.
जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय (the second oldest profession in the World) म्हणजे हेरगिरी. जवळपास सर्व देशांकडे आज गुप्तचर संघटना किंवा संस्था आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. गुप्तचर किंवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र ‘ मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. विविध प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी कशा प्रकारे हेरांना नियुक्त करावं, त्याच्या कसोट्या, शत्रूचे हेर कसे ओळखावेत याबद्दल विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा यशस्वी होण्यामागे बहिर्जी नाईक यांच्यासारख्या हेरांचा सह्भाग हा मोठाच आहे. आधुनिक काळात तर माहिती हेच सर्वात मोठं संसाधन असल्यामुळे हेर आणि हेरगिरी यांचं महत्व कमी होण्याऐवजी उलट वाढलेलंच आहे. सामान्य माणसांना हेर आणि त्यांचं आयुष्य याच्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते. जेम्स बॉंडचा पहिला चित्रपट येऊन आज पन्नासपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलेली आहेत पण तरीही त्याचे चित्रपट आजही गर्दी खेचतात. हेरकथा किंवा खऱ्याखुऱ्या हेरांच्या कामगिऱ्या वाचायला लोकांना प्रचंड आवडतं. अनेक लेखक उदाहरणार्थ जॉन ल कार, फ्रेडरिक फोरसाईथ, रॉबर्ट लडलम हे उत्कृष्ट हेरकथा लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. सोविएत रशियाची के.जी.बी.,अमेरिकेची सी.आय.ए., ब्रिटनची एम.आय.६, पाकिस्तानची आय.एस.आय. यांच्याबद्दल सर्वसामान्यांनाही माहिती असते. या सगळ्या संस्थांमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारी संस्था म्हणजे इझराईलची मोसाद.
मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुप्तता. इतर गुप्तचर संस्थांविषयी बरीच माहिती पुस्तकांमध्ये किंवा आजकाल इंटरनेटवर मिळते. पण मोसादविषयी फारच कमी माहिती आहे. अर्थात, तेच मोसादचं यश म्हणता येईल. काही कारवायांशी मोसादचा काहीही संबंध नसतानाही त्यांच्याकडे बोट दाखवलं गेलंय. काही बाबतीत मोसादचा त्यात सहभाग असल्याचा संशय आहे. कधी मोसादने अगदी उघडपणे आपण एखादी कारवाई केली असल्याचं मान्य केलेलं आहे. पण असे प्रसंग फारच कमी. या गुप्ततेमुळे मोसादचा झालेला एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे मोसादमध्ये दुसऱ्या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही. मोसादने मात्र जगातल्या जवळजवळ प्रत्येक गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यात इझराईलशी अजिबात शत्रुत्व नसलेले देशही आहेत. त्याच्यामागचा हेतू एकच आहे – माहिती मिळवणं. "Where no counsel is, the people fall, but in the multitude of counselors there is safety – जेव्हा माहिती किंवा माहितगार माणसाची साथ नसते, तेव्हा तुमचं पतन होतं, पण जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायला अनेक लोक असतात, तेव्हा तुम्ही सुरक्षित असता – हे मोसादचं ब्रीदवाक्य आहे.
असं असण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण – आणि मोसादचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिथे काम करणाऱ्यांची संख्या. इतर गुप्तचर संस्था, जर कर्मचाऱ्यांची संख्या बघितली, तर अवाढव्य म्हणाव्या लागतील. सी.आय.ए. ही जगातली सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. एक लाखाहून जास्त एजंट्स आज तिथे वेगवेगळ्या प्रकरणांवर काम करत आहेत. शिवाय अनेक अर्धवेळ सी.आय.ए. एजंट्स – ज्यांना सी.आय.ए.च्या भाषेत gofer असं म्हणतात, ते तर ५-६ लाखांच्या घरात असतील. मोसादमध्ये जेमतेम ८०० ते १००० लोक – सगळ्या जगभरातल्या मोसाद स्टेशन्सची मोजदाद केली तर – असतील. याचं एक कारण आर्थिक आहे. सी.आय.ए. ही अमेरिकेसारख्या महासत्तेची गुप्तचर संस्था आहे. त्यामुळे त्यांचं बजेटसुद्धा तेवढंच मोठं आहे. इझराईल हा कितीही झालं तरी एक छोटा देश आहे. पण दुसरं कारण म्हणजे मोसादच्या निर्मितीपासूनच मोसादचा अरब दहशतवाद आणि मुस्लीम कट्टरवादाशी असलेला संघर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली इझराईलची निर्मिती ही पॅलेस्टिनी आणि इतर अरबांसाठी एक अपमानास्पद आणि संतापजनक घटना होती. त्यामुळे संपूर्ण जगभर इझराईल आणि अरब यांच्यातलं छुपं युद्ध खेळलं जाणार आणि इझराईलचा सूड उगवण्याची संधी अरब दहशतवादी जगभर शोधत फिरणार, हे उघड होतं. अशा वेळी भरपूर लोक कामावर ठेवून सगळ्या जगाला आपण कोण आहोत हे सांगण्यापेक्षा गुप्तपणे काम करणं हे मोसादचं धोरण होतं, आणि गुप्तता ठेवायची असेल तर जितके कमी लोक तेवढं बरं – असा हा सरळ हिशोब आहे.
