मोसाद - भाग ११

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 12:55 am


.
मोसाद - भाग १०

मोसाद - भाग ११

१ एप्रिल १९७३, बैरुट, लेबेनॉन. सँड्स हे बैरुटमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक. त्या दिवशी सकाळी तिथे नेहमीची लगबग चालू होती, त्यामुळे बेल्जियन पासपोर्ट घेऊन आलेल्या गिल्बर्ट रीम्बो नावाच्या पर्यटकाकडे कुणाचंही जरुरीपेक्षा जास्त लक्ष गेलं नाही. त्याच दिवशी दुपारी डीटर ऑल्टन्यूडर नावाचा जर्मन पर्यटक तिथे आला. तो आणि रीम्बो एकमेकांना बहुतेक ओळखत नव्हते. दोघांनीही खिडकीमधून समुद्र दिसेल अशा खोल्या मागितल्या होत्या, आणि त्या त्यांना मिळाल्याही होत्या.

६ एप्रिल या दिवशी अजून तीन पर्यटक तिथे आले. त्यातला अँड्र्यू विशेलॉ हा पक्का ब्रिटीश होता, अगदी नखशिखांत. त्याच्यानंतर दोन तासांनीच आलेल्या बेल्जियन चार्ल्स ब्युसार्दला इझराईलमध्ये डेव्हिड मोलाद म्हणून लोक ओळखत होते. संध्याकाळी जॉर्ज एल्डर नावाचा अजून एक ब्रिटीश पर्यटक तिथे आला. चार्ल्स मेसी नावाचा अजून एक ब्रिटीश पर्यटकही तिथे आला, पण विचार बदलल्याचं सांगून तो तिथून काही अंतरावर असलेल्या प्रसिद्ध एल बाईदा समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अॅटलांटिक हॉटेलमध्ये गेला. एखाद्या अस्सल ब्रिटीश माणसाप्रमाणे तो दिवसातून किमान दोन वेळा हवामानाची चौकशी करत असे.

हे सहाजण एकमेकांना अजिबात ओळख न दाखवता बैरूट शहर भटकत होते आणि महत्वाचे रस्ते आणि वाहतुकीची जंक्शन्स लक्षात ठेवत होते. त्यांनी शहर फिरण्यासाठी सहा वेगवेगळ्या गाड्या भाड्याने घेतल्या होत्या.

९ एप्रिल या दिवशी नऊ मिसाइल बोटी आणि गस्ती नौका असा एक मोठा काफिला इझराईलच्या एलात बंदरातून निघाला आणि भूमध्य समुद्रातल्या वर्दळीच्या वाहतुकीतून लेबेनॉनच्या दिशेने सरकू लागला. त्यातल्या एका बोटीवर कर्नल अॅमनॉन लिप्कीनच्या नेतृत्वाखाली जे युनिट होतं, त्यांच्यावर पी.एफ.एल.पी. (Popular Front for Liberation of Palestine) च्या बैरूटमधल्या हेडक्वार्टर्सवर हल्ला करून ते नेस्तनाबूत करायची जबाबदारी होती. दुसऱ्या बोटीवर अजून एक युनिट होतं. या युनिटबरोबर इझरेली स्पेशल फोर्स युनिट सायारेत मत्कालचं एक युनिट होतं. त्याचा प्रमुख होता कर्नल एहूद बराक (जो नंतर इझराईलचा पंतप्रधानही झाला). बराकच्या युनिटकडे वेगळी जबाबदारी होती. युनिटमधल्या प्रत्येकाकडे चार फोटो होते. पहिला होता अबू युसुफ, ब्लॅक सप्टेंबरचा सरसेनापती. दुसरा कमाल अदवान, फताहचा ऑपरेशन्स कमांडर. फताह आणि ब्लॅक सप्टेंबरने इझराईलच्या शहरांत केलेल्या दहशतवादी कारवायांमागे त्याचा हात होता. तिसरा कमाल नासर, फताहचा प्रवक्ता. तिघेही रु वेर्डून नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत राहात होते. चौथा अली हसन सलामेह. तो कुठे आहे हे मात्र कोणालाही माहित नव्हतं.

लेबेनॉनचा समुद्रकिनारा जसजसा जवळ यायला लागला, तसं या कमांडोनी कपडे बदलले. प्रत्येकाच्या अंगावर हिप्पी वाटावेत असे कपडे होते. एहूद बराकसारखे काहीजण तर चक्क स्त्रियांच्या वेशात होते. त्यांच्या कपड्यांत त्यांनी स्फोटकं लपवली होती.

जेव्हा ते लेबेनॉनच्या किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर पोचले तेव्हा बोटीवरचे रबरी मचवे खाली उतरवले गेले. हे कमांडो त्यात बसले आणि लेबेनॉनच्या किनाऱ्याकडे निघाले. ते तिथे पोचले तेव्हा पूर्ण अंधार पडला होता आणि किनाऱ्यावर ६ गाड्या उभ्या होत्या आणि ड्रायव्हर म्हणून आधी आलेले ६ एजंट्स होते. कमांडो किनाऱ्यावर उतरल्यापासून जेमतेम ५ मिनिटांत या गाड्या आपल्या मार्गाला लागल्या होत्या. त्यातल्या तिन्ही गाड्या पी.एफ.एल.पी. हेडक्वार्टर्सकडे वळल्या आणि उरलेल्या ३ रु व्हेर्डूनच्या दिशेने. यातली एक गाडी डेव्हिड मोलाद चालवत होता.

पी.एफ.एल.पी. हेडक्वार्टर्सकडे जाणाऱ्या कमांडोनी या हल्ल्याची रंगीत तालीम तेल अवीवमधल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये केली होती. एका रात्री सायारेत मत्काल कमांडर डेव्हिड एलाझार ही तालीम बघायला आला. त्यावेळी या कमांडोपैकी एक लेफ्टनंट अविदा शोर त्याला भेटला आणि त्याने एक सुधारणा सुचवली. आधीच्या योजनेनुसार ही इमारत उध्वस्त करायला १२० किलोग्रॅम्स एवढी स्फोटकं लागणार होती पण शोरच्या योजनेनुसार फक्त ८० किलोग्रॅम्स एवढी स्फोटकं वापरूनही काम झालं असतं. शिवाय बाजूच्या इमारती, जिथे सामान्य लोक राहात होते, त्यांना या हल्ल्याची झळ पोचली नसती. थोडा विचार केल्यावर एलाझारने शोरची योजना मान्य केली.

आता हे कमांडो पी.एफ.एल.पी. च्या इमारतीजवळ पोचले होते. पी.एफ.एल.पी.ने अर्थातच इमारतीभोवती पहारेकरी बसवले होते. त्यांचा अडथळा भेदून आत जाताना दोन इझरेली कमांडोना आपले प्राण गमवावे लागले. त्यातला एक अविदा शोर होता. पण त्याचे सहकारी इमारतीत घुसले आणि त्यांनी तळमजला आणि पहिला मजला इथे स्फोटकं पेरली, ते इमारतीतून बाहेर पडले आणि सुरक्षित अंतरावर जाऊन त्यांनी या सगळ्या स्फोटकांचा एकाच वेळी स्फोट घडवला. ८० किलोग्रॅम्स एवढ्या प्रचंड प्रमाणात स्फोटकं असल्यामुळे ही इमारत पूर्णपणे उध्वस्त झाली आणि आतमध्ये असलेले पी.एफ.एल.पी.चे जवळपास सर्व दहशतवादी मारले गेले. पण बाजूच्या एकाही इमारतीवर ओरखडाही उठला नाही.

