.
मोसाद - भाग १
मोसाद - भाग २
मोसाद - भाग ३
मोसाद - भाग ४
३ जानेवारी १९४६. न्यूरेम्बर्ग, जर्मनी. सगळ्या जगाला एका फटक्यात बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं. संहार, व्याप्ती, क्रौर्य या सगळ्याच बाबतीत एकमेवाद्वितीय असलेल्या या युद्धानंतर तशीच एक अभूतपूर्व घटना घडली होती. अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या विजेत्या राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या नेत्यांवर त्यांनी युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान केलेल्या अत्याचारांबद्दल खटला भरला होता. ११ उच्चपदस्थ नाझी अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी हा खटला सुरु झाला आणि आता नाताळच्या सुट्टीनंतर न्यायालयाचं कामकाज परत सुरु झालं होतं. न्यायमूर्ती फ्रान्सिस बिडल यांच्यासमोर सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून डिटर विस्लीसेनी नावाचा एक एस.एस. अधिकारी उभा होता. स्लोव्हाकिया आणि हंगेरी इथून ज्यूंना पोलंडमधल्या ऑशविट्झ मृत्युछावणीपर्यंत पोहोचवणं ही त्याच्याकडे असलेली जबाबदारी होती. प्रॉसिक्युटर रॉबर्ट जॅक्सन त्याला प्रश्न विचारत होते. बोलता बोलता विस्लीसेनी म्हणाला, की त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यूंना पाठवण्याचा हा जो आदेश आलेला होता, त्याच्या सत्यतेबद्दल शंका होती. तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला एस.एस. प्रमुख हाइनरिक हिमलरने सही केलेलं एक पत्र दाखवलं. या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं: फ्युहररने ज्यूंच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर (जर्मन भाषेत Endlosung der Judenfrage, इंग्लिश भाषेत Final Solution of the Jewish Question) कार्यान्वित करण्याचा आदेश दिलेला आहे. यावर जॅक्सनचा प्रतिप्रश्न होता: अंतिम उत्तर या शब्दांचा अर्थ तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितला होता का? त्यावर विस्लीसेनीने होकारार्थी उत्तर दिलं: युरोपातील सर्व ज्यू वंशीयांचा योजनाबद्ध संहार.
विस्लीसेनी पुढे हेही म्हणाला: “ या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संपूर्ण युरोपातून येणाऱ्या ज्यूंना वेगवेगळ्या मृत्यूछावण्यांमध्ये पाठवण्याची जबाबदारी होती. जेव्हा मी त्याला या अंतिम उत्तराची व्याप्ती विचारली, तेव्हा त्याने मला थंडपणे असं सांगितलं – ‘ मी जेव्हा मरेन तेव्हा अत्यंत समाधानाने मरेन कारण ६० लाख ज्यूंच्या मृत्यूची जबाबदारी माझ्या डोक्यावर असेल. त्यामुळे अगदी हसत हसत मी माझ्या थडग्यात प्रवेश करेन.’ ”
हे ऐकून संपूर्ण न्यायालय सुन्न होऊन गेलं. जॅक्सनने विस्लीसेनीला या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं – अॅडॉल्फ आइकमन!
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
या घटनेनंतर तब्बल ११ वर्षांनी मोसाद संचालक इसेर हॅरेलला इझराईलच्या पश्चिम जर्मनीमधल्या वकिलातीकडून एक अजब संदेश मिळाला. या संदेशात असं म्हटलं होतं, की पश्चिम जर्मनीमधल्या हेसे प्रांताचा अॅटर्नी जनरल डॉ. फ्रित्झ बॉवर याच्याकडे मोसादसाठी काही महत्वाची माहिती आहे आणि ती मोसादला देण्याची त्याची इच्छा आहे. हॅरेल अर्थातच बॉवरला ओळखत होता. १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर नाझींनी ज्यूंसाठी छळछावण्या उभारायला सुरुवात केली. यातली पहिली छावणी म्हणजे डाखाऊ (Dachau). इथे जे ज्यू सर्वात पहिल्यांदा पाठवण्यात आले, त्यांच्यामध्ये डॉ.बॉवरचा समावेश होता. पण तिथून त्याने सुटका करून घेतली आणि तो प्रथम डेन्मार्कला आणि तिथून स्वीडनमध्ये गेला. युद्ध संपल्यावर जर्मनीमध्ये परत आल्यावर त्याची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ.बॉवरसाठी राजकारणात पडण्याचा एकमेव हेतू होता नाझी गुन्हेगारांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर खटले भरून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांप्रमाणे शिक्षा होईल अशी व्यवस्था करणं. या कमी पश्चिम जर्मन सरकार कमी पडतंय अशी त्याची तक्रार होती, जी काही प्रमाणात खरीही होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे जर्मन जनतेला आणि सरकारलाही आपला काळा भूतकाळ परत परत उगाळायची इच्छा नव्हती. दुसरं कारण म्हणजे युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान नाझी पक्ष किंवा एस.एस. किंवा दोन्हींचे सभासद असलेल्या पण या ना त्या कारणाने अटक न झालेल्या अनेक जणांनी योजनापूर्वक पश्चिम जर्मनीच्या केंद्रीय आणि प्रांतिक सरकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिरकाव केलेला होता. काही जण तर मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते. पोलिस, सरकारी वकिलांचं ऑफिस, अंतर्गत सुरक्षा मंत्रालय – अशा अनेक ठिकाणी या पूर्वाश्रमीच्या नाझींनी जम बसवलेला होता. त्यामुळे पश्चिम जर्मनीमध्ये एखाद्या नाझी गुन्हेगारावर खटला भरून त्याला शिक्षा होणं ही खूप कठीण गोष्ट होती. याच कारणामुळे बॉवरची त्याच्याकडे असलेली माहिती पश्चिम जर्मन सरकारला देण्याची इच्छा नव्हती.
१९५७ च्या नोव्हेंबरमध्ये हॅरेलने शॉल दारोम नावाच्या एका मोसाद एजंटला डॉ.बॉवरला भेटण्यासाठी म्हणून जर्मनीला पाठवलं. तो आणि बॉवर फ्रँकफर्टमध्ये भेटले. तिथून परत आल्यावर दारोम हॅरेलला भेटला आणि त्याने बॉम्ब टाकला – डॉ.बॉवरच्या मते आइकमन जिवंत आहे आणि सध्या अर्जेन्टिनामध्ये दडून बसलेला आहे.
हॅरेलने त्याच्याकडे रोखून पाहिलं. अॅडॉल्फ आइकमन कोण आहे आणि कशा प्रकारे ५० ते ६० लाख पूर्व आणि पश्चिम युरोपियन ज्यूंच्या मृत्युला तो जबाबदार आहे, हे त्याला अगदी व्यवस्थित माहित होतं. युद्धानंतर आइकमन मरण पावला असा एक प्रवाद होता. काही जणांच्या म्हणण्यानुसार तो इजिप्त किंवा सीरियामध्ये होता. जगद्विख्यात नाझी शिकारी सायमन विझेन्थालच्या मते आइकमन दक्षिण अमेरिकेत होता. विझेन्थालने आइकमनच्या उर्वरित कुटुंबावर पाळत ठेवली होती. १९५२ मध्ये त्याचं कुटुंब ऑस्ट्रियामधून अचानक गायब झालं. त्यानंतर विझेन्थालने ते दक्षिण अमेरिकेमध्ये गेल्याचं शोधून काढलं होतं. पण नक्की कुठे हे त्यालाही माहित नव्हतं. आणि आता डॉ.बॉवरच्या मते आइकमन अर्जेन्टिनामध्ये होता.
दारोमने डॉ.बॉवरकडे ही बातमी कशी आली, ते हॅरेलला सांगितलं. काही महिन्यांपूर्वी डॉ.बॉवरला एक पत्र मिळालं होतं. लोथार हरमान नावाच्या एका माणसाने हे पाठवलं होतं. हरमानचे वडील ज्यू होते. नाझी जर्मनीमध्ये अशा लोकांनाही ज्यू म्हणूनच मानण्याचा कायदा असल्यामुळे हरमानचाही नाझींकडून छळ झाला होता. युद्धानंतर तो त्याची पत्नी आणि तरुण, सुस्वरूप मुलीबरोबर अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाला होता. या मुलीचं नाव होतं सिल्व्हिया.
एका डेटिंग एजन्सीमार्फत सिल्व्हियाला एका तरुणाचं नाव आणि पत्ता मिळाला होता. त्याला भेटून आल्यावर तिने आपल्या वडिलांना त्याचं नाव सांगितलं – निक आइकमन. हरमानला आश्चर्याचा धक्का बसला. हा मुलगा अॅडॉल्फ आइकमनशी संबंधित असू शकेल अशी शंका त्याच्या मनात आली आणि त्याने डॉ.बॉवरला पत्र पाठवलं.
सायमन विझेन्थालकडून आइकमनचं कुटुंब ऑस्ट्रियाहून दक्षिण अमेरिकेत पळून गेल्याचं डॉ.बॉवरला समजलं होतंच. आपले अधिकार आणि ओळखी वापरून डॉ.बॉवरने हे शोधून काढलं, की आइकमनची पत्नी व्हेरा आणि तिची तीन मुलं ऑस्ट्रियाहून अर्जेन्टिनाला पळून गेली आणि तिथे व्हेराने दुसरं लग्न केलं. हरमानच्या पत्रामुळे ते अर्जेन्टिनामध्ये कुठे आहेत, त्याची कल्पना बॉवरला आली होती – ब्युनोस आयर्स. अर्जेन्टिनाची राजधानी. व्हेरा अचानक ऑस्ट्रियामधून मुलांसकट पळून गेली, कारण आइकमनने तिच्याशी संपर्क साधला असणार आणि तिथे जाऊन तिने दुसरं लग्न वगैरे काहीही न करता दुसऱ्या नावाने राहात असलेल्या आइकमनशी लग्न केलं असणार असा डॉ.बॉवरचा अंदाज होता.
ही माहिती जर आपण पश्चिम जर्मन सरकारला दिली, तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी सार्थ भीती डॉ.बॉवरला वाटत होती. शिवाय महायुद्ध संपल्यावर अनेक नाझी अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाले होते, आणि तिथल्या सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या करत होते. त्यामुळे जरी पश्चिम जर्मन सरकारने अर्जेंटिनियन सरकारशी संपर्क साधून आइकमनच्या अटकेची आणि प्रत्यार्पणाची मागणी केली, तरी अर्जेन्टिनामधून त्याची अंमलबजावणी होईलच याची काही खात्री नव्हती. सर्वात वाईट म्हणजे जर आइकमनला कोणी त्याच्या मागावर असल्याची बातमी दिली, तर तो पुन्हा एकदा गायब होईल आणि मग त्याला पकडण्याची संधी परत येऊ शकणार नाही ही शक्यताही होतीच.
त्यामुळे बॉवरला ही कामगिरी इझराईलने, पर्यायाने मोसादने पार पाडावी असं वाटत होतं. ब्युनोस आयर्समधला हा माणूस खरोखर आइकमन आहे की नाही हे शोधून काढणं आणि जर तो आइकमन असेल, तर इझराईलने त्याच्या प्रत्यार्पणाची अर्जेन्टिनाकडे मागणी करणं किंवा आइकमनला तिथून उचलून इझराईलमध्ये आणणं आणि त्याच्यावर खटला भरणं – हे करावं, नव्हे, करायलाच पाहिजे, असं डॉ.बॉवरला वाटत होतं. अर्थात, बॉवर त्याच्या वैयक्तिक अधिकाराने हे बोलत होता. पश्चिम जर्मनीमधल्या एका प्रांताचा अॅटर्नी जनरल म्हणून नव्हे. तो मोसादच्या प्रतिनिधीला भेटतोय, हे फक्त हेसे प्रांताचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑगस्ट झिन यालाच माहित होतं, आणि ते तसंच राहावं अशी बॉवरची इच्छा होती.
हॅरेलला ही माहिती दिल्यावर दारोमने त्याच्यासमोर एक कागद ठेवला. या कागदावर आइकमनचा ब्युनोस आयर्समधला संभाव्य पत्ता लिहिला होता – ४२६१, चकाब्युको स्ट्रीट, ओलीव्होस, ब्युनोस आयर्स.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
१९५८ च्या जानेवारीत मोसाद एजंट एमॅन्युएल ताल्मोर ब्युनोस आयर्समध्ये आला. चकाब्युको स्ट्रीटवरून त्याने अनेक फेऱ्या मारल्या, आणि जे काही दिसलं, ते त्याला आवडलं नाही. ओलीव्होस हा ब्युनोस आयर्समधला निम्न मध्यमवर्गीय भाग होता. इथली वस्ती ही प्रामुख्याने कामगारांची होती. बैठी, बऱ्या स्थितीतल्या झोपड्या म्हणावं अशी घरं होती. ४२६१ क्रमांकाचं घरही असंच होतं. त्याच्या छोट्या आवारात ताल्मोरला एक लठ्ठ आणि विटके कपडे घातलेली स्त्री दिसली.
“हे आइकमनचं घर असेल असं मला वाटत नाही,” तेल अवीवला परतल्यावर ताल्मोर हॅरेलला म्हणाला, “आइकमन नक्कीच भरपूर पैसे घेऊन अर्जेन्टिनामध्ये आला असणार. जवळपास सगळ्या नाझी आणि एस.एस. अधिकाऱ्यांनी १९४४ मध्येच आपल्या पलायनाची तयारी सुरु केली होती. असल्या झोपडपट्टीत आइकमन राहात असेल असं मला वाटत नाही. ती बाईसुद्धा व्हेरा आइकमनसारखी दिसत नव्हती.”
सुदैवाने ताल्मोरच्या आक्षेपांना धूप न घालता हॅरेलने तपास तसाच चालू ठेवायचं ठरवलं, पण त्याला आता बॉवरला ही माहिती ज्याने दिली, त्याला भेटायची इच्छा होती. बॉवरने ताबडतोब लोथार हरमानची माहिती दिली. हरमान आणि त्याचं कुटुंब आता ब्युनोस आयर्सपासून ३०० मैल दूर असलेल्या कोरोनेल सुआरेझ या शहरात राहात होते.
फेब्रुवारी १९५८ मध्ये एफ्राइम हॉफस्टेटर कोरोनेल सुआरेझमध्ये जाऊन लोथार हरमान आणि त्याची मुलगी सिल्व्हिया या दोघांना भेटला. हॉफस्टेटर मोसादचा एजंट नव्हता, तर तेल अवीवचा पोलिसप्रमुख होता. पोलिसांची आंतरराष्ट्रीय संघटना इंटरपोलची एक कॉन्फरन्स त्यावेळी ब्युनोस आयर्समध्ये होती. हॉफस्टेटर त्याच्यासाठी आला होता, आणि त्याने मोसादसाठी एवढं एक काम करायचं कबूल केलं होतं.
लोथार हरमान आंधळा होता. नाझी सत्तेवर आले, तेव्हा तो एक पोलिस अधिकारी होता, पण नाझींच्या ज्यूंना जर्मनीमधल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याच्या धोरणामुळे त्याची नोकरी गेली आणि त्याला डाखाऊ छळछावणीत टाकण्यात आलं. तिथे त्याची दृष्टी गेली. युद्धानंतर त्याची सुटका झाली आणि मग तो आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर अर्जेन्टिनामध्ये आला.
