(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)
कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील.
हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं.
अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते.
अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू.
तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं.
त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो?
तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश!
आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ.
कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.
प्रतिक्रिया
3 Dec 2015 - 7:05 pm | राजेश घासकडवी
या लेखमालेतले पहिल्या दोनतीन प्रास्ताविक लेखांनंतर बरेच लेख उत्क्रांती या विषयाला वाहिलेले आहेत. नुकतीच उत्क्रांती या विषयावर चर्चा झाली म्हणून अधिक स्पष्टपणे तो विषय मांडण्यासाठी ही लेखमाला इथे प्रसिद्ध करतो आहे. कुठचेच तांत्रिक शब्द शक्यतो न वापरता सोप्या भाषेत संकल्पना समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. मिपाकरांना ही लेखमाला आवडेल अशी आशा आहे.
3 Dec 2015 - 7:16 pm | दमामि
वा!!!पुभाप्र
19 Mar 2016 - 9:02 pm | उल्का
मी आज हा पहिला लेख वाचला. मस्त मालिका असणार यात शंका नाही. ती संपूर्ण वाचून झाल्यावर नक्की प्रतिक्रिया देईनच. धन्यवाद!
3 Dec 2015 - 7:27 pm | शिव कन्या
जड विषय हलका करून सांगितलात. उत्तम.
पुलेप्र.
3 Dec 2015 - 7:43 pm | मार्मिक गोडसे
छान माहीती. उत्क्रांतीविषयी वाचायला आवडेल.
अनेक तारे पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर आहेत, म्हणून आपण विश्वातील अब्जावधी वर्षापूर्वी घडलेल्या अनेक घटना आजही बघू शकतो. त्यामुळे विश्वाचे गुढ उकलण्यास मदत होते.
3 Dec 2015 - 7:52 pm | बोका-ए-आझम
पुभाप्र!
3 Dec 2015 - 7:54 pm | संदीप डांगे
अरेवा! हे पाऊल उचलल्याबद्दल मनापासून शतशः धन्यवाद!
लेख पूर्ण वाचला नाही. वाचून प्रतिसाद देतो.
पुनश्च धन्यवाद!
3 Dec 2015 - 8:01 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हालाच मिठी मारतो आता.
गुर्जी असले काही लिहीतील आणि ते आवडेल असे कधी वाटलेच नाही.
जाम भारी!
3 Dec 2015 - 8:06 pm | विवेक ठाकूर
सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत सामावलेलं आहे. जाणीव संपली, जग संपलं.
जग केंव्हा निर्माण झालं? जेंव्हा ते जाणीवेत आलं तेंव्हा.
अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहे
4 Dec 2015 - 4:03 pm | गॅरी ट्रुमन
या प्रतिसादात कोणालाच काहीच आक्षेपार्ह वाटले नाही असे म्हणायचे की याला पूर्णपणे फाट्यावर मारायचे मिपाकरांनी ठरविले आहे असे म्हणायचे?
जर का अन्य कोणी सदस्य काहीतरी लिहित असेल आणि त्या लेखनात काही उणीव जाणवली तर त्यात आपल्या परिने भर घालावी किंवा माहिती चुकीची आहे असे वाटल्यास बरोबर माहिती कोणती हे लिहावे आणि ते ही करायचे नसल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे पण अशाप्रकारची भाषा नक्कीच खटकण्याजोगी आहे.
4 Dec 2015 - 4:20 pm | सस्नेह
अर्थ समजला नाही म्हणून एखादे लेखन निरर्थक होत नाही.
शिवाय जे काही समजले नाही, ते लेखकाला विचारून स्पष्ट करून घेता येतेच.
4 Dec 2015 - 8:27 pm | विवेक ठाकूर
विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका
मुळात काळ असं काही नाहीये, ती प्रक्रियेचा कालावधी मोजण्यासाठी मानवानं निर्माण केलेली कल्पना आहे. जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही त्यावर चर्चा निरर्थक आहे.
माझ्या या प्रतिसादावर लेखकानं यावर मला अत्यंत बाळबोध प्रश्न विचारला होता :
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल?
आणि त्याला मी असं उत्तर दिलंय :
हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे.
त्यामुळे लेखकाला विचारणा झालीये पण त्यातूनही काही निष्पन्न नाही.
4 Dec 2015 - 8:40 pm | राजेश घासकडवी
घड्याळ हे कालमापनाचं यंत्र आहे. मी काळ या राशीबद्दल बोलत होतो. पृथ्वीचं भ्रमण म्हणजेच 'आधी' इथे आणि 'नंतर' तिथे. त्यामुळे भ्रमण होतं आहे म्हणून काळाचा भास होतो हे म्हणणं योग्य नाही. काळ आहे म्हणून भ्रमण शक्य आहे.
असो. काळ असं काही नाहीच, असं जर तुमचं मत असेल तर त्याविषयी तुम्ही स्वतंत्र मांडणी करावी असं मी म्हणतो. या लेखमालेत मी सर्वसामान्य विज्ञानाच्या पुस्तकांत जगभर जे शिकवलं जातं तेच मांडतो आहे. त्यात काल ही एक मूलभूत राशी आहे हेच सर्वमान्य आहे. तुम्हाला वेगळं मत बाळगायला माझी काही हरकत नाही. पण तुमचंच बरोबर, आणि मी मांडतो ते कसं चूक असं किती वेळा म्हणत राहाणार? खाली एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला हे सगळं चुकीचंच वाटत असेल तर या लेखमालेतून तुमच्या हाती काही लागणार नाही. तुम्ही स्वतंत्र लिखाण करून तुमचं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा अशी मी विनंती करतो. पण यापुढे मी 'काळ हा भ्रम आहे' या विषयावर चर्चा करू इच्छित नाही.
आपण पुढे जाऊया.
4 Dec 2015 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> आपण पुढे जाऊया. <<
ते जर काळाची गती मानतच नसतील तर ते पुढे कसे जाणार? ते तिथेच राहणार. त्यांच्या संदर्भचौकटीत तुमचे ग्रह* उलगडून दाखवा.
