जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात.
मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत.
जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत. इथल्या व्यावसायीकांच आणि मनपा नेते आणि नोकरशाहीच गणित काही वेगळच आहे.
सहसा इथे रस्ते खणण्याआधी परवानगी घेतली जात नाही. नविन इमारत झाली, पाण्याच कनेक्शन घ्यायचय मग रस्ता मध्यरात्री उकरला जातो. वहातुक फारशी नसतेच त्यामुळे हक ना बोंब. मग सारवा सारवी करुन तो बुजवला जातो. नविन रस्ता बनेपर्यंत इथे वहाने येतात. आपला वेग हळु करतात. वहानात मागे बसलेल्या स्त्रीया कपड्यांच्या दुकानात नजर टाकतात. वहान हळु असल्यामूळे कपडा नजरेत भरतो. विश्वास बसत नाही ? पिंपरीच्या मार्केटमधे जाऊन पहा. क्रॉफर्ड मार्केटमधे जेव्हडी गर्दी नसेल तितकी पिंपरीला असते.
हा फॉर्म्युला मग अनेक दुकानदार उचलतात. नविन डांबरी रस्ता बनवायला आलेल्या मजुरांना चहा पाण्याचे पैसे दिले की दुकानाच्या अलिकडे एक स्पीड ब्रेकर तयार होतो ज्याचा आकार अधिकृत डिझाईन सारखा नसतो त्यावर पांढरे पट्टे नसतात. तुम्ही कमी वेगात असाल तर व्यावसायीकांचा धंदा होतो. जास्त वेगात असाल तर हॉस्पीटलचा धंदा होतो. मध्यम वेगात असाल तर पाठीचा कणा नुसताच दुखावतो. मग गॅप आहे, ट्रॅक्शन घ्या असे सांगीतले जाते.
एक राजकीय नेता तर माझ्या दरवाज्यातुन जाताना सर्वच वहानांचा वेग मर्यादीतच असावा असे त्याचे सार्वजनीक मत प्रदर्शन करीत जितके वेळा रस्ता नविन बनेल तितके वेळा स्पीड ब्रेकर नव्याने बनवुन घेतो. मनपा निवडणुकीत हरल्यावर सुध्दा गेले दहा वर्षे यात खंड पडला नाही.
अश्या स्पिड ब्रेकर्स ना हौशी स्पिड ब्रेकर म्हणतात. याची नोंद मनपा दरबारात नसते. त्यावर पांढरे पट्टे नसतात. कोणताही बोर्ड पुढे स्पीड ब्रेकर आहे असे चिन्ह दर्शवत नाही. तुम्ही फारच पेटलात आणि मनपा दरबारी अर्ज केलात तर त्यावर सुनावणी होऊन जर स्पीड ब्रेकर का बनवला याचे कारण कोणी देऊ शकला नाही किंवा त्यास विरोध झाला नाही तर दोन- चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तो काढला जातो. असा स्पीडब्रेकर काढण्याची कारवाई मोठी प्रदर्शनीय असते. एक जेसीबी फावडे लावलेले हत्यार तोंडावर लाऊन येतो. रस्त्यावरचा गोणपाटावर बसुन दाढी करणारा किंवा दहाव्याला अनेक जणांची डोकी भादरायला कमीत कमी वेळात काम करणारा केशकर्तनकार परवडला इतक्या बेफाम पणे तो जेसीबीवाला तस्त्यावर ते फावडे चालवतो. यावर नंतर मुलामा न करता तो रस्ता तसाच रहातो. हा स्पीड ब्रेकर उखडवणारा मैने प्यार क्यु किया च्या चालीवर मी हा घोळ का घातला असे म्हणत हात चोळत रहातो.
पिंपरी चिंचवड मनपा रस्त्यावर अजुन एक प्रकारचा स्पीडब्रेकर सापडतो. त्याला नवश्या स्पीडब्रेकर म्हणतात. कधी एखादा अपघात घडतो. यात वहानात तांत्रीक दोष असु शकतो. बरेच वेळा वाहन चालकाचा असु शकतो. पण हा सारा दोष इथे स्पीडब्रेकर नाही म्हणुन अपघात घडला असे जखमी व्यक्ती ठरवतो. काही वेळा भुतदया म्हणुन स्वयंघोषीत राज्यस्तरीयसुध्दा मान्यता नसलेल्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकर्ते असा स्पीडब्रेकर निर्माण करवतात. याला नवसा स्पीडब्रेकर म्हणतात. अपघात झालेला व्यक्ती हे विसरुन जातो पण पांढरे पट्टे ओढायचे कंत्राटदार असा स्पीडब्रेकर तो हलवु देत नाहीत. कारण तो आता अधिकृत असतो.