त्याच वेळी एहूद बराकचं युनिट रु व्हेर्डूनच्या दिशेने चाललं होतं. फताह किंवा लेबनीज सैन्य या कोणालाही या कारवाईबद्दल संशय येऊ नये म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी इझरेली कमांडोच्या एका युनिटने बैरूटच्या दक्षिण भागात असलेल्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना फताहने काही कारवाई केली ना लेबनीज सैन्याने काही प्रतिक्रिया दिली.

इकडे सायारेत मत्काल कमांडो रु व्हेर्डूनपाशी पोचले. ते इमारतीत शिरणार तेवढ्यात दोन लेबनीज पोलिस ऑफिसर्स तिथून गेले. पण त्यांना इझरेली कमांडोऐवजी एकमेकांच्या कमरेत हात घालून चालणारं एक जोडपं दिसलं. त्यातला पुरुष होता मुकी बेत्झर आणि स्त्री होता खुद्द एहूद बराक. ते पोलिस ऑफिसर्स दिसेनासे झाल्यावर कमांडो इमारतीत घुसले. अदवान राहात असलेला फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता, नासरचा फ्लॅट तिसऱ्या आणि अबू युसुफचा फ्लॅट सहाव्या. कमांडोनी एकाच वेळी तिन्ही फ्लॅट्सवर आक्रमण केलं.

अदवान, नासर आणि युसुफ – तिघांनाही कमांडोनी प्रतिकाराची संधीही दिली नाही. स्फोटकं वापरून त्यांच्या फ्लॅट्सचे दरवाजे उखडून टाकून कमांडो आत घुसले आणि त्यांनी सरळ या तिघांवर गोळ्या झाडल्या. तिघेही त्यांच्या शस्त्रांपर्यंत पोचायच्या आत कमांडोच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीरांची चाळण केली. अबू युसुफच्या पत्नीने त्याच्यावर झाडल्या गेलेल्या गोळ्यांपैकी काही स्वतःवर घेतल्या. अदवानच्या फ्लॅटच्या समोर जो जिना होता त्याच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये एक म्हातारी इटालियन स्त्री राहात होती. दुर्दैवाने तिने आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि गोळीबारात तिचाही मृत्यू झाला.

पुढची १५ मिनिटं कमांडोनी प्रत्येक फ्लॅटची अगदी कसून झडती घेतली आणि जेवढी मिळतील तेवढी कागदपत्रं गोळा केली आणि ते तिथून निघाले. परत गाड्यांमध्ये बसून ते किनाऱ्याच्या दिशेने गेले. तिथे त्यांनी बरोबर आणलेले रबरी मचवे तयारच होते. त्यावर बसून हे कमांडो समुद्रात दूरवर असलेल्या इझरेली युद्धनौकांच्या दिशेने निघून गेले. हे ६ पर्यटकही त्यांच्याबरोबरच गेले. जाण्याआधी त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाड्या नीट ओळीत समुद्रकिनाऱ्यावर पार्क करून ठेवल्या होत्या. गाड्यांच्या चाव्या इग्निशनमध्ये होत्या. साधारण एका आठवड्याने ज्या एजन्सीजमधून या गाड्या भाड्याने घेतल्या गेल्या होत्या त्यांना बैरूटमधल्या अमेरिकन एक्सप्रेस बँकेच्या नावाने काढलेले चेक्स मिळाले.
ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ यशस्वी झालं. पी.एफ.एल.पी. साठी हा फार मोठा धक्का होता. त्यांचे १०० हून जास्त दहशतवादी मारले गेले आणि शिवाय हेडक्वार्टर्स कायमचं उध्वस्त झालं. ब्लॅक सप्टेंबरसाठीसुद्धा हा निर्णायक तडाखा होता. त्यांचा सर्वोच्च कमांडरच मोसादने टिपला होता, आणि त्याच्या इतर सैनिकांना संदेश दिला होता – जर तुमचा कमांडर स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही, तर तो तुम्हाला काय सुरक्षित ठेवेल?

पण त्यांना एक गोष्ट माहित नव्हती. या इमारतीपासून जेमतेम ५० यार्डांवर असलेल्या दुसऱ्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये अली हसन सलामेह शांतपणे झोपला होता. स्प्रिंग ऑफ युथने जरी ब्लॅक सप्टेंबरवर निर्णायक प्रहार केला असला, तरी ऑपरेशनचं मुख्य लक्ष्य अजूनही साध्य झालेलंच नव्हतं.

ब्लॅक सप्टेंबरच्या तिघा नेत्यांच्या फ्लॅट्समधून जी कागदपत्रं मोसादला मिळाली होती, त्यावरून दोन मोठ्या रहस्यांचा उलगडा झाला. एक म्हणजे ३० मे १९७२ या दिवशी तेल अवीवच्या लॉड एअरपोर्टवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे. या हल्ल्यात अरब आणि जपानी दहशतवाद्यांनी एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता आणि पोर्टो रिकोहून आलेल्या आणि जेरुसलेमला जाणाऱ्या एका मोठ्या प्रवासी गटातले जवळपास सर्वजण त्यात ठार झाले होते. हा सूत्रधार होता बेसिल अल कुबैसी. त्याला मोसादने आधीच उडवला होता. दुसरं रहस्य म्हणजे त्याच्या एक वर्ष आधी झालेलं पासओव्हर प्रकरण.

एप्रिल १९७१ मध्ये दोन सुंदर फ्रेंच तरुणी लॉड एअरपोर्टवर उतरल्या. त्या इमिग्रेशनसाठी गेल्या असताना त्यांचे फ्रेंच पासपोर्ट खोटे आहेत हे उघडकीस आलं. दोघींना ताबडतोब अटक करण्यात आली आणि शाबाकच्या स्त्री अधिकाऱ्यांकडून कसून झडती घेण्यात आली. तेव्हा एक चक्रावून टाकणारी गोष्ट आढळली. या तरुणींच्या कपड्यांचं वजन खूपच जास्त होतं. जेव्हा पोलिसांनी आणि शाबाक अधिकाऱ्यांनी या कपड्यांची शिवण उसवली, तेव्हा त्यांना आत एक पांढरी पावडर सापडली. त्यांच्या सँडल्समध्येही ही पावडर होती. दोघींच्या कपड्यांतून आणि इतर वस्तूंमधून तब्बल १२ पाउंड्स एवढ्या वजनाची पावडर सापडली. ही पावडर म्हणजे सेमटेक्स या नावाने प्रसिद्ध असलेलं प्लास्टिक स्फोटक होतं. त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये डेटोनेटर्स लपवलेले होते.

शाबाक अधिकाऱ्यांनी कसून ‘ विचारपूस ’ केल्यावर दोघींनीही कबुली दिली. दोघी बहिणी होत्या आणि एका श्रीमंत मोरोक्कन व्यापाऱ्याच्या मुली होत्या. त्यांची नावं होती नादिया आणि मेडेलिन बार्देली. त्यांना पॅरिसमध्ये एक माणूस भेटला होता, आणि त्याने त्यांना हे काम – इझराईलमध्ये सेमटेक्स पोचवण्याचं – दिलं होतं. दोघीही धाडसी स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी ही कामगिरी स्वीकारली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तेल अवीवमधील हॉटेल कमोडोरमध्ये उतरलेल्या पिअर आणि एडिथ बर्गहाल्टर या फ्रेंच जोडप्याला अटक केली.

