छि _ _

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
10 Oct 2015 - 5:43 pm

छि _ ल,

पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं.

श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता.

मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी
जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की
करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली
होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड
पोचलेलं सहज कळत होतं.

हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,
आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता.

इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला
समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला.
अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो,
त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते.

कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं
सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्‍यांपैकी ते लोक नाहीत,
उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्‍याला घट्ट बांधून
घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं
ते अशा चेहर्‍यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्‍या मुलींना नावं ठेवणार्‍यांना कसं कळावं.)

तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या..
काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती.

तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला..
छि _ ल, सा _ !!

................

................

त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता.
मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी..
त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले,
एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली.

ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती.
माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अ‍ॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल
तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं..
याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच.
इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं..

कोणासाठी होती ती शिवी ?
त्याला विरोध करणार्‍या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ?
पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित..
काय नव्हतं त्या शिवीमध्ये ?
राग, तिरस्कार, विखार, वासना ?
सगळंच, त्याशिवायही अजून काही..

त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील
विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते.

त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी
इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार
मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती.

वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं,
मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये,
जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये..
एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता.

अर्थात हे सरसकटीकरण नाही.
समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल.

त्यावेळी मला अशा समाजात राहणार्‍या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट
शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील.

त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय,
आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही,
जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
जिथे आपल्याला बर्‍यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही,
जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत,
जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही.

म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली.
अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात,
फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला..
इतकंच..

समाजप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 10:22 pm | टवाळ कार्टा

आजकाल मुलींकडे पेपर स्प्रे देउन ठेवावा....शक्य असेल तिथे वापरावा

लेख आवडला.डोकं फिराऊ अनुभव. पिशीशी पण सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Oct 2015 - 12:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

-_- आधीचं युपी बिहार्‍यांना स्त्री ला आदराने वागवणं माहित नाही. त्यामधुन जर का सोमरसाच्या अंमलाखाली असतील तर काही पहायलाचं नको. दोन-तीन वेळा अश्या लोकांना कानफाटलेलं आहे निगडी-कात्रज रुटवर. कोणीतरी डेरिंग करुन एक भडकाउन द्याय्ला लागते नंतर गर्दीच्या अंगात जोर येतो आणि ही असली जमात वठणीवर येते.

इडली डोसा's picture

11 Oct 2015 - 2:39 am | इडली डोसा

मी साधारण 15 वर्षांपुर्वि 3 वर्ष कराड-सातारा असा एस्टीतुन दर आठवड्याला प्रवास करायचे. तेव्हा कोणी पुरुष सीटवर बसला तर त्याच्यासमोर कर्कटक काढुन हातात घ्यायचे. त्या तासाभराच्या प्रवासात त्यामुळे सेफ वाटायचं. एक दोनदा अश्या महाभागांना ढडा सद्घा शिकवला आहे. आपण थोडं धाडस दाखवलं तर अशी माकडं आपोआप तिथुन पळ काढतात.

यूपी बिहार्‍यांना पुण्यात तरी असलं काही करताना बघितलेलं नाहीये. बघितलं असतं तर मनसेचं नाव घेवून पहिलं पोटात लाथ घातली असती. पुढचं पुढे. खरं तर असं करायला काही कारण मिळत नाहीये याचंच दु:ख आहे. पीएमटी नं जायला सुरवात केली पाहीजे.

वेल्लाभट's picture

13 Oct 2015 - 3:41 pm | वेल्लाभट

वे टू गो काळापहाड ! गुड.

खूप वाईट वाटतं की असं एकही नाव राहिलं नाही आता की ज्याच्यामुळे बाहेरून महाराष्ट्रात येणारे आणि वर उपद्रव करणारे चळाचळा कापावेत. निराशा केलीय काही मंडळींनी॑.

मार्मिक गोडसे's picture

11 Oct 2015 - 11:59 am | मार्मिक गोडसे

@ इन कम, जागेवरच हिशोब चुकता केला हे योग्यच केले. नंतर रडण्यत काहीच अर्थ नसतो.

एकदा मुंबईला फोर्ट् परिसरात फूटपाथवर पुस्तकं बघत होतो, बाजुला एक परदेशी कृष्णवर्णीय महिला पुस्तक बघण्यासाठी खाली वाकली,तेव्हड्यात बाजुने जाणार्‍या एका तरुणाने त्या महिलेच्या पार्श्वभागाला स्पर्श केला, त्या महीलेने गर्रकन वळुन आपल्या हातातील बॅगने त्या तरुणाच्या चेहर्‍यावर तडाखा दिला. हेलपाटत तो खाली पडला, ती त्याच्या बाजुला उभी... तो उठला व काही न बोलता सरळ निघुन गेला. त्या परदेशी महिलेने कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही.
शाब्दीक असो वा शारिरीक, कोणत्याही छेडछाडीला जागेवरच उत्तर दिले पाहीजे.

मागे असंच फेसबूकवर मुंबईत प्रवासात महिलांच्या शारिरीक छेडछाडीत वाढ झाली,व त्याला सर्वस्वी परप्रांतीय जबाबदार आहेत अशा प्रकारची पोस्ट एकाने टाकली होती. त्यावर कॉमेंट करताना मी लिहिले होते, परप्रांतीयांमुळे असे प्रकार वाढले असतील,परंतू स्थानिकही गर्दीचा फायदा घेतातच. अव्यवहार्य वाटेल पण प्रत्येक लोकलच्या व बसच्या प्रवेशद्वाराजवळ कॅमेरे लावा, त्या चित्रणात आपल्याला आपले ओळखीचे चेहरे दिसतील. कदाचीत वडिलांचे, भावाचे किंवा आपले मित्रही दिसतील, अन्य नातेवाईकांबरोबर वडील,नवरा,सख्खे काका,मामा,भाऊ, किंवा स्वतः तुम्हीही दिसल्यास आश्चर्य वाटून घेवू नका. शेवटी मला ब्लॉक केले गेले..

म्हटलं तर ही एक किरकोळ घटना,

किरकोळ घटना? अहो ही सुरसुरणारी वात चिरडून विझवून नाही टाकली तर बाँब जवळच फूटून शारिरीक व मानसिक इजा होण्याचा धोका संभवतो.

इन कम's picture

11 Oct 2015 - 9:36 pm | इन कम

असे हिशोब लगेचच चुकवायचे असतात!

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:47 pm | वेल्लाभट

वर्मावर लाथ मारणे
डोळ्यात बोट घालणे
गळ्यावर बुक्का देणे

काही उपाय. या क्रियांनी किमान मिनिटभरासाठी तरी त्या व्यक्तीची वाट लागू शकते. यू कॅन बाय टाईम.

असो. सांगणं सोपं आहे. त्या वेळी करणं कठीण.

पद्मावति's picture

11 Oct 2015 - 12:12 pm | पद्मावति

भयानक अनुभव. कठीण आहे.

हेमंत लाटकर's picture

11 Oct 2015 - 12:14 pm | हेमंत लाटकर

"आपल्याला काय करायचे" ही मानसिकता जोपर्यंत आहे. तोपर्यंत हे असेच चालणार.

अंवातर: गाडीतील बहुतेक युवक, पुरूषांनी कधीतरी हेच केलेले असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Oct 2015 - 12:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सरसकटीकरण नको. तुम्हीही कधीतरी प्रवास केला असेलचं ना? हे असले छपरी लोकं सुदैवानी कमी आहेत.

एस's picture

11 Oct 2015 - 8:59 pm | एस

अशी दामिनी पथके सर्वत्र स्थापन व्हायला हवीत.

http://m.esakal.com/details.aspx?sid=28&sn=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E...

नीलमोहर's picture

12 Oct 2015 - 12:12 pm | नीलमोहर

लिंक त्याविषयी नाही.

रातराणी's picture

12 Oct 2015 - 1:50 am | रातराणी

स्वसंरक्षणाचे बेसिक धडे मुलींना शाळेतच कंपल्सरी करायला हवेत. डोकंचं फिरलं हा लेख वाचून.

नीलमोहर's picture

12 Oct 2015 - 12:06 pm | नीलमोहर

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार.

वर काही प्रतिसादांत अशा प्रसंगी प्रतिकार करावा, कानाखाली खेचावे, ठेचावे, लाथ घालावी, शौर्य दाखवावे,
हिशेब चुकते करावे इ. उपाय सुचवले आहेत.
इथे आपण काही उदाहरण पाहू,

तुम्ही रस्त्याने जाताय,समोरून एक दारूडा/मनोरूग्ण येत असतो. तो आपल्याच धुंदीत बरळत चाललाय,
मध्येच शिव्याही देतोय, तुम्ही समोरून जात असता एखादी शिवी तो जनरल टाकून देतो, काय कराल तुम्ही ??

वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल ?
की दुर्लक्ष कराल..

आपल्याला दिसतंय की समोरचा माणुस शुध्दीवर नाहीय, तो काय करतोय बोलतोय त्याचं त्याला समजत नाहीय.
तरीही समजा तुम्ही त्याला कानाखाली खेचून द्याल, एखादा फटका माराल, तो हेलपाटत जाऊन पडेल..
तुम्हाला काय मिळेल, त्याक्षणी जवळ जवळ बेशुध्द असलेल्या त्याला धडा शिकवल्याचे समाधान ?
त्याक्षणी समोरची व्यक्ति आपल्या पातळीवर नसतांना, दोघांपैकी सूज्ञ आपण दिसत असतांना, उगाच रिकामे वाद घालण्यात अर्थ नसतो. त्यावेळेसाठी दुर्लक्ष हा वाजवी, तर्कशुध्द पर्याय असतांना त्याच्या नादी लागायला जाणे,
हा आपलाही मूर्खपणा होऊ शकतो.

अजून एक उदाहरण,
तीच जागा, तोच रस्ता, समोरून एक कुत्रा येतो, बळंच तुमच्यावर भुंकतो.
तुम्ही त्याला हाड करून पुढे जाल की त्याच्यावर धावून जाल, त्याला लाथा-बुक्क्या घालत बसाल ?
आणि असे केल्यावर तो जर तुम्हाला चावला तर जवाबदार कोण..