*ही कोटी दुर्दैवी आहे, हे मलाच मान्य आहे.
4 Dec 2015 - 9:11 pm | विवेक ठाकूर
तुम्ही काल आणि आवकाश या दोन्हीची गल्लत करतायं.
____________________________
खालच्या प्रतिसादात, तुमच्या विचारसरणतली चूक दर्शवून दिली आहे.
तुम्ही मला विचारलं होतं :
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? स्थिरच राहाणार नाही का?
आणि मी म्हटलंय
हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे.
_______________________
पुन्हा एका प्रतिसादात तुम्ही असं म्हटलंय :
मुद्दा : आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम आहे.
तुमचं उत्तर :
आवर्तन या शब्दातच काळ अंतर्भूत आहे. हा मुद्दा मी वरदेखील मांडलेला आहे.
तुम्ही पुन्हा मापन आणि प्रक्रिया यात घोळ करतायं.
________________________
पुढे तुमच्या कल्पनेतली चूक तुम्ही अधिक स्पष्ट केलीये :
तुमचा प्रतिसाद :
मी तुमचाच मुद्दा थोडा बदलून एक विधान करतो 'गती सत्य आहे, अवकाश किंवा अंतर हा भ्रम आहे' हे विधान तुम्हाला मान्य आहे का?
यावर साधा विचार करा : समजा तुमचं शरीर नेमक्या त्याच आकाराच्या खोलीत बंद आहे तर हालचाल शक्य आहे का? अंतर नसेल तर गती असंभव आहे. आणि गतीच नसेल तर मापनाचा प्रश्नच येत नाही.
थोडक्यात, कोणत्याही आकाराच्या गतीसाठी किमान त्यापेक्षा जास्त निराकाराची पूर्वौपस्थिती आवश्यक आहे. म्हणजे आवकाश हा भ्रम नसून वास्तविकता आहे आणि कालही केवळ प्रक्रिया मोजण्यासाठी निर्मित मानवी कल्पना आहे.
4 Dec 2015 - 9:25 pm | राजेश घासकडवी
बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल तर तेच बरोबर असेल.
4 Dec 2015 - 10:49 pm | विवेक ठाकूर
त्यात मी म्हणतो म्हणून बरोबर याला अर्थ नाही.
आणि काल ही कल्पना आहे तर मग "काळाचा आवाका" अशा लेखमालीकेला अर्थ राहात नाही!
5 Dec 2015 - 1:33 am | स्रुजा
हा तुमचा पहिला प्रतिसाद. या मध्ये अवकाश, काळ, कालमापनाची प्रक्रिया आणि एकक ( तुम्ही घड्याळाचा उल्लेख केलाय , म्हणुन एकक) याचा कुठेच उल्लेख नाही. तुमच्या मताप्रमाणे जी विसंगती आहे , ती, त्यांनी जसा पब्लिकली लेख सादर केलाय तशी तुमच्या प्रतिसादात करायला हवी होती. लेखकाने त्याचे उत्तर दिलेच असते आणि वाचकांना पण चांगला संवाद/ वाद वाचायची संधी मिळाली असती. तुमच्या पहिल्या प्रतिसादात कुठलंही कारण न देता केवळ शेरेबाजी केली आहे आणि लेखमालेला निकालात काढलं आहे. याची काय गरज होती?
3 Dec 2015 - 8:08 pm | शरभ
नमस्कार राजेशजी,
Big bang आणि तद्दन विश्वाचा जन्म आणि विस्तार ह्या गोष्टी मुळीच पट्णार्या नाहीत. ह्या पुढचा प्रतिसाद English मध्ये लिहीतोय. क्षमस्व.
I believe Big bang and all theories are based out on observations made. Since every single object has been found moving away from each other, big bang came into picture - so to satisfy current state of the expanding Universe. Relevant scientists would have further imagined and put forward big crunch etc. Nobody today is able to satisfactorily answer singularity and pre-big bang conditions. On other side rules of quantum mechanics do not apply to "observed" World/Universe. This is a very vast topic to comment.
However I wish to introduce you and everybody here to something new. It is called "Biocentrism" which if believed in principle for even a slightest probability would answer many questions on existence (or rather non-existence) of (real) space and time and which are relevant only to an “observer”.
मनापासुन लिहायचय. वेळ मिळाला तर detailed लिहीन.
3 Dec 2015 - 8:12 pm | राजेश घासकडवी
बिग बॅंग वर एक स्वतंत्र, पण छोटेखानी लेख लवकरच येईल. तेव्हा या विषयावर चर्चा करू.
3 Dec 2015 - 8:28 pm | शब्दबम्बाळ
बिग क्रंच होण्याची शक्यता कमी वाटते त्यापेक्षा विश्व प्रसरण पावत जाउन शेवटी सगळी उर्जा गमाउन बसेल आणि सगळीकडे अंधारच राहील असे वाटते. कृष्णविवरे बराच काळ टिकून राहतील पण शेवटी तीही उर्जेअभावी कोसळतील.
पण जर आपण कृष्ण विवरे मानतो तर white whole देखील असू शकते कि! आणि असे एक माहितीतले white whole म्हणजे Big Bang ;)
quantum mechanics चे जग मात्र भन्नाट आहे! सध्या या जगाला जन्म देणाऱ्या एका प्रयोगाच्या तयारी साठी साहित्य गोळा करतोय.
Thomas Young चा डबल स्लिट चा प्रयोग! एकदा बघायचाच आहे करून स्वताच्या डोळ्यांनी Dual nature of Light :)
3 Dec 2015 - 8:34 pm | शरभ
नक्की करा आणि कळवा सगळ्यांना.
If interested try google -
"Delayed Eraser Double Slit"
अजून मजा येईल.
3 Dec 2015 - 8:52 pm | मार्मिक गोडसे
सिंगल स्लिटचा (दोन बोटांचा) प्रयोग करून बघितला. मजा आली.
4 Dec 2015 - 2:06 pm | तुषार काळभोर
एफ ई च्या अॅप्साय मध्ये फिजिक्सला होतं खरं हे.