दुसऱ्या दिवशी या कटामध्ये सहभागी असलेली अजून एक तरुणी लॉड एअरपोर्टवर उतरली. तीही फ्रेंच पासपोर्टवर आली होती. तिच्या पासपोर्टवर जरी फ्रान्सीन अॅडेलिन मारिया असं नाव असलं, तरी मोसादला तिचं खरं नाव – एव्हेलीन बार्जेस – हे माहित होतं. ती पी.एफ.एल.पी. ची सदस्य होती आणि के.जी.बी. ने तिला प्रशिक्षण दिलेलं होतं. इझराईलमध्ये येण्याआधी तिने पश्चिम जर्मनी, स्पेन आणि इटली इथे अनेक घातपाती कृत्यं केली होती.

तिच्याकडून पी.एफ.एल.पी.चा नक्की काय डाव आहे ते मोसादला समजलं. त्यांची तेल अवीवमधल्या नऊ महत्वाच्या हॉटेल्समध्ये स्फोट घडवून पर्यटकांमध्ये दहशत पसरवून इझराईलच्या अर्थव्यवस्थेचं न भरून येणारं नुकसान करायची योजना होती. पण तेव्हा या योजनेचा सूत्रधार कोण आहे हे समजलं नव्हतं. आता या कागदपत्रांनी ते नाव उघड केलं होतं – मोहम्मद बौदिया. अत्यंत रुबाबदार आणि देखणं व्यक्तिमत्व असलेला बौदिया अल्जेरियन होता आणि पॅरिसमध्ये राहात होता. तिथल्या रंगभूमीवर त्याचं अभिनेता आणि निर्माता म्हणून चांगलंच नाव होतं. पण पुन्हा एकदा झ्वेतर आणि हमशारीप्रमाणे हा डॉ.जेकील आणि मि. हाईड असा प्रकार होता. अभिनेता आणि नाट्यनिर्माता हा मुखवटा होता आणि वास्तवात तो अत्यंत घातक असा दहशतवादी होता. एव्हेलीन बार्जेस त्याची प्रेयसी आहे हे मोसादला माहित होतं, पण तो संपूर्ण पासओव्हर प्रकरणाचा सूत्रधार होता हे त्यांना आता समजलं होतं.

एव्हेलीनप्रमाणे बौदियाही कट्टर मार्क्सिस्ट होता, पण पासओव्हर प्रकरणात एव्हेलीनला अटक झाल्यावर त्याने पी.एफ.एल.पी.शी संबंध तोडले आणि तो यासर अराफतच्या फताहसाठी काम करायला लागला. अराफतने त्याच्यावर ब्लॅक सप्टेंबरच्या फ्रान्स आणि स्पेनमधल्या कारवायांची जबाबदारी सोपवली. मोसादचा खबरी असलेल्या खादेर कोनू या सीरियन पत्रकाराच्या हत्येत त्याचा सहभाग होता. व्हिएन्नामध्ये रशियाहून आलेल्या ज्यूंसाठी उभारण्यात आलेल्या एका निवासी शिबिरावर हल्ला झाला होता. त्यातही त्याचा सहभाग होता.

ह्मशारीच्या मृत्यूनंतर बौदिया कमालीचा सावध झाला होता. त्याला शोधणं कठीण होऊन बसलं होतं. मे १९७३ मध्ये मोसादची एक किडॉन टीम पॅरिसमध्ये आली. त्यांनी बौदियाच्या नव्या प्रेयसीचं नाव आणि पत्ता शोधून काढला आणि तिच्या इमारतीच्या जवळ ते दबा धरून बसले. त्यांना बौदिया आत जाताना दिसला. पण तो नक्की कुठल्या फ्लॅटमध्ये गेला, हे त्यांना समजलं नाही. त्यामुळे ते इमारतीत शिरले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी बौदिया बाहेर आल्यावर त्याचा पाठलाग करायचं त्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी इमारतीतून अनेक लोक त्यांच्या कामांसाठी बाहेर पडले. बौदिया त्यांच्यामध्ये नव्हताच.

एक महिनाभर एजंट्सनी त्या इमारतीवर पाळत ठेवली आणि बौदिया ज्या फ्लॅटमध्ये गेला होता तो शोधून काढला. वेगवेगळ्या टीम्स हे पाळत ठेवायचं काम करत होत्या. जेव्हा ते आपापले अनुभव सांगण्यासाठी एकत्र भेटले तेव्हा त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. बौदियाच्या फ्लॅटमधून एक उंच, बांधेसूद स्त्री दररोज बाहेर पडत असे आणि संध्याकाळी परत येत असे. एका गटाने या स्त्रीचं वर्णन करताना तिचे केस सोनेरी आहेत असं म्हटलं. दुसरा गट तिचे केस काळे आहेत यावर ठाम होता. अखेरीस त्यांनी शोधून काढलं की बौदियाच त्याचं वेशभूषेचं कौशल्य वापरून स्त्रीवेशात ये-जा करत होता.

हे समजल्यावर एजंट्सनी त्या फ्लॅटवर हल्ला करायचं ठरवलं पण त्याच दिवशी बौदिया गायब झाला. बहुतेक त्याला संशय आला होता. मोसादकडे आता फक्त एकच धागा होता. बौदिया दररोज आर्क डी त्रायम्फच्या खाली असलेल्या Etoile या मेट्रो स्टेशनवरून पॅरिसच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असे. हे स्टेशन पॅरिसमधलं एक महत्वाचं जंक्शन होतं. अनेक ट्रेन्स आणि हजारो लोक तिथून दररोज जात असत. बौदियाला त्या जनसागरात शोधणं कठीण होतं. पण दुसरा पर्याय नव्हता.

गायब झाल्यापासून चार दिवसांनी बौदिया मोसाद एजंट्सना सापडला. त्याने वेषांतर केलं होतं, पण त्याची चालण्याची ढब तशीच होती. त्यावरून त्यांनी त्याला हेरलं आणि आता मात्र एजंट्स त्याच्यापाठी सावलीसारखे लागले. तो ज्या गाडीतून प्रवास करत होता, तिच्यावरही त्यांनी पाळत ठेवली. हा दिवस होता २७ जून १९७३. दुसऱ्या दिवशी बौदिया एका वेगळ्याच पत्त्यावर गेला आणि रात्रभर तो तिथेच राहिला. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे २९ जून १९७३ या दिवशी सकाळी तो त्या घरातून बाहेर पडला आणि आपल्या गाडीकडे गेला. गाडीत बसण्याआधी त्याने गाडीची तपासणी केली आणि जेव्हा सगळं ठीक आहे याबद्दल त्याचं समाधान झालं तेव्हा तो गाडीचा दरवाजा उघडून ड्रायव्हरच्या जागेवर बसला. त्याच क्षणी एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला, बौदियाची गाडी हवेत जवळजवळ ६ फूट उंच फेकली गेली, आणि त्याच्या शरीराचे तुकडेतुकडे झाले. हा स्फोट मोसाद संचालक झ्वी झमीरने समोरच्या फूटपाथवरून पाहिला.

पण हे यश साजरं करायला मोसादला वेळ मिळाला नाही. फताहमधल्या एका अंडरकव्हर मोसाद एजंट्सने एक संदेश पाठवला होता. बेन अमाना नावाचा एक अल्जेरियन ब्लॅक सप्टेंबर सदस्य अली हसन सलामेहला भेटायला युरोपमध्ये येणार होता. तो आणि सलामेह एका वेगळ्याच ठिकाणी भेटणार होते - नॉर्वेमधलं निसर्गरम्य शहर लिलहॅमर.

