विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
16 Feb 2016 - 5:29 am

1
.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट , भाग १२ - सामाजिक डार्विनवाद , भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' , भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती , भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी , भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख , भाग १७ - डीएनए एक तोंडओळख

सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी आपल्या अवकाशाच्या पोकळीत दूरवर कुठेतरी एक प्रचंड उत्पात झाला. दोन महाप्रचंड कृष्णविवरं एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे गरागरा फिरली आणि प्रचंड वेगाने जवळ येत एकमेकांवरती आपटली. एकमेकांकडे खेचलं जाण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली होती, मात्र त्यांच्या आपटण्याच्या शेवटच्या सुमारे अर्ध्या सेकंदात जो कल्लोळ झाला तो आपल्यापर्यंत अब्ज वर्षं प्रवास करून काही दिवसांपूर्वी येऊन पोचला. आणि त्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रातही खळबळ माजली. गुरुत्वीय लहरींची पहिलीवहिली नोंद झाली.

हीच घटना जर दोनशे वर्षं आधी घडली असती तर आपल्याला त्याचा पत्ताही लागला नसता. कारण या कंपनांची मोजमाप करण्याची क्षमताच नव्हती. इतकंच नाही तर अशा लहरी असतात किंवा असू शकतात याचीही कल्पना कोणाला नव्हती. आइन्स्टाइनने जेव्हा सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांत (जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटी) मांडली तेव्हा कुठे अशा लहरी असतात याचं भाकित त्याला करता आलं होतं. मात्र त्या काळच्या तंत्रज्ञानाने अशा लहरी मोजणं केवळ अशक्यप्रायच होतं. अत्याधुनिक 'दुर्बिण' वापरून शंभर वर्षांनी का होईना, पण या लहरी मोजल्या गेल्या. आणि आइन्स्टाइनचा सिद्धांत आधीपेक्षाही बळकट झाला.

गुरुत्वीय लहरी म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आधी आइन्स्टाइनची मांडणी थोडक्यात समजावून घ्यायला हवी. आपल्या सामान्यज्ञानाप्रमाणे अवकाश असतं, आणि त्यात वस्तु असतात. काही वस्तू नसलेली पोकळी म्हणजे अवकाश. वस्तू अवकाशात पुढे मागे जाऊ शकतात. अवकाश मात्र आहे तसंच राहातं. अवकाशामुळे वस्तूही बदलत नाहीत. सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार वस्तुमानाचा परिणाम अवकाशावर होतो. म्हणजे अवकाश वाकडं होतं, ताणलं जातं. ताणलेल्या रबराच्या पृष्ठभागावर चेंडू ठेवला की रबराचा पृष्ठभाग ताणला जातो तसं. समजा या पृष्ठभागावर जर सरळ रेषा काढल्या असतील तर चेंडू ठेवल्यावर त्या ताणलेल्या, वाकलेल्या दिसतील. अवकाशाचंही तसंच आहे. या मूळच्या रेषांवरून प्रकाशकिरण सरळ जातो. मात्र चेंडू किंवा वस्तुमान ठेवल्यावर त्यामुळे ज्या रेषा वाकतात त्यांवरून प्रकाशकिरण गेला तर तो वाकलेला दिसतो. अशा प्रकारे प्रकाशकिरण वेगवेगळ्या ठिकाणी वाकल्यामुळे एखादा महाप्रचंड तारा हा गुरुत्वीय भिंगासारखा परिणाम करू शकतो. असा परिणाम दिसून आलेला आहे. त्यामुळे 'वस्तुमानामुळे अवकाश वक्र होतं' हे आधीच सिद्ध झालेलं आहे.

स्थिर वस्तुमानामुळे अवकाश वाकतं. तर दोन वस्तुमानं एकमेकांभोवती फिरली की या वक्राकाराच्या लाटा तयार होऊ शकतात. आपल्या कल्पनेतल्या रबराच्या पृष्ठभागावर दोन वजनदार गोळे एकमेकांभोवती फिरले तर त्यांच्यामधल्या खळग्यांमध्ये सतत बदल होत राहून आख्ख्या रबरी पृष्ठभागावरच त्याच्या लाटा पसरू शकतील तशा. या गुरुत्वीय लहरी. या लहरींमुळे अवकाशाचा वाकडेपणा कमी-जास्त होतो. म्हणजे मी जर एक मीटरची पट्टी ठेवलेली असेल तर तिची लांबी कमी-जास्त होईल. अर्थात ही लांबी बदललेली आहे हे मला तिच्या शेजारीच पट्टी ठेवून मोजणं शक्य नाही. कारण त्या पट्टीचीही लांबी तितकीच बदलेल. यासाठी मला एका दिशेला ठेवलेल्या पट्टीची लांबी दुसऱ्या दिशेला ठेवलेल्या पट्टीशी तुलना करून मोजावी लागते. ही पद्धत म्हणजे मायकेलसन इंटरफेरॉमीटर.

