सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
नदीसोबत सायकल सफर
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शतक केल्यानंतर थोडे दिवस गॅप पडली. त्या दिवसांमध्ये पुण्यामध्येच जास्त वास्तव्य होतं. म्हणून २० सप्टेंबर २०१३ ला सायकल पुण्यात मागवून घेतली. हा सायकलचा पहिला बस प्रवास! काहीही न होता सायकल पोहचली. पुण्यातल्या संगमवाडीपासून धायरी- डिएसके इथे असलेल्या फ्लॅटपर्यंत १७ किलोमीटर चालवत नेली. शहराच्या ट्रॅफिकमध्ये चालवता येण्याविषयी शंका होती, पण काही अडचण आली नाही. फक्त एक झालं की, सकाळी ११ वाजताच्या उन्हामध्ये डिहायड्रेशन झालं. चालवताना एकदा थांबलो तर खूप थकवा जाणवला. थोडा वेळ थांबावं लागलं. चक्कर येईल इतकं थकल्यासारखं वाटलं. पण योग्य वेळी थांबलो आणि पाणी घेतलं. त्यामुळे बरं वाटलं. आधी एकदा चौथ्या मजल्यावर बरंच सामान नेलं होतं, तेव्हाही असा अनुभव आला होता. कदाचित शरीरात खर्च होणारी ऊर्जा एकदम वाढल्यामुळे व पाणी कमी असल्यामुळे असं झालं असेल.
त्यावेळी पुण्यात राहात होतो ते डिएसके विश्व एका छोट्या टेकडीवर आहे. सायकल आणताना पहिल्यांदा तो चढ चढलो. टेकडी आहे छोटीच. एक किलोमीटरचा चढ आहे आणि एक छोटा ग्रेड ५ चा घाट आहे. पण तोसुद्धा चढता आला नाही. चढ सुरू झाल्यावर लगेचच पायी जाण्याची वेळ आली. इतकंच नाही, तर पायी जातानाही थांबावं लागलं! आता पुणे परिसरातल्या चढाच्या रस्त्यांवर मजा येणार हेही कळालं!
सतरा किलोमीटर चालवल्यानंतर दुस-या दिवशी २१ सप्टेंबरला खडकवासला डॅमकडे गेलो. एन.डी.ए. जवळचं हे डॅम! ही राईड मस्त झाली. चौदा किलोमीटर सायकल चालवली. एकूण दीड तास लागला. पण नजारा सुंदर होता. परत घरी येताना डिएसकेचा चढ पायी पायीच चढावा लागला. आणि त्यातच इतकं थकलो, की दुपारी किंवा संध्याकाळी खाली चक्कर मारायची इच्छाही होत नव्हती.
दुस-या दिवशी २२ सप्टेंबरला मोठी राईड करायचं ठरवलं. डिएसकेपासून २६ किलोमीटर असलेल्या वाकडकडे. हा प्रवास एनएच ४ वरून केला. छोटे चढ आणि अगदी छोटा घाटही लागला. पण पायी चालायची वेळ न येता हा प्रवास झाला. जाऊन- येऊन एकूण ५२ किलोमीटर झाले. जवळपास चार तास लागले. पण आत्मविश्वास वाढला. सलग तिस-या दिवशी सायकल चालवल्यामुळे शरीराला थोडी सवयही झाली. आणि चढाच्या रस्त्यांवरही इतकी सायकल चालवता येते, ह्याचा आनंद झाला. पण थकवाही आल्यामुळे लगेच मोठी राईड करण्याची इच्छा मंदावली. हा अनुभव नेहमीच येत राहिला. एक मोठी राईड केली की पुढच्या राईडची इच्छा निघून जायची. पण परत एक- दोन दिवसांमध्ये मनात इच्छा यायची. २३ सप्टेंबरला जवळच छोटी राईड केली. जवळ असलेल्या न-हे रिजरवॉईर जवळ. तिथेही मजा आली. सलग चार दिवस सायकल चालवणं झालं. त्याचा फायदा झाला. आता डिएसकेचा चढ अर्धा सायकलवर चढू शकतो. पण नंतर पायी जावं लागतंय अजून.