माईक हरारीच्या नेतृत्वाखाली असलेली किडॉन टीम लिलहॅमरमध्ये येऊन पोचली. सलामेह इथे काय करतोय हा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. त्यामुळे त्यांनी बेन अमानाच्या मागावर राहून त्याच्या हालचालींचा छडा लावायचा प्रयत्न करायचं ठरवलं, आणि तीन दिवसांत त्यांना अमाना एका अरबी चेहरेपट्टी असलेल्या एका माणसाबरोबर बोलताना दिसला. तो बरेचवेळा या माणसाबरोबर बोलत होता. मोसाद टीमने त्या माणसाचे अनेक फोटो काढले आणि त्यांच्या टीममधल्या वरिष्ठ लोकांनी तो माणूस अली हसन सलामेहच आहे यावर शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या एका सहकाऱ्याने या निष्कर्षाला विरोध केला होता. त्याने त्या माणसाला कुणाशी तरी बोलताना ऐकलं होतं आणि त्याच्या मते सलामेह अस्खलित नॉर्वेजियन भाषा बोलणं हे निव्वळ अशक्य होतं. पण या वरिष्ठ नेत्यांनी या सहकाऱ्याच्या विरोधाकडे लक्ष दिलं नाही.

एकदा तो माणूस सलामेह आहे हे निश्चित झाल्यावर मोसाद टीमने त्या माणसाचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्याला त्याच्या मागावर किती लोक आहेत हे समजणार नाही अशा बेताने त्यांनी त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर ठेवली. तो दिवसातला बहुतेक वेळ एका गरोदर नॉर्वेजियन स्त्रीबरोबर असायचा.

हे ऑपरेशन जेव्हा शेवटच्या टप्प्यावर आलं, तेव्हा इझराईलहून अनेक एजंट्स तिथे आले. मोसाद संचालक झ्वी झमीरही त्यांच्यात होता. सलामेहच्या मृत्यूने ब्लॅक सप्टेंबरची पाळंमुळं खणली गेली असती यात शंका नव्हती. आणि झमीरला त्या वेळी तिथे असण्याची इच्छा होती. जोनाथन इंगेल्बी, रोल्फ बेहर आणि गेरार्ड एमिल या तिघांवर सलामेहला संपवण्याची जबाबदारी होती. डेव्हिड मोलाद या ऑपरेशन मध्ये सहभागी झाला नव्हता.

आपल्या नेहमीच्या पद्धतीने मोसाद एजंट्सनी गाड्या भाड्याने घेतल्या आणि आजूबाजूच्या प्रदेशाची टेहळणी करायला सुरुवात केली. पुढे जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली, तेव्हा अनेकांनी ही मोसादची पहिली चूक झाल्याचं प्रतिपादन केलं. त्यांच्यामते लिलहॅमर हे इतकं छोटं आणि टुमदार शहर होतं, की तिथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखत होता. अशावेळी अचानक एवढे पर्यटक तिथे येणं आणि गाड्यांमधून इकडे-तिकडे फिरणं या नक्कीच स्थानिक लोकांच्या मनात संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या.

२१ जुलै १९७३ या दिवशी सलामेह आणि त्याची गरोदर मैत्रीण एका चित्रपटगृहातून क्लिंट ईस्टवूड आणि रिचर्ड बर्टन यांचा Where Eagles Dare हा चित्रपट बघून बाहेर पडले, बसस्टॉपवर गेले, बस घेतली आणि एका शांत, सुनसान रस्त्यावर उतरले. तिथे ते हातांत हात घालून फिरत असताना अचानक एक पांढरी गाडी त्यांच्यापाशी येऊन थांबली, तिच्यातून तिघेजण उतरले, त्यांनी आपल्या हातातल्या बरेटा आणि उझी पिस्तुलांनी जवळपास १५-२० गोळ्या सलामेहवर झाडल्या. तो जागच्या जागी कोसळला.

ऑपरेशन संपल्यावर माईक हरारी आणि त्याच्या टीममधले इतर लोक त्याच दिवशी लिलहॅमरहून नॉर्वेची राजधानी ऑस्लोला गेले आणि तिथून युरोपमध्ये आणि तिथून इझराईलला निघून गेले. इंगेल्बी आणि इतर दोघे मारेकरीही दुसऱ्या दिवशी निघून गेले. आता फक्त टीमने भाड्याने घेतलेली घरं रिकामी करणारे आणि भाड्याने घेतलेल्या गाड्या परत करणारे लोक उरले होते. तेही तिसऱ्या दिवशी गेले असते, पण एक अनपेक्षित गोष्ट घडली.

मोसाद एजंट्सनी सलामेहवर गोळ्या झाडताना सायलेन्सर वापरला होता, पण त्याला त्यांनी जिथे मारलं, तो भाग इतका शांत होता, की सायलेन्सरमुळे दबलेला गोळ्यांचा आवाजही तिथे जवळच राहणाऱ्या एका स्त्रीला ऐकू आला होता. ती धावत आपल्या घराच्या खिडकीपाशी येईपर्यंत मारेकरी निघून गेले होते, त्यामुळे तिला कोणाचाही चेहरा दिसला नाही, पण तिने मारेकऱ्यांची पांढरी प्युगो गाडी अगदी नीट पाहिली होती, आणि लगेचच पोलिसांनाही कळवलं होतं. पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी जारी करून हल्लेखोरांना पकडायचा प्रयत्न केला होता. मारेकऱ्यांची पांढरी प्युगो त्यातून निसटली होती, पण एका तत्पर पोलिस अधिकाऱ्याने तिचा नंबर लिहून घेतला होता.

पुढच्या दिवशी जेव्हा डॅन इर्बेल आणि मारियन ग्लाडनिकोफ हे दोन एजंट्स ही गाडी परत करायला गेले, तेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांना अजून दोन एजंट्सचा – सिल्व्हिया राफाएल आणि अॅव्हरम गेमर यांचा पत्ता लागला आणि या दोघांनाही अटक झाली. इर्बेल आणि ग्लाडनिकोफ हे तुलनेने नवखे एजंट्स होते. त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडलं आणि या संपूर्ण ऑपरेशनची सारी माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी ऑस्लोमधल्या एका घरावर धाड टाकली आणि तिथून अनेक कागदपत्रं हस्तगत केली. तेव्हा इझराईलच्या नॉर्वेमधल्या दूतावासाचा मुख्य सुरक्षा अधिकारी इगाल एयाल हा मोसादचा एजंट आहे आणि ते इझराईलने नॉर्वेच्या सरकारसमोर जाहीर केलेलं नाही, हे उघडकीस आलं, आणि संपूर्ण जगभरात इझराईलची अभूतपूर्व नाचक्की झाली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा नॉर्वेमधल्या प्रसारमाध्यमांनी या एजंट्सच्या अटकेबद्दल जाहीर केलं, तेव्हा मोसादला कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आत्तापर्यंत मिळवलेला सगळा लौकिक धुळीला मिळाला. आणि त्यात या सगळ्यावर कळस करणारी बातमी जाहीर झाली – ज्याला मोसादने मारलं, तो अली हसन सलामेह नव्हताच. तो अहमद बुशिकी नावाचा मोरोक्कन होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता. त्याची पत्नी नॉर्वेजियन होती आणि ७ महिन्यांची गरोदर होती आणि तिच्या डोळ्यांदेखत मोसादने तिच्या पतीची हत्या केली होती, तीही केवळ गैरसमजाने. बुशिकीचा सलामेहशी किंवा फताहशी दूरवरचाही काही संबंध नव्हता.