लायगो
लायगो (लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी) मध्ये मोजताना ज्या दोन 'पट्ट्या' L च्या आकारात वापरल्या जातात त्या चार किलोमीटर लांब आहेत. अमेरिकेतल्या लुइझियाना राज्यातल्या लिव्हिंगस्टन आणि वॉशिंग्टन राज्यातल्या हार्नफर्ड असा दोन ठिकाणी असे इंटरफेरॉमीटर आहेत. त्यांच्यातलं अंतर सुमारे ३००० मैल असल्यामुळे या गुरुत्वलहरी त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या वेळी पोचतात. त्यांच्यातलं वेळातलं अंतर मोजून साधारण कुठून या लहरी आल्या हे शोधणं सोपं जातं.

या L च्या कोपऱ्यातून एक लेझर किरण दोन्ही बोगद्यांतून पाठवला जातो. बोगद्यांच्या दुसऱ्या टोकाला आरसे आहेत, आणि तिथून ते किरण परावर्तित होऊन परत येतात आणि एकमेकांत मिसळले जातात. आता यातून कुठच्याही एका बाजूचं अंतर कमीजास्त झालं की नाही हे कसं कळतं?

इंटरफेरन्स

दुसऱ्या प्रतिमेत वरती दोन एकतानता असलेल्या वेव्ह्ज दाखवलेल्या आहेत. त्यांची बेरीज झाली की नवीन, अधिक तीव्र प्रकाश दिसतो. खाली एकतानता नसलेल्या वेव्हज आहेत, त्यांची बेरीज शून्य होत असल्यामुळे प्रकाश शून्य दिसतो. हे आपल्या सामान्यज्ञानाच्या विरुद्ध आहे - दोन प्रकाशलहरी एकत्रित केल्या तर त्यांतून शून्य प्रकाश कसा निर्माण होईल, हे आपल्याला पटत नसलं तरी घडतं खरं.

इंटरफेरोमीटरच्या दोन बाजूंना जाणारा प्रकाश हा एकतानता असलेला असतो. मात्र समजा, तुम्ही काहीतरी करून एका बाजूची लांबी किंचित वाढवली तर ही एकतानता कमी होते. हे समजून घेण्यासाठी आपण या प्रकाशलहरी म्हणजे मण्यांची माळ आहे असं समजू. प्रत्येक उंचवटा म्हणजे एक मणी. जेव्हा दोन्ही बाजूंची लांबी सारखीच असेल तेव्हा दोन्ही बाजूंसाठी सारखेच मणी लागतील. पण जर एका बाजूची लांबी पाव मण्याने वाढली तर तिथे जाणारी माळ आणि तिथून परत येणारी माळ अर्ध्या मण्याने जास्त लांब होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या माळा मण्याला मणी अशा जुळणार नाहीत. त्यातून वरच्या चित्रात खालच्या बाजूला दाखवलेली परिस्थिती निर्माण होईल. शून्य मणी ते पाव मणी यांच्यामध्ये काहीतरी परिस्थिती असेल तर पूर्ण एकतानता (प्रखर प्रकाश) आणि शून्य एकतानता (शून्य प्रकाश) यामधली परिस्थिती येईल. जर शून्य ते पाव यामध्ये कमीजास्त अशी हालचाल झाली तर ती हालचाल आपल्याला कमीअधिक होणाऱ्या प्रकाशातून मोजता येते. या आरशांची कायमची स्थिती असते ती डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची - म्हणजे शून्य प्रकाशाची. त्यामुळे अंतर कमी किंवा जास्त झालं तर ते प्रकाश वाढल्यामुळे दिसून येतं.
लायगोची कार्यपद्धती

गुरुत्वीय लहरी येतात तेव्हा त्या आरशांना हलवत नाहीत, तर अवकाशाचीच लांबी कमीजास्त करतात. त्यामुळे आरसे हलले नाहीत तरीही मधलं अंतरच कमीजास्त होतं. त्याचं प्रमाण इतकं लहान असतं की आपल्याला त्याची कल्पनाही करता येत नाही.

