.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , "भाग ९ - अनैसर्गिक निवड
मनुष्यप्राण्याने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारे नवीन प्राणी आणि वनस्पती बनवले आहेत. पंधरावीस बंद बिया लगडलेल्या चारपाच इंचाच्या लोंबीपासून चांगले फूटभर लांबीचे, शेकडो उघड्या दाण्यांनी भरलेले मक्याचे कणीस देणारे झाड बनवले. लांडग्यासदृश प्राण्याच्या एका जातीपासून कुत्र्यांच्या शेकडो वैविध्यपूर्ण जाती बनवल्या. कुंभार जसा हाताने भांड्याला आकार देतो, घडवतो तसे अक्षरशः कुत्र्यांचे वेगवेगळे अवयव घेऊन ते पिढ्यान् पिढ्या पैदास करून त्यांचे आकार हळुवार बदलले. हे करण्यासाठी त्याने शेकडो वर्षे चालणारी, निवडीची प्रक्रिया वापरली. मानवाने हस्तक्षेप करून, आपल्या बुद्धीने हे प्रयत्न केलेले असल्यामुळे या निवडीला मानवी, कृत्रिम किंवा अनैसर्गिक निवड असे म्हणता येईल. ही निवड करणारा कर्ता मानव आहे. चाकावर फिरणाऱ्या मातीला योग्य ठिकाणी हात लावून, योग्य तेवढंच बल लावून तो आकार घडवतो. तसे बल लावणारे कोणी नसेल तर हीच निवडीची प्रक्रिया आपोआप, किंवा नैसर्गिकरीत्या घडू शकते का? डार्विनने जेव्हा या प्राण्यांच्या पैदाशीतून होणारे बदल पाहिले तेव्हा हाच प्रश्न विचारला - हे किंवा अशा प्रकारचे, नवीन प्रजाती निर्माण करणारे बदल नैसर्गिकरीत्या घडून कसे येतील?
मानवी किंवा अनैसर्गिक निवडींतून प्रजातीत बदल घडवून आणण्यासाठी काय गोष्टी आवश्यक असतात? समजा आपल्याला कणसाची लांबी वाढवायची आहे तर त्यासाठी मुळात त्या पिकात काय असायला हवे? एक म्हणजे जो गुणधर्म बदलायचा आहे, त्यात वैविध्य हवे. दुसरे म्हणजे तो विशिष्ट गुणधर्म निवडण्यासाठी काहीतरी निकष - कणसाच्या बाबतीत 'जितके अधिक लांब तितके चांगलं'. तिसरे म्हणजे आपोआप घडणारे जनुकीय बदल - ज्याला मी थोडक्यात 'आजब' असे म्हणतो - ते सर्वच जीवांमध्ये दिसून येतात. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकषावर पास होणारांची पैदास करणे आणि नापास होणारांची पैदास न करणे याची व्यवस्था.
यापैकी पहिल्या तीन गोष्टी सर्वच सजीवसृष्टीत दिसून येतात. बहुतेक प्राण्यांमध्ये (जुळे सोडले तर) एक प्राणी हुबेहुब दुसऱ्यासारखा नसतो. बैलांच्या शिंगांची लांबी, हत्तींची वजने, हरणांचा धावण्याचा वेग हे कमी जास्त असतात. माणसांच्या उंचीसारखंच - सर्वसाधारण भारतीय पुरुष पाच फूट सात इंचाच्या आसपास असतात. काही थोडे उंच काही अजून बुटके. आणि जसजसे आपण या मध्यम उंचीच्या खूप वर किंवा खूप खाली जाऊ तसतसे त्या उंचीच्या लोकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. पण काही खूप उंच आणि काही खूप बुटके असे वैविध्य सापडेल. दुसरी गोष्ट म्हणजे 'कुठचा गुणधर्म वाढवणे चांगले?' हे परिस्थितीनुसार ठरते. यासाठी नेहेमीच एकच एक सरळधोपट उत्तर असते असे नाही. पण चित्ते जर हरणांचा पाठलाग करून त्यांना मारून खात असतील तर अर्थातच दोन्ही प्रजातींसाठी वेग वाढवणे ही चांगली बाब आहे. उंच झाडे आसपास असतील तर जिराफांच्या माना लांब होणे हे जिराफांसाठी चांगले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपोआप घडणारे जनुकीय बदल - आजब (जेनेटिक म्यूटेशन्स) - हे तर सर्वच प्राण्यांमध्ये कायम होत असतात.
आता शेवटी प्रश्न येतो तो या निकषांवर उतरणारांची निवड करून अधिक प्रमाणावर पैदास करणे आणि निकषांवर न उतरणारांची पैदास कमी करणे याची खातरजमा करणाऱ्या व्यक्ती अथवा व्यवस्थेची. अनैसर्गिक निवडीमध्ये हाच भाग नेमका कोणीतरी सुजाण व्यक्ती करते. केवळ आसपासच्या परिस्थितीतून हे आपोआप कसे घडून येईल?
