मोसाद - भाग ७

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 9:00 pm


.
मोसाद - भाग ६

मोसाद - भाग ७

२ जानेवारी १९६५, लाताकिया बंदर, सीरिया. सोविएत रशियामधून आलेलं एक जहाज किनाऱ्याला लागलं. या जहाजात के.जी.बी. ने विकसित केलेली नवीन यंत्रसामग्री होती. प्रामुख्याने रेडिओ संदेश ऐकणे आणि ते कुठून पाठवले जात आहेत, ते ट्रान्समीटर्स शोधून काढणे यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार होता. सीरियामध्ये सध्या वापरली जात असणारी यंत्रणा जुनाट आणि कुचकामी होती. तिच्या जागी ही नवीन यंत्रणा बसवायची सीरियन सैन्याची योजना होती.

७ जानेवारीला ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार होती आणि तिच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून त्या दिवशी सीरियन सैन्याने आपलं संपूर्ण संदेश प्रसारण चोवीस तासांसाठी बंद ठेवलं होतं. पण त्याच वेळी एका अधिकाऱ्याला एक अगदी क्षीण पण जाणवण्याएवढा असा रेडिओ संदेश मिळाला. अगदी अशाच स्वरूपाचे आणि याच फ्रीक्वेन्सीवरचे संदेश याआधीही नोंदवले गेले होते पण त्यावेळी इतर रेडिओ संदेशांच्या गोंधळात ते पकडणं आणि त्यावरून ते पाठवले जात असल्याचं ठिकाण शोधून काढणं हे अशक्य होतं. पण आता अजिबात एकही संदेश पाठवला जात नसल्यामुळे हा संदेश पकडला गेला होता. त्याने ताबडतोब फोन करून ही बातमी सीरियाच्या गुप्तचर संघटनेला दिली. त्यांना हा संदेश कुठून आला, हे जेव्हा समजलं तेव्हा ते हादरले. सीरियन सैन्याच्या राजधानी दमास्कसमधल्या एका तळाच्या अगदी जवळ असलेल्या एका इमारतीमधून हा संदेश पाठवण्यात आला होता आणि सीरियन तंत्रज्ञांनी त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असा निष्कर्ष काढला होता. तिथे राहणाऱ्या माणसाचं नाव होतं कमाल अमीन साबेत.

साबेत दमास्कसमधल्या अतिश्रीमंत आणि अतिमहत्वाच्या लोकांपैकी एक होता. साक्षात राष्ट्राध्यक्ष हाफेझचा जवळचा मित्र. तो राष्ट्राध्यक्षांच्या पुढच्या मंत्रिमंडळात असणार आहे अशीही कुणकुण होती. दर महिन्यात किमान एकदा तरी त्याने दिलेल्या मेजवान्यांच्या बातम्या सीरियन वृत्तपत्रांमध्ये येत असत. बाकी त्याचे या न त्या महत्वाच्या नेत्यांबरोबर फोटो जवळजवळ दररोज असायचेच. त्याने दिलेल्या मेजवान्यांना दमास्कस आणि उर्वरित सीरियामधले सर्व उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित लोक अगदी आवर्जून हजेरी लावत असत. दारू, खाद्यपदार्थ, बायका यांची अगदी रेलचेल असे. त्या साबेतच्या घरातून हा संदेश आलाय?

“काहीतरी चूक आहे,” सीरियन मुखबारत(गुप्तचर संघटना)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. साबेत, ज्याचे सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी एवढे जवळचे संबंध आहेत, त्याच्याशी वैर ओढवून घेण्याची कोणाचीही तयारी नव्हती. पण त्या दिवशी संध्याकाळी तसाच संदेश पाठवला गेला. आता मात्र काहीतरी गडबड असल्याची मुखबारतच्या अधिकाऱ्यांची खात्री पटली होती. त्यांनी हे प्रकरण सरळ मुखबारतच्या प्रमुखाकडे – जनरल नदीम अल तायाराकडे नेलं.
अल तायाराने त्यांना साबेतच्या पत्त्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या दिवशी – १० जानेवारी १९६५ रोजी सकाळी ८ वाजता दमास्कसच्या अबू रामेन भागातल्या या फ्लॅटमध्ये मुखबारतचे चार अधिकारी घुसले. दरवाज्याची कडी किंवा बेल न वाजवता त्यांनी दरवाजा उखडला आणि ते आत शिरले आणि सरळ बेडरूमच्या दिशेने गेले. साबेत झोपला असेल अशी त्यांची कल्पना होती, पण तो जागा होता, एवढंच नव्हे, तर संदेश पाठवत होता. त्याला त्यांनी रंगेहाथ पकडला होता. त्यांना पाहिल्यावर तो उभा राहिला आणि त्याने हात वर केले. त्यांनी त्याला बेड्या घातल्या आणि ते त्याला मुखबारत हेडक्वार्टर्समध्ये घेऊन गेले.

साऱ्या दमास्कसमध्ये ही बातमी एखाद्या वणव्यासारखी पसरली. कमाल अमीन साबेत आणि शत्रूचा हेर? राष्ट्राध्यक्षांचा खास मित्र आणि पुढच्या मंत्रीमंडळात ज्याचा समावेश होणार होता, असा माणूस? पण साबेतच्या घराची झडती घेतल्यावर सापडलेले गुप्त ट्रान्समीटर्स, घरातच लपवलेल्या मायक्रोफिल्म्स आणि शत्रूच्या हातात जिवंतपणे न सापडता आयुष्य संपवण्यासाठी असलेल्या सायनाईडच्या गोळ्या यांनी साबेतच्या हेर असण्यावर शिक्कामोर्तब केलं.
सीरियन नागरिकांमध्ये तो कोण आहे आणि सीरियाच्या नक्की कुठल्या शत्रूकडून आलेला आहे याबद्दल चर्चा आणि पैजांना एकच उधाण आलं होतं. काही जणांचा संशय इराकवर होता, काहींचा इराण किंवा मग इजिप्तवर. पण २४ जानेवारी १९६५ या दिवशी, दोन आठवडे कमाल अमीन साबेतची कसून ‘ चौकशी ’ केल्यावर आणि त्याचे अनन्वित हाल केल्यावर सीरियन सरकारने त्याची खरी ओळख जाहीर केली आणि पुन्हा एकदा सीरियन जनतेला आणि साबेतचं आदरातिथ्य उपभोगलेल्या लोकांना जबरदस्त हादरा बसला. कमाल अमीन साबेत हा अरब नसून ज्यू होता आणि चक्क इझराईलचा हेर होता. त्याचं खरं नाव होतं एली कोहेन.

१६ डिसेंबर १९२४ या दिवशी अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे जन्म झालेल्या एलियाहू उर्फ एली कोहेनबद्दल जगभरातल्या इतिहासकारांचं आणि हेरगिरी तज्ञांचं एकच मत आहे – मोसादच्या, किंबहुना जगातल्या सर्वश्रेष्ठ हेरांपैकी एक.

----------------------------------------------------------------------------------------

लहानपणापासूनच एली हुशार आणि धाडसी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची स्मरणशक्ती अफाट होती. ज्यूंचा धर्मग्रंथ असलेल्या ताल्मूदमधली सर्व वचने तो वयाच्या दहाव्या वर्षीच घडाघडा म्हणून दाखवू शकत असे. इजिप्तमध्ये ज्यूंचा छळ होणं ही अगदी नैमित्तिक बाब होती. त्यामुळे ज्यू क्रांतिकारक संघटनासुद्धा उदयाला आल्या होत्या. या संघटनांना पॅलेस्टाईनमध्ये कार्यरत असलेल्या झिओनिस्ट चळवळीचा पाठिंबाही होता. एली अशाच एका क्रांतिकारक संघटनेसाठी काम करत होता. पण त्याचं काम वेगळ्या स्वरूपाचं होतं. १९४८ मध्ये इझराईलची निर्मिती झाल्यावर ज्यूंना स्वतःची मातृभूमी मिळाली होती. पण त्याचबरोबर इजिप्त इझराईलचा प्रच्छन्न शत्रू असल्यामुळे आणि इझराईलच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या युद्धात इजिप्तला पराभव स्वीकारावा लागला असल्यामुळे तिथे ज्यूंचा छळ अजूनच वाढला होता. या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग इजिप्तमधल्या ज्यूंसाठी होता – इझराईलला निघून जाणं. अशा ज्यूंना गुप्तपणे इजिप्तच्या बाहेर काढून इझराईलपर्यंत पोचवणं हे काम एली करायचा. त्याच अनुषंगाने १९५४ मध्ये एका धाडसी कटामध्ये त्याने भाग घेतला.

१९५४ मध्ये इझरेली नेत्यांना ब्रिटीश सरकारने ब्रिटीश सैन्य इजिप्तमधून पूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं होतं. त्याआधीच इजिप्तमध्ये राज्यक्रांती होऊन राजेशाही उलथली गेली होती आणि गमाल अब्दुल नासरच्या नेतृत्वाखाली लष्करी हुकूमशाही सुरु झालेली होती. सर्व अरब देशांमध्ये लष्करीदृष्ट्या इजिप्तच बलाढ्य होता आणि नासर इझराईलचा कट्टर शत्रू होता. त्याच्या मनात आलं असतं तर त्याने कधीच इझराईलवर हल्ला केला असता, पण ब्रिटीश सैन्य देशात असल्यामुळे आणि या सैन्याचे अनेक तळ सुएझ कालव्याच्या बाजूने असल्यामुळे नासरला असं काही करता येत नव्हतं. पण जर ब्रिटनने सैन्य काढून घेतलं, तर नासरला इझराईलवर हल्ला करण्यापासून थांबवणारं कोणीही नव्हतं. शिवाय ब्रिटीश सैन्य निघून गेल्यावर त्यांची आधुनिक युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रं यांचा बऱ्यापैकी मोठा साठा इजिप्तकडे आला असता आणि १९४८ च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इजिप्तचं सैन्य इझराईलच्या दिशेने झेपावलं असतं यात शंका नव्हती.

त्यामुळे इझराईलच्या नेत्यांच्या मनात एकच विचार होता – काहीही करून ब्रिटिशांना त्यांचा निर्णय बदलायला, निदान काही वर्षे पुढे ढकलायला भाग पाडायचं. नेमकं त्यावेळी डेव्हिड बेन गुरियन इझराईलचे पंतप्रधान नव्हते. त्यांनी राजकारणातून काही काळ निवृत्ती घेतली होती. त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचे पण त्यांच्याएवढे प्रभावी नसलेले मोशे शॅरेट हे पंतप्रधान होते. त्यांचा त्यांच्या मंत्र्यांवरचा प्रभाव हा असून नसल्यासारखा होता. संरक्षण मंत्री पिन्हास लाव्होन उघडपणे पंतप्रधानांच्या अधिकारांना आव्हान देत असे. ब्रिटिशांना इजिप्तमधून सैन्य काढून घ्यायचा निर्णय बदलायला भाग पाडायचं हा विचार लाव्होनचाच होता. त्याने आणि त्यावेळी लष्करी गुप्तचर संघटना अमानचा प्रमुख असलेल्या कर्नल बेन्जामिन गिबलीने एक धाडसी पण तितकीच आततायी आणि धोकादायक योजना बनवली. या योजनेबद्दल ना पंतप्रधानांना माहित होतं ना मोसादला.