4 Dec 2015 - 3:57 pm | गॅरी ट्रुमन
या विषयातले मला काहीही म्हणजे काहीही कळत नाही. तरीही या चर्चेत एक गोष्ट लिहित आहे.
बी.ए.आर.सी मधून मागच्या वर्षी निवृत्त झालेल्या आभास कुमार मित्रा यांचे म्हणणे आहे की कृष्णविवरे असे काही नसतेच.
मागच्या वर्षी काही कारणाने आभास कुमार मित्रा यांना भेटलोही होतो. आता त्यांच्याशी काहीच संपर्क नाही पण त्यांचा चेहरा नक्कीच लक्षात होता. काही दिवसांपूर्वी कुणीतरी फेसबुकवर ही लिंक पोस्ट केली आणि आभास कुमार मित्रांचा फोटो त्यात दिसला म्हणून लिंक क्लिक केली इतकेच.वर उल्लेख केल्याप्रमाणे या विषयातले मला अगदी शून्य आकलन आहे.त्यामुळे याविषयी अन्य काही मुद्दे आल्यास त्यावर मला काहीही लिहिता येणार नाही. तरीही समजा या चर्चेत उपयोगी होणार असे काही त्या लिंकेत असायची शक्यता आहे म्हणून ते इथे लिहिले आहे.
4 Dec 2015 - 4:09 pm | sagarpdy
धन्स दुव्याबद्दल.
5 Dec 2015 - 1:48 am | अर्धवटराव
म्हणजे कृष्णविवराविषयी...
5 Dec 2015 - 3:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला जे काही समजलं होतं त्यानुसार आभास मित्रा जे काही म्हणतात त्याचा आणि हॉकिंगने जे काही मांडलंय ते विरुद्धार्थी आहे. हॉकिंगने कायमच कृष्णविवरं आहेत अशी आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल खगोलभौतिकीबद्दल मांडणी केली आहे. अलिकडच्या काळातही त्याने काही निराळं म्हटलेलं नाही.
हॉकिंगने पावणेदोन वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धांताचा सोप्या भाषेतला अर्थ - "ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग
5 Dec 2015 - 5:57 am | अर्धवटराव
आमच्याकडे एक वैज्ञानीक बुवा आहेत. ते विकीपंडीत असले तरी बरेचदा त्यांची माहिती बरोबर असते. ब्लॅक होल्सबद्द्ल त्यांच्याकडुनच असं काहितरी ऐकलं होतं. इन फॅक्ट, तुमच्याशी मागे एकदा गप्पा मारतानाचाच तो काळ होता.
3 Dec 2015 - 8:09 pm | मारवा
अत्यंत सुंदर लेखमालेचा प्रारंभ.
इथे सध्या या लेखमालेची आत्यंतिक गरज होती.
ती पुर्ण झाली आहे.
राजेशजी लेख इथे प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला अनेकदा धन्यवाद !
सर्वात महत्वाचं म्हणजे यात अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत सुबोध सुंदर मांडणी केलेली आहे. क्लीष्टता अजिबात नाही.
प्रत्येकाने आवर्जुन एकदा तरी वाचावी अशी लेखमाला.
3 Dec 2015 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरूवात ! और आने दो.
3 Dec 2015 - 8:40 pm | गवि
उत्कृष्ट. धन्यवाद..
4 Dec 2015 - 4:32 pm | मितभाषी
हेच बोल्तो.
4 Dec 2015 - 5:16 pm | मूकवाचक
+१
3 Dec 2015 - 8:47 pm | अजया
पुढच्या लेखांची उत्सुकता वाढली आहे सुरूवात वाचून.पुभाप्र
3 Dec 2015 - 8:55 pm | टवाळ कार्टा
पुढ्ले भाग लौकर टाका इथे :)
3 Dec 2015 - 9:04 pm | स्रुजा
अप्रतिम सुरुवात. लेखमालेसाठी शुभेच्छा !
3 Dec 2015 - 9:14 pm | रामदास
मी मराठी वृत्तपत्रात आधीच वाचले आहेत पण पुन्हा एकदा वाचताना आनंद वाटला.
3 Dec 2015 - 9:18 pm | अनुप ढेरे
अप्रतिम!
3 Dec 2015 - 9:47 pm | चतुरंग
या आत्ताचंच बघण्याच्या, आपलं झालं ना मग जाऊदेत...प्रवृत्तीमुळेच प्रदूषण किंवा तशाच इतर जागतिक दूरगामी समस्यांकडे डोळेझाक होते का? असा एक विचार आला....
तसेही उत्क्रांतीदेखील एक दिवस एका वेळी अशीच होत आलीये त्यामुळे छोट्या कालखंडाचं महत्त्व हे थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने निसर्गातच अधोरेखित आहे असे वाटते.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
-रंगा
3 Dec 2015 - 9:56 pm | प्रचेतस
उत्कृष्ट लेख.
पुभाप्र.
ह्या वयापेक्षाही जुन्या असलेल्या काही आकाशगंगांचा शोध लागलाय त्यामुळे विश्वाचे वय अजून मागे जातेय ह्या विषयी कुठेतरी वाचले होते.संदर्भ आता आठवत नाहीये.
3 Dec 2015 - 9:59 pm | कानडाऊ योगेशु
त्याआधी काय होते?
(ह्या प्रश्नाचा विचार करताना मला नेहेमी मळमळायला होते.ह्यात कृपया काहीही उपरोध नाही आहे.)
3 Dec 2015 - 10:41 pm | विवेक ठाकूर
मस्त, पण इतका साधा विचार बहुदा कुणी करत नाही .
3 Dec 2015 - 10:44 pm | राजेश घासकडवी
थोडक्यात सांगायचं झालं तर काळ ज्या क्षणाला सुरू झाला 'त्याच्या आधी' या कल्पनेला अर्थ राहात नाही. असो. या विषयावर फार लिहीत नाही, कारण याची चर्चा पुढच्या एकदोन लेखांतच होणार आहे. तेव्हा बोलूच.
3 Dec 2015 - 11:01 pm | विवेक ठाकूर
याची तुम्हाला बहुदा कल्पना दिसत नाही. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारा तो निव्वळ भास आहे.