याचे उत्तर डार्विनला सापडले ते माल्थसच्या निबंधात. १७९८ साली माल्थसने 'लोकसंख्यावाढीच्या तत्त्वांबाबत एक निबंध' या नावाचा तो प्रसिद्ध केला. हा निबंध प्रसिद्ध होऊन तीनशे वर्षे होऊन गेली तरी लोकसंख्येच्या स्फोटातून होऊ शकणाऱ्या तुटवड्याला 'माल्थसचा कॅटेस्ट्रोफ' असे नाव आहे. त्यात माल्थसने मांडलेले विचार असे-
१. लोकसंख्या ही वाढतच जाते.
२. अन्नपुरवठ्यात होणारी वाढ मर्यादित आहे.
३. त्यामुळे कितीही कमी लोकसंख्येपासून सुरूवात केली, आणि कितीही भरपूर अन्नपुरवठा असला तरी शेवटी लोकसंख्या चक्रवाढीने वाढून अन्न कमी पडणार.
४. असलेली जमीन कसायला अधिकाधिक लोक उपलब्ध होतील, त्यामुळे मजुरी कमी कमी होत जाईल. कमकुवतांना काम मिळणार नाही. यातून त्यांच्यात गरीबी वाढणार.
५. सर्वात गरीब/कमकुवत लोक अन्नान्न दशा होऊन, आणि रोगराईने तडफडून मरणार. कारण शेवटी अन्नपुरवठा मर्यादित आहे.
थोडक्यात मनुष्यजातीत जी हलाखीची परिस्थिती दिसते आहे, ती अटळ आहे. कारण जर कमकुवतांना आधार देऊन त्यांना जगवले तर ते आणखीन संतती निर्माण करून प्रश्न अजूनच गंभीर करणार. त्यामुळे कमकुवत किंवा गरीब लोकांची परिस्थिती सुधारून फायदा नाही. काहीही केले तरी ते मरणारच.
माल्थसचे विचार आता मागे वळून बघताना काहीसे पुरातन वाटतात. कारण विशेषतः गेल्या शंभर वर्षांत लोकसंख्या अनेकपट झाली तरीही अन्नान्न होऊन मरण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. संततीनियमनाच्या साधनांमुळे, लग्ने उशीरा होत असल्यामुळे लोकसंख्याही २०५०च्या सुमाराला स्थिरावेल, आणि नंतर घसरेलसुद्धा अशी चिन्हे दिसताहेत. पण त्यावेळी जी परिस्थिती होती तीत माल्थसचे विचार पटण्याजोगे होते. अनेक विचारवंतांनी त्यांची दखल घेऊन सरकारकडे गरीबांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
मात्र डार्विनला यातून आपोआप लोकसंख्या मर्यादित ठेवण्याची आणि विशिष्ट गुणधर्मांच्या प्रजेला नष्ट करण्याची नैसर्गिक यंत्रणा दिसली. मर्यादित अन्नपुरवठ्यासाठी माणसांमधली होणाऱ्या स्पर्धेची त्याने सर्व सजीवसृष्टीसाठीच कल्पना केली. समजा एका जंगलात भरपूर हरणे आहेत. तिथे काही मोजके चित्ते आले. सुरूवातीला त्यांच्यासाठी अन्नाची लयलूट असेल. पहिल्या काही पिढ्या भरपेट खातील. त्यांची बरीच पिल्ले वाढतील. आणि वेगाने लोकसंख्या वाढेल. कारण तेच - भरपूर अन्नपुरवठा. पण जसजशी लोकसंख्या वेगाने वाढेल, तेव्हा एक वेळ अशी येईल की असलेल्या हरणांची संख्या त्या चित्त्यांसाठी पुरेनाशी होईल. मग अर्थातच अधिक सक्षम चित्त्यांनाच केवळ शिकार मिळेल. या सक्षमतेमध्ये अर्थातच अनेक गोष्टी येतात - त्यांचा धावण्याचा वेग, डोळ्यांची क्षमता, दातांची धार आणि रचना, पंज्यांचे आकार - सर्व गोष्टी एकत्रितपणे हरणे पकडण्यासाठी आवश्यक असतात. जसजशा पिढ्या जात जातील तसतसे या एकत्रित बाबींमध्ये मागे असणारे चित्ते कमी होत जातील, आणि पुढच्या पिढ्या अधिकाधिक सक्षम होताना दिसतील. हीच नैसर्गिक निवडीची प्रक्रिया. यासाठी कोणीच ती घडवून आणण्याची किंवा तिला दिशा देण्याची गरज पडत नाही.
