‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं. ‘ आज दुपारी भोजनानंतर राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र आपल्या सभेत येणार आहेत, तुम्ही सर्वांनी त्यावेळी तिथं यावं, अर्थात सर्व मर्यादा पाळुनच ही भेट होईल, तसेच पुर्वेकडच्या काही राज्यांनी या स्वयंवराच्या विरोधात एकत्र येउन युद्धाची तयारी सुरु केली असल्याची वार्ता आलेली असल्यानं या प्रस्तावावर एक दोन दिवसांत आपण निर्णय घ्यावा असं मंत्रिपरिषदेचं विचार आहे, अर्थात तुम्हां तिघींवर कोणताही दबाव नाही निर्णय घेण्यासाठी हे लक्षात ठेवा परंतु त्याचवेळी हे आपलं राज्य, प्रजा आणि समाज या सर्वांचाही विचार तुम्ही कराल एवढ्या ज्ञानवती तुम्ही आहात हे मी जाणतो ‘
पुढे चालु.....
आम्ही हळुच राजसभेच्या दालनात डोकावुन आलो, स्वयंवराच्या वेळी होती त्यापेक्षा वेगळी तयारी चालु होती तिथं, स्वयंवरात सत्ता आणि संपत्तीचं दर्शन मांडल्यासारखं होतं, पण आज सगळी तयारी शांत आणि कोमल रंगांत होत होती, सगळीकडं पांढ-या र्ंगांच्या आक्रुती काढलेल्या होत्या, जमिनीवर विविध फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या, तिथुन निघुन आम्ही भोजन शाळेत आलो, भोजनं लवकरच आटोपुन आम्ही तयार होण्यासाठी आपापल्या दालनात गेलो. आज मी हट्टानं आईकडुन ती सुवर्णभुषित वस्त्रं परवानगी मिळवली होती. काही वेळातच आम्हांला राजसभेत बोलावण्यासाठी महिषिदलांच्या तुकड्या दालनाबाहेर येउन उभ्या राहिल्या. आम्ही सर्वजण राजसभेत पोहोचलो, आज ताईने नेमका निळ्या रंगांचा वस्त्रसाज नेसला होता अन् त्यावर मोत्यांचे अलंकार घातले होते. काही क्षणांतच एक ज्येष्ठ मंत्रि आपल्या सोबत राजा दशरथ व त्यांच्या कुटुंबियांसमवेत येत असल्याचं समजलं, आम्ही चौघी, आई आणि काकु एका वस्त्रपटाच्या मागे थांबलो होतो. राजा दशरथ आणि त्यांच्या चार पुत्रांचं राजसभेत आगमन झालं तो क्षण खरंच भारावुन टाकणारा होता, स्वयंवराच्या दिवसानंतर राम आणि लक्ष्मणांना आम्ही प्रथमच पाहात होतो, त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच अतिशय थोडेसेच अलंकार घातलेले होते, राजा दशरथाच्या डोक्यावरचा मुकुट मात्र रक्तवर्णिय मण्यांनी सजवलेला होता, राम आणि लक्ष्मणांच्या चेह-यावरचं तेज या राजस रुपात जास्त खुलुन येत होतं.
सर्वजण आसनस्थ झाल्यावर राजा दशरथांनी सर्व सभेला आपल्या चार पुत्रांची ओळख करुन दिली, ज्येष्ठ राम, मग लक्ष्मण, मग भरत आणि शत्रुघ्न. ‘ राजा जनका, माझा ज्येष्ठ पुत्र राम आणि तुझी कन्या सिता, यांचा विवाह तु योजलेल्या स्वयंवराच्या निर्णयाच्या रुपाने ठरलेला आहे, त्यांस मी राजा दशरथ रामाचा पिता तसेच अयोध्येचा राजा या दोन्ही नात्यानं मान्यता देत आहे, तसेच त्याचबरोबर माझे इतर तीन पुत्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह तुझ्या कुलकन्या उर्मिला,मांडवी आणि श्रुतकिर्ति यांचेबरोबर व्हावा असा प्रस्ताव मांडतो आहे.’ या भेटीची सुरुवात एवढी स्पष्ट होईल अशी अपेक्षा बहुधा काकांनी देखील केली नसावी, कारण त्यांच्या चेह-यावर एक संदिग्धता दिसुन येत होती. ‘ राजा दशरथा, आपण पुढे केलेल्या या प्रस्तावावर मी माझ्या कुलगुरु, मंत्रिसभा आणि कुटुंबासोबत विचार केला आहे, त्यानुसार राजकीय द्रुष्ट्या या प्रस्तावात काही उणे आम्हांला आढळले नाही, परंतु माझ्या कुलकन्यांना याबाबत निर्णय घेण्यासाठी तुमच्या पुत्रांना भेटण्याची अनुज्ञा आणि काही वेळ हवा आहे.’ काकांनी तेवढ्याच स्पष्टपणे आमचा विचार सभेपुढे ठेवला.