त्याने हॉफस्टेटरची आपल्या मुलीशी ओळख करून दिली आणि तिने आता पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
जवळजवळ दीड वर्षांपूर्वी ती आणि तिचं कुटुंब ब्युनोस आयर्सच्या ओलीव्होस भागात राहात होतं. तिथे तिची आणि निक आइकमनची भेट झाली होती. दोघेही एकत्र फिरायला जात असत. तिने आपण ज्यू आहोत हे त्याला सांगितलं नव्हतं, पण निकच्या मनात ज्यूंबद्दल असलेले विचार तिच्या लक्षात आले होते. एकदा असंच बोलताना तो म्हणाला होता, की जर्मनांनी ज्यूंचा पूर्ण निकाल लावून मगच शरणागती पत्करायला हवी होती. नंतर एकदा त्याने त्याच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्यातले अधिकारी म्हणून काम केल्याचं आणि जर्मनीप्रती आपलं कर्तव्य पार पाडल्याचं सांगितलं होतं.
निक आणि सिल्व्हिया इतके वेळा भेटले होते, पण त्याने एकदाही तिला त्याच्या घरी बोलावलं नव्हतं. ती ब्युनोस आयर्स सोडून कोरोनेल सुआरेझला राहायला गेल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार होता, पण तिची पत्रं तो स्वतःच्या घराच्या पत्त्यावर स्वीकारत नव्हता. तिला तिची पत्रं निकच्या एका मित्राच्या पत्त्यावर पाठवावी लागत.
निकच्या या विचित्र वागण्यामुळे लोथार हरमानला संशय आला आणि त्याने सिल्व्हियाबरोबर ब्युनोस आयर्सला जाऊन याचा छडा लावायचं ठरवलं. तिथे तिने काही मित्रांकडून निकचा पत्ता शोधून काढला आणि ती त्याच्या घरी गेली. निक घरी नव्हता, पण तिचं स्वागत एका चष्मा घातलेल्या, टक्कल पडलेल्या आणि बारीक मिशी असलेल्या माणसाने केलं. त्याने तिला निक त्याचा मुलगा असल्याचं सांगितलं.
हरमानची परत एकदा ब्युनोस आयर्सला जाऊन तो माणूस नक्की कोण आहे, ते शोधून काढायची तयारी होती. सिल्व्हियाही त्याच्याबरोबर असणार होती. हॉफस्टेटरने त्याला शोधून काढायच्या गोष्टींची यादी दिली – त्या माणसाचा फोटो, सध्याचं नाव, कुठे काम करतो तो पत्ता, एखादं अधिकृत कागदपत्र आणि त्याचे बोटांचे ठसे.
काही महिन्यानंतर हरमानचा रिपोर्ट मोसाद हेडक्वार्टर्समध्ये आला. त्याच्यात त्याने आपण आइकमनबद्दल सगळं शोधून काढल्याचं म्हटलं होतं. चकाब्युको स्ट्रीटवरचं ते घर फ्रान्सिस्को श्मिड नावाच्या एका ऑस्ट्रियन माणसाने दहा वर्षांपूर्वी बांधलं होतं आणि दोन कुटुंबांना भाड्याने दिलं होतं – दागुतो आणि क्लेमेंट. हरमानने श्मिड हाच आइकमन असल्याचं ठासून सांगितलं होतं. त्याच्या मते दागुतो आणि क्लेमेंट ही दोन्ही नावं म्हणजे आइकमनची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न होता.
हॅरेलने मोसादच्या ब्युनोस आयर्समधल्या प्रतिनिधीला या माहितीची शहानिशा करून घ्यायला सांगितलं. काही दिवसांनी या प्रतिनिधीने त्याला कळवलं – फ्रान्सिस्को श्मिड हा आइकमन असल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरात याआधी कधीही राहिलेला नाही.
हॅरेलने यावरून लोथार हरमान विश्वासार्ह नसल्याचा निष्कर्ष काढला आणि हे शोधकार्य थांबवलं.
हॅरेलचा हा निर्णय म्हणजे एक मोठी चूक होती पण हे त्याला तेव्हा समजलं नाही. दीड वर्षांनी, जानेवारी १९६० मध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवर इझराईलला आला, तेव्हा तो प्रचंड संतापलेला होता. त्याला हॅरेलचं तोंड पाहण्याचीही इच्छा नव्हती. त्याने आपली तक्रार सरळ पंतप्रधान बेन गुरियनकडे नेली आणि इझराईलला जर एका नाझी युद्धगुन्हेगाराला पकडण्याच्या संधीचा फायदा घेण्याची इच्छा नसेल, तर आपल्याला हे प्रकरण पश्चिम जर्मनीच्या सरकारकडे द्यावं लागेल, अशी धमकी दिली. बेन गुरियननी इझराईलचा अॅटर्नी जनरल हाईम कोहेनला या प्रकरणात लक्ष घालायची विनंती केली, आणि कोहेनच्या ऑफिसमध्ये बॉवर आणि हॅरेल समोरासमोर आले. बॉवरने हॅरेलवर हे सगळं शोधकार्य अत्यंत बालिशपणे, अव्यावसायिक रीत्या आणि पुरेशा गांभीर्याने न हाताळल्याचा आरोप केला. हॅरेल निर्विकार चेहऱ्याने सगळं ऐकून घेत होता. बॉवरने बोलता बोलता सांगितलेल्या एका माहितीवर तो चमकला आणि त्याने बॉवरला तो मुद्दा परत सांगायची विनंती केली. तो मुद्दा होता आइकमनच्या अर्जेन्टिनामधल्या नावाचा. हे नाव होतं रिकार्डो क्लेमेंट.
एका क्षणात हॅरेलला आपली चूक लक्षात आली. चकाब्युको स्ट्रीटवर असलेल्या त्या घराचा मालक जरी फ्रान्सिस्को श्मिड असला, तरी तिथे दोन भाडेकरू होते, असं हरमानने सांगितलं होतं. त्यातल्या एकाचं नाव क्लेमेंट होतं, हेही त्याने शोधून काढलं होतं. याचा अर्थ आइकमन त्या घराचा मालक नव्हता, निदान कागदोपत्री तरी. तो तिकडे भाडेकरू म्हणून राहात होता. हरमानला आइकमनने रिकार्डो क्लेमेंट हे नाव घेतलेलं माहित नव्हतं आणि त्याने श्मिड हा आइकमन असावा असा निष्कर्ष काढला होता, जो चुकीचा निघाल्यावर हॅरेलने सगळा तपास थांबवला होता.
हॅरेलने आपली चूक मान्य केली आणि हा तपास पुन्हा चालू करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच करून तो थांबला नाही तर त्याने शाबाकचा एक अत्यंत हुशार एजंट झ्वी आहारोनीला आइकमनबद्दलच्या माहितीची शहानिशा करून घेण्यासाठी ब्युनोस आयर्सला पाठवलं.
फेब्रुवारी १९६० मध्ये आहारोनी ब्युनोस आयर्समध्ये उतरला आणि त्याने चकाब्युको स्ट्रीटवरच्या त्या घराबद्दल एका स्थानिक ज्यू इस्टेट एजंटकडून माहिती काढली. सध्या त्या घरात कोणीही राहात नव्हतं. घराचे दोन भाग होते. दोन्हीही सध्या रिकामे होते, आणि क्लेमेंट कुटुंब जिथे राहात होतं, त्या भागाची सध्या रंगरंगोटी आणि साफसफाई चालू होती आणि बरेच रंगारी, गवंडी आणि इतर कामगार तिकडे काम करत होते. क्लेमेंट कुटुंब दुसरीकडे कुठेतरी राहायला गेलं होतं, पण नक्की कुठे ते माहित नव्हतं.
मार्च १९६० च्या सुरुवातीला कुरियर कंपनीच्या गणवेशातला एक तरुण चकाब्युको स्ट्रीटवरच्या या घरी आला. त्याच्या हातात निकोलस क्लेमेंटसाठी एक एकदम भारी सिगरेट केस आणि लायटर या भेटवस्तू होत्या. दोन्हीही अगदी छान पॅक केलेल्या होत्या. निकोलस क्लेमेंटला ओळखणाऱ्या पण स्वतःची ओळख न देऊ इच्छिणाऱ्या एका मुलीने ही भेट त्याच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेली होती.
या कुरियरवाल्या तरुणाने क्लेमेंट कुटुंब राहात असलेल्या भागात जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. पण तिथे काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल काहीही माहित नव्हतं. त्यांच्यापैकी एकाला निकोलस क्लेमेंटचा भाऊ जवळच कुठेतरी काम करतो आणि कधीतरी इथे देखरेख करण्यासाठी येतो एवढं माहित होतं. या माहितीवरून हा कुरियरवाला तरुण निकोलस क्लेमेंटच्या भावाच्या कामाच्या ठिकाणी गेला.
हे ठिकाण म्हणजे एक मध्यम आकाराचा कारखाना होता. या भावाचं नाव होतं डिटर. त्याच्याकडून या कुरियरवाल्याला निकोलस क्लेमेंटचा पत्ता मिळाला नाही, पण बोलण्याच्या ओघात त्याने आपले वडील थोडे दिवस तुकुमान नावाच्या एका शहरात काम करत आहेत, आणि लवकरच ते काम सोडून ब्युनोस आयर्सला परत येणार आहेत हे सांगितलं.
हा कुरियरवाला तरुण तिथून चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरी गेला, आणि त्याने तिकडे त्या कामगारांसमोर सरळ रडायला सुरुवात केली. कशी त्याला या नोकरीची गरज आहे आणि ही भेटवस्तू जर पोहोचवली नाही तर कशी त्याची नोकरी जाईल आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल याचं रसभरीत वर्णन त्याने केल्यावर त्याची दया येऊन एका कामगाराने जरा चौकशी केली आणि क्लेमेंट कुटुंबाचा नवीन पत्ता शोधून काढला, “ तू ट्रेनने सान फर्नान्डो स्टेशनला जा,” तो म्हणाला, “मग २०३ नंबरची बस पकड आणि अॅविहेन्डाच्या स्टॉपवर उतर. त्याच्या समोर एक छोटं दुकान आहे. त्या दुकानाच्या उजवीकडे, इतर घरांपासून थोडं दूर असं एक विटांचं छोटेखानी घर आहे. तिथे हे लोक सध्या राहात आहेत.”
आहारोनीला ही माहिती मिळाल्यावर त्याने आणि तिथल्या मोसाद एजंट्सनी डिटर क्लेमेंटच्या हालचालींवर नजर ठेवली. डिटरच्या मागावर असलेल्या एजंटने असं घर प्रत्यक्षात असल्याचं कळवताच आहारोनी स्वतः तिकडे जाऊन आला आणि त्याने ते घर पाहिलं. तिथे असलेल्या एका छोट्या दुकानात त्याने रस्त्याचं नाव विचारलं. “गॅरिबाल्डी स्ट्रीट.” दुकानदाराने उत्तर दिलं.
मार्चच्या मध्यावर आहारोनीने गॅरिबाल्डी स्ट्रीटला परत एकदा भेट दिली. पण यावेळी तो भपकेबाज सूट घालून फिरत होता. क्लेमेंट कुटुंबाच्या घरासमोर असलेल्या घराचा दरवाजा त्याने वाजवला. एका स्त्रीने दरवाजा उघडला. आपण एका शिवणयंत्रं बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी आहोत आणि या भागात आपल्याला एक फॅक्टरी चालू करायची आहे, आणि त्यासाठी म्हणून त्या भागातली काही घरं विकत घ्यायची आहेत, असं त्याने तिला सांगितलं.
तिच्याशी बोलता बोलता आहारोनी त्याच्या हातात असलेल्या छोट्या बॅगचं बटन सतत दाबत होता. पाहणाऱ्याला हा चाळा वाटला असता, पण प्रत्यक्षात तो एका छोट्या कॅमेऱ्याने क्लेमेंट कुटुंबाच्या घराचे फोटो घेत होता.
या भेटीच्या दुसऱ्या दिवशी आहारोनीने ब्युनोस आयर्स म्युनिसिपल रेकॉर्ड्समधून हे शोधून काढलं, की ज्या जमिनीवर क्लेमेंट कुटुंबाचं घर आहे, ती व्हेरा लीबल आइकमन नावाच्या स्त्रीच्या नावावर आहे. अर्जेन्टिनामधल्या पद्धतीनुसार व्हेरा आइकमनने आपलं लग्नापूर्वीचं आणि नंतरचं अशी दोन्हीही आडनावं दिली होती. याचा अर्थ तिच्या दुसऱ्या लग्नाची बातमी खोटी होती. तिने आइकमनशीच परत लग्न केलेलं होतं. या सगळ्या कागदपत्रांमध्ये रिकार्डो क्लेमेंट हे नाव मात्र कुठेही नव्हतं.
आहारोनी अनेक वेळा, वेगवेगळ्या वेशांत गॅरिबाल्डी स्ट्रीटवर गेला, पण त्याला तिथे आइकमन दिसला नाही. व्हेरा आइकमन आणि तिची मुलं होती, पण स्वतः अॅडॉल्फ आइकमन नव्हता. पण आहारोनीची थांबायची तयारी होती. त्याच्याकडे असलेल्या फाईलमध्ये २१ मार्च हा आइकमनच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं लिहिलेलं होतं. त्या दिवशी आइकमन ब्युनोस आयर्समध्ये नक्की येईल अशी आहारोनीची अटकळ होती.
२१ मार्चच्या दिवशी दुपारी आहारोनी तिथे गेला आणि इतके दिवसांची त्याची प्रतीक्षा संपली. एक मध्यम उंचीचा, बारीक चणीचा, टक्कल पडलेला माणूस घराच्या आवारात येरझाऱ्या घालत होता. त्याच्या डोळ्यांवर चष्मा होता. आहारोनीने त्याचे अनेक फोटो काढले, आणि नंतर आइकमनच्या फाईलमध्ये असलेल्या फोटोंशी ते पडताळून पाहिले आणि नंतर मोसादच्या हेडक्वार्टर्सला एक संदेश पाठवला.
२२ मार्चच्या दिवशी हॅरेल स्वतः पंतप्रधान बेन गुरियनच्या निवासस्थानी गेला. “आइकमन अर्जेन्टिनामध्ये असल्याचा खात्रीलायकरीत्या समजलेलं आहे,” तो म्हणाला, “माझ्या मते आपण त्याला तिथून उचलून इथे आणू शकतो.”
बेन गुरियननी ताबडतोब उत्तर दिलं, “त्याला जिवंत किंवा मृत – कसाही आण,” आणि एक क्षणभर थांबून ते म्हणाले, “ जिवंत आणलंस तर बरं. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर हॅरेलने कामाला सुरुवात केली. सर्वात महत्वाचं काम म्हणजे आइकमनला अर्जेन्टिनामध्ये उचलण्यासाठी आणि तिथून इझराईलमध्ये परत आणण्यासाठी टीम बनवणं. हॅरेलच्या या टीममध्ये १२ जणांचा समावेश होता:
रफी एतान – शाबाकच्या अत्यंत हुशार आणि घातकी एजंट्सपैकी एक असलेला एतान इझराईलच्या निर्मितीआधी शाईमध्ये होता. तेव्हा ब्रिटीशांच्या डोळ्यांत धूळ झोकून इतर देशांमधल्या ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये सुखरूप पोचवणं हे त्याचं काम होतं, आणि एकदाही तो पकडला गेला नव्हता. या संपूर्ण ऑपरेशनच्या प्रमुखपदी हॅरेलने त्याची निवड केली होती.
