झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 4:17 am

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो.

त्या कॉलनीत आमचं भाजीचं दुकान होतं. दुकान म्हणजे टिनाची शेड बांधलेली. दोन्ही बाजूंनी बांबूच्या चिपट्यांपासून बनवलेल्या तट्ट्या. रात्री समोरचा भाग झाकायला, बंद करायला आणखी एक तट्टी. मागची बाजू पक्कं बांधकाम असलेल्या दुकानांची रांग होती. आमचं भाजीचं दुकान कॉलनीच्या प्रवेशाच्या रस्त्याच्या ऐन चौकात होतं. त्या चार पक्क्या दुकानांच्या डाव्या भिंतीला आमचं दुकान आणि मागच्या भिंतीला अशाच तीन बाजुला तट्ट्या लावून तयार केलेली झोपडी. वरुन टीनपत्रे. चार माणसं जवळ जवळ झोपु शकतील इतकीच जागा होती ती. पुढे थोडसं अंगण होतं, न्हानी अशीच तट्ट्यांची बांधलेली. बाजूला कपडे धुवायचा दगड.

ती जागा भाड्याची होती. दुकान आणि घराचे बहुतेक शंभर रुपये महिना भाडं होतं. भाजीचं दुकान चांगलं चालायचं, म्हणजे बर्‍यापैकी पैसा मिळायचा. खायला प्यायला उत्तम होतं. दूध, अंडी, ब्रेड आमच्याच दुकानात मिळायचे. शिवाय ताजा भाजीपाला. मला वरणभात खूप आवडायचा. बाबा कधीच खाण्यापिण्यात, कपडेलत्त्यात हयगय करत नसत. दिवाळीचे फटाके भरपूर. पण खेळणी मात्र कधीच आणायचे नाहीत. आयुष्यात माझ्यासाठी वडिलांनी खास आणलेलं एकमेव खेळणं म्हणजे एक चारचाकी गाडी. त्याआधी, त्यानंतर कधीच नाही. खाण्यापिण्याचे लाड करतो पण गुलाबी लाड नको असे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यांचं लहानपण दुसर्‍यांनी दिलेले कपडे घालण्यात, मागून आणलेल्या भाकरी खाण्यात गेलेले.

वडीलांचा जनसंपर्क चांगला, आमच्या जातीमधे वावरही चांगला, बोलण्यात फटकळ. का कुणास ठावूक त्यांना अचानक गावोगावी फिरण्याच छंद लागला.पहाटे मेन मार्केटात जाऊन भाजी घेऊन येणे, ती धुवून मांडणे. बोहणी झाली की आईच्या हाती दुकान सोपवून हिंडायला मोकळे. लग्नाच्या बोलणी करायला जाणे, लग्न जुळवून देणे यात बाबा तरबेज होते.

मला आठवतं, १९९५ नंतर लोकं बिघडायला लागली तोवर म्हणजे सात-आठ वर्षात किमान शंभर दिडशे तरी संसार बाबांनी उभे करुन दिले असतील. नंतर काही घटनांमधे दोन पार्ट्यात विसंवाद होऊन काडीमोड झाला आणि 'बाबांनी नीट बघून स्थळ आणलं नाही' असे आरोप होऊ लागले तसे हे लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे त्यांनी कमी केले. बाबांच्या फटकळ बोलण्याचे भारी किस्से आहेत. पण त्यानेच कित्येक लोकांना फायदा होत असे. म्हणुन अपमानित होतील असे बोलणे असून बाबांशिवाय कित्येकांचे पान हलायचे नाही. एकदा भर लग्नाच्या बैठकीत एक किस्सा घडला. एका स्थळ म्हणुन आलेल्या मुलाचे वडील बर्‍याच वर्षांआधी वारलेले. त्या मुलाचे घर इत्यादी बघायला मुलीकडून बाबा आणि काही जण गेले होते. तर तिथे बैठकीत एक आगंतुक व्यक्ती बसलेला होता. लग्नाच्या बोलणी करण्याच्या बैठकीत नातेवाईकांशिवाय कुणी असू नये असा दंडक असतो. मध्यस्थही जातवाले आणि सहसा नातेवाईकच असतात. हा तिर्‍हायित शेजारी असून, कुटूंबाशी कुठल्याही तर्हेने संबंधित नव्हता. बाबांनी भर बैठकीत त्याला विचारले. तुम्ही इथे काय करत आहात. तो म्हणाला "काही नाही. मी शेजारी आहे,आलो असाच." बाबा बोलले, "ह्या बैठकीत तुमचे तर काहीच काम नाही." हा संवाद सुरु असतांना मुलगा आणि त्याची आई यांची चलबिचल बाबांनी हेरली. आणि बॉम्बच टाकला. "ह्या बाईंशी तुमचे काही संबंध आहेत का?" झालं. संपलं. बाबा म्हणाले हे लग्न होऊ शकत नाही. पुढे बर्‍याच दिवसांनी कळलं, बाबांचा अंदाज अचूक होता. असे आमचे बाबा, अगदी जीवघेणे फटकळ, तोंडाला येईल ते कुणाचीही पर्वा न करता बोलून मोकळे. सगळ्या नातेवाईकांत बाबांना क्रॉस जाणे कुणालाच जमायचे नाही. कारण ते अखंड सत्य बोलायचे. लपवाछ्पवी, राजकारण शून्य.

