क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात. अशा सामान्यातल्या असामन्य क्रांतिकारकांपैकी एक नाव म्हणजे मास्टरदा उर्फ सूर्य सेन ज्याने फक्त एका ध्वजारोहणासाठी आपले आयुष्य भिरकावुन दिले!
चितगांव च्या नोआपारा येथील एक शिक्षक राजमणी सेन व त्यांच्या पत्नी शशीबाला यांच्या पोटी २२ मार्च १८९४ रोजी सूर्य सेन यांचा जन्म झाला. शालेय सिक्षण संपवून मास्टरदा पुढील शिक्षणासाठी कोलकत्त्यास आले आणि महाविद्यालयिन जीवनातच त्यांच्या भेटी अनेक क्रांतिकारकांशी व देश्भक्तांशी पडल्या व नकळत ते देशकार्यात सामिल झाले. आपले शिक्षण संपवुन पदवी घेउन ते चितगांवला परत आले आणि त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. त्यांना शिकवण द्यायची होती ती राष्ट्रवादाची. एक कॉंग्रेसकार्यकर्ता म्हणुन प्रवेश करीत मास्टरदा १९१८ साली भारतिय राष्ट्रिय कॉंग्रेसचे चितगांवचे अध्यक्ष झाले. मास्टरदांनी अनेक सत्याग्रह व आंदोलनात भाग घेतला व त्यांनी तुरुंगवासही पत्करला. सुटका होताच त्यांनी पुन्हा आपल्या कार्याला आरंभ केला. मात्र कॉंग्रेसचे स्वातंत्र्यप्राप्तीचे धीमे मार्ग त्यांना भावले नाहीत. नुसत्या सभा वा आंदोलने यांनी इंग्रज हटणार नाहीत व त्यांना हटविण्यासाठी सशस्त्र संघषाची आवश्यकता आहे असे त्याच्या लक्षात आले.त्यांनी ’युगांतर’ संघटनेचा प्रचार केला व अनेक गावात शाखा स्थपन केल्या.
मास्टरदांनी बहुत्वेकरुन उत्तरेत गाजलेल्या ’हिंदुस्थान प्रजासत्ताक समाजवादी सेना’ या संघटनेचे कार्य जोमाने पूर्वेत सुरू केले. मास्टरदा हे अत्यंत कुशल संघटक होते. त्यांच्या कार्यात बंगालचे अनेक वाघ व वाघिणी उस्फुर्तपणे सामिल झाले. मास्टरदा व त्यांच्या सेनेने साम्राज्याला पहिले आव्हान दिले ते भरदिवसा चितगांवची ’आसाम - बंगाल रेल्वे’ कचेरी लुटुन!(दि. २३ डिसेंबर १९२३). मास्टरदांचे स्वप्न व अंतिम ध्येय होते ते शस्त्रसज्ज होऊन व इंग्रज सैन्याशी दोन हात करून अखेर स्वातंत्र्य मिळविण्याचे व स्वतंत्र हिंदुस्थानात तिरंगा फडकलेला पाहण्याचे. बंगालच्या एका भागात लहानशा संख्येने असलेले आपण व आपले सहकारी सैन्य कसे उभारणार व ते सैन्य किती लढु शकणार हा विचार त्यांना बाधला नाही. केल्याने होत आहे रे.. या वचनावर श्रद्धा ठेवुन देशप्रेमाने भारलेल्या मास्टरदांनी एक धाडसी योजना आखली. चितगांव काबिज करुन तिथे आपला स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा दिमखाने फडकविण्याची! आज चितगांव, उद्या संपूर्ण बंगाल आणि परवा हिंदुस्थान. आपण ठिणगी पेटवायची, उद्या तिचा वडवानल होईल व तो इंग्रजांना भस्मसात करेल. मात्र ही ठिणगी पेटविताना आपणही भस्मसात होऊ याची लवमात्र भिती त्यांना नव्हती.
मास्टरदांनी नुसते स्वप्न पाहिले नाही तर त्यांनी ते साकार कराच्या दृष्टीने पावले उचलली. सैन्य उभारणीस सुरुवात करताच त्यांना बंगालचे वाघ व वाघिणी सैनिक म्हणुन लाभले. सैन्य उभरणीस सुरुवात झाली आणि योद्धे जमु लागले - अंबिका प्रसाद, अनंत सिंग, लोकनाथ बौल, टेग्रा, मतिलाल, हिमांशु गणेश घोश, बिनोद बिहारी चौधरी, सुबोध रॉय, तारकेश्वर दस्तीदार, निर्मल सेन, भोला, रजत सेन, देबु गुप्ता, फणिंद्र नंदी, मनोरंजन सेन, मधुसुदन दत्त, रामकृष्ण बिस्वास, जितेन, पुलिन, नरेश, त्रिपुरा, बिंदु, हरिगोपाल, प्रितिलता वड्डेदार, कल्पना दत्त...आणि मास्टरदांनी आपली योजना निश्च्चित केली - चितगांव स्वतंत्र करण्याची. चितगांव वर सशस्त्र असा नियोजनबद्ध हल्ल चढवुन तिथले शस्त्रागार लुटायचे, शस्त्रे व दारुगोळा लढाईसाठी ताब्यात घ्यायचा व तोच इंग्रजांशी लढायला वापरायचा, तारायंत्रे व लोहमार्ग उद्धवस्त करुन चितगांवचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तोडुन टाकायचा व चितगांव स्वतंत्र करुन तिथे तिरंगा फडकावायचा. या विलक्षण योजने मागे प्रेरणा होती ती आयर्लंडच्या १९१६ सालच्या ’इस्टर उत्थाना’ची. या जबरदस्त व अनपेक्षित हल्ल्यात बेसावध शत्रुला नामोहरम करवुन आयरिश क्रांतिकारकांनी डब्लिन काबिज केले होते व सात दिवस पर्यंत कब्जात ठेवले होते. पुढे या घटनेतुन स्फूर्ती घेत आयर्लंडमध्ये असे अनेक संग्राम घडले होते. या घटनेने मास्टरदांना विलक्षण प्रभावित केले. इतके, की त्यांनी आपल्या स्वतंत्र सेनेचे नाव ठेवले ’इंडियन रिपब्लिकन आर्मी’ - ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना’ आणि हल्ल्याचा दिवस मुक्रर केला तोही इस्टरचाच - दिनांक १८ एप्रिल १९३०.