गिबली आणि लाव्होन या दोघांनाही ब्रिटन आणि इजिप्त यांच्यामधल्या करारामध्ये एक मुद्दा सापडला होता. त्याच्यानुसार जर इजिप्तमध्ये अत्यंत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर ब्रिटीश सरकार सैन्य काढून घेणार नव्हतं. गिबली आणि लिव्होन यांनी कोणालाही विश्वासात न घेता असं ठरवलं की जर इजिप्तमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले तर ब्रिटीश सरकार असा निष्कर्ष काढेल की इजिप्तच्या नेत्यांचं परिस्थितीवर नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे ते आपला विचार बदलतील. हे बॉम्बस्फोट इजिप्तच्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये करायचे हेही ठरलं. कैरो आणि अलेक्झांड्रिया ही दोन शहरं त्यासाठी निवडली गेली आणि हे स्फोट ब्रिटीश आणि अमेरिकन सांस्कृतिक केंद्रं, चित्रपटगृहं, पोस्ट ऑफिसेस आणि इतर सरकारी इमारतींच्या जवळ करावेत असंही ठरलं. इजिप्तमध्ये असलेल्या अमानच्या गुप्तचरांनी त्यासाठी अनेक स्थानिक ज्यूंची मदत घेतली. हे ज्यू कट्टर झिओनिस्ट होते आणि इझराईलसाठी आपले प्राणही देण्याची त्यांची तयारी होती. पण असं करून अमानने इझरेली गुप्तचर संघटनांचा एक अत्यंत महत्वाचा नियम मोडला होता, तो म्हणजे कधीही स्थानिक ज्यूंना घातपाताच्या कामात सहभागी करून घ्यायचं नाही. जर तिथल्या सरकारला अशा कटाचा सुगावा लागला तर संपूर्ण ज्यू समाजाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. शिवाय या कामासाठी निवडलेल्या लोकांनी असल्या गोष्टींचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांनी बनवलेले बॉम्बही अत्यंत साधे आणि जास्त जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी करणारे नव्हते.

सुरुवातीपासूनच ही योजना अत्यंत कमकुवत होती. २३ जुलै १९५४ या दिवशी फिलीप नॅथन्सन नावाच्या एका झिओनिस्ट कार्यकर्त्याच्या खिशात असलेल्या बॉम्बचा अलेक्झांड्रियाच्या एका चित्रपटगृहाच्या दरवाज्यात स्फोट झाला. फिलीपला पोलिसांनी अटक केली आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नेटवर्कमधल्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात एली कोहेनचाही समावेश होता. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना काहीही सापडलं नाही. त्याला पुराव्याअभावी सोडून देण्यात आलं, पण इजिप्शियन पोलिसांनी त्याच्या नावाने एक फाईल उघडली आणि त्यात एलीबद्दल त्यांना असलेल्या माहितीची नोंद केली – एलियाहू शॉल कोहेन; जन्म १९२४ अलेक्झांड्रिया, इजिप्त; वडील शॉल कोहेन, आई सोफी कोहेन; २ भाऊ आणि ५ बहिणी. हे बाकीचे नातेवाईक १९४९ मध्ये इजिप्तमधून बेपत्ता झाले आहेत. एली कोहेन हा कैरोमधल्या फ्रेंच कॉलेजचा पदवीधर असून किंग फारूक विद्यापीठ, कैरो, इथे विद्यार्थी आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब १९४९ मध्ये इझराईलला निघून गेलं होतं आणि तेल अवीवच्या बात याम या उपनगरात स्थायिक झालं होतं पण याबद्दल पोलिसांना काहीही माहित नव्हतं.

एकदा अटक होऊनसुद्धा एली इजिप्तमध्येच राहिला. त्याने इझराईलला निघून जायचा प्रयत्न केला नाही. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इजिप्तच्या सरकारने इझरेली हेरांच्या अटकेबद्दल जाहीर केलं आणि ७ डिसेंबर या दिवशी त्यांच्यावर खटला सुरु झाला. या हेरांपैकी मॅक्स बेनेट हा अमानचा अधिकारी होता. त्याने आत्महत्या केली आणि सरकारी पक्षाने बाकीच्या सर्वांना मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली. संपूर्ण जगभरातून इजिप्तच्या सरकारवर या लोकांना मृत्यूदंड न देण्याबाबत दबाव आणला गेला, पण कुठल्याही अर्जविनंत्यांचा काहीही परिणाम झाला नाही. १७ जानेवारी १९५५ या दिवशी न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला – दोघांना निर्दोष सोडण्यात आलं, दोघांना ७ वर्षांची सक्तमजुरी, दोघांना १५ वर्षांची शिक्षा, दोघांना जन्मठेप आणि कटाचे सूत्रधार असलेल्या डॉ.मोशे मार्झुक आणि श्मुएल अझार यांना फाशी. ४ दिवसांनी त्यांना कैरो तुरुंगाच्या आवारात सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात आली.

या सगळ्या प्रकरणाचे राजकीय पडसाद इझराईलमध्ये अत्यंत तीव्रपणे उमटले. गिबली आणि लाव्होन या दोघांचीही कारकीर्द संपुष्टात आली. पंतप्रधान शॅरेटनी लाव्होनच्या जागी निवृत्तीतून परत आलेल्या बेन गुरियनची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली. नंतर काही काळाने बेन गुरियन पुन्हा पंतप्रधान झाले.

श्मुएल अझार एलीचा मित्र होता. त्याचा एलीवर खूप प्रभाव होता. त्याचा असा मृत्यू झाल्यामुळे एलीच्या मनातही इजिप्त सोडून इझराईलला जायचे विचार यायला लागले पण तो लगेचच इझराईलला गेला नाही.

१९५६ च्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये इजिप्तच्या विरोधात झडलेल्या सुएझ संघर्षात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याबरोबर इझराईलचाही सहभाग होता. त्यामुळे नासरने १९५७ मध्ये अनेक ज्यूंना इजिप्तमधून हाकलून दिलं. त्यात एलीचाही समावेश होता. आता इझराईलला जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

इझराईलमध्ये आल्यावर एलीसाठी सर्वात पहिला प्रश्न होता कामाचा. पण त्याच्या भाषाप्रभुत्वामुळे तो लगेचच निकालात निघाला. त्याला अरेबिक, हिब्रू, इंग्लिश आणि फ्रेंच अशा चार भाषा अस्खलित रीत्या लिहिता, वाचता आणि बोलता येत होत्या त्यामुळे अमानसाठी काही मासिकं आणि नियतकालिकांचे अनुवाद करण्याचं काम त्याला लगेचच मिळालं. पण काही महिन्यांनंतर त्याची ही नोकरी सुटली. अमानसाठी काम केल्यामुळे आणि इजिप्तमध्ये क्रांतिकारक संघटनेत काम केल्यामुळे मोसादमध्ये जाण्याचे विचार एलीच्या मनात यायला लागले होते. त्याने मोसादमध्ये अर्ज केला, त्याला मुलाखतीसाठी बोलावणंसुद्धा आलं, पण मुलाखतीनंतर त्याला नाकारण्यात आलं.

मोसादच्या मानसशास्त्रतज्ञांनी एलीचं जे प्रोफाईल बनवलं होतं, त्यात ‘ या माणसाला साहस या गोष्टीची अत्यंत आवड आहे आणि निव्वळ त्याच्यासाठी तो वेळप्रसंगी जिवावरचा धोका पत्करू शकतो ’ असं म्हटलं होतं. असा माणूस मोसादला नको होता, त्यामुळे त्यांनी एलीला परत पाठवलं.

एलीला हा स्वतःचा मोठा अपमान वाटला. त्याच वेळी त्याला हमाशबीर नावाच्या एका डिपार्टमेंटल स्टोअर्स चेनमध्ये काम मिळालं. ही नोकरी हिशेब तपासनीसाची होती. अत्यंत कंटाळवाणं काम होतं, पण पगार चांगला होता, म्हणून एली तिथे काम करायला लागला. त्याच सुमारास त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राच्या बहिणीशी एलीची ओळख करून दिली. ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि तिचं नाव होतं नादिया मायकेल. तिचा भाऊ सामी मायकेल इझराईलमधल्या नामवंत कवी आणि लेखकांपैकी एक होता. नादिया आणि एली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी यथावकाश लग्न केलं.

इकडे मोसादने जरी एलीला परत पाठवलं असलं, तरी त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. त्याच्या आयुष्यातल्या घडामोडींची ते अगदी तपशीलवार नोंद करत होते. त्यावेळी अमानचा प्रमुख असलेला मायर अमित एका खास प्रकारच्या एजंटच्या शोधात होता. मोसादच्या फाईलमध्ये असा एजंट न मिळाल्यामुळे अमितने मोसादने नाकारलेल्या लोकांची फाईल बघायला सुरुवात केली आणि एलीचं नाव आणि त्याची पार्श्वभूमी कळल्यावर असा माणूस आपल्या कामाला येऊ शकेल याबद्दल त्याची खात्री पटली.

एलीला त्याच्या ऑफिसमध्ये झाल्मान नावाचा एक माणूस भेटायला आला. त्याने त्याला मोसादसाठी काम करायची ऑफर दिली. आपलं नुकतंच लग्न झालं असल्याचं सांगून एलीने त्याला परत पाठवलं. पण अमितला एली कुठल्याही प्रकारे हवा होता आणि लवकरच तशी संधी आली.

गरोदरपणामुळे नादियाला तिची नोकरी सोडावी लागली. हमाशबीरची मालकी एका फ्रेंच कंपनीकडे गेली. त्यांनी पुनर्रचनेच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्यात एलीचा समावेश होता.

झाल्मान एलीला परत भेटला आणि त्याने एलीला परत तीच ऑफर दिली. या वेळी एलीने नकार दिला नाही. प्रत्यक्ष काम करण्याआधी त्याला ६ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार होतं.

