नुकतंच माझ्या सासर्यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते.
ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे. मात्र ‘ती करेल तो स्वयंपाक’ असं नाही. काय करायचं, कसं करायचं, त्यात सुधारणा काय करायला पाहिजे ते समजावून सांगतात. हे वाचून असं वाटेल की फारच चिकित्सक दिसताहेत. तसं अजिबात नाही. कोणालाही त्रास न होता क्वॉलिटी कशी सांभाळायची ही कसरत त्यांना सहज जमते.
बाई कामाला येते दुपारच्या जेवणाआधी. म्हणजे दुपारचा स्वयंपाक गॅसवरून सरळ ताटात. वयोपरत्वे रात्री जेवत नाहीत. मग ब्रेकफास्टचं काय? फ्रिजमध्ये ठेवून सकाळी मायक्रोवेव्ह करणं सोपं. पण त्यांचं गुणवत्ता नियंत्रण (quality control) आणि उत्साह इतका दांडगा की ताजा ब्रेकफास्ट ते स्वतःच बनवतात. साधं सोपं कॉर्नफ्लेक्स, दूध, ब्रेड नव्हे. व्यवस्थित पोहे, खिचडी, सांजा वगैरे. इतकं सुरेख बनवतात की वाटेल त्यांना पहिल्यापासून स्वयंपाकाची आवड आहे. माझी मुलगी जितके दिवस माहेरवाशीण असते तितके दिवस रोज आजोबा आणि नातीचा ब्रेकफास्ट एकत्र.
पोहे, तांदूळ, कुरडया, पापड वगैरे कुठल्या दुकानात चांगले मिळतात हे त्यांना माहीत असतं. कारणमीमांसेसकट! मी स्वतः त्यांचा या बाबतीत सल्ला नेहमी घेते. राजनीतीमध्ये कोण काय करत आहे याची इत्यंभूत माहिती असते. मी त्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ. तेच माझे सल्लागार.
आप्पा घरकामात इतके कुशल झाले कसे? पहिल्यापासून असे नव्हते. त्यांना जरूरच पडली नसणार कारण माझ्या सासूबाई सर्वच कामात अतिशय निपुण. मात्र सन २००० नंतर आईंना आजारपणानी त्रास द्यायला सुरवात केल्यानंतर आप्पांनी सर्व कामांत लक्ष द्यायला सुरवात केली आणि थोड्याच काळांत माहिर झाले. आजारपणाचा काळ आई आणि आप्पा दोघांनाही कष्टप्रदच असणार. खरं तर ‘होता’ असंच म्हणायला पाहिजे, पण मी ‘असणार’ अशासाठी म्हणते की दोघांनीही चेहर्यावरचं हास्य कधीही मावळू दिलं नाही. त्यांच्याकडे जाऊन आलं की प्रसन्न वाटायचं. अजूनही वाटतं.
आईंचा आजार बळावतंच गेला आणि २००९ साली त्यांना देवाज्ञा झाली. साठ वर्षांहून जास्त काळ त्या दोघांचा संसार झाला होता. इतक्या मोठ्या कालखंडात कित्येक काटेकुटे, दगडधोंडे वाटेत लागलेच असणार. मात्र त्या दोघांच्या संभाषणात एकदाही म्हणजे खरोखरच एकदाही स्वर चढलेला कोणीही ऐकलेला नाही. प्रत्येक निर्णय घेताना घरच्या सगळ्यांची मतं घेतली जायची. भरपूर चर्चा. म्हणजे मतभेद अपरिहार्य. पण तरी स्वर कधीही वाढला नाही. नुसतं एकमेकाशीच नव्हे, तर दुसर्या कोणाशीही बोलताना नेहमीच विनयानी बोलणं असतं.
आईंनंतरच्या एकटेपणाला आप्पांनी इतक्या सहजपणे तोंड दिलं की ते कोणाला जाणवलंच नाही. कोणतीही गोष्ट एखाद्याने सहजगत्या केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या ‘सहजपणा’च्या मागे किती प्रचंड मेहनत, निग्रह आणि एकांतातले अश्रू असतात ते.