आणि योजनेनुसार हल्ला झाला. १८ एप्रिल १९३० रात्री ९.५० ला अंबिका चक्रवर्ती आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांच्या तुकडीने एकाच फटक्यात तार-कचेरीवर हला चढवला व तारायंत्र नष्ट केली व कचेरीला आग लावुन संपर्क यंत्रणा बंद पाडली. इकडे अनंतसिंग, गणेश घोष व २२ सहकाऱ्यांच्या तुकडीने जलप्रकल्पावरील रक्षकांना कंठस्नान घालत पोलिस लाईनीतुन प्रवेश केला व थेट शस्त्रागारावर हल्ला चढविला. शस्त्रागार अलगद ताब्यात आले! तिकडे दुसऱ्या दोन तुकड्यांनी लोहमार्गावरील रुळ उखडले आणि लोहमार्ग खंडित केला व चितगॉंग स्वतंत्र झाल्याची पत्रके सर्वत्र वाटली. पुढे इतर दोन तुकड्यांना मात्र निराश व्हावे लागले. युरोपियन क्लब वर इंग्रज अधिकाऱ्यांना टिपण्यसाठी गेलेल्या तुकडीला त्या दिवशी इस्टर असल्याने क्लबात कुणीही सापडले नाही. दुसऱ्या तुकडीने लष्करी भारी शस्त्रागारावर यशस्वी हल्ला केला अणि ३०३ बंदुका तसेच लुइसगन सारखी जबरदस्त शस्त्रे ताब्यात घेतली. मात्र त्यांना काडतुस वा दारुगोळा अजिबात नावाला देखिल मिळाला नाही. मास्टरदांचे सैन्य हे देशाच्या मुक्तिसाठी उभे राहीलेले सर्वसामान्यांचे सैन्य होते, ते प्रशिक्षित लष्कर नव्हते आणि त्यामुळेच त्यांना अजिबात कल्पना नव्हती की शस्त्रे व दारुगोळा कधीही एकत्र ठेवायची नाहीत हा श्स्त्रागाराचा महत्वाचा नियम असतो. यामुळे यशस्वी होऊनही त्या वीरांच्या पदरी नैराश्यच आले. काही क्षणांपूर्वी आनंदात असेल्या वीरांच्या मनोरथावर पाणी पडले होते. काडतुसे नसल्यामुळे भारी शस्त्रे मिळुनही काही उपयोग नव्हता. मग त्या शस्त्रांचा नाश करण्यासाठी ती मोडण्यात आली व शस्त्रागाराला आग लावण्यात आली; जेणेकरून ती पुन्हा ब्रिटिशांना उपयोगी पडता कामा नयेत.पुढे तीन दिवस चितगांववर भारतीय प्रजासत्ताक सेनेचे अधिपत्य होते. मात्र संपूर्ण सेना काहीशी विस्कळीत झाली. शस्त्रागारांच्या भिंतींवर पेट्रोल शिंपडताना हिमांशु सेन होरपळला. त्याला उपचारा साठी गावात नेण्याकरीता अनंतसिंग आणि गणेश घोष यांनी गाडीत घातला आणि ते गावाकडे गेले. पुन्हा एकदा जलप्रकल्पाकडुन इंग्रज सैन्याचा हल्ला सुरु झाला आणि मास्टरदांच्या सैनिकांनी आपापल्या रायफली सज्ज केल्या आणि पुन्हा धुमश्चक्रीला सुरुवात झाली. अखेर हिंदुस्थान प्रजासत्तक सेनेच्या सैन्यापुढे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली आणि विशेष म्हणजे या चकमकीत हिंदुस्थानी प्रजासत्ताक सेनेचा एकही सैनिक कामी आला नाही वा गंभीर रीत्या जखमी झाला नाही.