वडीलांचा आपल्या लहान भावांवर फार जीव. त्यांना कुठेतरी शहरात कामाला लावावे म्हणून बरीच खटपट करीत. एकाला उसाच्या रसाचे गुर्‍हाळ सुरु करुन दिले. मस्तपैकी एक बैल आणला, ते रस काढण्याचे यंत्र. खुर्च्या-टेबले. त्यात सुरुवातीला वडिलांनी लक्ष घातले तोवर चांगला पैसा मिळाला. मग त्या काकांनी दहा हजाराला फटका दिला. कर्ज काढून वीस सायकली विकत आणून भाड्याने सायकल देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यातल्या बहुधा सात आठ सायकली चोरीस गेल्या. म्हणजे भाड्याने नेतो म्हणुन गेल्या त्या परत आल्याच नाही. मग काही विकल्या. एक राहिली होती बाबांच्या वापरासाठी. तीही एक दिवस अंगणातून चोरीला गेली. आईला चांगलाच धक्का बसलेला.

एका काकाला बँकेत नोकरीस लावून दिले. सातव्या दिवशी साहेब टांग मारुन गावाला परत. म्हणे चपराशाची नोकरी नाही करणार.

वडील बारावी झाल्यावर ह्या शहरात आले होते. तेव्हा साधारण दोनेक लाख लोकसंख्येचं हे शहर. त्यांनी बीकॉम ला प्रवेश घेतला. जवळच्या सरकारी आस्थापनात ठेकेदाराच्या हाताखाली मजुरांवर लक्ष ठेवणारे सुपरवायजर झाले. तिथेच एका माणसाने आपल्या जातीचा, गोरागोमटा, छान व्यक्तिमत्व असलेला हा पोरगा हेरला. आमचे वडील चतुर्भूज झाले. नंतर कुठल्याशा वादावरुन ती नोकरी सोडली. एकटेच मुंबईस गेले. तेव्हा मी सहा महिन्यांचा होतो - आईच्या पोटात. ८० साली माझा जन्म झाला आणि त्यांची दु:खे अपरिमित वाढली. शहरात कुठेतरी छोटीशी खोली होती दहा रुपये महिना भाड्याची. एक बारदाना होता, पोतं - गहु भरतात, साखर भरतात ते. त्याच्यावर आई-बाबा आणि मधे मी असे झोपायचो. अशा अनेक रात्री रडत घालवल्या त्या दोघांनी. कुठेतरी रोजंदारीवर काहीतरी काम कर, संध्याकाळी एक किलो पिठ आणि मिर्च्या-कांदा आण, मग स्वयंपाक. काही दिवस एमायडीसीतल्या तेलमिलमधे कामास होते. शेंगदाण्यापासून तेल काढल्यावर ढेप बनते. मशिनमधून ती ढेप खाली पडते ती पटापट उचलून पोत्यात भरून बाहेर काढायला लागते. ती भयंकर गरम असायची.बाबांचे हात भाजायचे. नंतर हमाली केली. रिक्षाही चालवली काही दिवस. भांड्यांच्या दुकानात पोर्‍या म्हणुन काम केलं. असे बरेच काय काय दिवस काढले. हे का होत होतं, शिक्षण होतं तर नोकरी का नाही केली असे प्रश्न मी त्यांना कधीही विचारले नाही. तुम्हीही विचारु नका.