सरकारच्या जाचक धोरणांना काही पक्ष मूक मोर्चा, निदर्शने इ. करून विरोध करतात,
काही तोडफोड, बंद, जाळपोळ इ. करून.
प्रत्येकाला आपला मार्ग योग्यच वाटतो, यातील कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ?

कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्याचे मार्ग व्यक्तिसापेक्ष राहणार.
त्या त्या वेळेस, त्या त्या परिस्थितीनुसार आपलं अंतर्मन, सिक्स्थ सेन्स सांगेल त्याप्रमाणे आपण वागत असतो.

लेखात लोकांच्या बघ्याची भूमिका घेण्याबद्दल फक्त लिहीले आहे, कोणाकडून मदतीची अपेक्षा नसतेच,
तसे अनुभवही नाहीत, कुठल्याही परिस्थितीत आपली मदत आपणच करू शकतो हे माहित आहेच.
काही वर्षांपूर्वी एका महिलेला, नाव विद्या बहुतेक (ठिकाण आठवत नाही), एका माणसाने भर रस्त्यात
पेटवून दिलं होतं, जमाव पहात राहिला, तिचा जीव वाचवायला कोणी पुढे आलं नाही.

मी शांतता, अहिंसा प्रिय, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहे, राहणार.
वर स्रुजा यांच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे गेलेला जीव, अब्रू काहीच परत येत नाही.
हे फार टोकाचे परिणाम आहेत, पण असं घडणारच नाही याची खात्री कोण देणार..
नंतर कोणी उदो उदो करून, कँडल मार्च वगैरे काढून उपयोग नाही,
बळी गेलेल्यापर्यंत पोचत नाही ते..

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Oct 2015 - 12:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या लेखासाठी आणि या प्रतिसादासाठी +१

स्वतःच्या मनगटात ताकद असेल तरच समोरच्याच्या आरे ला कारे म्हणावे. ती घटना जमत असेल तर विसरुन जावी आणि पुन्हा कामाला लागावे. अगदिच अशक्य असेल तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा थंड डोक्याने सुड घ्यावा. (संधीच्या शोधात राहिले की संधी मिळतेच) तेव्हा दया वगेरे दाखवायच्या फंदात पडू नये.

उगाच डोक्यात राख घालुन घेउन इंन्स्टंट रिअअ‍ॅक्शन देण्याच्या फंदात अजिबात पडू नये. त्याने आपलेच नुकसान होते.

पैजारबुवा,

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 12:32 pm | तर्राट जोकर

एवढं जर तुम्हाला आधीच समजतं तर पहिलेछूट हे जे लेखातले विचार तुमच्या मनात आले ते का आले मग? तिथेच का सोडून दिले नाही त्याच्या वागणूकीला आणि मानसिकतेला?

इथे काही जणांनी स्त्रियांना स्वसंरक्षण, चाकू, मिर्चीपूड वैगेरे ठेवा याबद्दल म्हटले आहे. मला कायम वाटत आले आहे यापेक्षा जास्त काहितरी स्त्रियांना शिकवणे आवश्यक आहे. चाकू, बंदूक, रणगाडा, मिसाइल सोबत असणे व तो चालवण्याची मानसिकता असणे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. वरच्या प्रतिसादातून ते स्पष्ट दिसतंय.

कधी विचार केलाय की असलं वागणं का फोफावतं? कारण त्याला ग्राउंड मिळतं म्हणून. ग्राउंड मिळालेच नाही तर हे प्रकार बंद होतील. ''कोणीच उलटून प्रतिकार करत नाही" या मानसिकतेतूनच हे प्रकार फोफावले. "प्रतिकार होतो" हे जेव्हा क्लिअर होइल तेव्हाच सगळं बंद होइल. छेडछाड करणं, अपमान करणं, विनयभंग करणं हे खून पाडण्याइतकंच गंभीर आहे हे कधी समजणार बायकांना? नाहीतर उद्या कुणी खून पाडायला आलं तरी तुम्ही वरचेच विचार पाजळत बसाल.

आय अ‍ॅम वेरी मच सॉरी. पण वरचे विचार अजिबात पटले नाहीत. "माझं काही बरंवाईट झालं तर काय" ह्या विचारांमुळे ही परिस्थिती आहे. पण "हे जे होतंय हेच बरंवाईट घडतंय, याला ताबडतोब संपवलं पाहिजे" हा विचार महत्त्वाचा. प्रत्येकाला जीवाची भिती असते, तुम्ही फक्त आपल्या जीवाची भीती बघता. समोरच्याचाही जीव असतो व त्याला ही तो तेवढाच प्यारा असतो. भेकड मानसिकता असणार्‍यांनी सन्मानाने जीवन जगण्याची अपेक्षा नक्कीच करू नये मग. तुम्ही वाघाला काही करणार नाही म्हणून वाघाने तुमच्यासोबत काही करू नये ही अपेक्षा पुस्तकात ओके. जंगलात नाही.

मी लोकलमधे दारु पिऊन दंगा करणार्‍यांना, डोकं उठवणार्‍यांना तिथल्या तिथे चोपले आहे. त्यांच्या उपद्रवाने झालेला त्रास, स्ट्रेस घरी घेउन जाणे, बायकामुलांवर काढणे पटत नाही. असो, ज्याचे त्याचे विचार. आपलं काय जातंय. एकच सांगतो माझ्यासमोर असला काही प्रकार झाला तर 'योग्य तोच उपाय' केला जाइल. मग माझे काय व्हायचे ते होवो. माझ्यासारखे लाखो मरतील, मरायला-मारायला तयार होतील तेव्हा तरी सूर्य उगवेल की नाही...?

रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे? जेव्हा अशा बातम्या यायला लागतील तेव्हा आपोआप दुसर्‍या बातम्या कमी होतील. आमेन!

रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे? जेव्हा अशा बातम्या यायला लागतील तेव्हा आपोआप दुसर्‍या बातम्या कमी होतील. आमेन! >>

आमेन!

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2015 - 1:29 pm | पिलीयन रायडर

रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे?

आमच्या ऑफिसमध्ये स्वसंरक्षणासाठी एक २ तासाचे सेशन झाले होते. कराटे शिकवणारे २ गुरुजी आणले होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला कुणी काही केलं तर सरळ जीवच घ्यायचा. सोडायचं नाही. कोण कोण घेऊ शकेल असा जीव?? तर फार कमी हात वर आले.
अनेक मुलींनी हे अर्ग्युमेंट केलं की जर मी त्याला फक्त जखमी करुन स्वतःचा जीव वाचवु शकत असेल तर का कुणाचा जीव घ्यायचा.

मुद्दा हा नाहीये की कोणता अ‍ॅप्रोच चुक किंवा बरोबर.. मुद्दा हा आहे की मुलींची मानसिकताच नसते कुणाचा जीव घेण्याची. त्यासाठी जे क्रौर्य किंवा अ‍ॅग्रेशन लागेल ते फार कमी जणींमध्ये असतं. आपण कमजोरच आहोत हेच त्यांनी स्वतःला पटवलेलं असतं. त्यामुळे रागाच्या भरात जे अ‍ॅग्रेशन निर्माण होऊ शकतं ते होत नसावं असं मला वाटतं.

हा कमजोरपणा नसून सूज्ञपणा नाही का? अवास्तव हिंसेचे समर्थन का?

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2015 - 1:45 pm | पिलीयन रायडर

माझ्या शरीराला स्वतःच्या मलाकीची वस्तु समजुन वाट्टेल ते करण्याची मनिषा बाळगणार्‍याचा जर मी खुन केला तर ती मुळात "हिंसा" कशी? आणि अवास्तव कशी?

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:29 pm | वेल्लाभट

+१

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2015 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

थिऑरेटिकल पातळीवर सहमत.

अत्रे's picture

12 Oct 2015 - 2:46 pm | अत्रे

१.

काही केले तरी

समजा अंगाला धक्का मारला तर खून करायची काय गरज? थोबाडीत मारले , बास झाले. खून करणं वाटणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात? म्हणून अवास्तव.

२. एखादी क्रिया "हिंसा" आहे की नाही हे तिच्या कारणांवर अवलंबून असते का?

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2015 - 3:40 pm | पिलीयन रायडर

अहो अंगाला धक्का मारला तर खुन करा असा अर्थ घेतात का? पण येस्स.. आवेश "साल्या मुडदाच पाडिन तुझा" असाच हवा.
पण त्याहुन जास्त कुणी काही करत असेल तर मग नक्की पाडावा मुडदा. एक लक्षात घ्या, कुणी कुणाला मारु शकेल की नाही हा फार पुढचा प्रश्न आहे. किमान आपण तेवढ्या ताकदीचा प्रतिकार तरी करु शकतो.. रादर केलाच पाहिजे हे बिंबवणं जास्त महत्वाचं आहे.
शिवाय जशा घटना आजुबाजुला घडत आहेत, अश्याच रिअ‍ॅक्शन्स आल्या शिवाय त्याला चाप बसणार नाही. कुणी आपलं काहिही घोडं मारु शकत नाही हा विश्वास, मुलीला तिच्या घरचेच "जाउ दे.. कशाला पोलीसात जा.." पासुन ते "तुझीच चुक आहे" पर्यंत करत असणारा "सपोर्ट" आणि "जीव घ्यावा की घेऊ नये" ह्या तात्विक चर्चा इतपतच समाजाचे सहकार्य... कसं काय थांबणार हे सगळं?

२. हो.. मला तरी तसंच वाटतं. धर्माच्या नावाखाली एखाद्याचा जीव घेणं आणि स्वसंरक्षणासाठी एखाद्याचा जीव घेणं ह्यात फरक असतो तसंच.

अत्रे's picture

12 Oct 2015 - 6:11 pm | अत्रे

समजलं.

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 10:35 pm | काळा पहाड

माझं समर्थन. स्ट्राईक हार्ड अ‍ॅन्ड स्ट्राईक टू किल. ही हिंसाच आणि जस्टीफाईड हिंसा. बाकी वरच्याप्रमाणे 'का मारावे' टाईप लोक मानवाधिकारवादी संस्थेत जातात किंवा मिपावर सर्वधर्मसमभावाचे मत मांडतात. इगनोअर.

