काल दहिसर बोरिवलीदरम्यानच्या मंडपेश्वर लेणींमध्ये जाऊन आलो. भारतीय इतिहास संकलन समितीच्या बोरीवली शाखेनं आखलेला कार्यक्रम होता. तन्ना सरांचा मेसेज आला आणि लगोलग तो दहा-बाराजणांना पुढे पाठवला. रविवारचा सुटीचा सोयीचा दिवस आणि मंडपेश्वरबाबत डाॅ. सूरज पंडित (Dr. Suraj A. Pandit ) यांच्याकडून मोफत माहिती. ब-याच जणांनी हो-नाही म्हणत, काही जणांनी 'मंडपेश्वरात काय पाहायचं' असा पवित्रा घेत, शेवटी माझ्यासोबत एकटा ( Manas Barve ) मानस बर्वेच आला. तोही वेळेच्या आधी. मीच आरामात उठून चेंगटासारखं आटपत आलो. येताना न विसरता कॅमेरा सोबत घेतला. आणि कुठेही जायचं म्हटलं की एक काहीतरी विसरायचं म्हणून कॅमे-याची बॅटरी तेवढी घरी विसरलो. हे अर्थात् मला नंतर लक्षात आलं. नावं वगैरे काही नोंदवली नव्हती. कारण नेमके किती जण येतील माझ्यासोबत याची काहीच खात्री नव्हती. मंडपेश्वर हे शैव पंथीय देऊळ आहे. त्यामुळे चपला बाहेर काढायच्या होत्या. गर्दी बरीच जमली होती. माणसांचीही, त्यांच्या चपलांचीही. त्यांत अगदी हुबेहूब माझ्यासारखी एक चप्पल दिसली. आली का पंचाईत. मी माझ्या चपला लांब एका कोनाड्यात काढून ठेवल्या आणि डबल सुरक्षा म्हणून मानसच्या चपला त्यांच्यावर ठेवल्या.
आत शिरलो. लोक उभे होते. आम्हाला बसून घ्यायला सांगितलं. सभोवताली नजर फिरवून घेतली. आधी माझ्या सरळ मानेच्या समांतर दिशेत, एखाद्या (किंवा जमल्यास अनेक) आखीव रेखीव आणि सजीव कलाकृतीच्या शोधात, आणि मग वरखाली इकडेतिकडे. कोरीव नक्षीकाम केलेले, आणि कोरलेली नक्षी निघून गेलेले खांब, समोर मधोमध शिवमंदीराचा गाभा बाहेर नंदी वगैरे नेहमीप्रमाणे, एक दगडाची आणि तेलबिल चोपून चापून चकाकती ठेवलेली समई, ती ज्या मातीच्या ढिगा-यावर ठेवली होती त्या ढिगा-यात खोचलेल्या आणि तुर्तास विझलेल्या उदबत्त्या, उंबरठ्यात टांगून ठेवलेल्या कैक घंटा, एखाद्या भाविकानं मधनंच येऊन त्यातली एखादी वाजवली तर कान बधीर करून टाकणारा आणि घुमणारा त्या घंटांचा नाद, गाभ्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एकेक खोली (दालन), गाभा उजवीकडे ठेवून मोठ्या दालनात बसल्यावर समोर एक चढून जायची, आणखी एक खोली - त्या खोलीच्या उजव्या कोप-यातलं, चटकन नजर वेधून घेणारं शिल्पकाम, आणि साऊंड सिस्टीम सांभाळणा-या माणसाची उन्हाळा असूनही अफलातून हेअरस्टाईल, हे मी प्राथमिक निरीक्षण म्हणून पाहून घेतलं.
तन्ना सरांनी प्रास्ताविक आणि काही ओळखीपाळखी करून दिल्या. आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भारतीय उपखंड हा आजच्या आफ्रिका खंडाला जोडलेला होता. तेव्हा तिथून तो दुभंगून इथे आला आणि तेव्हा किंवा त्यासुमारास त्या भागात काहीतरी गडबड होऊन ज्वालामुखीचे उद्रेक झाले. त्यातनं बाहेर आलेला लाव्हारस सुकून जे दगड धोंडे सगळीकडे तयार झाले, ते अवघ्या काहीशे वर्षांपूर्वी जोखून त्यांत लेणी कोरण्याचं काम अनेकांनी केलं. कान्हेरीच्या दगडापेक्षा मंडपेश्वराच्या दगडाचा दर्जा जास्त चांगला आहे असं कळलं. उगाचच मनात 'आट ले सहीये दहिसर झिंदाबाद' असं वाटलं. मंडपेश्वर येतं बोरिवलीत पण ते असो. शेवटी अंतर पाहता कान्हेरीपेक्षा मंडपेश्वर मला जवळचं.