पुढे शहरातल्या सुस्थितीत असलेल्या कोण्या मानलेल्या बहिणीने हे भाजीचे दुकान टाकायची आयडीया दिली. भांडवल दिलं. हे दुकान सुरु झालं आणि दिवस पालटले. माझ्या बहिणीचा जन्म झाला आणि भरभराटीने वेग घेतला. दोन मुलांवर स्टॉप मारायचे ठरवले.

काही लोकांना बुद्धीबळ खेळतांना चाली छान रचता येतात. पण जिंकायला आले की खेळ नीट संपवता येत नाही. बाबांचे असेच काही होत होते. माणूस मेहनती होता, हुशार होता, तेव्हाही. आजही. पण एका मर्यादेपुढे रिस्क घ्यायची, दुरगामी ध्येय बाळगायची दूरदृष्टी काहीशी कमी होती. काही संकटं हाताळता आली नसतील. त्यांना नोकरीचा प्रचंड तिटकारा होता. कोणाचेच बॉसिंग झेपत नसे. असो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांना ठावूक.

सुमारे सात वर्षे हा भाजीचा धंदा नीट सुरु होता. थोडीफार बचतही होत होती. त्याच कॉलनीत एक छानसा प्लॉट बघून बाबा सौदा पक्का करुन आले. दुसर्‍या दिवशी पैसे द्यायला गेले तर मालकाने थोडे पैसे वाढवून मागितले. अशा शब्द फिरवणार्‍या माणसाशी व्यवहार नको म्हणुन तसेच निघून आले. श्याहेंशी साली तो सौदा फक्त पाचशे रुपयाने हुकला. आजही खंत राहते कारण आज त्या जागेची किंमत काही कोटींमधे आहे.

मी मॉन्टेसरीत केजी वन केजी टू पर्यंत शिकलो. बा बा ब्लॅक्शिप, ट्वींकल ट्वींकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हाट यु आर. वन टु थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट. आमची मुख्याध्यापिकाबै आपल्या मुलांना सोडायला येणार्‍या पुरुषांसोबत फार लाडे लाडे बोलते ह्याबद्दल विचित्र वाटून मला त्या शाळेत जावेसे वाटत नव्हते. मी ती इंग्रजी शाळा सोडली. आईशप्पथ घरी हेच कारण सांगितले मी. सातव्या वर्षी मला झेडपीच्या पहिल्या वर्गात टाकले. पाटीवर अ आ ई ई सुरु झाली. बाबांनी फटके देऊन देऊन अक्षर वळणदार मोत्यासारखे करुन घेतले. त्यासाठी हजारो मोती डोळ्यांतून टपकले असतील. बरेच झाले म्हणा. वृत्तपत्रातून बातम्या गिरवायला लावत. वाचनाची सवय, आणि वेड्यासारखी सवय लागली. व्यसन झालं.

आमच्या दुकानाची चलती बघून स्पर्धा उभी राहीली. नवा गडी स्वस्तात भाजी द्यायला लागला. धंद्यावर परिणाम व्हायला लागला. बचत संपत होती. त्यातच मूळ मालकाने जागा खाली करण्याबद्दल तगादा लावायला सुरुवात केली. अच्छे दिन संपत येत होते. धंदा बंद होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. आता त्या कॉलनीत घर घेण्याइतके पैसे शिल्लक नव्हते व भावही वधारले होते. कोणाकडेही भाड्याने द्यायला जागा नव्हती.

मग दुकान तिथेच ठेवून घर हलवण्याबद्दल हालचाली सुरु झाल्या. जगण्याची लढाई सुरुच आहे.

ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल मलाही नीट माहिती नाही. जेवढं आणि जसं माहित तेवढं वर लिहिलंय. वडिल नेहमी आपली कहानी सांगत असतात. पण सर्वच धागे जुळत नाहीत. काही निसटलेले आहेत. कायम राहतील.