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 10:53 pm | काळा पहाड

बाकी वरच्याप्रमाणे 'का मारावे' टाईप लोक मानवाधिकारवादी संस्थेत जातात किंवा मिपावर सर्वधर्मसमभावाचे मत मांडतात. इगनोअर.

अत्रे साहेब, हे तुमच्यासाठी नव्हे, तर त्यांच्या ऑफिसमधल्या बायकांसाठी आणि हाफथ्रॉटल साहेबांसाठी आहे. गैरसमज नसावा.

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 1:48 pm | तर्राट जोकर

आपण कमजोरच आहोत हेच त्यांनी स्वतःला पटवलेलं असतं. त्यामुळे रागाच्या भरात जे अ‍ॅग्रेशन निर्माण होऊ शकतं ते होत नसावं असं मला वाटतं.

प्रतिकार न करण्याच्या मुळाशी हेच कारण आहे. घराघरांतून मुलींना 'अबला'पणाचं जे बाळकडू दिलं जातं ते बदलणे आवश्यक आहे हे अनेक वेळा वाटतं. सगळे दोषारोप मुलींवरच करत असतात. त्यातूनच विरूद्ध पार्टीला लायसन्स दिल्यासारखं होतं.

अशीच शिवीगाळ कुणा पुरुषाला दुसर्‍या पुरुषाने केली तरी ते एकमेकांची-स्वतःची देहयष्टी विसरून आरे ला कारे करतातच. स्त्रियांनी हा पवित्रा घेणे हेच सर्वात आवश्यक. simple hairpin can be a fatal weapon. पण जीव घेण्याइतकं मन तयार असणे महत्त्वाचं, आपला जीव/सन्मान जाण्यापेक्षा जगात जास्त काही नाही हे शिकवणे जास्त महत्त्वाचं.

त्यांच्या उपद्रवाने झालेला त्रास, स्ट्रेस घरी घेउन जाणे, बायकामुलांवर काढणे पटत नाही.

अतिशय सहमत!

प्राची अश्विनी's picture

12 Oct 2015 - 2:03 pm | प्राची अश्विनी

निमोताई, स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका.
1 जेव्हा एक मुलगी त्यांच्याविरुद्ध बोलत होती तेव्हा जर आपणही तिला मदत करायच्या एवजी गप्प राहिलो तर"इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते" या इतरांमध्ये आणि आपल्यात काय फरक?
२ तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती उदाहरणे म्हणून ठिक आहेत. आडरस्त्यावर, किंवा आडवेळेला विरोध करू नये मान्य पण दिवसा pmt बस मध्ये जिथे मध्यमवर्ग आहे तिथे निदान आवाज चढवायला घाबरू नये. माझा अनुभव असा आहे की आपण जर विरोध केला तर लोकं मदतिला येतात. आपणच गप्प राहिलो तर इतरांनी का बरे मध्ये पडावे.
पैजारबुवा म्हणतात ते मान्य,पण मग गप्प बसावे, गिळगिळीत वाटते, समाज असा का वागतो असं म्हणण्यापेक्षा मला विरोध करता आला नाही याबद्दल वाईट वाटले हा सूर जास्त genuine वाटतो.
3 माझा एक अनुभव, ज्यामुळे माझा हा दृष्टिकोन झाला.
पंधरा वर्षांपूर्वी एका संध्याकाळी स्टेशनवरून घाईघाईत क्लिनिकवर जात असताना समोरून एकजण आला आणि अत्यंत गलिच्छ शिवी देऊन धक्का मारून गेला.प्रचंड संताप आला,पण सुशिक्षित, सुसंस्कारीत मी गप्प बसले.
क्लिनिकवर पोचल्यानंतर दहा एक मिनिटात तोच माणूस "मॅडम से माफी मांगनी है" आत आला आणि फटाफटा गालावर मारून घेत माफी मागू लागला. मला काय प्रकार आहे ते कळेना. त्याच्यामागून अजून एक वयस्करवव्यक्ती आत आली. आणि " वापस मैडम को तकलिफ दिया तो याद रखना " असे रागवत त्याला बाहेर पाठवले.
ही व्यक्ती (जी माझी पेशंट होती )तो प्रसंग घडला तेव्हा मागेच गाडीत बसली होती.आत्ता पर्यंत मी तिला केसपेपर वरच्या नावाने ओळखत होते. पण तेव्हा बोलताना कळले की ती मुंबई मध्ये ज्याने गँगवॅारला प्रथम सुरवात केली तो कुख्यात गुंड होता.
पुढे ती म्हणाली," कभी चुप मत बैठना,आप जैसेपढेलिखे लोग चुप रहते हैं इसलिए तो हमारा राज चलता हैं नही तो गिनेचुने पुलिस हमारा कुछ नही कर सकती!"
असो.
म्हणून म्हणते तुम्ही निदान त्या मुलिच्या बाजुने बोलायला हवे होते.

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:30 pm | वेल्लाभट

कडक +१

शलभ's picture

12 Oct 2015 - 2:37 pm | शलभ

+११

तुमच्या बराचशा मुद्द्यांचे उत्तर माझ्या http://www.misalpav.com/comment/753738#comment-753738 वरील प्रतिसादात दिलेले आहे, त्यावर अजून काही बोलणे म्हणजे रिपीटीशन होईल फक्त. तरीही,

१. जेव्हा एक मुलगी त्यांच्याविरुद्ध बोलत होती तेव्हा जर आपणही तिला मदत करायच्या एवजी गप्प राहिलो... इतरांमध्ये आणि आपल्यात काय फरक?

- तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बहुतेक, तुम्ही समजताय की तो त्या मुलीला शिव्या देत होता आणि मी इतरांप्रमाणे गंमत बघत होते. तर ते तसं नाही.
मी लिहीलंय की शिव्या स्पेसिफिक तिच्या - माझ्यासाठी नव्ह्त्या. तो त्या निमित्ताने त्याचे फ्रस्टेशन काढत होता,
आणि तिच्या उलट बोलण्याने तो अजून चिथावले जात होता, त्याला प्रोत्साहन मिळत होते, ती गप्प बसली असती तर तोही गप उभा राहिला असता, विषय तिथेच मिटला असता.

एका अर्धवट शुध्दीत असलेल्या माणसाशी वादात पडण्याची इच्छा, गरज त्याक्षणी मला वाटत नव्हती हे परत सांगेन.
जिथे भांडणाची गरज नाही दुर्लक्षानेही काम चालते तिथे भांडण करून विषय वाढवणे आपला मूर्खपणाही ठरू शकतो.
वाद वाढवण्याचा नाही तर वाद मिटवण्याचा माझा प्रथम प्रयत्न असतो. तो चुकीचा असेल तर तसं.

२. 'मला विरोध करता आला नाही याबद्दल वाईट वाटले'

- मी माझ्या पद्धतीने विरोध केला.
अहिंसेने केलेला विरोध खरा की हिंसेने, मौनाने केलेला खरा की आक्रस्ताळेपणाने,
कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ?

'गप्प बसावे, समाज असा का वागतो' - हे कुठल्या संदर्भात लिहीलंय लक्षात येत नाहीये.
समाजातील खालच्या स्तरावरील लोकांसाठी काही गोष्टी लिहील्या आहेत.

'गिळगिळीत वाटते' - अशी शिवी ऐकून कोणा संवेदनशील व्यक्तिला नाही वाटणार? ते इथे लिहीलं ते चुकलं का,
तसं असेल तर पूर्ण लेखच चुकीचा आहे म्हणता येईल.
कितीतरी गोष्टींवर ऑब्जेक्शन घेता येईल हे का लिहीलं, ते का लिहीलं म्हणून. काहींनी घेतलंही आहे वर तसं.

३. "आप जैसेपढेलिखे लोग चुप रहते हैं इसलिए तो हमारा राज चलता हैं नही तो गिनेचुने पुलिस हमारा कुछ नही कर सकती!"

- " The trouble with the world is that the stupids are full of confidence and the intelligent are full of doubts."
हे सत्य आहेच. एकटीने पूर्ण समाज बदलवण्याची स्वप्नं मी तरी पहात नाही.

इथे हेही सांगेन, हेच जर तो विषय वाढला असता, नंतर काही अनावस्था प्रसंग आला असता तर लोकांनी तुम्हाला काय गरज होती वाद घालायची, शहाणपणा दाखवायची, बसायचं ना गप असं म्हणायलाही कमी केलं नसतं.
लोक असेही बोलणार आणि तसेही बोलणार, घोडयावरही बसू देणार नाहीत आणि चालतही जाऊ देणार नाहीत,
त्यामुळे लोकांचा विचार करणं केव्हाच सोडून दिलंय.

त्याक्षणी आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं.

