विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
6 Feb 2016 - 8:13 am

1
.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट , भाग १२ - सामाजिक डार्विनवाद , भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' , भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती , भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी , भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख

आत्तापर्यंत आपण अनेक लेखांत जनुकांचा आणि डीएनएचा उल्लेख केला. नैसर्गिक निवडीतून प्राण्यांचे गुणधर्म निवडले जातात. या गुणधर्मांचे मूळ हे जनुकांत असते. ते डीएनएवर असतात. आणि प्रत्येक पिढीत आईवडिलांकडून मुलांकडे हे गुणधर्म पुढे जातात. इतपतच जुजबी माहिती आपण वापरली. जीएमओ (जनुकीय बदल केलेले जीव) पिके आणि प्राणी तयार करताना त्यांच्या मूळ जनुकांतच बदल केले जातात, हेही आपण पाहिले. पण या सर्व गोष्टी कशा होतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला डीएनए म्हणजे काय, आणि प्राण्याचे गुणधर्म कसे ठरतात याचा थोडा आढावा घ्यायला हवा.

आपण पाहिले की रेणूंपासून पेशींपर्यंत जाण्यासाठी मुळात असे काही स्वजनक रेणू आवश्यक होते, जे स्वतःची प्रतिकृती निर्माण करू शकतील. एकाचे दोन, दोनाचे चार अशा प्रतिकृती तयार झाल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली. प्रतिकृती काढण्याची प्रक्रिया अचूक नसल्याने त्यांच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स तयार झाल्या. या आद्य 'प्रजाती'. यांच्यात स्पर्धा निर्माण होऊन, उत्क्रांती होत होत ते रेणू अधिक क्लिष्ट झाले, आणि काहींभोवती कवच निर्माण झाले. या आद्य पेशी. या पेशींचे समुदाय होत होत, आणि विशिष्ट पेशींना विशिष्ट गुणधर्म प्राप्त होऊन त्या पेशींच्या गोळ्यांना आकार आले, अवयव निर्माण झाले. हीच प्रक्रिया पुढे चालत राहात अब्जावधी वर्षांनी आज दिसणारी प्राणीसृष्टी तयार झाली. अजूनही प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येक पेशीत हे स्वजनक शिल्लक आहेत. मूळचे रेणू कुठचे होते हे आपल्याला माहीत नाही, पण सध्याचा त्यांचा अवतार म्हणजे डीएनए. पेशीच्या गाभाऱ्यात बसून डीएनए स्वतःचे पुनरुत्पादन होण्यासाठी पेशीचे गुणधर्म ठरवतो, आणि त्याचबरोबर नवीन जीव जन्म घेताना आपली एक प्रतिकृती पुढे पाठवतो. सर्व जीवसृष्टीमध्ये समान गोष्ट असेल तर केवळ ही एकच - प्रत्येक जीव डीएनएमार्फत शरीर बनवतो आणि पुनरुत्पादन करतो.

डीएनएचा शब्दशः अर्थ डीऑक्सिरायबोज न्यूक्लेइक अॅसिड. हा एक प्रचंड लांबलचक रेणू असतो. दुपदरी मण्यांच्या हारासारखा. दोन रेषांमधले दोन मणी हे परस्परांना जोडलेले असतात. आता या हाराला पीळ दिला की कसा दिसेल, तसा तो दिसतो. हे मणी एका रंगाचे नसून चार रंगांचे असतात. या मण्यांच्या मांडणीतून जी रंगीत अक्षरे तयार होतात, त्यात सर्व सृष्टीच्या आकार, रूप, रंग, जडणघडणीची माहिती भरलेली असते. हे चार रंगांचे मणी म्हणजे चार लहानलहान रेणू असतात. त्यांच्या रासायनिक नावाच्या पहिल्या अक्षरानुसार A, C, G, T या अक्षरांनी ते ओळखले जातात. माळेला दोन पदर असले तरी ते दोन्ही एकमेकांना पूरक असतात. म्हणजे एका माळेत जर A असेल तर त्याच्या शेजारी दुसऱ्या माळेत कायम T असतो. आणि एका माळेत G असेल तर त्याच्या शेजारी नेहेमी C येतो. त्यामुळे एका पदरात जी माहिती असते तीच दुसऱ्या पदरातही असते.