पण याचा अर्थ असा नाही की मोसादचं लोक कमी असल्यामुळे अडतं. इझराईलच्या निर्मितीनंतर जगभरातल्या ज्यू लोकांसाठी इझराईल हे एक हक्काचं घर आहे. पण अजूनही जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशात ज्यू लोक आहेत. एवढंच नाही तर ते सुशिक्षित आहेत. त्यातले बरेच जण स्वतःच्या व्यवसायांत आहेत. काही जण बँका, विमा कंपन्या, पत्रकारिता अशा व्यवसायांमध्ये आहेत. ते ज्या देशांत आहेत, तिथे त्यांना मान आहे, किंवा नाझींप्रमाणे कोणी त्यांच्या जीवावर उठलेलं नाहीये. ते कदाचित त्या देशाचे निष्ठावंत नागरिकही असतील, पण त्याचबरोबर इझराईलशी त्यांची बांधिलकी आहे. धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक, पण ती आहे हे निश्चित. मोसादकडे अशा लोकांची यादी असते. या लोकांसाठी sayan हा शब्द वापरला जातो. जेव्हा मोसादला एखाद्या कामगिरीसाठी मदत लागते, तेव्हा हे sayan कामाला लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या कामगिरीसाठी स्थानिक चलनात भरपूर पैशांची गरज आहे. बँक मॅनेजर असलेला एखादा sayan ते पैसे कर्ज म्हणून उपलब्ध करून देतो. जर एखाद्या संशयास्पद व्यक्तीच्या घरावर पाळत ठेवायची असेल, तर स्थानिक प्रॉपर्टी ऑफिसमध्ये काम करणारा एखादा sayan त्या घराबद्दल संपूर्ण माहिती, अगदी नकाशासकट, पुरवतो. दुसरा एखादा रिअल इस्टेट एजंट असणारा sayan त्या घरासमोर असलेलं दुसरं घर मोसादच्या लोकांना नाममात्र भाड्याने मिळवून देतो. हे sayan network म्हणजे मोसादची फार मोठी ताकद आहे. हे sayan कोणीही असू शकतात. अगदी रस्ता झाडणारे सफाई कामगारसुद्धा. अनेक केसेसमध्ये मोसादला टेलिफोन खात्यात काम करणाऱ्या sayan नी बिनबोभाट अनेक टेलिफोन टॅप करून दिलेले आहेत.
मोसादचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे इझराईलच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ लगेचच मोसादची निर्मिती झाली. ब्रिटीश साम्राज्य १७व्या शतकापासून सगळ्या जगभर पसरायला लागलं होतं. पण ब्रिटनच्या MI ५ आणि MI ६ यांची निर्मिती १९०९ मध्ये – जवळजवळ ३०० वर्षानंतर झालेली आहे. अमेरिकेच्या सी.आय.ए.ची निर्मिती व्हायला तर दुसरं महायुद्ध उजाडावं लागलं. तेव्हा नाझी जर्मनीच्या ताब्यात गेलेल्या युरोपमध्ये हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने Office of Strategic Services (OSS) नावाची संस्था स्थापन केली. युद्धानंतर OSS बरखास्त करण्यात आली, पण त्याच वेळी सोविएत रशियाबरोबर चालू झालेल्या शीतयुद्धाने अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागला आणि सी.आय.ए.ची स्थापना करण्यात आली, ज्यात OSS मध्ये काम केलेल्या अनेक लोकांचा समावेश होता. रशियाबद्दल बोलायचं तर झारकालीन रशियामध्ये ‘ओखराना ’ ही अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम अशी सरकारी गुप्तचर संस्था होती. झारने त्यांचे सल्ले, विशेषतः रास्पुतिनबद्दलचे, ऐकले असते, तर रशियन राज्यक्रांती टाळता आली असती असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर रशियामध्ये यादवी युद्धाचा डोंब उसळला होता. तेव्हा स्टॅलिनने ‘ चेका ’ नावाची संघटना उभारली होती. नंतर तिचं रुपांतर एन.के.व्ही.डी. आणि नंतर के.जी.बी. मध्ये झालं.
याउलट मोसादची निर्मिती इझराईलच्या जन्मानंतर लगेचच करण्यात आली. त्याचा इतिहास हा मोठा मनोरंजक आहे. आज जिथे इझराईल, जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन हे देश आहेत, तो सगळा भूभाग सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत – म्हणजे जवळजवळ ४०० वर्षे तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. १९१४ ते १९१८ या काळात झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढला होता आणि युद्धात पराभूतही झाला होता. ज्याप्रमाणे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर व्हर्सायचा तह लादून जर्मनीच्या सगळ्या वसाहती आपापसांत वाटून घेतल्या, तशीच पाळी तुर्कस्तानवरही आली. १९२० मध्ये फ्रान्समधील सेव्हरेस या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी तुर्कस्तानचा मूळ प्रदेश सोडून बाकीचं सगळं ऑटोमन साम्राज्य वाटून घेतलं. या साम्राज्यात असलेला सीरियाचा प्रदेश फ्रान्सला मिळाला आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटनचा ताबा प्रस्थापित झाला. याच्या आधी १९१७ मध्ये, अगदी स्पष्टपणेच सांगायचं तर २ नोव्हेंबर १९१७ या दिवशी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ब्रिटनमधल्या ज्यू धर्मियांचे नेते वॉल्टर रॉथशील्ड यांना एक पत्र पाठवलं होतं.
His Majesty's government view with favour the establishment in Palestine of a national home for the Jewish people, and will use their best endeavours to facilitate the achievement of this object, it being clearly understood that nothing shall be done which may prejudice the civil and religious rights of existing non-Jewish communities in Palestine, or the rights and political status enjoyed by Jews in any other country.