----

क्रमशः

इतिहासजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

5 May 2016 - 5:44 am | मार्मिक गोडसे

मस्तच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 May 2016 - 6:32 am | कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर तजो! शैली उत्तम आहे तुमची, अन व्यक्तिचित्रण तूफ़ान करता आहात तुम्ही, साधारण पर्सनॅलिटी ठळक उभी केली तुम्ही वडिलांची तुमच्या फॉर एन इंट्रोडक्शन. अजुन मदर बाकी आहेत (म्हणजे ह्या भागात त्यांच्यावर भर कमी वाटला) भरपुर लिहा अन लवकर लवकर लिहा !

-बाप्या

खेडूत's picture

5 May 2016 - 8:32 am | खेडूत

अवडला.
या मलिके बद्दल मागेच विचारू म्हणलं पण राहिलं.

हा दुसरा भाग असायला हवा ना?
पहिला हा होता ..
http://misalpav.com/node/33357

संजय पाटिल's picture

5 May 2016 - 5:38 pm | संजय पाटिल

हेच म्हणतो....
दोन्ही भाग वाचले, आवडले!! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत..

हातच राखुन न ठेवता जे आहे ते अस आहे या शैलीतला मनमोकळेपणा आवडला.

तुषार काळभोर's picture

5 May 2016 - 4:10 pm | तुषार काळभोर

+१

बोका-ए-आझम's picture

5 May 2016 - 9:01 am | बोका-ए-आझम

पण वरती खेडूत यांनी म्हटलंय तसं - हा दुसरा भाग असायला हवा ना? पहिला भाग खूप आधी टाकलाय मला वाटतं तुम्ही.

ऋषिकेश's picture

5 May 2016 - 9:04 am | ऋषिकेश

कसदार! पुभाप्र

एस's picture

5 May 2016 - 9:07 am | एस

पुभाप्र.

नीलमोहर's picture

5 May 2016 - 9:56 am | नीलमोहर

पुभाप्र.

राजाभाउ's picture

5 May 2016 - 10:05 am | राजाभाउ

मस्तच तजो. भारी सुरुवात

आमची मुख्याध्यापिकाबै आपल्या मुलांना सोडायला येणार्‍या पुरुषांसोबत फार लाडे लाडे बोलते ह्याबद्दल विचित्र वाटून मला त्या शाळेत जावेसे वाटत नव्हते मी ती इंग्रजी शाळा सोडली. आईशप्पथ घरी हेच कारण सांगितले मी

त्या वयातली तुमची समज आणि मुल घरात हे बोलु शकेल इतपत तुमच्या पालकांनी ठेवलेल मोकळ वातावरण दोन्हीलाही __/\__
पुभाप्र.

विवेक ठाकूर's picture

5 May 2016 - 10:10 am | विवेक ठाकूर

आत्मकथन आवडले.

पथिक's picture

5 May 2016 - 11:18 am | पथिक

आवडले ! छान लिहिले आहे ! तुमच्या वडिलांबद्दल आदर वाटतोय.

मृत्युन्जय's picture

5 May 2016 - 11:22 am | मृत्युन्जय

आवडले. वाचतो आहे.

पिलीयन रायडर's picture

5 May 2016 - 12:22 pm | पिलीयन रायडर

केजी मधले लहान मुल घरी हे कारण सांगुन स्वतः शाळा सोडायचा निर्णय घेऊ शकते ह्याचेच मला आश्चर्य वाटत आहे.

चांगले लिहीत आहात. लिहीत रहा.

निर्धार's picture

5 May 2016 - 7:14 pm | निर्धार

लिहीत रहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2016 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लिहिताय ! साध्या सरळ शब्दातले मनाला भिडणारे प्रामाणिक आत्मकथन खूप आवडले. पुभाप्र.

सस्नेह's picture

5 May 2016 - 1:00 pm | सस्नेह

वाचतेय....

पैसा's picture

5 May 2016 - 1:07 pm | पैसा

खूप छान!

शलभ's picture

5 May 2016 - 1:43 pm | शलभ

वाचतोय..

अप्रतिम, अत्यंत सुंदर रित्या लिहलेले.

आवडले.

केदार-मिसळपाव's picture

5 May 2016 - 1:58 pm | केदार-मिसळपाव

काय अनुभव आहेत...

कसलेल्या हातांनी कारागिरी व्हावी तसं हे लेखन आहे...

आवडले! पुभाप्र!