डावीकडच्या, चढून जायच्या दालनात (खोलीत) उजवीकडे नटेशाची मूर्ती आहे. मला बाहेर बसल्या बसल्या उजव्या कोप-यातलं जे शिल्पकाम दिसलं होतं ते नुसतंच हिमनगाचं टोक होतं असं लक्षात आलं. या मूर्तीची बरीच पडझड झाली असली तरी जेवढी शिल्लक आहे तेवढीसुद्धा बाप दिसते. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव, गणपती, विष्णु अशा इतर मातब्बरांचीही हजेरी आहे. कल्पना अशी की नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत आहेत.
पंडित सरांनी या मूर्तीची ओळख करून देताना शैव पंथाबाबत, त्यांच्या तत्त्वज्ञानाबाबत जे काही सांगितलं ते ऐकून थोडी गंमतच वाटली. साधकाला आध्यात्मिक उन्नतीसाठी एकांत मिळावा, आणि तो मिळावा यासाठी त्यानं वेड्याचं नाटक करून लोकांचा तिरस्कार स्वीकारून वाळीत पडावं, अशा काही या पंथातल्या मार्गदर्शक सूचना आहेत हे ऐकताच 'मला तर नाटकही करावं लागत नाही' असा विचार डोकावून गेला. जसं एकांत मिळवण्यासाठी वेड्याचं, तसंच चार माणसांत आपण सामावले जावं यासाठी शहाण्याचं नाटक करावं लागतं हे आता सुचतंय. बाकी एकांत मिळवण्यासाठी वेडाची नाटकं करावी लागणं, म्हणजेच एखाद्यासाठी तो सरळ मागून न मिळण्याइतका अवघड असणं, यावरून एखाद्याच्या खाजगी आयुष्यात कुठल्या थरापर्यंत आसपासच्या मंडळींचा हस्तक्षेप होत असेल अशी कल्पना करावीशी वाटते. एवढ्या वर्षांनंतरही आपल्या समाजात हा हस्तक्षेप कमी अधिक प्रमाणात कायम आहेच. मोक्ष, निर्वाण या संकल्पनांप्रमाणे शैव पंथात दुःखांताची संकल्पना आहे. मला व्यक्तिशः ही संकल्पना मोक्ष आणि निर्वाणाहून जास्त आवडली.
सर बिचारे एका हातात माईक धरून आणि दुस-या हातातल्या टिशुने घाम पुसत न थकता बोलतच होते. त्यात त्यांच्यावर प्रकाशझोत मारलेला होता. इथे मानस अधनं मधनं माझी बाटली काढून पाणी संपवत होता. गर्दी बरीच असल्यानं आणि त्यामानानं जागा कमी असल्यानं लोकांचे दोन गट करून आधी एका गटाला मग दुस-या गटाला अशी एकेका ठिकाणची माहिती ते देत होते. तशी नटेशाची माहिती आम्हाला देऊन झाल्यावर दुस-या गटाला माहिती देईस्तोवर त्यांनी आम्हाला खांबांच्या खोबण्या पाहायला सांगितल्या. या गोलाकार खोबण्यांमध्ये प्रत्येकी दोन तीन मानवाकृती मला दिसून येत होत्या. प्रत्येक खांबावर बारकाईनं काम केलेलं होतं. बाहेरच्या बाजूच्या दोन खांबांची जरा विचित्रच, ओबडधोबड झीज झालेली दिसत होती. ती कशी झाली असेल याबाबत माझे आणि मानसचे वाद चालले होते. एका खांबावर खोबणीशेजारची एक मूर्ती मला गणपतीची वाटत होती, आणि मानसला ती एखाद्या पैलवानाची वाटत होती. एकूणच आम्ही मनात येतील तसे अंदाज बांधत उभे होतो. तेवढ्यात गाभ्याशेजारच्या खोलीत सरांनी आम्हाला बोलावलं.
या खोलीतली मुख्य मूर्ती पोर्तुगीजांनी उध्वस्त केली होती. आणि इतर मूर्तींना चुना फासला होता. खोलीत बाहेरून प्रकाश यावा म्हणून दारात कोणीही उभं राहू नका असं सांगितलेलं होतं. सगळे बाजूला दाटीवाटीनं उभे होतो. भिंतींनाही चिकटायचं नव्हतं. घाम फुटला होता. पण विषय भारी होता. या खोलीला जोडून आत आणखी दोन खोल्या दिसल्या. पोर्तुगीजांनी या भागाचा सामानसुमान ठेवण्यासाठी वापर केला होता. सरांनी फ्लॅश मारू नका असं सांगितलं. मी हे आधीही ऐकलं होतं. का ते कळेना.
