संवेदना!!
===================================
शुष्क.. निबर काळी..
बोथट खपली.. बघितली आहेस कधी?
ती ज्वालामुखी नंतरच्या मुरमाड जमिनी सारखीच दिसते..
राठ! जखमेचा रसरसता लाल रंग लपवणारी..
जागच्या जागी गोठलेली..
तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त!
त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..!
कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी..
ही तर फक्त खपलेली... कातडी.. !
गळून जाणारी.
गळेलच..!!!
मग पुन्हा हसेल.. संवेदना!!
मिरवेल वीरश्री!!!..
===================================
स्वाती फडणीस..... ०३-१२-२००८
प्रतिक्रिया
19 Dec 2008 - 12:33 am | मीनल
कविता आवडली.
पॉझिटिव्ह विचार करायला लावणारी आहे.
माझी अजून काही मते --
`निःसत्व `यापेक्षा `निष्प्राण` हा शब्द कसा वाटेल?
भळभळती वेदना म्हणजे प्राण आहे
दगड -निर्जिव.प्राण रहित.म्हणून `निष्प्राण`.
कसं वाटतं?
ते दगड `वाईट` का ते कळले नाही.
मला अस वाटत की --
उद्रेक होईन लाव्हा बाहेर पडतो. मग शांत होऊन कातळासारखा ( काळ्या दगडासारखा) होतो.त्यातून ही काही काळाने पालवी येते.
मग वाईट कसा?
मीनल.
19 Dec 2008 - 12:43 am | स्वाती फडणीस
त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..!
इथे मी खपली बद्दल बोलती आहे..
खपली = बोथट संवेदना / बधीरपणा..
नि:सत्व = मुरमाड जमिन ज्यात काही उगवत नाही.. ( बंजर)
बोथटपणा हा काहीसा तसाच..!
म्हणून वाईट.
19 Dec 2008 - 12:58 am | मीनल
हं
आता समजल तूला काय म्हणायच आहे
आभार.
मीनल.
19 Dec 2008 - 12:39 am | प्राजु
कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी..
ही तर फक्त खपलेली... कातडी.. !
गळून जाणारी.
गळेलच..!!!
हे तर खासच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Dec 2008 - 10:11 am | राघव
सुंदर! :)
मुमुक्षु
19 Dec 2008 - 10:43 am | स्वाती फडणीस
मनापासून आभार!
:)
19 Dec 2008 - 12:40 pm | स्वाती फडणीस
विचारणा!!
===========================
लाल भडक तवंगवाली;
तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी?
ती ज्वालामुखी चुटूक लाव्हारसा सारखीच दिसते..
लाल! झणझणीत रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी..
जिभेचे चोचले पुरवणारी..
इच्छाच खवळते मग.. पोटातल्या भुकेपेक्षा जास्त!
त्या घमघमत्या वासापुढे.. ही अळणी उसळच वाईट..!
पोट जडावत आणि मनही भरत नाही..
गर्रेदार पोटांच्या धेंडानाही सुचतेच ना खादाडी..!
ही तर गरीबाची करी..!!!
भुक भागवणारी..!!!
मिळेलच..!
मग पुन्हा होइल.. विचारणा!!
एक प्लेट ओर लाना.
===========================
१९-१२-२००८
19 Dec 2008 - 5:16 pm | विसुनाना
मूळ कविता आणि कवियत्रीने स्वतःच केलेले तिचे विडंबन आवडले.
19 Dec 2008 - 6:37 pm | मीनल
हे ही मस्त आहे
खर तर हेच जास्त मस्त आहे.
मीनल.
19 Dec 2008 - 6:39 pm | श्रावण मोडक
छानच. मागे एकदा विसुनानानीच कुठे तरी "हा स्किझोफ्रेनिया (तेच ना? की या लक्षणाला काही वेगळा इंग्रजी शब्द आहे?) की काय" असा काहीसा मुद्दा काढलेला आठवला.
19 Dec 2008 - 7:17 pm | स्वाती फडणीस
:)
19 Dec 2008 - 2:28 pm | पॅपिलॉन
छान आहे कविता आणि तीची माडणी.
त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..!
हे खासच आवडले.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.