झ्वी उर्फ पीटर मॉल्किन – वेषांतर आणि अभिनय यांची आवड असलेला मॉल्किन शाबाकमधला उगवता तारा होता. तो दरवर्षी एक सोविएत एजंट पकडतो असा त्याचा लौकिक होता. त्याचं या मोहिमेवर येण्याचं वैयक्तिक कारणसुद्धा होतं. त्याचा जन्म पोलंडमधल्या ग्रास्निक लुबेल्स्की नावाच्या खेड्यात झाला होता. दुसरं महायुद्ध सुरु होताना नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया यांनी पोलंडवर अनुक्रमे पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून हल्ला चढवला होता. तेव्हा मॉल्किनचं गाव रशियनांच्या ताब्यात गेलं, पण त्याचे कुटुंबीय तिथून पॅलेस्टाईनला जाण्यात यशस्वी झाले. दुर्दैवाने त्याची मोठी बहिण फ्रुमा आणि तिचं संपूर्ण कुटुंब मागे राहिलं आणि नंतर १९४१ मध्ये नाझींनी जेव्हा सोविएत रशियावर आक्रमण केलं तेव्हा त्या सर्वांची रवानगी ऑशविट्झला करण्यात आली आणि तिकडेच फ्रुमाचा आणि तिच्या लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यांना तिथे पाठवणं हे अर्थातच आइकमनचं काम होतं.
अॅव्हरम शालोम – मध्यम उंचीचा, दणदणीत शरीरयष्टी असलेला शालोम हा विध्वंसक पदार्थ आणि स्फोटकं यामधला तज्ञ होता. तो पुढे शाबाकचा संचालकही झाला.
याकोव्ह गाट – इझराईलच्या निर्मितीआधी फ्रान्समध्ये राहात असलेला गाट युद्धादरम्यान फ्रेंच प्रतिकारकांच्या नाझीविरोधी मोहिमांमध्ये सक्रीय सहभागी होता.
मोशे ताव्होर – इझराईलच्या निर्मितीआधी ताव्होर ब्रिटीश सैन्यात होता, आणि त्याने टोब्रुक आणि एल अलामेन या लढायांमध्ये भाग घेतलेला होता. तो ब्रिटीश सैन्यातल्या ‘ अॅव्हेंजर्स ‘ नावाच्या गुप्त तुकडीत होता, आणि या तुकडीने युद्धानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक नाझी अधिकाऱ्यांना पकडलं आणि ठारदेखील मारलं होतं.
शालोम डॅनी – खोटी कागदपत्रं बनवण्यात उस्ताद असलेला डॅनी एक उत्कृष्ट चित्रकारही होता. त्याने टॉयलेट पेपरवर एस.एस.ची ओळखपत्रं बनवून १० जणांसह नाझी छळछावणीमधून पलायन केलं असल्याची आख्यायिका होती. (जी खरी असल्याचं नंतर सिद्ध झालं.)
एफ्राईम इलानी – इलानीला ब्युनोस आयर्स शहर अगदी तिथल्या गल्लीबोळांसकट पूर्णपणे माहित होतं. त्याला स्पॅनिश भाषाही अस्खलित रीत्या बोलता येत होती आणि तो कुठलंही कुलूप मोजून १० सेकंदांमध्ये उघडू शकत असे. शिवाय त्याचा चेहरा हा कोणाच्याही मनात विश्वास निर्माण करू शकतो असं एतान आणि हॅरेल या दोघांचं मत होतं.
येहुदिथ निसियाहू – या टीममधली एकमेव स्त्री असलेली येहुदिथ मोसादच्या सर्वश्रेष्ठ एजंट्सपैकी एक होती. एखाद्या प्रेमळ मध्यमवयीन स्त्रीप्रमाणे दिसणाऱ्या येहुदिथचाही कोणाला संशय आला नसता.
डॉ. योना एलीयान – व्यवसायाने भूलतज्ञ (anaesthetist) असलेल्या डॉ.एलीयान याची निवड करण्यामागचं कारण उघड होतं. आइकमनला इझराईलला आणायचं तर उघडपणे आणता येणारच नव्हतं, आणि तज्ञ नसलेल्या दुसऱ्या कोणी भूल दिली, तर चूक होण्याचा संभव होता. त्यामुळे डॉ.एलीयानचा समावेश अपरिहार्य होता.
झ्वी आहारोनी – आइकमनबद्दल असलेली सगळी माहिती पडताळून पाहून रिकार्डो क्लेमेंट हाच आइकमन आहे, हे सिद्ध करणाऱ्या आहारोनीचा त्या कामगिरीचं बक्षीस म्हणून या मोहिमेत समावेश करण्यात आला होता.
याकोव्ह मिदाद – इझराईलच्या निर्मितीआधी मिदाद बिटीश सैन्यात होता. त्याचंही संपूर्ण कुटुंब मृत्यूछावणीमध्ये नष्ट झालेलं होतं.
स्वतः इसेर हॅरेल – बारावा सदस्य म्हणून जेव्हा हॅरेलने स्वतःचं नाव सांगितलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण हॅरेलच्या सहभागाचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण मोहिमेत अनेक वेळा असे प्रसंग येणार होते, जेव्हा अगदी उच्च पातळीवर निर्णय घेण्याची गरज भासणार होती. अशा वेळी मोसादचा संचालक तिथे असल्यामुळे वेळ वाचला असता आणि निर्णय ताबडतोब घेता आले असते.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एप्रिल १९६० च्या शेवटी चार एजंट्सनी वेगवेगळ्या दिशांनी अर्जेन्टिनामध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या सामानात अनेक आवश्यक गोष्टी लपवून आणल्या होत्या. शालोम डॅनीने तर आपली जवळपास सगळी प्रयोगशाळा अर्जेन्टिनामध्ये आणली होती.
ब्युनोस आयर्समध्ये आल्यावर या चौघांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला. या ठिकाणाचं सांकेतिक नाव होतं द कॅसल. बाकीचे सदस्य आल्यावर त्यांच्या राहण्यासाठी म्हणून ही व्यवस्था होती. या फ्लॅटची व्यवस्था लावल्यावर हे सगळेजण एक गाडी भाड्याने घेऊन गॅरिबाल्डी स्ट्रीट आणि आइकमनचं घर पाहायला गेले. तिथे ते पोहोचले, तेव्हा संध्याकाळचे ७.४० झाले होते. त्यांची गाडी अगदी कमी वेगाने रस्त्यावरून चालली होती. तेव्हा त्यांना तिथल्या बसस्टॉपवर एक बस थांबलेली दिसली. त्या बसमधून एक माणूस उतरला. तो आइकमन उर्फ रिकार्डो क्लेमेंट आहे, हे समजल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आइकमनचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याच्या घरापाशी तो वळला आणि घरात गेला.
याचा अर्थ आइकमन दररोज साधारण याच वेळी घरी येत होता, आणि बसस्टॉपपासून ते त्याच्या घरापर्यंत असलेल्या रस्त्यावर त्यावेळी चिटपाखरूही नव्हतं, म्हणजे या भागातून त्याला उचलणं शक्य होतं.
त्याच रात्री या एजंट्सनी इझराईलला संदेश पाठवला – काम होऊ शकतं.
आइकमनला कसं, कुठे आणि केव्हा उचलायचं हा प्रश्न निकालात निघाला होता. आता सर्वात महत्वाचा मुद्दा होता त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर कसं काढायचं. त्यावेळी नशिबाने हॅरेलची साथ दिली. त्याच वर्षी म्हणजे १९६० मध्ये अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्याला १५० वर्षे पूर्ण होत होती आणि दिवस होता २० मे. संपूर्ण जगातून अनेक परदेशी पाहुणे या समारंभात भाग घेण्यासाठी अर्जेन्टिनामध्ये येणार होते. शिक्षणमंत्री अब्बा एबानच्या नेतृत्वाखाली इझरेली शिष्टमंडळही जाणार होतं. हे शिष्टमंडळ ब्युनोस आयर्सपर्यंतचा प्रवास सरकारी विमान कंपनी एल अॅलच्या नवीन जम्बो जेटने करणार होतं. या विमानाचं नाव होतं the Whispering Giant..
११ मे १९६० या दिवशी या शिष्टमंडळाची फ्लाईट होती. हॅरेल स्वतः मोर्देचाई बेन अरी आणि एफ्राईम बेन अर्त्झी या एल अॅलच्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला आणि त्याने त्यांना सगळी कल्पना दिली. मुख्य पायलट झ्वी तोहरला बाकी काहीही माहिती देण्यात आली नाही, फक्त एखादा अनुभवी मेकॅनिक बरोबर घेण्याची सूचना देण्यात आली. जर विमानाला अर्जेन्टिनामधून तिथल्या एअरपोर्ट स्टाफच्या मदतीशिवाय उड्डाण करावं लागलं, तर काही प्रश्न उद्भवू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.
१ मे १९६० या दिवशी वेगळ्याच पासपोर्टवर इसेर हॅरेल ब्युनोस आयर्सच्या विमानतळावर उतरला. अर्जेन्टिना दक्षिण गोलार्धात असल्यामुळे मे महिन्यात हिवाळा होता. त्याच्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर ९ मे या दिवशी ब्युनोस आयर्सच्या मध्यभागात असलेल्या एका उंच इमारतीमधल्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये टीमच्या सर्व १२ सदस्यांची बैठक होती. सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी ब्युनोस आयर्समध्ये शिरले होते. या फ्लॅटचं सांकेतिक नाव होतं हाईट्स.
अर्जेन्टिनामध्ये येण्याआधी हॅरेलने ब्युनोस आयर्समधल्या जवळजवळ ३०० कॅफे आणि बार्स यांची एक यादी बनवली होती. त्यांचे पत्ते आणि ते चालू असण्याच्या वेळासुद्धा त्यात होत्या. दररोज सकाळी तो निघत असे आणि पायी वेगवेगळ्या कॅफेमध्ये जात असे. कुठल्या कॅफेमध्ये तो कधी असेल याचं एक वेळापत्रक त्याने बनवलं होतं आणि त्यामुळे तो दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठे असेल हे त्याच्या टीमला अगदी व्यवस्थित माहित असायचं. या मोहिमेच्या शेवटी गोडमिट्ट अर्जेंटिनियन कॉफी पिऊन पिऊन आपलं डोकं दुखायला लागल्याचं हॅरेलने लिहून ठेवलेलं आहे.
हॅरेल आल्यावर त्याने स्वतः ब्युनोस आयर्स विमानतळापासून जवळ असलेला एक बंगला आइकमनला उचलल्यापासून ते त्याला इझराईलला जाणाऱ्या विमानात बसवेपर्यंत ठेवण्यासाठी म्हणून निवडला होता. या जागेचं सांकेतिक नाव होतं द बेस. इथे येहुदिथ निसियाहू आणि याकोव्ह मिदाद हे पर्यटक जोडपं म्हणून राहणार होते. या बंगल्यात इझरेली एजंट्सनी अनेक लपण्याच्या जागा बनवल्या होत्या. आइकमनला उचलल्यावर त्याच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली, आणि जर स्थानिक पोलिस तपासासाठी आले, तर त्यांना आइकमन सापडू नये हा त्यामागचा उद्देश होता. या बंगल्याजवळ असलेला दुसरा एक बंगला पर्यायी व्यवस्था म्हणून भाड्याने घेण्यात आला होता.
आता सगळी तयारी झाली होती. १० मेला आइकमनला उचलायचं, ११ मेचा एक दिवस ‘ द बेस ’ वर ठेवायचं, आणि १२ तारखेला जेव्हा ११ तारखेला आलेलं विमान परत जाईल तेव्हा त्याच्यातून इझराईलला पाठवायचं असं ठरलेलं होतं, पण ऐनवेळी माशी शिंकली.
अर्जेन्टिनाच्या १५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभामुळे ब्युनोस आयर्स आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमले होते, की अर्जेंटिनियन पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला इतक्या लोकांना सांभाळणं जड जात होतं. त्यामुळे अर्जेन्टिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इझरेली शिष्टमंडळाला ११ मेऐवजी १९ मे या दिवशी येण्याची विनंती केली. त्यानुसार आता इझरेली शिष्टमंडळाची फ्लाईट १८ मे या दिवशी इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता निघणार होती.
हॅरेलपुढे आता दोन पर्याय होते – आइकमनला ठरल्याप्रमाणे १० मेला उचलायचं आणि मग २० मेपर्यंत वाट पहायची किंवा मग त्याला १९ मेला उचलायचं आणि २० तारखेला इझराईलला पाठवायचं. दोन्हीमध्ये धोके होते. जर आइकमनला उचलल्यावर त्याच्या कुटुंबाच्या विनंतीवरून पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं, आणि त्याच्यात जर इझरेली एजंट्स सापडले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इझराईलची आणि मोसादची नाचक्की झाली असती. पण जर त्याला १९ मेला उचललं असतं, तर त्यावेळी अत्यंत कडक झालेल्या सुरक्षाव्यवस्थेतून त्याला बाहेर काढणंही तितकंच कठीण होतं.
शेवटी हॅरेलने पहिलीच योजना – आइकमनला १० मे या दिवशी उचलायची – नक्की केली. फक्त एक बदल केला. १० मे ऐवजी आता तारीख ठरली ११ मे आणि वेळ संध्याकाळी ७.४० वाजता.
आता आइकमनच्या अपहरणाची योजना अगदी तपशीलवार तयार झाली होती: आइकमन दररोज संध्याकाळी ७.४० वाजता येणाऱ्या बसने येतो आणि बसस्टॉपवर उतरतो. तिथून तो जवळजवळ ५०० मीटर्स एवढं अंतर गॅरिबाल्डी स्ट्रीटवरून चालत आपल्या घराकडे जातो. रस्त्यावर या वेळी अगदी अंधुक प्रकाश असतो. वाहतूक अगदी तुरळक असते. त्याचं अपहरण करण्यासाठी दोन गाड्या आणि आठ एजंट्स असणार होते. चार एजंट्सची एक टीम प्रत्यक्ष अपहरण करणार होती आणि दुसरी टीम टेहळणी आणि अपहरण करणाऱ्या टीमचं संरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणार होती. अपहरण करणारी टीम एकदा तो त्यांच्या ताब्यात आला, की त्याला त्यांच्या गाडीत घालून तिथून ताबडतोब निघणार होती आणि दुसरी टीम लगेचच त्यांच्या मागून येणार होती. भूलतज्ञ डॉक्टर एलीयान दुसऱ्या गाडीत असणार होता.
“जर तुम्हाला पोलिसांनी हटकलं तर कुठल्याही परिस्थितीत आइकमनला सोडू नका,” हॅरेलने सर्वांना बजावून सांगितलं, “जर पोलिसांनी तुम्हाला अटक केली, तर खरं काय ते सांगा.”
१० मेच्या दिवशी येहुदिथ आणि मिदाद ‘ द बेस ‘ मध्ये राहायला गेले. दिवसाच्या शेवटी बाकी एजंट्सही त्यांच्या हॉटेल्समधून बाहेर पडून कॅसल आणि हाईट्समध्ये राहायला गेले.
११ मेच्या सकाळपासून सगळे एजंट्स कामात होते. मुख्य काम होतं सगळ्या ‘ पाऊलखुणा ‘ पुसून टाकायचं. दोन गाड्या सोडून बाकी सगळ्या भाड्याने घेतलेल्या गाड्या परत करण्यात आल्या. १२ जणांच्या टीमने आपलं नवीन वेषांतर केलं आणि जुनी कागदपत्रं नष्ट केली. आता प्रत्येकाकडे त्यांच्या नवीन वेषांतराला अनुरूप अशी कागदपत्रं होती.
हॅरेलनेही त्याच्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान ब्युनोस आयर्सच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या क्लोकरूममध्ये नेऊन ठेवलं. आजही तो एका कॅफेमधून दुसऱ्या कॅफेमध्ये जात होता. आज त्याचा दौरा ब्युनोस आयर्सच्या बिझिनेस आणि थिएटर्स यांच्या भागात होता. त्यामुळे इथले सगळे कॅफे एकमेकांपासून खूप जवळ होते.
दुपारचा १.०० – हॅरेल, रफी एतान आणि इतर काही एजंट्स शेवटच्या ब्रीफिंगसाठी भेटले. हा कॅफे शहरातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध कॅफेपैकी एक होता. २ वाजता सगळे आपापल्या दिशेने गेले.