पिंपरी चिंचवड मधे जिथे चार रस्ते मिळतात त्या रस्त्यावर चारही दिशांना स्पीडब्रेकर हवाच असा दंडक आहे. पुढे वहातुक वाढुन तिथे ट्रॅफिक सिग्नल बसले तरी स्पीडब्रेकर असतातच याचे कारण रात्री किंवा वीज नसताना त्याची गरज असते.
तिसर्या प्रकारचा स्पीडब्रेकर लावण्याची गरज अनेक कंपन्या निर्माण करतात. आजकाल रोड सेफ्टी सारखे विषय मोठ्या कंपन्या सामाजीक जबाबदारी म्हणुन हाताळतात. ते मनपा कडे तगादा करुन जे स्पीडब्रेकर लावतात ते अधिकृत असतात तसेच त्याचे आकारही अधिकृत असतात. सोबत एखादा बोर्ड ही १०० फुट मागे अशी सुचना देतो त्याला गवसे स्पीडब्रेकर म्हणतात. अर्थातच यावरुन वेगवान वहाने जाताना आपला स्पीड कमी करुच शकत नाहीत. फार झाले तर दुचाकी स्वार फाकडा घोडेस्वार कसरती करताना जसा रिकीबीवर उभा रहातो तद्वत हालचाली करत आपला तोल जाऊ देत नाही. हे फारसे त्रास दायक नसतात. तसेच मोठ्या कंपनीतल्या बिनकामाच्या मंडळीची नोकरीही चालु रहाते. कारण त्यावर पट्टे ओढणे यासाठी मनपा कडे तगादा करावा लागतो. तीन महिने तगादा केला की पट्टे नविन होतात. परत तीन महिन्याचा तगादा कालावधी संपेपर्यंत रंगवण्याची गरज निर्माण होते. अश्या रितीने सामाजीक बांधीलकी आणि अर्थकारण याचा संगम घातला जातो.
अनेक वेळा पी एच डी करता विषय काय निवडावा असा प्रश्न अनेकांना असतो यासाठी या लेखाचे प्रयोजन होते. घाबरु नका. मनपाचे रस्ते आणि स्पीडब्रेकर यांचे प्रमाण किती असावे व किती आहे. किती लोकांना यातुन रोजगार मिळाला आहे इ. आकडे वारी करताना आपली तीन वर्षे सहज निघुन जातील. शिवाय काही मानधनावर खास करुन पिंपरी चिंचवड मनपा स्पीडब्रेकर एक्स्पर्ट म्हणुन आपली नेमणुक ही करेल. आपला सल्ला त्यानंतरही मानला जाणार नाही यावर खट्टु होऊ नका. आपण सल्ला देताय हे कार्य मोठे विधायक असेल.
प्रतिक्रिया
4 Jan 2016 - 12:29 pm | एस
छान चिमटे काढले आहेत.
4 Jan 2016 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
:) पण वस्तुस्थिती तशीच आहे म्हणून :(
4 Jan 2016 - 12:38 pm | संदीप डांगे
मस्त....
4 Jan 2016 - 12:43 pm | प्रचेतस
पिंपरी चिंचवडवाले राव तुम्ही, कधी भेटताय?
4 Jan 2016 - 1:28 pm | हरकाम्या
लै झकास राव.
4 Jan 2016 - 2:34 pm | सप्तरंगी
मी रस्ता या विषयावर इतके खुसखुशीत असे काही वाचेन असे कधी वाटले नव्हते, मस्तच !
4 Jan 2016 - 6:02 pm | रेवती
स्पीडब्रेकरमुळे दुकानातील कपडे पाहता येतात व त्यामुळे दुकानदार गर्दी असते वगैरे कल्पना केली नव्हती.
5 Jan 2016 - 6:21 am | खेडूत
:)
आवडला.. लै जिव्हाळ्याचा विषय !