विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
11 Dec 2015 - 8:30 pm

भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974
भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987
भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009
भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर http://www.misalpav.com/node/34037

माझ्या लहानपणी घरी येणारे एक काका गंमत करण्यासाठी म्हणून 'कोंबडी आधी की अंडे आधी?' असा प्रश्न विचारायचे, आणि मी गोंधळात पडलो की कशी मजा आली म्हणून हसायचे. त्याचा मला खूप राग यायचा. एक म्हणजे हा खराच कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. आणि काहीही उत्तर दिले तरी ते कोडे सुटत नाही. दुसरे म्हणजे त्यांना उत्तर माहीत असेल अशी आशा असायची. पण 'कोंबडी आधी' असे उत्तर सांगितले की 'पण अंड्याशिवाय कोंबडी कशी येईल' असा विरुद्ध प्रश्न विचारण्यापलिकडे त्यांच्याकडून काही मिळायचे नाही. जसा मी मोठा झालो आणि इतर मुलांना हाच प्रश्न विचारताना मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात यायला लागले की त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे मुलांना गोंधळात टाकण्याच्या खेळापलिकडे या प्रश्नात काहीतरी शोधण्यासारखे आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती.

कोडे खरेच विचित्र आहे. अंडे आधी म्हणावे तर ते अंडे उबवायला कोंबडी लागते. कोंबडी आधी म्हणावी तर अंडे घालू शकणारी कोंबडी ही त्या अंड्यातूनच जन्माला येते. त्यामुळे आधी काय? हे कोडे असाध्य आहे हे मान्य केले तर 'अनंत काळपासून हे आहे हे असे आहे. काळालाच सुरूवात नाही, त्यामुळे कोंबडी-अंडे या चक्रालाही सुरूवात नाही.' हे मान्य करावे लागते. या चक्राची उत्पत्ती काही-नाही पासून झाली हे सकृद्दर्शनी संभवतच नाही. परमेश्वराने सगळे निर्माण केले, आणि प्रजाती बदलत नाहीत या गृहितकाला पुष्टी मिळते. त्यामुळे शून्यापासून, कुठच्याही निर्मात्याशिवाय जीवांची निर्मिती कशी झाली हे जाणून घ्यायचे असेल तर या कोड्याचे उत्तर समजून घ्यावे लागते.

याचे उत्तर दडले आहे या कोड्याच्या भाषेतच. 'अंड्याशिवाय कोंबडी नाही, आणि कोंबडीशिवाय अंडे नाही' असे म्हटले की हे चक्र बदलू न शकणारे आहे हे आपणच गृहित धरतो. हे अर्थातच खरे नाही हे आपल्याला कुठेतरी माहीत असते. कारण पृथ्वीचा जन्मच साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. हा कालखंड प्रचंड असला तरी तो अनंत नाही. जवळपास चाळीस टक्के काळ कोंबड्या जगू शकतील इतका ऑक्सिजनच पृथ्वीवर नव्हता. किंबहुना हाडे असणारे प्राणीच पन्नासेक कोटी वर्षांआधी सापडत नाहीत. पण त्याआधी काही प्रकारचे जीव तर होतेच. त्यामुळे आधीच्या कुठच्यातरी प्राण्यापासून कोंबड्या तयार झाल्या असणार हे मान्य करावे लागते. म्हणजे कोंबडी-अंडे-कोंबडी हे चक्र कधीतरी निर्माण झाले असणार. आपल्याला फक्त या चक्राची उत्पत्ती कशी झाली हे शोधून काढायला हवे.
कोंबडी अंडं चक्र

ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वरील चित्राकडे पाहा. चित्राच्या पहिल्या भागात सध्या चालू असलेले चक्र दाखवलेले आहे. कोंबडीपासून अंडे बनते, अंड्यातून पिलू बाहेर येते, ते वाढून कोंबडी होते, आणि ती कोंबडी अंडे देते. चित्राच्या दुसऱ्या भागात हेच चक्र शतकानुशतके, युगानुयुगे चालू असलेले दाखवले आहे. डावीकडून उजवीकडे जसजसे जातो, तसतसा काळ पुढे जातो. आणि प्रत्येक चक्र म्हणजे एक पिढी अशी कल्पना केलेली आहे. जर या चक्रात बदल होणारच नाही, होतच नाही, आणि पूर्वापारपासून अव्याहतपणे ते तसंच चालू आहे असे गृहित धरले तर दुसऱ्या चित्राप्रमाणे अनादी अनंत काळाचा भास होतो. हेच कोंबडी आधी की अंडे आधी या कोड्याचे सार आहे.