सगळ्या जगभरात या बातम्यांनी प्रचंड खळबळ माजवली. अटक झालेल्या एजंट्सवर नॉर्वेच्या न्यायालयात खटले भरण्यात आले. बऱ्याच एजंट्सना मोठ्या कालावधीच्या शिक्षा झाल्या.

मोसादमध्ये या अपयशाचे परिणाम होणार होतेच. आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये मोसादला आमूलाग्र बदल घडवून आणावा लागला. अहमद बुशिकीच्या पत्नीला ४ लाख डॉलर्स एवढी नुकसानभरपाईही द्यावी लागली. पण सर्वात मोठा परिणाम म्हणजे मोसादची अजिंक्य प्रतिमा आता मलीन झाली. .

पंतप्रधान गोल्डा मायरनी झ्वी झमीरला ऑपरेशन राथ ऑफ गॉड बंद करायचे आदेश दिले. पण मोसादला या अपयशावर विचार करायलाही वेळ मिळाला नाही. ६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी इजिप्त आणि सीरिया यांनी इझराईलवर अनपेक्षितरीत्या हल्ला चढवला आणि योम किप्पुर युद्धाची सुरुवात झाली.

यानंतर दोन वर्षांनी मोसाद एजंट्सना सलामेह विश्वसुंदरी जॉर्जिना रिझ्कबरोबर दिसला पण तो परत गायब झाला. त्यानंतर परत दोन वर्षांनी मोसादला त्याच्या आणि जॉर्जिनाच्या लग्नाची बातमी समजली.

जॉर्जिनाप्रमाणेच सलामेहच्या व्यावसायिक आयुष्यातही यशश्रीचा प्रवेश झाला होता. १९७३ च्या शेवटी ब्लॅक सप्टेंबर संघटना अराफतने बरखास्त केली, पण सलामेह आता अराफतचा उजवा हात बनला होता. तो आपला दत्तक मुलगा आहे असं अराफतने स्वतः जाहीर केलं होतं. अराफत पी.एल.ओ. आणि फताहमधून निवृत्त झाला, किंवा त्याला काही झालं तर सलामेह त्याची जागा घेणार हे आता सगळ्यांना ठाऊक झालं होतं. सलामेहने फोर्स १७ नावाचं एक दल निर्माण केलं होतं. फताहच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा हा या दलाचा एककलमी कार्यक्रम होता. एका अफवेनुसार त्यांना अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसमधल्या एका निवृत्त एजंटने प्रशिक्षण दिलं होतं. अराफत जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कला गेला, तेव्हा सलामेह त्याच्याबरोबर होता. तिथून अराफत मॉस्कोला आणि हवानाला गेला, तेव्हा सगळीकडे सलामेह त्याच्याबरोबर होता. एका दहशतवाद्याचा हळूहळू राजनेता बनण्याकडे प्रवास चालू होता आणि मोसादमधले लोक हे सगळं अस्वस्थपणे बघत होते. त्यांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्यांना सी.आय.ए.ने सलामेहपुढे मैत्रीचा हात केल्याचं समजलं.

सी.आय.ए. आणि त्यांनी शीतयुद्धाच्या काळात सोविएत रशियाची आणि नंतर अल कायदा, इराण आणि सद्दाम हुसेन यांची नाकेबंदी करण्यासाठी दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांशी वेळोवेळी बांधलेलं संधान हा मोसादसाठी नेहमीच एक डोकेदुखीचा विषय राहिलेला आहे. ‘ अमेरिकन्स नेहमीच चुकीच्या लोकांबरोबर मैत्री करतात ’ हे इझराईलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचं मत होतं. त्यावर अजूनही इझरेली सैन्य आणि मोसाद यांचा दृढ विश्वास आहे. (इराण आणि अमेरिका यांच्यातल्या कराराने इराणवरचे निर्बंध उठवणं ही अमेरिकेची चूक आहे असं जे विद्यमान इझरेली पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांचं म्हणणं आहे त्याला एवढा जुना संदर्भ आहे.) १९७० च्या दशकाच्या शेवटीही त्यात काही फरक पडलेला नव्हता. यावेळी मोसादच्या काळजीचं कारण होतं सी.आय.ए. आणि सलामेह यांच्यातली वाढती जवळीक. तो कम्युनिस्टविरोधी आहे एवढं सी.आय.ए.साठी पुरेसं होतं. त्याने खार्टुममध्ये अमेरिकन राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांना घातलेल्या कंठस्नानाकडे सी.आय.ए.मुद्दाम दुर्लक्ष करत होते, आणि सलामेहला रशियाविरुद्ध कसा वापरता येईल याचा विचार करत होते. सलामेह आणि जॉर्जिना हवाई बेटांवर सुट्टी घालवत असताना त्याला उडवायची मोसादची योजना होती, पण अमेरिकन भूमीवर असं काही केल्यास परिणाम वाईट होतील अशी सी.आय.ए.कडून तंबी मिळाल्यावर मोसादचा नाईलाज झाला.

सलामेहच्या आयुष्याला आता काहीही धोका नाही असं त्याच्या मित्रांचं म्हणणं होतं, पण स्वतः सलामेहला तसं वाटत नव्हतं. “माझी वेळ आली की मला जावंच लागेल,” त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “तेव्हा कुणीही मला वाचवू शकणार नाही.”

लिलहॅमरनंतर पाच वर्षांनी परत एकदा सलामेहची फाईल उघडायची वेळ आलेली आहे असं मोसादने ठरवलं. खुद्द इझराईलमध्येही अनेक बदल घडून आलेले होते. गोल्डा मायर निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्यानंतर आलेल्या यित्झाक राबिन यांनी राजीनामा दिलेला होता, आणि इझराईलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिकुड या उजव्या विचारसरणी असलेल्या पक्षाचं सरकार इझराईलमध्ये सत्तेवर आलं होतं आणि पंतप्रधान होते मेनॅचम बेगिन. मोसादमध्ये आता झ्वी झमीरच्या जागी नवीन संचालक आलेला होता – यित्झाक होफी. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांचा इझराईलविरोधी दहशतवाद अधूनमधून डोकं वर काढत होता. १९७६ मध्ये पी.एफ.एल.पी.च्या दहशतवाद्यांनी एअर फ्रान्सचं विमान त्याचं अपहरण करून युगांडामधील एन्टेबी या ठिकाणी नेलं आणि सायारेत मत्कालच्या कमांडोजनी एका अभूतपूर्व ऑपरेशनमध्ये या विमानाची आणि त्यातल्या प्रवाश्यांची सुटका केली. त्यामुळे मोसादची गेलेली अब्रू परत यायची थोडी शक्यता निर्माण झालेली असतानाच १९७८ ची घटना घडली. फताहचे दहशतवादी इझराईलमध्ये आले, त्यांनी एक प्रवासी वाहतूक करणारी बस ताब्यात घेतली आणि तेल अवीवच्या दिशेने निघाले. ही बातमी तेल अवीवमध्ये पोलिसांना समजल्यावर त्यांनी या बसचा मार्ग रोखला. या अतिरेक्यांची गठडी वळून बसवर परत ताबा मिळवण्यात कमांडोना यश आलं, पण ३५ निरपराध प्रवाश्यांचे प्राण गेले.