दुपारचे २.३० – शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या गॅरेजमधून एजंट्सनी अपहरण करण्यासाठी जी गाडी वापरण्यात येणार होती, ती ताब्यात घेतली. त्याच वेळी दुसऱ्या एका गटाने दुसरी गाडी ताब्यात घेतली. अपहरण करणाऱ्या गटाने आणि या दुसऱ्या गटाने नंतर गाड्यांची अदलाबदल केली.
दुपारचे ३.३० – दोन्हीही गाड्या द बेस या बंगल्यापाशी पोचल्या.
दुपारचे ४.३० – शेवटचं ब्रीफिंग. दोन्ही गटांनी कपडे बदलले आणि आपली कागदपत्रं घेऊन निघण्याची तयारी केली.
संध्याकाळी ६.३० – दोन्ही गाड्या द बेस वरून निघाल्या. अपहरण करणाऱ्या गाडीमध्ये – झ्वी आहारोनी (ड्रायव्हर), रफी एतान, मोशे ताव्होर आणि झ्वी मॉल्किन. दुसऱ्या गाडीत अॅव्हरम शालोम, याकोव्ह गाट, डॉ. एलीयान आणि एफ्राईम इलानी (ड्रायव्हर). दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच ठिकाणाहून निघाल्या, पण नंतर त्यांचे मार्ग बदलले आणि त्या परत एकमेकींना क्लेमेंटच्या घराच्या जवळच असलेल्या एका चौकात भेटल्या. येताना दोन्हीही गाड्यांनी पोलिस आणि गस्ती किंवा नाकाबंदी असलेले भाग आपल्या नकाशावर नोंद करून ठेवलेले होते.
संध्याकाळी ७.३० – दोन्ही गाड्या गॅरिबाल्डी स्ट्रीटवर, आपल्या नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळी पोहोचल्या. रस्त्यावर अजिबात कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता. अपहरणासाठी वापरली जाणारी गाडी काळ्या रंगाची शेवरलेट सेडान होती. आहारोनीने ती फुटपाथच्या अगदी जवळ, क्लेमेंटच्या घराकडे तोंड करून उभी केली. मॉल्किन आणि ताव्होर बाहेर पडले. आहारोनी ड्रायव्हरच्या जागेवरच बसून राहिला. रफी एतान गाडीच्या आत दबा धरून बसला. ताव्होरने गाडीचं हूड उघडलं आणि आतमध्ये बघायला सुरुवात केली. मॉल्किन त्याच्या उजव्या हाताला उभा होता. दोघांचीही नजर आळीपाळीने रस्त्यावर आणि थोड्या अंतरावर असलेल्या बसस्टॉपवर फिरत होती.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, काही अंतरावर दुसरी गाडी उभी होती. ही काळ्या रंगाची ब्यूक गाडी होती. ती क्लेमेंटच्या घराकडे पाठ करून उभी होती. डॉ.एलीयान मागच्या सीटवर आणि इलानी ड्रायव्हरच्या जागेवर होते. शालोम आणि गाट यांनी उतरून गाडीचं हूड उघडलं. इशारा मिळताच इलानी गाडीचे प्रखर दिवे चालू करून आइकमनला गोंधळवणार होता.
सापळा आणि शिकारी तयार होते. आता फक्त सावज यायचं बाकी होतं.
संध्याकाळचे ७.४० – २०३ क्रमांकाची बस स्टॉपपाशी आली, थांबली पण त्यातून कोणीही उतरलं नाही.
संध्याकाळचे ७.५० – अजून दोन बसेस येऊन गेल्या पण कोणीही उतरलं नाही. आता एजंट्सच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या. काय झालं असावं? आइकमनला संशय आलाय की काय? आज तो वेळेच्या आधीच तर नाही आला? किंवा काही कामानिमित्त आपल्या ऑफिसमध्येच तर थांबला नसेल?
संध्याकाळचे ८.०० – हॅरेलने दुपारच्या ब्रीफिंगमध्ये जर आइकमन ८ वाजेपर्यंत आला नाही, तर तिथून निघून जायला सांगितलं होतं. पण रफी एतानने मिशन कमांडर म्हणून आपला अधिकार वापरत सगळ्यांना अजून अर्धा तास थांबायला सांगितलं.
संध्याकाळचे ८.०५ – अजून एक बस स्टॉपवर थांबली. बहुतेक शेवटची बस. पहिल्यांदा तर एजंट्सना कोणीच दिसलं नाही, पण दुसऱ्या टीममध्ये असलेल्या शालोमला एक आकृती चालताना दिसली. आइकमनच्या चालीचा त्याने अभ्यास केलेला होता. त्याने इलानीला इशारा केला आणि इलानीने गाडीचे प्रखर दिवे चालू केले.
समोरचा माणूस रिकार्डो क्लेमेंट उर्फ अॅडॉल्फ आइकमनच होता. तो आपल्या घराकडे चालत येत होता. अचानक डोळ्यांवर पडलेल्या प्रखर प्रकाशामुळे त्याने चेहरा बाजूला केला. दुसरी गाडी ओलांडून तो पुढे गेल्यावर त्याला अजून एक गाडी दिसली. तिचं हूड उघडलेलं होतं, आणि लोक आत बघून काही दुरुस्तीचा प्रयत्न करत होते. तो गाडीच्या जवळ येताच तिथे उभ्या असलेल्या माणसाने त्याला थांबवलं आणि तो म्हणाला – Momentito, senor! तो झ्वी मॉल्किन होता, आणि त्याला स्पॅनिश भाषेचे फक्त एवढेच शब्द येत होते.
क्लेमेंटने खिशातून टॉर्च काढण्यासाठी खिशात हात घातला. पुढच्या घटना डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच घडल्या. मॉल्किनला क्लेमेंट खिशातून पिस्तुल किंवा काही शस्त्र काढेल अशी भीती वाटली, म्हणून त्याने क्लेमेंटवर झेप घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं. क्लेमेंट जोरात ओरडला. तो परत ओरडायच्या आत गाडीतून एक आणि बाहेर उभा असलेला एक असे दोघेजण त्याच्या दिशेने आले आणि त्यांनी त्याला उचलला, गाडीत टाकला, आणि पाठोपाठ गाडीत उडी मारून गाडीचे दरवाजे बंद करून गाडी चालू केली. क्लेमेंट गाडीच्या बाजूने गेला आणि त्याला उचलून गाडी निघाली यांच्या दरम्यान जेमतेम अर्ध्या मिनिटाचा वेळ गेला असेल.
ही गाडी गेलेली बघताच दुसरी गाडीही तिच्या पाठोपाठ निघाली.
इकडे पहिल्या गाडीत एतान आणि मॉल्किनने क्लेमेंटचे हात आणि पाय बांधले आणि त्याच्या तोंडात एक बोळा कोंबला. त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून टाकला आणि एकदम जाड भिंगांचा काळा चष्मा त्याच्या डोळ्यांवर चढवला. हे सगळं झाल्यावर एतान त्याच्या कानांत जर्मनमध्ये कुजबुजला – जरा आवाज किंवा हालचाल केलीस, तर मरशील! त्याक्षणी तो शांत झाला. दरम्यान एतानने त्याच्या पोटावर उजव्या बाजूला आणि डाव्या काखेच्या थोडं खाली असलेल्या शस्त्रक्रियेच्या व्रणांना तपासून पाहिलं होतं. आइकमनच्या फाईलमध्ये हे व्रण ज्या ठिकाणी आहेत असा उल्लेख होता, त्याच ठिकाणी ते सापडले होते. सगळ्यांनी एकमेकांशी हात मिळवले. अखेरीस आइकमन त्यांच्या ताब्यात आला होता.
आपल्या भावना आपल्या पूर्ण नियंत्रणात आहेत असं मॉल्किन आणि एतानला वाटत होतं, पण जेव्हा आहारोनीने त्यांना गप्प बसायला सांगितलं तेव्हा आपण ज्यू क्रांतिकारकांचं नाझीविरोधी गाणं गुणगुणतो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं.
गाडी वेगाने द बेस च्या दिशेने चालली होती आणि अचानक ती थांबली. समोर रेल्वे फाटक होतं आणि एक लांबच्या लांब मालगाडी चालली होती. झ्वी मॉल्किनच्या मते हा या संपूर्ण अपहरण नाट्यातला सर्वात महत्वाचा क्षण होता. त्यांची गाडी इतर अनेक गाड्यांच्या मध्ये उभी होती. आइकमनने अशा वेळी हालचाल केली असती आणि ते जर कुणाच्या लक्षात आलं असतं तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं असतं पण सुदैवाने तसं काही घडलं नाही आणि मालगाडी निघून गेल्यावर बाकीच्या गाड्यांप्रमाणे ही गाडीही पुढे निघाली.
रात्रीचे ८.५५ – दोन्हीही गाड्या द बेस पाशी पोचल्या. एजंट्सनी आइकमनला भरभर चालवत आतमध्ये आणलं. तिथे आणल्यावर सर्वप्रथम त्यांनी त्याचे सगळे कपडे त्याच्या अंगावरून उतरवले आणि त्याने कुठे काही शस्त्र, बॉम्ब वगैरे लपवलेलं आहे का, याची तपासणी केली. नंतर त्यांनी त्याला तोंड उघडायला सांगितलं आणि त्याने आपल्या तोंडात किंवा दाढांमध्ये सायनाईड किंवा दुसऱ्या एखाद्या विषाची कुपी लपवलेली नाही याचीही तपासणी केली. त्याच्या डोळ्यांवर अजूनही तो काळा चष्मा होता.
अचानक त्याच्यावर जर्मन भाषेत एक आवाज कडाडला – तुझ्या बुटांची आणि डोक्याची साईझ? तुझी जन्मतारीख? आईचं नाव? वडिलांचं नाव?
यांत्रिकपणे त्याने या प्रश्नांची उत्तरं दिली. एजंट्स ही सगळी माहिती फाईलमधल्या माहितीबरोबर पडताळून पाहात होते.
तुझा नाझी पार्टी सदस्य क्रमांक? “४५३२६.” त्याने उत्तर दिलं.
आणि तुझा एस.एस.क्रमांक ६३७५०, बरोबर? इथे तो थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला:"नाही तो ६३७५२ असा आहे. "
ठीक आहे. आता नाव सांग तुझं. “रिकार्डो क्लेमेंट.” तो म्हणाला.
नाव? “ओट्टो हेनिन्गर” तो थरथरत म्हणाला.
खरं नाव? “Ich bin Adolf Eichmann.”
त्याच्या आजूबाजूला शांतता पसरली. त्यानेच त्या शांततेचा भंग केला, “माझं नाव अॅडॉल्फ आइकमन,” तो म्हणाला, “मी इझरेली लोकांच्या कैदेत आहे याची मला कल्पना आहे. मला थोडीफार हिब्रू भाषा येते. वॉर्सामध्ये एका राब्बायने मला ही भाषा शिकवली होती.”
तो हिब्रू प्रार्थना म्हणायला लागल्यावर सगळे एजंट्स निःस्तब्ध झाले.
इकडे इसेर हॅरेलचा एका कॅफेमधून दुसऱ्या कॅफेत असा दौरा चालू होता. रात्री जवळजवळ साडेनऊ वाजता तो दिवसातल्या शेवटच्या कॅफेत जाऊन खुर्चीत बसला आणि त्याला झ्वी आहारोनी आणि रफी एतान येताना दिसले.
“तो आता आपल्या ताब्यात आहे,” आहारोनी म्हणाला, “आपण त्याची ओळख पटवली आहे, आणि त्याने स्वतःसुद्धा आपण अॅडॉल्फ आइकमन आहोत हे मान्य केलेलं आहे.” हॅरेलने त्यांचं अभिनंदन केलं आणि ते निघून गेले.
हवेत थंडी होती, पण हॅरेलचा मूड इतका छान होता, की तिथून रेल्वे स्टेशनपर्यंत तो चालत गेला, तिथून त्याने आपलं सामान काढलं आणि एका नव्या हॉटेलमध्ये नव्या नावाने चेक इन केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी पंतप्रधान बेन गुरियनपर्यंत पोचवण्यात आली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्यासाठी जेव्हा हॅरेल द बेस बंगल्यावर पोचला, तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघून काय झालं असावं हे त्याच्या लक्षात आलं. आइकमनचं त्यांच्या एवढं जवळ असणं हे त्यांना घुसमटवत होतं. ज्याने आपल्या असंख्य धर्मबांधवांना थंडपणे गॅस चेंबरकडे पाठवलं, त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी स्वयंपाक करणं, त्याचे कपडे धुणं हे त्यांच्यासाठी अशक्य होतं. तो आत्महत्या करायचा प्रयत्न करेल म्हणून त्याच्या हातात रेझर किंवा कुठलंही धारदार हत्यार द्यायचं नव्हतं. म्हणजे त्याची दाढी करण्यापासून सगळ्या गोष्टी या एजंट्सना कराव्या लागत होत्या आणि ते संतापले होते.
शेवटी हॅरेलने त्यांना जबरदस्तीने शहरात फिरायला पाठवलं. आळीपाळीने एक एक गट जाऊन ब्युनोस आयर्स शहर बघून आला. ते १० दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातले संपता न संपणारे प्रदीर्घ दिवस होते.
आइकमनला प्रश्न विचारून सगळी माहिती जमा करण्याची जबाबदारी आहारोनीकडे होती आणि तो दिवसाचे किमान १० तास आइकमनबरोबर घालवत असे. आइकमनने आपलं भवितव्य ओळखलं होतं, त्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारे एजंट्सशी वाद घालण्याचा, भांडण करण्याचा किंवा त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला नाही.
आहारोनीच्या प्रश्नांमुळे मोसादला आइकमनने युद्ध संपल्यापासून ते आतापर्यंत काय केलं त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली.
मे १९४५ मध्ये जर्मनीने शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मन सरकार बरखास्त केलं आणि नाझी अधिकाऱ्यांना युद्धगुन्हेगार म्हणून घोषित केलं. मृत्युछावण्या आणि छळछावण्या या एस.एस.च्या अधिकारात येत होत्या, त्यामुळे एस.एस.अधिकाऱ्यांना अटक करण्यावर जास्त भर दिला जात होता. हे ओळखून आइकमनने लुफ्तवाफ प्रायव्हेट अॅडॉल्फ कार्ल बार्थ हे नाव घेतलं आणि जर्मन वायुदलाचा गणवेश आणि कागदपत्रंदेखील मिळवली. पण त्याला वायुदलाविषयी तांत्रिक माहिती नव्हती, त्यामुळे पकडलं जाण्याचा धोका होता. त्यामुळे त्याने वाफेन-एस.एस. किंवा एस.एस.च्या लढाऊ युनिटमधल्या लेफ्टनंटची ओळख घेतली आणि ओट्टो एकमन या नावाने स्वतःला अटक करवून घेतली. जवळजवळ तीन महिने तो युद्धकैदी म्हणून तुरुंगात होता. जेव्हा त्याचा एकेकाळचा सहाय्यक डिटर
विस्लीसेनीने त्याच्या कृत्यांबद्दल साक्ष दिली, तेव्हा तो तुरुंगातून पळाला आणि ओट्टो हेनिन्गर हे नाव घेऊन जर्मनीच्या सॅक्सनी प्रांतात लपला. तिथे तो १९५० पर्यंत होता. १९५० मध्येच तो इटलीमार्गे अर्जेन्टिनाला पळून गेला.