पोर्तुगीजांनी मुंबईत ज्या दोन मुख्य धर्मस्थानांचं चर्चमध्ये रूपांतर केलं होतं, त्यातलं मंडपेश्वर हे एक होतं. व्यापाराच्या हेतुनं आलेले पोर्तुगीज सोबत धर्मही घेऊन आले आणि त्यांनी मंडपेश्वरात चर्चला साजेशी तोडफोड करून घेतली. उदाहरणार्थ, नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे दोन खांब काढून टाकले, मी आणि मानस ज्या खांबांच्या विचित्र पडझडीबद्दल अंदाज बांधत होतो त्यांच्यावर कोरलेल्या मूर्ती या देवदेवतांच्या आहेत असं समजून पोर्तुगीजांनी त्या मूर्ती उध्वस्त केल्या होत्या. मग त्यांना समजलं की त्या देवता नव्हेत आणि तेव्हा ते थांबले. मोठ्यांच्या युद्धांत सामान्यांचीही वाट लागते ती अशी. बाहेर डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी क्राॅस करून ठेवला. आणि उजवीकडच्या मूर्तीचं काही करता येईना म्हणून ती सोडून दिली. नटेशाच्या दालनाचं अल्टारमध्ये रूपांतर करण्यात आलं. जागोजागी लाकडी तुळई लावण्यासाठी खोदलेल्या चौकोनी खोबण्या दिसत होत्या. काही खोबण्यांत लाकडाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत.
गाभ्याबाहेर नंदीवरल्या छतावर एक वर्तुळ समुद्भरित (emboss) केलेलं दिसत होतं. ते कशासाठी हे विचारायचं राहून गेलं.
गाभ्याशेजारच्या खोलीतून बाहेर आल्यावर आम्हाला चक्क ताक दिलं गेलं. त्याला कढीला देतात तशी थोडी फोडणीही दिली होती आणि त्यामुळे ते आणखीनच छान लागत होतं. आमच्या न आलेल्या मित्रांनी काय काय चुकवलं याबद्दल बडबडत आम्ही ताक पिऊन घेतलं. मूर्ती फोडून क्राॅस कोरलेल्या ठिकाणी शेजारी बाहेरच्या बाजूला आणखी दोन मोठी दालनं होती. बाहेरून आम्हाला त्यांच्या लांबी रुंदीचा अंदाजच आला नव्हता. आतली जमीन आणि भिंती सगळंच ओबडधोबड होतं. पण ही दालनं प्रशस्त होती.
आम्ही मुख्य दालनात परतलो. ताक पिऊन सगळेच फ्रेश झालो होतो. आता सरांनी पोर्तुगीजांचा व्यापार, त्यांची समुद्रावरली मक्तेदारी, त्यांचे चाच्यांशी असलेले संबंध, त्याला उल्लालची अबक्का राणी हिनं दिलेलं आव्हान, यांचा इतिहास सांगायला घेतला. इथले राजे ताडगुळाची साखर, मीठ आणि चाच्यांपासून व्यापा-यांना संरक्षण देण्याबदल्यात खंडणी अशा तीन मुख्य उत्पन्न स्रोतांवर अवलंबून होते हे कळलं.
मंडपेश्वराचं प्रभावक्षेत्र मोठं होतं. इथं चर्च झाल्यावर त्याच्या उत्पन्नाचे तपशील आज उपलब्ध आहेत. सरांच्या मते आजच्या कोणत्याही देवस्थानापेक्षा मंडपेश्वर श्रीमंत होतं. पुढे पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून वसई जिंकून घेतल्यावर मंडपेश्वरही ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेख, जो तोवर आमच्या समोर असूनही नजरेस पडलाच नव्हता, सरांनी आम्हाला दाखवला. त्यावर मंडपेश्वर कधी सर केलं त्याची तारीख दिली होती वाटतं. ती पाहण्यासाठी काही जणांनी त्या शिलालेखाजवळ गर्दी केली. सनावळ्यांशी कायमच वाकडं असल्यानं मी लांबच राहिलो.