एक दिवस आराम केला आणि परत मोठ्या राईडची योजना बनवली. स्वत:चा प्रायव्हेट व्यवसाय असल्यामुळे हे शक्य झालं. २५ सप्टेंबरच्या सकाळी निघालो. आज पानशेत डॅमकडे जायचं आहे. त्याशिवाय एका टेकडीवरचं मंदीरही बघायचं आहे. आणि हा सगळा चढ- उतारांचा रस्ता आहे. सकाळी खडकवासलाजवळ मस्त धुकं आहे. इथे मिलिटरीचा सुंदर कँपस! रमणीय आणि प्रगाढ शांततेचा परिसर! इथून पुढचा प्रवास आणखी सुंदर होतोय.
रस्ता मुठा नदीसोबतच पुढे जातोय. जवळच सिंहगड दिसतोय. सिंहगड! एक उत्कृष्ट घाट! तिथे जाण्याची इच्छा आहेच; पण त्यासाठी आधी 'पात्र' व्हावं लागेल! सायकल घेण्यामागचं एक कारण लदाख़मध्ये सायकलिंग करणं, हेही आहे आणि पुण्यातून लदाख़ला सायकलवर जाणारे लोक सिंहगडावरच प्रॅक्टिस करतात. आणि म्हणतात की, सिंहगडाचा क्लाइंब दीड तासामध्ये चढता येणे हे लदाख़मध्ये सायकलिंग करण्यासाठीचं 'क्वालिफिकेशन' आहे! पण सिंहगड लांब राहिला, मला डिएसकेची त्याहून सहा पट लहान असलेली टेकडीच चढता येत नाहीय. त्यासाठी पहिले मला माझी 'हैसियत' वाढवावी लागेल. . . .
ढगांमध्ये सिंहगड. .
एक गाव पार केल्यानंतर थोडा मोठा चढ आला. त्याने बराच त्रास दिला. कसंबसं सगळ्यात खालच्या गेअरवर तो पार केला. योगोदा आश्रम लागला. वेग कमी आहे, पण चालवताना काही अडचण नाही आहे. चढावर वेळ जास्त लागतोय. पानशेत डॅमला पोहचेपर्यंत जवळपास तीन तास लागले. अंतर जेमतेम ३२ किलोमीटर आहे. थकवा आहे, पण अजून पुढे जायची इच्छा आहे. म्हणून पुढे दुस-या रस्त्याकडे निघालो. आता दुस-या रस्त्याने परत येईन. ह्या रस्त्यावर बीएसएफचं एक युनिट लागलं.
ह्या रस्त्यावर एका टेकडीवर नीळकंठेश्वर महादेव मंदीर आहे. एका ब्लॉगवर त्याविषयी वाचलं आहे. हा रस्ताही मस्त आणि एकदम शांत आहे. हे रस्ते मोठ्या मार्गाला जोडलेले नसल्यामुळे शांत आहेत. हे मंदीर थोडं उंचावर आहे. चढ मोठाच आहे, म्हणून सायकल खाली गावात ठेवून पायी पायी निघालो. हा तीन किलोमीटरचा चढही मोठाच वाटला. इथे जीप व बाईक येतात. पण रस्ता कच्चाच आहे. आणि पार्किंगच्याही वर पायवाट जाते. जसं मंदीर जवळ येत गेलं, तसा नजारा आणखीन रमणीय होत गेला. आता पानशेत डॅम वरून वेगळा दिसतोय! मंदीरात पोहचताना उतरताना ह्याच वाटेवरून यायचं आहे, हे वाटून थोडी भिती वाटत होती. कारण वाट अगदी कच्ची आहे. आणि त्यावर पाय घसरण्याची भिती वाटली.