१८ एप्रिल ची रात्र संपत आली, १९ चा दिवस उजाडण्यापूर्वी होते तितके सैनिक एकत्र जमले. "मास्टरदा, आता पुढे काय?" धीरोदात्त आवाजात मास्टरदा म्हणाले. ’दोस्तांनो, आपण चितगांव स्वतंत्र केले आहे आणि आता आपण चितगावात स्वराज्याच्या हंगामी सरकारची स्थापना करत आहोत! त्या नुसत्या कल्पनेने प्रत्येक जण मोहरुन गेला. मास्टरदांचे ध्येयस्वप्न अंशत: का होइना पण प्रत्यक्षात उतरले होते. तात्पुरती का होइना, पण चितगावातली ब्रिटिश सत्ता पूर्णत: उखडली गेली होती. ’आपण क्रांतिसेनेचे, आपल्या हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले आहेच, आणि आता आपण मरेपर्यंत या हंगामी सरकारचे सैनिक म्हणुन लढणार आहोत.’ "वंदे मातरम!" मास्टरदांच्या शब्दांनी सर्वांना जणु संजिवनी मिळाली. पहाट होण्यापूर्वीच पुन्हा एकदा ब्रिटिशांचा हल्ला आला आणि पुन्हा एकदा हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेच्या कडव्या सैनिकांनी तो परतवुन लावला, ब्रिटिशांची मशिनगन बंद पडली, उरलेले ब्रिटिश माघारी पळाले. जयघोष करीत सैनिक गावातुन फिरु लागले. सर्वत्र भयाचे वातावरण होते. नक्की काय घडत आहे याचे आकलन न झाल्याने सर्व नागरीक दारे बंद करुन बसले होते, सर्वत्र नि:शब्द शांतता होती. रात्री अनेक ठिकाणी विखुरलेल्या तुकड्या एकत्र येत होत्या. मात्र हिमांशु, अनंत सिंग, गणेश घोष तसेच टेहळणीला गेलेले युवक बेपत्ता होते, त्यांची चुकामुक झाली होती. १९ तारखेचा दिवस वणवण करण्यात गेला. चितगांव जिंकले, झेंडा फडकावलाखरा, पण मर्यादित शस्त्रबळावर पुढे लढणार कसे ही चिंता सर्वांना भेडसावु लागली. शत्रु प्रबळ होता, तात्पुरती माघार घ्यावी लागली तरी शत्रुकडॆ मशिनगन व लुइसगन सारखी जबर मारा करणारी घातक शस्त्रे होती तर काडतुसे व दारुगोळा न सापडल्याने हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेकडे होत्या मोजक्या ३०३ रायफली आणि पोलिस मस्केट्स. शत्रु कुमक मागवुन प्रतिहला चढविणार हे निश्चित होते.
सर्व विचार करुन शेवटी सर्वांनी अलगद गावाबाहेर पडत जवळ्च्या जलालाबाद टेकडीच्या जंगलाचा आसरा घेत लपून रहायचे व पुढच्या हालचालींचा अंदाज घ्यायचा असे ठरले. शत्रू कुठुन किती व कसा येतो हे पाहणे व त्यानुसार पुढील चाल करणे महत्वाचे होते. ते ५५ जण अंधारातच जंगलातुन रस्ता काढत टेकडीवरच्या दाट झाडीत पोचले. १९ व २० असे दोन दिवस तसेच काढल्यावर सैनिक अस्वस्थ झाले. ब्रिटिश सेना मोठ्या कुमकीनुसार व ताज्या दमाच्या फौजेनुसार पुन्हा चितगांवात दाखल झाली होती आणि ती सेना क्रांतिसेनेचा शोध घेत होती. आता असे लपून राहण्यापेक्षा थेट हल्ला चढवावा असे सर्वांना वाटु लागले. यात आपल्या जिवाला धोका आहे, शत्रू प्रबळ आहे, भारीभक्कम शस्त्रांनी सज्ज आहे हे सर्वांना माहित होते. पण हाती घेतलेले कार्य आता अपुरे सोडणे शक्य नवह्ते, आता निकराची झुंज अटळ होती, वेढा पडु न देणे अत्यावश्यक होते. २१ तारखेला मास्टरदांनी आपल्या सेनेला संबोधित केले. त्यांनी आपली पुढची चाल सर्वांन ऐकवली आणि सर्वत्र विरश्री संचारली. "आपण ५५ आहोत, ब्रिटिश अधिक आहेत. त्यांच्याक्डे खूप भारी शस्त्रे व दारुगोळा आहे. अशा परिस्थितीत जर आपण समोरासमोर ठाकलो तर आपला सर्वनाश अल्पावधीतच होईल. सगळे एकत्र जाणे योग्य नाही आणि फार लहान तुकड्या करणेही घातक ठरेल. तेव्हा आपण १३ च्या चार तुकड्या करुया." स्वत: मास्टरदा, निर्मलचन्द्र, अंबिकाप्रसाद व लोकनाथ बौल या चौघांनी त्या चार तुकड्यांचे नेतृत्व करायचे असा आदेश त्यांनी दिला. चारही तुकड्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने चितगांव मध्ये प्रवेश करायचा, मात्र आंत शिरताच दोन तुकड्यांनी ईंपिरियल बॅंकेवर हल्ला चढवुन खजिना लुटायचा तर दुसऱ्या दोन तुकड्यांनी तुरुंगावर हल्ला चढवुन कैद्यांना मुक्त करायचे व त्यांनाही आपल्या संग्रामात सामिल करुन घ्यायचे अशी योजना होती. दोन्ही तुकड्यांनी आपापला कार्यभाग सिद्धीस जाताच सगळ्यांनी न्यायालयाच्या आवारातील मैदानात एकत्र होऊन सैन्यावर चालुन जायचे. मग पुढे काय होइल ते होवो.