लेझरच्या प्रकाशासाठी ही मण्यांची लांबी ५०० नॅनोमीटरच्या आसपास असते. म्हणजे अर्धा मायक्रॉन. म्हणजे एका मिलीमीटरच्या सहस्रांशाचा अर्धा भाग. या प्रयोगात मोजली गेलेली लांबी ही साधारण पाव मण्याची, म्हणजे मिलीमीटरच्या एक दशसहस्रांश! आणि एवढा बदल झाला तो चार किलोमीटर लांबीच्या आर्म्समध्ये. म्हणजे चार हजार मीटरची लांबी फक्त साधारण एक कोट्यांश मीटरने बदलली. इतका बारीक फरक मोजण्याची क्षमता अभूतपूर्व आहे.

या शोधाचा फायदा नक्की काय? एक तर उघड आहे की आइन्स्टाइनचा सिद्धांत त्याने मांडल्यापासून बरोब्बर शंभर वर्षांनी अधिक पक्का झाला. वस्तुमानामुळे अवकाश वाकतं हे आधीच सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे मूळ तत्त्व यातून सिद्ध होत नाही. त्याच तत्त्वातून दिसणारे अपेक्षित परिणामही दिसून आले. पण नुसतीच सिद्धांताला बळकटी मिळण्यापलिकडे खगोलशास्त्रज्ञांना एक नवीन साधन मिळालं हा दुसरा फायदा आहे. अवकाशात कोट्यवधी प्रकाशवर्षं दूर घडणाऱ्या घटनांकडे बघण्यासाठी नवीन दृष्टी मिळाली. विश्वाकडे बघण्यासाठी जितके जास्त डोळे मिळतील तितकं चित्र अधिक स्पष्ट होतं. आपलं विश्व नक्की काय आहे, त्यात काय घडामोडी होतात, विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचं ज्ञान या संशोधनामुळे निश्चितच वाढत जाईल. या दृष्टीने हा क्रांतीकारी शोध आहे.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

एस's picture

16 Feb 2016 - 9:16 am | एस

वाचतोय.

sagarpdy's picture

16 Feb 2016 - 9:46 am | sagarpdy

मस्त. उदाहरणे आवडली.

धन्यवाद.. आपली लेखमाला अशीच चालू राहो.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Feb 2016 - 12:21 pm | बिपिन कार्यकर्ते
आनन्दा's picture

16 Feb 2016 - 3:19 pm | आनन्दा

मस्तच..

चिन्मना's picture

18 Feb 2016 - 8:43 am | चिन्मना

काय मस्त समजावलंय ! छानच...

मराठी_माणूस's picture

16 Feb 2016 - 1:00 pm | मराठी_माणूस

छान समजावलेत.
काही शंका
१)

एका बाजूची लांबी किंचित वाढवली तर ही एकतानता कमी होते

.
ही लांबी समजा इतकी वाढली असेल की एकतानता परत साधली गेली. म्हणजे दोन उंचवटे परत एकत्र आले . तर प्रत्यक्षात अंतर वाढुन सुध्दा ते आपल्यला समजणार नाही, असे होउ शकेल का ?
२) ह्या प्रयोगामधे, अंतरात फरक होण्यासाठी काय घडले होते ?
३) ह्या प्रयोगाच्या बातमीत दोन कृष्ण विवरांच्या टकरीचा उल्लेख होत आहे . त्याचा ह्या प्रयोगाशी काय संबंध ?
४)आपल्या ग्रह मालीकेत सुध्दा ग्रह, त्यांचे उपग्रह फीरत असतात त्यामुळे सुध्दा गुरत्व लहरी निर्माण होत असणारच ना ?
५)हा प्रयोग विशिष्ट दिवशी करण्याचे काही प्रयोजन होते का ?
६)

विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचं ज्ञान या संशोधनामुळे निश्चितच वाढत जाईल

ते कसे ?

