सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक
सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम
सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!
सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक
सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद
सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!
सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .
सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना
सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक
सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी
सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .
सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस
सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव
श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .
६ डिसेंबर २०१५ ला रात्री उशीरापर्यंत माणगांवच्या लॉजमध्ये झोप आली नाही. दिवसभर घाम गेल्यामुळे व कदाचित शरीरामध्ये साखर कमी झाल्यामुळे रात्री उशीरापर्यंत वारंवार बाथरूमला जावं लागत होतं. त्यामुळेच झोपही लागत नव्हती. शेवटी रात्री दीड वाजता थोडा आराम मिळाला आणि झोप लागली. पण तरी जास्त झोप झाली नाही. डेडलाईनचं काम असल्यामुळे पहाटे साडेचारला उठलो. लॅपटॉपवर अडीच तास काम केलं. नंतर थोडा व्यायामही केला. आज समुद्राच्या किनारी पोहचायचं आहे- श्रीवर्धन आणि त्यानंतर कोंकणात दक्षिणेच्या बाजूला पुढे जायचं आहे. आज कमीत कमी १२० किमी चालवण्याचं लक्ष्य आहे. सकाळी निघताना त्याविषयी मनात अजिबात शंका नाही.
सकाळी निघेपर्यंत नऊ वाजले. पण लॅपटॉपवरचं काम चांगलं झालं. नंतरचं काम दुपारनंतर लॉजवर जाऊन करेन. माणगांवमध्ये राष्ट्रीय महामार्ग १७ जवळ नाश्ता केला. इथून रस्ता हळु हळु समुद्राकडे जाईल. पण त्याआधी काही छोटे डोंगर समोर दिसत आहेत. इथून श्रीवर्धनला जाताना वाटेत एक घाट आहे, हे माहिती आहे. पण तो छोटाच असणार. आत्ता उत्साह वाढलेला आहे. एक पूर्ण दिवस सायकलवर चालवल्यानंतर दुस-या दिवशी शरीर लयीमध्ये आलं असणार. त्यामुळे काही अडचण येणार नाही. श्रीवर्धन तसं माझ्या जाण्याच्या दिशेला नाहीय. कारण मला दक्षिण कोंकणात जायचं आहे आणि श्रीवर्धन तसं सरळ पश्चिमेकडे आहे. पण श्रीवर्धनला जातोय, कारण सर्वांत जवळचा समुद्र किनारा तिथेच मिळेल. मग तिथून पुढे जाईन.
जसं म्हसळा गावाच्या रस्त्याला लागलो, अगदी थोड्याच वेळात घामाच्या धारा लागल्या. पूर्ण शर्ट घामाने भिजून गेला. मनात भितीची लहर चमकून गेली. इतका घाम तर काल संध्याकाळपर्यंत आला नव्हता. सकाळी अर्ध्या तासातच इतका घाम! पण रस्ता सुंदर आहे. कोंकण! कोंकणात सायकल चालवतो आहे! कोंकणाच्या ह्या भागात पहिले कधी आलो नाहीय. लाल माती आणि हिरवागार परिसर! थोडा वेळ रस्ता समतल राहिला आणि लवकरच साई नावाच्या गावाच्या आधीचा घाट सुरू झाला. इथून पुढे रस्ता असाच सीसॉ करत राहील. त्यामुळे सायकलचं गेअर काँबीनेशन ठरवणं कठिण आहे. विशेष अडचण येत नाहीय. पण जेव्हा दोन- तीन किलोमीटरच्या पुढेही चढ सुरू राहिला, तेव्हा त्रास झाला. घामही फार येतोय. माणगांव सोडून जेमतेम अर्धा- पाऊण तास झालाय, पण चढाच्या रस्त्याने थकवलं. दुस-या कोणत्याही दिवशी जो चढ सामान्य होता, तोच आता भीषण वाटतोय! खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी पायी जाणं भाग पडलं. कधी संपतोय, कधी संपतोय असं वाटणारा चढ एक दिड किलोमीटरपर्यंत सुरू राहिला. ह्या चढाने फार त्रास दिला.
कोंकण!