त्यामुळे `अस्तित्व केंव्हा अस्तित्वात आलं' या विषयाचा घनघोर पण निरर्थक चर्चा करण्यापलिकडे काहीएक उपयोग नाही.
इन फॅक्ट वरचा एकच प्रश्न : `या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला'......ओके, पण...
त्या आधी काय होते?
संपूर्ण विषयाचा बोजवारा उडवतो!
3 Dec 2015 - 11:08 pm | राजेश घासकडवी
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? स्थिरच राहाणार नाही का? गती ही संकल्पनाच काळावर आधारित आहे. कारण त्यात 'आधी' पृथ्वी अमुक अवस्थेत होती, 'नंतर' ती फिरून तमुक अवस्थेला पोचली हे मान्य केलेलं आहे.
काळ नसेल तर 'त्याआधी काय होतं' हा प्रश्नच निरर्थक होतो. कारण आधी आणि नंतर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही काळाचा वापर करत आहात. तेव्हा एक काय ते ठरवा, काळ आहे की नाही? आणि लवकर ठरवा, फार 'काळ' लावू नका. :)
4 Dec 2015 - 12:49 am | शब्दबम्बाळ
तुमचा वेळ नका वाया घालवू!
इथे त्यांना बर्याच प्रकारे सांगितलाय वेळेच्या अस्तित्वाबद्दल पण त्यांना ऐकून घ्यायचंच नाहीये असे दिसतंय!
4 Dec 2015 - 12:49 am | शब्दबम्बाळ
तुमचा वेळ नका वाया घालवू!
इथे त्यांना बर्याच प्रकारे सांगितलाय वेळेच्या अस्तित्वाबद्दल पण त्यांना ऐकून घ्यायचंच नाहीये असे दिसतंय!
4 Dec 2015 - 10:07 am | विवेक ठाकूर
हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे.
गती ही संकल्पनाच काळावर आधारित आहे. कारण त्यात 'आधी' पृथ्वी अमुक अवस्थेत होती, 'नंतर' ती फिरून तमुक अवस्थेला पोचली हे मान्य केलेलं आहे.
काल ही, प्रक्रिया मापनाची सोय किंवा मानक आहे. पण मुळात काल असं काहीही अस्तित्वात नाही. तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं होणारा भास आहे कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे.
तस्मात, लेखविषयातून काहीही निष्पन्न होणार नाही. तो प्रयास निरर्थक आहे.
4 Dec 2015 - 11:25 am | sagarpdy
बाहुबलीने असा विचार केला असता तर जल्पर्बत चढून गेला असता का ?
4 Dec 2015 - 11:29 am | विवेक ठाकूर
तस्मात, बाहुबलीला पर्वत चढायला काही प्रॉब्लम नाही.
5 Dec 2015 - 1:50 am | अर्धवटराव
विषय संपला.
5 Dec 2015 - 5:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गैरसमज.
५ अब्ज वर्षांपूर्वी आणि ५ अब्ज वर्षांनंतर सूर्य प्रकाशमान नव्हता आणि नसेल. ५ अब्ज वर्षांच्याही काही (लाख, कोटी, अब्ज वर्षं) कोणतातरी तारा मेला तेव्हा जे अणू तयार झाले ते तुमच्या-आमच्या शरीरांत आज आहेत.
(उपहास सुरू) ... पण सॉरी. तुम्ही म्हणता म्हणजे बरोबरच असणार. माझीच चूक झाली असणार. पाठ्यपुस्तकांमध्ये, फ्रेड हॉयल ते जॉर्ज गॅमॉपर्यंत, नारळीकरांपासून स्टीफन हॉकिंगपर्यंत, स्थिरस्थिती विश्वरचना मानणारे आणि महास्फोटाचे प्रवक्ते शास्त्रज्ञ जे म्हणतात ते चूकच असणार. तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने काही म्हणता आहात म्हणजे वैज्ञानिक पाया वगैरे असेलच त्याला, ते जे काही आहे ते स्पष्ट करायची गरजच नाही. (उपहास संपला.)
6 Dec 2015 - 12:51 pm | विवेक ठाकूर
कारण कालमापन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास लागणार्या भ्रमणावर आधारित आहे. त्यासंदर्भात, सूर्य सदैव प्रकाशमान असल्यानं दिवस-रात्र-दिवस असा भास होतो हे विधान आहे.
मूळ प्रक्रियाच भासावर आधारित असल्यानं कालमापन हे भासावर आधारित आहे (तास-मिनीट-सेकंद).
मला वाटतं ही फार उघड आणि सहज लक्षात येणारी गोष्ट आहे.
5 Dec 2015 - 4:09 am | कानडाऊ योगेशु
साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले दहा अंक कोणते तर १ ते १० असेच बाय डिफॉल्ट वाटायचे जरी शून्य ही संख्या माहीती होती तरी.(आताही प्रोग्रॅमिंग करताना इन्डेक्स शुन्यापासुन चालु करायचा का एका पासुन ह्यात बर्याच प्रोग्रॅमिंग भाषेत गोंधळ आहे. ते असो.)
नंतर साधारण चौथी/पाचवी पर्यंत सगळे अंकगणित हे शून्यापासुन चालु व्हायचे तेव्हा धन ऋण असा प्रकार अजुन अभ्यासक्रमात नव्हता म्हणुन माहीतीही नव्हता.
मग माध्यमिक शाळेत शून्याच्या अलिकडचे व पलिकडचे अश्या दोन्ही संख्या असतात हे शिकलो. त्यातही दोन्ही बाजुंकडे इन्फिनिटी असते व नंतर पुढे कॉलेज व तदनंतरच्या शिक्षणात दोन संख्यांमध्येही इन्फिनिटी असते (सिक्वेन्स आणि सिरिज शिकताना) व मग कॉम्प्लेक्स नंबर वगैरे प्रकार समजले. थोडक्यात जिथे काही संपले असे वाटायचे तिथे गणिताच्या बाबतीत तरी त्या ठिकाणी खरोखरच फुल स्टॉप आला असे झाले नाही. ह्या पार्श्वभूमिवर विश्व जेव्हा निर्माण झाले त्याआधी काही नव्हते हे पचायला खरोखरच जड जाते. माझ्या अल्पमतीनुसार विश्वाच्या आधी काहीच अस्तित्वात नव्हते हा वैज्ञानिक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. थोडक्यात ही एक वैज्ञानिक अंधश्रध्दा वाटते.