मात्र ही योजना मास्टरदा सर्वांना समजावत असतानाच टेकडीवरुन टेहेळणी करणाऱ्या सैनिकांनी बातमी आणली की टेकडीच्या पायथ्याशी आगगाडी थांबली असुन त्यातुन ब्रिटिश सैन्य उतरत आहे व ते संख्येने मोठे आहे. मास्टरदा समजुन चुकले की आपण जलालाबाद टेकडीवर आहोत ही बातमी कॅप्टन टेटला मिळाली असावी. गोरे व गुरखा पलटणी आल्या होत्या. आता मास्टरदांनी संग्रामाचा निर्धार व्यक्त केला व आपल्या सेनेला त्यांनी सांगितले की आता दोन हात करायची वेळ आली आहे, सर्वांनी धर्याने लढा! जिंकाल तर विजयी व्हाल आणि मराल तर हुतात्मे व्हाल. मास्टरदांनी या लढाईचा सेनापती लोकनाथ बौल असल्याचे जाहिर केले. लोकनाथने सर्वांना ध्येयसंग्रामासाठी सिद्ध आवाहन केले. सैनिकांच्या चार तुकड्या करण्यात अल्या, दोन पुढे तर दोन मागच्या अंगाने लढण्यासाठी - ही सर्व वेढले जाऊ नये यासाठीची खबरदारी. दुपारी पाचच्या सुमारास टेटने चढाईचे आदेश दिले. गुरखा पलटणीने टेकडी चढत हल्ल्याला सुरुवात केली आणि हिंदुस्थान प्रजासत्त्ताक सेनेने प्रेत्त्युत्तर दिले. सुमारे एक तासाहुन अधिक चाललेल्या धुमश्चक्रीत सेनेने गुरख्यांना रोखले. जंगलात लपून गनिमी काव्याने लढणाऱ्या क्रांतिकारकांचा नेमका ठाव ठिकाणा समजत नसल्याने गुरखे अपय्शी ठरत होते. अखेर गुरखा पलटणीला मघार घ्यावी लागली. या एका तासात सेनेचा एकही सैनिक जखमी झाल नव्हता. मात्र या मुळे हुरुप चढलेल्या सैनिकांनी नकळत एक चुक केली आणि ती म्हणजे त्यांनी माघार घेणाऱ्या पलटणीवर ’इन्किलाब झिंदाबाद’ व ’वंदे मातरम’ च्या घोषणा देत जबरदस्त प्रतिहल्ला चढवला. जलालाबाद टेकडी ही आजुबाजुच्या टेकड्यांच्या मानाने कमी उंचीची असल्याने इतर टेकड्यांवरुन तिथे मारा करणे तिथे लपलेल्या इंग्रजी सैन्याला सोपे होते. या जयघोषामुळे व एकवटुन केलेल्या हल्ल्यामुळे सेनेचे निश्चित स्थान ब्रिटिश फौजांना कळले व चोहोकडुन मारा सुरु झाला. उलट हल्ल्याने सटपटलेले गुरखेही सावरले व पुन्हा संग्राम सुरु झाला. पलटणीवर हल्ला चढवताना मस्तकात गोळी लगुन कोवळा तेगरा हुतात्मा झाला. अंबिकाच्या मस्तकालाही गोळीने जखम झाली. अवघ्या पाच दहा मिनिटाच्या अंतराने निर्मलचंद्र, नरेश, बिधु व त्रिपुर हौतात्म्य पावले तर आणखी काही मिनिटातच पुलिनही धारातिर्थी पडला. एव्हाना संध्याकाळचे साडेसात वाजुन गेले होते, आंधार पडु लागला होता. अखेर झालेली हानी पाहता सकाळी नवी कुमक येईपर्यंत हल्ला थांबायचा निर्णय कॅप्टन टेटला घ्यावा लागला व त्याने त्या दिवसापुरती माघार घेण्याचे हुकुम दिले. या संग्रामात मशिनगन व लुइसगनसारख्या संहारक शस्त्रांनी सज्ज अशा प्रशिक्षित सेनेशी हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेच्या जेमेतेमे हत्यार चालविता येणाऱ्या व प्रथमच संग्रामात भाग भेणाऱ्या सैनिकांनी पोलिस मस्केट्स व जुनाट रायफली वापरत जी लढत दिली तिने नवा इतिहास निर्माण केला व स्वतंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात चितगाव पर्व सुवर्णाक्षरात लिहिले गेले. मस्केट्स चालवायचा सराव नसलेले सैनिक जेव्हा मस्केट मधून गोळी झाडत तेव्हा अनेकदा त्या मस्केट्स अडकत होता व सर्वत्र धावत एकेक मस्केट्चा अडकलेला चाप मास्टरदा सोडवत होते अशी आठवण त्यांचे सहकारी बिनोद बिहारी चौधरी यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी - गेल्या ११ जानेवारीला न्यु एज या नियतकालीकाला दिलेल्या मुलखतीत सांगितली होती.