मात्र तिसऱ्या भागाकडे बघितले की खरी परिस्थिती डोळ्यासमोर आणता येते. सर्वात आधी एकपेशीय जीव होते. ते सरळसरळ पेशीविभाजनाने पुनरुत्पादन करत असत. त्यामुळे इथे चक्राचा प्रश्नच नाही. त्यानंतर द्विपेशीय आणि नंतर हळूहळू अनेकपेशीय जीव आले. त्यांचेही पुनरुत्पादन जसेच्या तसे होत असावे. त्यामुळे तिथेही चक्राचा प्रश्न नाही. जसजसे जीव अनेकपेशीय झाले, तसतसे त्यांच्या पेशींचे समूह विशिष्ट कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करू लागले. म्हणजे अवयव निर्माण झाले. त्यातला एक अवयव म्हणजे गर्भाशय. म्हणजे पुनरुत्पादनातून निर्माण होणारा जीव हा संपूर्णपणे वाढलेला नसून जन्माला आल्यानंतर वाढून मग पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेवर आला. या पातळीवर कुठेतरी या चक्राला हळुवार सुरूवात झाली. कारण 'आधी कोंबडी की आधी अंडे?' हा प्रश्न 'आधी प्राणी की आधी अर्भक?' या स्वरूपात विचारता येऊ शकतो. याच सुमाराला कुठेतरी लैंगिक पुनरुत्पादनालाही सुरूवात झाली. नवजात जिवाला जन्म घालण्यात नर आणि मादी असे शुक्राणू आणि अंडंबीज पुरवणारे दोन भाग एकाच प्रजातीमध्ये दिसायला लागले. मग जीव जन्मण्याच्या आणि वाढण्याच्या प्रक्रियेचे गर्भाशयात घडणाऱ्या प्रक्रिया, आणि गर्भाशयाबाहेर घडणारी वाढ असे भाग व्हायला लागले. म्हणजे आपल्याला दिसणारे चक्र हे अधिकाधिक मोठे व्हायला लागले. काही प्रजातींमध्ये बाहेर येणाऱ्या गर्भावर ते काही काळ टिकून राहावे यासाठी कदाचित आवरण तयार झाले असेल. हे आवरण जसजसे कठीण होत गेले, तसतसे गर्भाशयातल्या प्रक्रिया गर्भाशयाबाहेर, या आवरणाच्या आत अधिकाधिक प्रमाणात व्हायला लागल्या. आणि त्याचे एका टोकाचे स्वरूप कोंबडीमध्ये दिसते. कोंबडीच्या पिलाची वाढ ही एकाच मोठ्या अंडंपेशीपासून ते पिलापर्यंत ही गर्भाशयाबाहेर, अंड्याच्या आत होऊ लागली. गरज असते ती फक्त विशिष्ट तापमान राखण्याची.

दुसऱ्या पद्धतीनेही याचा आपल्याला विचार करता येतो. कुठचीही कोंबडी असली तरी तिला आई असतेच. आता एका प्रचंड मैदानावर एक रेष आखू. ही काळरेषा. तिच्या सर्वात उजव्या टोकावर आजची एक कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई.... असे करत करत गेलो तर आपल्याला काय दिसेल? जसजसे डाव्या बाजूला जाऊ तसतसे आपण काळात मागे जाऊ. मीटरला एक पिढी या दराने. आता कुठच्याही कोंबडीकडे बघितले तरी ती गुणधर्मांनी जवळपास तिच्या आईसारखीच असेल. कारण उत्क्रांतीचे बदल हे एखाद-दोन पिढ्यांत दिसून येत नाहीत. त्यामुळे तुम्ही आजची कोंबडी बघितली आणि डावीकडे एक किलोमीटर चालत हजार पिढ्या मागे गेलात तरी तुम्हाला त्यांच्यात फरक दिसणार नाही. दोन्ही प्राण्यांना तुम्ही कोंबडीच म्हणाल. मात्र लाखभर पिढ्यांचा फरक केलात निश्चितच त्यांच्यात फरक जाणवेल. कदाचित त्यांचा आकार वेगळा असेल, कदाचित आधीच्या कोंबड्यांची अंडी लहान असतील, कमी कडक असतील... पाचदहा लाख पिढ्या मागे गेलात तर कदाचित इतका प्रचंड फरक जाणवेल की हा प्राणी तुम्हाला कोंबडी म्हणून ओळखू येईल की नाही सांगता येणार नाही. पण गंमत अशी की त्या पाच लाखाव्या आजीच्या आसपासच्या 'कोंबड्या' जवळपास हुबेहुब तिच्यासारख्याच दिसतील. कारण हा घडणारा बदल हजारो पिढ्यांमध्ये, हळूहळू होतो. जर तुम्ही काही कोटी पिढ्या मागे गेलात दिसणारा प्राणी हा इतका वेगळा असेल की त्याला कदाचित पक्षी म्हणता येणार नाही. कदाचित तो अंडे घालत नसेल. अजून अनेक कोटी पिढ्या मागे गेलात तर काही पेशींचा अवयव नसलेला गोळा दिसेल. त्याही मागे मागे सुमारे पन्नासेक कोटी वर्षे गेलात तर दोनचार पेशींचा समूह असेल. आणि पुरेसे मागे गेले तर त्या रांगेत एकपेशीय जीव सापडतील. अशा रीतीने हे कोडे पद्धतशीरपणे सुटते. यासाठी उत्क्रांतीद्वारे हळुहळू होणारा बदल लक्षात घ्यावा लागतो.