Sandy

चिनार's picture

5 May 2016 - 2:35 pm | चिनार

मस्त लिहिताय !आवडले.

अपरिचित मी's picture

5 May 2016 - 2:58 pm | अपरिचित मी

मस्त लिहिलय!!!

अप्पा जोगळेकर's picture

5 May 2016 - 3:12 pm | अप्पा जोगळेकर

छान लिहिले आहे. धागाकर्ते प्रतिसाद देण्यात जे श्रम खर्च करतात ते धागानिर्मितीत घालवले तर घाऊक प्रमाणात कसदार लेख येऊ शकतील.

हेमंत लाटकर's picture

5 May 2016 - 3:31 pm | हेमंत लाटकर

छान. तुम्ही सुद्धा वडिलांसारखे फटकळ असाल असे वाटते.

शाम भागवत's picture

5 May 2016 - 8:10 pm | शाम भागवत

सगळ्या नातेवाईकांत बाबांना क्रॉस जाणे कुणालाच जमायचे नाही. कारण ते अखंड सत्य बोलायचे. लपवाछ्पवी, राजकारण शून्य.

मन१'s picture

5 May 2016 - 3:40 pm | मन१

लक्षपूर्वक वाचतोय . पुढील तपशील वाचण्यास उत्सुक.

अनुप ढेरे's picture

5 May 2016 - 4:24 pm | अनुप ढेरे

छान लिहिताय!

प्रचेतस's picture

5 May 2016 - 4:52 pm | प्रचेतस

उत्त्तम लिहिताय.

अनंत छंदी's picture

5 May 2016 - 5:24 pm | अनंत छंदी

छान लिहिले आहे.

अत्रन्गि पाउस's picture

5 May 2016 - 7:21 pm | अत्रन्गि पाउस

थेट भिडणारे ...
तीर्थरूपांचा तडक फटकळपणा फारच मस्त ...

विवेकपटाईत's picture

5 May 2016 - 7:25 pm | विवेकपटाईत

अप्रअस्प्रति, आवडले

वैभव जाधव's picture

5 May 2016 - 7:31 pm | वैभव जाधव

बेष्ट ल्हिलायसा!

आता फूडचा भाग ;)
तुमाला लै ढिल दिऊन उपेग न्हाय. तवा लौकर लौकर ल्हिनेचे क्रावे. धन्यवाद!

उगा काहितरीच's picture

5 May 2016 - 9:44 pm | उगा काहितरीच

छान... उगाच ग्लोरीफाय न करता लिहीलेली शैली आवडली. पुभाप्र ...

आरोह's picture

6 May 2016 - 12:05 am | आरोह

इतकी सुंदर आत्मकथा मी अजून पर्यंत कधी वाचली न्हवती...त्रिवार अभिनंदन !!!
माणसाला आत्मकथा सांगावी किंवा लिहावी हि प्रेरणा नेमकी कधी आणि का होते?
जाणकार मिपाकर प्रकाश टाकतील काय?

आरोह's picture

6 May 2016 - 1:23 am | आरोह

तर्राट भाऊ, तुम्ही तरी सांगा...तुम्हाला आत्मकथा सांगावी,लिहावी असे नेमके का वाटले..

मानसशात्रीय दृष्ट्या काही करणे असावीत जसे
१. स्वतःचे किंवा स्वतःच्या क्रुत्यांचे ग्लोरिफिकेशन
2. दुसर्याकडून स्तुती ऐकून घेणे...
3. लोकांच्या मनांत स्वतःविषयी आदराची भावना प्रस्थापित करणे
4. काही वेळ डॉक्टर पेशंटला memoir लिहायला सुचवतात, ते एक थेरपी सारख काम करत आणि त्याचा उपयोग वाचणाऱ्या पेक्षा लिहणाऱ्याला जास्त होतो.

अजून काही वेगळे असल्यास सांगा...एक कुतूहल म्हणून विचारतोय

वीणा३'s picture

6 May 2016 - 1:23 am | वीणा३

पुभाप्र

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 1:27 am | तर्राट जोकर

मिपावरच्या मानसशास्त्र जाणकारांनो, आरोह ह्यांना हा वरचा प्रतिसाद का द्यावासा वाटला ह्याची मानसशात्रीय कारणं कळतील का?