राजेश घासकडवी's picture

16 Feb 2016 - 4:09 pm | राजेश घासकडवी

ही लांबी समजा इतकी वाढली असेल की एकतानता परत साधली गेली. म्हणजे दोन उंचवटे परत एकत्र आले . तर प्रत्यक्षात अंतर वाढुन सुध्दा ते आपल्यला समजणार नाही, असे होउ शकेल का ?

तितकी वाढण्यासाठी एका उंचवट्यापासून दुसऱ्या उंचवट्यापर्यंत जाताना जे कमी जास्त होईल ते डिटेक्ट केलं जातं. उदाहरणार्थ यातला एक आरसा हळूहळू सरकवत इतका लांब नेला की दोन्ही बाजूंमधला फरक दोन उंचवटे झाला - म्हणजे प्रकाशाला जाऊन येण्याचं अंतर चार उंचवट्यांनी वाढलं तर आपल्याला मिळणाऱ्या सिग्नलमध्ये शून्य ते अधिकतम आणि अधिकतम ते शून्य असे चार उंचवटे दिसतील.

२) ह्या प्रयोगामधे, अंतरात फरक होण्यासाठी काय घडले होते ?
३) ह्या प्रयोगाच्या बातमीत दोन कृष्ण विवरांच्या टकरीचा उल्लेख होत आहे . त्याचा ह्या प्रयोगाशी काय संबंध ?
४)आपल्या ग्रह मालीकेत सुध्दा ग्रह, त्यांचे उपग्रह फीरत असतात त्यामुळे सुध्दा गुरत्व लहरी निर्माण होत असणारच ना ?

कृष्णविवरांमुळे मोठ्या प्रमाणावर अवकाशाचं वक्रीकरण होतं. आणि दोन एकमेकांभोवती फिरली की एक प्रकारचं घुसळणं होतं. ती दूरवर असली तरी त्यांची शक्ती इतकी प्रचंड होती की त्या घुसळणीतून निर्माण होणाऱ्या लाटा आपल्यापर्यंत पोचल्या. त्या गुरुत्वलहरींमुळे आरशांचं अंतर कमीजास्त झालं. आपल्या सूर्याच्या फिरण्यामुळे किंवा इतर ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्यामुळेही लाटा तयार होतात. पण त्या इतक्या कमी शक्तीच्या असतात की त्या मोजणं शक्य नसतं. त्यासाठी आपल्या सूर्याच्या अब्जावधीपट वस्तुमान लागतं.

५)हा प्रयोग विशिष्ट दिवशी करण्याचे काही प्रयोजन होते का ?

हा प्रयोग केला नाही, झाला. थोडंसं पाण्यात गळ टाकून राहाण्यासारखं आहे. मासा लागतो तेव्हा 'या विशिष्ट क्षणी मासा मिळवण्याचं काय प्रयोजन होतं?' असं विचारता येत नाही. त्या ऑब्झर्व्हेटरी तयार केलेल्या होत्या अशाच प्रकारच्या घटना घडतील आणि त्यातून असा सिग्नल मिळेल या आशेने. सुदैवाने लवकर मोठ्ठा मासा गावला.

मराठी_माणूस's picture

16 Feb 2016 - 7:16 pm | मराठी_माणूस

उत्तरांबद्दल धन्यवाद.

कृष्णविवरांमुळे मोठ्या प्रमाणावर अवकाशाचं वक्रीकरण होतं. आणि दोन एकमेकांभोवती फिरली की एक प्रकारचं घुसळणं होतं. ती दूरवर असली तरी त्यांची शक्ती इतकी प्रचंड होती की त्या घुसळणीतून निर्माण होणाऱ्या लाटा आपल्यापर्यंत पोचल्या. त्या गुरुत्वलहरींमुळे आरशांचं अंतर कमीजास्त झालं.

हे त्याच दिवशी होइल हे आधी कसे समजले , कारण पेपर मधे आईन्स्टाईन चा सिध्दांत खरा कींवा खोटा ते उद्या समजेल अश्या बातम्या होत्या. त्यामुळे गळाला मासा केंव्हा लागेल ह्याची शक्यता कशाच्या जोरावर केली गेली होती.

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2016 - 12:03 am | राजेश घासकडवी

हा डेटा सप्टेंबरमध्येच मिळाला होता. मात्र तो दुसऱ्या कशामुळे आलेला नाही, निश्चित कारण काय असावं याचा अभ्यास आणि खात्री करण्यात पाचसहा महिने गेले. आधी एकदा दुसऱ्या टीमने गुरुत्वीय लहरी सापडल्याचा दावा केला गेला होता, तो मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे खुंटा हलवून बळकट केला गेला असावा. दुसऱ्या दिवशी काहीतरी विशेष सांगण्यासाठी पत्रकार परिषद असली तरी अनेकांना याची आधीपासून कुणकुण असावी.