या कोड्याची मेख 'खूप मोठे' आणि 'अनादी-अनंत' यामधल्या फरकात आहे. आपल्याला सर्वसाधारण जीवनात दिसणाऱ्या गोष्टी या मर्यादित काळाच्या आणि मर्यादित आकाराच्या असतात. आपल्याला ज्या कोंबड्या माहीत आहेत, त्या आपल्या वडलांना, आजोबांना दिसणाऱ्या कोंबड्यांसारख्याच असतात. कोंबडी-अंडे-कोंबडी या चक्रात गेल्या काही शतकांत बदल झालेला नाही. काळाच्या रेषेवर उभ्या केलेल्या या कोंबड्यांकडे आपल्याला काहीशे मीटरपलिकडच्या कोंबड्या दिसत नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला यात बदल होऊ शकतो याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे 'खूप मोठा काळ' आपण मागे वाढवून 'अनादी काळ' मनातल्या मनात आपोआप बनवतो. काळाच्या महाप्रचंड पसरलेल्या आवाक्यात आपले स्थान टिचभर आहे. त्याच्या लहानशा भागाकडे - शंभर दोनशे वर्षांकडे - पाहून आपण जे निष्कर्ष काढतो ते मोठ्या काळाच्या - कोट्यवधी वर्षांच्या - पातळीवर लागू ठरतातच असे नाही. हे एकदा मान्य केले की हे कोडे सहज सुटते.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

बाकी फाफट पसारा जाऊं द्या कारण तो डोलारा फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे :

सर्वात आधी एकपेशीय जीव होते.

निर्जीवातून सजीव कसा निर्माण झाला ?

संदीप डांगे's picture

12 Dec 2015 - 7:38 pm | संदीप डांगे

ठो!!!

राजेश घासकडवी's picture

12 Dec 2015 - 8:02 pm | राजेश घासकडवी

आपण वारंवार दाखवलेल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद. असे प्रश्न निर्माण होणं, त्यावर चर्चा होणं हे मी माझ्या लेखमालेचं यश समजतो. ही लेखमाला मोठी आहे. तिची मांडणी करताना वेगवेगळ्या पातळीवरच्या संकल्पना समजावून देण्याचा प्रयत्न आहे. उत्क्रांती का होते, नैसर्गिक निवड कशी होते, जनुकं म्हणजे काय, सर्व्हायव्ह ऑफ द फिटेस्ट म्हणजे नक्की काय, अचेतनापासून सचेतनापर्यंत प्रवास कसा होतो असे अनेक वेगवेगळे पैलू एकेका लेखात सांगण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा हजार शब्दांच्या एका लेखात सगळी उत्तरं मिळतील असा आग्रह धरू नये. तेव्हा कृपा करून धीर धरावा. आणि या लेखात जो मर्यादित मुद्दा मांडला आहे त्यावर चर्चा करावी.