स्फुट लेख लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहेच, पण या particular विषयावर त्यांनी ‘मी एकटा आहेच कुठे?’ या शीर्षकाचा इतका सुंदर लेख लिहिला की त्यांना अभिनंदनाचे भरपूर फोन्स आले. त्याहूनही महत्वाचं म्हणजे सीनियर सिटिझन्सनी “मी अशाच अवस्थेतून जात असताना सैरभैर झालो होतो/झाले होते. तुमच्या लेखामुळे मला दिशा मिळाली.” अशी अतिशय समाधान देणारी पावती दिली.
‘मुंबई ग्राहक पंचायत’ या आता प्रचंड मोठ्या झालेल्या संस्थेच्या फाउंडर मेंबरपैकी दोन म्हणजे आमचे आई आणि आप्पा. कित्येक वर्षं संस्थेचं ऑफिस त्यांच्याच घरी होतं. तेव्हां अगणित चांगली माणसं जोडली. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या हस्ते त्यांचा सत्कार याच कार्यासाठी झाला. मुंबई सोडून आता सतरा वर्षं झाली पण अजूनही कित्येक कार्यक्रमांना त्यांना बोलावणं येतं आणि ते जातातही.
तीन वर्षांपूर्वी केसरीबरोबर यूरोपची टूर करून आले. एकटे! ज्यांनी यूरोपची टूर केली आहे त्यांना माहीतच असेल की प्रेक्षणीय स्थळं बघायची असतील तर सर्व ठिकाणी बसमधून उतरल्यावर खूप चालायला लागतं. नो प्रॉब्लेम! एकही ठिकाण सोडलं नाही. इतकंच नव्हे तर परत आल्यावर ‘लंडन ते रोम’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं! त्यात तिथल्या एकही हॉर्न ऐकू न येणार्या गुळगुळीत रस्त्यांबद्दलच फक्त लिहिलं नाही, तर ‘दुसर्या महायुद्धाचा अंत’ आणि ‘भारताचं स्वातंत्र्य’ या दोन्ही घटना साधारण एकाच काळात होऊनही त्यानंतरच्या आपल्या प्रगतीमध्ये इतकी तफावत का? यावर देखील लिहिलं.
श्रीनगरचं शंकराचार्यांचं अडीचशे पायर्यांचं देऊळ असो, किंवा ग्वाल्हेरचा किल्ला असो. स्वतःच्या पायाने वरपर्यंत! कोणाशीही स्पर्धा न करता, कोणालाही काहीही सिद्ध करण्याची इच्छा न बाळगता शांत, सहज चालीनी वरपर्यंत! नव्वदीत! प्रचंड आत्मविश्वास. पण फाजील आत्मविश्वास अजिबात नाही. एक दिवशी त्यांना वाटलं, तोल सांभाळण्यासाठी चालण्याची काठी बरोबर ठेवलेली बरी. लगेच घेतली. आता अजिबात जरूर नसलेली काठी कायम बरोबर असते.
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
बुद्धी तल्लख. मुलं, नातवंडं आणि पतवंड इतकेच नव्हे तर ओळखीच्या आणि नात्यातल्या सगळ्यांचीच इत्यंभूत माहिती असते आणि लक्षात देखील असते. पुण्याबाहेरचं कोणीही पुण्याला आलं की वेळात वेळ काढून आप्पांकडे जातातंच. प्रत्येकाचं आदरातिथ्य त्यांच्याकडे व्यवस्थितच होणार. मग तो त्यांचाच बालमित्र असो नाहीतर त्यांच्या अमेरिकेतील पुतण्याची ग्रीक पत्नी असो.