प्राची अश्विनी's picture

12 Oct 2015 - 8:30 pm | प्राची अश्विनी

१ गैरसमज बिलकुल नाही. चार पाच मुलींना कुणी त्रास देतय, त्यातली एक विरोध करतेय आणि आपण जर गप्प बसलो तर आपण्सुद्धा गर्दीतलेच एक होतो. कारण दुर्लक्ष करण्याची बहुतांश मानसिकता याला मी "गर्दी" म्हणतेय.
२ "एका अर्धवट शुध्दीत असलेल्या माणसाशी वादात पडण्याची इच्छा, गरज त्याक्षणी मला वाटत नव्हती हे परत सांगेन.
जिथे भांडणाची गरज नाही दुर्लक्षानेही काम चालते तिथे भांडण करून विषय वाढवणे आपला मूर्खपणाही ठरू शकतो.
वाद वाढवण्याचा नाही तर वाद मिटवण्याचा माझा प्रथम प्रयत्न असतो. तो चुकीचा असेल तर तसं."
हाच विचार इतर बघ्यांनीही केला असेल नाही का? मग "इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते "हे म्हणयचा आपल्याला नैतिक अधिकार रहात नाही.
३ "कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं
सरळमार्गी मत"
एवढी माणसं असताना , त्यातील एक आजोबा आणि एक मुलगी अन्यायाचा विरोध करताना सुद्धा जर आपण दुर्लक्ष करायचा तर मग झाशीची राणी कधी बनायचे याचे एक उदाहरण द्याल का?
४ "मी माझ्या पद्धतीने विरोध केला.
अहिंसेने केलेला विरोध खरा की हिंसेने, मौनाने केलेला खरा की आक्रस्ताळेपणाने,
कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ?"
आवाज उठवणे म्हणजे हिंसा करणे किंवा आक्रस्ताळेपणा देखील नव्हे. पण असो. कोणी अशावेळी मनातल्या मनात एखादे संकट्नाशन स्तोत्र वगैरे म्हणेल वा बाहुबलीला हाक मारेल आणि म्हणेल की मी माझ्या पद्धतीनी विरोध केला खरे आहे ईथे चूक बरोबर कोण ठरवणार. हा तुमचा मुद्दा पटला बरं का .
५ पूर्ण समाज बदलण सोडा हो, आपण आपली मानसिकता बदलली तरी खूप झालं. पण "शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरी, मी तर मावळा पण होणार नाही" हा विचार यात असेपर्यंत समाज बदलणं अशक्य आहे. मग कुणालाच दुसर्‍याल बोलायचा अधिकारच रहात नाही.
कारण आपण जसं लोकांचा विचार करणं सोडून दिलं तसंच लोकांनीही आपला विचार करणं सोडून दिलेय नाही का?
६ लेखाचा हेतू माझ्या संवेदनाशील मनाला काय काय वाट्लं हे सुंदर भाषेत लिहिणे हे असेल तर वरील सगळ्या मुद्द्यान्चा संबंध येतच नाही. लेख खूप छान लिहिलाय.
इति लेखनसीमा .

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 10:43 pm | काळा पहाड

तो त्या निमित्ताने त्याचे फ्रस्टेशन काढत होता,
आणि तिच्या उलट बोलण्याने तो अजून चिथावले जात होता, त्याला प्रोत्साहन मिळत होते, ती गप्प बसली असती तर तोही गप उभा राहिला असता, विषय तिथेच मिटला असता.

यूपी बिहार्‍यांना अधिकार नसतात हे एक सूत्र लक्षात ठेवा. जिथे दिसतात तिथे ठेचायचे असतात ते. त्याचं फ्रस्ट्रेशन वगैरे जे काही आहे पाटण्याला जावून काढायचं असतं. तुमच्या सारख्या "विचारांच्या" लोकांमुळे हे लोक इथे रहातात आणि मान वर करून बोलतात. यांच्या डोक्यात बाटल्या फोडूनच त्यांना हाकलायचं असतं. आता ते कसं करायचं ते तुम्हाला शिकावं लागेल. पण आजूबाजूला जे असेल ते डोक्यात घालणं हा महाराष्ट्र धर्म आहे हे तरी ध्यानात असू दे तेव्हा.

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:35 pm | वेल्लाभट

माझं एकच स्पष्ट मत. मग याला कुणी निराशावादी म्हणा की अजून काही.

तुम्ही प्रतिकार करा, वा नका करू हा विषय वेगळा.
पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.

पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.

ते ढोल-डिजे वगैरे संदर्भातही हे लागू होतं का हो?

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:50 pm | वेल्लाभट

दोन गोष्टींचा संबंध नाही. तरीही तुम्हाला जोडायचा असल्यास तुम्ही खुशाल जोडा. तुमचा प्रश्न आहे.

बॅटमॅन's picture

12 Oct 2015 - 2:54 pm | बॅटमॅन

एका संदर्भात तुम्ही जे म्हणताहात ते दुसर्‍या संदर्भात लागू होतं किंवा नाही इतकेच विचारतोय. त्याला संबंध जोडणे म्हणत असाल तर मजाच आहे.

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:58 pm | वेल्लाभट

म्हटलं ना, तुमचा प्रश्न आहे. आणि जे म्हणायचं ते स्पष्ट म्हणा उगाच मी फक्त हे विचारतोय, मी फक्त असं म्हणतोय हे असले आडून आडून हात लावल्यासारखे प्रकार कशाला?

स्पष्टच विचारतोय हो. "अमुक विधान तमुक संदर्भात लागू होते" असे विधान केलेले नाही, तर "ते तसे लागू होते का" असा प्रश्न विचारला आहे. त्याला "तो तुमचा प्रश्न आहे" हे उत्तर अपेक्षित नाही तर हो किंवा नाही असे उत्तर अपेक्षित आहे.

झालं पुरेसं स्पष्ट की अजूनही आडून आडूनच आहे?

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 3:09 pm | वेल्लाभट

मग दोन गोष्टींचा संबंध नाही.
याचा अर्थ लागू होत नाही.

हेही तितकंच स्पष्ट आहे माझ्या मते.

असो. याहून अधिक कमेंट करण्याची इच्छा नाही. ढोल पथकांना असभ्य असंस्कृत विकृत चीप म्हणायचंय का तुम्हाला? ती कधीही सुधारणार नाहीत असं म्हणायचंय का? खुशाल म्हणा. एन्जॉय.

काही लोकांना निरर्थक विषयांतर करून काय आनंद मिळतो हे अनाकलनीय आहे.

पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.

अगदी हे सार्वजनिक सण, अमक्याचं व्रत म्हणून तमक्याने मासळी खाणं बंद करावं, अमक्याने बीफ खाल्लं म्हणून तमक्याने मारावं, अमक्याने तमक्याला पर्सनल गोष्टीवर कमेंट करुन मग साळसूद आव आणावा, धर्मासाठी अमक्याने साडेपाच वाजता बांग द्यावी आणि तमक्याने ढोल बडवत टाळ कुटत हिंडावं, देव निराकार आहे म्हणून अमक्यातमक्या राजापुढे भक्तांची गर्दी लोटावी अगदी सगळ्या सगळ्या बाबती लोकांची मानसिकता बदलणं अशक्य आहे.

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 4:53 pm | वेल्लाभट

+ १

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 2:51 pm | वेल्लाभट

हे असं वाचून हात प्रचंड शिवशिवतात.

माझाही एक अनुभव सांगतो. एकदा एक माणूस गर्दी असलेल्या बसमधे एका बाईजवळ जात होता. हे तेंव्हा कळलं जेंव्हा ती बाई तिथून बाजूला सरकून उभी राहिली. मी केवळ त्या माणसाकडे रोखून बघत उभा राहिलो. काहीही बोललो नाही की काही केलं नाही. पण माझा पवित्रा ओळखून तो माणूस नजर चोरत शिस्तीत तिथे उभा राहिला आणि स्टॉप आल्यावर उतरला.

इतकं केलं तरीही पुरतं अनेकदा. पण येस; हात शिवशिवतात. आणि याच्याशीही सहमत की अनेकजण दुर्लक्ष करणं पसंत करतात. जे पूर्णतः चूक नाही म्हणता येत; विरोध करून आपल्याला कायद्याचं पाठबळ मिळेल असा विश्वास देऊ शकेल का कुणी? ही शंका येतेच.

माझ्या रोजच्या रस्त्यावर परवा एका मुलीची अ‍ॅक्टिव्हा वळण घेताना घसरली, पडली. फार वेगात नव्हती त्यामुळे लागलं नाही. मी रस्त्याच्या पलिकडच्या बाजूस गाडीची वाट बघत होतो. तिला स्कूटर उचलता येईना. तिथून दहा गाड्या गेल्या पण कुणीही तिला मदत करायला आलं नाही. मी शेवटी धावत पलिकडे जाऊन स्कूटर उचलून दिली लागलंय का विचारलं. मुद्दा हा की पडलेल्या मुलीची स्कूटर उचलायला कुणी आलं नाही, पण अडलेल्या मुलीच्या अंगचटीस जायला लांडगे टपलेलेच असतात.

चीप कंट्री ऑफ चीप पीपल विथ चीप माईंड्स. नेव्हर विल धिस चेंज. नेव्हर.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2015 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

१. मी स्वत: पुरूष असल्यामुळे, अशा वेळी स्त्रीला नक्की काय वाटतं, तिने कसं वागायला हवं वगैरेंबद्दल मला जे काही वाटतंय ते कायमच डिस्काउंटेड असणार. असायलाही पाहिजे. पण, त्रास होतो हे असलं काही वाचलं की.

२. गेल्या काही वर्षांमध्ये जालावर खूप प्रगल्भ व्यक्ती भेटत गेल्या. त्यांच्याशी बोलल्याने माझेही विचार बदलत गेले. चारचौघात फिरताना नीट वागण्याचे उत्तरदायित्व मुलींवर टाकण्यापेक्षा नीट वागण्याचे कर्तव्य मुलांनी / पुरूषांनी पार पाडावे, आणि त्यांना तसे वळण बालवयापासूणच लावणे आवश्यक आहे, असे आता माझे मत आहे.

३. या संदर्भात दोन आठवणी लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये. पहिली आठवण अशी: (हे मध्यंतरी फेसबुकवर लिहिले होते ते तसेच इथे टाकतो आहे.)

ही घटना १९८३ / ८४ च्या सुमाराची आहे. आईबाबा इंदौरला आणि मी मुंबईला राहत होतो. सतत येणेजाणे चालू असायचे. तेव्हा विजयंत ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हल कंपनी जोरात होती. एकदा मी आणि आई मुंबईहून इंदौरला जात होतो. रात्री महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरजवळ कुठे तरी होतो. थंडीचे दिवस होते. सगळे झोपेत होते. अचानक बस थांबली आणि बसमधे आरडाओरडा सुरू झाला.