या लेखात 'उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे आपल्या सगळ्यांनाच कायम सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं' हे सांगितलेलं आहे. तसंच उत्क्रांतीची रूपरेषा कोंबडी आणि अंडं या उदाहरणातून मांडलेली आहे. तिसरा मुद्दा असा मांडलेला आहे की आपण बऱ्याच वेळा आपल्या मर्यादित अनुभवांतून काही निष्कर्ष गृहित धऱतो. कोंबडी-अंडं हे चक्र गेल्या शेकडो वर्षांत बदललेली दिसत नाहीत, त्यामुळे अनंत काळपर्यंत ते तसंच असेल असं आपल्याला वाटू शकतं. पण हजारो लाखो वर्षांत जे बदल होतात ते आपल्याला अभ्यासाशिवाय दिसत नाहीत. पहिल्या लेखात काळाचा आवाका केवढा प्रचंड आहे हे सांगितलं होतंच.

या मुद्द्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तूर्तास अचेतन-सचेतन प्रवासाबाबत धीर धरा.
धन्यवाद.

विवेक ठाकूर's picture

12 Dec 2015 - 8:13 pm | विवेक ठाकूर

उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे आपल्या सगळ्यांनाच कायम सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं

निर्मितीचं उत्तर सापडल्या शिवाय उत्क्रांतीच्या सिद्धांताला काय अर्थ आहे? आणि तुम्ही तर डायरेक्ट `उत्तर मिळतं' म्हणता !

राजेश घासकडवी's picture

13 Dec 2015 - 5:26 am | राजेश घासकडवी

संजय क्षीरसागर यांनी दिलेल्या एका प्रतिसादातली काही वाक्यं इथे लागू होतील. (काही शब्द लेखानुरुप बदललेले आहेत)

हा लेख फालतू आहे, एक अक्षर कळत नाही, निर्मिती कशी झाली हे समजल्याशिवाय कशावरच विश्वास ठेवणार नाही, काल हाच एक भ्रम आहे इतक्या विविध विषयावर तुम्ही कल्ला केलात तर मला सर्वांची उत्तरं माहिती असून देखील काहीही सांगता येणार नाही.

ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `कोंबडी आधी की अंड आधी' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, उत्क्रांती घडली ही खात्री झाली की अनुषंगिक बदल (आपण कोण आणि कसे झालो याची जाणीव, त्यातून येणारा मानसिक मोकळेपणा) तुमच्या आयुष्यात नक्की घडतील याची मी ग्वाही देतो

ज्यांना कळत नाहीये पण कळावंस वाटतय त्यांनी कृपया लेख सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा वाचा, साध्या- सोप्या भाषेत आणि अभ्यासातून लिहिलय, त्यात न समजेलसं काही नाही.

ज्यांना निव्वळ तिरकस प्रतिसाद द्यायचेत ते काय साधतायत याची कल्पना नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला काहीही म्हणायच नाही.

माझं नाही ऐकलं तर संक्षींचं तरी ऐका की.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 8:44 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/applause-smiley-emoticon.gif द्दे मारा! अब आयेगा मजा!

विवेक ठाकूर's picture

13 Dec 2015 - 5:57 pm | विवेक ठाकूर

पण तुम्ही तर पहिल्याच लेखात हार मान्य केली आहे !

या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी कुवत नाही

आणि तरीही लेखमाला दामटतायं. आता संक्षींना क्वोट करुन काय उपयोग?

त्याही मागे मागे सुमारे पन्नासेक कोटी वर्षे गेलात तर दोनचार पेशींचा समूह असेल. आणि पुरेसे मागे गेले तर त्या रांगेत एकपेशीय जीव सापडतील.

त्या एकपेशीय जीवात कोंबडी निर्माण करण्याची सूक्ष्म संभावना असायलाच हवी. अन्यथा कोंबडी शून्यातून निर्माण होऊ शकत नाही (हा तुमचाच दावा आहे). आता त्या सूक्ष्मतम बीजाला तुम्ही कोंबडी म्हणणार की अंडे?

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 7:20 pm | संदीप डांगे

पकडे रेहना.... छोडना मत. सॉल्लीड पॉईण्ट आहे.

पण राघांचे रीस्पॉन्सेस लिमिटेड आहेत. ठाकूरांचे प्रश्न अनलिमिटेड....

विवेक ठाकूर's picture

13 Dec 2015 - 7:34 pm | विवेक ठाकूर

संक्षींचं लेखन स्वानुभवातून होतं त्यामुळे त्यांना प्रश्नांची फिकीर नसायची. लेखमाला मात्र, इकडून तिकडून गोळा केलेला डेटा इथे डकवून `उत्तर सापडलं' असं सांगायचा प्रयत्न करतेयं, ते अशक्य आहे.