अर्जेन्टिनामध्ये सुरुवातीला तो जुरमान या ब्युनोस आयर्सच्या एका उपनगरात राहिला. त्यानंतर रिपलर नावाच्या एका जर्मन व्यापाऱ्याच्या घरात त्याने ४ महिने काढले. तोपर्यंत त्याचा शोध थंडावला होता. मग तो ब्युनोस आयर्सपासून जवळजवळ ६०० मैल दूर असलेल्या तुकुमान नावाच्या छोट्या शहरात गेला. इथे काप्री नावाच्या एका बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. काप्रीचा मूळ उद्देश पलायन केलेल्या नाझींना आश्रय आणि नोकऱ्या मिळवून देणं हाच होता. दरम्यान त्याने अर्जेन्टिनाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. तो मंजूर होऊन त्याला एप्रिल १९५२ मध्ये अर्जेन्टिनाचं नागरिकत्व मिळालं. त्यासाठी त्याने नाव घेतलं होतं रिकार्डो क्लेमेंट. अर्जेन्टिनामधल्या रेकॉर्ड्सनुसार क्लेमेंटचा जन्म इटलीमधल्या बोल्झानो शहरात झाला होता, तो व्यवसायाने मेकॅनिक होता आणि अविवाहित होता.
नागरिकत्व मिळाल्यावर आइकमनने त्याची पत्नी व्हेरा हिच्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्यावेळी ती आपल्या मुलांसह जर्मनी सोडून ऑस्ट्रियामध्ये स्थायिक झाली होती. हे पत्र त्याने त्रयस्थ म्हणून लिहिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की तिच्या मुलांचा दूरचा काका रिकार्डो, जो मरण पावला आहे असं तिला वाटतंय, तो प्रत्यक्षात जिवंत आहे. व्हेरा आइकमनने त्याचं हस्ताक्षर ओळखलं आणि ऑस्ट्रियामधल्या भूमिगत नाझी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ऑस्ट्रियन सरकारमधल्या नाझी हस्तकांनी तिला आणि तिच्या मुलांना एक कायदेशीर पासपोर्ट मिळवून दिला आणि तिच्याविषयी रेकॉर्ड्समध्ये असलेली माहिती नष्ट केली. जून १९५२ मध्ये व्हेरा आणि तिची मुलं ऑस्ट्रियामधून गायब झाली. जुलै १९५२ मध्ये इटलीमधल्या जेनोआ बंदरातून ती आणि तिची मुलं अर्जेन्टिनासाठी रवाना झाली आणि ऑगस्टच्या मध्यावर तिची आणि आइकमनची तुकुमान येथे भेट झाली.
१९५३ मध्ये काप्री कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर आइकमनला नोकरी शोधावी लागली. पहिल्यांदा त्याने ब्युनोस आयर्समध्ये एक लाँड्री काढली, मग भागीदारीमध्ये शेती, पशुपालन, बागाईत असे अनेक व्यवसाय करून बघितले. पण यातलं काहीही या ना त्या कारणाने यशस्वी होऊ शकलं नाही. नंतर काही काळाने त्याला ब्युनोस आयर्सजवळ असलेल्या सुआरेझ या शहरात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारखान्यात फोरमन म्हणून नोकरी मिळाली. आता आपलं आयुष्य सुरळीत जाईल आणि आपल्याला नैसर्गिकरीत्या शांतपणे मरण येईल असं त्याला वाटायला लागलं होतं, पण ११ मे १९६० या दिवशी सगळं बदलून गेलं.
दरम्यान आइकमनच्या मुलांनी त्याचा शोध चालू केला होता. हॉस्पिटल्स, मॉर्ग, पोलिस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स – सगळीकडे त्यांचं शोधून झालं होतं. शेवटी त्यांनी अर्जेन्टिनाचा माजी अध्यक्ष हुआन पेरॉन याच्या समर्थकांनी काढलेल्या ताक्युआरा नावाच्या फॅसिस्ट संघटनेला मदतीची विनंती केली. सगळी पार्श्वभूमी ऐकल्यावर ताक्युआराच्या लोकांनी आपला निष्कर्ष आइकमनच्या मुलांना ऐकवला – तुमच्या वडिलांचं अपहरण ज्यू लोकांच्या संघटनांनी केलेलं असण्याची दाट शक्यता आहे. आइकमनच्या मुलांनी ताक्युआराच्या लोकांना इझरेली राजदूताचं अपहरण करून आइकमनच्या मोबदल्यात त्याचा सौदा करण्याचं आवाहन केलं, पण ताक्युआराच्या लोकांचे हेतू राजकीय असल्यामुळे त्यांना इतक्या उघडपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा करायचा नव्हता, त्यामुळे हा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
१८ मे १९६०. लॉड एअरपोर्ट, तेल अवीव.
सकाळचे ११ वाजले होते आणि लॉड एअरपोर्ट माणसांनी भरून गेला होता. इझरेली शिष्टमंडळ आज अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्जेन्टिनाला जाणार होतं. या विमानात इझरेली शिष्टमंडळाच्या सदस्यांशिवाय इतर सामान्य प्रवाशांचाही समावेश होता. या विमानाला १९ तारखेला पोचायचं असल्यामुळे ते सरळ ब्युनोस आयर्सला जाणार नव्हतं. विमानाचा पहिला थांबा होता रोम. इथे तीन नवे प्रवासी विमानात आले आणि थोड्या वेळाने त्यांनी एल अॅलचे गणवेश चढवले. तिघेही मोसाद एजंट्स होते आणि आइकमनला अर्जेन्टिनामधून बाहेर काढण्यासाठी ते या विमानात चढले होते. त्यांच्यातला एक होता येहुदा कार्मेल. तो आपल्या निवडीबद्दल खुश नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याची निवड ही त्याच्या कुठल्याही कौशल्यामुळे नव्हे, तर चेहरेपट्टी आणि अंगकाठीने तो आइकमनशी बऱ्यापैकी मिळताजुळता असल्यामुळे झाली होती. त्याला अर्जेन्टिनामध्ये आणायचं, त्याचा एल अॅल गणवेश आइकमनला घालायचा आणि तसं त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर काढायचं अशी हॅरेलची योजना होती. विमानात कार्मेल झीव्ह झीकरोनी या नावाच्या पासपोर्टवर आला होता.
दरम्यान अर्जेन्टिनामध्ये १६ मे या दिवशी हॅरेलने अजून एक योजना कार्यान्वित केलेली होती. मायर बार-हॉन नावाचा एक तरुण इझरेली नागरिक त्याच वेळी ब्युनोस आयर्समध्ये त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. त्याने १६ मे या दिवशी एका हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि तिथल्या डॉक्टरांना आपण एका गाडीच्या अपघातातून बालंबाल बचावलो आहोत पण आपल्याला आता चक्कर येणं, मळमळणं आणि अशक्तपणा यांचा त्रास होतोय असं सांगितलं. ही सगळी लक्षणं त्याला डॉ. योना एलीयानने व्यवस्थित समजावून सांगितली होती. मायर बार-हॉन १६ मेच्याच दिवशी ब्युनोस आयर्समधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाला. १९ मे या दिवशी सकाळी त्याने आपल्याला आता पुष्कळच बरं वाटतंय असं सांगून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवला. तो हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर लगेचच हॅरेलला भेटला आणि त्याने आपले डिस्चार्ज पेपर्स हॅरेलला दिले. आता हॅरेलकडे ब्युनोस आयर्समधल्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचे अस्सल डिस्चार्ज पेपर्स होते. जर आइकमनला विमानाकडे नेताना कुणी हटकलं तर हे पेपर्स कामाला येणार होते.
१९ मे १९६० या दिवशी अर्जेन्टिनियन प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजता एल अॅलचं विमान ब्युनोस आयर्स एअरपोर्टवर उतरलं. विमान उतरल्यानंतर दोन तासांनी हॅरेल आणि विमानाचा पायलट झ्वी तोहर भेटले. दोघांनी इझराईलकडे परत जाण्याची वेळ निश्चित केली – २० मेची मध्यरात्र.
हॅरेलची योजना अशी होती – आइकमनला एल अॅलचा आजारी पडलेला कर्मचारी म्हणून विमानामध्ये आणायचं. त्याचा ‘ डबल ’ येहुदा कार्मेल उर्फ झीव्ह झीकरोनी अर्जेन्टिनामध्ये पोचलेला होताच. त्याने आपला गणवेश आणि कागदपत्रं हॅरेलकडे दिली होती. शालोम डॅनीने अत्यंत कौशल्याने या कागदपत्रांमध्ये आइकमनच्या अनुषंगाने फेरफार केले होते आणि येहुदा कार्मेलसाठी नवीन कागदपत्रंही बनवली होती. ती वापरून तो काही दिवसांनी इझराईलला परत जाणार होता.
२० मेच्या मध्यरात्री निघायचं ही बातमी द बेस वर समजताच तिथल्या एजंट्सची सगळी मरगळ निघून गेली. डॉ.एलीयानने आइकमनला झोपेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर एजंट्सनी सगळा बंगला स्वच्छ केला. सगळ्या वस्तूंवरचे बोटांचे ठसे पुसून टाकले. तिथे आणलेल्या सगळ्या यंत्रांचे भाग सुटे करून ठेवले आणि आपापलं व्यक्तिगत सामान भरून ठेवलं. कॅसल आणि हाईट्समधल्या एजंट्सनीही आपापली घरं अशीच ‘ साफ ’ केली.
२० मे १९६०
हॅरेल सकाळपासूनच कामात व्यस्त होता. आज तो ज्या कॅफेमध्ये जाणार होता, ते सगळे एअरपोर्टजवळ होते. सकाळीच त्याने आपल्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान घेऊन तो पहिल्या कॅफेमध्ये गेला. त्याला सर्वात पहिल्यांदा भेटणाऱ्यांमध्ये एल अॅलच्या लोकांचा समावेश होता.
दुपारी या सगळ्या नाटकाचा शेवटचा अंक सुरु झाला. हॅरेलने शेवटच्या कॅफेमधून बाहेर पडल्यावर सरळ एक टॅक्सी घेतली आणि तो एअरपोर्टवर गेला. आता मध्यरात्री विमानाने उड्डाण करेपर्यंत तो इथूनच सगळ्याचं नियंत्रण करणार होता. एअरपोर्टवरचा कॅफेटेरिया लाउंज बऱ्यापैकी उबदार होता आणि बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लाउंजमध्ये सतत लोकांची वर्दळ होती. हॅरेलला त्याच्या लोकांना भेटून हलक्या आवाजात चर्चा करण्यासाठी अत्यंत सोयीची जागा होती.
रात्रीचे ९.०० – द बेस मध्ये सगळेजण तयार होते – आइकमनसकट. त्याला एल अॅलचा गणवेश आणि झीव्ह झीकरोनीची कागदपत्रं देण्यात आली होती. झ्वी मॉल्किनने आपला हौशी रंगभूमीवरचा सगळा अनुभव पणाला लावून आइकमनचा मेक अप केला होता. आइकमनप्रमाणे डॉ.एलीयान आणि अजून दोन एजंट्ससुद्धा एल अॅलच्या गणवेशात होते. निघण्यापूर्वी डॉ.एलीयानने आइकमनला थोडं कमी तीव्रतेचं गुंगीचं औषध दिलं. त्यामुळे आइकमनला गाढ झोप लागली नसती, पण तो ग्लानीच्या अवस्थेत राहिला असता.
एल अॅल गणवेशातल्या एजंट्सपैकी एक झ्वी आहारोनी होता. त्याने गाडी चालवायची असं ठरलेलं होतं. त्याच्या शेजारी एक एजंट बसला आणि मागे आइकमन दोघांच्या मध्ये बसला. या दोघांपैकी एक डॉ. एलीयान होता.
त्याच वेळी शहरातल्या दोन प्रसिद्ध हॉटेल्समधून खऱ्याखुऱ्या एल अॅलच्या लोकांना घेऊन दोन गाड्या निघाल्या. सगळ्या लोकांचं सामान घेऊन अजून एक वेगळी गाडी तिथे पोचली.
हॅरेलपासून दोन टेबल्स सोडून शालोम डॅनी बसला होता. तो काय करतोय हे कुणी जर लक्षपूर्वक पाहिलं असतं, तर त्यांना धक्काच बसला असता. तो प्रत्येक मोसाद एजंटसाठी बनवलेल्या नवीन पासपोर्टवर व्हिसा, अर्जेन्टिनामध्ये आल्याचे, परत जातानाचे वगैरे जे सहीशिक्के असतात, त्यांची नक्कल करत होता.
रात्रीचे ११ – रफी एतान हॅरेलला भेटला आणि त्याने सगळेजण पोचल्याचं सांगितलं. हॅरेलने पार्किंगमध्ये प्रत्येक गाडीपाशी जाऊन त्यांना त्यांचे पासपोर्ट आणि पुढच्या सूचना दिल्या. तिसऱ्या गाडीत त्याने डोकावून पाहिलं, तेव्हा त्याला एल अॅलच्या गणवेशातला आइकमन दोघांच्या शेजारी बसलेला दिसला. तो गाढ झोपेत होता. तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने निघाल्या आणि हॅरेल कॅफेटेरियामध्ये परतला.
एल अॅलचं विमान धावपट्टीजवळ येऊन थांबलं होतं. या तिन्ही गाड्या आता अर्जेंटिनियन पोलिस असलेल्या शेवटच्या अडथळ्यापाशी पोचल्या होत्या. “हाय, एल अॅल!” गाडीतला एक जण पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी तिन्ही गाड्यांमधल्या लोकांकडे लक्षपूर्वक पाहिलं, पण त्यांना काहीही वावगं आढळलं नाही. पहिल्या आणि दुसऱ्या गाडीमधले लोक हसत खिदळत होते आणि तिसऱ्या गाडीमधले लोक शांत झोपलेले होते.
अडथळा पार करून या तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने गेल्या. आता आइकमनला विमानात चढवायचा प्रश्न होता. आहारोनी, इलानी आणि शालोम या तिघा धटिंगणांच्या आडून आइकमनला विमानात चढवण्यात आलं आणि एजंट्स त्याला सरळ फर्स्ट क्लासमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला एका खिडकीपाशी बसवून डॉ. एलीयान त्याच्या शेजारी बसला. बाकीच्या एजंट्सनीही आपापल्या जागा घेतल्या.
रात्रीचे ११.३० – विमानाने धावपट्टीवर जाण्याआधी दिव्यांची उघडझाप केली. हा हॅरेलसाठी इशारा होता. तो स्वतःचं सामान उचलून निघाला. अजून चार-पाच एजंट्स आपापल्या सामानासह तिथे उभे होते. हॅरेलला बघताच न बोलता तेही निघाले. शालोम डॅनीच्या कौशल्यामुळे पासपोर्ट तपासणीच्या वेळी काहीही प्रश्न उद्भवला नाही.
रात्रीचे ११.४५ – कस्टम आणि इमिग्रेशन तपासणी पार पडल्यावर सगळे विमानाच्या दिशेने गेले. सर्वात शेवटी हॅरेल विमानात आला. लगेचच विमानाचा दरवाजा बंद झाला.
मध्यरात्र – विमान उड्डाण करणार तेवढ्यात कंट्रोल टॉवरकडून त्याला थांबण्याचा आदेश आला. सगळ्यांच्या मनात परत एकदा शंकांचं मोहोळ उठलं. शेवटच्या क्षणी दगाफटका झाला की काय? कुणाला संशय आलाय? पण सुदैवाने तांत्रिक मुद्दा होता. सुमारे २० मिनिटांनी विमानाला उड्डाणाचा इशारा देण्यात आला. विमानाने उड्डाण केलं आणि हॅरेलने सुटकेचा निःश्वास सोडला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
२२ मे १९६०
इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता एल अॅलचं विमान लॉड एअरपोर्टवर उतरलं. बरोबर सकाळी १० वाजता इसेर हॅरेल पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनला भेटला आणि त्याने आइकमन इझराईलमध्ये आल्याची बातमी सांगितली आणि आइकमनला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी परवानगी मागितली.
“तुझी खात्री आहे?” बेन गुरियननी विचारलं.
“कशाबद्दल?”