हा त्या पत्राचा मजकूर होता. हे पत्र नंतर बाल्फोर जाहीरनामा (Balfour Declaration) म्हणून प्रसिद्ध झालं. जर हा मजकूर नीट वाचला तर असं दिसतं की बाल्फोरनी ज्यू लोकांसाठी मातृभूमी द्यायचं किंवा त्यासाठी प्रयत्न करायचं आश्वासन दिलं होतं, पण त्याचबरोबर इतर जमाती किंवा लोकांचे हक्क डावलण्यात येणार नाहीत असंही म्हटलं होतं. आता पॅलेस्टाईनमध्ये मध्ययुगीन काळापासून ज्यू येऊन वसती करायला लागले होते. जेव्हा जेव्हा पूर्व युरोपियन प्रदेशांमध्ये – उदाहरणार्थ पोलंड, युक्रेन, रोमानिया, रशियन साम्राज्य – ज्यू धर्मियांवर अत्याचार व्हायचे, तेव्हा ते पॅलेस्टाईनचा आश्रय घ्यायचे. त्यामुळे तिथे आता ज्यूंची संख्या बऱ्यापैकी वाढलेली होती. त्याच सुमारास पश्चिम युरोपियन देशांमध्ये ज्यूंना अनेक हक्क मिळत होते. परिणामी आपली स्वतंत्र मातृभूमी असली पाहिजे हा विचार पूर्व युरोपियन ज्यूंमध्ये प्रबळ व्हायला लागला. जेव्हा सेव्हरेस करारामध्ये बाल्फोर जाहीरनाम्याचा समावेश झाला, तेव्हा या विचाराने उचल खाल्ली. ज्यू राष्ट्राची पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीत स्थापना व्हावी म्हणून चालू झालेल्या झिओनिस्ट चळवळीला मोठ्या प्रमाणात आश्रय मिळायला लागला. पुढे १९३३ मध्ये जर्मनीमध्ये नाझी राजवट प्रस्थापित झाल्यावर पश्चिम युरोपियन ज्यूसुद्धा पॅलेस्टाईनमध्ये यायला लागले. १९४५ मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं, तेव्हा ज्यूंची संख्या पॅलेस्टाईनच्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक तृतीयांश झालेली होती. त्यात जर्मन छळछावण्या आणि मृत्युछावण्यांमधून वाचलेल्या ज्यूंचाही समावेश होता. महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्हीही राष्ट्रे कमजोर झालेली होती. त्यामुळे त्यांच्या वसाहतींमधून स्वातंत्र्याची मागणी जोरात व्हायला लागली. पॅलेस्टाईनही त्याला अपवाद नव्हतं. दरम्यान ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान चर्चिल आणि त्यांचा पक्ष पराभूत झाले आणि क्लेमंट अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. या सरकारचा वसाहतींच्या स्वातंत्र्याला तात्विक पाठिंबा होता आणि आर्थिक कारणांमुळे वसाहती चालवणं शक्य नाही याची जाणीवसुद्धा होती. या सरकारने पॅलेस्टाईन प्रश्न नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला.
राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या समितीने जो तोडगा सुचवला तो असा होता – एक अरब संघराज्य, एक ज्यू संघराज्य आणि जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण. म्हणजे थोडक्यात पॅलेस्टाईनची फाळणी. या तोडग्यामुळे ज्यूंना जरी आनंद झाला असला, तरी अरब नेते संतापले होते. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये यादवी युद्ध सुरु झालं. अमेरिकेने राष्ट्रसंघाच्या या योजनेला पाठिंबा दिला होता. पण यादवी युद्ध सुरु झाल्यावर पॅलेस्टाईनमधल्या ज्यूबहुल भागांमधून जवळजवळ एक लाख अरबांनी स्थलांतर केलं. त्यामुळे अमेरिकेचा असा समज झाला की आता पॅलेस्टाईनची फाळणी करायची गरज नाही आणि त्यांनी या योजनेला असलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पॅलेस्टाईनमधल्या अरब नेत्यांचं मनोधैर्य उंचावलं. त्यांना इजिप्त, इराक, सीरिया, सौदी अरेबिया या अरब देशांच्या ‘अरब लीग’ चा पाठिंबा मिळाला. फेब्रुवारी १९४८ मध्ये ब्रिटिशांनी ट्रान्सजॉर्डनच्या (जॉर्डनचं आधीचं नाव) सरकारला पॅलेस्टाईनच्या अरबबहुल भागाचा ताबा घ्यायची परवानगी दिली. पण त्यांचं केवळ त्याने समाधान होण्यासारखं नव्हतं. त्यांनी ज्यूबहुल विभागात घुसखोरी करायला सुरुवात केली.
झिओनिस्ट ज्यूंनी स्वतःचं सैन्यदल आणि गुप्तचर संघटना स्थापन केल्या होत्या. यांना अनुक्रमे हॅगन्हा आणि शाई (Hagannah & Shai) अशी नावं होती. ज्यू नेता डेव्हिड बेन गुरियनने हॅगन्हामध्ये भरती होण्याचं प्रत्येक प्रौढ स्त्रीपुरुषांना आवाहन केलं. दरम्यान एक अनपेक्षित गोष्ट घडली. चक्क सोविएत रशियाने झिओनिस्ट चळवळीला आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेतून ज्यू हितचिंतकांनी दिलेल्या पैशातून रशियन शस्त्रास्त्रे विकत घेऊन हॅगन्हाचे सैनिक अरब लीगचा मुकाबला करायला सिद्ध झाले. हॅगन्हाचं नेतृत्व यीगेल यादीन या धुरंधर सेनानीकडे होतं. त्याच्या नेतृत्वाखाली हॅगन्हाने टायबेरियस, हैफा, जाफा, साफेद, बीसान आणि एकर ही सगळी महत्वाची शहरं दोन महिन्यांत आपल्या ताब्यात आणली.