मंदीरात कोणीच दिसत नाहीय. पण ह्या मंदिरात अनेक पुतळे आहेत. मंदीरात फिरताना अचानक आवाज ऐकू आला. दचकून बघितलं तेव्हा कळालं की, आतमध्ये खूप लोकसुद्धा आहेत! मग थोडं बरं वाटलं. उतरताना कोणाच्या तरी सोबत उतरेन. दुपारचा एक वाजतोय. त्यामुळे जास्त वेळ न थांबता निघालो. दोन जण उतरताना सोबत मिळाले. पाय न घसरता उतरलो. मला अशा कच्च्या रस्त्यांवर ट्रेकिंग करण्याचा जवळजवळ शून्य अनुभव आहे. उतरताना एक मेलेला साप दिसला. आता लवकरात लवकर निघायचं आहे. अजून खूप अंतर बाकी आहे.
अपेक्षेप्रमाणे पुढचा प्रवास अवघड होत गेला. मध्ये रस्ताही विचारावा लागला. आता हा रस्ता खडकवासला धरणाच्या दुस-या बाजूकडे जातो आहे. म्हणजे एका अर्थाने ह्या धरणाची परिक्रमा पूर्ण होईल! मध्ये मध्ये थांबावं लागत आहेच. पण फार जास्त त्रास झाला नाही आणि संध्याकाळच्या आधीच डिएसके विश्वमध्ये पोहचलो. सहा किलोमीटर पायी पायी आणि ६६ किलोमीटर सायकलिंग झालं आणि अजून एक अर्धशतक पूर्ण झालं. पण ह्या वेळी अर्धशतकाची जाणीव नाहीय. त्याउलट थकवाच जाणवतोय. रूट इथे बघता येईल. शेवटच्या टप्प्यात तर एक डेस्परेशन येतं की, कधी एकदा घरी पोहचतो. आणि इतकी शारीरिक व मानसिक ऊर्जा खर्च होते की, पुढच्या राईडचा विचारही मनात येत नाही. असो. योगायोगाने आणखी चार दिवसांनंतरच परत एकदा पानशेतची राईड झाली. ह्यावेळी दोन मित्रांसोबत पहिल्यांदाच ग्रूप राईड केली. त्यातही वेगळी मजा आली. आता भरपूर आत्मविश्वास येतोय.
पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
19 Nov 2015 - 12:13 pm | एस
वा! तुमची सायकलतर आमच्या पुण्यात आली की!
मस्त फोटो आणि सफर!
19 Nov 2015 - 12:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त प्रवास आणि वर्णन
19 Nov 2015 - 12:36 pm | यशोधरा
सुरेख.
19 Nov 2015 - 12:47 pm | मोदक
अरे व्वा.. अभिनंदन. :)
19 Nov 2015 - 4:56 pm | मित्रहो
सु्ंदर वर्णन
19 Nov 2015 - 5:23 pm | नितीन पाठक
झक्कास .................
आनंद वाटला ....... मस्त
19 Nov 2015 - 5:36 pm | शिव कन्या
सुंदरच!
19 Nov 2015 - 6:37 pm | आदूबाळ
आप तो हमारे अंगना में आ गए! फोटो लय भारी आले आहेत.
20 Nov 2015 - 10:09 am | प्रचेतस
अप्रतिम.
20 Nov 2015 - 4:11 pm | _मनश्री_
छानच
खूप आवडला हा भाग
21 Nov 2015 - 8:40 am | मार्गी
सर्वांना धन्यवाद! :)
23 Nov 2015 - 2:36 pm | बोका-ए-आझम
आताच दिवाळीत खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तिन्ही धरणांच्या जवळपास फिरून आलो. हा सगळा नजारा पाऊस फारसा न पडल्यामुळे थोडा उतरला आहे पण तरी इथलं निसर्गसौंदर्य अप्रतिमच आहे. तुम्ही ते फोटोंमध्ये छान पकडले आहे.
23 Nov 2015 - 2:49 pm | पैसा
फोटोही अप्रतिम आलेत! सायकल इतकी चालवण्यासाठी मात्र साष्टांग नमस्कार!!