5 Dec 2015 - 5:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही.
तुम्ही जो तर्क त्यासाठी मांडता तो तर्क म्हणून छाणे, पण विज्ञान म्हणून कामाचा नाही. तर्क म्हणूनच दुसरं उदाहरण देते. एका कपात मी गरम कॉफी ओतली. घुटका घुटका करत पिताना ती थोडी थोडी थंड व्हायला लागली. मगाचच्या घोटाला होती त्यापेक्षा ती जास्त थंड व्हायला लागली. पण आजूबाजूच्या हवेएवढी कॉफी थंड झाल्यानंतर कॉफी आणखी थंड झालीच नाही. त्यापेक्षा बरीच जास्त थंड असणारी पेयं मी पिते, पण ही कॉफी त्यापेक्षा थंड होऊ शकत नाही. तर्क काय (संस्कृत सुभाषितांसारखा) दोन्ही बाजूंनी लावता येतो. म्हणून ते विज्ञान ठरत नाही.
काळ उणे असणारच, हे म्हणणं 'शोले'तला गब्बर सिंग आणि बोट तुटका शाहिस्तेखान यांच्या समलिंगी अफेयरचं गॉसिप पसरवण्यासारखं आहे.
5 Dec 2015 - 12:03 pm | कानडाऊ योगेशु
कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही एक गृहितक आहे पिणारा एका जागी स्थिर आहे अथवा त्याचा भवताल स्थिर आहे. आता कल्पना करा कि अवकाशयानात बसुन कॉफि पीत पीत मी सूर्यापासुन दूर जात आहे त्यावेळी कॉफि ही नेहेमीच आधीच्या अवस्थेपेक्षा जास्त थंड वाटेल. ते असो. पण मुळात इथेही हा कन्सेप्ट समजावुन सांगायला मला अनदर फ्रेम ऑफ रेफरन्सची गरज पडली (म्हणजे कॉफी व भवताल.) म्हणजे कॉफि कशापेक्षातरी थंड अथवा तितक्या तापमानाची आहे वगैरे. ह्या तर्कानुसार विश्व होते म्हणजे कशाच्या तरी अगोदर होते अथवा नव्हते म्हणजे दुसरे काहीतरी होते पण विश्व नव्हते असे त्रांगडे होऊन बसते.
इथे थोडी गफलत होतेय.
लहानपणी इसवी सन ही कालमोजमापनाची व्यवस्था प्रथम माहीती झाली तेव्हा असे वाटायचे इ.स. ० पूर्वी काही नव्हतेच का काय. मग नंतर समजले जे आपण सध्या लिहितो २०१५ ते खरेतर इ.स.० नंतर २०१५ असे आहे. (इ.स. पूर्व अमुक अमुक असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा मनात उगीचच ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमा उमटतात.). म्हणजे इ.स व्य्वस्था अस्तित्वात आली त्यापूर्वी काळ हा प्रकार नव्हताच का काय?
मग हेच लॉजिक सो कॉल्ड विश्वनिर्मीतीच्या झिरो स्टेटला का लावता येऊ नये.?
5 Dec 2015 - 12:33 pm | विवेक ठाकूर
माझ्या अल्पमतीनुसार विश्वाच्या आधी काहीच अस्तित्वात नव्हते हा वैज्ञानिक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. थोडक्यात ही एक वैज्ञानिक अंधश्रध्दा वाटते.
फँटॅस्टिक ! आणि हाच खरा मुद्दायं.
अगदि साधी गोष्ट आहे कोणत्याही निर्मिती पूर्वी ज्यात निर्मिती होऊ शकेल असं अवकाश हवं . त्या आवकाशाला तुम्ही स्पेस म्हणा, शांतता म्हणा नाही तर बुद्ध म्हणतो ते शून्य म्हणा किंवा वॉइड म्हणा.
उदा. ध्वनी निर्माण होण्यासाठी शांतता हवी, नाहीतर ध्वनी निर्मिती असंभव आहे, मग तो सूक्ष्मातला सूक्ष्म ध्वनी असो की बीग बँग असो. पण लेखकाला तेच मान्य नाही !
त्यामुळे विश्वनिर्मितीपूर्वी काही नव्हते म्हणणे म्हणजे `मूल जन्मण्यापूर्वी काहीच नव्हते (किंवा आईच नव्हती) म्हणण्यासारखं ' आहे.
तस्मात ही लेखमाला, तुम्ही यथार्थ शब्दात म्हटल्याप्रमाणे `वैज्ञानिक अंधश्रद्धेवर' उभी आहे. आणि तो एका कपोलकल्पित घटनेचा, काल या मानवी संकल्पनेनं घेतलेला निरर्थक वेध आहे .
5 Dec 2015 - 5:03 pm | बिपिन कार्यकर्ते
निर्माण होण्यासाठी की ऐकू येण्यासाठी?
5 Dec 2015 - 5:08 pm | संदीप डांगे
ध्वनि निर्माण होण्यासाठी माध्यम हवे. ऐकू येण्यासाठी कान पुरेसे आहेत. ;-)
5 Dec 2015 - 5:09 pm | तुषार काळभोर
आँ??
हौ डेअर यु क्वेश्चन हिम?
6 Dec 2015 - 5:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीच कॉफी समजा बाहेरून ऊर्जा वापरून थंड करत नेली तर -२७३ अं. से (उणे २७३ अं. से) = ० अं. केल्व्हीन या तापमानाखाली थंड होऊ शकणार नाही. तापमान म्हणजे अणू-रेणूंची गती. या तापमानाला अणूरेणूंची हालचाल थांबते. ही हालचाल थांबल्यानंतर आणखी थंड होणं शक्य नाही. ही मानवी मेंदूची किंवा तंत्रज्ञानाची मर्यादा नसून नैसर्गिक मर्यादा आहे.