मे १९४८ मध्ये आपण पॅलेस्टाईन सोडणार असल्याचं ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी जाहीर केलं होतंच. त्याप्रमाणे १४ मे १९४८ या दिवशी शेवटचा ब्रिटीश सैनिक पॅलेस्टाईनमधून बाहेर पडला आणि त्याच दिवशी डेव्हिड बेन गुरियनने तेल अवीवच्या म्युझियममध्ये इझराईल या ज्यू राष्ट्राची घोषणा केली. चाइम वाईझमन या देशाचे प्रथम राष्ट्रपती असणार होते आणि डेव्हिड बेन गुरियन पंतप्रधान. अमेरिका आणि रशिया या महासत्तांनी ताबडतोब या नवीन देशाला मान्यता दिली.
अरब लीगला अर्थातच काही फरक पडत नव्हता. त्यांनी इझराईलवर आक्रमण केलं. अरब लीगमध्ये सौदी अरेबिया, इराक, इजिप्त, सीरिया, ट्रान्सजॉर्डन आणि लेबेनॉन यांचा म्हणजे इझराईलच्या सर्व शेजाऱ्यांचा समावेश होता. सुरुवातीच्या पीछेहाटीनंतर हळूहळू हॅगन्हाच्या सैनिकांनी अरब सैन्याला पाठी रेटायला सुरुवात केली आणि अरब पॅलेस्टाईनमधले काही भाग आपल्या टाचेखाली आणले. नोव्हेंबर १९४८ पर्यंत मोठ्या लढाया बंद झाल्या आणि किरकोळ चकमकी उडायला सुरुवात झाली. अखेरीस फेब्रुवारी १९४९ मध्ये इझराईल आणि इजिप्त यांनी युद्धबंदी जाहीर केली. बाकीची अरब राष्ट्रे अजूनही युद्धाच्या आवेशात होती, पण युद्धाचा आर्थिक बोजा सहन करायची तयारी नसल्यामुळे हळूहळू एकेकाने काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मार्चमध्ये लेबेनॉन, एप्रिलमध्ये ट्रान्सजॉर्डन आणि सर्वात शेवटी जुलैमध्ये सीरिया यांनी युद्धबंदी जाहीर केली. इराक आणि सौदी अरेबिया प्रत्यक्ष युद्धात फार कमी सहभागी होते आणि त्यांच्या सरहद्दी इझराईलला लागून नव्हत्या. त्यामुळे त्यांनी एकतर्फी युद्धबंदी केल्यावर इझराईलनेही त्यांच्याशी युद्धबंदी जाहीर केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने इझराईल आणि उर्वरित अरब पॅलेस्टाईन यांच्या नवीन सीमारेषा ठरवण्यात आल्या. पण अरब राष्ट्रांना त्या मान्य नव्हत्या. त्यामुळे पुढेमागे या राष्ट्रांशी आपल्याला लढावं लागणार हे इझराईलच्या राजकारण्यांना आणि सेनाधिकाऱ्यांना कळून चुकलं. त्यामुळे पंतप्रधान बेन गुरियन यांच्या पुढाकाराने एक गुप्तचर संस्था चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी इझराईलमध्ये तीन प्रमुख गुप्तचर संस्था होत्या – अमान (AMAN) ही सैन्याची गुप्तचर संघटना, शिन बेत (Shin Bet) ही अंतर्गत सुरक्षितता सांभाळणारी संघटना आणि परराष्ट्रखात्याचा राजकीय विभाग (Political Department). त्यांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून अजून एक संस्था स्थापन केली गेली. तारीख होती १३ डिसेंबर १९४९ आणि या संघटनेचं नाव अगदी साधं होतं - the Institute किंवा हिब्रू भाषेत मोसाद!
क्रमशः
संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Mossad
https://en.wikipedia.org/wiki/History_of_Israel
Gideon’s Spies – Gordon Thomas
The History of Mossad – Antonella Colonna Vilasi
भाग २
प्रतिक्रिया
16 Dec 2015 - 12:05 pm | कपिलमुनी
पुभाप्र
16 Dec 2015 - 1:55 pm | पगला गजोधर
16 Dec 2015 - 12:24 pm | अजया
रोचक इतिहास आहे मोसादचा.पुभाप्र.
16 Dec 2015 - 4:39 pm | तुषार काळभोर
रोचक!
16 Dec 2015 - 12:32 pm | नाखु
आस्तीक-नास्तीक,भंन्साळी गिरणीतून बाहेर काढल्याबद्दल शेकडो मिपाकरांकडून धन्यवाद..
पु भा प्र.
प्रतिसाद मात्र मिपाकर नाखुस
16 Dec 2015 - 12:32 pm | sagarpdy
पुभाप्र
16 Dec 2015 - 12:33 pm | बाबा योगिराज
मस्त झालिये सुरवात. पुलेशु. पुभाप्र.