काही मिनिटेच असतील, पण असं वाटलं की किती मोठ्या काळाने सपाट रस्ता आला आहे. एक छोटं गाव लागलं- साई. इथे थोडा नाश्ता केला. पाणी भरून घेतलं. पुढचं मोठं गाव म्हसळा असेल. ते जेमतेम वीस किलोमीटर पुढे असेल. पण आजची राईड प्रचंड कठिण जाणार आहे. सुरुवातीच्या दहा किलोमीटरसाठीसुद्धा दिड तास लागला आहे. साधाच चढ इतका मोठा वाटतोय. त्यानंतर कदाचित इतका घाट नसेल. कोंकणच्या रमणीय प्रदेशाचा आनंद घेत पुढे निघालो. थोडा वेळ पुढे परत चढ लागला आणि मग उतार मिळाला. पाणी तर पितच राहायचं आहे, त्याशिवाय थोडं थोडं खात राहायला हवं. त्यामुळे बिस्किट, चिक्की, चिप्स इत्यादी सोबत आहेच. आता इलेक्ट्रॉल असलेलं पाणी प्यायला सुरू केलं. काल ह्याच इलेक्ट्रॉलने मला जादुई ऊर्जा दिली होती. कदाचित आजही ते मला मदत करेल. आता ऊन वाढतंय. दुपारचा दिड वाजतोय आणि आला परत एक घाट! तसा चढ सामान्यच आहे. छोटासाच घाट असणार. पण कसंबसं चालवू शकतोय. आणि लवकरच पायी पायी जावं लागलं. आज हे सगळं नक्की काय होतं आहे? चढ तर जाऊ द्या, पण समतल रस्त्यावरही मीस्लोच चालवतो आहे. कदाचित शरीराच्या फिटनेसबद्दल मला वाटलेली शंका बरोबर आहे. खरंच माझं शरीर बॅक टू बॅक राईडसाठी तयार नव्हतं. कारण जेव्हा एका दिवशी ४७ किलोमीटर केले, तेव्हा दुस-या दिवशी ५१ किलोमीटर चालवतानाही खूप जास्त घाम व थकवा आला होता. वेगही कमी झाला होता. बहुतेक इथेही तसंच होतंय. आणि तसंही आज माझी सलग तिस-या दिवशी मोठी राईड आहे. ५ डिसेंबरला निघण्याच्या आधी ४ डिसेंबरलाही एक ७७ किलोमीटरची राईड केली होती- वॉर्म अप म्हणून. पण आता हाच सगळा थकवा त्रास देतोय. बघूया. श्रीवर्धन! अचानक मनात विचार चमकून गेला की, श्रीवर्धनवरून पुण्याला बस जाते.
म्हसळा गावाच्या आधीही एक घाट लागला. त्याने अजून थकवलं. मला दिवसभरात १०० पेक्षा जास्त किलोमीटर करायचे आहेत. त्यामुळे आता चढावर संघर्ष करण्याचं थांबवलं आणि सरळ पायी पायी जायला सुरुवात केली. आता कडक ऊनही आहे. डेस्परेटली वाट बघतोय की, कधी म्हसळा येईल आणि चांगलं हॉटेल मिळेल. पण त्याआधी म्हसळा गाव तर यावं लागेल ना! साधाच चढही चढता येत नाहीय आणि त्यामुळे हाकेचं अंतरावर आलेल्या म्हसळामध्ये पोहचायला बराच वेळ लागला. जवळजवळ एक वाजता म्हसळामध्ये पोहचलो. अतिशय गर्दीचं गाव. अरुंद गल्ल्या आणि खेड्यासारखी वस्ती. पण गर्दी शहरासारखी. इतका थकवा आणि भूक लागलेली असूनही थांबावसं वाटलं नाही. फक्त काही बिस्किटस घेतले आणि पुढे निघालो. गावाबाहेर चांगलं हॉटेल मिळेल, अशी आशा होती. पण नाही! म्हसळा गाव हळु हळु मागे पडलं, पण चांगलं हॉटेल मिळालंच नाही. नॉन व्हेजचेच जास्त होते. थांबायची इच्छा झाली नाही. पाण्याची बाटलीसुद्धा आता रिकामी होते आहे. इथून श्रीवर्धन बावीस किलोमीटर असेल. पण हे बावीस किलोमीटर 'फक्त' असणार नाहीत. आणि श्रीवर्धनच्या पुढे जाता येईल, असं वाटत नाहीय आता.