...एक कुतूहल म्हणून विचारतोय

१ ते ४ मध्ये कोणते तरी एक कारण तर असेल..कि काही वेगळे?
हे मी माझ्या ज्ञानात भर म्हुणुन विचारतोय...त्यात राग येण्याचं काही कारण नसावे
नाहीतर सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन केले नसते...तुम्ही अतिशय उत्कृष्ट लिहिलंय ह्यात शंका नाही...तुम्ही विग्रजी शाळा सोडल्याचे कारण(एव्हड्या कमी वयात) तर केवळ अप्रतिम..दुसरा शब्द नाही माझ्याकडे
..असो पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत

नाखु's picture

6 May 2016 - 8:49 am | नाखु

लेखकाचा

वेग
रोखण्याची
मी

सुयोग पुणे's picture

6 May 2016 - 5:46 am | सुयोग पुणे

मस्त ..

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 9:01 am | तर्राट जोकर

सर्व वाचकांचे खूप खूप आभार. प्रतिसादांमुळे लिहायला हुरुप येतो. धन्यवाद!

शाळा सोडल्याचे वर काहींना आश्चर्य वाटले. मी सोडल्यावर दोन-तीन वर्षात ती शाळाच बंद झाली. शाळाचालकांचे गांभिर्य सगळ्यांच्याच नजरेत भरण्यासारखे होते.:)

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 11:08 am | पिलीयन रायडर

नाही हो.. तसे असेलही.. पण एवढ्या लहान मुलास अशा गोष्टी समजतात ह्याचे मला आश्चर्य वाटले. माझा मुलगा आता केजीतच आहे. त्याला एक बाई खुप लाडात येऊन दुसर्‍या पुरुषांशी बोलते ही गोष्ट समजेल हेच खरे वाटत नाही. ही लहान मुलाला समजण्यास खुप गुंतागुंतीची गोष्ट आहे. पण असेही असेल की अजुन माझा मुलगा त्याला विचित्र वाटेल असे वागणार्‍या बाईला भेटलेला नाही. त्याला कधी अवघडल्यासरखे वाटणे ही भावनाच आलेली नाही. पण ती येऊ शकते का? कुणी विचित्र वागत असेल तर त्याला इतक्या लहान वयात कळेल का? आणि काही तरी चुकतय हे कळालं तरी तो मला शब्दात सांगु शकेल का? असे प्रश्न मनात आल्याने आश्चर्य वाटले. पण तो एक बारिकसा मुद्दा आहे. बाकी तुम्ही चांगले लिहीत आहात. जास्त खंड न पडु देता पुढचा भाग टाका इतकेच.

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 11:18 am | तर्राट जोकर

असं असेल... तो काळ, तो भोवताल परपुरुषांशी महिलांनी मोकळेपणाने बोलण्याचा नव्हता. ती नेहमीच्या बघण्यातली गोष्ट नव्हती. त्या वातावरणात हे काहीतरी चुकीचे होते आहे असे वाटत असेल. माझे वागणे चमत्कारिक वाटणे शक्य आहे, म्हणून तर लिहिले आहे.

ह्या निमित्ताने एक अ‍ॅडिशनल किस्सा. एक कॉलेजीयन मुलगा एका कॉलेजीयन मुलीशी आमच्या दुकानासमोरच्या रस्त्याच्या दुसर्‍या बाजून उभे राहुन बोलत होते. दोघेही सायकलवरुन विरुद्ध दिशेने आले आणि गाठ पडून बोलायला लागले. मीही तिकडेच खेळत होतो. मला त्या मुलीच्या पिशवीवरचे एम्ब्रॉयडरीसदृश्य चित्र खुप आवडले आणि मी ते जवळ जाऊन निरखत बसलो. बराच वेळाने आई ने ओरडून बोलावले. आई बाबा दोघेही मला बोलले, "काय ऐकत बसला रे तिकडे त्या दोघांचं गुलूगुलू." =)) मला पिशवीवरच्या चित्राखेरीज काहीच माहित नव्हतं आणि इतर लोकांना त्यांचे भिन्नलिंगी असून रस्त्यावरच्या मोकळ्या गप्पा खटकत होत्या. मानसिकता, और क्या?