जाग आली. आधी काही कळलेच नाही. नंतर लक्षात आले... बसमधे २ तरूण मुली शेजारी शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या मागे दोन मध्यमवयीन पुरूष बसले होत. पन्नाशी चाळिशीचे. रात्री गाडी जिथे जेवायला थांबली होती तिथे बहुधा दोन चार बिअर प्यायले होते. तर रात्री सगळी सामसूम झाल्यावर त्यांनी मागून या मुलींना हात वगैरे लावायला सुरूवात केली. आधी खालून पाय लावले. मुली घाबरून गप्पच राहिल्या. यांची हिंमत वाढली. मग हात लावणं सुरू झालं. तरीही मुली गप्पच. काय करावं कळत नव्हतं. अगदीच लहान वय होतं त्यांचं. बहुधा एकट्याने फ़िरणं नुकतंच सुरू केलं असावं. असा अनुभवही पहिलाच असावा. त्या गप्प बसल्या तर यांचं अजून अजून वाढत राहिलं... मजल हात लावण्याच्या पुढे गेली. मग एकीने हिंमत करून ड्रायव्हर / क्लीनरला तक्रार केली. त्यांनी गाडी थांबवली आणि त्या दोघांना बडव बडव बडवलं. अक्षरश: भुस्काट पाडलं त्यांचं. "साले, यह विजयंत की गाडी है. तेरी हिंमत कैसे हुई?" ... त्या क्लीनरचे शब्द अजूनही माझ्या कानात आहेत... ते दृश्य अजूनही समोर दिसतं. अक्षरश: त्या मुलींच्या पाया पडत होते ते दोघे हरामखोर. माफ करा म्हणून विनवत होते. काही उपयोग नाही झाला. खूप मारल्यावर तिथेच थांबला नाही तो क्लीनर. त्याने त्या दोघांना तसंच, त्या भयानक थंडीत, जंगलसदृश भागात, रात्रीच्या किर्र अंधारात खाली उतरवून दिलं. सामान फेकलं आणि बस पुढे नेली. त्या दोघांचं पुढे काय झालं माहित नाही. मी मात्र त्या ग्रोइंग अप वयात बरंच काही शिकलो.

४. दुसरी आठवण आहे ती, याच धाग्यावर पिरा आणि तर्राट जोकर यांच्यामध्ये झालेल्या संवादाशी निगडीत आहे. मुद्दा असा होता की, स्वसंरक्षणाची साधने शिकणे आणि ती अंमलात आणायची वृत्ती अंगी बाणवणे असे काहीसे. पिरा यांनी किती मुली जीव घ्यायला तयार झाल्या ते ही लिहिले आहे.

आम्ही ९वी / १०वीत होतो तेव्हाची गोष्ट. माझा एक शाळकरी मित्र आहे. त्याचे एक नातेवाईक मुंबईतील बर्‍यापैकी प्रतिष्ठित आणि तसे सभ्य राजकारणी. खर्‍या अर्थाने समाजसेवक वगैरे. त्यांना दोन मुले होती. मोठा अगदी काडीपैलवान तर धाकटा मुंबईत बर्‍यापैकी नाव असलेला बॉडीबिल्डर. एकदा आम्ही मित्राबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. हे दोघेही आमच्या मित्राचे दादा तसे आमचेही दादाच. मोठा दादा वडिलांच्या कामात त्यांच्या बरोबर असणारा. लोकसंग्रह मजबूत. नेतृत्वगुण उत्तम. नजरेत जरब, अंगात प्रचंड रग होती त्याच्या. धाकटा बॉडीबिल्डर मात्र अगदीच शांत, शामळूच म्हणावा अगदी असा. पण अनोळखी लोकांना त्याचीच खूप भीती वाटायची. आम्ही तिथे असताना, त्यांच्या वाडीत काहीतरी 'मॅटर' झाला. बाहेरची पोरं येऊन काही राडा घालायला लागली. बॉडीबिल्डर आतल्या खोलीत निघून गेला. मोठा दादा मात्र त्याच क्षणी बाहेर गेला. दोन चार, त्याच्यापेक्षा बर्‍यापैकी आडदांड असलेल्या, पोरांना अक्षरशः कुत्र्यासारखं मारलं त्याने. बाकीचे पळून गेले. 'मारायला शक्ती नाही, जिगर लागते', हा बहुमोल धडा त्यादिवशी शिकलो. जिगर असली तर कोणतीही वस्तू हत्यार होते, कोणताही माणूस इफेक्टिव्ह होतो.

५. 'निर्भया' प्रकरणानंतर बरीच राळ उडली होती. त्यावेळेस, 'स्त्रियांना चारचौघात त्रास होऊ नये या करता मुलांना वळण असणे गरजेचे आहे' या विचाराने आजवर काही केले गेले आहे का, याची चौकशी करत होतो. काही वर्षांपूर्वी धारावीत असा काही प्रयोग झाल्याचे कळले होते. तेथील मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. एका स्वयंसेवी संस्थेने त्या भागातील मुलांना 'सेन्सिटाइझ' करायचा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आणि मुलींचा त्रास संपला. दुर्दैवाने मला तपशील मिळाले नाहीत, अन्यथा त्यावर एक लेख लिहायचा विचार होता.

६. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, स्त्रियांना होणार्‍या त्रासात तिची चूक नसते (कपडे कसे घालते, किती वाजता कुठे जाते, कोणाबरोबर असते इ.), तर केवळ आणि केवळ पुरूषांचीच चूक असते असे आता ठामपणे वाटू लागले आहे.

पिशी अबोली's picture

12 Oct 2015 - 8:13 pm | पिशी अबोली

तुमचे मुद्दे पटले.
पुरुषांची चूक पेक्षा ही समाजाची चूक जास्त वाटते. आपल्या समाजात बाय डिफॉल्ट स्त्रीला अबला समजणं इतक्या खोलवर रुजलेलं आहे की शिक्षण असूनही तुमच्यासारखा विवेकी विचार करणं म्हणजेही स्त्रियांना डोक्यावर बसवणं असं कदाचित बऱ्याच लोकांना वाटत असावं. हे 'सेन्सिटाइज़' करणं किती आवश्यक आहे असं बर्‍याचदा वाटतं. याच्यावर जमल्यास कृपया खरंच लेख लिहा. या दृष्टीने केल्या गेलेल्या विधायक कामाची माहिती जाणून घ्यायला आवडेल.

मधुरा देशपांडे's picture

12 Oct 2015 - 2:47 pm | मधुरा देशपांडे

निमोताई, लेख पटला. त्रास होतोच हे असे वाचुन.
अनेकांनी आवाज का उठवला नाही याबद्दल लिहिले आहे. प्राची अश्विनी म्हणतात तसे अनुभव अनेकींना असतीलही, पिराचे मुद्देही पटतात, विरोध करावा शक्य तेव्हा हे काही अंशी बरोबरही वाटते, पण म्हणुन हे सगळे सेफली हँडल होईल, निभावुन नेता येईल हेही खात्रीने सांगता येणार नाही. वर पिशीने जे लिहिले आहे, तसेही होते. स्रुजाने जे लिहिले आहे तशी मानसिकता होणे हे काही पुर्वीच्या अनुभवातुनही येऊ शकतं. किंवा एकदा विरोध करायला जमला नाही, म्हणजे लगेच कमजोर, अबला, एकटीला का जमत नाही विरोध करायला, असेही म्हणता येत नाही. रात्री दहा पर्यंत पिशीने पाठपुरावा केला, पण उत्तर काहीच आले नाही. पुढच्या वेळी उगाच कशाला वेळ घालवा, मलाही माझा अभ्यास आहे, परीक्षा आहे असा विचार तिने केला तर तो चुक ठरणार नाही. कधीतरी ही स्त्री कुणाची आई असते, जिला घरातली काळजी जास्त असल्याने इथे दुर्लक्ष करणे क्रमप्राप्त होते किंवा अजुन काही. ते त्या त्या वेळच्या प्रसंगानुसार बदलु शकतं. मुळात हे असे प्रसंग, कधी टोकाचे तर कधी नुसते धक्के, काहीतरी कमेंट्स असे प्रकार बहुतांशी मुली नेहमीच अनुभवत असतात. आणि त्यातुन या सगळ्याला चारदा विरोध करुनही पाचव्यांदा आता किती आणि काय बोलायचे असे वाटुन काही वेळा बाजुला होणे स्वाभाविक आहे. स्त्री आहोत म्हणुन असे नव्हे, तर इतर अनेक वेळा पुरुषही ही भुमिकाच स्विकारत असतात. गणपतीच्या वर्गणीसाठी गुंडांची मंडळे, राजकारण्यांनी अडवलेली कामे, सरकारी कामे इथपासुन तर अनेक बाबतीत, एकच प्रकार दहादा झाला तर तेवढ्यापुरते काहीही करुन काम पुर्ण करण्याकडेच कल असतो.
आपला मध्यमवर्गीय समाज कातडीबचाव धोरणच स्विकारत असतो. आता ते प्रत्येक वेळी बरोबरच आहे असे नाही.

विरोध करण्याची मनोवृत्ती वाढायला हवी, इतर पुरुषांकडुन मदतीपेक्षाही आपण आपले संरक्षण करण्यास स्त्रियांनी अधिकाधिक समर्थ व्हावे, मानसिक आणि शारिरीक क्षमता वाढवायला हवी या सगळ्याशी प्रचंड सहमत आहेच. पण वरच्या प्रसंगात मदत केली नाही म्हणुन धागाकर्तीने त्या प्रसंगी चूक केली असेही वाटत नाही.

स्वप्नांची राणी's picture

12 Oct 2015 - 6:29 pm | स्वप्नांची राणी

कधीतरी ही स्त्री कुणाची आई असते

...अगदी अगदी मधुरा..(डी.प्र.)

शाळा, कॉलेज, नोकरी करतांना असले असंख्य अनुभव आलेत. पण ईथे लिहीतेय तो भयावह अनुभव आला तेंव्हा माझा तेंव्हा ३ वर्षांचा असलेला मुलगा माझ्या बरोबर होता. खरच सांगते, लहान मुल बरोबर असलं की स्त्री सगळ्यात हेल्पलेस असते. ईथे काही प्रतिसाद ,प्रतिकार का नाही केला, आवाज का नाही उठवला, आले असते की लोकं मदतीला ' या किंवा तत्सम अर्थाचे आहेत. (म्हणजे हाच अर्थ कदाचित निघत असावा...काय्ये की त्या प्रतिसादतील वाक्यरचना ईतकी क्लिष्ट आहे की बहुतेक हाच अर्थ असावा अशी मी समजुत करुन घेतली...:;)..)