16 Dec 2015 - 1:29 pm | विशाखा पाटील
चांगली सुरूवात. यासोबत त्या भागाचा नकाशा दिला तर वाचकांना ही गुंतागुंत नीट लक्षात येईल.
अजून एक मुद्दा -
बाल्फोर जाहीरनाम्यानंतर आपल्याला ब्रिटीश स्वतंत्र देश देणार आहेत, असा ज्यूंचा समज झाला. ब्रिटीशांनीही नेहमीपप्रमाणे तळ्यात-मळ्यात धोरण ठेवलं. गोंधळाचं वातावरण तयार झाल्यावर गप्प बसले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मात्र ब्रिटीश अडचणीत आले. युरोपातून इकडे धाव घेणाऱ्या ज्यूंच्या संख्येवर बंधन घालावं, अशी अरबांची मागणी होती. युद्धकाळात अरबांना दुखावूनही चालणार नव्हतं, कारण तेल. नुकतंच कुठे नौदल तेलावर वेगात धावू लागलं होतं.
ब्रिटीश सरकारने अरब लोकांची मागणी मान्य करताच ज्यू चिडले. त्यातून ज्यूंनी ह्गानाह ही लष्करी संघटना उभी केली. इर्गुन ही अजून एक. ज्यू लोकांना अरब देशांमधून आणि युरोपातून गुपचूप आणून वसवण, सुरक्षा पुरवणं ही कामं या संघटनांची होती. ब्रिटीशांच्या डोळ्यादेखत ही समांतर व्यवस्था उभी राहिली. ब्रिटीश गेल्यानंतर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इस्रायलला या संघटनांचा मोठा फायदा झाला. पलेस्टीनी अरब मात्र आपल्या शेजारच्यांच्या भरवशावर बसले.
16 Dec 2015 - 2:02 pm | पगला गजोधर
16 Dec 2015 - 2:03 pm | पगला गजोधर
16 Dec 2015 - 2:07 pm | पगला गजोधर
17 Dec 2015 - 12:17 am | अर्धवटराव
एक चित्र हजार शब्दांचं काम करतात ते असं.
17 Dec 2015 - 8:47 am | खेडूत
+१००
याविषयी सहजी वाचायला मिळत नाही. उत्कंठा वाढली आहे. पुभाप्र..,
अन्य प्रतिसादांमधे दिलेले चित्रपट आणि पुस्तके मिळवून वाचली पाहिजेत आता!
16 Dec 2015 - 1:38 pm | उगा काहितरीच
मस्त ! पुभाप्र ...
16 Dec 2015 - 1:39 pm | यशोधरा
लेख आवडला. विशाखाताईची माहितीही छान.
16 Dec 2015 - 2:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
बोक्याभाऊ, _________/\__________
राया तुमचा व्यासंग नेमका कश्यात कश्यात आहे हो? स्केरक्रो ते मोसाद दंडवत घ्या आमचा
काही प्रश्न काही माहिती
ते कदाचित त्या देशाचे निष्ठावंत नागरिकही असतील, पण त्याचबरोबर इझराईलशी त्यांची बांधिलकी आहे. धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक, पण ती आहे हे निश्चित.
मग ते निष्ठावंत नागरिक कसे अन का म्हणवले जावेत?
युद्धानंतर OSS बरखास्त करण्यात आली, पण त्याच वेळी सोविएत रशियाबरोबर चालू झालेल्या शीतयुद्धाने अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागला आणि सी.आय.ए.ची स्थापना करण्यात आली
सदरहु घटनाक्रमावर आधारित "द गुड शेफर्ड" हा एक अत्युकृष्ट हेरपट आहे पाहिला नसल्यास आवर्जून पाहण्याचे करावे :)
अजुन एक गंमत म्हणजे आधुनिक जगातली सर्वाधिक जुनी इंटेलिजेंस एजेंसी म्हणजे आपला इंटेलिजेंस ब्यूरो उर्फ़ आय.बी. ही होय, कर्नल स्लीमन ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम ब्यूरो ची स्थापना १८३५ मधे झाली होती, त्याचे कारण म्हणजे रुमालाने गळा आवळणाऱ्या ठगांचा बंदोबस्त (हे ठग एखाद्या आधुनिक गुप्तचर संघटनेसारखे काम करत त्याकाळी म्हणजे परम गुप्तता, पुरावे न सोडणे वगैरे) तेव्हा श्रीयुत स्लीमन ह्यांनी जो फ़ोर्स ट्रेन केला तो "चोरांशी चोरांसारखे लढ़ा" ह्या तत्वा वर आधारित होता म्हणजे त्यांनी चुकूनमाकुन पकडलेल्या अन तोंड उघडलेल्या एका ठगाकडून त्यांची मोडस ओपेरेंडी समजून घेतली नंतर त्याला ठार केले अन त्या "नोट्स" च्या आधारावर आपले काही चपळ अधिकारी अन हवालदार ट्रेन केले अन त्यांच्यात इंफिल्ट्रेट केले, स्वातंत्र्याच्या पुर्वी त्याला "ब्रिटिश सीआयडी" चा एक भाग ठेवले होते, नंतर आधीच ठगीच्या मुशीत तयार झालेल्या ह्या संघटनेला केजीबी कडून काही प्रार्थमिक तांत्रिक धड़े मिळाले अन साकार झाली ती जगातली एक सर्वात तेज अंतर्गत सुरक्षा प्रणाली. आय.बी.