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2016 - 2:03 pm | मराठी कथालेखक

अवकाशात कोट्यवधी प्रकाशवर्षं दूर घडणाऱ्या घटनांकडे बघण्यासाठी नवीन दृष्टी मिळाली.

ती कशी ? या लहरींपासून काय काय माहिती मिळते ? त्यांचे उगमस्थान , उगम होण्याचे कारण , वेळ ई सर्व कळते का ?

बाकी या लहरींनी जी खळबळ माजली ती पाहता एकच म्हणता येईल
आली लहर केला कहर :)

विश्वातल्या घडामोडींसाठी आतापर्यंत फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी हा एकच इन्पुट होता. किंवा मग इनडायरेक्ट निरीक्षणं. (उदा. गुरुत्वीय भिंग इफेक्ट वगैरे) बाकी सारं शांत शांत.

आता थेट स्पेसटाईममधेच तरंग उमटवणार्‍या अत्यंत क्षीण का असेनात पण गुरुत्वीय लहरी डिटेक्ट झाल्या आहेत. म्हणजे बहिर्‍या निरीक्षकाला कान लाभल्यासारखा अ‍ॅडिशनल इनपुट आहे, लिटरली "विश्वाचे आर्त" ऐकण्यासाठी.

शिवाय स्पेसटाईममधे अशा लहरी असतात याचा थेट पुरावा मिळाल्याने केवळ दूरस्थ गुरुत्वीय वक्रीभवनाने सिद्ध होणार्‍या गुरुत्वीय ताणाच्या अस्तित्वाला आणखी एक पुरावा मिळून तो अधिक बळकट झाल्याने जगभरातले दया, साळुंखे आणि एसीपी प्रद्युम्न वगैरे खूष झाले.

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2016 - 3:41 pm | मराठी कथालेखक

राजेशजी
कृपया थिअरी ऑफ रिलेटिविटी समजावून सांगणारा लेख लिहाल काय ? (E=mc2 च्या पलीकडे ते समजून घ्यायच आहे)

अमेरिकन त्रिशंकू's picture

16 Feb 2016 - 5:30 pm | अमेरिकन त्रिशंकू

गुरुत्वीय लहरींचा वेग काय असतो आणि ते कोणी, कसे, केव्हा निश्चित केले?
कृष्णविवरांची टक्कर १ अब्ज वर्षापूर्वी झाली हे कसे ठरवले आणि ते दुसर्‍या पद्ध्तीने व्हेरिफाय केले आहे का? (उदा. रेडिओ वेव्ह)

राजेश घासकडवी's picture

16 Feb 2016 - 6:12 pm | राजेश घासकडवी

गुरुत्वीय लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो. हा आइन्स्टाइनच्या सिद्धांताचाच भाग आहे.

लुइझियाना आणि वॉशिंग्टन इथल्या दुर्बिणींत हे सिग्नल सुमारे ७ मिलीसेकंदांच्या फरकाने मिळाले. त्यावरून अवकाशातून हा सिग्नल कुठून आला याचा साधारण अंदाज करता येतो. इतर पद्धतींनी व्हेरिफाय कसं केली याची माहिती मी सध्या मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र त्या दोन ब्लॅकहोल्सची वस्तुमानंही त्यांनी दिलेली आहेत, त्यावरून त्यांना निश्चित जास्त माहिती आहे हे नक्की.

अमेरिकन त्रिशंकू's picture

16 Feb 2016 - 8:57 pm | अमेरिकन त्रिशंकू

त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद.
गुरुत्वीय लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो. हा आइन्स्टाइनच्या सिद्धांताचाच भाग आहे.
म्हणजे हे एक्स्पेरिमेंटली अजुन सिद्ध झालेले नाही का?

वर लेखात तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर एक कोट्यांश मीटर एवढाच फरक असेल तर ते नॉईजमुळे नाही हे कसे ठरवले आणि नॉईज आयसोलेट करण्यासाठी काय केले? यासाठी योग्य ती उपाययोजना केली असणार याची खात्री आहे पण तेच समजून घ्यायचे आहे.