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 7:48 pm | संदीप डांगे

आमचा तुम्हाला फुल्ल्ल सपोर्ट आहे.... लगे रहो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

आत् म्या च्या आंंधारातून http://www.freesmileys.org/smileys/smiley-char067.gif बोलत राहीन मींSSS मींSSS मींSSS
आत्म भ्रमीत रूपायाला २आणे अक्कल कमी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

संक्षींचं लेखन स्वानुभवातून होतं त्यामुळे त्यांना प्रश्नांची फिकीर नसायची

येस्स्स. संजयजी भारी माणूस होते. खरा रसिक अन दिलदार माणूस.

राजेश घासकडवी's picture

13 Dec 2015 - 10:42 pm | राजेश घासकडवी

त्या एकपेशीय जीवात कोंबडी निर्माण करण्याची सूक्ष्म संभावना असायलाच हवी. अन्यथा कोंबडी शून्यातून निर्माण होऊ शकत नाही (हा तुमचाच दावा आहे). आता त्या सूक्ष्मतम बीजाला तुम्ही कोंबडी म्हणणार की अंडे?

तुम्ही शब्दांच्या बुडबुड्यांच्या जेस्टाल्टमध्ये अडकलेले आहात. त्यातून बाहेर यावं ही विनंती. काळामध्ये पुरेसं मागे गेलं की सगळेच जीव बदलताना दिसतात. प्रत्येकच प्राण्याच्या बाबतीत वरच्या लेखातल्या कोंबडीसारखं खूप मागे गेलं की त्यांच्या रेषा एकत्र येऊन सामायिक होत जातात. असं काही अब्ज वर्षं मागे गेलं की सगळ्या रेषा एकत्र येतात. तिथे जे एकपेशीय जीव सापडतात ते कोंबड्यांचेच नव्हे, तर हत्ती, व्हेल, कुत्रा, माणूस, आंब्याचं झाड, त्यांवर पडणारी कीड या सर्वांचेच महामहामहा...महपिता आहेत. तेव्हा त्या जीवाला कोंबडी किंवा अंडं म्हणण्याची गरज राहात नाही. त्या प्राण्याला आपण सामायिक पूर्वज म्हणू शकतो. पुढच्या काळात जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून हे जीव त्या जिवापासून उत्क्रांत झाले. ती परिस्थिती वेगळी असती तर वेगळे जीव निर्माण झाले असते.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

@तिथे जे एकपेशीय जीव सापडतात ते कोंबड्यांचेच नव्हे, तर हत्ती, व्हेल, कुत्रा, माणूस, आंब्याचं झाड, त्यांवर पडणारी कीड या सर्वांचेच महामहामहा...महपिता आहेत.>> याचे पुरावेही दिसतात.. (अर्थात मी पुढे जे म्हणतोय..ते खरं आहे का खोटं..ते मात्र पहां हं,पण खर असेल तर हा एक पुरावा होइलच.) आज झाडं ही मुळांच्या पानांच्या वाटे पाणी प्रकाश मिळवतात,वाढतात..तेच त्यांचे अन्न आहे. पण आफ्रिकन जंगलात (म्हणे..) काही झाडं माणूस किंवा प्राणी त्यांचे जवळ आला..तर फांद्या वाकवून आपले काटे त्यांच्यात घुसवितात..व रक्त शोषून चिपाड बनवून फेकून देतात... ही धड वनस्पतीही नाही आणि जळवेसारखी रक्तशोषक किटक प्रजातीही नाही,अशी अवस्था झाली. याला अर्ध उत्क्रांत की काय म्हणायच हो घासकडवी? (आणि आधी हे खरं आहे,की खोटं तेही सांगा. )

राजेश घासकडवी's picture

14 Dec 2015 - 12:50 am | राजेश घासकडवी

माणसं खाणाऱ्या झाडांच्या दंतकथा एकोणिसाव्या शतकात - जेव्हा युरोपीय देश नवे देश काबीज करत होते तेव्हा निर्माण झाल्या. पण 'मांसभक्षक' झाडं अस्तित्वात असतात. इथे ही माहिती मिळते.
Man-eating tree can refer to any of various legendary or cryptid carnivorous plants that are large enough to kill and consume a person or other large animal.[1] In actuality, the carnivorous plant with the largest known traps is probably Nepenthes rajah, which produces pitchers up to 38 cm (15 in) tall with a volume of up to 3.5 litres (0.77 imp gal; 0.92 US gal).[2] This species may rarely trap small mammals.[3]

याला अर्ध उत्क्रांत की काय म्हणायच हो घासकडवी?