१९६० चं दशक सुरु होताना अनेक गोष्टी बदलल्या होत्या. इझराईलच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी इराक आणि इजिप्त हे दोन्हीही देश ज्यूविरोधात अग्रेसर होते. पण दोन्ही देशांमध्ये झालेल्या राज्यक्रांतीने परिस्थिती बदललेली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी राजवट होती आणि तिथल्या राष्ट्रप्रमुखांना आपल्या सैन्याच्या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळे ६० चं दशक सुरु होताना त्यांचा इझराईलविरोध थोडा कमी झाला होता. पण त्यांची जागा घ्यायला सीरिया पुढे आला होता. इझराईल आणि सीरिया यांच्या सरहद्दीवर असलेल्या गोलान टेकड्या हा इझराईलसाठी डोकेदुखीचा विषय होता. तिथे सीरियन तोफखान्याची अनेक ठाणी होती. त्यांच्यामधून खाली दरीत असलेल्या इझरेली शेतकऱ्यांवर तोफगोळ्यांचा भडीमार ही नित्याची गोष्ट होती. अनेक वेळा सीरियामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी इझराईलमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला होता. आणि आता सीरिया आणि इतर अरब देश इझराईलचं पाणी तोडण्याचा विचार करत होते.
इझराईलच्या मध्य आणि दक्षिण भागात नेगेव्हचं वाळवंट पसरलेलं आहे. या भागात पाऊस अतिशय कमी पडतो. १९५० च्या दशकाच्या शेवटी इझरेली इंजिनीअर्सनी जॉर्डन नदी, तिच्या उपनद्या आणि टायबेरिअस सरोवर (ज्याला गॅलिलीचा समुद्र असंही नाव आहे आणि समुद्र म्हटलं तरी ते प्रत्यक्षात गोड्या पाण्याचं सरोवर आहे) यांचं पाणी अनेक कालवे आणि पाईपलाईन्स यांच्यामार्फत नेगेव्हमध्ये खेळवलं आणि तिकडे शेतीची सुरुवात केली. यासाठी इझराईलने वापरलेलं पाणी हे जॉर्डन नदीच्या इझराईलमधून वाहणाऱ्या प्रवाहामधून आणि तिच्या इझराईलमधल्या उपनद्यांमधून वळवलं होतं. पण अरब राष्ट्रांनी त्याविरुद्ध आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्यात झालेल्या बैठकींमध्ये इझराईल वापरत असलेलं पाणी इझराईलला मिळू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि ही कामगिरी सीरियाने स्वतःकडे घेतली. हा सीरियन प्रकल्प अर्थातच अत्यंत गुप्तपणे चालणार होता आणि त्याचसाठी मोसादला सीरियामध्ये कोणीतरी ‘ आपला माणूस ’ हवा होता. पहिल्यांदा सीरियन सरकारमधल्या कुणालातरी फोडण्याची योजना आखण्यात आली. पण तिची अव्यव्हार्यता लक्षात आल्यावर मोसादकडे एकच पर्याय उरला होता – आपला कोणीतरी माणूस तिकडे पाठवायचा. तो ज्यू आहे असा संशयही कुणाला येता कामा नये. आणि एली कोहेन असा माणूस आहे, असं मोसादमधल्या लोकांचं मत पडलं. ज्या कारणांमुळे त्याला त्यांनी आधी नाकारलं होतं, त्याच कारणांमुळे एलीला आता मोसादमध्ये प्रवेश मिळाला होता.

एलीला तो काय करतोय आणि पुढे काय होणार आहे, याबद्दल कोणालाही, अगदी त्याच्या पत्नीलाही सांगायची मनाई करण्यात आली होती. त्यामुळे दररोज सकाळी एली काहीतरी थाप मारून किंवा बहाणा करून घरातून निघत असे आणि सरळ अमान – मोसाद यांच्या संयुक्त प्रशिक्षण केंद्रात येत असे. सुरुवातीचे काही दिवस त्याला फक्त एकच काम होतं – स्मरणशक्ती वाढवणं. त्याची स्मरणशक्ती उपजतच जबरदस्त होती, पण ती आता वेगळ्या कामासाठी वापरली जाणार होती.

त्याचा प्रशिक्षक दररोज त्याच्यासमोर वेगवेगळ्या वस्तू टाकत असे आणि अगदी अर्ध्या मिनिटाच्या किंवा काही सेकंदांच्या निरीक्षणानंतर त्याला त्या वस्तू लक्षात ठेवून लिहायला सांगत असे. कधीकधी एक-दोन आठवड्यांपूर्वी दाखवलेल्या वस्तूंबद्दलही हा प्रशिक्षक, ज्याचं नाव यित्झाक होतं, तो एलीला विचारत असे.

कधीकधी यित्झाक एलीला बाहेर रस्त्यावर घेऊन जाई आणि आपला पाठलाग होतोय का हे कसं ओळखायचं, त्यांना झुकांडी कशी द्यायची, अजिबात लक्षात न येऊ देता एखाद्याचा पाठलाग कसा करायचा याचंही प्रशिक्षण होत असे.
अजून एका प्रशिक्षकाने एलीला ट्रान्समीटर कसा वापरायचा त्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर एक महिना त्याचं शारीरिक आणि मानसिक परीक्षण झालं. एली सगळ्या चाचण्या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला होता. नंतर त्याला एक वेगळाच पासपोर्ट देऊन जेरुसलेमला जायला सांगण्यात आलं. तिथे त्याला १० दिवस राहायचं होतं आणि फक्त फ्रेंच आणि अरेबिक या दोनच भाषांमध्ये संभाषण करायचं होतं.

एली जेरुसलेमला असतानाच त्याच्या मुलीचा, सोफीचा जन्म झाला. तो त्याच्या भूमिकेत इतका खोलवर शिरला होता, की जेव्हा त्याला मोसादच्या लोकांनी त्याच्या मुलीच्या जन्माची बातमी सांगितली, तेव्हा त्याने प्रतिक्रिया अरेबिकमध्ये दिली.

तिथून परत आल्यावर एका ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अरब धर्मगुरूने एलीला कुराण, प्रार्थना आणि अरब रीतिरिवाज शिकवले. हे करताना एलीच्या चुका होत होत्या. पण त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला काळजी न करण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या मते एलीची जी कव्हर स्टोरी होती, त्यानुसार तो पाश्चात्य देशांमध्ये राहिलेला अरब होता, त्यामुळे त्याच्या हातून चुका होणं स्वाभाविक होतं.

आता खऱ्या कामगिरीची ओळख करून घेण्याची वेळ आली होती. एलीला एका तटस्थ देशात पाठवून मग तिथून या अरब देशात जायचं होतं. जेव्हा एलीने त्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला सांगण्यात आलं – सीरिया किंवा इराक.
त्याचबरोबर त्यांनी त्याला एक नवीन नाव आणि एक नवीन कव्हर स्टोरी, ज्याला हेरगिरीच्या परिभाषेत ‘legend’ असं म्हणतात, ती दिली.

“तुझं नाव कमाल बिन अमीन साबेत. तुझ्या वडिलांचं नाव अमीन बिन खुर्रम साबेत. आईचं नाव सईदा इब्राहीम. तुला एक बहीणसुद्धा होती. तुझा जन्म बैरुट, लेबेनॉन इथे झालेला आहे. तू ३ वर्षांचा असताना तुझ्या आईवडिलांनी लेबेनॉन देश सोडला आणि ते इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया इथे स्थायिक झाले. पण हे विसरू नकोस, की तुझं कुटुंब मूळचं सीरियामधलं आहे. इजिप्तमध्ये गेल्यानंतर एका वर्षाच्या आत तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला. तुझ्या वडिलांचा कापडाचा व्यापार होता. १९४६ मध्ये तुझ्या काकांनी अर्जेन्टिनामध्ये स्थलांतर केलं आणि त्यानंतर काही काळातच त्यांनी तुझ्या वडिलांना तिथे बोलावलं. १९४७ मध्ये तुम्ही सगळे अर्जेन्टिनाला गेलात. तुझे वडील आणि काका यांनी तिसऱ्या एका माणसाला भागीदार म्हणून घेऊन एक दुकान चालू केलं, पण त्याचं दिवाळं काढावं लागलं. १९५६ मध्ये तुझ्या वडिलांचा आणि त्यानंतर ६ महिन्यांच्या आत तुझ्या आईचा मृत्यू झाला. तू तुझ्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काही काळ काम केलंस आणि नंतर स्वतःचा व्यवसाय चालू केलास आणि तो भरभराटीला आला.”

त्याचप्रमाणे त्यांनी एलीला त्याच्या घरच्यांना सांगण्यासाठीही एक दुसरी कव्हर स्टोरी दिली. एलीने नादियाला त्याला इझराईलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांसाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाल्याचं सांगितलं. या नोकरीसाठी त्याला भरपूर फिरावं लागणार होतं. इझरेली संरक्षण उत्पादनांसाठी सामग्री खरेदी करणे आणि या उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणे अशी दोन्ही कामं आपल्याला करायची आहेत, असंही त्याने तिला सांगितलं.

फेब्रुवारी १९६१ मध्ये एलीची कामगिरी सुरु झाली. तो सर्वात पहिल्यांदा तेल अवीवहून झुरिकला गेला. तिथे त्याला भेटलेल्या एका माणसाने त्याला पुढच्या कामगिरीबद्दल सूचना दिल्या आणि त्याच्या हातात ब्युनोस आयर्सचं तिकिट ठेवलं. तिथे एली वेगळ्या पासपोर्टवर गेला.

ब्युनोस आयर्समध्ये एलीचं काम लगेच सुरु झालं नाही. एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एका शिक्षकाकडून स्पॅनिश भाषा शिकणं आणि दुसऱ्या शिक्षकाकडून सीरियन धाटणीने अरेबिक भाषा बोलायला शिकणं हीच कामं त्याला आता पुढचे दोन महिने करायची होती.

दोन महिन्यांनी पुढचा टप्पा सुरु झाला. त्या फ्लॅटमधून बाहेर पडताना एलीने ब्युनोस आयर्समध्ये राहणाऱ्या अरब माणसासारखा पेहराव केला होता आणि त्याच्याकडे आता सीरियन पासपोर्ट होता. त्याच्यावर नाव होतं - कमाल अमीन साबेत.

त्या फ्लॅटमधून बाहेर पडल्यावर एलीने सर्वप्रथम एक नवीन फ्लॅट भाड्याने घेतला, एक बँक अकाऊंट उघडला, आणि अरब, विशेषतः सीरियन अरब जिथे प्रामुख्याने असतील अशा रेस्तराँ आणि क्लब्जमध्ये जायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा मित्रपरिवार वाढायला लागला आणि काही काळातच या आयात-निर्यातीच्या व्यवसायात असणाऱ्या देखण्या अरब माणसाला ब्युनोस आयर्समधले बहुतांश अरब ओळखायला लागले. त्यांच्या अनेक संस्थांना साबेतने अगदी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होतं. तो अनेक देश फिरलेला होता आणि गोष्टीवेल्हाळ होता.
त्यामुळे त्याला अनेक क्लब्जमधून मेजवान्यांची आणि कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली.

एली उर्फ साबेतने याच्यापुढचा टप्पा सहजपणे पार केला. एका क्लबमध्ये त्याची ओळख अब्देल लतीफ हसन नावाच्या माणसाशी झाली. हसन अर्जेन्टिनामधल्या अरब लोकांसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘ अरब वर्ल्ड ’ नावाच्या नियतकालिकाचा संपादक होता. तो या हसतमुख आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या सीरियन ‘ व्यापाऱ्यामुळे ‘ खूपच प्रभावित झाला आणि दोघेही लवकरच घनिष्ठ मित्र बनले.

हसनच्या ओळखीने साबेतला सीरियन राजदूतावासातही प्रवेश मिळाला. अशाच एका राजनैतिक स्वरूपाच्या मेजवानीमध्ये हसनने साबेतची ओळख एका लष्करी अधिकाऱ्याशी करून दिली. या अधिकाऱ्याचं नाव होतं जनरल अमीन अल हाफेझ आणि तो सीरियन राजदूतावासातला लष्करी प्रतिनिधी (military attache) होता.

आता एलीच्या खऱ्याखुऱ्या कामगिरीला सुरुवात झाली. जुलै १९६१ मध्ये कमाल अमीन साबेत हसनला त्याच्या ऑफिसमध्ये भेटला आणि त्याने आपण अर्जेन्टिनामध्ये राहायला कंटाळलेलो असून आपली लवकरात लवकर सीरियाला परत जायची इच्छा आहे असं त्याने सांगितलं. हसन त्याबद्दल काही करू शकेल का आणि त्याच्यासाठी शिफारसपत्र देऊ शकेल का? असंही त्याने पुढे विचारलं. हसनला यात काहीही वावगं वाटलं नाही. कमाल अमीन साबेत हा एक अत्यंत देशभक्त सीरियन असून तो केवळ नाईलाज म्हणून ब्युनोस आयर्समध्ये राहतो आहे या कथेवर त्याचा पूर्ण विश्वास बसलेला होता. त्याने लगोलग एलीला चार शिफारसपत्रं दिली. त्यातलं एक त्याच्या दमास्कसमध्ये राहणाऱ्या मुलासाठी होतं. हसनप्रमाणेच इतर अरब मित्रांना भेटून एलीने त्यांच्याकडूनही अशीच शिफारसपत्रं मिळवली.