काही वर्षांपूर्वी त्यांची अंजिओप्लास्टी झाली. ती झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, “तुम्ही आता वीस वर्षांनी तरुण झालेले आहात.” आप्पांनी ते “तुम्ही आता वीस वर्षांचे तरुण झालेले आहात.” असं ऐकलं असावं कारण ते खरोखरंच तसे झाले!
एकदा मी त्यांना विचारलं, “आप्पा, तुम्हाला अजिबात व्यसन नाही हे खरं, पण तुम्ही काही नियमितपणे व्यायाम करीत नाही. खाण्याच्या बाबतीत बंधनं स्वतःला घालून घेतलेली नाहीत. तुमच्या दिनचर्येच्या बाबतीत काही कडक नियमावली नाही. तरी तुम्ही इतके सुपरमॅन कसे?”
त्यावर ते उत्तरले, “सुपरमॅन बिपरमॅन मला माहीत नाही. मात्र मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात.”
आजपर्यंत जीवनमूल्यांवर रकानेच्या रकाने लिहिले गेले आहेत. त्या सार्यांतल्या तत्वज्ञानाचा अर्क याहून सुटसुटीत, सुंदर आणि सोप्या भाषेत कोणी काढू शकेल काय?
ते अगदी सहजपणे बोलून गेले. मी मात्र विचार करीत राहिले. आपण शरीर निरोगी राहावं म्हणून धडपडंत राहातो. पण खरं तर शरीराचे लगाम मनाच्याच हातात आहेत. मनानी सकारात्मकच आज्ञा दिल्या की शरीर मजेत असतं. पण आपलं मनच आपल्या ताब्यात नसतं. आप्पांचं ते आहे.
आता मला कळलं. ते साधेसुधे सुपरमॅन नाहीत. ते तपस्वी आहेत. वीस वर्षांचे तपस्वी !
प्रतिक्रिया
2 Jun 2016 - 2:25 pm | त्रिवेणी
नेहमीप्रमाणे मस्त लेख.
अप्पाना उदंड आयुष्य लाभू देत.
2 Jun 2016 - 4:56 pm | नाखु
होवोत ही प्रार्थना.
छान लेख,
वाचक नाखु
2 Jun 2016 - 5:00 pm | दिगोचि
हा लेख दुसरीकडे वाचला आहे. असे स्मरते.
2 Jun 2016 - 5:21 pm | मुक्त विहारि
+ १
2 Jun 2016 - 5:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सुंदर. आप्पांच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करेन.
2 Jun 2016 - 6:07 pm | पद्मावति
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
सुंदर!तुमच्या अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
3 Jun 2016 - 12:46 am | बोका-ए-आझम
हे वाचून मला माझ्या आईच्या वडिलांची आठवण झाली. तेही असेच होते. त्यांनाही आम्ही अप्पाच म्हणायचो. फार छान लिहिलं आहे तुम्ही!
3 Jun 2016 - 1:15 am | सखी
सुंदर!
तुमच्या अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना. - असेच म्हणते.
तसेच त्यांचं लेखन वाचता येईल का? अर्थात त्यांच्या परवानगीने.
2 Jun 2016 - 6:21 pm | राजाभाउ
सुंदर !!!
आणि
__/\__
2 Jun 2016 - 6:42 pm | अमितसांगली
कोणतीही गोष्ट एखाद्याने सहजगत्या केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या ‘सहजपणा’च्या मागे किती प्रचंड मेहनत, निग्रह आणि एकांतातले अश्रू असतात ते.
मला स्वतालाच प्रेरणा मिळाली हा लेख वाचून...‘मी एकटा आहेच कुठे?’ हा लेख वाचायला आवडेल...
2 Jun 2016 - 6:53 pm | शान्तिप्रिय
स्फुर्तिदायक लिखाण
2 Jun 2016 - 7:17 pm | प्रसाद गोडबोले
___/\___
आजोबांना शिरसाष्ठांग नमस्कार !
एकदम स्फुर्तीदायक लेखन ! मला तर फौजा सिंग ह्यांचीच आठवण झाली !!