“हा माणूस आइकमनच आहे याबद्दल? तू कसं पडताळून पाहिलंस की हा माणूस आइकमनच आहे?”
हॅरेलला धक्काच बसला. त्याने आइकमनची फाईल, त्यामध्ये असलेलं वर्णन, झ्वी आहारोनीने आइकमन आणि रिकार्डो क्लेमेंट यांच्या फोटोंची केलेली तुलना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“शिवाय त्याने स्वतः कबूल केलेलं आहे की तो आइकमन आहे,” हॅरेल म्हणाला.
पण बेन गुरियन ऐकायला तयार नव्हते. शेवटी हॅरेलने मोसादच्या लोकांना कामाला लावलं आणि आइकमनशी प्रत्यक्ष बोललेल्या दोन ज्यूंना शोधून काढलं. त्या दोघांनी तुरुंगात जाऊन आइकमनशी संभाषण केलं आणि तोच एस.एस. अधिकारी अॅडॉल्फ आइकमन आहे असं सांगितलं.
इकडे फ्रँकफर्टमध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवरला आइकमनच्या अपहरणाची आणि त्याला इझरेली पोलिसांनी रीतसर अटक केल्याची बातमी समजल्यावर त्याने ती बातमी सांगणाऱ्या मोसाद एजंटला मिठी मारली. डॉ.बॉवरने जर नेटाने प्रयत्न केले नसते, तर आइकमनला अटक होणं आणि त्याच्यावर इझराईलमध्ये खटला भरला जाणं या गोष्टी अशक्यच होत्या.
त्याच दिवशी नेसेटचं, इझराईलच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाला पत्रकारांना – इझराईलमधल्याच नव्हे तर उर्वरित जगातल्याही – बोलावण्यात आलं होतं. सर्व प्रतिनिधी हजर होते. अशी कोणती गोष्ट जाहीर होणार आहे, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
बरोबर दुपारी ४ वाजता पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन उभे राहिले आणि त्यांनी सभापतींना बोलण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर त्यांनी आपलं वक्तव्य वाचून दाखवायला सुरुवात केली
“मला सभागृहाला ही माहिती द्यायची आहे की इझराईलच्या गुप्तचर संस्थांनी एका अत्यंत मोठ्या नाझी युद्धगुन्हेगाराला अटक केलेली आहे. हा गुन्हेगार इतर नाझींसमवेत ज्यूविषयक प्रश्नाचं अंतिम उत्तर म्हणजेच योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेल्या जवळजवळ ६० लाख ज्यूंच्या संहारासाठी जबाबदार आहे. त्याचं नाव आहे अॅडॉल्फ आइकमन. आइकमन या क्षणी इझराईलमध्ये आहे. त्याला इझरेली पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यावर नाझी युद्धगुन्हेगारांसंदर्भात असलेल्या कायद्यानुसार खटला चालवण्यात येईल.”
एक क्षणभर लोकांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना आणि नंतर संपूर्ण सभागृह उस्फूर्तपणे उठून उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. त्या एका क्षणाने मोसादची प्रतिमा बदलवून टाकली – इझरेली नागरिकांच्या नजरेत, इझराईलच्या मित्रांच्या नजरेत, संपूर्ण जगाच्या नजरेत!
क्रुश्चेव्हच्या भाषणाच्या प्रसंगामुळे जगात मोसादविषयी कौतुकाची आणि आदराची भावना होती. आइकमन प्रकरणानंतर त्या भावनेचं आदरयुक्त भीती आणि दरारा यांच्यात रूपांतर झालं.
उपसंहार:
आइकमनच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध असलेले पुरावे गोळा करून त्याच्यावर रीतसर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यामध्ये ९ महिने गेले. इझरेली सरकारला केवळ कागदपत्रांच्या आधारे हा खटला चालवायचा नव्हता त्यामुळे दररोज आइकमनला पोलिस अधिकारी प्रश्न विचारत. अपेक्षेप्रमाणे त्याने आपल्यावरच्या आरोपांना नाकारलं. त्यामुळे त्याच्यावर खटला चालणार हे निश्चित होतं. पण आइकमनचा वकील म्हणून कोण उभं राहणार, हा प्रश्न होता, कारण इझराईलमधला एकही वकील त्यासाठी तयार नव्हता. शेवटी न्यूरेंबर्ग खटल्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या जर्मनीतल्या रॉबर्ट सर्वेशियसला इझरेली सरकारने विनंती केली आणि तो आइकमनचं वकीलपत्र घ्यायला तयार झाला.
हा सर्व काळ आइकमनला इझरेली सरकारने उत्तर इझराईलमधील यागुर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं.
अर्जेन्टिनामध्ये आइकमनचं अपहरण झाल्यानंतर बरोबर ११ महिन्यांनी – ११ एप्रिल १९६१ या दिवशी त्याच्यावरचा खटला जेरुसलेमच्या न्यायालयात सुरु झाला. सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या गिडिऑन हॉसनरने १५ गुन्ह्यांचा उल्लेख असलेलं आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केलं. या गुन्ह्यांमध्ये ज्यू वंशाविरुद्ध गुन्हेगारी कारस्थान आणि प्रत्यक्ष गुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे (Crimes against Humanity) या मुद्द्यांचाही समावेश होता.
१५ डिसेंबर १९६१ या दिवशी न्यायालयाने आइकमनला प्रत्येक गुन्ह्याबद्दल दोषी असल्याचा निर्णय देऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आइकमनने या निर्णयाविरुद्ध अपील केलं पण ते नाकारण्यात आलं. त्याने राष्ट्राध्यक्षांकडे केलेला दयेचा अर्जसुद्धा फेटाळण्यात आला.
३१ मे १९६२ च्या मध्यरात्री/ १ जून १९६२ च्या पहाटे रामला येथील तुरुंगात खास बनवण्यात आलेल्या वधस्तंभावर आइकमनला फासावर लटकवण्यात आलं. त्याचा मृतदेह ताबडतोब जाळण्यात आला. तेव्हा विद्युतदाहिनीमधून येणाऱ्या धुराकडे पाहून ऑशवित्झमधल्या शवदाहिन्यांची आठवण तिथे हजर असलेल्या पत्रकारांना आली.
साठ लाख ज्यूंच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आनंदात हसत हसत मरू इच्छिणाऱ्या अॅडॉल्फ आइकमनची राख इझरेली तटरक्षक दलाच्या जहाजांनी भूमध्य समुद्रात विखरून टाकली.
जेव्हा रेडिओवर ही बातमी प्रसारित झाली, तेव्हा झ्वी मॉल्किन त्याच्या मरणासन्न आईचा हात हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये तिच्या बाजूला बसला होता.
“मी आइकमनला पकडलं आई. फ्रुमाच्या आणि तिच्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेतला आपण!” तो तिला म्हणाला.
“तू तुझ्या बहिणीला विसरणार नाहीस याची मला खात्री होती बाळा!” त्याची आई म्हणाली.
सी.आय.ए.च्या प्रतिहेरखात्याचा प्रमुख जेम्स अँगलटनने आपल्या डायरीत लिहिलं – The way Israel ensured justice with Adolf Eichmann proves that everything is NOT fair in love and war!
क्रमशः
संदर्भ:
१.The House on Garibaldi Street – by Isser Harel
२.Eichmann in my hands – by Zvi Malkin
३.Hunting Eichmann: Chasing down the World’s most notorious Nazi – by Neal Bascomb
४.Eichmann Trial – United States Holocaust Memorial Museum (www.ushmm.org )
५.Mossad: the Greatest Operations of the Israeli Secret Service – by Michael Bar Zohar and Nissim Mishal
६. The History of Mossad – by Antonella Colonna Vilasi
७. Nazi War Trials – by Andrew Walker
काही प्रताधिकारमुक्त फोटो -
एस. एस. लेफ्टनंट कर्नल अॅडॉल्फ आइकमन
डॉ. फ्रित्झ बॉवर
खटल्यादरम्यान आइकमन
प्रतिक्रिया
6 Jan 2016 - 1:40 am | श्रीरंग_जोशी
अत्यंत थरारक घडामोडींचे एकदम परिणामकारक वर्णन. वाचायला सुरुवात केल्यापासून न थांबता पूर्ण लेख वाचून काढला.
या लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद.
6 Jan 2016 - 2:46 am | राघवेंद्र
खुप सुरेख भाग !!!
6 Jan 2016 - 2:33 am | पद्मावति
अगदी हेच म्हणायचे आहे.
खरोखर अप्रतिम.
6 Jan 2016 - 3:50 am | कल्पक
चतुर संघटना, अचाट साहस, अफलातून घटनाक्रम आणि अप्रतिम लेखन!
6 Jan 2016 - 3:59 am | पहाटवारा
ह्या घटनेवर आधारीत एक मूवी आहे The house on Garibaldi Street
6 Jan 2016 - 8:25 am | अजया
अफलातून खरंच ! सूड घ्यावा तो मोसादने!
6 Jan 2016 - 9:38 am | नाखु
सहमत . दरारा+धाक खंबीर आणि शूरांचा असतो, नेम्स्तांच्या निषेध खलित्यांच्या भेंडोळ्या होतात हेच खरे !!!!
6 Jan 2016 - 9:12 am | स्पा
जबराट, थरारक
6 Jan 2016 - 10:03 am | विशाल कुलकर्णी
क्षणाक्षणाह्शिशोब दिलात राव , जियो !
मजा आली...
6 Jan 2016 - 10:29 am | पगला गजोधर
हिटलर व त्याचे भक्तगण
इस्राईलच्या ताब्यात फाशिपूर्व मेडीकल चेकअप
कैद
मोसादने अॅडॉल्फ आइकमनच्या अपहरणासाठी बनवलेला बनावट पासपोर्ट
केवळ विशिष्ठ धर्मीय असल्यामुळे बळी गेलेले अॅडॉल्फ आइकमनचे बळी
6 Jan 2016 - 1:25 pm | रघुनाथ.केरकर
साठ लाख ज्यु.......
अत्यन्त दुर्दैवी.
मला एक प्रश्ण आहे..... की....
ज्युनी काहीच कसा प्रतीकार केला नाही....
डेफीयन्स मध्ये थोडाफार पाहिला होता.
जाणकार प्रकाश टाकतील का?
10 Jan 2016 - 5:12 pm | विवेकपटाईत
जर्मनीत सर्व घटना तीव्र वेगाने घडल्या होत्या. निशस्त्र जनता प्रतिकार करण्यास असमर्थ ठरली. शिवाय ज्यू विषयी अनादर होताच. आत्ताचेच पहा गेल्या २ वर्षांपासून फ्रांस मध्ये ज्यू लोकांवर हल्ले होत होते, ज्यू लोकांनी फ्रान्समधून पलायन करायला हि सुरुवात केली. पण फ्रांस सरकार ने तिथे लक्ष्य दिले नाही. परिणाम......
10 Jan 2016 - 6:13 pm | पगला गजोधर
असहिष्णू हिटलर/ त्याचे भक्तगण....
आणि राष्ट्रप्रेमाचा दिखावा करून
सत्ता बळकावणारे, ज्यू हत्याकांड करणारे नाझी मंडळी ....
ज्यांची मते पटत नाही व ज्यू लोकांवर, हल्ला करणारे, व त्यांना, इस्रायेल ला चालते व्हा म्हणणारी, आजच्या फ्रांस मधली मंडळी ,
यांच्यात काहीही फरक नाही.
6 Jan 2016 - 12:10 pm | मन१
आइअकमन ही मोस्सादच्या सर्वाधिक गाजलेल्या किस्श्यांपैकी एक आहे.
मधुकर तोरडमल ह्यांनी कुठल्याशा दिवाळी अंकात ह्याबद्दल सविस्तर लिहिलं होतं.
अर्थात अटकेचे तपशील त्यात इतके नव्हते; तर आइकमन बद्दलची माहिती होती, आणि खटल्याची माहिती होती.
इथे नेमकी उलट केस आहे; त्यामुळे डोक्यातलं चित्र पूर्ण झालं.
.
.
.बादवे, त्या आइकमनला उचलून आणायची आयडिया मोस्साद एजण्टांनी सर्रळसरळ मागच्या वर्षी आलेल्या
बॉलीवूडपटातून -- अक्षयकुमारच्या "बेबी" मधून ढाप्लेली आहे, कॉपी पेस्ट केली आहे .
6 Jan 2016 - 4:03 pm | तुषार काळभोर
परत सिद्ध झालं! मोसाद किती दूरदृष्टीवाले आहेत.
6 Jan 2016 - 12:36 pm | मनराव
लिहित रहा ....
6 Jan 2016 - 12:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
मोसादच्या इतिहासातले सर्वात आवडते पान! कुठेतरी वाचले का ऐकले होते "रिवेंज इज द प्योरेस्ट इमोशन" ते अन ऑशविट्ज़ च्या पापांबद्दल काव्यात्मक न्यायगती ही ह्या ऑपरेशन ची खासियत!!
6 Jan 2016 - 1:34 pm | महासंग्राम
वाह कसला भारी कोटे बाप्पू ….
8 Jan 2016 - 5:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
6 Jan 2016 - 12:48 pm | विलासराव
सर्व भाग वाचले.
पुढचेही वाचण्याची उत्सुकता आहेच.
6 Jan 2016 - 12:53 pm | विजुभाऊ
मनोबा बर्रोब्बर बोल्या रे. मै बी येईच्च कैनेकु आयेला था.
6 Jan 2016 - 12:55 pm | नया है वह
लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद!
6 Jan 2016 - 1:33 pm | अरिंजय
केवळ अप्रतीम
6 Jan 2016 - 1:36 pm | महासंग्राम
एखादा चित्रपट पहावा अश्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात लेख वाचतांना, आपण वाचक नसून मोसाद च्या टीम मधला एक भाग आहे अस वाटायला लागलं होत ते ऑपरेशन वाचताना.
+१११११११११११ आणि पुभाप्र
6 Jan 2016 - 1:44 pm | रघुपती.राज
लिहित रहा
6 Jan 2016 - 2:14 pm | मोदक
बोकाजी.. उत्तम लेख. पुभाप्र.
या विषयावर पारध नावाचे पुस्तक आहे ते वाचले असेलच.. नसल्यास जरूर वाचा.
6 Jan 2016 - 2:31 pm | शलभ
अप्रतिम लेखन.
6 Jan 2016 - 2:35 pm | सुधांशुनूलकर
हा भागही अत्यंत थरारक, रोमांचक.
6 Jan 2016 - 2:54 pm | बाबा योगिराज
मानल बुआ. जबरस्त लेख आहे. आवड्यास.
पुढील भागाची वाट बघत आहोत.
योगी बाबा.
6 Jan 2016 - 3:12 pm | बंट्या
ज्यू आणि त्यांच्या राष्ट्र भक्ती ला तोड नाही .
6 Jan 2016 - 3:28 pm | होबासराव
एकदम जबराट :)
जियो बोका भाउ जियो
6 Jan 2016 - 3:34 pm | अत्रन्गि पाउस
वाचतांना ...जियो
6 Jan 2016 - 4:26 pm | पिलीयन रायडर
थ रा र क!!
हे भाग लिहीताना तुम्हाला खुप अभ्यास करावा लागत असणार.. इतके बारिक सारिक डीटेल्स लिहायचे म्हणजे खुप वेळखाउ काम असेल.. पण तरीही...
प्लिझ पटकन पुढचा भाग टाका!
6 Jan 2016 - 7:53 pm | रुस्तम
+१ हेच म्हणतो...
6 Jan 2016 - 4:39 pm | प्रचेतस
जबरदस्त.