सीमावर्ती भागात काम असल्यामुळे बरेचवेळी आमच्याकड़े ह्या भूतांचा राबता असतो, होय ती भूतेच असतात बॉस क्वचित तोंड उघड़तात अन उघडले की असे काही बोलतात जे आपल्या सामान्य कल्पनेपालिकडले असते
क्षमा करा, मोह आवरला नाही अन तुमच्या ताजमहालाला आमची एक वीट विनाकारण जोडली,
पुढील भागच्या प्रतिक्षेत
बाप्या :)
16 Dec 2015 - 10:25 pm | पिंगू
कधीतरी त्यावर पण लेख येऊ दे..
17 Dec 2015 - 12:20 am | अर्धवटराव
या लंकेवर एक फर्रास लेखमाला झाली पाहिजे बापु
16 Dec 2015 - 2:17 pm | प्रचेतस
लेख अजून वाचला नाही, सवडीने वाचण्यासाठीच राखून ठेवलाय. तूर्तास ही पोच.
ही मालिका रंगतदार होणार ह्यात शंकाच नाही.
19 Dec 2015 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाखु साठवतोय.
-दिलीप बिरुटे
16 Dec 2015 - 2:18 pm | नया है वह
पुभाप्र
16 Dec 2015 - 2:19 pm | कविता१९७८
मस्त माहीती, पुलेशु
16 Dec 2015 - 2:31 pm | अद्द्या
नेहमीप्रमाणेच जबरदस्त . .
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
16 Dec 2015 - 2:37 pm | भुमी
पुभाप्र..
16 Dec 2015 - 2:47 pm | महासंग्राम
आंजावर मोसादच्या कारवायांवर आधारीत MOSAAD THE GREATEST MISSIONS OF THE ISRAELI SECRET SERVICE
हे मायकेल बार-झोहार आणि निस्सीम मिशाल यांच पुस्तक पण वाचण्याजोग आहे.
16 Dec 2015 - 2:55 pm | कानडाऊ योगेशु
बोका भाऊ ह्या लेखाबद्दल व एकुणच पुढे येणार्या मालिकेबद्दल आमच्याकडुन एक खणखणीत "म्याँव" स्वीकार करावा.!
16 Dec 2015 - 2:57 pm | पद्मावति
जबरदस्त लेखमालेची सुरूवात.
मोसादचा इतिहास, sayan network ...खुपच रोचक आहे सगळं.
16 Dec 2015 - 2:57 pm | सुमीत भातखंडे
मस्त सुरुवात.
पुभाप्र.
16 Dec 2015 - 3:11 pm | जातवेद
पुभाप्र
16 Dec 2015 - 3:15 pm | चाणक्य
पुभाप्र
16 Dec 2015 - 4:06 pm | एकनाथ जाधव
लेखमाला मजेशीर होणर.
16 Dec 2015 - 4:19 pm | नन्दादीप
पुभाप्र.....
16 Dec 2015 - 4:41 pm | आतिवास
वाचते आहे.
16 Dec 2015 - 4:47 pm | सामान्य वाचक
पुभप्र
16 Dec 2015 - 5:08 pm | राजाभाउ
मस्तच !!! हि मालिकाही रंगतदार होणार हे नक्की.
>>राया तुमचा व्यासंग नेमका कश्यात कश्यात आहे हो?
बापूंसारखा प्रश्न आम्हालाही पडला आहे.
16 Dec 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा
+१ शमत हाय.
16 Dec 2015 - 5:39 pm | एस
मी ते 'देअर डार्केस्ट अवर्स' विकत घेऊ काय एकदाचं? :-)
16 Dec 2015 - 5:57 pm | मी-सौरभ
मिपा वर पण कुणी सयन असेल का?
16 Dec 2015 - 6:00 pm | सुधांशुनूलकर
आवडता विषय. छान सुरुवात.
खूप वर्षांपूर्वी 'Spymasters of Israel' (लेखकाचं नाव आठवत नाही) हे पुस्तक वाचलं होतं. मिळाल्यास जरूर वाचा.
16 Dec 2015 - 6:45 pm | वॉल्टर व्हाईट
आता रोज वाट पहायची पुढच्या लेखाची असे होणार :-), धन्यवाद.
या लेखमालेनंतर पुन्हा भाषांतर हातात घेणार ना ?
16 Dec 2015 - 7:04 pm | अभ्या..
सवडीने वाचणार आणि सवडीने प्रतिसाद देणार.
भारी विषय आणि तेवढाच भारी लेखक. मस्त मस्त.
16 Dec 2015 - 7:19 pm | अत्रन्गि पाउस
एवढेच म्हणू शकतो
16 Dec 2015 - 7:34 pm | मृत्युन्जय
झक्कास सुरुवात. पुभाप्र
16 Dec 2015 - 7:56 pm | जव्हेरगंज
वाव!
माझा आवडीचा विषय!!!
मज्जा येणार आता!!
विस्तृत माहिती येऊ द्यात!!!
सगळ वाचणार!!
[ईस्राईल वर आजूबाजूचे एवढे तुटून का पडलेत हे एक कुतुहल आहे]
पुभाप्र!
:)
19 Dec 2015 - 12:13 am | आरोह
त्या साठी एक वेगळा लेख लिहावा लागेल....
16 Dec 2015 - 8:02 pm | प्रीत-मोहर
Mast lekh
16 Dec 2015 - 8:23 pm | मुक्त विहारि
पुभाप्र....
16 Dec 2015 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त विषय !
बोकांच्या अभ्यासू लिखाणपद्धतीमुळे ही लेखमाला वाचायला खूप मजा येणार हे नक्की ! पुभाप्र.