साधारण असंच काहीसं काळाच्या बाबतीत खरं आहे. विश्वाचं प्रसरण सुरू झालं तेव्हाच काळ आणि अवकाश या मिती अस्तित्वात आल्या, जन्मल्या; अवकाश आणि काळ यांच्यापैकी त्याआधी काहीही नव्हतं हे न समजणं ही मेंदूची मर्यादा आहे, विज्ञानाची नाही.
तरीही वैज्ञानिक अंधश्रद्धा वगैरे लेबलं लावायला हरकत नाही, पण सात-आठ नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांना आणि या विषयावर संशोधन करणाऱ्या हजारो इतर शास्त्रज्ञांना (या कारणास्तव) अंधश्रद्ध म्हणण्यासाठी तर्कापेक्षा अधिक काही भरीव, ठोस कारण दिलं तर बोलण्याकडे लक्ष देता येईल. एरवी काय प्रथेनुसारच ... चालू द्या.
6 Dec 2015 - 10:27 am | अर्धवटराव
हेच कॉफीचं उदाहरण थोडं पुढे वाढवलं तर ??
जेंव्हा द्रव्याच्या अणुरेणुंची हालचाल थांबते तेंव्हा त्याला आणखी थंड करता येत नाहि. पण त्याचवेळी
१) अणु रेणूंची तशी हालचाल करायची क्षमता, शक्यतेचा लय होत नाहि. हालचाल करण्याची अणुरेंणुंची प्रॉपर्टी सदा अबाधीत असते, इर्र्स्पेक्टीव्ह ऑफ तापमान ??
२) द्रव्य त्याच्या मिनीमम फ्रीझींग पॉइंटला आलं, त्याचे अणु इतके आक्रसले कि सगळे अणु एकाच बिंदुमधे सामावले. असं झालं, आणि तरी त्या द्रव्याने आपले परिवर्तनाचे गुणधर्म सोडले नाहि (कारण त्याचाच पुढे स्फोट होऊन प्रसरण झालं?). म्हणजे ते द्रव्य कधि "शुण्य" झालच नाहि ? याचाच अर्थ "काहिच नाहि" मधुन बिग बँग झालच नाहि ? आणि जर ते कधि शुण्य झालं असेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे कि द्रव्याने आक्रसत जाऊन शुण्य होणे या पलिकडे आपण त्याची अवस्था ट्रॅक करु शकत नाहि ?
जर इथे हि चर्चा अप्रस्तुत वाटत असेल ( मुख्य म्हणजे तशी चर्चा काहि उपयोगाची वाटत असेल :) ) तर ख.व. मधे देखील वार्तालाप करता येईल.
7 Dec 2015 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या प्रतिसादाचाच वेगळा धागा काढा. गुर्जी मारायच्या आत रोचक अवांतर इतरत्र नेऊ.
5 Dec 2015 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही.
हे म्हणणे म्हणजे मला आता माहीत आहे तेच आस्तित्वात आहे/होते... इतर काहीच नाही असे म्हणण्यासारखे आणि म्हणूनच "अशास्त्रिय" दावा आहे.
आजच्या घडीला बिग बँग हा "सिद्धांत" मानवाच्या भूतकाळासंबंध्दीच्या आकलनाची सीमा आहे. म्हणूनच केवळ तो कालमापनासाठी एक अर्बिट्ररी झिरो पॉईंट आहे.
"बिग बँग अगोदर काहीच नव्हते" हे शास्त्रज्ञांनी म्हणणे आणि "देवाने विश्व निर्माण केले त्याअगोदर काहीच नव्हते" हे आस्तिकांनी म्हणणे एकाच पठडीतले दावे आहेत, नाही का ? :)
असं बघा...
१. जर "देवाने विश्व निर्माण केले" हे खरे मानले तर त्याच विधानाने विश्वाआधी देव होता हेच सिद्ध होते... म्हणजे आस्तिकांचा "त्याअगोदर काहीच नव्हते" हा दावा फोल ठरतो. शिवाय, "मग देवाआधी काय होते ?" हा प्रश्नही निर्माण होतो :)
त्याच न्यायाने...
२. "वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?
अजून एक महत्वाचे...
शास्त्रिय सत्य हे आहे की "आपल्याला बिग बँग (झाला असलाच तर) त्यागोदर काय होते हे आज माहीत नाही". आजच्या घडीला केवळ बिग बँग पर्यंतच मानवाच्या भूतकालाच्या शास्त्रिय आकलनाची परिसीमा आहे व म्हणूनच केवळ तो सद्याचा "अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर मेझरमेंट ऑफ टाईम आहे". पिरियड. भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ?
5 Dec 2015 - 3:32 pm | राजेश घासकडवी
- बिगबॅंगमध्ये काळाचीच सुरूवात झाली. त्यामुळे 'त्याआधी' हा शब्दप्रयोगच चुकीचा ठरतो. तो आर्बिट्ररी पॉइंट नाही, अॅब्सोल्यूट पॉइंट आहे.
हा आजचा शास्त्राधार आहे असं कोणी सांगितलं? मॅटर आणि अॅंटिमॅटर यांच्या जोड्या आपोआप तयार होऊ शकतात. स्टीफन हॉकिंगने त्याच्या पुस्तकात मांडलेलं मिशिओ काकुने सोप्या शब्दांत समजावून सांगितलेलं आहे.
But how can an entire universe come out of nothing? This apparently violates the conservation of matter and energy. But there is a simple answer.
Matter, of course, has positive energy. But gravity has negative energy. (For example, you have to add energy to the earth in order to tear it away from the sun. One separated far from the solar system, the earth then has zero gravitational energy. But this means that the original solar system had negative energy.)
If you do the math, you find out that the sum total of matter in the universe can cancel against the sum total of negative gravitational energy, yielding a universe with zero (or close to zero) net matter/energy. So, in some sense, universes are for free. It does not take net matter and energy to create entire universes.
5 Dec 2015 - 3:57 pm | sagarpdy
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते, म्हणजेच ते नथिंगनेसमधून निर्माण झाले नव्हते.बिगबँग च्या अगोदर काय होते याविषयी देखील काही थेअरी आहेतच, परंतु त्या सर्वमान्यही नाहीत व त्यांना काही प्रायोगीक आधारही नाही. लिंका मिळाल्या तर नंतर टंकतो.