अर्ध-उत्क्रांत हा थोडा गोंधळाचा शब्द आहे. त्यातून असं सूचित होतं की उत्क्रांती होऊन खरं तर या कप्प्यांमधलं काहीतरी तयार व्हायला हवं होतं पण चुकून म्हणा किेवा ती प्रक्रिया अर्धवट राहिल्यामुळे मधलंच काहीतरी दिसतं आहे. अशी सदिश नसते उत्क्रांती. बऱ्यापैकी टिकून राहिलेल्या प्रजाती या ज्या प्रजातीपासून उत्क्रांत झालेल्या असतात त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्याइतक्याच टिकून राहाण्यास लायक असतात. प्रत्येक प्रजाती आपापल्या इव्होल्युशनरी निशमध्ये जगत असते. त्यामुळे एखादी प्रजाती जर आपल्याला 'धड हे ना धड ते' अशी वाटत असेल तर दोष आपल्या शब्दमर्यादेचा आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर जमिनीवर राहाणाऱ्या प्राण्यापासून व्हेल तयार झाला. या बदलातल्या मधल्या अवस्था आपल्याला माहीत आहेत. खालच्या चित्रात त्या दाखवल्या आहेत.

सस्तन प्राणी ते व्हेल

या ज्या मधल्या अवस्था आहेत त्या टिकून राहिल्या नाहीत. किंबहुना पहिला सस्तन प्राणीही आता अस्तित्वात नाही. कदाचित पाण्यातून मिळणारं खाद्य अधिक असल्यामुळे पुढच्या तीनही अवस्था या चढत्या भांजणीत अधिक यशस्वी होत्या. थोडक्यात - हो, मधल्या अवस्था किंवा ट्रांझिशनरी फॉर्म्स आपल्याला दिसतात, पण याचा अर्थ उत्क्रांतीला खऱं तर व्हेलच तयार करायचा होता, पण त्या वाटेवर हे काहीतरी अगम्य जीव तयार झाले असा नाही. पहिला प्राणी बदलून दुसऱ्यासारखा झाला कारण तो तत्कालीन परिस्थितीत जगण्यासाठी अधिक यशस्वी होता. हेच पुढच्या पायऱ्यांनाही लागू होतं.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2015 - 1:35 am | अत्रुप्त आत्मा

ठांकू ठांकू...घासूगुर्जी. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2015 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2015 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ राजेश घासकडवी : तुम्हाला उत्खननशास्त्रात प्रचंड स्कोप आहे =))

@ श्रीरंग जोशी : तुमाला लै जोरात टशन हाय ;) :)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2015 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत संयत सूंदर विवेचन.

अनुप ढेरे's picture

12 Dec 2015 - 9:58 pm | अनुप ढेरे

हेच बोल्तो!

सुज्ञ's picture

14 Dec 2015 - 1:02 am | सुज्ञ

राजेश यांनी उत्क्रांती चे नियम चांगले समजाऊन सांगितले आहेत .. उत्क्रांती का झ्हाली वगैरे प्रश्न येथे गैरलागू आहेत..

विवेक ठाकूर's picture

14 Dec 2015 - 9:07 am | विवेक ठाकूर

काळामध्ये पुरेसं मागे गेलं की सगळेच जीव बदलताना दिसतात. प्रत्येकच प्राण्याच्या बाबतीत वरच्या लेखातल्या कोंबडीसारखं खूप मागे गेलं की त्यांच्या रेषा एकत्र येऊन सामायिक होत जातात. असं काही अब्ज वर्षं मागे गेलं की सगळ्या रेषा एकत्र येतात. तिथे जे एकपेशीय जीव सापडतात ते कोंबड्यांचेच नव्हे, तर हत्ती, व्हेल, कुत्रा, माणूस, आंब्याचं झाड, त्यांवर पडणारी कीड या सर्वांचेच महामहामहा...महपिता आहेत. तेव्हा त्या जीवाला कोंबडी किंवा अंडं म्हणण्याची गरज राहात नाही. त्या प्राण्याला आपण सामायिक पूर्वज म्हणू शकतो.

या तुमच्या सामायिक पूर्वजाला तुम्ही अंडे म्हणणार की कोंबडी ?