6 Jan 2016 - 5:17 pm | कविता१९७८
हा पुर्ण भाग जवळपास आहे तसाच २०-२५ वर्षापुर्वी वाचलाय मी साधारण १९९०-९२ च्या आसपास, एका मासिकात (अनुवादीत) म्हणुन आला होता ,आणि या ऑपरेशन ने इतकी भारावुन गेले होते की ही माहीती अजुनही आठवतेय, त्याकाळी आमच्याकडे सोविएत रशिया चे मासिक यायचे कदाचित तेव्हा वाचला असेल पण विसरणे अशक्य, तुम्हीही खुप मेहनत घेतलीये, तुमचेही कौतुक.
6 Jan 2016 - 5:30 pm | पगला गजोधर
'मिशा' हे मासिक का ?
6 Jan 2016 - 7:04 pm | कविता१९७८
आठवत नाही , सोव्हीएत सन्घ असे कीहीसे असेल, तेव्हा शाळेत जायचे तेव्हा मी
6 Jan 2016 - 7:10 pm | अत्रन्गि पाउस
असे नाव होते
6 Jan 2016 - 9:06 pm | आरोह
त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टल स्टॅम्प असायचे ते मी कापून घ्यायचो
7 Jan 2016 - 10:05 am | पगला गजोधर
8 Jan 2016 - 5:21 pm | ऋतुराज चित्रे
सोविएत देश असावे. आमच्याकडे यायचे हे मासिक.
6 Jan 2016 - 7:46 pm | राजाभाउ
जबरदस्त मालिका, The House on Garibaldi Street वाचले होते. पण तपशील आठवत नव्हते आता. या लेखामुळे ते सर्व आठवले. मनापासुन धन्यवाद.
6 Jan 2016 - 9:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ज ब र द स्तं हा एकचं शब्द बोकोबा.
6 Jan 2016 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त मालिकेतील जबरदस्त लेख ! अजून काय ?!
7 Jan 2016 - 12:27 am | जुइ
जबरदस्त आणि थरारक!
7 Jan 2016 - 1:16 am | अर्धवटराव
लय भारी.
हे ऑपरेशन कसं राबवलं गेलं त्याच्या डिटेल्स कशा काय उघड झाल्या? अगदी नकली पासपोर्टच्या फोटोसकट? हे मोसादचं अपयश मानावं काय? कारण कोर्टात तर या भानगडी कोणि सांगितल्या नसतील. मग मोसादच्या कपाटातुन कुणी चोरली हि माहिती??
7 Jan 2016 - 6:37 am | निनाद मुक्काम प...
९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर नाझींनी ज्यूंसाठी छळछावण्या उभारायला सुरुवात केली. यातली पहिली छावणी म्हणजे डाखाऊ (Dachau). इथे जे ज्यू सर्वात पहिल्यांदा पाठवण्यात आले
हि छावणी आमच्या म्युनिक मध्ये आहे. तिथे जगभरातून पर्यटक येउन संपूर्ण छावणी पाहतात त्यांना प्रवेश मोफत आहे.
आपले पेठकर काका आले होते तेव्हा त्यांना घेऊन त्या छावणीत नेले होते . पहिल्या दिवशी उशिरा झाला म्हणून काका काकूंना पार गेस चेंबर मध्ये नेता नाई आले म्हणून मग पेठकर काका दुसर्या दिवशी जाऊन छावणी पाहून आले.
मृत्युच्या प्रदेशात निशब्ध होऊन सगळे पर्यटक पाहत होते.
तेथे माहितीपट दाखवतात तो पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही , माझ्या मनात जालियानवाला बाग ते
फाळणी च्या वेळची दंगल असा विचार सुरु आला प्रेतांनी भरलेले ट्रक पाहणे धक्कादायक नक्कीच होते पण भारतात असेच निरपराध दंगलीत मारले गेले होते तेव्हा मन कुठेतरी निबर झाले होते हे सर्व पाहतांना
मोसाद विषयी आदरयुक्त भीती जगाला वाटते तशी रॉ बद्दल व्हावी असे मनापासून वाटते.
7 Jan 2016 - 9:22 am | पगला गजोधर
भारतीय तपास यंत्रणाच्या खर्याखुर्या कर्तुत्वावर आधारित, 'खुशबू' ही कथा लिहिलेली,
सुरक्षेच्या दृष्टीने, त्यातील तपास अधिकारी, राजकारणी आणि इतर संवेदनाशील डीटेल्स मुद्दामून आल्टर करून लिहिलेली,
हा तपास अतिशय कौशल्यपूर्वक व उपलब्ध साधनसामग्रीसहित, गाजावाजा न करता, अतिशय गुप्ततेने पूर्ण केलेला.
मुखदुर्बल म्हणून हिणवले गेलेले माजी पंतप्रधान व लुंगीवाला म्हणून टीका झालेले केंद्रीय गृहमंत्री, यांनी मीडियामधून / विरोधी पार्टीकडून अतिशय तिखट टीका होत असतानाही, एकही अक्षर तोंडून बाहेर पडू दिले नाही. कुठेही बोलबच्चनगिरी न करता, तत्कालीन राजकीय व्यक्ती व तपास यंत्रणा यान्नि अतिशय खडतर मेहनतीने तपास केला. रॉ आयबी एनआयए यांना माझा स्यालुट…
8 Jan 2016 - 12:10 am | अर्धवटराव
खुशबू वाचायची राहुन गेलि :(
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद राजे.
8 Jan 2016 - 8:08 am | कैलासवासी सोन्याबापु
+११ पगला गजोधर भाई तूफ़ान लिहिलिये!!
8 Jan 2016 - 9:09 am | पगला गजोधर
मला कथेत, मार्कोस जलमुर्गी (आठवा-कॅप्टन वाझ) बद्दल विस्ताराने लिहायचे होते पण, कथेचा फोकस डेव्हीएट झाला असता म्हणून, आवरले …
8 Jan 2016 - 11:15 am | असंका
आता अवांतर चालू झालंच आहे तर-
फार घाईघाईने आटपली गेल्यासारखी वाटली ती गोष्ट....
7 Jan 2016 - 12:24 pm | होबासराव
अहो रॉ आयबी एनआयए ह्यांचे योगदान फारच थोडे होते महराजा, खरी मेहनत सोगां आणि रागां चि होति.
7 Jan 2016 - 12:41 pm | मार्गी
अतिशय जबरदस्त. . . धन्यवाद बोका ए आझम जी!
असं म्हणतात की, अर्जेंटिना सरकारला नाझींचा प्रभाव कमी करायचा होता, म्हणून त्या सरकारने मोसादला अप्रत्यक्ष सहकार्य केलं. जाणकारांनी माहिती द्यावी. शिवाय राजनैतिक संकेतांचं उल्लंघन म्हणून इस्राएलवर नंतर टीकाही झाली. पण न्या य मि ळा ला थोडा तरी.
7 Jan 2016 - 6:17 pm | संदीप डांगे
बोकाभाऊ, खतरनाक लिवता राज्या तुमी... लै अभ्यास लागते बावा येवळं लिव्याले! आता सगळे भाग वाचून काढले. फुडचा लौकर टाकजा!
8 Jan 2016 - 11:51 am | पैसा
सुंदर मालिका!
8 Jan 2016 - 12:00 pm | नूतन सावंत
आताच चारही भाग वाचून काढले. बोक्या तुझ्या विचारमंथनातून वाचकांच्या हाती लागलेला लोण्याच गोळा आहे हा.पुढचा भाग लवकर टाकरे बाबा.आणि हा दंडवत स्वीकार.
8 Jan 2016 - 2:41 pm | रुस्तम
सहमत
8 Jan 2016 - 2:05 pm | मोहन
नेहमी प्रमाणेच सुंदर लेखन आणि मालीका विषय .
लिखते रहो बोके भाय, हम वाचते रहेंगे.
8 Jan 2016 - 2:53 pm | गुरूप्रसाद बाचल
सुरूवात ते शेवट खिळवून ठेवणारे लिखाण.इतिहासाची माहिती फारच छान
8 Jan 2016 - 8:39 pm | गामा पैलवान
आईकमनचं अपहरण ही मोसाद्ची चक्क थापेबाजी आहे. बीबीसीच्या इतिहास विभागात एक लेख आहे : http://www.bbc.co.uk/history/worldwars/genocide/eichmann_01.shtml
त्यातलं आईकमनचं चित्रं नित बघितलं तर तो ज्युईश आहे हे स्पष्ट दिसतं. त्याचं लोंबतं नाक आणि बाहेर फाकलेले कान पाहावेत. त्यावेळी फायनल सोल्युशन म्हणजे ज्यूंना ठार मारणे हे नसून त्यांना प्यालेस्टाईन वा मादागास्कर मध्ये कायमचे पाठवणे हे आहे. त्याबाबत नाझी आणि झायोनिस्ट यांच्यात सामंजस्य करारही (= हावरा करार) झाला होता. पुढे झायोनिस्टांनी टांग मारली आणि ज्यूंना प्यालेस्टाईनात नेणं बंद केलं. तर हिटलरने वैतागून त्यांना सक्तीने पाठवायचा निर्णय घेतला. हेच ते फायनल सोल्युशन.
ज्यूंना ठार मारंत बसायला वेळ आणि शक्ती नाझी जर्मनीकडे नव्हती. १९४३ पासून पुढे फायनल सोल्युशन आमलात आणलं गेलं. दीड दोन वर्षांत साठ लाख माणसं ठार मारणे म्हणजे गंमत आहे का?
तर आपण आईकमन कडे येऊया. त्याला रिकारो क्लेमेंट या नावाचे कागदपत्र बनवून देणारी नेली क्राविट्झ ही विधवा होती. तर क्राविट्झ हे आडनाव ज्युईश आहे.
8 Jan 2016 - 9:18 pm | गामा पैलवान
प्रतिसाद अर्धवट राहिल्याबद्दल क्षमस्व. पूर्ण प्रतिसाद खाली आहे.
-गा.पै.
11 Jan 2016 - 4:17 pm | महासंग्राम
http://www.misalpav.com/node/24014
8 Jan 2016 - 9:14 pm | गामा पैलवान
लोकहो,
आईकमनचं अपहरण ही मोसाद्ची चक्क थापेबाजी आहे. बीबीसीच्या इतिहास विभागात एक लेख आहे : http://www.bbc.co.uk/history/worldwars/genocide/eichmann_01.shtml
त्यातलं आईकमनचं चित्रं नित बघितलं तर तो ज्युईश आहे हे स्पष्ट दिसतं. त्याचं लोंबतं नाक आणि बाहेर फाकलेले कान पाहावेत.
त्यावेळी फायनल सोल्युशन म्हणजे ज्यूंना ठार मारणे हे नसून त्यांना प्यालेस्टाईन वा मादागास्कर मध्ये कायमचे पाठवणे हे आहे. त्याबाबत नाझी आणि झायोनिस्ट यांच्यात सामंजस्य करारही (= हावरा करार) झाला होता. पुढे झायोनिस्टांनी टांग मारली आणि ज्यूंना प्यालेस्टाईनात नेणं बंद केलं. तर हिटलरने वैतागून त्यांना सक्तीने पाठवायचा निर्णय घेतला. हेच ते फायनल सोल्युशन.
ज्यूंना ठार मारंत बसायला वेळ आणि शक्ती नाझी जर्मनीकडे नव्हती. १९४३ पासून पुढे फायनल सोल्युशन आमलात आणलं गेलं. ते फारतर १९४५ पर्यंत चाललेलं असणार. तर मग दीड दोन वर्षांत साठ लाख माणसं ठार मारणे म्हणजे गंमत आहे का? किती तो वेडगळपणा ! रोज साताठ हजारांहून अधिक माणसे मारावी लागतील. १९४३ नंतर जर्मनी युरोपातल्या युद्धांत थोड्याफार सातत्याने माघार घेत होता. आता लढाईवर लक्ष केंद्रित करायचं का ज्यूंना ठार मारंत बसायचं?
तर आपण आईकमनकडे परत येऊया. त्याला ओटो हेनिंजर या नावाने आश्रय देणारी नेली क्राविट्झ ही स्त्री होती. क्राविट्झ हे आडनाव ज्युईश आहे. आईकमनने नंतर रिकार्डो क्लेमेंट हे नाव धारण केले. त्यासाठी नेलीची बरीच 'मदत' झाली. एकंदरीत आईकमन झायोनिस्ट कंपूतला प्राणी होता. मोसादचं नाव व्हावं म्हणून त्याचा बळी दिला गेला असावा. त्याचं प्रेत कोणी बघितलेलं नाही. कारण ते जाळून त्याची राख म्हणे समुद्रार्पण केली. गरज काय होती? (यावरून ओसामा बिन लादेन आठवतो, नाहीका?)
मात्र असं असलं तरी धागाकर्त्याने नाराज होऊ नये. त्याचे श्रम योग्य दिशेस लागावेत ही इच्छा.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2016 - 1:39 am | बोका-ए-आझम
आणि तुमचे एकतर गैरसमज झालेले आहेत किंवा मग तुम्ही बहुधा Alternative History वाचत असाल. तुमच्या एकेक मुद्द्याला उत्तर देतो -
१. बापूंनी त्यांच्या प्रतिसादात लिहिलं आहेच. मीही लिहितो - माणूस कसा दिसतो यावरून वंश ओळखता येत नाही. लांब नाक आणि फाकलेले कान ही चेहऱ्याची वैशिष्ट्ये आहेत - ज्यू वैशिष्ट्ये नाहीत.इथिओपियन ज्यू हे निग्रोंप्रमाणे काळे असतात. बेने इझरायली लोक तुम्हा-आम्हा भारतीयांसारखे दिसतात.
२. FINAL SOLUTION हा शब्दप्रयोग जानेवारी १९४२ मध्ये बर्लिनचं एक उपनगर वानसी येथे झालेल्या एका बैठकीमध्ये वापरला गेला. ही बैठक राईनहार्ड हायड्रिच या क्रूरकर्मा नाझी अधिका-याने बोलावली होती. ज्युंना पॅलेस्टाईनमध्ये नेण्यासाठी झिओनिस्ट आणि नाझी यांच्यात करार झाला होता पण १९३९ मध्ये महायुद्ध भडकल्यावर त्यांना पॅलेस्टाईनमध्ये नेणं अशक्य झालं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे झिओनिस्टांनी टांग वगैरे काहीही मारली नाही. १९४१ मध्येच सोविएत प्रदेशात Einsatzgruppen या भरारी पथकांनी ज्यूंचं हत्याकांड चालू केलं होतं. युक्रेनमधील बाबी यार (Babi Yar)या ठिकाणी पाॅल ब्लोबेल या एस्.एस्. अधिका-याच्या देखरेखीखाली ३३,००० ज्यूंना ठार मारण्यात आलं - एका दिवसात.
वानसीमध्ये हायड्रिचने ज्यूंचं हत्याकांड करायचं ठरवलं आणि त्याला हिटलरची मंजुरी घ्यायचा ठराव केला. या बैठकीची टिपणं (minutes)आइकमनने काढली होती. मादागास्करला ज्यूंना पाठवण्याची योजना होती, प्रत्यक्षात काहीच झालं नाही.
३. जर्मनीच्या पराभवाच्या अनेक कारणांमध्ये एक कारण म्हणजे ज्यूंना मारण्यावर बहुमोल संसाधनं वाया घालवणं. १९४३ च्या जानेवारीत जर्मनीचा स्टॅलिनग्राडला पराभव झाला. पुढे १९४३ च्या जून आणि जुलैमध्ये कर्स्कच्या लढाईनंतर जर्मन सैन्याची चढाईची क्षमता अर्ध्याहून जास्त नष्ट झाली. पण प्रत्यक्ष माघार ही सप्टेंबर १९४४ मध्ये सुरु झाली. तेव्हा अँग्लो-अमेरिकन सेना फ्रान्समधून आणि रशियन सैन्य पोलंडमधून जर्मनीत घुसू पाहात होतं. पण याच काळात एकट्या आॅशविट्झमध्ये दररोज ३००० ज्यू मारले जात होते. हा अाकडा कोणा ज्यू संस्थेने नव्हे तर आॅशविट्झचा माजी कमांडंट रुडाॅल्फ होएस (नाझी नेता रुडाॅल्फ हेस वेगळा)याने न्यूरेंबर्ग खटल्यात दिलेल्या साक्षीतला आहे.
