गच्ची

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 4:55 pm

घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो.

उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही. कावळ्यांचा भेंडी बाजार भरला की आपल्या जास्त जवळ येऊन काव काव करणा-या एकदोघांना उडवून लावावं. सगळे कावळे एकाच वेळी कसे उडतात आणि थोडंसं फिरून पुन्हा तिथेच किंवा समोरच्या झाडावर, इमारतीवर येऊन का बसतात यावर विचार करत बसावं. यातली लेडीज कोण हा सदैव छळणारा प्रश्न. मग थोड्या वेळानं सगळ्या मित्रांना फोनाफोनी करावी. कोणालाच वेळ नाही म्हटल्यावर अस्ताला जायच्या आधी सूर्याचं खाडीत पडणारं प्रतिबिंब पाहून मन सुखवावं. मग त्याच्याकडेच पाहात बसावं. पिवळ्याचा केशरी, केशरीचा लालबुंद गोळा आणि मग त्यावर ढगांची नाहीतर क्षितीजाची काळसर छटा येत जाऊन शेवटी तो दिसेनासा होईस्तोवर आपण मन रिकामं ठेवून नुसतं शांतपणे बघत बसावं. मधूनच झुळूक येऊन गार गार वाटावं नाहीतर डासांनी चावून हैराण करावं.

या सगळ्यानंतर अंधारत चाललेल्या आकाशाखाली आणि प्रकाशत चाललेल्या शहराच्या मधोमध उंचावर बसून एखादी कविता स्फुरावी. ती दहाजणांना पाठवावी. अतिच चांगली झाली असेल तर कोणालाही न दाखवता कुठेतरी स्वतःपासूनच दडवून आतल्या फोल्डरमध्ये ठेवावी. मग भविष्याची चिंता करत बसावं. आयुष्यात काय करावं इथपासून अजून काय काय करावं इथपर्यंतच्या कल्पना रंगवाव्या. त्या कल्पनांनी प्रेरित होऊन एखादा निर्णय घ्यावा. तो निर्णय घेऊन आपलं आयुष्य कसं पालटून जाईल याची तिथेच कल्पना करत बसावं. मग समोरच्या मंदीरातल्या सात वाजता कर्कश्श आवाजात रेकून म्हटल्या जाणा-या आरतीचाही त्रास होईनासा व्हावा. पावसाळा असला तर वीज आणि पाऊस, हिवाळा असला तर ता-यांचं आकाश, आणि उन्हाळा असला तर मधूनच येणारी झुळूक यांनी कल्पनांमध्ये भर पाडावी. पाडत राहावी. शेवटी आता गच्चीतला आजचा कोटा संपत आल्याची जाणीव मनाला बोचत राहावी, आणि नेहमीसारखा 'आज गच्चीत तितकी मजा नाही आली. समाधान झालं नाही' असं मनातल्या मनात म्हणत त्या डुगडुगत्या शिड्या उतरून घरी यावं.

आयुष्याच्या कामांत कितीही गुंतून गेलो, तरी असा दिवस येताजाता येतच राहतो. अस्वस्थ करतो. पण एकांतात घालवलेला सर्वोत्तम दिवस असतो तो. आता गच्चीत फिरकणं कमी झालेलं असलं, तरी रोजच हाक येत असते तिची. जाईन म्हणतो कधीतरी.

- कौस्तुभ अनिल पेंढारकर

वावरसाहित्यिकजीवनमानराहणीमौजमजा

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

9 Apr 2016 - 5:52 pm | शिव कन्या

तंतोतंत अनुभवकथन!
सुंदर ...

दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा.

फक्त या नॉस्टेल्जियासाठी उरलेला आख्खा लेख माफ.

स्पा's picture

9 Apr 2016 - 6:40 pm | स्पा

मस्त

विजय पुरोहित's picture

11 Apr 2016 - 12:16 pm | विजय पुरोहित

वडापाव साहेब... अगदी छान लेख...

बोका-ए-आझम's picture

11 Apr 2016 - 12:38 pm | बोका-ए-आझम

बालपण गेलेल्या मुलांना खेळण्याची हक्काची जागा गच्चीच असते. मीही अपवाद नव्हतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी ३ वाजल्यापासून ते अगदी सूर्यास्त होईपर्यंत खेळ चालायचा. कुणी खाली बाॅल मारला की तो आऊट आणि तो बाॅल त्याने आणायचा; बाॅल रस्त्यावर पडला की ' ए बाॅल बाॅल ' म्हणून गच्चीवरून आरडाओरडा; मग तो माणूस बाॅल फेकणार; ७ वाजता सगळ्यांच्या आया मुलांना घरी बोलावणार; पुढे आकाशदर्शनाची आवड लागल्यावर अमावास्येच्या जवळपासचा शनिवार गच्चीवर आकाशदर्शनासाठी रात्रभर राहायचं. पहाटे ४-५ च्या सुमारास छान वारा सुटायचा. सगळा आसमंत साखरझोपेत असायचा. मग सूर्योदय पाहूनच घरी जायचो. अशा अनेक आठवणी आहेत.
तुम्ही छान लिहिले आहे. आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!