5 Dec 2015 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते
हा त्या थियरीचा फार महत्वाचा गाभा आहे आणि तोच विवादास्पद आहे !!!
डोळे मिटून मान्य करायचे नसेल व शास्त्रिय कारणे हवी असली तर नमुन्यादाखल खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जरूर आहेत :
१. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ???
२. त्या "आकारमान नसलेल्या" बिंदूत इतके सगळे "वस्तूमान + उर्जा" कसे सामावले असेल याचे काही सर्वमान्य शास्त्रिय कारण आहे का? आजपर्यंत तरी नाही.
३. मुळात, तो बिंदू तयार कसा झाला ?
४. तो बिंदू तयार होण्याअगोदर काय होते ?
आता अजून एक खास महत्वाचे...
५. जर तो बिंदू होता, तर त्याच्या स्फोटाने प्रसरण पावणारे विश्व गोलाकार (स्फेरिकल... बिंदूपासून/मध्यापासून सर्व दशदिशांना समान) प्रसरण पावायला हवे होते... विश्व तसे नाही! याचे विवरण करायला मग दोन पापुद्रे (मेंब्रेन्स) एकमेकावर आदळून त्यांच्या स्फोटाने विश्व प्रसरण पावू लागले असा सिद्धांत व इतर स्पेस-टाईमचे सिद्धांतही पुढे आला. मग त्या पापुद्र्यांचा आणि आकारमान नसलेल्या एकुलत्या एका बिंदूचा संबंध कसा जोडणार ??? महत्वाचे म्हणजे, बिंदू आणि पापुद्रे हे दोन्हीही केवळ "थियरेटिकल फिजिक्स"च्या सद्या मान्य असलेल्या आवाक्यातले व सद्याच्या गणिती समीकरणांच्या आवाक्यातले, कमी-जास्त मान्यताप्राप्त "सिद्धांत" आहेत. पिरियड.
६. अजून या लेखमालेत, "दिसणारी आणि मोजता येणारे वस्तूमान + उर्जा" यांचाच उहापोह आहे... "डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा.
इ इ इ
5 Dec 2015 - 9:28 pm | राजेश घासकडवी
या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी कुवत नाही. या दुव्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत.
5 Dec 2015 - 9:28 pm | राजेश घासकडवी
या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी कुवत नाही. या दुव्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत.
5 Dec 2015 - 9:38 pm | संदीप डांगे
लिंकसाठी अनेक धन्यवाद!
6 Dec 2015 - 6:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विश्वाच्या सुरुवातीच्या १०-४७सेकंदात काय, कसं घडलं याबद्दल अजूनही भौतिकशास्त्राला काहीही समजत नाही. अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.
लेखमालेत काय-काय लिहायचं हा निर्णय लेखकाचा आहे.
पण डार्क मॅटर - कृष्णपदार्थ हा प्रकार ट्रायकॉर्डर आणि इनर्शियल डँपर-छाप अनाकलनीय वगैरे नाही. याबद्दल बऱ्यापैकी सिद्धांत समोर आलेले आहेत. कृष्णपदार्थ साधारण किती असेल याचा अंदाज निरनिराळ्या खगोलभौतिकी घटना वापरून केले गेले आहेत. आणि त्यांच्यात बऱ्यापैकी एकवाक्यता आहे. अजूनही पुरेसं निदान झालेलं नाही ते डार्क एनर्जी, म्हणजेच वैश्विक स्थिरांकाचं.
महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत. पण ती काळ म्हणजे काय, विश्वाची सुरुवात कशी झाली यात नाहीत. जी भोकं आहेत ती रीआयनायझेशन कधी झालं, दीर्घिकांचं चुंबकीय क्षेत्र आणि मधल्या रिकाम्या भागातलं चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारचे आहेत. ते फार किचकट तपशील आहेत; मलातरी भौतिकशास्त्रातल्या जड संकल्पनांशिवाय, सोप्या भाषेत ते समजावता येणार नाहीत. (होय, स्वतःच्या शिक्षणाची ही क्षीण जाहिरात आहे.)
6 Dec 2015 - 2:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.
महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत.
उत्तम ! हे आणि या प्रतिसादातले इतर काही मुद्देच तर बहुतेक प्रतिवादी केव्हापासून मांडत आहेत आणि लेखक त्यांचा प्रतिवाद करत होता !
पण दुसर्या एका प्रतिसादात बिग बँग व इतर दावे "अल्टीमेट" / "अॅबसॉल्युट पॉईंट" वगैरे नाहीत आणि पुढच्या संशोधनाने त्यांच्यात बदल होऊ शकतो हे मानले आहे... लेखात तसा उल्लेख असता किंवा हे अगोदर मानले असते तर मिपाची बरीच बँड्विड्थ वाचली असती. इतकेच.
बाय द वे "डार्क मॅटर/एनर्जी" सुद्धा "सच्छिद्र" "थियरी"च आहे. पण त्याबद्दल इथे नको. पुढे काही संबंध आला व गरज पडली तर चर्चा होईलच. :)
6 Dec 2015 - 8:14 pm | राजेश घासकडवी
थियरी ही एका स्वेटरसारखी असते. पुरेशा पुराव्यांच्या लोकरीने ती विणली जाते. आता तयार झालेला स्वेटर अंगावर व्यवस्थित बसतोय, पण त्याच्यात दोनचार भोकं आहेत. हे मान्यच असतं. माझा मुद्दा असा आहे की 'ही थियरी बदलू शकेल' यातून 'हे सर्व साफ चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकेल' असा अर्थ प्रतीत होतो. स्वेटरच नाही, नुसतेच लोकरीचे विणलेले पॅचेस आणि व्यवस्थित बसणारा पण दोनचार भोकं असलेला स्वेटर यामध्ये फरक करणं महत्त्वाचं ठरतं.