म्हसळानंतर परत लगेच चढ मिळाला. आता लवकरच समुद्र किनारा दिसण्याची आशा आहे. खूप वाट बघतोय की, दूरवर निळी रेषा दिसेल. पण त्याला अजून वेळ लागेल. काही पाण्याचे प्रवाह दिसले, पण ते बहुतेक खाडीकडे जाणारे असावेत. आता हा चढ! सायकलचे जुने दिवस आठवले. जुन्या दिवसांमध्ये सायकल चालवताना मध्ये मध्ये श्वास मिळण्यासाठी थांबावं लागायचं. आताही तसंच थांबावं लागत आहे. आणि चढ असेल तिथे तर पायी पायीच. आता खाण्याचे पदार्थ व पाणीही लवकर संपत आहे. पण काही भिती नाही, कारण आपल्या शरीरात इतकं स्टोअर असतंच की, काही तास किंवा काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो किंवा कमी पाण्यात भागवू शकतो. पण फार जास्त थकल्यामुळे हेही होतं की, हळु हळु विचार क्षमता मंदावते. एक अडसर येतो. गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत.
श्रीवर्धनच्या आधी जणू जंगलच लागलं
हाच क्रम पुढेही सुरू राहिला. एक गंमत झाली जेव्हा आजच्या नशीबावरच हसायला आलं. एका जागी चढावर थोडी सावली बघून काही चिप्स आणि चिक्की खायला थांबलो. जवळच मजूरही होते. खाण्यासाठी चिप्सचं पॅकेट उघडलं तर लगेच बाजूला आवाज झाला. एक माकड माझ्याकडेच बघतं आहे. त्या थकलेल्या स्थितीमध्ये खाण्याची हिंमत झाली नाही आणि चिप्सचं पॅकेट बंद करून आत ठेवलं. परत पायी प्रवास सुरू. हा दिवस वेगळाच आहे. एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीय. एक एक किलोमीटर काय, एक एक मीटरसाठी घाम गाळावा लागला. तेव्हा कुठे हा 'महाकाय चढ' संपला. आता शक्यतो श्रीवर्धनपर्यंत उतार असला पाहिजे. कारण ते तर समुद्र किनारी आहे. आणि जेव्हा अशा चढ- उतारांमधून पुढे जातो, तेव्हा कुठे समुद्राची खोली आणि स्थिरता मिळते.
कशी बशी सायकल चालवत राहिलो. मध्ये मध्ये चढ अजून घाबरवत होता. पण श्रीवर्धनच्या काही किलोमीटर अलीकडे दूरवर समुद्राची निळी रेषा दिसली. काही वेळ जंगलासारखा निर्जन परिसर होता. सूर्यही पश्चिमेकडे असल्यामुळे व्हिजिबिलिटी इतकी नव्हती. पण आता समुद्र इतका जवळ आला आहे! वा! आणि एक मोठ्ठा उतार मिळाला. इतका की त्यानेही थोडी भिती दिली. पण आता बस. आता श्रीवर्धन आलंच आहे. पण ह्या ४६ किलोमीटरसाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. सकाळी नऊ वाजता निघालो होतो आणि आता दुपारचे सव्वा तीन झाले आहेत! आणि हे साधे चढ हिमालयासारखे वाटले. इतका थकलोय की, पुढे जाण्याची इच्छाच नाही. आणि ह्या सगळ्या राईडचं पूर्ण गणितच बिघडलं आहे. काल कमी वेग असेल, पण १२५ किलोमीटर तरी केले होते. पण आज त्याच्या अर्धेही नाहीत. आणि सहा तास लागले. एका अर्थाने मी किती पाण्यात आहे हे बरोबर कळालं.
श्रीवर्धन गावामध्ये आमलेट खाल्लं. हॉटेलवाल्यांनीच स्वस्त लॉज सांगितला. आता आधी लॉजवर जाईन, थोडा आराम आणि आंघोळ करेन आणि मग बीचवर जाईन. लॉज बीचच्या जवळच आहे. आणि लॉजवर जाताना रस्त्यालगतच्या किना-यावर एक नाव दिसली! समुद्राच्या जवळ आल्यामुळे शरीर नाही, पण मनाचा थकवा गेला. नारळाची झाडं! कौलारू घरं! आणि खास मासेदार हवा! वा! लॉजही मस्त आहे. श्रीवर्धनमधल्या जुन्या घरांसारखंच घर आहे.
अहा!
चढ छोटेच . . .