शिवाय तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शून्यातून काहीच निर्माण होऊ शकत नाही मग हा `सामायिक पूर्वज' कुठून आला ?

सोप्पं आहे, तो ब्रह्मदेवाने निर्माण केला …

प्रचेतस's picture

14 Dec 2015 - 2:17 pm | प्रचेतस

उत्स्फूर्त निर्मिती.

अर्धवटराव's picture

16 Dec 2015 - 2:51 pm | अर्धवटराव

=))

झाडाच्या खोडात स्वयंभू दत्त.

दत्त दत्त
दत्ताची गाय
गायीचं दूध
दुधाची साय
सायीचं दही
दह्याचं लोणी
लोण्याचं तूप
तुपाची बेरी
बेरीची माती
मातीचा गणपती
गणपतीची घंटा वाजे घण घण घण.

राजेश घासकडवी's picture

14 Dec 2015 - 6:34 pm | राजेश घासकडवी

शिवाय तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शून्यातून काहीच निर्माण होऊ शकत नाही मग हा `सामायिक पूर्वज' कुठून आला ?

अहो, हजार शब्दांच्या एकाच लेखातून तुम्हाला सगळी उत्तरं कशी देऊ? जरा धीर धरा, याविषयी येत्या काही लेखांमध्ये चर्चा होईल.

'आमाला आमच्या लायनीपरमानं जाऊ द्या'

अत्यंत साधा प्रश्न आहे . लेखाचं शीर्षक पाहा आणि प्रश्न पाहा :

या तुमच्या `सामायिक पूर्वजाला' तुम्ही अंडे म्हणणार की कोंबडी ?

प्रतिसादातला सोयीचा भाग घेतलायं आणि निव्वळ चालढकल चालू आहे.

आणि मूळ प्रश्नालाच बगल देऊन उत्तर सापडल्याचा दावा चाललायं !

राजेश घासकडवी's picture

16 Dec 2015 - 8:26 pm | राजेश घासकडवी

अहो उत्तर आधीच दिलंय. तो कोंबडी आणि अंड्याचाच पूर्वज नसून सर्व सजीवसृष्टीचा पूर्वज आहे. त्याला कोंबडी-अंडं यांसारखं मर्यादित नाव देऊन कसं चालेल? म्हणून त्याला 'सामायिक पूर्वज' असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला हवं तर त्याला 'शामपूरचा शिलेदार' असं नाव द्या. नावात काय आहे? नाव काही दिलं म्हणून चित्र बदलणार आहे का?

वरतीच मी क्वोट केलं होतं त्याचा सारांश पुन्हा लिहितो - 'ज्यांना जेन्युईन प्रश्न आहेत त्यांनी पुन्हा एकदा शांतपणे वाचावं. ज्यांना मुद्दाम तिरकस प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलण्याची माझी इच्छा नाही.'

विवेक ठाकूर's picture

17 Dec 2015 - 9:50 am | विवेक ठाकूर

तो कोंबडी आणि अंड्याचाच पूर्वज नसून सर्व सजीवसृष्टीचा पूर्वज आहे. त्याला कोंबडी-अंडं यांसारखं मर्यादित नाव देऊन कसं चालेल? म्हणून त्याला 'सामायिक पूर्वज' असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला हवं तर त्याला 'शामपूरचा शिलेदार' असं नाव द्या. नावात काय आहे?

तुम्ही सामायिक पूर्वज म्हणा की लसूण, अथवा कोंबडी म्हणा की अंडं; `आधी कोण'? हा प्रश्न तसाच राहातो!

म्हणून पहिल्यापास्नं सांगतोयं, लेखमालेतून फक्त भारंभार माहिती मिळेल; उत्तर मिळणार नाही.

मला या सगळ्यातून एक प्रश्न आता छळायला लागला आहे, उत्क्रांतीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर एकपेशीय जीवापासून बहुपेशीय जीव निर्माण झाले? त्याचा काय हायपोथेसिस आहे? काही पुरावे आहेत का? अजूनही कोणते दोन पेशीय, चारपेशीय जीव अभ्यासासाठी उपलब्ध आहेत का?
पुढचा प्रश्न काही जणांना अश्लील वाटेल, पण लैंगिकता कशी निर्माण झाली याची काही थिअरी आहे का?