या अक्षरांमध्ये नक्की कसली माहिती असते? आणि त्यातून मनुष्याचे शरीर बनण्याची कृती कशी मिळते? या प्रश्नांचे उत्तर थोडक्यात असे देता येईल - प्रत्येक पेशी ही एक अत्यंत क्लिष्ट रासायनिक फॅक्टरी असते. त्यात वेगवेगळे रासायनिक घटक आत येतात, आणि त्यांवर प्रक्रिया करून वेगवेगळी प्रथिने बनवली जातात. या रासायनिक अभिक्रिया करणारी यंत्रे ही विशिष्ट प्रथिने आणि एंझाइम्स असतात. ही प्रथिने बनवण्याची कृती डीएनएमध्ये साठवलेली असते. डीएनए केंद्रकाच्या गाभाऱ्यात बसलेला असतो. तिथे हे रसायनांच्या उत्पादनाचे काम होत नाही. लायब्ररीत ठेवलेल्या पुस्तकासारखा तो आत असतो. काही विशिष्ट रासायनिक यंत्रे त्याची प्रतिकृती काढण्याचे काम करतात. हे रेणू प्रथम पॅंटची झिपर वेगळी करावी तसा डीएनएचे दोन पदर विलग करतात. मग दुसरा एक कॉपीअर रेणू त्या लांबलचक साखळीच्या टोकावर 'बसतो' आणि ही अक्षरे 'वाचत' पुढे सरकतो. जसजशी ती अक्षरे वाचली जातात, तसतशी त्याची कॉपी असलेली रेणूंची साखळी या कॉपीअर रेणूतून बाहेर पडत जाते. बसतो, वाचतो हे शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत लिहिलेले आहेत. कारण त्या काहीशे अणूंनी बनलेल्या रेणूत काही जाणण्याची क्षमता नसते. जे काही घडते ते निव्वळ रासायनिक अभिक्रियांमधून. अमुक प्रकारचा रेणू या कॉपीअर रेणूच्या विशिष्ट ठिकाणी असला की आसपास असलेल्या रेणूंतून तोच रेणू या कॉपीअरला चिकटतो आणि त्या वाढत असलेल्या चेनमध्ये जोडला जातो, आणि कॉपीअर एक पाऊल पुढे सरकतो. आणि ही निव्वळ प्रतिकृती बनवण्याची क्रिया झाली. म्हणजे लायब्ररीतून पुस्तकाच्या विशिष्ट परिच्छेदाची कॉपी करावी आणि ती बाहेर घेऊन जाऊन त्याप्रमाणे कृती करावी, तशी ही प्रक्रिया असते.

ही कॉपी लायब्ररीच्या, म्हणजे पेशीकेंद्रकाच्या बाहेर जाते. तिथे वेगळी रासायनिक यंत्रे असतात. ती या बाहेर आलेल्या कॉपीच्या टोकावर बसतात आणि त्यातले शब्द वाचायला लागतात. या A, C, T, G अक्षरांचे तीन अक्षरी शब्द बनतात. प्रत्येक शब्दाने एक विशिष्ट प्रकारचे अमिनो अॅसिड बनते. ते यंत्र पुढे सरकते - आणि पुढच्या शब्दापासून पुढचे अमिनो अॅसिड बनते, आणि ते आधीच्या अमिनो अॅसिडला जोडले जाते. या तीन अक्षरी शब्दांतले काही शब्द हे पूर्णविरामासारखे असतात. ते शब्द आले की ही प्रक्रिया थांबते आणि तयार झालेला रेणू मुक्त होतो. हे मुक्त झालेले रेणू - प्रथिने - आपल्या शरीरात वेगवेगळी कामे करतात. उदाहरणार्थ आपल्या शरीरात असलेले हिमोग्लोबिन हे एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन आहे. त्याचे कार्य म्हणजे फुप्फुसांत तयार झालेले ऑक्सिजनचे रेणू स्वीकारणे, आणि शरीरातल्या पेशींना तो देणे. हिमोग्लोबिन तयार करण्याची 'पाककृती' वेगवेगळ्या जनुकांमध्ये असते. त्यातून तयार झालेली प्रथिने एकमेकांशी जोडली जातात आणि हिमोग्लोबिन तयार होते.

यापलिकडे जाऊन प्रत्येक पेशीत कुठचे रेणू तयार होतील हे डीएनएद्वारे ठरवले जाते. काही पेशींमध्ये डिएनएचे काही भाग अकार्यक्षम म्हणून नोंदले जातात. हे गर्भाची वाढ होताना होते. तिथे ती प्रथिने तयार होत नाहीत. यातून कुठची पेशी कुठच्या प्रकारची होईल हे ठरते. शरीराचे अवयव अशा पद्धतीने बनतात. कुठचे रेणू, कुठची प्रथिने तयार होतात, यावरून त्या त्या अवयवाचे गुणधर्म ठरतात. आणि त्या अवयवांवरून त्या प्रजातीचे गुणधर्म ठरतात. स्नायूंची शक्ती किती असावी, दात जाडे असावेत की धारदार टोकेरी असावेत या गोष्टी ठरतात. म्हणजे पेशींचे गुणधर्म, पेशीसमुहाचे गुणधर्म हे डीएनएद्वारे ठरतात.