ऑगस्ट १९६१ च्या शेवटी कमाल अमीन साबेतने त्याच्या ब्युनोस आयर्समधल्या मित्रांचा निरोप घेतला आणि तो तिथून स्वित्झर्लंडला आणि तिथून म्युनिकला गेला. म्युनिकमध्ये त्याने वेषांतर केलं आणि एका वेगळ्याच इझरेली पासपोर्टवर तो इझराईलमध्ये आला. आता काही महिने तो घरच्यांबरोबर घालवणार होता.

पण मोसादने त्याच्या सुट्टीमध्येही त्याला कामाला लावलं होतं. आता यापुढचा टप्पा अत्यंत धोक्याचा होता. कुणाला जराजरी संशय आला असता, तरी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. त्यामुळे या सुट्टीमध्ये मोसादच्या प्रशिक्षकांनी एलीला सीरिया, तिथलं राजकारण, अंतर्गत परिस्थिती, जनमत याबद्दल अगदी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर त्याचा अरेबिक भाषेचा आणि रेडिओ संदेश पाठवण्याचा अभ्यासही चालूच होता. तासाला १२ ते १६ शब्दांचा संदेश प्रसारित करण्याइतपत एलीची प्रगती झाली होती.

डिसेंबर १९६१ मध्ये एली तेल अवीवहून परत झुरिकला आणि तिथून म्युनिकला गेला. आता यापुढे तो प्रत्यक्ष सिंहाच्या गुहेत जाणार होता – सीरियाची राजधानी दमास्कस.

----------------------------------------------------------------------------------------

सीरियन सरकार दिवसेंदिवस कमजोर व्हायला लागलं होतं. लष्कराचा हस्तक्षेप वाढायला लागला होता. त्यामुळे इझराईल आणि सीरिया यांच्या सरहद्दीवर तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. पहिल्या महायुद्धापर्यंत इझराईलप्रमाणे सीरियासुद्धा तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता आणि युद्धानंतर फ्रेंचांनी त्यावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं. १९४८ मध्ये ब्रिटीश पॅलेस्टाईनमधून आणि फ्रेंच सीरियामधून साधारणपणे एकाच वेळी निघून गेले. त्यानंतर सीरियामध्ये राजकीय स्थैर्य नावाचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. राज्यक्रांत्या होऊन एका हुकुमशहाच्या जागी दुसरा येणं ही नियमाने होणारी गोष्ट झाली होती. सीरियाचा कुठलाही शासक हा नैसर्गिकरीत्या मरत नाही – एकतर त्याच्याजागी सत्तेवर आलेला दुसरा शासक त्याची हत्या करवतो किंवा मग त्याच्या हत्येनेच नवीन राज्यक्रांती होते अशी साधारण परिस्थिती होती. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सीरियन राज्यकर्ते कधी लेबेनॉनबरोबर आणि बरेच वेळा इझराईलबरोबर काहीनाकाही भांडण उकरून काढत असत. राजवट बदलली की आधीच्या राजवटीच्या पाठीराख्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून दमास्कसच्या मध्यवर्ती मार्जेह चौकात जाहीररीत्या फाशी दिली जात असे.

एली दमास्कसमध्ये येण्याच्या काही काळ आधी – सप्टेंबर १९६१ मध्ये सीरियामध्ये राज्यक्रांती होऊन इजिप्त आणि सीरिया यांचं एकीकरण रद्द करण्यात आलं होतं. असं एकीकरण हे इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष नासरचं डोकं होतं. १९५६-५७ मधल्या सुएझ कालव्याच्या संघर्षानंतर त्याची प्रतिष्ठा अरब जगामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. इकडे सीरियामध्ये कम्युनिस्ट पक्ष हळूहळू बलिष्ठ होत होता, आणि तत्कालीन सीरियन लष्करप्रमुख अफीफ अल बिझरी हा सोविएत रशियाच्या पूर्णपणे कह्यात गेलेला होता. त्यामुळे सीरियाला कम्युनिस्टांच्या हातात पडण्यापासून वाचवण्यासाठी नासरने सीरियन सरकारपुढे हा प्रस्ताव मांडला होता आणि सीरियामधला दुसरा प्रबळ राजकीय पक्ष असलेल्या बाथ (Ba’ath) पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता आणि १ फेब्रुवारी १९५८ या दिवशी हे एकीकरण झालं होतं.

पण नासरचा अंतस्थ हेतू संपूर्ण अरब जगाचा मसीहा बनणं हा असल्यामुळे तो बाथ पक्षाच्या हातात सीरियाची सूत्रं जाऊ द्यायला तयार नव्हता. त्यामुळे हे एकीकरण तीन वर्षांनी फिसकटलं आणि सप्टेंबर १९६१ मध्ये झालेल्या राज्यक्रांतीनंतर सीरिया या एकीकरणातून बाहेर पडला.

एलीला मोसादमध्ये आणणारा झाल्मान हाच एलीचा केस ऑफिसर किंवा मोसादच्या परिभाषेत ‘ कात्सा ‘ होता. त्याने एलीला म्युनिकमध्ये हेरगिरीसाठी लागणारी सर्व सामग्री – खास बनवलेले कागद, अदृश्य शाई, एक छोटा टाईपरायटर, छोटा ट्रान्समीटर गुप्तपणे बसवलेला एक ट्रान्झिस्टर रेडिओ सेट आणि इतरही बऱ्याच वस्तू – दिली.

म्युनिकवरून एली इटलीमधल्या जेनोआ इथे गेला आणि तिथून बोटीने तो बैरुटला गेला. बोटीवर त्याला मजीद एल अर्द नावाचा एक अरब भेटला. तो संपूर्ण अरब जगात मसाले आणि उंची कपडे यांचा व्यापारी म्हणून प्रसिद्ध होता. पण त्याची खरी प्रसिद्धी वेगळ्या कारणासाठी होती, ती म्हणजे अरब जगातल्या कुठल्या बंदरामध्ये कुठला कस्टम आणि इमिग्रेशन ऑफिसर किती लाच घेऊन सामान जाऊ देतो याबद्दल त्याला खडानखडा माहिती होती. त्याच्या याच ‘ कौशल्याचा ‘ उपयोग करून घ्यायचं मोसादने ठरवलं होतं, आणि त्यांना हे समजलं होतं एल अर्दच्या पत्नीकडून. ती इजिप्शियन ज्यू होती आणि तिचं आणि एल अर्दचं लग्न ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चक्क नाझी जर्मनीमध्ये झालं होतं. तिने अर्थातच आपण ज्यू आहोत ही माहिती लपवलेली होती आणि आता युद्धानंतर ते सीरियामध्ये स्थायिक झाले होते. आपल्या व्यवसायानिमित्त एल अर्द जगभर फिरत असे. सीरियामधल्या सध्याच्या राजवटीबद्दल त्याच्या मनात राग होता, पण आपण मोसादची मदत करतोय याची त्याला कल्पनाही नव्हती. आपण सीरियन राजवटीविरुद्ध असलेल्या उजव्या विचारसरणीच्या बंडखोरांची मदत करतोय असं त्याला वाटत होतं. एलीला झाल्मानने दिलेली सामग्री सीरियामध्ये व्यवस्थित पोचवणं हे काम तो करणार होता.

बैरूटहून एल अर्द आणि एली गाडीने सीरियामध्ये शिरले. तिथे सरहद्दीवर तिथल्या कस्टम अधिकाऱ्याला ५०० अमेरिकन डॉलर्स देऊन एल अर्दने आपल्या गाडीची झडती होऊ दिली नव्हती. त्याच्या गाडीच्या डिकीमध्येच एलीला झाल्मानने दिलेली सगळी सामग्री होती.

सर्वसाधारणपणे एखादा हेर जेव्हा शत्रूराष्ट्रात जातो, तेव्हा तिथल्या गर्दीत मिसळून जाणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट असतं, पण एलीच्या बाबतीत ते पूर्णपणे उलटं होतं. त्याला सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं, आणि तेही लवकरात लवकर.
दमास्कसमधल्या एकदम श्रीमंत आणि उच्चभ्रू अशा अबू रामेन या भागात एलीने एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला. हा फ्लॅट सीरियन सैन्याच्या एका मोठ्या तळाच्या अगदी समोर होता. आपल्या या घराच्या बाल्कनीमधून एलीला सीरियन सरकारचं मोठं अतिथीगृह दिसू शकत होतं. इतर देशांच्या वकिलाती, श्रीमंत व्यापारी आणि सीरियन सरकारमधले उच्चपदस्थ अधिकारी असले तालेवार लोक त्याचे शेजारी होते. या फ्लॅटच्या विविध भागांमध्ये त्याने आपले ट्रान्समीटर्स लपवले होते आणि नोकरांकडून दगाफटका होण्याचा धोका होता, त्यामुळे कोणीही पूर्णवेळ नोकर त्याने कामावर ठेवला नव्हता.

तो ज्यावेळी दमास्कसमध्ये आला, तेव्हा त्याचं दैव जोरावर होतं. इजिप्तबरोबर झालेलं सीरियाचं एकीकरण संपुष्टात येणं हा नासरला स्वतःचा व्यक्तिगत अपमान वाटला होता, त्यामुळे तो कदाचित सीरियामध्ये एखादी राज्यक्रांती घडवून आणू शकेल ही भीती सीरियन राज्यकर्त्यांना वाटत होती. त्यामुळे इझराईलकडे त्यांचं थोडंफार दुर्लक्षच झालं होतं. सततच्या संघर्षांमुळे देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट होता. राज्यकर्त्यांना मित्र, पाठीराखे आणि पैसे यांची नितांत आवश्यकता होती आणि अशावेळी कमाल अमीन साबेतसारखा प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी, आणि श्रीमंत व्यापारी देशामध्ये परत येणं ही त्यांच्यासाठी पर्वणी होती.

एली उर्फ साबेतने सीरियामध्ये स्वतःचं वलय निर्माण करायला सुरुवात केली. त्याला ज्या लोकांनी शिफारसपत्रं दिली होती, त्यांना सीरियामध्ये चांगलाच मान होता, त्यामुळे त्याच्यासाठी सीरियामधल्या उच्चवर्गाने स्वखुशीने दरवाजे उघडले. हळूहळू मोठे व्यापारी आणि सरकारी अधिकारी त्याच्या बैठकीमध्ये सामील झाले. तो अजून अविवाहित आहे हे समजल्यावर लोकांमध्ये त्याला आपला जावई किंवा मेहुणा करून घेण्यासाठी अहमहमिका लागली.

दमास्कसमधल्या गरीब लोकांसाठी तिथल्या नगरपालिकेने चालवलेल्या अन्नछत्राला भलीमोठी देणगी देऊन साबेतने आपली सामाजिक बाजूही लोकांना दाखवून दिली. पण अजूनही तो राजकारणात पडायचं टाळत होता, कारण सीरियामध्ये अजून एखादी मोठी उलथापालथ होऊ घातलेली आहे असं त्याच्या मोसादमधल्या वरिष्ठांचं मत होतं, आणि आता एलीही त्याच निष्कर्षाला पोचला होता.