17 Dec 2015 - 3:05 pm | इशा१२३
+१
असेच म्हणते.रोचक इतिहास.पुभाप्र.
16 Dec 2015 - 9:09 pm | अरिंजय
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. मोसाद वर मी पुर्वी एक लेख वाचला होता. त्यांनी हिटलर चा उजवा हात आणि ४० लाख ज्युंची हत्या करण्याचा आदेश देण्याचा आरोप असलेल्या अॅडॉल्फ आईकमन ला २० वर्षांनंतर अर्जेंटीना मधुन गुपचुप पकडुन इस्रायल मध्ये आणले होते. अंगावर काटा आणणारा लेख होता तो. खुप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडुन.
16 Dec 2015 - 9:16 pm | सटक
उत्तम विषय!! पुभाप्र !
16 Dec 2015 - 9:31 pm | पैसा
अतिशय सुंदर लेख!! प्रतिसादही छान माहितीपूर्ण आहेत.
16 Dec 2015 - 9:34 pm | एक एकटा एकटाच
नेहमीप्रमानेच जबरदस्त
16 Dec 2015 - 10:05 pm | स्पा
म्हातारचळवालांच्या तावडीतून थोडा रिलीफ दिल्याबद्दल सर्वप्रथम बोका यांचे आभार
तेच तेच विकृत धागे आणि चर्चा वाचून डोक्याला शॉट लागलेले होते .
आता लेख वाचतो
16 Dec 2015 - 10:26 pm | पिंगू
सुरुवात अतिशय रंगतदार झाली आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत..
16 Dec 2015 - 10:41 pm | DEADPOOL
जबरदस्त लिहिलय!
16 Dec 2015 - 10:46 pm | विशाल कुलकर्णी
जबरा लेख भाऊ !
या लेखामुळे एक चित्रपट आठवला 'द डेब्ट'. हां चित्रपट मोसादच्या एका ऑपरेशनवर आधारीत होता. अर्थात चित्रपटात बरेच नाट्यमय बदल केले होते त्यांनी. पण क्लासच चित्रपट होता.
16 Dec 2015 - 11:57 pm | इष्टुर फाकडा
मस्त सुरुवात. पुभाप्र !
17 Dec 2015 - 3:20 am | श्रीरंग_जोशी
मोसाद वर वाचायला मिळणे ही एक पर्वणीच असणार आहे. या लेखमालिकेची सुरुवात जोरदार झाली आहे.
पुभाप्र.
17 Dec 2015 - 8:04 am | सौन्दर्य
खूप छान आणि रंजक लेख. आता मिपावर रोज येणार.
17 Dec 2015 - 8:39 am | जॅक डनियल्स
लेख खूप मस्त लिहिला आहे. मी Gideon’s Spies – Gordon Thomas वाचले आहे त्यामुळे तुमचा लेख अजून मनाला भावला.
17 Dec 2015 - 9:47 am | प्रीत-मोहर
पुभाप्र. वाट बघतेय बोकेराव
17 Dec 2015 - 10:09 am | जेपी
वाचतोय..
17 Dec 2015 - 10:47 am | कल्पक
मस्त विषय आणि चांगली सुरुवात. गुप्तहेर हा माझ्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय आहे. मागे वाचलेल्या एका लेखानुसार RAW चे ३५००० एजंट्स पाक मध्ये पेरलेले आहेत. ते पाकची माहिती भारताला पुरवतात आणि पाकला अस्थिर ठेवण्यासाठी कारवाया करतात. भारतात ओळखीचे असे दोन जण आहेत जे इतरांसाठी पोलिस आणि शासकीय अधिकारी आहेत पण ते आयबी साठी काम करतात! कुठे जातात, काय काम करतात त्यांच्या बायकांना सुद्धा माहित नसते. कॅलिफोर्नियात असतांनाचे माझे दोन सहकारी पूर्वी अमेरिकेच्या अतिशय गुप्त अशा प्रकल्पांवर काम करायचे. त्यांच्या इमारतींना खिडक्या सुद्धा नसायच्या गुप्तता जपण्यासाठी. असं ऐकलय कि अमेरिका-रशिया एकमेकांच्या देशात काही 'साधारण' लोक पाठवतात ज्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ (जन्मानी स्थानिक नागरिक होऊन) भविष्यात मूळ देशासाठी हेरगिरी करेल अशी योजना असते. असो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
17 Dec 2015 - 11:24 am | कैलासवासी सोन्याबापु
ह्या सांगोवांगीवर आधारित "सॉल्ट" हा एंजेलिना जोलीचा सिनेमा पाहिल्याचे स्मरते :)
17 Dec 2015 - 7:10 pm | मार्मिक गोडसे
माहितीपूर्ण लेख
संबंधीत देशातील गुप्तहेर संस्थाही अशा sayan च्या हालचालींवर वॉच ठेवत असतीलच ना?