डीएनएला जरी पुस्तकाची उपमा दिली असली तरी तो एखाद्या सामान्य पुस्तकासारखा नाही. कारण पुस्तकामध्ये माहिती असली तरी ती वाचकावर अवलंबून असते. ती क्रियाहीन असते. डीएनए रेणूची क्षमता अशी असते की आसपासच्या सामान्य रेणूंतून वाचक निर्माण होतात. ते वाचक हे पुस्तक वाचून इतर अधिक क्लिष्ट वाचक निर्माण करतात. त्यांपासून नवीन रेणू तयार होतात ज्यांमध्ये आपल्या भवतालाच्या परिस्थितीचे - पेशीचे - गुणधर्म ठरवण्याची क्षमता असते. या पेशीसमूहाचे गुणधर्म काय आहेत, ते पेशीसमूह कुठे कुठे आणि कसे कसे पसरले आहेत यावरून आख्ख्या शरीराचे गुणधर्म ठरतात. आणि हे शरीर इतर शरीरांशी जगण्यासाठी झुंजते, मैत्री करते, अन्न शोधते, आणि अंतिमतः इतर शरीरांबरोबर मिळून नवीन शरीरे तयार करते. हे चक्र पिढ्यानपिढ्या चालू राहाते, उत्क्रांतीच्या झगड्यातून त्यातल्या तत्कालीन योग्य त्या गुणधर्मांचा समुच्चय म्हणून आपण आपले शरीर घेऊन वावरतो. त्याचप्रमाणे इतर अब्जावधी प्रजातींमधले लाखो अब्ज प्राणी जगतात.

कुठल्यातरी देवाने आपोआप हे सगळे तयार केले असे मानण्यापेक्षा हे सत्य डोळे दिपवून टाकणारे आहे. दुर्दैवाने अजूनही बहुतांश मानवजात या तेजस्वी प्रकाशापासून दूर आहे. अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना अजूनही कचकड्यांच्या प्रकाशाने दिपून जायला होते.

तमसो मा ज्योतिर्गमय.

(मीमराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

6 Feb 2016 - 10:15 am | अर्धवटराव

खरच डोळे दिपवुन टाकणारा व्यवहार आहे हा...

डीएनए रेणूची क्षमता अशी असते की आसपासच्या सामान्य रेणूंतून वाचक निर्माण होतात. ते वाचक हे पुस्तक वाचून इतर अधिक क्लिष्ट वाचक निर्माण करतात. त्यांपासून नवीन रेणू तयार होतात ज्यांमध्ये आपल्या भवतालाच्या परिस्थितीचे - पेशीचे - गुणधर्म ठरवण्याची क्षमता असते.

हे थोडंफार अ‍ॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग झालं... पण माणसाला बाय डिफॉल्ट अ‍ॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींगची वृत्ती नसते... डीएनए आपली फंडामेंटल वृत्ती कॅरी फॉर्वर्ड करत नाहि ?? (अर्थात, हि फारच जास्त अपेक्षा झाली)

राजेश घासकडवी's picture

6 Feb 2016 - 6:43 pm | राजेश घासकडवी

प्राण्याच्या शरीरात पेशी असतात - पेशींचे गुणधर्म डीएनएद्वारे ठरवले जातात. प्रत्येक पेशी इतर पेशींना जोडलेली असते, या जोडणीतून त्या अवयवाचं कार्य ठरतं. आणि या सर्व अवयवांचा समुच्चय म्हणून त्या प्राण्याचे गुणधर्म ठरतात. या सर्व वरवर जाणाऱ्या पातळ्या आहेत. कुठचीही क्लिष्ट वस्तू अशाच वेगवेगळ्या पातळ्यांनी बनलेली असते. मात्र त्यातला सर्वात लहान कार्यकारी घटक (फंक्शनल युनिट) अतिशय सोपा असू शकतो. त्याचे गुणधर्म आणि वरच्या पातळ्यांचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे असू शकतात.

एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मेंदूची रचना न्यूरॉन्सनी झालेली असते. एक विशिष्ट न्यूरॉन घेतला तर त्याला इनपुट आणि आउटपुट असतं. इनपुट विशिष्ट पातळीला गेलं की आउटपुट बाहेर येतं. बस्स. इतकी साधी निर्णयप्रक्रिया असते. पण त्यातून आपल्याला दिसणारं मेंदूचं थक्क करून सोडणारं वर्तन दिसतं. प्रत्येक माणसातल्या न्यूरॉन्सची कार्यपद्धती सारखीच - एक प्रकारे यांत्रिक - असली तरी एकाच घटनेला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. त्यामुळे तळागाळातली युनिट्स काय आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत हे वरच्या पातळीवर दिसणाऱ्या सिस्टिमला लागू पडेलच असं नाही.