ब्युनोस आयर्समध्ये हसनच्या संपादकपदामुळे एलीला तिथल्या राजकीय वर्तुळात शिरकाव करता आला होता. इथे सीरियामध्ये तेच काम करणारा माणूस होता जॉर्ज सलीम सैफ. तो जगभरात पसरलेल्या सीरियन नागरिकांसाठी रेडिओ दमास्कसवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा निर्माता होता, आणि हसनप्रमाणेच त्यालाही एलीच्या खऱ्या स्वरुपाची काहीही माहिती नव्हती. त्याच्याशी गप्पा मारता मारता एलीला सीरियामधल्या राजकीय परिस्थितीबद्दल माहिती समजत होती. हसनप्रमाणेच सैफनेही एलीची अनेक राजकीय नेत्यांशी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली.

हे सगळं चालू असताना एली वैयक्तिकरीत्या मात्र एकाकी पडला होता. त्याच्या मनावरचा ताण तो कोणाशीही बोलून हलका करू शकत नव्हता. मोसादचं एखादं अजून नेटवर्क दमास्कसमध्ये असण्याची शक्यता होती, पण त्यांनी एलीशी किंवा त्याने त्यांच्याशी संपर्क साधणं म्हणजे आत्मघात ठरला असता. दिवसाचे २४ तास एक वेगळा माणूस बनून शत्रूराष्ट्रात राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही याची जाणीव आता त्याला व्हायला लागली होती.

मिळालेली सगळी माहिती तो नित्यनियमाने सकाळी ८ वाजता आणि कधी कधी संध्याकाळीही प्रसारित करत असे. त्याचं घर सैन्याच्या तळाच्या खूपच जवळ होतं. तिथून सतत संदेश प्रसारित होत असत. त्या संदेशांमध्ये त्याने पाठवलेले संदेश लपून जात असत.

दमास्कसमध्ये आल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीत कमाल अमीन साबेतने बरीच मजल मारली होती. कामासाठी बाहेर जावं लागणं हे त्याच्यासाठी अगदी नैमित्तिक होतं. त्यामुळे तो अर्जेन्टिनामधल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला, तेव्हा दमास्कसमध्ये कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. ब्युनोस आयर्सवरून तो म्युनिकला गेला आणि तिथे वेषांतर करून आणि वेगळ्या पासपोर्टवर तो तेल अवीवला गेला. तिथे आपल्या कुटुंबाबरोबर काही काळ घालवून मग तो दमास्कसला परत गेला.

यावेळी त्याला एल अर्दची गरज नव्हती. त्याचं स्वतःचं नाव पुरेसं होतं. त्याने सीरियामधल्या मित्रांसाठी भरपूर भेटवस्तू आणल्या होत्या. या भेटवस्तूंमध्ये मायक्रोफिल्म्स आणि एक छोटा कॅमेरा दडवलेले होते. जी माहिती प्रसारित करता येणार नव्हती, ती माहिती एली मायक्रोफिल्म्सद्वारे पाठवत असे. सीरियामध्ये बनलेल्या बुद्धिबळ आणि बॅकगॅमन यांच्या पटांना अर्जेन्टिनामध्ये चांगली मागणी होती. त्यामुळे तो अर्जेन्टिनामध्ये या वस्तू निर्यात करत असे आणि त्यांच्यामध्ये मायक्रोफिल्म्स दडवलेल्या असायच्या. तो अर्जेन्टिनामधल्या लोकांना हे पट पाठवायचा आणि ते त्यातून मायक्रोफिल्म्स काढून घेऊन इझराईलला त्या राजनैतिक मार्गाने (diplomatic channel) पाठवायचे.

त्यावेळी सीरियामध्ये बाथ पक्षाच्या स्वतंत्र सीरियावादी गटाचा जोर वाढायला लागला होता. सैफकडून एलीला याची बित्तंबातमी मिळत होतीच. वारे ज्या दिशेने वाहत होते त्याचा फायदा घ्यायचं त्याने ठरवलं आणि बाथ पक्षाच्या या नेत्यांबरोबर ओळख वाढवायला सुरुवात केली आणि आपल्या पैशांच्या थैल्या मोकळ्या सोडल्या.

त्याचा हा होरा अचूक होता हे मार्च १९६३ मध्ये सिद्ध झालं. ८ मार्च १९६३ या दिवशी सीरियामध्ये परत राज्यक्रांती झाली आणि बाथ पक्षाच्या स्वतंत्र सीरियावादी गटाने सत्ता काबीज केली. त्यांना सैन्याचाही पाठिंबा होता. एलीला ब्युनोस आयर्समध्ये भेटलेला जनरल अमीन अल हाफेझ या नवीन सरकारमध्ये संरक्षणमंत्री होता. त्याच वर्षी जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष सलाह अल बित्रविरुद्ध त्याच्या मंत्रिमंडळाने बंड केलं आणि हाफेझ राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास सगळे कमाल अमीन साबेतचे घनिष्ठ मित्र होते. काहीजणांना तर साबेतच्या सांगण्यावरून हाफेझने नियुक्त केलेलं होतं. साबेत आता सीरियन सरकारच्या अंतर्गत वर्तुळात सामील झाला होता.

दमास्कसमधली एक झगमगणारी मेजवानी. एकापाठोपाठ एक गाड्या येत आहेत. सगळ्या उच्चपदस्थांच्या मर्सीडिज किंवा रोल्स रॉईस. सरकारमधले मंत्री आणि सैन्यदलांचे अधिकारी त्यामधून उतरत आहेत. त्यांचा यजमान प्रत्येकाचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि त्यांना काय हवं-नको त्याकडे जातीने लक्ष पुरवत आहे. या मेजवानीला येणाऱ्या पाहुण्यांची यादी आणि दमास्कसमधल्या सर्वात बलाढ्य लोकांची यादी यात फारसा फरक नाहीये. बरेच लोक कर्नल सलीम हातुमभोवती घोळका करून उभे आहेत. जनरल हाफेझच्या राष्ट्राध्यक्ष बनण्यामध्ये हातुमचा मोठा हातभार होता. त्यानेच जुलै १९६१ मध्ये दमास्कसमध्ये रणगाडे घुसवून अल बित्रला राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. थोड्या वेळाने स्वतः राष्ट्राध्यक्ष हाफेझचं आगमन होतं. तो सर्वप्रथम जाऊन आपल्या मित्राला – कमाल अमीन साबेतला भेटतो. राष्ट्राध्यक्षाबरोबर त्याची पत्नीही आहे. तिच्या अंगावर हिऱ्यांची कलाकुसर केलेला मिंक कोट आहे, जो साबेतने तिला भेट दिलेला आहे. अर्थात अशी भेट मिळालेली ती एकटी नाहीये. तिथे असलेल्या स्त्रियांपैकी किमान ५० टक्के स्त्रियांचे कपडे आणि दागिने हे साबेतने भेट दिलेले आहेत.

एकीकडे सैन्याधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा एक गट सरहद्दीवरच्या परिस्थितीबद्दल चर्चा करतोय. त्यांच्यामध्ये असलेले काही लोक जॉर्डन नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी इझराईलपासून वळवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. ते उत्साहाने आपण आजवर केलेल्या कामाबद्दल बोलताहेत.

दुसरीकडे साबेत स्वतः काही लष्करी अधिकाऱ्यांबरोबर त्याच्या रेडिओ कार्यक्रमाबद्दल बोलतोय. हो, त्याला आता स्वतःचा रेडिओ कार्यक्रम मिळालाय. या कार्यक्रमात तो सीरियामधली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती आणि इझराईल या विषयांवर भाष्य करतो. त्याशिवाय जगभर पसरलेल्या सीरियन नागरिकांसाठीही त्याचा एक वेगळा कार्यक्रम रेडिओ दमास्कसवर चालू आहे.

एली उर्फ साबेत अशा मेजवान्या महिन्यातून किमान एकदा देत असे. त्यांना सीरियन प्रसारमाध्यमांतून भरपूर प्रसिद्धी मिळत होती.

या आदरातिथ्याचा परिणाम म्हणून एलीला सैन्याच्या तळांवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी आमंत्रणं यायला लागली. तो बरेच वेळा तिकडे प्रमुख पाहुणा म्हणून जात असे. सीरियन सैन्याची गोलान टेकड्यांवरील तटबंदी, सीरियन लष्कराच्या पुढच्या योजना, त्यांचे नकाशे, नवी शस्त्रास्त्रं याबद्दल त्याला मिळणारी सगळी माहिती त्याच्या प्रसारणातून किंवा मग मायक्रोफिल्म्सच्या द्वारे मोसाद आणि अमानपर्यंत पोचत होती. त्याने त्याच्याव्यतिरिक्त संदेश पाठवण्याची एक अजून नवीन पद्धत शोधून काढली – रेडिओ दमास्कसवरचे त्याचे कार्यक्रम. त्याच्या एका इझराईल भेटीमध्ये त्याने आणि मोसादच्या अधिकाऱ्यांनी एक विशिष्ट शब्द आणि वाक्प्रचार यांचं कोड विकसित केलं. एली त्याच्या कार्यक्रमांमध्ये हे शब्द वापरत असे. त्यावरून मोसादला माहिती मिळत असे.

आता त्याने आपला प्रभाव अजून वाढवायला सुरुवात केली. त्याचं घर प्रचंड मोठं होतं आणि तो एकटाच राहात असे. त्याच्या ओळखीच्या एका सरकारी अधिकाऱ्याला आपल्या ‘ मैत्रिणीला ‘ भेटण्यासाठी एका जागेची आवश्यकता होती. त्याने साबेतला विचारलं. साबेतने काहीही न बोलता आपल्या घरातली एक खोली उघडून दिली. आणि त्यानंतर हे प्रकार अगदी नियमितपणे सुरु झाले. अनेक उच्चपदस्थ लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मैत्रिणींना साबेत भेटवस्तू देत असे. त्याच्या मोबदल्यात त्या त्याला माहिती देत असत. कर्नल सलीम हातुमच्या अनेक मैत्रिणी होत्या आणि त्या सगळ्या साबेतला त्याच्याकडून मिळणारी प्रत्येक माहिती देत असत.

इझराईलबद्दल बोलताना साबेतच्या वाणीला भलतीच धार चढत असे. अरब राष्ट्रांचा प्रच्छन्न शत्रू आणि मध्यपूर्व आशियामधल्या शांततेला आणि इस्लामला असलेला सर्वात मोठा धोका याच शब्दांत तो इझराईलचं वर्णन करत असे. सीरियन लष्करातल्या आपल्या मित्रांना तो सतत इझराईलविरुद्ध ते फार काही करत नसल्याचे टोमणे मारत असे. त्याचा परिणाम म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला दोन-तीन वेळा गोलान टेकड्यांच्या भागात नेऊन सीरियन सैन्याची तयारी दाखवली. तिथल्या सैनिकांनाही साबेतच्या सरकारमधल्या प्रस्थाची कल्पना होती त्यामुळे त्यांनीही त्याला सर्व माहिती दिली. तिथले बंकर्स, शस्त्रांचा साठा, विमानविरोधी तोफा वगैरे बघून साबेत प्रचंड प्रभावित झाला. त्याने एकच सूचना तिथल्या अधिकाऱ्यांना दिली – इथले सैनिक कडक उन्हात उभं राहून आपल्या देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करताहेत. निदान त्यांच्यासाठी थोडी झाडं इथे लावा. त्यांना सावली मिळेल. साबेतच्या सूचनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. (१९६७ च्या ६ दिवसांच्या युद्धात इझरेली विमानांना सीरियन सैन्याचे शस्त्रसाठे आणि बंकर्स सहज उध्वस्त करता आले कारण त्यांच्या जागांबद्दल या झाडांमुळे इझरेली वायुदलाला अगदी अचूक माहिती मिळालेली होती.)