30 Dec 2015 - 1:20 pm | निनाद मुक्काम प...
माजी सी आय ए असलेल्या एका व्यक्तीने अमेरिकेत सध्या द अमेरिकन्स ही नितांत सुंदर हेरगिरी ची टीव्ही मालिका चालू केली आहे, ह्या मालिकेचा प्रत्येक भाग प्रदर्शित होण्याआधी सी आय ए संमत व्हावा लागतो
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेत रशियन विशीचे तरुण जोडपे स्लीपर सेल म्हणून दाखल होतात ते अमेरिकेत अमेरिकन बनून
त्यांचे छुपे हेरगिरीचे आयुष्य जगतात ह्यात त्या दोघाची पती पत्नी म्हणून जगतांना जी मानसिक घालमेल होते पुढे त्यांना मुले झाल्यावर आपले लग्न आपले कुटुंब आपले एकमेकांवर प्रेम हे खरे कि आभासी ह्यातील दन्द्व उत्तमरीत्या दाखवत रशियाची अमेरिकेत केजीबी कारवाया दाखवतांना कोठेही कोणाचे उदात्तीकरण न करता दाखवले आहे, त्यांच्या पुढच्या सिझन ची आतुरतेने वाट पाहत आहे , वरील लेखमाला सुद्धा आवडीने वाचली जाईल .ज्या देशात आर्य चाणक्य ते बहिर्जी नाईक ह्यांनी हेरगिरी ला नवा आयाम दिला त्या देशात रॉ ची निर्मिती होण्यास १९६८ उजाडावे लागले ह्याहून दुर्दैवाची गोष्ट अजून काय असू शकते.
आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे.
17 Dec 2015 - 11:36 am | चांदणे संदीप
इथे आलेल्या सर्व वाचकांशी सहमत!
लेखमालेची जबरदस्त सुरूवात! उत्कंठावर्धक!
पुभाप्र!
Sandy
17 Dec 2015 - 3:48 pm | पिलीयन रायडर
अत्यंत सुंदर लेख!!
पुभाप्र!
19 Dec 2015 - 3:20 am | स्पार्टाकस
सुरवात भारी बोक्या!
एली कोहेन, ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ, अली हसन सालामेह, मोरोक्कन ज्यू ऑपरेशन. खालिल अल वझीर आणि सालाह खलाफ, जेराल्ड बुल, हुसेन अल बशीर, अल माशाद, लिलहॅमर अफेअर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अॅडॉल्फ आईकमन हे येणार असतीलच पुढे अशी अपेक्षा आहे! बाकीचीही बरीच ऑपरेशन्स आहेत.
मोसाद बरोबरच शिनबेथ, सायरेत मातकल, लॅकेम यांच्याबद्दल पण लिही!
22 Dec 2015 - 11:32 am | अर्धवटराव
च्यायला... पहिल्यांदाच नावं वाचतोय हि :(
21 Dec 2015 - 3:07 pm | नरेश माने
मस्तच!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.......
21 Dec 2015 - 3:24 pm | सस्नेह
आणि वाचनीय !
पुभाप्र.
21 Dec 2015 - 3:50 pm | सतीश कुडतरकर
इस्राइलविषयी पुस्तक वाचून खूप वर्षे झाली आहेत. लेखमालेमुळे पुन्हा उजाळा! धन्यवाद!
23 Dec 2015 - 12:21 am | लिओ
@मानस चंद्रात्रे
अॅडॉल्फ आईकमनला पकडण्याच्या मोहिमेवर एक पुस्तक व त्या पुस्तकावर एक चित्रपट निघाला नाव "हाऊस ओन गारिबाल्डी स्ट्रीट". पुस्तक व चित्रपट अप्रतिम
28 Dec 2015 - 9:43 am | शाम भागवत
मोसाद - भाग २
6 Jan 2016 - 3:13 pm | सूड
निवांत वाचायला राखून ठेवत आहे.
6 Jan 2016 - 3:42 pm | कविता१९७८
वाह, अतिशय अभ्यासपुर्ण आणि प्रचंड ताकदीच्या लेखमालिकेला सुरुवात झालेली आहे, हेरगिरी आवडीचा विषय आहे आणि माझ्यासाठी ही एक मेजवानीच ठरणार आहे.
31 Mar 2016 - 10:15 am | हकु
खुप अभ्यासपूर्ण लिखाण!!
बोकासाहेब, आपला या मालिकेचा नववा भाग आला आहे पण मी आता इथुन सुरुवात करत आहे.
या देशाबद्द्ल नेहमीच कौतुक वाट्त आलं आहे. आता अजुन समजून घेण्यास मदत होइल.
शुभेच्छा!!!
21 Nov 2017 - 5:49 pm | Hind Sagar
व्वा,
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख..
मोसाद चे पुस्तक परीक्षण कसे करायला पाहिजे हे शिकायला मिळाले..
धन्यवाद..
29 Nov 2018 - 6:52 pm | संन्यस्त खड्ग
बोकासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
29 Nov 2018 - 7:42 pm | महामाया
बोकासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
29 Nov 2018 - 7:42 pm | महामाया
बोकासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
29 Nov 2018 - 7:49 pm | अनिरुद्ध प
बोकासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
29 Nov 2018 - 8:33 pm | योगी९००
बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
30 Nov 2018 - 1:32 pm | रागो
बोकासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
2 Dec 2018 - 1:52 pm | कापूसकोन्ड्या
बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
28 Sep 2020 - 6:38 pm | डीप डाईव्हर
जबरदस्त मालिकेची जबरदस्त सुरुवात 👍
हे मोसादचं ब्रीदवाक्य फार समर्पक वाटले.
मालिका लेखक बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
31 Jan 2023 - 3:23 pm | रघुनाथ.केरकर
आज ७ वर्षांनी पुन्हा बोका शेट चं मोसाद पुन्हा वाचायला घेतलं.
ह्या लेखमालिकेसाठी त्यांचा मी कायम ऋणी राहीन आणि मिसळपाव चा सुद्धा...