काळा पहाड's picture

6 May 2016 - 10:46 am | काळा पहाड

छान लेखन

चित्रगुप्त's picture

6 May 2016 - 10:55 am | चित्रगुप्त

बहुप्रतिक्षित दुसरा भाग आला हे बघून आनंद झाला. लेखन उत्तमच आहे, परंतु माझ्या समजून घेण्याच्या क्षमतेतील कमतरतेमुळे असेल कदाचित, पण आधीच्या भागातील हजार बाराशे फुटावरील जागा आणि या भागातील घर, दुकान यातील आधीचे कोणते, नंतरचे कोणते, हे स्पष्ट झाले नाही. तरी खुलासा करावा.
कृपया चरित्रात्मक पुस्तकांमधे शेवटी जीवनाचा आलेख थोडक्यात देतात, तसे अमूक साली जन्म, अमूक ते अमूक साली अमूक ठिकाणी वास्तव्य, अमूक साली मॅट्रिक/लग्न्/नोकरी वगैरे तुमचे स्वतःचे आणि वडिलांचेही दिल्यास मजसारख्या अल्पमतींना मदत होईल.

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 11:02 am | तर्राट जोकर

नमस्कार, हा झोपडपट्टीत जायच्या आधीचा घटनाक्रम आहे. झोपडपट्टीतच का जावे लागले हे समजण्यासाठी ह्या भागाची आवश्यकता होती असे वाटले.

झोपडपट्टीत जाण्याच्या अगोदरची माहिती मिळविण्यासाठी लोकांशी बोलून व प्रसंगी त्या जागेला भेट देऊन माहिती गोळा करतोय असा प्रतिसाद तुम्ही टंकलेला आठवतोय.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

बाबांचा स्वभाव फटकळ होता

ह्म्म्म, आलं आमच्या लक्षात!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 4:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

पक्षांची नजर खूपच तीक्ष्ण असते असे ऐकून आहे... अगदी काही शे मीटर वरून उडतानाही खालचा चिमुकला प्राणीसुद्धा अचूक हेरतात ;) =))

सूड's picture

6 May 2016 - 2:49 pm | सूड

वाचतोय.

बबन ताम्बे's picture

6 May 2016 - 3:22 pm | बबन ताम्बे

खूप आवडले. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

नाईकांचा बहिर्जी's picture

6 May 2016 - 3:48 pm | नाईकांचा बहिर्जी

सरळसोट लेखन , आवडले

आदूबाळ's picture

6 May 2016 - 6:29 pm | आदूबाळ

वाचतोय. छान लिहिताहात.

जव्हेरगंज's picture

6 May 2016 - 7:36 pm | जव्हेरगंज

साधं सरळ पण जबरी !

इष्टुर फाकडा's picture

6 May 2016 - 8:16 pm | इष्टुर फाकडा

काही लोकांना बुद्धीबळ खेळतांना चाली छान रचता येतात. पण जिंकायला आले की खेळ नीट संपवता येत नाही. बाबांचे असेच काही होत होते. माणूस मेहनती होता, हुशार होता, तेव्हाही. आजही. पण एका मर्यादेपुढे रिस्क घ्यायची, दुरगामी ध्येय बाळगायची दूरदृष्टी काहीशी कमी होती. काही संकटं हाताळता आली नसतील. त्यांना नोकरीचा प्रचंड तिटकारा होता. कोणाचेच बॉसिंग झेपत नसे. असो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांना ठावूक.

--- बसुन बोलु :)

सुबोध खरे's picture

6 May 2016 - 8:17 pm | सुबोध खरे

प्रामाणिक आणि सरळ लेखन. शैली छान आहे.

वैभव जाधव's picture

6 May 2016 - 8:34 pm | वैभव जाधव

माझ्या मते हा नंतर लिहिला असला तरी आधी लिहिलेल्या भागाची पार्श्वभूमी असल्याने हा आधी हवा. तसंच मत त जो यांनी प्रतिसादात व्यक्त केलं आहे. नाहीतर फ्लॅशबॅक असं काही लिहिलं जावं. जाणकार सांगतील च ;)

कौशी's picture

7 May 2016 - 1:45 am | कौशी

पुभाप्र.

सिद्धार्थ ४'s picture

25 Apr 2018 - 2:58 pm | सिद्धार्थ ४

पुढील भागाची लिंक मिळेल काय?