जनरल हाफेझच्या आधी राष्ट्राध्यक्ष असलेला सलाह अल बित्र हाफेझने सत्ता काबीज केल्यावर पॅलेस्टाईनमधल्या जेरिको शहरात निर्वासित म्हणून राहात होता. बाथ पक्षाच्या नेत्यांनी अल बित्र आणि हाफेझ यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी साबेतवर सोपवली. तीही त्याने यशस्वीरीत्या पार पाडली. त्याच्या या प्रगतीमुळे मोसादमधले लोकसुद्धा अचंबित झाले. इतक्या यशाची त्यांनी अपेक्षासुद्धा केली नव्हती.

१९६३ मध्ये इझराईलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन आणि मोसाद संचालक इसेर हॅरेल यांच्यात झालेल्या वादानंतर हॅरेलने राजीनामा दिला आणि अमानचा संचालक असलेल्या मायर अमितची त्या जागी नेमणूक करण्यात आली. साधारण त्याच सुमारास एलीच्या दुसऱ्या मुलीचा – आयरिसचा जन्म झाला, आणि १९६४ च्या नोव्हेंबरमध्ये त्याच्या मुलाचा – शॉलचा जन्म झाला.

आपल्या मुलाला पाहायला एली इझराईलमध्ये आला आणि त्याच्यात बदल झालेला त्याच्या घरच्यांच्या लक्षात आलं. तो अबोल आणि चिडचिडा झाला होता. कुठेही बाहेर यायला तो तयार नसायचा आणि वारंवार नोकरी सोडून देण्याबद्दल बोलत असायचा. “ आता यापुढे मी जेव्हा परत येईन, तेव्हा मी माझी नोकरी सोडलेली असेल आणि इथे इझराईलमध्येच काहीतरी काम शोधेन. मला आता माझ्या कुटुंबापासून अजून दूर राहण्याची इच्छा नाही,” असं त्याने नादियाला नोव्हेंबर १९६४ च्या शेवटी इझराईलमधून निघताना सांगितलं होतं. खरंतर त्याची जायची इच्छाही नव्हती, पण मोसाद अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे तो सीरियाला गेला.

नंतर अनेक वर्षांनी नादिया कोहेनने दिलेल्या मुलाखतीत या क्षणाबद्दल सांगितलं, की का कुणास ठाऊक, पण जे घडतंय ते बरोबर नाही अशी एक जाणीव तिला वारंवार होत होती आणि आपण एलीला परत पाहू शकू याची तिला खात्री वाटत नव्हती. तिची भीती दुर्दैवाने खरी ठरली.

----------------------------------------------------------------------------------------

१३ नोव्हेंबर १९६४ या दिवशी सीरियन लष्कराने तेल दान या इझराईल- सीरिया सीमेवरच्या ठिकाणाहून इझरेली हद्दीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. इझराईलने लगेचच आणि अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली. जमिनीवरून रणगाडे आणि तोफांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच इझरेली वायुदलाची मिराज आणि व्हाऊतूर विमानं हवेत झेपावली आणि त्यांनी सीरियन लष्कराच्या गोलान टेकड्यांवर असलेल्या चौक्यांवर बॉम्बफेक केली.

इथपर्यंत ठीक होतं, पण नंतर अचानक ही विमानं सीरियन हद्दीत घुसली आणि त्यांनी जॉर्डन नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी वळवण्याचा प्रकल्प जिथे चालू होता, तिथे मोर्चा वळवला. तिथे खणलेले कालवे, बुलडोझर्स आणि इतर सामग्री आणि आत्तापर्यंत झालेलं सगळं बांधकाम या विमानांनी बॉम्बफेक करून नष्ट केलं. सीरियाकडे त्यावेळी रशियन बनावटीची मिग विमानं होती, पण सीरियन वैमानिकांना ती उडवण्याचा अजून काहीही अनुभव नव्हता. त्यांचं प्रशिक्षण चालू होतं, त्यामुळे सीरियन वायुदलाने या इझरेली विमानांना अजिबात प्रतिकार केला नाही.

या इझरेली हवाई हल्ल्याच्या अचूकतेचं श्रेय निःसंशय एली कोहेनचंच होतं. त्याने या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या माणसाशी मैत्री केली होती. हा माणूस सौदी अरेबियामधला होता, आणि त्याची स्वतःची बांधकाम कंपनी होती. या मैत्रीमुळेच एलीला या प्रकल्पाचं ठिकाण, व्याप्ती, आजवर झालेलं काम, या बांधकामाची बॉम्ब किंवा इतर स्फोटकांसमोर टिकून राहण्याची क्षमता, तिथे असणारी सुरक्षितता वगैरे महत्वाच्या गोष्टी अगदी तपशीलवार समजल्या होत्या आणि त्याने त्याची माहिती इझराईलला लगेचच कळवली होती. या सौदी अरेबियन माणसाचं नाव होतं मोहम्मद बिन लादेन – ओसामा बिन लादेनचा बाप. त्याने एलीला आपल्या कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल दिलेल्या माहितीमुळेच इझरेली विमानांनी यानंतरही अनेकवेळा तिथे हल्ला केला आणि शेवटी सीरिया आणि इतर अरब राष्ट्रांनी हा प्रकल्प १९६५ च्या शेवटी सोडून दिला.

सीरियामध्ये या हल्ल्याचे पडसाद उमटलेच. सर्वात महत्वाचा प्रश्न होता – इझरेली वायुदलाला ही माहिती मिळाली कशी? सीरियन मुखबारतच्या प्रमुखाला – नदीम अल तायाराला वेगळाच संशय येत होता. संपूर्ण १९६४ या वर्षांत जे काही निर्णय सीरियन लष्कराने किंवा सरकारने घेतले, त्याबद्दल इझरेली रेडिओ सेवा कोल इझराईलवर अगदी लगेचच ऐकायला मिळालं होतं. अनेक अतिगोपनीय निर्णयही इझराईलला लगेच समजले होते आणि आता नोव्हेंबरमध्ये इझराईलने अगदी अचूक प्रतिहल्ला चढवला होता. तायाराचा तर्क होता की ज्याअर्थी इझराईलमधून ही माहिती प्रसारित होते आहे, त्याअर्थी इथे सीरियामध्ये घेतले गेलेले निर्णय इझराईलपर्यंत ताबडतोब पोचताहेत. म्हणजे सीरियन सरकारच्या अगदी अंतर्गत वर्तुळामध्ये, सत्ताकेंद्राच्या अगदी जवळ कुणीतरी इझराईलचा हेर आहे आणि तो त्याला मिळणाऱ्या बातम्या इझराईलला प्रसारित करतोय. पण मग त्याचा ट्रान्समीटर कुठे आहे? संपूर्ण डिसेंबर महिना तायारा आणि त्याच्या लोकांनी हा ट्रान्समीटर शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं पण त्यांना तो मिळू शकला नाही. शेवटी त्यांच्या सुदैवाने त्यांना जानेवारी १९६५ मध्ये ट्रान्समीटर आणि तो वापरणारा हेर असे दोघेही मिळाले.

साबेतच्या अटकेने सीरियन सरकारचं धाबं दणाणलं होतं. सर्वात मोठा प्रश्न होता – हा माणूस जर बोलला, तर तो कोणाकोणाची नावं घेईल? कारण साबेतकडून भेटवस्तू आणि इतर ‘ गोष्टी ‘ स्वीकारणाऱ्या लोकांमध्ये सीरियामधल्या बहुतेक सर्व लब्धप्रतिष्ठितांचा समावेश होता. स्वतः राष्ट्राध्यक्ष हाफेझने साबेतच्या चौकशीमध्ये भाग घेतला. आपण कोण आहोत हे एलीने त्याच्यासमोरच कबूल केलं.

सीरियन मुखबारतसमोर आता पुढचा प्रश्न होता – साबेत उर्फ एली कोहेन हा एकांडा शिलेदार आहे, का हे एक हेरगिरी नेटवर्क आहे? त्यामुळे साबेतशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या सगळ्यांना अटक झाली – एल अर्द, जॉर्ज सैफ, काही सैन्याधिकारी, काही स्त्रिया. यामध्ये साबेतकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या हाफेझच्या पत्नीचा किंवा तिच्यासारख्या उच्च वर्तुळातल्या स्त्रियांचा अर्थातच समावेश नव्हता.

एलीला मुखबारतने संदेश पाठवताना रंगेहात पकडलं होतं. मोसादची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी एलीला अजून काही संदेश पाठवायला लावले. पण एलीने त्या संदेशात वापरलेल्या काही शब्दांमुळे त्याला अटक झालेली आहे आणि तो त्याच्या डोक्याला पिस्तुल लावलेल्या परिस्थितीत संदेश पाठवतोय हे मोसाद अधिकाऱ्यांना समजलं. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, पण एलीच्या कुटुंबियांना याबद्दल सांगणं गरजेचं होतं.

एलीच्या भावाने एलीला सीरियामध्ये अटक झाल्याची बातमी जेव्हा त्याच्या आईला सांगितली, तेव्हा तिला एली चुकून सीमा पार करून सीरियामध्ये गेला असेल असं वाटलं. तो सीरियामध्ये नक्की काय करत होता, हे कळल्यावर ती कोसळलीच.

नादियाची अवस्थाही फार वेगळी नव्हती. तिला एलीच्या वागणुकीमुळे संशय जरूर आला होता, पण एली असं काही काम करत असेल, याचा तिने विचारही केलेला नव्हता.

मोसाद संचालक मायर अमितने हे सगळं प्रकरण स्वतःची वैयक्तिक जबाबदारी म्हणून हातात घेतलं. ३१ जानेवारी १९६५ या दिवशी फ्रान्समधल्या सर्वश्रेष्ठ वकिलांपैकी एक असलेला जॅक्स मेर्सियर दमास्कसमध्ये उतरला. त्याने एलीचं वकीलपत्र घेण्याची इच्छा सीरियन सरकारला सांगितली आणि आपल्या अशिलाला भेटू देण्याची मागणी केली पण त्याची मागणी फेटाळण्यात आली.

सीरियन सरकारमध्ये त्यावेळी दोन गट होते. एक गट राष्ट्राध्यक्ष हाफेझच्या विरोधातल्या लोकांचा. या गटाला एली कोहेनवर रीतसर खटला चालवायला हवा अशी इच्छा होती, कारण त्याचा वापर करून हाफेझच्या राजवटीमधला भ्रष्टाचार बाहेर काढण्याची आणि त्याला बदनाम करायची त्यांची इच्छा होती. दुसऱ्या गटाला, जे हाफेझचे निकटवर्तीय लोक होते, त्यांना याच कारणासाठी रीतसर खटला चालू नये अशी इच्छा होती, कारण साबेत उर्फ एली कोहेनने त्यांची नावं घेतली असती, तर त्यांनाही पुढे फासावर लटकवण्यात आलं असतं.