सेनापती लोकनाथ बौलने मास्टरदांना दिवसाचा हिशेब सांगितला - ११ धारातिर्थी व २ गंभीर जखमी. ब्रिटिश सेनेची प्रचंड संख्या व त्यांच्याकडे असलेली शस्त्रसामग्री पाहता दुसऱ्या दिवशी हट्टाने लढत राहणे म्हणजे सर्वनाश हे मास्टरदांनी ओळखले. जर आज वाचलो तर उद्या पुन्हा उभे राहता येइल मात्र अट्टाहासाने सर्वच शहिद झालो तर कार्य कायमचे अधुरे राहील हे लक्षात घेत मास्टरदांनी रातोरात मागच्या बाजुने टेकडी उतरुन रातोरात जंगलात पसार होत दूर जाण्याचा जड निर्णय घेतला. सापडले तर सगळे सापडु नयेत यासाठी पुन्हा दोन तुकड्या करण्यात आल्या, एक मास्टरदांची तर एक लोकनाथची.
अनेक परिचितांचे सहाय्य घेत, अन्न व निवारा घेत सेना जड पावलांनी अथकपणे दूर जात होती. इकडे हिमांशु, अनंत सिंग व गणेश घोष जेव्हा चितगावात परत आले तेव्हा त्यांना काय चालले आहे याचा पत्ता लागेना व आपल्या सहकाऱ्यांचा थांगपत्ताही लागेना. अखेर नाईलाजाने त्यांनी सेनेनी मार्ग बदलला असावा असा कयास बांधत तिथुन दूर निसटत कोल्कत्त्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. वाटेत त्यांची पोलिसांशी एक चकमकही घडली पण त्यातुन निसटण्यात ते यशस्वी ठरले. इकडे मास्टरदा व निर्मल एका दिशेने तर लोकनाथ व अन्य क्रांतिकारक अन्यत्र भूमिगत अवस्थेत फिरत होते. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मास्टरदांनी भूमिगतांपैकी ज्यांची नावे पोलिसांना माहित नव्हती वा ज्यांच्या संशय्हही आला नसता अशा गुपचुप आपापल्या घरी जायला सांगितले. ’पुढे तुमची गरज लागणार आहे तेव्हा तुम्हाला पुन्हा साद देउ, मात्र आत्ता या परिस्थितीत तुम्ही परत जा असा हुकुम मी देत आहे असे समजा’ अए मास्टरदांनी बजावले.
या संग्रामातील सर्वात लहान सैनिक म्हणजे सुबोध रॉय! वय वर्षे फक्त चौदा. चितगाव जवळच्या जमिनदारी कुटुंबात जन्मलेले सुबोधदा सहा भावंडातले दुसरे. वडील ख्यातनाम वकील. मात्र चिरंजीवांनी लहानवयातच क्रांतीचा ध्यास घेतला, त्यांचा ओढा बालवयातच सशस्त्र क्रांतिकडे होता. आपल्या वडीलांची परवान्याची बंदुक उचलुन ८ एप्रिल १९३० रोजी म्हणजे चितगाव मुक्तीसंग्रामाच्या बरोबर दहा दिवस आधी घरुन पळाले व सेनेला येउन मिळाले. २६ ऑगस्ट २००६ साली वयाच्या नव्वदाव्या वर्षी सुबोधदांचे देहावसान झाले आणि त्याप्रसंगी त्यांच्या अनेक आठवणी प्रसिद्ध केल्या गेल्या. आपल्याला मास्टरदांनी जाण्याचा हुकुम दिला व आपण तो शिरोधार्थ मानुन घरी आलो, मात्र जाताना आपण मास्टरदांना वचन दिले होते की पकड्लो गेलोच तरीही काहीही माहिती पोलिसांना देणार नाही व त्याप्रमाणे त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती असे त्यांनी अभिमानाने नमूद केले आहे. त्यांची बंदूक सापडल्याने तिच्यावरील अनुक्रमांकाचा धागा पकडुन पोलिस त्यांच्यापर्यंत पोचले होते. मात्र छळ सहन करुनही त्यांनी मास्टरदा व सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली नाही. १९३४ साली मास्टरदांना फाशी तर अन्य अनेक सहकाऱ्यांना अंदमानच्या काळ्यापाण्याची सजा दिली गेली व त्यात सुबोधदा हे सर्वात लहान होते - वय वर्षे १८!