साती's picture

14 Dec 2015 - 4:19 pm | साती

एकपेशीय प्रोटोझोआ - अमिबा, बॅक्टेरिया सगळ्यानाच माहित्येयत.
दोनपेशीय- यात दोन पेशींना जोडणारा एक पुल असणारे डेस्मिड्स आणि दोन पेशी वेगवेगळ्या पण सत्तत एकत्र असे रहाणारे डिप्लोकोकाय येतात.
चारपेशींचे- अनेक प्रकारची शेवाळे आणि बुरश्या चार चार पेशींच्या असंख्य वसाहती (कॉलन्या) करून रहातात.

(एक वेगळी पेशी म्हणजे तिचे स्वतःचे सायटोप्लाजम आणि वेगळे न्यूक्लिअस असले पाहिजे. सेल विभाजनाच्या वेळी पाहिले तर दोन किंवा कॅन्सर पेशींमध्ये तर कित्येक न्यूक्लिया असू शकतात पण त्या प्रकाराला स्वतंत्र द्विपेशीय प्राणी/जीव म्हणत नाहीत.)

घासकडवी, सुरेख लेखमाला. वाचत आहे. योग्य वेळी योग्य प्रश्न विचारेनच! ;)

आनन्दा's picture

14 Dec 2015 - 5:38 pm | आनन्दा

धन्यवाद.

साती's picture

14 Dec 2015 - 10:15 pm | साती

बाकी लैंगिकता कशी निर्माण झाली ते या लेखमालिकेच्या स्कोप आणि लिमिटेशन्समध्ये येणार आहे का हे घासुगुर्जींनाछ विचारावे लागेल.
येणार असला तर उत्तमच.

राजेश घासकडवी's picture

14 Dec 2015 - 10:50 pm | राजेश घासकडवी

साती, उत्तराबद्दल धन्यवाद. एका पेशीपासून अनेक पेशींपर्यंत प्रवास कसा झाला, त्यात इव्होल्युशनरी अॅडव्हांटेज काय आहे वगैरेबद्दल मलाही जाणून घ्यायला आवडेल.

लैंगिक पुनरुत्पादन हा एक महत्त्वाचा विषय आहे, आणि त्याविषयी मी निश्चितच लिहिणार आहे. पण पहिले बरेच लेख उत्क्रांतीची तत्त्वं काय आहेत यासाठी लिहिलेले आहेत.

जेपी's picture

14 Dec 2015 - 8:19 pm | जेपी

लेख आवडला..
पुभाप्र.

अवांतर-आमची आगामी लेखमालीका..
--
पोटाचे आर्त- आधी अंडा आम्लेट की भुर्जी पाव..

मांत्रिक's picture

14 Dec 2015 - 10:20 pm | मांत्रिक

मस्तच जेप्याण्णा...

अभिजीत अवलिया's picture

15 Dec 2015 - 9:46 am | अभिजीत अवलिया

लेख आवडला ....

लेखमाला सुंदर चाललेली आहे.
प्रतिसाद मनोरंजक व ज्ञानवर्धक दोन्ही टाइपचे आहेत.

राजेश घासकडवी's picture

15 Dec 2015 - 8:43 pm | राजेश घासकडवी

प्रतिसाद मनोरंजक व ज्ञानवर्धक दोन्ही टाइपचे आहेत.

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या! ;)

DEADPOOL's picture

23 Jan 2016 - 11:06 pm | DEADPOOL

इंग्लेंड मध्ये 18 व्या शतकात क्रूत्रिम जीव तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये एका भांड्यात पानी घेऊन त्यात जीवस्रुश्टिला आवश्यक असे अमीनो आसिड्स,फॅट वगैरे ठेवले होते. प्रयोग फ़सला!
करोडो वर्षापूर्वी जीवनाला आवश्यक असे घटक योग्य वेळी,योग्य वातावरणात व योग्य प्रमाणात एकत्र आले योगायोगाने आणि पहिला सजीव तयार झाला. या प्रक्रियेला करोडो वर्षसुद्धा लागले असतील.
आता उत्क्रांतीक्रम बघू!
1.एकपेशीय सजीव
2.द्विपेशिय व अनेक्पेशीय सजीव
3. शारीरिक क्षमता विकास
4. प्रजननक्षमता विकास
5. प्रजनन प्रकार सस्तन व अंडज
6.. सस्तन व अंडज प्राणी संकर व अनेक प्राणी निर्मिती
त्यामुळे कोम्बडी आधी आणि प्रजननक्षमतेचा विकास मग अंडे!
थँक्स!