शेवटी एका विशेष सैनिकी न्यायालयासमोर हा खटला सुरु झाला. खटल्याचं निवडक कामकाज सीरियन सरकारच्या अधिकृत वाहिनीवर प्रसारित होत असे. इझराईलमध्येही हे कामकाज प्रसारित केलं जात असे.

हा खटला म्हणजे एक मोठा फार्स होता. न्यायाधीश म्हणून असलेले तिघेही अधिकारी जनरल सलाह दाली, ब्रिगेडियर अली आमीर आणि कर्नल सलीम हातुम हे कमाल अमीन साबेतचे एकेकाळचे चांगले मित्र होते आणि त्याच्याकडून त्यांनी अनेक भेटवस्तूही स्वीकारल्या होत्या.

एलीला संपूर्ण खटल्यात बोलायची परवानगी नव्हती. त्याचा चेहरा संपूर्ण खटला चालू असताना निर्विकार होता. आपल्याबाबतीत काय होणार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. जवळपास १० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये साधारण अशाच परिस्थितीमध्ये असताना काय झालं हे त्याला आठवत होतंच.

३१ मार्च १९६५ या दिवशी न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला – एली कोहेन, माजिद एल अर्द आणि जॉर्ज सैफ या तिघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

इझरेली सरकारच्या वतीने मेर्सियरने एलीला वाचवण्याचे प्रयत्न चालू केले. इझराईल सीरियाला एली कोहेनच्या बदल्यात औषधं आणि शेतकी अवजारं फुकट देईल अशी पहिली ऑफर होती. या सर्व गोष्टींची किंमत जवळजवळ दहा लाख डॉलर्स होती. सीरियन सरकारने हे धुडकावून लावलं. इझराईलने लगेचच दुसरी ऑफर दिली – एलीच्या मोबदल्यात इझराईलने पकडलेले ११ सीरियन हेर. सीरियन सरकारने हीसुद्धा ऑफर धुडकावली.

१ मे १९६५ या दिवशी राष्ट्राध्यक्ष हाफेझने मजीद एल अर्द आणि जॉर्ज सैफ या दोघांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत बदललं पण एलीवर मात्र कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. ८ मे १९६५ या दिवशी त्याला फाशी होणार हे सीरियन सरकारने अधिकृतरीत्या जाहीर केलं.

शेवटचा प्रयत्न म्हणून नादियाने पॅरिसमधल्या सीरियन वकिलातीमध्ये दयेचा अर्ज नेऊन दिला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संपूर्ण जगातून सीरियन सरकारला एली कोहेनला फासावर न चढवण्यासाठी विनंती करणारी अनेक पत्रं आली. एलीला त्यांच्याबद्दल जर समजलं असतं, तर त्याचा मित्र श्मुएल अझारची त्याला आठवण झाली असती. तेव्हाही अशा विनंत्यांचा काहीही उपयोग झाला नव्हता. आत्ताही झाला नाही. त्याला फक्त त्याच्या नातेवाईकांना एक शेवटचं पत्र लिहायची परवानगी देण्यात आली आणि मृत्यूसमयी दमास्कसचा राब्बाय निसीम अन्दाबो त्याच्याबरोबर असावा ही विनंतीही मान्य करण्यात आली.

१८ मेच्या पहाटे अडीच वाजता एलीला झोपेतून उठवण्यात आलं. त्याच्या कपड्यांवर एक मोठा पांढरा गाऊन घालण्यात आला. त्याच्या छातीवर एक भलं मोठं पोस्टर चिकटवण्यात आलं. या पोस्टरवर त्याचे गुन्हे अरेबिक भाषेत अगदी स्पष्टपणे लिहिण्यात आले होते. उघड्या ट्रकमधून त्याला दमास्कसच्या मुख्य बाजारपेठेत – मार्जेह चौकात नेण्यात आलं. या सगळ्या क्षणांचं थेट प्रक्षेपण होत होतं. चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या वधस्तंभावर एली शांतपणे चढला. तिथे उभ्या असलेल्या जल्लादाने त्याच्या गळ्याभोवती फास अडकवला. एलीला त्याने एका छोट्या स्टूलवर उभं केलं.

एली शांतपणे तिथे उभा होता. तिथे त्यावेळी हजर असणाऱ्या पत्रकारांच्या मते त्याने आपलं भवितव्य स्वीकारलेलं होतं. प्रेक्षक श्वास रोखून उभे होते. इशारा मिळताच जल्लादाने एलीच्या पायांखाली असलेल्या स्टुलाला जोरात लाथ मारली आणि एली कोहेन नामक सर्वश्रेष्ठ हेर सगळ्याच्या पलीकडे निघून गेला. हजर असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला.

पुढचे सहा-सात तास एलीचा देह तिथेच फासावर लटकत ठेवलेला होता. येणारे-जाणारे जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते. काही जणांनी त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले. काहीजण त्याच्या चेहऱ्यावर थुंकले सुद्धा.

तिथून काही मैल पश्चिमेला इझराईलमध्ये कोहेनचं कुटुंब हेच दृश्य त्यांच्या टेलिव्हिजनवर पाहात होतं. मोसाद संचालक मायर अमितही त्यांच्याबरोबर तिथे हजर होता.

१८ मेच्यादिवशी सकाळी साधारण ११ च्या सुमारास एलीचा मृतदेह वधस्तम्भावरून उतरवण्यात आला आणि त्याचं एका गुप्त ठिकाणी दफन करण्यात आलं. नादियाने यानंतर अनेकवेळा सीरियन सरकारकडे एलीचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्याची मागणी केली, पण आजतागायत सीरियामधल्या एकाही सरकारने ही मागणी पूर्ण केलेली नाही.

एलीच्या मृत्यूनंतर तो इझरेली जनतेचा हीरो झाला. पण अनेक जणांनी, ज्यांच्यात एलीच्या कुटुंबियांचाही समावेश आहे, मोसादवर टीका केली. त्यांच्या मते मोसादने एलीवर प्रचंड जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्याचा ताण त्याला सहन झाला नाही. त्याला दररोज संदेश प्रसारित करायला सांगितलं होतं आणि त्याची खरोखर गरज नव्हती.
एलीच्या कामगिरीचं खरं मोल इझराईलला २ वर्षांनी कळलं, जेव्हा ६ दिवसांच्या युद्धात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच इझरेली विमानांनी गोलान टेकड्यांवरची सीरियन सैन्याची ठाणी उध्वस्त केली आणि तिथल्या २/३ भागावर कब्जा केला आणि इझरेली शेतकऱ्यांना वाटणारी सीरियन हल्ल्याची भीती कायमची मिटवून टाकली.

क्रमशः

संदर्भ –
१. Mossad : The Greatest Operations of the Israeli Secret Service – by Michael Bar Zohar & Nissim Mishal
२. The History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
३. Gideon’s Spies – by Gordon Thomas

मोसाद - भाग ८

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अतिशय छान बोका भाऊ... पुलेशु

प्रचेतस's picture

11 Feb 2016 - 9:46 pm | प्रचेतस

हा भाग बऱ्याच दिवसानंतर आला मात्र वाट पाहण्याचं सार्थक झालं.
एली कोहेनबद्दल आधी वाचलं होतं पण ह्या लेखामुळे अगदी तपशीलवार वाचण्यास मिळालं.

दुसरं महायुद्ध तसंच अरब इस्राईल किंबहुना एकंदरीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणं हा माझ्यासाठी तसा निरस विषय. पण तुम्ही किंवा जयंत कुलकर्णी हाच विषय अगदी रंगतदारपणे आणि सुरेख शैलीत मांडता त्यामुळे वाचल्याशिवाय राहवतंच नाही.

नया है वह's picture

12 Feb 2016 - 1:29 pm | नया है वह

+१००

जव्हेरगंज's picture

11 Feb 2016 - 11:10 pm | जव्हेरगंज

क्या बात है बोकाभाऊ,

एकदम रोमांचक वाटले लिखाण.
गेल्या पाच सहा दिवसांत मिपावरच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकूण पकलो होतो.
आज मात्र भरपाई झाली.

दिवसाला किमान एक धागा तरी 'वाचणीय' असावा याच सारखा.

अजून भरपूर येणार आहे हे माहित आहे, तेव्हा वाट बघतोय.

आणि असे धागे【च】 वर असावे,,,
बाकी चित्तथरारक !

यशोधरा's picture

11 Feb 2016 - 11:13 pm | यशोधरा

वाचले. थरारक आहे!

अभिजित - १'s picture

12 Feb 2016 - 12:02 am | अभिजित - १

solid !!
त्याला दररोज संदेश प्रसारित करायला सांगितलं होतं आणि त्याची खरोखर गरज नव्हती - या मुळे तो पकडला गेला.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 12:33 am | पिलीयन रायडर

तारिफ करायलाही आता शब्द नाहीत!
__/\__

राघवेंद्र's picture

12 Feb 2016 - 12:47 am | राघवेंद्र

हा भाग ही मस्तच !!! पु. भा. प्र.

इष्टुर फाकडा's picture

12 Feb 2016 - 12:54 am | इष्टुर फाकडा

हाही भाग जोरदार झालाय बोका भाउ. लगोलग तुनळीवरचा हिड्यु बघुन टाकला !
थरारक आहे हे सर्व !
https://www.youtube.com/watch?v=z6LVU3yKzAk

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2016 - 8:05 am | कैलासवासी सोन्याबापु

अक्षरशः ग्रिपिंग!! कोहेन बद्दल प्रचंड आदर दाटुन आला मनात एकदम! एक नंबर सुरु आहे बोका भाऊ

आनन्दा's picture

12 Feb 2016 - 9:57 am | आनन्दा

मस्तच आहे हा पण भाग. बरीच नवीन माहिती मिळतेय.

जाता जाता -
ते जरा "नैमित्तिक" खटकले - तिथे "नित्याचे" हा शब्द वापरायला होतामिमाझ्या माहितीनुसार नैमित्तिक म्हणजे कारणवशात. आणि नित्याचे म्हणजे नेहमी. बाकी तुम्ही त्याच अर्थाने हा शब्द वापरला असेल तर हाहुद्या.

बोका-ए-आझम's picture

12 Feb 2016 - 10:17 am | बोका-ए-आझम

ती चूक भाग प्रकाशित केल्यावर वाचताना लक्षात आली. सांगितल्याबद्दल धन्यवाद!

सुबोध खरे's picture

12 Feb 2016 - 11:38 am | सुबोध खरे

फारच छान

महासंग्राम's picture

12 Feb 2016 - 12:54 pm | महासंग्राम

अल खराब, लिहिल्या लिहिलंय बोका भाऊ, खिळवून ठेवणार लेखन

इशा१२३'s picture

12 Feb 2016 - 3:17 pm | इशा१२३

मस्तच! पु भा प्र

अन्या दातार's picture

12 Feb 2016 - 3:19 pm | अन्या दातार

भारतात असे किती एली कोहेन असावेत या विचारानेही थरकाप उडाला

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Feb 2016 - 5:22 am | निनाद मुक्काम प...

भारतातले एली टीव्ही वर येतात बडबड करतात , पुरस्कार परत करतात अजून बरेच काही करतात .

sagarpdy's picture

12 Feb 2016 - 4:43 pm | sagarpdy

रोमांचक ! पु भा प्र

बंट्या's picture

12 Feb 2016 - 5:33 pm | बंट्या

मस्त .पु. भा प्र

रंगासेठ's picture

12 Feb 2016 - 5:44 pm | रंगासेठ

फार छान लिहिलयं. हाही भाग एकदम रोमांचक.
आत्ता 'म्युनिच' घटना आणि त्यावरची मोसादची प्रतिक्रिया हा भाग केव्हा येईल याची प्रतिक्षा आहे.