पंतप्रधान बेगिन विरोधी पक्षनेते असताना आपल्या कट्टर दहशतवादविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. आता पंतप्रधान झाल्यावर त्यात काहीही बदल झालेला नाही हे दाखवायची वेळ आता त्यांच्यासमोर आली होती. त्यांनी इझराईलच्या जुन्या शत्रूपासून सुरुवात करायचं ठरवलं – अली हसन सलामेह.

लग्न झाल्यानंतर सलामेहच्या आयुष्याला जरा स्थिरता लाभली होती. तो एकेकाळी जगभर फिरत असे, पण सध्या तो जॉर्जिनाच्या शहरात – बैरूटमध्ये होता. पंतप्रधानांकडून सलामेहचा कायमचा काटा काढायच्या मोहिमेला हिरवा कंदील मिळाल्यावर मोसादने एका अंडरकव्हर एजंटला सलामेहच्या मागावर पाठवलं. बैरूटच्या श्रीमंत वस्तीत असलेल्या एका प्रतिष्ठित हेल्थ क्लबमध्ये सलामेह नियमित जात असे. या एजंटने सर्वप्रथम तिथे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. तेव्हा त्याने नाव बदलून क्लबचं सदस्यत्व घेतलं. एके दिवशी हा एजंट सौना बाथ घेण्यासाठी क्लबमध्ये गेला असताना तो आणि सलामेह अचानक एकमेकांसमोर आले. हा एजंट आणि सलामेह जवळपास १५ मिनिटं एकमेकांपासून फक्त ४-५ फूट अंतरावर होते. सलामेह संपूर्ण नग्न होता, आणि त्याच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं.

या एजंटने जेव्हा ही बातमी मोसाद हेडक्वार्टर्समध्ये कळवली, तेव्हा तिथे एकच खळबळ माजली. सौना बाथमध्ये नग्नावस्थेत असताना सलामेहला मारणं सहज शक्य आहे असं काहींचं म्हणणं पडलं. पण सलामेहला जराजरी संशय आला असता, तरी त्याने तिथल्या एखाद्या निरपराध माणसाला ढाल बनवून तिथून निसटण्याचा प्रयत्न केला असता, यात शंका नव्हती, आणि अहमद बुशिकीनंतर मोसादला परत तसलं कुठलंही प्रकरण नको होतं. त्यामुळे सलामेहला त्याच्या हेल्थ क्लबमध्ये संपवायची योजना बासनात गुंडाळली गेली.

आणि त्याच वेळी या नाटकात एरिका मारी चेम्बर्स नावाच्या स्त्रीचा प्रवेश झाला.

एरिका इंग्लंडमधली होती आणि एखाद्या टिपिकल इंग्लिश माणसाने पण हात वर केले असते एवढी विक्षिप्त होती. तिच्या पासपोर्टवरील नोंदीनुसार ती गेली चार वर्षे जर्मनीमध्ये राहिली होती. बैरूटमध्ये आल्यावर तिने एक फ्लॅट भाड्याने घेतला. हा फ्लॅट रु व्हेर्डून आणि रु मादाम क्युरी या दोन रस्त्यांच्या छेदबिन्दुजवळ असलेल्या एका इमारतीत होता. तिच्या शेजाऱ्यांना तिने आपलं नाव पेनेलोपे आहे आणि ती एका गरीब आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी काम करते असं सांगितलं होतं. तिचा दिवस हा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, अनाथालयांमध्ये आणि लहान मुलांच्या व्यायामशाळांमध्ये जात असे. व्यक्तिगत दृष्ट्या बोलायचं तर ती एक अत्यंत एकाकी स्त्री होती. तिचे कपडे काही खास नसत. त्यांना धड इस्त्रीसुद्धा केलेली नसे. तिची अजून एक आवड म्हणजे मांजरी. ती बघावं तेव्हा दोन्ही हातांत कॅट फूडने भरलेल्या बशा घेऊन गल्लीतल्या मांजरांना खायला घालताना दिसे. तिच्या फ्लॅटमध्येही मांजरांचा वावर होता. त्यामुळे संपूर्ण घराला एक विचित्र वास येत असे. पण ती तिचं घरभाडं वेळेवर देत असे, त्यामुळे तिच्या घरमालकाला तक्रार करायला काही जागा नव्हती. तिला चित्रकलेचीही आवड होती. पण तिची चित्रं कुणा जाणकाराने लक्षपूर्वक पाहिली असती, तर तिच्या चित्रकलेतल्या कौशल्याबद्दल त्याला नक्कीच शंका आली असती.

जर एखाद्याने तिची दिनचर्या अगदी काळजीपूर्वक न्याहाळली असती, तर त्याला एक गोष्ट जाणवली असती. ती बराच वेळ तिच्या फ्लॅटच्या गॅलरीतून दिसणारी गाड्यांची ये-जा बघण्यात घालवत असे. दररोज सकाळी साडेनऊ वाजता एक तपकिरी रंगाची शेवर्लेट स्टेशन वॅगन आणि तिच्यामागे एक लँड रोव्हर या दोन गाड्या तिच्या घराखालून जात असत. नेमक्या त्याच वेळी ती आपलं चित्र काढणं थांबवून जवळ ठेवलेल्या बायनॉक्युलर्स हातात घेत असे आणि त्या गाड्यांकडे लक्षपूर्वक बघत असे. दररोज सकाळी साडेनऊच्या थोडं आधी या गाड्या बैरूटच्या अतिश्रीमंत स्नौब्रा भागातून निघत आणि जवळच असलेल्या रु व्हेर्डूनवरून रु मादाम क्युरी रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडे जात असत. तिथून जवळच फताहचं एक ऑफिस होतं. दुपारी जेवणाच्या वेळी या दोन्हीही गाड्या परत येत आणि साधारण दुपारी ३ च्या सुमारास परत जात असत. एरिका दिवसभर कुठेही गेली तरी या गाड्यांच्या जायच्या आणि यायच्या वेळी ती घरात, किंबहुना गॅलरीत असायचीच.

त्या पहिल्या स्टेशन वॅगनच्या मागच्या सीटवर दोन अंगरक्षकांच्या मध्ये अली हसन सलामेह बसलेला असतो, हे एरिकाने पाहिलेलं होतं. त्याच्या ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक अंगरक्षक असतो, आणि मागून येणाऱ्या गाडीत अजून अनेक हत्यारबंद तरुण असतात, हे सगळं तिने नोंदवून ठेवलं होतं.

एवढ्या अंगरक्षकांमुळे सलामेह कदाचित जिवावरच्या हल्ल्यातून बचावला असता, पण त्याचं एका जबरदस्त शत्रूपासून हे अंगरक्षक संरक्षण करूच शकत नव्हते. तो शत्रू म्हणजे नियमितपणा. दररोज सकाळी ठराविक वेळी ऑफिस, ठराविक वेळी घरी जेवायला जाणं, ठराविक वेळी परत ऑफिस आणि ठराविक वेळी परत घर हा आता सलामेहचा नियमित दिनक्रम झाला होता. तो गुप्त कारवायांचा पहिला आणि महत्वाचा नियम विसरला होता – जर तुम्हाला स्वतःवर शत्रूचा हल्ला होऊ नये असं वाटत असेल, तर सर्वप्रथम नियमितपणा टाळा. कधीही त्याच रस्त्याने, त्याच वेळी, त्याच वाहनाने येऊ-जाऊ नका.