भूमिगत असलो तरी पराभूत नाही हे दाखविण्यसाठी अनेक हल्ले व संग्राम चालुच होते. २४ सप्टेंबर १९३२ रोजी मास्टरदांनी पुन्हा एकदा पहारतळीच्या युरोपियन क्लब वर हल्ला चढविला व त्याचे नेतृत्व देउ केले होते त्यांच्या छोट्या दीदीला म्हणजे प्रितिलता वड्डेदारला. "मास्टरदा, मी तुमची अनुयायी असताना नेतृत्व कसे करु?" असा सवाल करणाऱ्या दीदीला मास्टरदांनी उत्तर दिले होते " तुझ्या नेतृत्वाखालील हल्ल्याने ब्रिटिशांनाच नव्हे तर साऱ्या जगाला समजेल की हिंदुस्थानातील स्त्रिया स्वेच्छेने आत्मबलिदान करण्यात मागे नाहीत". या हल्ल्यात प्रितीलताने क्लबातल्या अधिकाऱ्यांना बॉंबस्फोटाने घाबरवुन बाहेर काढले व स्वत: बाहेर पडणाऱ्याची धडपड करणाऱ्यांवर गोळीबार केला. पोलिस कुमक येताच तिने आपल्या सहकाऱ्यांना मागे फिरायचा हुकुम दिला. तिला सोडुन जायला त्यांचा जीव होत नव्हता पण तो नेत्याचा हुकुम होता. तिला सलामी देउन साथीदार अंधारात पसार होताच तिने जखमी होऊन पोलिसांच्या हाती पडण्या आधीच सायनाईड पिऊन हौतात्म्य पत्करले. या आघाताने मास्टरदा विषण्ण झाले. १५ दिवसांनी आलेल्या विजयादशमी निमित्त त्यांनी ’विजया’ असा एक लेख लिहिला. हा लेख आपले हौतात्म्य पत्करलेले सहकारी व अंदमानात सजा भोगत असलेले राजबंदी यांना आदरंजली देण्यासाठी लिहिला होता. त्यात त्यांनी तिला आदरांजली वाहताना म्हटले की "मी स्वत: तुला वीरपुरूषाचा वेश चढविला, तुला मृत्युच्या जबड्यात उडी घेण्याची अनुमती दिली आणि तु अमृतप्राशन करुन आम्हा सर्वांना सोडुन गेलीस आणि अजरामर झालीस".
सर्व दु:खे पचवुन मास्टरदांची वाटचाल सुरूच होती. अनेक नावे अनेक वेष धारण करुन त्यांनीस सरकारला हुलकावणी दिली होती. अनेकदा सरकारने हिंदु-मुस्लिम भेदाचे तंत्र वापरुन मुसलमान गावकऱ्यांना भूमिगतांची माहिती देण्यास प्रवृत्त केले, अनेकदा दंगे घडवुन आनले, अनेकदा सरसकट गावांवर दंड बसविण्यात आला मात्र हे सहन करुनही कुणी मास्टरदांची फितुरी केली नाही, ते त्यांना देव मानत होते. दुसरीकडे असे लपत छपत जगण्यापेक्षा लढुन मरायला क्रांतिकारक उतावळे होत होते. कर्णफुली नदीकठच्या कालेर्पोल गावात फणींद्र व सुबोध रॉय पोलिसांच्या हाती सापडले. जुल्दा गावात एका झोपडीत लपले असता रजत, मनोरंजन सेन, स्वदेश रॉय व देवप्रसाद गुप्त हे चोहो बाजुंनी वेढले गेले. काड्तुसे असेपर्यंत प्रतिकार करायचा असे त्यांनी ठरविले होते. मात्र अल्पाअवधीतच सुमारे १०० सशस्त्र पोलिसांचा वेढा पडला, गोळिबार वाढला आणि त्या चार महवीरांनी आपले मरण ओळखले. मात्र शत्रुच्या हातात जिवंत पडायचे नाही वज्रनिश्चय होता. अखेर त्या चार वीरांनी एकमेकावर नेम धरत अचूक पणे एकाच क्षणी गोळ्या झाडत हौतात्म्य पत्करले. त्यांना पकडायला आलेल्या लुइस या आयरिश अधिकाऱ्याने "आजवर असे क्रांतिकारक कुठेही पाहायला मिळाले नव्हते" असे गौरवोद्गार काढले. चितगांव युद्धात पहिल्याच दिवशी ताटातुट झालेले अनंतसिंग, गणेश, माखन व आनंद हे चंद्रनगर येथे राहीले होते. चंद्रनगर ही फ्रेंच वसाहत होती. इथे ब्रिटिश पोलिस फ्रेंच सरकारच्या परवानगीविना येउ शकत नाहीत हे त्यांना माहित होते. एक महिना गेल्यावर ब्रिटिशांनी हिंदुस्थान प्रजसत्ताक सेनेच्या सैनिकांना शरण आणण्यासाठी नीच मार्गाचा अवलंब केला; त्यांनी भूमिगतांच्या नातेवाईकांना अटक करुन छळसत्र सुरू केले. रजतचे वडील रंजनबाबू, देवप्रसादच्गे वडील योगेशचंद्र व अनंतसिंगचे वडील गुलाबसिंग यांना पोलिसांनी तुरुंगात टाकले. यामुळे व निष्क्रियतेमुळे विमनस्क मनस्थितीत अनंतसिंग याने पोलिसांकडे शरणागती पत्करली. आपण असहाय्य नाही, मृत्युला भीत नाही, आपल्याकडे शस्त्रे व पैसे आहेत तसेच आसरा द्यायला अनेक मित्र तयार आहेत तरीही मी तुमच्या स्वाधीन होत आहे असे सांगत तो स्वत:च पोलिस चौकीत दाखल झाला. पाठोपाठ पोलिसांनी फ्रेंच सरकारशी कागदोपत्री व्यवहार करुन चंद्रनगरात प्रवेश मिळविला. गणेश, लोकनाथ व आनंद हे शशीधर गांगुली यांच्या घरात आश्रयाला होते. त्यांनी शशीधरबाबूंना तोशीस नको म्हणुन त्यांचे घर सोडले व ते मागच्या दाराने बाहेर निघाले. त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव होत होता. सर्वात पुढे असलेला माखन हौतात्म्य पावला तर गणेश घोष, लोकनाथ व आनंद हे कोलकत्त्याहून आलेला पोलिस आयुक्त टेगार्ट याच्या तावडीत सापडले. या सर्वांना तसेच अंबिकाप्रसादला चितगांवच्य तुरुंगात ठेवण्यात आले.