अजून एक जबरदस्त भाग.अतिशय आवडला.पुभाप्र

गामा पैलवान's picture

12 Feb 2016 - 7:42 pm | गामा पैलवान

बोकोबा,

खरच रोमहर्षक कथा आहे. पण अखेरीस एलीला इझ्रायली लोकांनीच उघडं पाडलं असावं असा संशय येतो. त्या दिवशी रेडियो शांती पाळली जात आहे असं एलीला समजलं असणारच. मग तो स्वत:हून कशाला संदेश पाठवेल? तेल अवीवच्या हुकुमावरूनच ना? असा आपला माझा तर्क.

आ.न.,
-गा.पै.

मोसादने एलीवर जी दररोज संदेश पाठवायची सक्ती केली होती त्यामुळे तो पकडला गेला. GORDON THOMAS आणि MICHAEL BAR ZOHAR या दोघांच्याही पुस्तकात Eli was undone by a spy's worst enemy - routine असा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाय तो जर पकडला गेला नसता तर सीरियन अध्यक्षांच्या मंत्रिमंडळात मंत्री वगैरे झाला असता. त्याची उपयुक्तता मोसादसाठी संपुष्टात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला जाणीवपूर्वक expose केलं असेल असं वाटत नाही. शक्यतो गुप्तचर संघटना असं कृत्य आपल्या एखाद्या अजून उच्चपदस्थ हस्तकाला वाचवण्यासाठी करतात. एली ज्या पातळीला पोचला होता त्या पातळीवर फार कमी हेर पोचले आहेत.

गामा पैलवान's picture

13 Feb 2016 - 1:31 am | गामा पैलवान

बोकोबा,

>> मोसादने एलीवर जी दररोज संदेश पाठवायची सक्ती केली होती त्यामुळे तो पकडला गेला. GORDON THOMAS
>> आणि MICHAEL BAR ZOHAR या दोघांच्याही पुस्तकात Eli was undone by a spy's worst
>> enemy - routine असा स्पष्ट उल्लेख आहे.

मोसादमधल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे एलीचा बळी गेला असावा. अन्यथा एव्हढा ढळढळीत नित्यक्रम मोसादवाल्यांच्या लक्षात आला नसेल काय?

आ.न.,
-गा.पै.

अत्यंत परिणाम कारक शब्दांच्या वापरासह सुरु असलेली थरारक लेखमाला.
शत्रूच्या इतक्या अंतर्गत वर्तुलापर्यंत प्रवेश मिळवू शकणाऱ्या व्यक्तीला सलाम!

श्रीरंग_जोशी's picture

13 Feb 2016 - 10:24 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहे हा भाग पण. दीर्घ असूनही खिळवून ठेवणारा.

आतापर्यंतचे भाग वाचून एक प्रश्न मनात उभा राहतो. एवढ्या लांबचा अर्जेंटिना या घडामोडींमध्ये खूपदा येतो. परंतु तुलनेने जवळ असलेल्या भारताचा उल्लेखही कुठेच येत नाही.

महासंग्राम's picture

13 Feb 2016 - 10:39 am | महासंग्राम

मोसाद च भारतात पण नेटवर्क असेल पण तुलनेने कमी असाव असे वाटते, भारताच राहणीमान, संस्कृती बर्याच प्रमणात वेगळी आहे इतर देशांपेक्षा त्यामुळे मोसादला भारतात हेर घुसवणे सहजासहजी शक्य नाही. कारण आपल्या इथे विदेशी लोक सहज ओळखू येतात.
दुसरी गोष्ट भारताने इस्त्रायल बाबत बर्याच प्रमाणात सहकार्याच धोरण ठेवलं आहे, त्यामुळे सुद्धा असं मोसाद चे नेटवर्क अथवा भारतात घडामोडी कमी आहेत असे वाटते.

अवांतर : ७०-८० च्या दशकातल्या भारतात घडलेल्या बर्याच घडामोडीत मोसाद ने भूमिका बजावल्याचे ऐकिवात आहे. अर्थात याला पुरावा असं काही नाही फक्त ऐकीव गोष्टी

अभिजित - १'s picture

19 Feb 2016 - 9:58 pm | अभिजित - १

भारतात आत्ता पण बरेच jew लोक राहतात . इथे मुंबई / ठाणे / अलिबाग जवळपास. आणि हो केरळ मध्ये पण आहेत.

सूर्याजीपंत's picture

24 Feb 2016 - 2:14 am | सूर्याजीपंत

सयाम आणि कट्सा हे मोसाद चे हे दोन्ही assets खूप महत्वाचे आहेत. बोका भाऊ आता स्टोरीलाईन मध्ये मायर अमीट अमान मधून मोसाद मध्ये आलीच आहे तर त्याने संघटने मध्ये घडवलेले बदल, एजंट्स च्या कामांचे वर्गीकरण, संघटनेच्या मुलभूत तत्वांची बांधणी याबद्दल पण जरा येऊ दे. मायर अमीट हे आपल्या RN Kao यांच्या समतुल्य मानले जातात, तर त्यांच्या बद्दल पण जरा येऊ दे.
बाकी लेख उत्तम, म्हणजे माझ्यासारख्या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यासाठी इंग्लिश पुस्तक वाचून माहिती मिळते पण समाधान मिळत नाही. हे वाचल्यावर काही प्रश्नच नाही, आणि इतकी उत्कंठा पहिल्यांदा इंग्लिश मध्ये वाचताना जाणवली नाही पण स्टोरी माहित असून सुद्धा जाणवली, सगळं श्रेय लेखकाला. जेब्बात !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2016 - 11:42 am | डॉ सुहास म्हात्रे

खिळवून ठेवणारा चित्तथरारक भाग ! ही लेखमाला एक कायम वाखू म्हणून साठवली आहे.

गुल्लू दादा's picture

17 Feb 2016 - 7:51 pm | गुल्लू दादा

बोका भाऊ तुम्हाला कडक सलाम....अफलातून चालू आहे मालिका..प्रतिक्षेत

कविता१९७८'s picture

18 Feb 2016 - 2:02 pm | कविता१९७८

नेहमी प्रमाणे रोमान्चक माहीती

नाखु's picture

18 Feb 2016 - 2:15 pm | नाखु

आणि अफाट

धुराळी धाग्यांवर हा हाजमोला पाहिजेच होता !!!!!!

जेपी's picture

20 Feb 2016 - 10:00 am | जेपी

वाचतोय

प्रसद जोशि's picture

20 Feb 2016 - 1:10 pm | प्रसद जोशि

फारच छान,

पैसा's picture

22 Feb 2016 - 7:15 pm | पैसा

दुर्दैवी हेर. लिखाण थरारक होतं आहेच.

पिलीयन रायडर's picture

23 Feb 2016 - 2:12 pm | पिलीयन रायडर

पुढचा भाग? ११ फेब ला हा भाग टाकला होता.. आज २३ फेब.. खुप दिवस झाले ना सर!!

मी-सौरभ's picture

1 Mar 2016 - 8:16 pm | मी-सौरभ

आज १ मार्च ऊजाडला पण मोसाद काय पुढे जाईना

पु. भा. प्र.

पद्मावति's picture

1 Mar 2016 - 10:27 pm | पद्मावति

जबरदस्त!

असंका's picture

2 Mar 2016 - 7:23 am | असंका

दुर्दैव!!

(सुंदर लिहिताय...धन्यवाद!)

सतीश कुडतरकर's picture

2 Mar 2016 - 4:45 pm | सतीश कुडतरकर

जबरदस्त!

बोका-ए-आझम's picture

2 Mar 2016 - 9:18 pm | बोका-ए-आझम

कालच THE SPY हि एली कोहेन वर आधारित नेटफ्लिक्स ची सिरीज पाहिली. त्यात कोहेन ने 'कामिल अमीन ताबेत' असं नाव धारण केलंय. गुगल वर पाहिले तर दोन्ही नावांचा उल्लेख दिसतो (कमाल अमीन साबेत). खरं तर साशा बरोन कोहेन या विनोदी अभिनेत्याकडून एली कोहेन चे गंभीर पात्र वठवणे हा किंचीत आश्चर्याचा धक्काच होता. मात्र साशा बरोन कोहेन ने पात्राला न्याय दिलाय असं म्हणता येईल. सहा भागांची मिनिसिरीज जबरदस्त आहे. एली कोहेन सीरिया च्या डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर होण्यापर्यंत मजल मारतो म्हणजे सीरियन राज्यव्यवस्था किती आतपर्यंत पोखरली गेली होती याचा प्रत्यय येतो. तसेच मोसाद संघटनेचं कौतुकही वाटतं. वरील लेखात म्हटल्याप्रमाणे एली कोहेन सीरियन राष्ट्राध्यक्षाचा मित्र होता तरी पण त्याला सीरियाच्या रशिया कडून आणलेल्या सिग्नल डिटेक्टर मशीनबद्दल आणि जागोजागी ते सिग्नल शोधण्याच्या रुटिनबद्दल माहिती नसावी हे पटत नाही. एली मानसिकरीत्या एकटा पडला असला तरी मॉर्स कोड ने संदेश पाठवताना त्याने हवी ती काळजी घेतली नाही हे देखील पटत नाही.
आणखी एक मुद्दा म्हणजे ओसामाच्या बापाबद्दल ('मोहंमद बिन लादेन') नव्याने माहिती कळाली. सीरिया च्या SHALLAL या प्रोजेक्ट? (कारस्थान) चा सूत्रधार हा मोहंमद बिन लादेन होता. त्यासाठी लागणारं शेतकी सामान हे एलीच्या कंपनीमार्फत मागवलं गेलं. इतकं असूनही एली कोहेन ला त्याबद्दल जास्त माहिती देण्यात आली नाही. पण मिळालेल्या जुजबी माहितीच्या आधारावर एली ने काढलेला अचूक निष्कर्ष आणि इसरेली सैन्याने केलेली कारवाई यामुळे इज्राइलचे पाणी अडवणे सीरियाला शक्य झालं नाही.
म्हणूनच १६ डिसेंबर १९२४ या दिवशी अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे जन्म झालेल्या एलियाहू उर्फ एली कोहेनबद्दल जगभरातल्या इतिहासकारांचं आणि हेरगिरी तज्ञांचं एकच मत आहे – मोसादच्या, किंबहुना जगातल्या सर्वश्रेष्ठ हेरांपैकी एक. याचा सिरीज पाहताना जागोजागी प्रत्यय येतो.
एकंदरीत, आवर्जून पाहावी अशी सिरीज आहे.

टर्मीनेटर's picture

29 Jul 2021 - 11:54 pm | टर्मीनेटर

हा भाग वर आणल्याबद्दल आभार!
मोसाद ही माझी मिपा वरची ऑल टाईम फेव्हरीट मालिका आहे. अनेक वेळा वाचलेला असूनही आज पुन्हा हा भाग वाचताना त्यात गुंगून गेलो!

गॉडजिला's picture

30 Jul 2021 - 1:23 am | गॉडजिला

सिरीजमधे ज्या सहजतेने (?) तो पकडला जातो ते जरा संशयास्पद वाटतेच कदाचीत म्हणूनच नक्की काय झाले ते फार फिरवून फिरवून सादर केले आहे...

रियल स्टोरी बहुदा वेगळीच असावी