१८ जानेवारी १९७९ या दिवशी पीटर स्क्रीव्हर नावाचा एक ब्रिटीश पर्यटक बैरूटमध्ये उतरला, हॉटेल मेडिटरेनियनमध्ये त्याने एक खोली घेतली आणि शहर फिरण्यासाठी एक फोक्सवॅगन गोल्फ गाडी घेतली. त्याच दिवशी तो रोनाल्ड कोलबर्ग नावाच्या एका कॅनेडियन पर्यटकाला भेटला. कोलबर्ग रॉयल गार्डन नावाच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये राहात होता. त्याने त्याच एजन्सीमधून एक क्रायस्लर सिमका गाडी घेतली. कोलबर्ग म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून डेव्हिड मोलाद होता. त्याच संध्याकाळी एरिका चेम्बर्सने त्याच एजन्सीमधून एक डॅटसन गाडी भाड्याने घेतली आणि आपल्या घराच्या खाली रस्त्यावर पार्क केली.

त्या रात्री बैरूटपासून जवळ असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर इझरेली नौदलाच्या तीन मिसाईल बोट्स आल्या आणि त्यांनी भरपूर स्फोटकं किनाऱ्यावर उतरवली. स्क्रीव्हर आणि कोलबर्ग उर्फ मोलाद हे दोघेही तिथे त्यावेळी हजर होते. त्यांनी ही स्फोटकं फोक्सवॅगन गाडीमध्ये भरली.

२१ जानेवारी १९७९ या दिवशी पीटर स्क्रीव्हरने हॉटेलमधून चेक आउट केलं आणि त्याची फोक्सवॅगन गाडी रु व्हेर्डूनवर, एरिकाच्या घरातून अगदी सहज दिसेल अशी पार्क केली. नंतर तिथून एक टॅक्सी घेऊन तो एअरपोर्टवर गेला आणि तिथून सायप्रसला गेला. रोनाल्ड कोलबर्गनेही चेक आउट केलं आणि तो मोन्त्मार्त नावाच्या हॉटेलमध्ये गेला. हे हॉटेल एरिकाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर पण मागच्या बाजूला होतं.

त्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता सलामेह त्याच्या घरातून निघाला, शेव्हर्लेटमध्ये बसला, त्याचे अंगरक्षकही आपापल्या जागी बसले आणि सगळे निघाले. ते रु व्हेर्डूनपाशी आले आणि एरिकाच्या घराखाली पार्क केलेल्या फोक्सवॅगनच्या बाजूने गेले, आणि नेमक्या त्याच क्षणी गॅलरीत एरिकाच्या मागे उभ्या असलेल्या कोलबर्ग उर्फ मोलादने रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. फोक्सवॅगनमध्ये ठासून भरलेल्या स्फोटकांचा जबरदस्त स्फोट झाला. स्फोटाचा दणका एवढा जबरदस्त होता, की आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि त्यांचा सडा रस्त्यावर पडला. फोक्सवॅगनतर वितळूनच गेली, पण तिच्या बाजूने गेलेल्या शेव्हर्लेट आणि लँड रोव्हर गाड्यांचाही स्फोट झाला. शेव्हर्लेटचे दरवाजे उखडले आणि आतमधले मृतदेह बाहेर फेकले गेले.

पोलिस आल्यावर त्यांनी शेव्हर्लेटमध्ये असलेला एकमेव मृतदेह बाहेर काढला. बाकीचे मृतदेह बाहेर फेकले गेले होते. हा मृतदेह होता अली हसन सलामेहचा. आपल्या सगळ्या अंगरक्षकांसमवेत सलामेह मारला गेला.

दमास्कसमध्ये यासर अराफतला ही बातमी समजल्यावर त्याला अश्रू आवरले नाहीत.

त्याच रात्री मोलाद आणि एरिका त्याच निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर इझरेली बोटीची वाट पाहात थांबले होते. २२ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता त्यांना हवा असलेला संदेश मिळाला, आणि इझरेली युद्धनौकेतून आलेल्या रबरी मचव्यावर बसून दोघेही त्या युद्धनौकेकडे आणि तिथून इझराईलला निघून गेले.

५ सप्टेंबर १९७२ या दिवशी सुरु झालेला सूडाचा प्रवास मोसादने ७ वर्षांनी संपवला आणि Mossad never forgets हे सिद्ध केलं.

क्रमशः

संदर्भ:
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements

इतिहासलेख

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

19 Apr 2016 - 1:50 am | राघवेंद्र

हा ही भाग वेगवान.

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2016 - 2:11 am | श्रीरंग_जोशी

थरारक घडामोडींचे वर्णन आवडले.
पुभाप्र.

इष्टुर फाकडा's picture

19 Apr 2016 - 2:18 am | इष्टुर फाकडा

बोका भाऊ, खालचं 'क्रमशः' वाचून हायसं वाटलं. वाटलं, सलामेह बरोबर संपवताय का काय ! खूप आवडलीये हि लेखमाला.

असंका's picture

19 Apr 2016 - 1:07 pm | असंका

+१...

इस्त्रायेलच्या अगदी विपरीत धोरण म्हणायचं का हे??

तुम्ही आवर्जून ह्या लेखमालेचं पुस्तक काढाच.
एकापेक्षा एक भन्नाट कारनामे आहेत.

नाखु's picture

19 Apr 2016 - 10:40 am | नाखु

म्हणतो....

जबहर्या शब्दपण बोथट झालेला नाखु पंखा

बेकार तरुण's picture

19 Apr 2016 - 7:42 am | बेकार तरुण

प्रचंड आवडत आहे लेखमाला
एकाहुन एक सरस भाग !

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Apr 2016 - 7:44 am | कैलासवासी सोन्याबापु

खल्लास आहे हे!!!

बोक्या भाऊ, एरिका नेमकी कोण होती? त्याबद्दल काही सांगाना, मोसाद जबरी जमुन आलंय राव _/\_

मोदक's picture

19 Apr 2016 - 11:38 am | मोदक

+११११

खल्ल्लास लेखमाला सुरू आहे..!!

नया है वह's picture

19 Apr 2016 - 12:34 pm | नया है वह

जबरदस्त!

विलासराव's picture

19 Apr 2016 - 12:36 pm | विलासराव

ग्रेट !!!!

नरेश माने's picture

19 Apr 2016 - 12:42 pm | नरेश माने

जबरदस्त!!!

शलभ's picture

19 Apr 2016 - 3:21 pm | शलभ

मजा आली.
तुमचे आभार इतकी वाचनीय लेखमाला आम्हाला दिल्याबद्दल. _/\_ :)

अभिजित - १'s picture

19 Apr 2016 - 5:39 pm | अभिजित - १

जबरा !!

" अरब आणि जपानी दहशतवाद्यांनी एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता आणि पोर्टो रिकोहून आलेल्या आणि जेरुसलेमला जाणाऱ्या एका मोठ्या प्रवासी गटातले जवळपास सर्वजण त्यात ठार झाले होते. "
- जपानी दहशत वादी ? हे कोण ?

अभिजित - १'s picture

19 Apr 2016 - 7:08 pm | अभिजित - १

धन्यवाद ..

मी-सौरभ's picture

19 Apr 2016 - 5:59 pm | मी-सौरभ

सर्वांग सुंदर लेखमाला.

मोदक भौ: या लेख मलिकेची पीडीएफ बनवुन झाली की सांगा बर का ;)

मोदक's picture

19 Apr 2016 - 7:17 pm | मोदक

:)

राघवेंद्र's picture

19 Apr 2016 - 11:32 pm | राघवेंद्र

+१ मला पण हाच विचार आला होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Apr 2016 - 7:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोसादे आझम अजुनच मस्तं भाग

अजया's picture

19 Apr 2016 - 10:51 pm | अजया

जबरदस्त!