आत्तापर्यंतच्या चार अब्ज वर्षांत सजीवसृष्टीत प्रचंड स्थित्यंतरे येऊन गेली. अनेक प्रजाती निर्माण झाल्या, बदलल्या, त्यांच्या पालक प्रजाती नामशेष झाल्या - हे अनेक वेळा झाले. कधी तत्कालीन परिस्थितीत तग धरण्यासाठी आकार वाढणे सोयीचे होते, तर कधी त्याच प्रजातीसाठी आकार कमी होणे सोयीचे व्हायला लागले. नैसर्गिक निवडीतून त्यांचे आकार सोयीप्रमाणे बदलले. 'तत्कालीन परिस्थिती' ही कायम बदलणारी, चंचल असत आलेली आहे. त्यांतून बदलणारे प्राणी इतर प्राण्यांसाठी बदललेली परिस्थिती बनतात. त्यातून पुन्हा बदलण्याचा जोर त्या प्राण्यांवर येतो. हे चक्र चालूच राहाते. असा अंदाज आहे की गेल्या काही अब्ज वर्षांत आत्तापर्यंत जन्माला आलेल्या ९९.९% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. आत्ता आपल्याला दिसणारे जैववैविध्य - लक्षावधी प्रजाती - हे पुन्हा संपूर्ण काळात जगलेल्या वैविध्याच्या एक सहस्रांशांनीही नाही! इतक्या प्रचंड काळाच्या महाप्रचंड उदरात गडप झालेले जगड्व्याळ विश्वाची आपल्याला कल्पनाही करता येत नाही!
'संगमरवरातून संगमरवर काढला की संगमरवर शिल्लक राहातो' - पुतळा घडण्यासाठी संगमरवरी दगडातून अनावश्यक संगमरवर काढून टाकावा लागतो. तेव्हा कुठे शिल्लक राहिलेला संगमरवर हा मूर्तीच्या आकाराचा बनतो. मूर्ती बनवणारा हात हा एका अर्थाने योग्य त्या संगमरवराची निवड करतो - आणि निरुपयोगी संगमरवर काढून टाकतो. हा निर्णय घेणारा डोळस असतो. मात्र नैसर्गिक निवडीच्या बाबतीत काम करणारा हात आंधळ्या निसर्गाचा असतो. निसर्गाला 'प्राणी अमुक प्रकारचे बनावेत, त्यांत हे हे गुणधर्म असावेत' अशी इच्छा नसते. प्राणीमात्र आणि इतर पंचमहाभूतं यांनी बनलेल्या निसर्गात प्रत्येक प्राणी आपली जागा धरून असतो. या जागेत टिकून राहाण्यासाठी असलेले गुणधर्म ज्यांच्याकडे अधिक प्रमाणात असतील, ते टिकतात, कमी प्रमाणात असतील ते पुरेसा काळ जगत नाहीत. ते गुणधर्म नको असलेल्या संगमरवराप्रमाणे नाहीसे होतात. कोणी काढून टाकत नाही, पण आपोआप गळून निघून जातात. आपल्याला आज दिसणारा सृष्टीच्या संगमरवरी पुतळ्याचा आकार हा असाच अब्जावधी तुकडे गळून जाऊन ताशीव रेखीव झालेला आहे. आणि याला कारणीभूत आहे ती नैसर्गिक निवडीची छिन्नी-हातोडी.
प्रतिक्रिया
31 Dec 2015 - 4:49 am | V.s.aivalli 1
Chaan
31 Dec 2015 - 7:23 am | एस
सोप्या भाषेत लिहिलेय. आवडलं.
31 Dec 2015 - 12:21 pm | sagarpdy
मस्त.
इन्फ़र्नो ची आठवण झाली.
1 Jan 2016 - 9:02 am | अनुप ढेरे
आवडला हाही भाग.
25 Jan 2016 - 12:51 pm | मराठी कथालेखक
मानवाला पुर्वी शेपटी होती आणि नंतर उत्क्रांतीत नाहीशी झाली असे म्हंटले जाते ? या उत्क्रांतीची वा नैसर्गिक निवडीची काय कहाणी असावी ?
26 Jan 2016 - 2:16 am | राजेश घासकडवी
माणसाची शेपटी नष्ट होणं हेही नैसर्गिक निवडीचंच उदाहरण आहे. शेपटी अंगावर वागवायची म्हणजे त्यासाठी शरीराचे रीसोर्सेस वापरले जातात. जर त्या शेपटीचा तितकासा उपयोग होत नसेल तर ती लोढणं होते. त्यामुळे जिराफाची मान लांब झाली तशीच ती शेपटीही लहान होत गेली. ज्या अर्भकांना किंचित लहान शेपटी होती त्यांना जनुकीय फायदा झाला, कारण शेपटी बाळगण्यासाठी जो खर्च झाला असता तोच खर्च इतर गोष्टींसाठी करता आला. असं पिढ्यानपिढ्या झाल्यावर बिनशेपटीचे प्राणी दिसायला लागले.