ग्योडेल एश्चर बाख या पुस्तकात मुंग्यांच्या हालचालींतून वारुळाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होतं अशी कल्पना करून हे खूप छान रीतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यातून तो होलिझम आणि रिडक्शनिझमवर उत्तम भाष्य करतो.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 10:50 am | सतिश गावडे

छान लिहिलं आहे.

मॅट रीडलेने आपल्या जिनोम या पुस्तकात हा विषय अतिशय सविस्तर आणि सोप्या भाषेत मांडला आहे.

कुठल्यातरी देवाने आपोआप हे सगळे तयार केले असे मानण्यापेक्षा हे सत्य डोळे दिपवून टाकणारे आहे. दुर्दैवाने अजूनही बहुतांश मानवजात या तेजस्वी प्रकाशापासून दूर आहे. अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना अजूनही कचकड्यांच्या प्रकाशाने दिपून जायला होते.

परफेक्ट. विज्ञानी हटवादी प्रचारकी प्रसारकी यांपैकी काहीही नसलेलं हे विधान.. आवडलं.

तुषार काळभोर's picture

6 Feb 2016 - 11:06 am | तुषार काळभोर

(तुमचं लेखन नव्हे) ही प्रक्रिया.

एका प्रक्रियेतून रेणू बनतात, दुसरी प्रक्रिया त्या रेणूंना जोडून अमिनो आम्ले बनवते. पुढची प्रक्रिया त्या अमिनो आम्लांना जोडून प्रथिने बनवते. आणखी एक प्रोसेस त्या हिमोग्लोबिनला त्यांचं काम करायला लावते.

एस's picture

6 Feb 2016 - 2:38 pm | एस

सुंदर लिहिलेय!

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2016 - 6:53 pm | मराठी कथालेखक

राजेशजी
या मालिकेत अजून लेख टाकणार आहात का ?
डीएनए वा जीन्स मध्ये बदल घडवून काय काय साध्य केले जावू शकते याबद्दल उत्कंठा आहे.

राजेश घासकडवी's picture

11 Feb 2016 - 8:01 am | राजेश घासकडवी

या मालिकेत अजून अनेक लेख येणार आहेत. मात्र प्रत्येक लेख हा स्वतंत्र निबंध असल्यामुळे नक्की काय काय कव्हर करता येईल, आणि ते नेमक्या कुठच्या क्रमाने येईल हे सांगता येणार नाही. पुढच्या काही लेखांमध्ये उत्क्रांतीच्या पुराव्यांबद्दल माहिती येईल. त्यासाठी कार्बन डेटिंग, भूस्तरीय अवशेष, आणि प्रयोगशाळेत दिसून आलेली उत्क्रांती यावरची चर्चा करणार आहे.

मराठी कथालेखक's picture

12 Feb 2016 - 2:49 pm | मराठी कथालेखक

या मालिकेत अजून अनेक लेख येणार आहेत.

तोपर्यंत पत्र, आयडी -डूआयडी, पॉपकॉर्न झेलावे लागेल

पॉइंट ब्लँक's picture

11 Feb 2016 - 4:36 pm | पॉइंट ब्लँक

डिनए, जीन्स किंवा जीन्सचे परिणाम बदलण्याच्या काही टेकनि़क्स
https://en.wikipedia.org/wiki/CRISPR
https://en.wikipedia.org/wiki/Recombinant_DNA
https://en.wikipedia.org/wiki/Small_interfering_RNA
ह्या तीनही अजून पुर्णत: यशस्वी झालेल्या नाहीत.

चौकटराजा's picture

12 Feb 2016 - 9:58 am | चौकटराजा

मी मेलो की जर का चित्रगुप्ताने मला प्रश्न विचारला की मी मला तिथे पृथ्वीवर काय सर्वात विस्मयकारक आढळले तर माझे उत्तर असेल " सूक्क्ष्म पातळीवर डी एन ए ,व्यक्त पातळीवर पाणी व अव्यक्त पातळीवर मन " ! मिपावरच्या वादावादी लेखांवर आपले लेख अ‍ॅन्टीडोट ठरावेत." बॉडी अ‍ॅट वॉर" या पुस्तकात "मी" असा एक केमिकल मार्क त्यासोबत यकृत //स्वादुपिन्ड असा एक मार्क असा असतो असा उल्लेख आहे . त्यामुळे एका अवयवाची पेशी दुसरीकडे जाउच शकत नाही. अपवाद कॅन्सरची पेशी.

सुमीत भातखंडे's picture

12 Feb 2016 - 3:01 pm | सुमीत भातखंडे

मस्त झालाय हा भाग पण.
ही सगळी मालिकाच भारी आहे.

वेल एक्सप्लेनड.. मिपावरच्या धुरळ्यात हा लेख हरवला होता. आज मिळाला.