४. नेली क्राविट्झ ही ज्यू नव्हती. तिने फक्त तसं नाव घेतलं होतं. अर्थातच आपला नाझी भूतकाळ लपवण्यासाठी. ती माजी एस्.एस्. अधिका-यांच्या ODESSA या संघटनेची कार्यकर्ती होती.
होलोकाॅस्ट आणि आइकमन या वस्तुस्थिती आहेत. कोणीही कितीही वेगळं सांगायचा प्रयत्न केला तरी नाकारता येणार नाही अशी वस्तुस्थिती!
तुम्ही लिंक दिलेला लेख हा डेव्हिड सीझरानी या ज्युईश इतिहासाच्या प्राध्यापकांनी लिहिलेला आहे. त्यांचं २०१५ मध्ये निधन झालं. त्यांनी या लेखात आइकमन एवढ्या लोकांच्या मृत्यूला कसा जबाबदार होता ते व्यवस्थित लिहिलेला आहे.
9 Jan 2016 - 12:13 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
9 Jan 2016 - 12:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
पटले नाही गा पै,
मुद्दे खालील प्रमाणे
१ लांब नाक अन लोंबते कान हे ज्युईश असल्याची १००% खात्री देतात का? माझ्यामते हे क्लेम्स करायला आधार म्हणजे फ़क्त कॉलोनीयल एंथ्रोपोलॉजी उर्फ़ मानववंशशास्त्र आहे, ज्याला आधुनिक वैद्यक अन जनुकीय शास्त्रे सपशेल नाकारतात एक्यूरेसी मधे नंतर ची २ शास्त्रे ही उत्तम समजली जातात
२. हिटलरकड़े ६० लक्ष ज्यु मारायला वेळ नव्हता असे म्हणले तरी ऑशविट्ज़ सारखे कॅम्प पूर्णपणे वेगळ्याकथा आजही दाखवतात
३. अडॉल्फ आईकमन म्हणुन ज्यु माणसे स्वधर्मियाला एकवेळ मारते झाले तरी एक लक्षात घ्या ज्यु बाय बर्थ असावे लागते त्यांच्याकडे कन्वर्शन सिस्टम नाही अन एक एक ज्यु प्राण मोलाचा हे इजराइल सरकारचे तत्व आहे ते न पाळता त्याला हरताळ फासुन जरी सरकार ने ज्यु माणसाला आईकमन म्हणून लटकवले असे मानले तरी त्याला एकही कडव्या ज़ियोनिस्ट ज्यु संघटनेने विरोध केला नाही? पुर्ण इजराइल मधे? अशक्यकोटीतले वाटले हे
४. बीबीसी बद्दल काय बोलणार? लेस्ली उड़विन अन तिच्या डॉटर ऑफ़ इंडिया मॅटर मधे त्यांचा मूर्खपणा अन बायस किमान भारतातल्या प्रबुद्ध लोकांना तरी समजला आहेच, त्या डॉक्यूमेंट्रीला नाकारायचे अन आईकमन मधे संदर्भ वापरायचा हे काही पटले नाही, शिवाय बरेच वेळी बीबीसी एमआय ६ च्या एका ब्रांच प्रमाणे काम करते की काय इतपत शंका यावी असले त्यांचे वर्तन असते अन मध्यपूर्व किंवा भारतातल्या कोलोनियल चूका झाकण्याकड़े त्यांचा कल असतो असे वाटते
10 Jan 2016 - 12:23 am | मास्टरमाईन्ड
हे मात्रं १००००००००००००++++++++ पटलं.
10 Jan 2016 - 1:26 am | गामा पैलवान
सोन्याबापू,
तुमचा प्रतिसाद वाचला. माझी मतं मांडतो.
१. >> लांब नाक अन लोंबते कान हे ज्युईश असल्याची १००% खात्री देतात का?
असं बघा की, जरी मानववंशशास्त्राने खात्री दिली, तरी हिटलरने काय या मुद्द्याच्या आधारे लोकांना ज्यू ठरवलं असेल का? शक्यच नाही. तत्कालीन समज काय होता त्या आधारे बघायला पाहिजे. इथे 'द स्ट्रुमर' नामे ज्यूविरोधी वृत्तपत्रातील तत्कालीन व्यंगचित्रांची यादी आहे : http://research.calvin.edu/german-propaganda-archive/sturm28.htm
तिथली व्यंगचित्रे पहा. प्रत्येकाचा स्वतंत्र दुवा आहे. जवळपास प्रत्येक व्यंगचित्रात ज्यू माणूस दाखवला आहे. कसा आहे ते बघा. आणि आईकमन कुणासारखा दिसतो ते ठरवा. हे तत्कालीन जर्मन माणसाचं आकलन आहे.
२.
>> ऑशविट्ज़ सारखे कॅम्प पूर्णपणे वेगळ्याकथा आजही दाखवतात
अधिकृत माहितीनुसार ऑशवित्झ ही मरणछावणी आहे. मात्र तिथल्या मृतांची संख्या सतत कमी होत आलेली आहे. तिथे ज्यूंना झायक्लॉन बी या ग्यासने घुसमटवून ठार मारलं असा दावा आहे. प्रत्यक्षात हा वायू डोक्यातल्या उवा मारण्यासाठी वापरण्यात येत असे. त्याने माणूस मरणार आहे का? त्याचे भिंतींवर निळे डाग पडतात. तसे कुठेही दिसंत नाहीत. शिवाय एव्हढी माणसं मारून त्यांची राख बनवायला किती प्रचंड प्रमाणावर ऊर्जा खर्च करावी लागेल? युद्ध जिंकायचं की निरर्थक खुनाखुनी करंत बसायचं?
३.
>> सरकार ने ज्यु माणसाला आईकमन म्हणून लटकवले असे मानले तरी त्याला एकही कडव्या ज़ियोनिस्ट
>> ज्यु संघटनेने विरोध केला नाही? पुर्ण इजराइल मधे? अशक्यकोटीतले वाटले हे
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. हावरा करारास आगोदर पाठींबा देऊन नंतर मोडता घालणारे हेच झायोनिस्ट होते ना? जर झायोनिस्टांनी हावरा करार ठरल्याप्रमाणे पाळला असता तर मध्य युरोपातला प्रत्येक ज्यू नाझींच्या मदतीने प्यालेस्टाईनात अलगद पोचला असता. मग युद्ध कोण करणार? आणि नफेखोरीची चटक लागलेल्या झायोनिस्टांना काम काय उरलं आता?
४.
>> बीबीसी बद्दल काय बोलणार?
मुद्दा बीबीसी बद्दल नाहीये. तिथल्या आईकमनच्या एका प्रकाशचित्राबद्दल आहे. ते प्रचित्र अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.
असो.
सर्वसामान्य ज्यूंचा ज्यांनी विश्वासघात केला तेच आता आमच्यावर भीषण अन्याय झाला म्हणून गेली सत्तर वर्षे बोंबाबोंब करताहेत.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2016 - 1:52 am | बोका-ए-आझम
Zyklon B म्हणजे हायड्रोजन सायनाईड. उवा मारायला सायनाईड वापरतात?
हावरा कराराची जी लिंक तुम्ही दिलेली आहे त्यातलाच एक परिच्छेद देतोय -
After the invasion of Poland and the onset of World War II in 1939, the practical continuation of the Haavara agreement became impossible. In 1940, representatives of the underground Zionist group Lehi met with von Hentig to propose direct military cooperation with the Nazis for the continuation of the transfer of European Jews to Palestine.[7] This proposal, however, did not produce results.
झिओनिस्टांनी ज्यूंच्या पॅलेस्टाईनमध्ये जाण्याला मोडता घातला हे जे तुम्ही म्हणताय त्याचा कुठलाही उल्लेख इथे नाहीये.
पुरावे न देता बेजबाबदार विधानं करणं ही दादा दरेकर/नाना नेफळे/ ग्रेटथिंकर/ मोगा वगैरे लोकांची मोनोपाॅली आहे हो. तुम्हाला शोभत नाही. का आयडी हायजॅक झालाय?
10 Jan 2016 - 4:35 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
एकेक मत मांडतो.
१.
>> उवा मारायला सायनाईड वापरतात?
डीडीटीचा शोध लागण्यापूर्वी कीटकनाशक म्हणून झायक्लॉन बी वापरत असंत. त्यातून हायड्रोजन सायनाईड हळूहळू पसरत असे. त्यामुळे कीटक वगैरे मरंत असंत. उवानाशक कक्ष (delousing chambers) हे त्यावेळचं सर्रास वापरात असलेलं तंत्रज्ञान होतं. टायफस रोग उवांमार्गे पसरंत असे. म्हणून त्याच्या अटकावार्थ उवानाशनाची प्रक्रिया घडवण्यात येई.
झायक्लॉन बी मधून तीन हजार माणसे मारण्याइतका ग्यास निघायला किती किलो माल वापरावा लागेल? आणि तो इवल्याश्या पाईपांचा चिमुकल्या छिद्रांतून किती वेळांत बाहेर येईल? आणि भिंतींवर सायनाईडचा अंश कसा सापडत नाही? हे प्रश्न आहेतंच.
२.
>> झिओनिस्टांनी ज्यूंच्या पॅलेस्टाईनमध्ये जाण्याला मोडता घातला हे जे तुम्ही म्हणताय त्याचा कुठलाही उल्लेख
>> इथे नाहीये.
हावरा करार जर पूर्णपणे यशस्वी झाला असता तर युरोपीय ज्यू प्यालेस्टाईन ऐवजी इतर आरामशीर जागी (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वगैरे) पांगण्याचा धोका होता. जो झायोनिस्टांना पत्करायचा नव्हता. म्हणून एका प्रमाणाबाहेर हावरा चालू दिला नाही. तसंही पाहता युद्ध चाललेलं असलं तरी तटस्थ झेंड्याखाली जहाजं व्यवस्थित संचार करंत होती. त्यातली काही प्यालेस्टाईनात जाण्यास काहीच हरकत नव्हती. जर्मन ज्यू अभिजनांचे (एलिट) इंग्लंड व अमेरिकेशी चांगले संबंध होतेच.
असो.
सांगण्याचा मुद्दा काये की सर्वसाधारण ज्यू माणसाला जे भोगावं लागलं त्याची सहानुभूती मात्र अत्याचाऱ्यांनाच मिळाली.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2016 - 7:51 am | बोका-ए-आझम
ब्रूनो टेश (Bruno Tesch) या रसायन तंत्रज्ञाने Hydrogen Cyanide चा कीटकनाशक म्हणून वापर करायला सुरुवात केली. उवानाशक किंवा निर्जंतुकीकरण करायचंय असं नाझी गॅस चेंबर्समध्ये आणल्या गेलेल्या लोकांना सांगायचे. टेशला युद्धानंतर ब्रिटिशांनी अटक केली आणि १९४६ मध्ये फाशी दिलं. तुम्ही ही माहिती पडताळून पाहू शकता. शिवाय हावरा करार यशस्वी न होण्याला नाझी जबाबदार होते. महायुद्ध त्यांनी सुरु केलं होतं, झिओनिस्टांनी नव्हे. तुम्ही एक पूर्वग्रहदूषित मत बनवलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ ऐतिहासिक गोष्टींना वाट्टेल तसं distort करताय असं खेदपूर्वक म्हणावं लागतंय.
मागे एका प्रतिक्रियेत तुम्ही Der Sturmer या वृत्तपत्राचा उल्लेख केलाय. त्याचा संपादक ज्युलिअस स्ट्रायचर हा अत्यंत कडवा ज्यू द्वेष्टा होता. इतका की नाझींनाही त्याच्या वर्तमानपत्रातला विखारी प्रचार सहन झाला नाही. स्ट्रायचरला रिबेनट्रॉप, कायटेल, जोडल इत्यादींबरोबर आॅक्टोबर १९४६ मध्ये न्यूरेंबर्ग इथे फाशी देण्यात आलं. तुम्ही त्याचे विचार हे सर्वसामान्य जर्मन माणसाचे विचार म्हणताय? याला दुसरं काही नाही, इतिहासाचं विरुपीकरण म्हणतात.
10 Jan 2016 - 12:22 am | मास्टरमाईन्ड
पण बोकाशेठ,
जरा लवकर भाग टाका की राव.
तुम्हाला लिहायला कष्ट पडत असतील हे समजून पण "पुभालटा" म्हणणारा
-लै शा.
10 Jan 2016 - 4:48 pm | NiluMP
सुंदर मालिका!
13 Jan 2016 - 10:56 pm | जव्हेरगंज
हा भा ग लै म्हं जे लै च ज ब रा ट झा ले ला आ हे.
अ ग म्य !
23 Jan 2016 - 10:09 am | बोका-ए-आझम
मोसाद - भाग ५
28 Jan 2016 - 11:48 am | हेमंत लाटकर
बर्याच दिवसापासून हा वाचणे राहिले होते. काल Airlift हा पिक्चर पाहिला व हा लेख वाचला. छान माहिती मिळाली.
अंवातर: शाळेत असताना बरीच अनुवादित पुस्तके वाचली होती. हिटलर वरील एका पुस्तकात ही माहिती वाचल्यासारखी वाटली.
12 Feb 2016 - 5:08 pm | सनईचौघडा
.The House on Garibaldi Street – by Isser Hare
च्या अनुवादित पुस्तकामुळे आईकमनचा परिचय झाला होता ती कथा पुन्हा आठवली.
5 Apr 2016 - 6:35 pm | हकु
अप्रतिम, अतिशय चित्तथरारक!!!
14 May 2016 - 11:41 am | नाईकांचा बहिर्जी
मिपा चा सभासद होण्यामागे ही लेखमाला खुप महत्वाचे कारण ठरली मला हेच ख़ास आपणाला सांगावे वाटले सर, उत्तम अभ्यास अन दर्जेदार लेख फारच छान आवडले मला.
आभारी
बहिर्जी
20 May 2016 - 8:57 am | अत्रन्गि पाउस
मोसाद चा पुढचा भाग लवकर येण्यासाठी ....धागावरकाढआंदोलन
20 May 2016 - 9:03 am | बेकार तरुण
....धागावरकाढआंदोलन - आमचा विनाशर्थ पाठींबा ह्या आंदोलनास
20 May 2016 - 10:25 am | अत्रन्गि पाउस
हजारोंच्या संख्येने सामील व्हा !!!
25 Jul 2016 - 10:45 am | मृत्युन्जय
असे ऐकण्यात आले की बोका बॅन झाले आहेत. प्रथेप्रमाणे त्यांच्या बॅन होण्याचे कारण कुणालाच माहिती नाही. पण हा एक फार मोठा विरोधाभास आहे की बोकांचे लेखन "दखल घेण्याजोगे" या शीर्षकाखाली ठळकपणे दिसते आणि लेखक मात्र मिपावरुन गायब केला गेलेला असतो. असो.
25 Jul 2016 - 11:13 am | बेकार तरुण
+१११
25 Jul 2016 - 11:26 am | सालस
सहमत आहे.दखलपात्र लिखाण असाणारा आय डी बॅन आहे हे वाचून धक्का बसला.
25 Jul 2016 - 11:37 am | नाखु
दखल न घ्यायच्या (योग्यतेच्या) धाग्यावर अदखलपात्र गुन्ह्याबद्दल (नक्की माहीत नाही) बेदखल करण्यात आले असावे असे वाटते.
दखलीचा दाखला दाखविल्याबद्दल दुवा देतो दादूस (मृत्युंजय)
दबलेला नाखु