हे लेखन वृत्तपत्रासाठी केल्यामुळे शब्दमर्यादा आलेली आहे. त्यामुळे गोष्टी थोडक्यात सांगाव्या लागतात. एखाद्या विशिष्ट शब्दप्रयोगाबद्दल चर्चा करण्यापेक्षा लेखमालेत येणारा संदेश समजावून घ्यावा ही विनंती. या लेखाचा संदेश असा आहे की 'आपल्या छोट्याशा कणापलिकडे हे जगड्व्याळ विश्व पसरलेलं आहे. ते आपण डोळे भरून पाहून घेऊ.' प्रास्ताविक, पहिला लेख आहे. संपूर्ण लेखमाला वाचून तिच्यात येणाऱ्या संदेशांबद्दल चर्चा व्हावी अशी माझी आशा आहे.
6 Dec 2015 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
जास्त हेअर स्प्लिटिंग न करता इतकेच म्हणतो की, "शास्त्रिय लेखात किमान नेमकेपणा (अक्युरसी) असावा आणि वाचकांचा... विषेशतः अनभिज्ञ (लेमॅन) वाचकांचा... गैरसमज होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे." इतकेच.
कारण "एखादे शास्त्रिय मत आहे" असा झालेला गैरसमज दूर करणे कठीण असते... त्याहूनही जास्त महत्वाचे म्हणजे ते गैरसमज सर्वसामान्य जीवनासंबंधी असले तर ते धोकादायक ठरू शकतात (जसे या लेखमालेच्या पुढच्या लेखात झाले आहे).
तुमचे लेख आवडतात, म्हणुनच वाचतो. मग एखादी गोष्ट फारच खटकली तर सांगितल्याशिवाय राहवत नाही.
6 Dec 2015 - 10:30 am | अर्धवटराव
१. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ???
-- बिंदु होता. फक्त "अगोदर" किंवा "नंतर" का कन्सेप्ट नव्हता.
6 Dec 2015 - 5:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही. महास्फोटाचा सिद्धांत बदलावा लागेल. विश्वाचं वय १३.७ अब्ज वर्षं आहे असं म्हणता येणार नाही.
3 Dec 2015 - 11:20 pm | नीलमोहर
याच्या बरोबर उलट विचाराने माझं डोकं बधीर होतं,
जेव्हा हे जग नष्ट होईल तेव्हा काय असेल.. ?
4 Dec 2015 - 6:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जे काही असायचं ते असेल, पण आपण नसू! ;-)
बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लेखमालेत असतील म्हणून टंकाळा करत आहे.
4 Dec 2015 - 11:20 pm | कानडाऊ योगेशु
बाब्बो.. आता ह्या विचाराने पुन्हा एकदा मळमळायला झाले !
4 Dec 2015 - 11:28 am | sagarpdy
या विषयी एकदोन थिअरि वाचल्या होत्या. पुढील भागांमध्ये याची चर्चा येईल असे वाटते.
पु भा प्र
4 Dec 2015 - 12:13 am | pacificready
विश्वाचा जन्म चौदा अब्ज वर्षापूर्वी झाला.
मान्य.
तो कसा झाला? का झाला? 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. नीट समजवा महाराज. अलंकारीक रूपकात्मक भाषा आवडली.
5 Dec 2015 - 1:54 am | अर्धवटराव
'काहि नाहि' असं कधिच नसतं. फार तर असं म्ह्णता येईल कि 'काहितरी आहे' यातल्या आपल्याला समजण्याजोग्या आवाक्याबाहेरचं जे आहे ते म्हणजे 'काहि नाहि' :)
5 Dec 2015 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
'काहि नाहि' असं कधिच नसतं.
+१
मुळ मुद्दा असा आहे की...
आज आवाक्याबाहेर आहे ते उद्या आवाक्यात येऊ शकतं... त्यामुळे किंवा अन्यथाही, आवाक्याबाहेरच्या गोष्टींसंबंधात "काही नाही" ऐवजी "(आज) माहीत नाही" असं म्हटलं तरच ते सत्य व शास्त्रिय वचन होईल.
5 Dec 2015 - 9:54 pm | pacificready
मला माहिती आहे ते.
कधीतरी नावाला जागावे ही विनंती!
4 Dec 2015 - 10:29 am | प्रसाद१९७१
गुर्जी - तुमचा लेख ललित प्रकारात मोडतोय. काहीतरी रीयल माहिती लिहा.
4 Dec 2015 - 10:31 am | सस्नेह
साध्या सोप्या उपमा, रसाळ भाषा आणि रंजक लेख.
आधी वाचला तेव्हाही आवडला होता.
4 Dec 2015 - 11:55 am | राही
विश्वनिर्मितीच्या क्लिष्ट संकल्पनांना विदा आणि दुव्यांच्या जंजाळातून बाहेर काढून अलगद समोर पेश केले आहे.
आमच्यासारख्या 'ले-पर्सन्स'ना नक्कीच आवडेल आणि आम आदमीला समजेल इतक्या सोप्या तर्हेने केलेली मांडणी पाहून कदाचित तज्ज्ञसुद्धा मान डोलावतील.
4 Dec 2015 - 12:06 pm | बबन ताम्बे
समजा भविष्यात (जवळपास) प्रकाशाच्या वेगाने जाणारी याने प्रुथ्वीवरच्या माणसाने बनवली, तरी सुद्धा दुस-या आकाशगंगेतील ग्रहावर जाणे शक्य होईल का? कारण विश्व तर सतत प्रसरण पावते आहे आणि त्याचा वेग प्रचंड (आपल्या स्केलने) आहे. म्हणजे दोन आकाशगंगांमधील अंतर ही प्रचंड वाढतेय. मग समजा एखाद्या आकाशगंगेतील ग्रहावर जीवसॄष्टी असली, तरी पॄथ्वीवरील माणसाला जाणे शक्य होईल का?
4 Dec 2015 - 12:12 pm | संदीप डांगे
जायचेच कशाला पण तिथे...? इथे घातलेत तेवढे गोंधळ पुरेसे नाहीत का?
असो. जोक्स अपार्ट. अशी याने बनवणे शक्य नाही. किंवा याने बनवण्याची गरज भासणार नाही. ट्रांसमिशन करता येईल.