नकाशा
संध्याकाळी ताजातवाना होऊन निघालो. इथून बीच अगदी जवळ आहे. सायकल घेऊनच निघालो. नारळाचे झाड आणि टिपिकल कोकणी बाग- शेती! सगळं अगदी वेगळंच भासतंय. आज काहीच धड सायकलिंग जमलं नाही, ह्याचं दु:ख तर आहेच. आता पुढे अजिबात जाऊ शकणार नाही, हेही दिसतंच आहे. कारण सगळं गणितच साफ चुकलं आहे. कुठे रोज १२० किमी चालवण्याचं स्वप्न आणि कुठे हे रडत रडत केलेले ४८ किमी! दु:ख झालं. पण ह्या सगळ्या दु:खामध्ये एक वेगळीच शांतीसुद्धा आहे. एक रिक्तता. आणि कशामुळेतरी ही रिक्तता खूप सुंदर वाटते आहे. जसं आपण एखादं स्वप्न बघत असतो आणि ते पूर्ण विखरून जातं. आल्डस हक्सलेच्या जीवनात उल्लेख आहे की, त्याने संपूर्ण जीवनभर मेहनत करून एक लायब्ररी बनवली होती. जगातून ग्रंथ एकत्र केले होते. कुटुंबातल्या सदस्यांइतकी तो ग्रंथांची काळजी घेत होता. पण एका दिवशी आगीत त्याची सगळी लायब्ररी जळाली. आल्डस हक्सलेच्या बायकोला वाटलं की, तो आता वेडा होणार. पण आल्डस अगदी शांत बसून बघत राहिला. त्याला स्वत:लाच आश्चर्य वाटलं. जेव्हा बायकोने त्याला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, "मलाच आश्चर्य वाटतंय. पण मला काहीच वाटलं नाही. उलट असं वाटतंय की, एक ओझं उतरलं. एक शांती मिळाली.”
जसं आपण एखाद्या गोष्टीचं अगदी वेड घेतो; त्याच्या मागे लागतो आणि अचानक ती गोष्ट आपल्या हातातून निसटून जाते. . . एखादं स्वप्न घेऊन आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि एक दिवस त्याचे तुकडे तुकडे होताना बघतो. . . सायकलिंगचं एक खूप मोठं स्वप्न मी बाळगलं होतं. माझ्या मनाचं सायकलिंगशी जणू तादात्म्य केलं होतं. पण अचानक ते सगळं विखुरलं. म्हणजेच माझं मन एकदम रिक्त होईल. एकदम सुनं सुनं आणि म्हणून ते 'स्व' ला समोरासमोर बघू शकेल. त्यामुळे एक प्रकारची अनोळखी शांतता जाणवते आहे. आणि जो सायकलचा एक ज्वर चढला होता, तो उतरल्यामुळे मन एकदम 'स्वस्थ' झालं. सगळी उत्त्रेजना निघून गेली. समुद्राच्या किनारी थोडा वेळ त्या शांततेत डुबकी घेतली. ह्याला एका प्रकारचा मृत्यु म्हणायला हवं. जेव्हा कोणी आपली जवळची व्यक्ती दुरावते, तेव्हा आपल्याला दु:ख तर होतंच, पण एक रिक्तताही जाणवते. जणू आपलाही थोडा भाग मृत्युमुखी पडला आहे. मला हेच वाटतंय. आत्तापर्यंत सायकलिंग हे मनाला भरणारं माध्यम होतं. अचानक ते थांबल्यामुळे मन अगदी निरभ्र झालं. अजिबात उत्तेजना नाही, पळापळ नाही. उलट ह्या दु:खामध्येही ह्या रिक्ततेचा वेगळा आनंद येतोय. त्या रिक्ततेला लगेच भरण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त त्याचा आस्वाद घेत राहिलो. समुद्राकडे पोहचेपर्यंत आपल्याला अनेक उतार- चढावांवरून जावं लागतं, पण एकदा समुद्र मिळाला की, सगळं किती गहिरं, अथाह आणि स्थिर! सायकलिंगमध्ये अनेकदा अनुभव घेतला होता की, दिवसभर सायकल चालवल्यानंतर मनातल्या इच्छा आणि मनाचे खेळ खूप शांत व्हायचे. कोणतीच इच्छा सबल नाही राहायची. आज ह्याचाही अनुभव घेतला की, सायकलिंगमुळे एक क्षण असाही येतो की, शेवटी सायकलिंगचीही इच्छा उरत नाही! त्या संध्याकाळी हेच वाटलं की, आता सायकलिंग बंद! सायकलमधून संन्यास घेईन.