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2016 - 11:38 am | पिलीयन रायडर

भारी!!

क्रमशः पाहुन फार बरं वाटलं!

अत्रन्गि पाउस's picture

20 Apr 2016 - 12:47 pm | अत्रन्गि पाउस

घ्या !!!

सोनुली's picture

20 Apr 2016 - 3:21 pm | सोनुली

mossad never forgets... आणखीन सांगा.

शान्तिप्रिय's picture

20 Apr 2016 - 3:26 pm | शान्तिप्रिय

वेगवान थरारक आणि मस्त!

Madhavi1992's picture

20 Apr 2016 - 8:27 pm | Madhavi1992

अप्रतीम

मी मिपा बरेचदा जमेल तेव्हा वाचत असते. प्रतिसाद द्यायला नेहमी जमतच असं नाही. पण हि आणि अशा अनेक अनेक लेखमाला मला नेहमी मिपा वर यायला भाग पडतात.
सोपी भाषा उत्कृष्ट लेखमाला

गामा पैलवान's picture

21 Apr 2016 - 11:54 pm | गामा पैलवान

बोका-ए-आझम,

सलामेहला उडवतांना चार निरपराध मारले गेले. हे मोसादच्या तत्त्वांत बसणारं आहे का?

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2016 - 11:48 am | कैलासवासी सोन्याबापु

बलूचिस्तानात रॉ कडून ४ निरपराध लोकं मारल्या गेल्याचे उद्या कळले (डीक्लासिफाय होणे वगैरे ने अधिकृत रीत्या) तर आपण एकंदरित राष्ट्रिय हित पहाल का चार परदेशी नागरिक मारले म्हणून आपल्या देशात किंवा अंतरराष्ट्रीय मंचावर रॉ वरती टिका कराल हो??

स्पष्ट बोलायचे झाल्यास

१ गुप्तहेरीच्या धंद्यात विधीनिषेध नसतात

२ कोलॅटरल डॅमेज होतच असते तरी जबाबदार गुप्तहेर खाती तो डॅमेज कमीत कमी ठेवायला कार्यरत अन प्रयत्नशील असतात तरीही जर असे काही झालेच तर दुर्दैव म्हणून सोडुन द्यायचे असते

शिवाय

जगात एक अशी गुप्तहेर संघटना सांगा जी कोलेटरल डॅमेज मधे इनवॉल्व नसेल! धुतल्या तांदळाचं कोणीच नसताना एकट्या मोसादवर प्रश्नचिन्ह का हे समजले नाही.

रंगासेठ's picture

22 Apr 2016 - 11:35 am | रंगासेठ

बर्‍याच दिवसांनी मिपावर आलो. बोकाभाऊंचे मोसाद वाचले आणि सार्थक झालं.
थरारक लिखाण.

अद्द्या's picture

22 Apr 2016 - 12:22 pm | अद्द्या

जबरदस्त बोकोबा ,

आता फक्त एक विनंती ,

हि मालिका संपली कि RAW वर पण अशी एक मालिका लिहा , कमी भागाची असली तरी चालेल,

"आपल्या लोकांना असलं सगळं कधी जमणार " या प्रश्नाला उत्तर द्याव म्हणून तरी लिहा ती मालिका

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2016 - 12:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

"आपल्या लोकांना असलं सगळं कधी जमणार " या प्रश्नाला उत्तर द्याव म्हणून तरी लिहा ती मालिका

+१०००००००००

शलभ's picture

22 Apr 2016 - 6:01 pm | शलभ

+123456789

पैसा's picture

22 Apr 2016 - 12:32 pm | पैसा

थरारक!

गामा पैलवान's picture

22 Apr 2016 - 7:05 pm | गामा पैलवान

सोन्याबापु,

तुमचा इथला संदेश वाचला. तुम्ही म्हणता की विधिनिषेध नसतात. मग मोसादने पीयेफेलेफ ची इमारत उद्ध्वस्त करतांना आजूबाजूच्या सामान्य लोकांची चिंता करायचं काहीच कारण नव्हतं. किंबहुना निरपराध सामान्य लोकांचा उल्लेखही यायला नको, बरोबर?

माझा प्रश्न असाय की, हेतुबाह्य हानीबद्दल (= कोल्याटरल ड्यामेज) मोसादचं काही निश्चित धोरण आहे का? की जे कोणी अधिकारी असतील ते आपापल्या मनाला येईल ते करत सुटतात?

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

22 Apr 2016 - 8:59 pm | बोका-ए-आझम

जगातल्या जवळपास सर्व गुप्तचर संघटना (केजीबी किंवा सध्याच्या रशियामधील एफ.एस.बी. आणि एस.व्ही.आर. सोडून) collateral damage हे जेवढं कमीतकमी होईल त्याचा प्रयत्न करतात. अापला देशही तसं करतो. असं करताना अनेक वेळा निरपराध लोक चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्याबद्दल दुर्दैवाने काही करता येत नाही. Civilian and wrongful death बद्दल जगभरातल्या सर्व लोकशाही देशांच्या गुप्तचर संघटनांचं नक्कीच धोरण असतं. त्याप्रमाणे मोसादचंही आहे. मोसादच्या कारवाया नेसेटच्या intelligence committee कडून तपासल्या जातात आणि त्यांचं धोरण अतिशय कडक आहे. मोसाद पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येते आणि त्यामुळे एक प्रकारे मोसादच्या कारवायांना पंतप्रधान जबाबदार असतात. हीच पद्धत ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेतही आहे. हुकूमशाही देशांच्या गुप्तचर संघटना मात्र कुठलाही विधिनिषेध पाळत नाहीत, कारण मानवी आयुष्य त्यांच्यासाठी कस्पटासमान असतं. पण लोकशाही देशांना तसं वागता येत नाही. सीआयएला अमेरिकन नागरिकांना, मग ते देशद्रोही असले तरीही,मारण्याची परवानगी नाहीये. एम आय ६ चे लोकही कुणाला अटक करु शकत नाहीत. त्यांना special branch of Scotland Yard ची मदत घ्यावी लागते. मोसादही अशाच नियमांनुसार चालवली जाते. इसेर बीरीसारख्या किंवा जनरल झाईरासारख्या लोकांनी जेव्हा मर्यादा ओलांडलेली आहे तेव्हा कारवाईही झालेली आहे.

पद्मावति's picture

23 Apr 2016 - 5:39 pm | पद्मावति

अप्रतिम लेखमाला!

मी-सौरभ's picture

12 May 2016 - 9:24 pm | मी-सौरभ

पुढचा भाग येणार आहे का बोका-ए-आझम?

मी-सौरभ's picture

27 May 2016 - 5:21 pm | मी-सौरभ

हा प्रतिसाद फक्त हा धागा वर काढण्यासाठी आहे. :)

रघुपती.राज's picture

27 May 2016 - 6:03 pm | रघुपती.राज

पुढचा भाग ?

बाराव्या भागाची वाट बघतोय!

सुधीर कांदळकर's picture

7 Jun 2016 - 7:35 am | सुधीर कांदळकर

वेगवान, थरारक वगैरे. छान.

मी-सौरभ's picture

15 Jun 2016 - 6:23 pm | मी-सौरभ

खुप दिवस झाले मालक... पु. भा. ल. टा. की

राजाभाउ's picture

16 Jun 2016 - 3:31 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 11:25 pm | बोका-ए-आझम