दिवसेंदिवस दडपशाही वाढत होती. नवे जुलमी कायदे लागु केले जात होते. अनेकांना संशयावरुन पकडुन छळ केला जात होता. अंबिकाप्रसाद, गणेश, अनंतसिंग इत्यादींनी सरकारला धडा शिकविण्यासाठी पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर येउन सशस्त्र संघर्षाचा विचार केला. त्यांनी तुरुंगातुन मास्टरदांशी संपर्क साधला व त्यांची संमती मागितली. मास्टरदांनी तारकेश्वर दस्तिदार व कल्पना दत्त ह्या व अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने तुरुंग स्पोटकांच्या सहाय्याने फोडुन क्रांतिकारकांना बाहेर काढायची योजना आखली. मोठा स्फोट घडविण्यासाठी कल्पना दत्तने सुरुंगाची दारु व स्फोटकांचा संग्रह आपल्या सवंगड्यांच्या सहाय्याने केला. तुरुंगातील कर्मचाऱ्यांना लाच देउन व बेसावध ठेवुन स्फोटके तुरुंगात पाठवली जाउ लागली. मात्र एका शिपायाची एका बंद्याशी काही कुरबुर झाली व त्याने तुरुंगाधीकाऱ्यांना कटाची माहिती दिली. सरकार खडबडुन जागे झाले. छापे व अटकसत्र सुरु झाले. सापड्लेली सुरुंग दारु व स्फोटके पाहुन पोलिसांचे डोळे फिरायची वेळ आली इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा जमविण्यात आला होत.
अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला. तीन वर्षे सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आपले कार्य सुरु ठेवणारे मास्टरदा अखेर फितुरीच्या शापाला बळी पडले. कुण्या नेत्री सेनने बहुधा ५००० रुपये इनामाच्या आशेने पोलिसांना खबर दिली की मास्टरदा, कल्पना, तारकेश्वर व ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेने’चे अनेक सैनिक कर्ण्फुलीकाठ्च्या गैराला गावात लपले आहेत.( पुढे एका गावकऱ्याने या नेत्री सेनला त्याच्या घरात शिरुन तो जेवायच्या तयारीत असताना शिरच्छेद करुन यमसदनास धाडले व फितुरीची सजा दिली). या फितुरीमुळे सर्व क्रांतिकारक अलगद पोलिसांच्या तावडीत सापडले. वेढा फोडुन निसटण्यात कल्पना, तारकेश्वर व अनेकांना यश आले मात्र मास्टरदा पोलिसांच्य हातात सापडले - दिनांक १६ फेब्रुवारी १९३३; म्हणजे चितगांव विजयानंतर तब्बल साडेतिन वर्षांनी. नंतर १९ मार्चला कल्पना व तारकेश्वर दस्तिदार पोलिसांच्या हाती लागले.
सर्वांवर अभियोग दाखल करण्यात आला. चितगांव संग्राम व मास्टरदा यांचा थेट संबंध जोडता येईल असा कोणताही पुरावा सरकारला मिळाला नसतानाही त्यांना तसेच तारकेश्वर ला फाशी तर कल्पना दत्त, अंबिका चक्रवर्ती, गणेश घोष, अनंतसिंग, लोकनाथ बौल, आनंद गुप्त, रणधीर दासगुप्ता व फकिर सेन यांना जन्मठेपेसाठी काळ्या पाण्याची सजा ठोठावली. हा निकाल १४ ऑगस्ट १९३३ रोजी दिला गेला. त्यावर दादही मागण्यात आली पण त्यात काहीही बदल झाला नाही. मास्टरदा व तारकेश्वर यांच्या फाशीसाठी १२ जानेवारी १९३४ हा दिवस मुक्रर केला गेला. फाशीसाठी कोठडीतुन बाहेर काढताच मास्टरदांनी ’इन्किलाब झिंदाबाद’, ’वंदे मातरम’ च्या घोषणा देत तुरुंग दणाणुन सोडला. सर्व बंदिवानांनी स्वातंत्र्याच्या जयघोषाने तुरुंग हादरवला. संतप्त पोलिसांनी मास्टरदांना अमानूष मारहाण केली. त्यांचे दात तोडण्यात आले, हातापायाची नखे उचकटुन काढली, हात पाय ठेचले व अचेतन देह अखेर फासावर लटकावला गेला. मास्टरदा व तारकेश्वर यांचे मृतदेह कुणाच्याही ताब्यात देण्यात आले नाहीत. कालांतराने अशी माहिती बाहेर आली की ते देह लोखंडी पिंजऱ्यांमध्ये भरुन ते पिंजरे बंगालच्या सागरात बुडविले गेले.