संध्याकाळी समुद्राचा आनंद घेतला. आराम केला आणि लॅपटॉपवर कामही केलं. इतर काही त्रास झाला नाही. आता पुढे जाण्याची बिलकुल इच्छा नाहीय. दुस-या दिवशी बसनेच जाईन. पण दुस-या दिवशी मनाने परत स्वत:ला भरण्याचा प्रयत्न सुरू केला. कारण इतक्या सहज मन:शांती थोडीच मिळते? मन असं अनासक्त होत नसतं. सायकल चालवल्यानंतर जी क्षणिक अनासक्ती यायची, ती शरीर थकल्यामुळे असायची. दुस-या दिवशी आराम केल्यानंतर जसं शरीर ताजं झालं, मनाने म्हणायला सुरुवात केली, पुढे का जात नाहीस, पुढे इतका त्रास होणार नाही, जाता येईल. मन समजवायला लागलं आणि रॅशनलाईझ करायला लागलं की, ह्यावेळी तुझी तब्येत इतकी चांगली नव्हती, पुढच्या वेळी आणखी तयारी करून ये, फिटनेस वाढवून ये आणि मग प्रयत्न कर. तेव्हा यश मिळेल. आपलं मन नेहमी अगदी हेच करतं. जेव्हा केव्हा नशीबाने आपण स्वत:चा सामना करतो व स्वत:च्या रिक्त मनाचा सामना करतो, तेव्हा मन हळु हळु समजवायला लागतं. त्यामुळे आपण अनेक वेळेस स्वत:मधली रिक्तताही बघू शकत नाही. नवीन कशाचं तरी निमित्त करून मन त्याला भरू लागतं. असो. त्याच दिवशी बसने परत निघालो
तर अशी ही दुस-या दिवशीच संपलेली माझी कोंकण मोहीम माझी शेवटची सायकल मोहीम होती? त्यानंतर कधी मला सायकलवर मोठी मोहीम करता येणार होती? ह्याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो. सध्या तरी ही लेखमाला इथेच थांबवायला हवी. लवकरच पुढची लेखमाला घेऊन येईन. वाचणा-या आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद. ह्या प्रवासात सोबत दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि शुभेच्छा!!
पुढील भाग: पुढील लेखमालिकेमध्ये
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
5 May 2016 - 6:28 pm | एस
अचानक संपली? अशी संपेल असं अजिबात वाटलं नव्हतं. लवकरच सायकलिंग पुन्हा सुरू केलं असेल अशी आशा बाळगून पुढील लेखमालेची वाट पाहतो.
5 May 2016 - 6:35 pm | अप्पा जोगळेकर
अहो काळजी नको. नंतर त्यांनी लदाह मोहीम केली आहे. जी आपण सगळ्यांनी आधीच वाचली आहे.
6 May 2016 - 1:12 pm | मार्गी
धन्यवाद काका, लदा़ख़ची मालिका जून २०१५ मध्ये लिहिली व हा लेख डिसेंबर २०१५ चा आहे. पण सायकलिंग सुरू राहिलं. आणि लेखनही सुरू राहील. काळजी नसावी. :) धन्यवाद.
5 May 2016 - 6:41 pm | मोदक
लवकरच पुढची लेखमाला घेऊन येईन.
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.
तुम्ही श्रीवर्धनपर्यंत तरी पोहोचला होतात.. आमच्या फसलेल्या कोकण राईडमध्ये आंम्ही क से ब से माणगांव ला पोहोचलो होतो. आणि नंतर मुकाट पुण्याला परत आलो.
तुम्ही भारी पल्ला मारलात. ग्रेट..!!! __/\__
..आणि सायकलींग सोडायचे मनातही आणू नका. झोप न होणे, पाणी कमी पडणे, पंक्चर ही साधी वाटणारी कारणेही सगळा प्लॅन उध्वस्त करतात. अपयश तात्पुरते असते. राईड पूर्ण झाल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो.
:)
5 May 2016 - 6:48 pm | चांदणे संदीप
मी माझ्या हापिसातल्या कामाला मार्गी लागतो!
@ मार्गी - सलाम!
Sandy
5 May 2016 - 6:50 pm | sagarpdy
+1
7 May 2016 - 6:09 pm | मित्रहो
सलाम
5 May 2016 - 8:06 pm | राघवेंद्र
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत!!!
5 May 2016 - 8:13 pm | बाबा योगिराज
____/\____
मार्गी भौ,
अस अर्ध्यात सोडून जाऊ नका.
मला वाटत मालिका योग्य ठिकाणी थांबवलीत.