कान्हेरीप्रमाणेच इथेही वर्षाजल संचयाची नीट व्यवस्था करून ठेवली होती. पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्राॅसच्या पायथ्याशी एक मोठं टाकं सुद्धा आहे. चर्चच्या मागच्या बाजूस एक भलामोठा तलाव होता जो आज पूर्णपणे बुजवला गेला असल्याचं सरांनी सांगितलं.
मग आम्ही वरचा भग्न चर्च पाहायला गेलो. वर दगडी विटांचे अवशेष आहेत. चर्चखेरीज इथे काॅन्व्हेंट आणि त्यासोबतच थोडंफार पाश्चिमात्य शिक्षण देणारं काॅलेजही होतं. इथे चिनी भांड्यांचे अवशेष विखुरलेले होते. हे अवशेष आहेत तसेच राहू द्या, ते उचलू नका किंवा घरी नेऊ नका असं सरांनी सांगितलं. पोर्तुगीज चीनमधून भांडी मागवायचे आणि या भांड्यांच्या तळाशी ते ज्या चिनी कारखान्यातून घडवले आहेत त्याचा शिक्का आणि कारागीराची सही असायची. लहान मुलांनी लगेचच अवशेष शोधायला सुरूवात केली. खरं सांगायचं तर मलाही खाज होती, पण मी स्वतःला आवर घातला. लेण्यामध्ये फ्लॅश का वापरायचा नाही हे मी विचारून घेतलं. त्या लेण्यावर रंगकाम केलेलं असतं आणि फ्लॅश वापरून वापरून त्याची एक प्रकारे झीज होते असं कळलं.
मंडपेश्वराच्या संपूर्ण सफरीत मला एक गोष्ट लक्षात आली की इथे कान्हेरीप्रमाणे जागोजागी एकविसाव्या शतकातलं कोरीव काम कुठेही पाहायला मिळालं नाही. कुठेही अमुक लव्ह तमूक साधं खडूनंही लिहीलेलं नव्हतं. कान्हेरीपेक्षा इथला दगड नक्कीच जास्त चांगला आहे यावर माझा भक्कम विश्वास बसला. नाही म्हणायला काही काचेच्या बाटल्या फुटलेल्या दिसल्या, पण त्या खुपण्याइतक्या प्रमाणात नव्हत्या आणि म्हटलं तर वास्तुच्या बाहेर होत्या. त्यामुळे हुश्शच वाटलं. अशी सामान्य ज्ञानाची तृष्णा तृप्त करून, एक दोन ग्रूप फोटो खेचून, सरांचे आभार मानून, पोटाला लागलेली भूक तृप्त करायला आम्ही घरी निघालो.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर
(चु.भू.दे.घे.)
फोटो न टाकल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
16 May 2016 - 10:58 am | विटेकर
चान लिहिले आहे !
धर्म प्रचार किती विखारी रुप घेतो नाही ? या पाशवी आक्रमण कर्त्याना त्या मंदिराचे सौन्दर्य दिसले नसेल का ?
16 May 2016 - 11:01 am | प्रचेतस
सूरज पंडित म्हणजे प्रश्नच नाही.
बाकी कान्हेरीपेक्षा इथला दगड अधिक चांगला आहे असे म्हणण्यापेक्षा कान्हेरीतला दगड प्रचंड ठिसूळ आहे असं म्हणणं जास्त योग्य वाटतं.
छायाचित्रे मात्र हवी होती.
उदाहरणादाखल हे पहा
16 May 2016 - 11:36 am | खेडूत
छान...
बहुतेक हे ठिकाण असावे.
16 May 2016 - 12:26 pm | सुप्रिया
त्रिपुरारी पोर्णिमेला हे पूर्ण मंदिर पणत्यांनी सुशोभित करतात. आणि मोठमोठ्या सुबक रांगोळ्या काढतात.
खूप सुंदर वाटते ते द्रुष्य.
हे सर्व RSS कडून केले जाते.
16 May 2016 - 12:53 pm | आदिजोशी
बोरिवलीत मंडपेश्वरचा भाग पूर्वी जंगलासारखा असल्याने देऊळ वापराबाहेर गेल्यानंतर ह्या गुंफेत कैक शे वर्ष लोकांची ये जा नव्हती.
पोर्तुगीजांनी आक्रमण केल्यानंतर गुंफेच्या वरच्या कातळावर चर्च बांधले आणि इथेही क्राॅस कोरले. आक्रमकांच्या स्टाईल प्रमाणे मुर्त्यांचीही नासधूस केली. नंतर ते चर्चही कालौघात वापराबाहेर जाऊन पडिक झाले.