राजाभाउ's picture

11 Apr 2016 - 12:56 pm | राजाभाउ

मस्त !!!

या सगळ्यानंतर अंधारत चाललेल्या आकाशाखाली आणि प्रकाशत चाललेल्या शहराच्या मधोमध उंचावर बसून एखादी कविता स्फुरावी.

हे फारच भारी.

आदिजोशी's picture

11 Apr 2016 - 1:02 pm | आदिजोशी

आमच्या सोसायटीच्या गच्चीला कठडे नसल्याने गच्चीत जाऊ देत नसत कधी कुणाला. पण संक्रांतीला पतंग उडवायला गच्चीत जाणं ही मोठी पर्वणी असायची. ग्राउंड फ्लोअरला राहणार्‍या आम्हाला वरून दिसणार्‍या दॄष्याचं फारच अप्रुप असायचं. लेख मस्त :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Apr 2016 - 1:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख वाचुन एकदम नॉस्टॅल्जिक वाटायला लागले. वेगवेगळ्या वयात गच्चीत रोज वेगवेगळ्या कारणांनी जाणे व्हायचे :)
म्हणजे दहावीपुर्वी जास्त करुन खेळायला किंवा पतंग उडवायला, दहावीत/बारावीत असताना अभ्यासासाठी, बारावीनंतर...वगैरे वगैरे

नाखु's picture

11 Apr 2016 - 2:02 pm | नाखु

आधारयुक्त उल्लेख आला आहे पुर्वी

सुधांशुनूलकर's picture

11 Apr 2016 - 4:00 pm | सुधांशुनूलकर

आवडला.

गच्चीचे आणखी काही (सभ्य) उपयोग आठवले -
भारतात आलेलं, एअर इंडियाचं पहिलं जंबो जेट 'सम्राट अशोक' गच्चीवरूनच पाहिलं होतं.
एका रात्री 'उल्कांचा पाऊस (वर्षाव)' पाहण्यासाठी रात्री गच्चीवर मुक्काम केला होता.
जवळच्या जांभळाच्या झाडाला लगडलेली टपोरी जांभळं काढण्यासाठी लांब काठीला एक पिशवी आणि चाकूचं पातं बांधून, पॅरापिटवर उतरून जांभळं काढायची आणि गच्चीवरच त्यांचा फराळ करायचा.
मी बारावीत असताना, शेजारच्या मुलाबरोबर गच्चीमध्ये अभ्यास केला. तो एलएल.एम.ला बसला होता. लवकरच एका राष्ट्रीय पक्षाचा युवा अध्यक्ष झाला आणि खासदार म्हणून चार वर्षांतच लोकसभेवर निवडून गेला. नंतर केंद्रीय मंत्रीही झाला. मात्र १९८९-९०मधल्या, गच्चीवरच्या आमच्या एकत्र अभ्यासाची आठवण त्याला आणि मला आजही आहे.

थोडं मोठं झाल्यावर - चोरून सिगरेट ओढण्यासाठी / तंबाखू खाण्यासाठी गच्चीसारखी जागा नाही.

पैसा's picture

12 Apr 2016 - 1:51 pm | पैसा

सुंदर लेख!

अपरिचित मी's picture

13 Apr 2016 - 9:57 am | अपरिचित मी

खूप छान लिहिला आहे... आठवणी ताज्या झाल्या!!!

बरखा's picture

13 Apr 2016 - 4:33 pm | बरखा

तुमचा लेख वाचुन माझ्या लहणपणीच्या गच्ची वरच्या आठवणी ताज्या झाल्या. दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही गच्ची वर झोपयला जायचो. त्यात घरी आलेल्या पाहुण्यांचा पण समावेश आसायचा. सर्व जण याची आतुरतेने वाट बघायचो. मोकळ्या आकाशाकडे डोळे करुन चांदण्यांच्या पांघरुणात झोपायला मजा यायची. पहाटेची गार हवा हवी हवीशी वाटायची. रात्री डास चावु नये म्हनुन चारही कोप-यात कॉईल लावुन ठेवायची. झोप अनावर होई पर्यन्त पत्ते कुटायचे. मग त्यात जो हारेल त्याने पार्टी द्यायची . पार्टीचे पदार्थ म्हणजे... भेळ, आईस्क्रिम, पेप्सिकोला, कुल्फी, वडापाव..... रोज कहीतरी नवीन मिळायचे. सकाळी जो पर्यन्त सुर्याच्या किरणांचा चटका बसत नाही तो पर्यन्त गच्चीत आम्ही पहुड्लेलो असायचो.
पण सर्वजण मोठे होत गेले तसे येणे जाणे कमी झाले. आणि आमचे गच्चीवर जाणे बंद झाले.