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2016 - 12:09 am | राजेश घासकडवी

नॉइजमुळे नाही हे ठरवण्यासाठी ३००० मैल दूर असलेल्या दोन सिस्टिम्समध्ये हुबेहुब तोच डेटा मिळाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्की कुठच्या शक्यता शिल्लक राहातात हे माहीत नाही.

हा महाप्रचंड प्रोजेक्ट आहे, त्यामुळे ते समजावून घेणं किंवा सांगणं हे माझ्या कुवतीबाहेरचं आहे. तुम्हाला रस असेल तर खालील पेपरमध्ये त्याची अत्यंत डिटेलवार माहिती आहे.

http://arxiv.org/ftp/arxiv/papers/1502/1502.06300.pdf

चाणक्य's picture

16 Feb 2016 - 5:31 pm | चाणक्य

उत्तम विवेचन. समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Feb 2016 - 7:03 pm | बिपिन कार्यकर्ते

राजेश, लायगो तयार करताना बराच खर्च केला गेला असणार. आणि आता गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्धही झाले आहे. म्हणजे, लायगोचे काम संपले का? गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करणे इतकीच त्याची इतिकर्तव्यता होती का? की त्याद्वारे अजूनही काही महत्त्वाचे संशोधन होऊ शकते? (अंदाजापेक्षा फारच लवकर मासा गळाला लागला असे म्हणले आहेस म्हणून विचारतोय.)

दुसरे असे की, लायगोची इतिकर्तव्यता संपली असेल, तर मग त्यातून मिळालेले संशोधन पुढे अजून कुठे कुठे कामास येईल? त्याद्वारे यापुढील वैज्ञानिक वाटचालीस नक्की काय व कसा फायदा होईल? (जेणेकरून त्यावर झालेला खर्च जस्टिफाय होईल?) शेवटच्या एक दोन ओळीत जे लिहिले आहेस त्याबद्दल तपशीलात सांगशील का? म्हणजे नवीन डोळे मिळाले हे तर नक्कीच उत्तम. आणि हे डोळे आजवर जे डोळे होते त्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारचे दृश्य पाहू शकतात हे ही समजले. पण त्यातून काय प्रकारची दृश्ये दिसतील / दिसू शकतील यावर काही लिहिशील का? (साक्षात विश्वाच्या उत्पत्तीचेच रहस्य उलगडण्याची खात्रीशीर शक्यता निर्माण झाली आहे असे म्हणले जात आहे.)

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 12:06 am | सतिश गावडे

प्रत्येक भागागणिक लेखमाला रोचक होत जात आहे. तुम्ही ज्या सहजतेने किचकट वैज्ञानिक गोष्टी समजावून सांगता ते वाखाणण्याजोगे आहे.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 5:50 pm | पिलीयन रायडर

ह्याच लेखाची वाट पहात होते. मला परत २-३ दा वाचावं लागणारे. जरा कच्चं आहे माझं फिजिक्स!

पण तरीही किमान गोष्टी तरी समजल्या. सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद!

वाट बघत असतो. प्रत्येक लेख वाचतो.अर्धंमुर्ध समजतं. जे समजतं त्याचा आनंद घेतो .पण वाचण्यापेक्षा दृकश्राव्य व्याख्यानमालेसारखे असते तर जास्त समजले असते असे वाटते. घासकडवी, विचार करा, टेड टॉक सारखी मालीका बनवा.मराठीत टेडटॉकची कमी आहेच. इकडे आलात तर काही " निवडक विश्वाचे आर्त " असा कार्यक्रम करू.

चौकटराजा's picture

18 Feb 2016 - 12:42 pm | चौकटराजा

इथल्या कुणाला रिलेटीव्हीटी समजून घ्ययची असेल तर डॉ वसंत चिपळोणकर य्यांचे "मानवी विकासातील क्रांत्या" हे पुस्तक जरूर वाचा . ते बुकगंगा मधे मिळणे शक्य आहे व किमत फक्त ५० रूपये आहे.माझ्या डोक्यावरून गेल्याने मी लेख लिहू शकत नाही. पण ते पुस्तक परत मिळवून मी नीट वाचायचा प्रयत्न करीनच बाकी राजेश साहेब आपले कार्य उत्तम चालले आहे. अवकाशाला चिमटा घेता येईल काय मला ?