तर झालं होतं असं की, आमच्या स्टेशनवरून दुपारी लेडीज डब्ब्यात फारसं कोणी नसतं, आणी पुढलं स्टेशन १० मिनीटांवर, म्हणून मी माझ्या लहान मुलासकट जेंट्स डब्ब्यात बसले. लोकल सुटल्याबरोबर डब्ब्यात एक आडदांड शरीराचा, लाल तांबारलेल्या डोळ्यांचा फुल्ल टाईट माणुस चढला. माझ्या बाजूला अंतर ठ्वून तिसर्‍या सीट वर आणखीन एक जण होता. तर, दुसरीकडे जागा असुनही हा माणुस आमच्या अगदी मधे येऊन बसला. आणि लगेच खेटायला सुरुवात.

मी घाबरून आजुबाजुला काही मदत पहायला लागले. पण अख्ख्या डब्ब्याने नजर चुकवली. आणि मी अजिब्बात त्यांना दोष देत नाही. ह्या गुंडाकडे चाकु, सुरा, कट्टा काहिही असण्याची शक्यता होती. असल्या जनावरांपुढे बाकी पुरुषही एका स्त्री ईतकेच हेल्पलेस असतात हे नक्की.

खिडकीपाशी उभ्या असलेल्या मुलाला खसकन ओढून मी आमच्यामधे अक्षरशः चेपवुन बसवले. पुढच्या स्टेशनवर थोड्या अंतरावर मला पोलीसही दिसले. पण मुलाला घेऊन तिथपर्यंत पोचणं अशक्य होत. आणि मुलाला तिथे ठेवून जाणं तर मी शक्यच नव्हतं. टोटली हेल्पलेस..

त्या माणसाची हिम्मत आता वाढलेलीच होती. पुढच स्टेशन येण्या आधीच मी मुलाला अक्षरशः काखोटीला मारलं. आणि दाराकडे पळाले. तो माणुस पण मागोमाग आला. तिथे कमी लोक होते आणि तो माणुस अगदी माझ्या मागे आला. दरवाज्यात कॉलेजची मुलं उभी होती. ती पण बिचारी हा प्रकार पाहून घाबरून गेली. त्यावेळी मला जे आणी जसं सुचलं तशी मी वागले.

तिथल्या एका मुलाचा हातात घट्ट धरून मी त्याला अगदी खेचतच दुसर्‍या दरवाजात घेऊन गेले. त्याला म्हणाले, 'तुला कुठेही जायच असो, तू आता या स्टेशनवर माझ्या बरोबर उतर आणि मला रीक्षा स्टँड पर्यंत घेऊन चल.' स्टेशन वर आम्ही चालत्या गाडीतुनच उतरलो आणी कसबसं पळत सुटलो. तो माणूसही आमच्या मागे शिव्या देत, घाण बोलत येत होताच.

आम्ही रुळावर उडी मारली आणि अगदी काही पावलच पुढे गेलो तर या माणसाने एक मोठ्ठा दगड आम्च्या दिशेने फेकून मारला. पण ईतक्यात त्या रुळांवरुन फास्ट लोकल गेली आणि आम्ही वाचलो म्हणायचो.

या माणसाला कसलाही प्रतिकार करणं मला अशक्यच होतं त्यातून लहान मुलगा बरोबर. किंबहुना प्रतिकार करणे वगैरे माझ्या मनातही आलं नाही. फक्त आणि फक्त माझ्या छोट्या मुलाची चिंताच माझ्या डोक्यात होती.

आता विचार करुनही माझा थरकाप होतो की या प्रसंगात किती किती रिस्क घेतली होती मी, चालत्या गाडीतुन मुलासकट उतरणे, रुळांवरून गाडी न बघता पळणे. त्या कॉलेजीयन मुलाला तर अक्षरशः भरीलाच घातला होता. विशीचाच असावा तो ही. त्या क्षणापासून आजपर्यंत आणि यापुढेही भारतात पब्लीक ट्रान्स्पोर्ट ने प्रवास करणं मी सोडून दिलय.

ह्या ईतक्या अनुभवांमुळे, जनरलाईझ न करता, पण मलाही वेल्लाभट, आणी बिका यांच्यासारखच म्हणावसं वाटतं.

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 10:48 pm | काळा पहाड

तर या माणसाने एक मोठ्ठा दगड आम्च्या दिशेने फेकून मारला.

अगदी फुलथ्रॉटल साहेबांची आठवण झाली. तसंच वर्णन, तसंच वर्तन.

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2015 - 3:45 pm | पिलीयन रायडर

स्रुजाचे मुद्दे जरी मला पटत असले (की का म्हणुन भानगडीत पडा.. त्यातुन पुढे काहिही वेळ येऊ शकते..) तरीही बसमध्ये जिथे ५० माणसं असतात तिथे जर एक मुलगी स्वतःहुन विरोध करत असेल तर आपण तिला नक्कीच सपोर्ट करायला हवा. चार पोरींनी मिळुन जरी आवाज वाढवला तरी फरक पडतो.
"कशाला नादाला लागा" हा उपाय सर्वत्र अ‍ॅप्लिकेबल नाही. कधी कधी तो वापरावा लागतोच.. नो डाऊट. पण सार्वजनिक ठिकाणी तरी आवाज वाढवायलाच हवा. मुलींनी तरी मुलींना नेहमी सहकार्य करायलाच हवे. नाहीतर मग असल्या पुरुषांच फावणारच..

मधुरा देशपांडे's picture

12 Oct 2015 - 5:33 pm | मधुरा देशपांडे

आता हे थोडेसे अवांतर होईल, पण तरीही वर आलेले मुद्दे बघता लिहावेसे वाटतेय.
मिपा ही एक आंतरजालावरील जागा. आभासी जग. इथेच असणारा अनाहितांचा, अर्थात स्त्रियांचा एक ग्रुप, काही स्त्रिया ज्या अनाहिता सदस्य नाहीत आणि इथेच असणारे अनेक पुरुष आयडी हे सगळे इथले लोक. आता बघा, स्त्रियांसंबंधी कुठलाही लेख आला, की काय होते. काही जण संयमित प्रतिसाद देतात, स्त्रियांच्या विरोधातले काही असेल तर काही जणी शक्य तिथे विरोध करतात. मग काय होतं, एका स्त्रीने, जिने असा विरोध केला, तिच्याबाबत -
१. डिफॉल्ट ती स्त्री आहे म्हणजे अनाहिता असणारच असं गृहित धरुन आल्या हाणाहिता, येतीलच आता, कंपुबाजीचे आरोप आणि बरंच काही सुरु होतं.
२. तिला जी दुसरी स्त्री सपोर्ट देते, तिलाही मग तीच लेबल; तेच प्रतिप्रश्न, कंपुबाजीचा आरोप...
३. समजा दुसर्‍या एका स्त्रीने काही वेगळी मते मांडली, तर लगेच 'बघा कशा भांडतात' अशा कमेंट्स, म्हणजे दोन स्त्रियांनी एखाद्या मुद्द्यावर वेगळी मतं मांडली की समजायचे लगेच भांडण वगैरे...
४. काही स्पेसिफिक आयडींकडुन नवीन काड्या, फक्त गम्मत बघण्यासाठी, हे काही वेळा सरळ सरळ सांगितलेही जाते की बघा अनाहितांना कसे छळले, त्यावर इतरांच्याही सपोर्टिंग कमेंट्स इत्यादी. काही वेळा 'आम्ही कुठे काही बोललो' असे साळसुद आव आणले जातात, पण तेही ज्यांच्याबद्दल बोललं जातंय, त्यांना कळत असतंच.
५. अजुन काही वेगळे प्रकार, नवीन धागे आले की जुने मुद्दे बाजुला, पण तिथेही हाच प्रकार चालु

या सगळ्यात अनाहिता, अथवा अनाहिताच्या सदस्य नसलेल्या स्त्रिया काही मुद्दे घेऊन विरोध करुन बघतात, पण ते सोडुन नवीनच मुद्दे घेऊन भांडणे उकरुन काढण्याचा काहींचा प्रयत्न दिसतो. आणि मग काय होतं, एका स्टेजला त्याही बाजुला होतात. कशाला उगाच वादात पडा असा विचार करुन. मग गम्मत बघणार्‍यांची चिडचिड होते, अजुन नवीन काड्या. हे चालुच राहतं, अशा कितिकशा वेळी इथले इतर पुरुष आयडी अनाहितांच्या बाजुने उभे राहुन त्या काड्या सारणार्‍यांना विरोध करु पाहतात?
नाही, लगेच काही गैरसमज होऊ शकतील तेव्हा हे आधीच सांगते की मला किंवा कुणालाच इथे मिपावर मदतीची अपेक्षा नाहीये....हे फक्त उदाहरण म्हणुन दिले आहे. फक्त आवाज उठवला की लगेच हजार लोक धावुन येतात असेही नाही. अगदी वाईट पद्धतीने अनाहितांबद्दल बोललेले पाहिले आहे, अशा वेळीही गम्मत बघणारेच जास्त असतात. एखाद्या आयडीचे चुकते आहे, का उगाच अनाहितांविरुद्ध बोलले जाते असे म्हणणारे कमी असतात. आभासी जगात आणि प्रत्यक्ष वावरात फरक असतो हेही माहिती आहे, आणि म्हणुनच काही वेळा प्रत्यक्षात, जिथे जिवाची भिती असते, तिथे बेटर सेफ दॅन सॉरी हे धोरण स्विकारले जाते.
आता याही प्रतिसादातुन फाटे फोडले जातीलच, आवश्यक तिथेच प्रत्युत्तरे दिली जातील, अन्यथा नाही.

या सर्व प्रतिसादात अनाहिता नसलेल्या स्त्री सदस्यांनाही विनाकारण त्रास होतो. त्या मिपावरच्या एक सदस्य हे खरेतर पुरे आहे, त्यांना सपोर्ट करणे अथवा विरोध, वेगळी मते मांडणे यात अनाहिता म्हणुन काही वेगळे नाही.