काही वर्षांपूर्वी चर्चने गुंफेची जमीन आमचीच अशी आवई उठवून चर्च विस्तारायची तयारी केली. ते झालं असतं तर गुंफा नेस्तनाबूत झाली असती.
इथे संघानी मधे पडून जनजागृती केली. चर्च विरूद्ध कायदेशीर लढा दिला. गुंफा साफसूफ केली. दरम्यान हे सिध्द झाले की वरचे चर्च काही शे वर्ष जुनं असलं तरी गुंफा जवळ जवळ १५०० वर्ष जुनी आहे. मग दर वर्षी संघाने लोकसहकारातून तिथे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायला सुरूवात केली. पणत्यांनी गुंफा सुशोभीत केली जाते आणि विविध सांस्कॄतीक कार्यक्रम होतात. आता तर सरकारनेच गुंफेला हेरिटेज साईट घोषित केल्याने चर्चच्या मालकीचा वाद मिटला.
पण हलकट चर्चने साधारण २० वर्षांपूर्वी पुन्हा हालचाली सुरू केल्या. टेंट वगैरे बांधून पाद्री, धर्मप्रचारक, इत्यादि लोकं पडिक जागी बसू लागली. हळूहळू टेंट वाढले, लोकंही वाढली. त्यांना हात लावायची सरकारची हिंमत नव्हतीच. पुन्हा जमीन आमची चे बॅनर आजूबाजूला लागले. मग शेवटी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एके दिवशी जाऊन सगळ्यांना धू धू धुतला. पुन्हा आता हिंमत झाली नाही.
ऐकीव माहिती - असं म्हणतात की ही गुंफा चर्चच्या खालीही खूप लांब पसरली आहे. पण ते उत्खनन करायचे म्हणजे मागच्या चर्चला नुकसान पोहोचेल. त्यामुळे अशा अनेक घटनांप्रमाणे ही माहितीही दाबली गेली.
16 May 2016 - 2:39 pm | नाखु
धागा उत्तम पण...
पुढारलेल्या पुरोगामी मिपा विश्वात, असा असहिष्णु वृत्तींचा पुरर्स्कार करणारा आणि अल्पसंख्याकांना दुखावणारा प्रतिसाद दिल्याबद्दल मी याच धाग्यावर साडे आठ मिनिटांचे मौन पाळणार आहे.....
गारवा..
अदिशेठ हलके घेणे..
17 May 2016 - 1:38 am | शलभ
हाऊ असहिष्णू..;)
लेख उत्तम..कधीतरी भेट देउ..
17 May 2016 - 1:38 am | शलभ
हाऊ असहिष्णू..;)
लेख उत्तम..कधीतरी भेट देउ..
16 May 2016 - 2:40 pm | एस
असे कट्टे नेहमीच माहितीपूर्ण असतात. चांगला वृत्तांत लिहिलाय.
16 May 2016 - 11:27 pm | बोका-ए-आझम
मुंबईतसुद्धा काही ऐतिहासिक स्थळं आहेत. कान्हेरी, मंडपेश्वर, घारापुरी सारखी काही चांगल्या अवस्थेत आहेत. सायन किल्ल्यासारखी काही गर्दुल्ल्यांचे अड्डे झालेली आहेत. अशा स्थळांचं पदरमोड करुन जतन करणाऱ्या आणि लोकांपर्यंत त्यांची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविषयी खूप आदर वाटतो.
17 May 2016 - 10:08 am | कंजूस
वा !त्या पंडित आणि तन्ना सरांनी सांगितलेली सर्व माहिती आठवून इथे लिहून ठेवा.जाऊ तेव्हा उपयोगी पडेल.
18 May 2016 - 6:06 pm | मुक्त विहारि
+१
18 May 2016 - 4:08 pm | सतीश कुडतरकर
त्या पंडित आणि तन्ना सरांनी सांगितलेली सर्व माहिती आठवून इथे लिहून ठेवा.जाऊ तेव्हा उपयोगी पडेल.>>>+1
18 May 2016 - 6:07 pm | मुक्त विहारि
पुढच्यावेळी फोटो टाकलेत तर उत्तम.
18 May 2016 - 6:37 pm | यशोधरा
लेख आवडला.
18 May 2016 - 6:43 pm | महामाया
लेख आवडला. चांगली माहिती मिळाली. फोटो असते तर ‘सोने पे सुहागा’ होता...
20 May 2016 - 1:38 pm | वैनिल
माझ्या मित्राने केलेले रसग्रहणः
मंडपेश्वर नटेश
20 May 2016 - 3:02 pm | पैसा
छान माहिती