण खूप आहेत हो, पण कसेही शाकाहारी वा मांसाहारी जेवण असले तरी शेवटी घासभर कढीभात हवाच. :)
28 Sep 2016 - 7:21 pm | प्रीत-मोहर
+१११
दिसत, खतखतें विसरलीस यशो.
28 Sep 2016 - 7:23 pm | प्रीत-मोहर
दोस
28 Sep 2016 - 7:35 pm | यशोधरा
नाही गं विसरले नाही, किती लिहायच्या रेश्प्या असे झाले. शा आणि मां उडीथमेथ्यापण राहिल्याच की. साण्णंपण.
केळफूलाची, मायाळूची भाजी, ओल्या काजूची उसळ.. किती लिहायचे सांग आता. ;)
1 Oct 2016 - 1:42 pm | प्रीत-मोहर
स्लर्प.खरय.
मी आज बिंबलांची उड्डामेथी केलीय. यो जेवणाक
29 Mar 2017 - 4:27 pm | प्रसाद गोडबोले
वाह वाह सुरेख लेखन !
आमचा आवडता बीच म्हण्जे आरंबळ बीच . तेथुन चालत चालत आम्ही कालचा बीच ला , स्वीट वॉटर लेक ला गेलो होतो . ते डोंगर कड्यावरचे मार्केट मस्त आहे !
तुम्ही गेलाय का तिकडे कधी ? नक्की जा , तुम्हालाही आवडेल !!
30 Mar 2017 - 5:28 pm | गणामास्तर
गेल्यासारखं वाटतंय बरं का. हे सगळे चालत चालत फिरून बघितल्यासारखे वाटते आहे. परंतु नक्की काहीचं आठवत नाहीये म्हणजे बहुदा भास असावा किंवा स्वप्न असावे :)