पिशी अबोली's picture

12 Oct 2015 - 6:12 pm | पिशी अबोली

अतिशय नेमके.
या नेमक्या प्रतिसादानंतर अजून काही बोलायची गरज आहे असे काही वाटत नाही. फाटे फुटले तर फुटूदेत. या लेखावर अनेक पुरुष आयडींनी अतिशय विवेकी आणि त्यांचा पाठिंबा देणारे विचार मांडलेच आहेत. तशा विचारांचे लोक समाजात वाढीला लागावेत एवढीच इच्छा.

नीलमोहर's picture

13 Oct 2015 - 4:08 pm | नीलमोहर

मधुरा देशपांडे आणि पिशी अबोली दोघींशी १००% सहमत.

फक्त आवाज उठवला की लगेच हजार लोक धावुन येतात असेही नाही.

एखाद्या उदाहरणातून असे दाखवून देऊ पाहिले की विरुद्ध उदाहरणे असूनही विरुद्ध बाजू जणू होत्याची नव्हतीच होते, नै का?

प्रसाद गोडबोले's picture

12 Oct 2015 - 5:50 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम लेखन !

टिपीकल पुरूषी मनोवृत्ती

अर्थात हे सरसकटीकरण नाही.

ह्या दोन सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी वाक्यांनी घोळ केला इतकेच !!

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 6:44 pm | तर्राट जोकर

आता माझा शेवटचा प्रतिसाद या धाग्यावर---
बायको (पूर्वाश्रमीची प्रेयसी - माझीच बरंका) भडकलेली असते, कधी चिडलेली असते, कधी त्रासलेली असते, कधी उदास असते. मी तिला विचारतो काय झाले...? ती सांगते खूप काही, घरात घडलेलं, बाहेर घडलेलं, काही तरी बिघडलेलं, काहितरी बिनसलेलं.....

मी तिला उपाय सांगतो, उभारी आणण्याचा प्रयत्न करतो, समस्येवरचे समाधान, क्लृप्त्या सुचवतो, काही एक-घाव-दोन-तुकडे टिप्सही देतो.

तिला यातलं काही नको असते, काहीही करायचे नसते... तिला कसल्याही समस्येवर कसलेही समाधान नको असते. तिला फक्त तिचे कुणीतरी ऐकून घेणारे हवे असते, तिला किती त्रास होतो, ती कशी सहन करते हे समजून घेणारे हवे असते.

मला फक्त तोडफोड, खळ्ळ्ख्ट्याक करुन डोक्याला ताप देणारे प्रश्न संपवूनच टाकावे वाटतात.

ती म्हणते, इथे बस आणि फक्त ऐक माझं... काहीही उपाय नकोत मला.... फक्त ऐक माझं...

.... नंतर मी तिला इग्नोर मारायला लागतो.... कालांतराने.... जेव्हा ती खरीच बायको असते तेव्हा तर तीचं बोलणंही मला ऐकू येत नाही.....

मृत्युन्जय's picture

12 Oct 2015 - 7:29 pm | मृत्युन्जय

या प्रतिसादासाठी तजोंना माझ्यातर्फे जेव्हा कधी भेटतील तेव्हा एक मस्तानी (बाजीरावाची नाही) ;)

बॅटमॅन's picture

12 Oct 2015 - 7:43 pm | बॅटमॅन

आणि मजतर्फे एक मसाला ताक.

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 7:55 pm | जव्हेरगंज

Smiley drinking beer

तिला यातलं काही नको असते, काहीही करायचे नसते... तिला कसल्याही समस्येवर कसलेही समाधान नको असते. तिला फक्त तिचे कुणीतरी ऐकून घेणारे हवे असते, तिला किती त्रास होतो, ती कशी सहन करते हे समजून घेणारे हवे असते.

मला फक्त तोडफोड, खळ्ळ्ख्ट्याक करुन डोक्याला ताप देणारे प्रश्न संपवूनच टाकावे वाटतात.

मेन आर फ्रॉम मार्स.. वाचले आहे ना?

सतिश गावडे's picture

13 Oct 2015 - 11:28 pm | सतिश गावडे

मेन आर फ्रॉम मार्स.. वाचले आहे ना?

मी ही हाच प्रश्न विचारणार होतो. :)

सुबोध खरे's picture

12 Oct 2015 - 9:44 pm | सुबोध खरे

जोकर साहेब
कितीही कंटाळवाणे असेल तरीही मी बहुसंख्य वेळेस बायकोचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. बर्याच वेळेस तुमच्या कडे चांगला उपाय असेल तरीही तो स्त्रियांना पटकन मान्य होत नाही.उदा स्वयंपाकाच्या बाईनी न सांगता दांडी मारली तर मी म्हणतो पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन ये.
तरीही नुसते ऐकून घेतले तरीही तो प्रश्न सुटल्यासारखा असतो. उदा मुलांना शिस्त लावणे,मुलांचा अभ्यास आणी मोलकरीण हे कधीही पूर्ण न सुटणारे प्रश्न आहेत. स्थितप्रज्ञ होऊन ऐकून घ्यायचे. पाच ते सात मिनिटांनी बायको शांत होते आणी सर्वत्र शांतता पसरते. (या काळात मी मला आज करायच्या कामांची उजळणी करून घेतो.)

ब़जरबट्टू's picture

13 Oct 2015 - 3:20 pm | ब़जरबट्टू

पायांचा फ़ोटो पाठवा.. यापुढे हा सल्लाचा पाळनार आहे.. :)

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2015 - 10:31 am | पिलीयन रायडर

ती म्हणते, इथे बस आणि फक्त ऐक माझं... काहीही उपाय नकोत मला.... फक्त ऐक माझं...

पांडुरंग हरी...वासुदेव हरी...

नीलमोहर's picture

13 Oct 2015 - 5:16 pm | नीलमोहर

"स्त्रियांनी जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.."
- लेखात लिहीलं आहेच ते.

बाकी गंभीर धाग्याला विनोदी झालर लावण्याचे आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.

कालच्या आपल्या, " हे जे लेखातले विचार तुमच्या मनात आले ते का आले मग?.."
या धन्य वाक्याच्या धक्क्यातून सावरतच होते तोवर हे..

अशाने मग हसू आवरत नाही आणि विचार विस्कटतात हो.
असे एकाहून एक अचाट प्रतिसाद वाचतांना परत तेच वाटतं मग,
' का बरं आले ते विचार मनात..'

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 6:26 pm | तर्राट जोकर

तुमचा तुमच्याच विचारांच्या निश्चितीबद्दल संभ्रम आहे. तो संभ्रम लक्षात आला म्हणून ते धन्य वाक्य होते. तुम्ही प्रतिसादात दिलेली दोन्ही उदाहरणे आणि तुमचा बसमधला अनुभव यास आपण एकसमान समजता यात का गफलत आहे हे तुम्हास तुमचे तरी कळले का याचा विचार करत आहे. दारुडा/मनोरग्ण्/कुत्रा व विनयभंगाच्या हेतूने वागणारा, एक स्त्री म्हणून तुमचा अपमान करणारा, अंगचटीला येऊ पाहणारा एक इसम हे एकाच पातळीवर आहेत हे वाचून धन्य झालो होतो काल.

तोल सुटलेला दारुडा, मनोरुग्ण याविषयी एक थोडीफार सहानुभुती वा त्रयस्थ भाव असतात जनरली. दारूडा शुद्धीत नाही म्हणून त्याने बलात्कार केलेला चालेल का? ही नेमकी मर्यादा कशी सिद्ध करायची? कुठला अपमान हा नेमका 'टीपीकल पुरुषी मनोवृत्तीने' केलेला की बेशुद्ध अवस्थेतल्या दारुड्याने केलेला, कसा ओळखायचा... याचीही काही नॅक असेल आपणाकडे. आम्ही पुरुष आम्हा पामरांस ते ठवूक नाही.

लेखामधे आपण टीपिकल पुरुषी मनोवृत्ती हा शब्द वापरून त्या दारुड्यास समस्त पुरुष वर्गाचा प्रतिनिधी केले, मग प्रतिसादात त्याच दारुड्यास 'बिचारा, शुद्ध नै हो त्याला, त्याला काय कळत नै ना' असा हळवेपणाचा आविर्भाव मांडायचा. आपण सूज्ञ, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहोत असा मोठेपणा सांगून परत पब्लिक मदतीला येत नाही याबद्दल कांगावाही करायचा. इतके द्वंद्व....?

आपला धागा आपल्याच प्रतिसादांतून आपण हास्यास्पद केलात, इतर काहींनी त्यास पुरेपूर हातभार लावला. मी या सगळ्या चर्चेचे सार या प्रतिसादात मांडले आहे. तुम्हास ते रुचले नाही हा आपआपल्या बुद्धीक्षेत्रफळाचा प्रश्न.

तर... 'स्त्रियांनी बोलू नये वा विचार करू नये' असे मी मांडल्याचे तुम्ही म्हणताय ते तर मला कुठेच माझ्या प्रतिसादात दिसले नाही.

माझ्या या प्रतिसादाचा अर्थ होता की स्त्रियांना उपाय नको असतात, त्यांना चर्चा करायला आवडते, तो त्यांचा मूलभूत स्वभाव आहे. कुणीतरी म्हटलंय वरंच.. मेन फ्रॉम मार्स वाचलंय का..? त्यात हेच दिलंय. पुरुषांना समस्या संपवाव्या वाटतात, स्त्रियांना चघळत राहाव्याशा वाटतात. निसर्ग आहे हो. मी काही नविन मांडले नाही.

साधी गोष्ट आहे, बघा लक्षात येते का..? (स्त्रियांना कमी लेखण्याचा खाली परिच्छेदाचा अजिबात उद्देश नाही. माझे फक्त निरिक्षण आहे. सरसकटीकरण अजिबात नाही.)