११ जानेवारीला आपल्या साथिदारांना लिहिलेल्या अखेरच्या पत्रात मास्टरदांनी लिहिले होते " माझ्या साथिदारांनो, उद्या माझी फाशी आहे, माझ्या आयुष्यातला तो मंगलक्षण आता अगदी जवळ येउन ठेपला आहे. माझे मन आता अनंताकडॆ झेपावत आहे. मृत्युला मिठीत घेउन मी लवकरच माझ्या प्रिय साथिदारांना भेटायला जाणार आहे. या क्षणी मी तुम्हाला काय बरे देऊ शकतो? मी तुमच्यासाठी माझे सोनेरी स्वप्न मागे ठेउन जात आहे. साथींनो, तुम्हे पुढे जात रहा, यश तुमचेच अहे, गुलामीचे पर्व संपुष्टात येत आहे आणि स्वातंत्र्याचे सोनेरी किरण मला दिसु लागले आहेत. अंतिम विजय आपलाच आहे"
ज्यांनी स्वतंत्र हिंदुस्थानात तिरंगा फडकावण्य़ासाठी ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना’ स्थापन केली, ज्यांनी अवघ्या ६४ सैनिकांना घेऊन चितगांववर झडप घातली आणि ज्यांचे नाव केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर इंग्लंड व फ्रान्समध्येही गाजले त्या मास्टरदांना व त्यांच्य तमाम साथीदारांना आज प्रजासत्ताकदिनी सादर प्रणाम.
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 8:51 pm | केदार
व्वा! सर्वसाक्षी तुम्ही प्रजासत्ताकदिनी मस्त लेख वाचायला दिला.
26 Jan 2009 - 9:00 pm | संजय अभ्यंकर
साक्षीदादा एवढेच म्हणू शकतो!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 Jan 2009 - 10:05 pm | कलंत्री
लेख वाचताना नकळतच असे जाणवत होते की क्रांतिकारकाचे मर्यादित उद्दिष्ट सशस्त्र लढा करणे हेच होते. लढा यशस्वी झाला असता तर काय करावयाचे याचा आराखडा नजरेसमोर नसावा.
ब्रिटीश लोकांनी स्वस्थ बसायचे ठरवले असते आणि या लोकांना १/२ आठवड्याची संधी दिली असती तरी हा लढा अयशस्वी झाला असताच असे नकळतच वाटले, साक्षीदेव आमच्या शंकेचे उत्तर देतीलच.
बंगाली आणि केरळी लोकांचे वैचारिक साधर्म्य मला जाणवते. केरळी लोकांनी असे लढे केले आहेत का याचा शोध घ्यावासा वाटतो.
वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले आणि राष्ट्रीय लढ्याला प्रेरणा दिली याचेही मोठेपण जाणवते.
27 Jan 2009 - 2:30 am | केदार
वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले >>
कलंत्री साहेब,
वासुदेव बळवतांच्या लढ्यात मराठी माणूस सहभागी गठ्याने सहभागी होता असे तुम्हाला म्हणायचे काय?
27 Jan 2009 - 12:36 am | प्रभाकर पेठकर
'सूर्य सेन' हे किती समर्पक नांव आई-वडीलांनी ठेवले.
ती धडाडी, ते तेज, तो क्षत्रीयबाणा सर्वच अलौकिक.
फार प्रभावी लेखन. मन गुंगून गेले आणि अंती सुन्न झाले.
27 Jan 2009 - 2:02 am | योगी९००
मास्टरदांना व त्यांच्य तमाम साथीदारांना आज प्रजासत्ताकदिनी सादर प्रणाम.
खादाडमाऊ
27 Jan 2009 - 3:38 am | भास्कर केन्डे
साक्षीदा, क्रांतिकारकांवरील आपल्या लेखमालेतील प्रत्येक लेख प्रचंड प्रेरणादायी असतो. क्रांतिकारकांचे जाज्वल्य देशप्रेम, धैर्य, निष्ठा, शैर्य आदी गुणांची उंची पाहिल्यावर आपण किती पामर आहोत याचीच प्रचिती येते. ही माहिती लिहिल्याबद्दल आभार!
आजच्या प्रजासत्ताक दिनी या महान हुतात्म्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या प्रमाणे काही सहस्त्र अंशी का होईना, आपल्या हातून सुद्धा देशसेवा व्हावी असे विचार प्रकट होण्या ऐवजी या लेखाच्या प्रतिसादांतही आता क्रांतिकारकांच्या मर्यादा, चुका वगैरे बाबींबर चर्चा सुरु होत आहे हे पाहून दु:ख वाटते.
मास्टरदा तसेच सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन व सहस्त्र प्रणाम!
आपला,
(नतमस्तक) भास्कर
28 Jan 2009 - 11:25 pm | विसोबा खेचर
साक्षिदेवा,
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख..!
वन्दे मातरम्!
तात्या.