2 Jun 2016 - 7:25 pm | कविता१९७८
मस्त
2 Jun 2016 - 7:31 pm | विवेकपटाईत
सुंदर प्रेरणादायी लिखाण.
2 Jun 2016 - 9:09 pm | अनंत छंदी
अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो.
2 Jun 2016 - 9:20 pm | सुंड्या
......अप्पांना सलाम.....परिसाचा स्पर्श आम्हासही लाभावा ही इच्छा.
2 Jun 2016 - 10:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
आप्पांना आमचा शिरसाष्टांग दंडवत...
3 Jun 2016 - 12:52 am | रमेश भिडे
अप्पा म्हणवणारे लोक असेच असतात का काय कोण जाणे...
फुल्ल ऑफ लाईफ!
3 Jun 2016 - 1:48 am | रेवती
खरे सुपरमॅन! लेखन आवडले.
3 Jun 2016 - 6:36 am | यशोधरा
खूपच सुरेख लिहिलेय. अप्पा खरे सुपरमॅन!
3 Jun 2016 - 9:56 am | सिरुसेरि
सुरेख लेखन .
--भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.-- +१००
3 Jun 2016 - 11:08 am | सुबोध खरे
+१००
3 Jun 2016 - 10:01 am | देशपांडे विनायक
खरा असामान्य सामान्य असतो हे अप्पाना पाहून पटते
3 Jun 2016 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे
स्फुर्तिदायक व्यक्तिमत्व !
3 Jun 2016 - 10:59 am | स्वीट टॉकरीणबाई
सर्वजण,
धन्यवाद. तुमच्या सर्व भावना मी आप्पांपर्यंत ऩ़क्कीच पोहोचवीन.
दिगोची - हा लेख 'सकाळ'मध्ये आला होता आणि मिपावरदेखील टाकला होता. तिथे तुमच्या वाचनात आला असेल.
सखी, अमितसांगली - 'मी एकटा आहेच कुठे?' हा लेख मी आज संध्याकाळी मिपावर टाकीन.
3 Jun 2016 - 2:13 pm | शाम भागवत
तुम्हाला मायबोली म्हणायच आहे का?
3 Jun 2016 - 10:59 am | जिन्गल बेल
आप्पांना __/\__
खूप उर्जा मिळाली हे वाचून!!! :)
धन्यवाद ताई..
3 Jun 2016 - 1:51 pm | बदामची राणी
आप्पांना दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेछ्छा! ‘मी एकटा आहेच कुठे?’ आप्पांच्या परवानगीने हा लेख वाचायला आवडेल...
3 Jun 2016 - 2:41 pm | क्रेझी
अप्पा मस्त आहेत एकदम आवडले :) पण त्यांच्याविषयी अजून वाचायला आवडेल आणि त्यांची हरकत नसेल तर मला त्यांना प्रत्यक्ष भेटायला पण आवडेल :)
3 Jun 2016 - 2:48 pm | सस्नेह
प्रेरणादायी लेख.
3 Jun 2016 - 5:37 pm | पैसा
सुपर लेख! तुमचे आप्पा शतायुषी होवोत!
3 Jun 2016 - 9:17 pm | निशाचर
अशी माणसं त्यांच्या सहज आणि साध्या वागण्यातूनही इतरांना प्रेरणा देतात.
18 Jun 2016 - 1:43 am | सही रे सई
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
आणि
मात्र मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात
दोन वाक्यात सांगितलतं कसं वागायला पाहिजे माणसाने ते. पण दुर्दैवाने सगळ्यांना हे कळत नाही.
त्रिवार नमस्कार सांगा माझा आप्पांना.
18 Jun 2016 - 7:38 am | मितभाषी
+111
18 Jun 2016 - 10:51 am | स्वीट टॉकरीणबाई
सर्वजण,
पुन्हा धन्यवाद!
शाम भागवत - तुमचं बरोबर आहे. मला 'मायबोली' म्हणायचं होतं.