आश्चर्याची गोष्ट झाली, काही क्षणांतच राजा दशरथांनी ही बाब मान्य केली, दुस-या दिवशीच्या दुस-या प्रहरातच नगरीच्या मुख्य वनांत आम्हां सर्वांच्या भेटीची व्यवस्था करण्यात येणार होती. राजसभेतलं काम संपले होते, राजा दशरथ आणि सर्वजण उठुन जाण्यास निघाले तेंव्हा सर्वांनी एकमेकांना आदराने नमस्कार केला, परंतु माझी मनस्थिती मात्र नेहमीप्रमाणे व्दिधा झालेली होती, नमस्कार करताना देखील माझं लक्ष लक्ष्मणाकडंच होतं, मात्र चेहरा अतिशय निश्चल होता, ना भिती ना आनंद ना उत्सुकता. त्याच्या चेह-यावर मात्र एक प्रसन्न हास्य होतं, अगदी रामाच्या चेह-यावर होतं तसंच. त्या दोघांच्या चेह-यात खुप साम्य नव्हतं, मात्र दोघंही एका विशिष्ट बंधनानं बांधले गेले असावेत असं उगाच वाटत होतं. तसं मी आईला बोलुन दाखवलं तर आई म्हणाली,’ असंच साम्य तुझ्या आणि सितेमध्ये वाटतं नेहमीच, मन आणि विचार जुळत असले की असा एक अबोल आणि अद्रुश्य बंध तयार होतो दोन व्यक्तींमध्ये. असाच बंध विवाहानंतर तुमच्या पतीसोबत व्हायला हवा, प्रक्रुति आणि पुरुष या परस्परपुरक निसर्गशक्तींचा हा बंधच तुमचं पुर्ण आयुष्य आणि तुमच्या वंशविकासाला कारणीभुत होतो.
आज मात्र माझं आईच्या अशा बोलण्याकडं लक्ष लागत नव्हतं, आई दालनातुन गेल्यावर दासिंना सर्व दिवे शांत करायला सांगुन मी झोपायचा प्रयत्न करायला लागले, काही केल्या झोप येत नव्हती, पलंगावर पडल्या ठिकाणाहुन गवाक्षातुन बाहेरचं आभाळ पाहात होते, चंद्रकोर अगदीच बारीक होती, मात्र तिच्या मागं असणारा लांबवरचा तारा मात्र पुर्ण तेजाने चमकत होता, छोट्याश्या गवाक्षातुन दिसणा-या ओंजळभर आभाळात चंद्र सोडुन उरलेल्या जागेला प्रकाशित करायचा पण घेतल्यासारखा चमकणारा तो तारा माझ्या मनात खोल उतरु पाहात होता. पहाटे कधीतरी झोप लागली असावी.
मी सकाळी उठले तेंव्हा सुर्य बराच वर आला होता, आणि पहिल्याच प्रहरात उपवनांत जायचं होतं, माझ्या एका दासीला मांडवी आणि श्रुतकिर्तीच्या दालनात जाउन त्यांची तयारी कितपत झाली आहे ते पाहायला सांगितलं आणि मी स्वत्ः ताईच्या दालनात गेले, तिनं तिचा आवडता धवल उत्तरीय आणि वक्षवस्त्र नेसण्याची तयारी करुन ठेवली होती, ति स्नानादी आन्हिकं आटोपुन देवघरात गेली आहे असं कळालं. ती परत येईपर्यंत मी तिथेच थांबले. ताईनं आल्या आल्या मला माझ्या तयारीबद्दल विचारलं, ‘ मी अजुन काहीच ठरवलं नाही, तु मात्र छान दिसशील या शुभ्र वस्त्रांत, मी सुद्धा असंच काही तरी करावं का, काल आई म्हणत होती की तुझ्या माझ्यात एक विश्वासाचा बंध आहे असं’
'हो आहेच, लहानपणापासुन आपणांसर्वांना ज्याप्रमाणे वाढवलं आहे इथं तो बंध तुझ्या माझ्यांतच नाही तर आपणां सर्वांतच आहे, याबद्दल आपण नंतर बोलु, आधी तु तयार हो’
मी तिथुन निघाले, मनांत काही विचार चालु होतेच, समोरुन काही दासी येताना दिसल्या त्यांना एका कामाला लावलं अन् माझ्या दालनात येउन माझी तयारी सुरु केली, काही मोठया पेटयात ठेवलेले सामान काढायला लावलं, तेवढ्यात मगाशी गेलेली दासी परत आली, तिनं येउन सांगितलं की त्या दोघी सुवर्णलंकाराच्या सहित निळ्या रंगांच्या वस्त्रांची तयारी करत आहेत, मी देखील माझी तयारी करायला सुरुवात केली, काही वेळानं आई दालनात आली, आणि त्याचवेळी मी मागवलेल्या वस्तु घेउन दासी सुद्धा येत होत्या, त्यांच्याकडं पाहुन आईनं विचारलं, हे काय आहे, उर्मिले, हे सर्व का मागवलं आहे आज,
क्रमशः
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०६ http://misalpav.com/node/36166
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७ http://misalpav.com/node/36252
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०८ http://misalpav.com/node/36339
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०९ http://misalpav.com/node/36429
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १० http://misalpav.com/node/36490
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १० http://www.misalpav.com/node/36541
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 10:17 am | आनन्दा
गुड गोईंग..
17 Aug 2016 - 10:44 am | सुबक ठेंगणी
सुंदर!
आणि हो, विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद. :)
17 Aug 2016 - 10:49 am | अभ्या..
सुरेख वर्णन.
वाचतच राहावे असे वाटते पण ५० रावानी फार लहान लहान भाग केलेत. :(
17 Aug 2016 - 2:41 pm | पैसा
वाचते आहे. आता याच लयीत लिहीत रहा!
17 Aug 2016 - 6:51 pm | सूड
वाचतोय.
17 Aug 2016 - 9:42 pm | nishapari
खूप सुंदर आहे .
28 Dec 2016 - 6:18 pm | नीलनिसर्गा
सुंदरच लिहीलयं... लवकर पुढचे भाग टाका... प्रतिक्षेत