5 May 2016 - 8:33 pm | स्वच्छंदी_मनोज
अतीशय मस्त लेखमाला. जरी अर्ध्यावर आणी अचानक संपल्यासारखी वाटली असली तरी त्याने तुमच्यात झालेले बदल अचूक टिपलेत. पुढील लेखमालेची वाट बघतोय आणी त्यात तुमच्या तुम्हाला नव्यानेच सापडलेल्या सायकलीस्टचे आम्हाला दर्शन होओ.
रच्याकने: हा माणगाव, साई, मोर्बा, म्हसळा, श्रीवर्धन, दिघी परीसर अगदी चांगल्याच परीचयाचा आहे. जवळच्याच गोरेगाव मध्ये काही वर्षे राहीलोही आहे आणी ह्या परीसरात भरपूर सायकलींग सुद्धा केले आहे त्यामुळे तुम्हाला आलेले अनुभव समजून घेवू शकतो :) :)
6 May 2016 - 11:42 am | चाणक्य
रिक्तपण छान उतरलंय. लेखमाला चांगली झाली.
6 May 2016 - 1:09 pm | मार्गी
काय बोलू, इतके जण पाठ थोपटत आहेत आणि सोबतीला आहेत! खरंच खूप धन्यवाद!
बाय द वे सायकलिंग थांबलं नाही. सुरू राहिलं आणि आता नवीन मोहीमेची तयारीही सुरू आहे. हे विचार फक्त त्या वेळी वाटलेले लाईव्ह विचार होते! :) आणि सायकलचा नाद आता सुटणं शक्य नाहीय!
आता नवीन विषयावर लिहीन. सायकलीवरही लिहेन पण पुढच्या मोहीमेच्या नंतर. म्हणून ही लेखमाला औपचारिक अर्थाने थांबवली. सर्वांना खूप खूप धन्यवाद. मोदकजी, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आणखी प्रेरणा देऊन गेलं! लवकरच भेटू. धन्यवाद.
6 May 2016 - 1:16 pm | स्पा
लाल सलाम
चायला बाईक ने जाणाऱ्या रायडर्सचे पण कोकणातले घाट घामटे काढतात, तुम्ही तर सायकल वर होतात.
तुमच्या जिद्दीला सलाम.
अजून एक आवडले म्हणजे तुम्ही जास्त शो शायनिंग न करताहि इतके लांबचे पल्ले गाठता, इतर अनेक सायकलस्वार इतर गोष्टींवर इतका खर्च करतात कि बास, खरच गरज नसते.
6 May 2016 - 1:17 pm | मोदक
अभिनंदन..!!!!
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.
हा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेलच. नसल्यास पुन्हा एकदा.
आम्ही केलेली कोकणातली सायकल भ्रमंती..
6 May 2016 - 1:20 pm | मोदक
अरे हो.. म्येन मुद्दा राहिला...
आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा "दिवेआगार ते माणगांव" असा आहे. साधारण याच रूटवर प्रवास करून तुम्ही लेखमाला संपवलीत. :)
13 May 2016 - 12:24 am | कपिलमुनी
किती ती झैरात !
13 May 2016 - 12:32 am | मोदक
हिहिहिहि... :))
6 May 2016 - 1:12 pm | वेल्लाभट
बेकार भारी
6 May 2016 - 1:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख तर मस्तच जमलाय पण श्रीवर्धन बीचवर पोचल्यावर मनात उठणारे विचारांचे तरंग अतिशय तरलतेने टिपले गेलेत.
एकट्याने सायकल भ्रमंती करताना जास्त अडचणी येत असतील ना? म्हणजे पंक्चर होणे, पाणी कमी पडणे अशा अडचणी स्वतः सोडवायला लागत असणार. शिवाय प्रत्येक ठिकाणी मुक्काम शोधणे वगैरे आलेच.
7 May 2016 - 7:03 pm | अजया
_/\_
पुढील अनेक लेखमालांच्या प्रतीक्षेत.
12 May 2016 - 10:18 pm | पैसा
_/\_
लिहीत रहा!
18 May 2016 - 5:37 pm | स्थितप्रज्ञ
"सायकलिंगचा नाद आता सोडून द्यायचा" हा विचार प्रत्येक cyclist च्या मनात एकदातरी येतोच. काहींच्या मनात सारखा येतो :P
असो, पण सायकलिंगची हौस फिटली असे वाटल्यावरही तुम्ही ते परत सुरु ठेवलेत यातच सगळे आले! गुड गोइंग!!!
माझी सायकल पहिल्यांदा पंक्चर झाली होती आणि मला ते अजिबात काढता आले नव्हते तेव्हा पण काहीसे असेच विचार मनात आले होते. मला तोच incident आठवला.