किचन अप्लायंसेसचा वापर ९९% स्त्रिया करतात, किती स्त्रियांनी यातले अप्लायंसेसचा शोध लावला आहे? मला नाही खरंच माहिती. पण ऐकीवात नाही की कुणा महिलेने काम सोपे करणारे यंत्र शोधून काढले. (असे नसेल तर खरंच सांगा.) ते पुरुषांनीच केले. जेव्हा त्यांना किचन मधे जावे लागले तेव्हा ज्या अडचणी आल्या, जाणवल्या त्या सोडवल्या. अनंत काळापासून स्त्रिया किचनमधल्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर शोधतायत अजुन, त्यावर कायम चर्चा करत असतात, "आज काय भाजी करायची, काही सुचत नाही बुवा?" याच ठिकाणी पुरुष असते तर महिन्याचा तक्ता लावुन मोकळे झाले असते वा जे सुचेल ते बनवून तयार केले असते.

भारतातलाच एक आठ वर्षाचा मुलगा, आईला विहिरीवरून पाणी आणायला उशिर होऊन जेवायला वेळेवर मिळत नाही म्हणून वैतागला होता. एक दिवस गेला विहिरीवर, बघितलं आइ रहाटाने पाणी ओढत आहे. पारंपरिक रहाट... एका हाताने धरून दुसर्‍या हाताने ओढायचे, हात सुटला तर बादली परत विहिरीत. वेळ, श्रम जास्त लागत होते. मुलाने आईसाठी लॉक होणारे रहाट बनवले अगदी घरगुती साधनांनी. आइचा कितीतरी वेळ वाचला. भारतातल्या करोडो स्त्रिया रहाटाने पाणी काढत होत्या, त्यांनाही ही समस्या समजत होती. त्याबद्दल कुरकुर करत होत्या, पण उपाय एका आठ वर्षाच्या मुलाने काढला. कारण समस्या दिसली की सोडव असंच त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. यात कुठलाही पुरुषी मोठेपणा नाहीये. बहुसंख्य स्त्रियांना जे मल्टीटास्किंग जमतं ते बहुसंख्य पुरुषांना अजिबात जमत नाही. प्रत्येकाच्या आपआपल्या मर्यादा-क्षमता आहेत. कुणीही लहान मोठं नाही.

असो, सगळ्या प्रतिसादांमधून जाणवलं ते हेच, उपाय नकोय, चर्चा हवी आहे. समाज आपोआप बदलायला हवाय, त्यासाठी तुम्ही काही करा म्हटलं की लाख समस्या पुढे येणार. एक पुरुष म्हणून मला हे नैसर्गिकरित्या झेपलं नाही. म्हणून वरचा किस्सा सांगितला. उपाय सांगून करत नाही म्हटल्यावर माणूस दुर्लक्षच करणार की नाही..?

स्त्रियांनी बोलू नये विचारही करू नये हा अर्थ आपण काढलात ह्याबद्दल वैषम्य वाटले इतकेच. म्हणून हा प्रतिसादप्रपंच...

प्यारे१'s picture

13 Oct 2015 - 6:30 pm | प्यारे१

मल्टीपल थम्स अप.
(-वेल्लाभटकडून उधार.)

च्यामारी जोकर तर्राट हाय पण लॉजिकली परफेक्ट आहे. मानले बॉस.

ह्याला कारण कोण आहे? सातत्याने नावे ठेवणारे प्रामुख्याने पुरुष आहेत. हीच भाजी का केली? अशीच का केली? अमुक तमुकने केलेली तशी तुला जमतच नाही? मीठच कमी अन जास्त...इ. तुम्हीही हे ऐकले पाहिले असेलच. पुन्हा एकदा सांगतो कंडिशनिंग मुळे माणसांची नैसर्गिक सहज प्रवृत्ती अमूलाग्र बदलते. बायकांना उपाय नको असतात हा तुम्ही सोयिस्कर काढलेला अर्थ आहे. आपले प्रश्न ऐकून घ्यावेत असे प्रत्येकाला वाटत असते. दरवेळी त्यावर उपाय सुचतोच असे नाही किंवा कुणी सुचवला तरी लगेच अमलात आणला जातोच असेही नाही. अन्यथा पुरुषांच्या अनेक वायफळ चर्चात तावातावाने अनेक गोष्टींवरती टीका करणारे पुरुष सटासट सोल्यूशन्स काढताना दिसले असते की हो?
तेव्हा असं काही नसतं. स्त्री-पुरुषातले नैसर्गिक भेद, दृष्टिकोनातला फरक हे असणार आहे परंतु अनेक वर्षे झालेल्या कंडिशनिंगमुळे दोन्ही बाजू एकमेकाकडे बघताना विशिष्ठ चष्मा घालून बघतात आणि त्यातून प्रश्न सुटण्याऐवजी अधिक चिघळत जातात.

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 7:03 pm | तर्राट जोकर

माझा प्रतिसाद एवढा मनावर घेऊ नका हो. काय खरं काय खोटं सगळ्यांनाच कळतं. कंडीशनिंगच्या मुद्द्याशी सहमत आहेच पण हे एकतर्फी आहे असंही म्हणू नका. 'अन्याय सहन करणारा अन्याय करणार्‍यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो' हे वाक्य आजकाल कुणी बोलत नाही. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू आहेत हेही काही खोटं नाही. त्यांच्यातल्या अंतर्गत युद्धामुळे पुरुषांचेही कंडीशनींग झाले आहे हे कधी लक्षात घ्यावे? कुणी कोणाचे कंडीशनिंग केले, कशास कोण कारणीभूत आहे, जबाबदार कोण हे मुद्दे अनंतकाळापर्यंत चघळण्यासारखे आहेत. इथे मुद्दा आहे उपाय सुचवण्याचा व अंमलबजावणीचा, त्यास बहुतेक सद्स्यांनी आपआपल्या अनुभव-स्वभावानुसार जे उत्तर दिले. तेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते.

बाकी चालुद्या... भाजीत मिठ घाला नैतर मिठात भाजी. नवरा टिकवायचे कंपल्शन नसेल तर 'गेलास उडत' म्हणायचा ऑप्शन आहेच. वापरायचा की नाही हे सर्वस्वी संबंधित पक्षकारावर आहे. त्यात 'नवरा नसलेल्या बाईस मान नाही हो समाजात' अशी भीती घालणार्‍या बायकाच असतात हेही लक्षात असू द्यावे, त्यांच्या ह्या कंडीशनींगचा फायदा घेऊन एकटी बाई आपलीच मालमत्ता असल्यासारखे वागायला बघतात. जौ दे. आधीच मी बरंच लिहिलंय. परत तेच दळण नको...

चतुरंग's picture

13 Oct 2015 - 7:12 pm | चतुरंग

नाहीच म्हणूनच मी वरती म्हंटले की 'दोन्ही बाजू चष्मे घालून बघतात आणि प्रश्न चिघळत जातो.'
असोमामी देखील आता थांबावे म्हणतो! :)

चतुरंग's picture

13 Oct 2015 - 7:13 pm | चतुरंग

असे वाचावे. (नाहीतर पुन्हा ही मामी कोण असा इथेच धाग्यावर गहजब सुरु व्हायचा! ;) )

कुणा महिलेने काम सोपे करणारे यंत्र शोधून काढले.
रोटीम्याटिक.

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 7:05 pm | तर्राट जोकर

याबद्दल मनापासून धन्यवाद! अजून यादी मिळाल्यास आवडेल... माझी समजूत दूर होण्यास मदतच होइल..

स्वारी हां, ते एक कामच होऊन बसेल.

बॅटमॅन's picture

14 Oct 2015 - 1:13 am | बॅटमॅन

प्रतिसाद आवडला, फक्त इलस्ट्रेटिव्ह उदाहरण गंडले आहे.

पहिल्या रिलायबल डिशवॉशरचा शोध एका स्त्रीने लावलेला आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Dishwasher#History

तर्राट जोकर's picture

14 Oct 2015 - 10:21 am | तर्राट जोकर

ते गंडावेच अशी मनापासून खरोखर इच्छा होती. म्हणून आधीच म्हटलं की बुवा आपल्याला खरंच माहिती नाही, हे सगळं स्वतःच्या (कदाचित बायस्ड) निरिक्षणावर आधारित आहे. सरसकटीकरणाविरोधी तर आपण आहोच.

मादाम क्युरीपासून पहिल्या कारची पहिली ट्रायल घेणार्‍या स्त्रीपर्यंत आपल्याला सगळ्यांचे कौतुक आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2015 - 10:25 am | बिपिन कार्यकर्ते

जोकर, तुमच्या प्रतिसादातील अंडरलाइंग टोनशी बव्हंशी सहमत आहे. सरसकटीकरण नकोच. मात्र 'किती स्त्रियांनी अप्लायंसेसचा शोध लावला?' असा काहीसा प्रश्न तुम्ही विचारलात. त्या अनुषंगाने हे लिहित आहे.

आजवर जे काही शोध लागले आहेत, त्यातले ९९.९९% शोध हे काही तरी अडचणींवर मात करण्याकरता किंवा आळशी लोकांना काम सोपं करावंसं वाटलं म्हणून लागले आहेत. सो द लॉजिक डिक्टेट्स दॅट, जी कामे सहसा स्त्रिया करत असतात त्यातील अडचणींवर उपाय काढण्याचे विचार त्यांच्या मनात नक्कीच घोळत असणार. आणि त्यातून काही साधी साधी तंत्रं, उपाय, उपकरणंही विकसित झाली असणार. अर्थात, ती काही तशी फार मोठी अप्लायंसेस वगैरे नसणार त्यामुळे कोणाचं नाव वगैरे व्हायचा प्रश्नच नसणार. दही घुसळलं की लोणी वर येतं आणि खाली राहिलेलं पाणीही चविष्ट असतं, मग ते घुसळणं नीट व्हावं म्हणून रवीसारखं हत्यार बनवणं, किंवा उत्तरेत दिसते तशी दोरीने फिरवायची रवी तयार करणं हे स्त्रियांनी केलंच नसेल असं कशावरून? किंबहुना, मी तर म्हणतो की ते स्त्रियांनीच केलं असावं. शक्यता तर तीच जास्त आहे. दुसरं उदाहरण म्हणजे, आजीबाईचा बटवा. घरगुती वाणसामानाचे औषधी उपाय शोधून काढण्यात स्त्रियांचा सहभाग (रदर, पुढाकार) नसेलच का? पोरगं किरकिर करतंय? अमुक तमुक चाटव त्याला. शी करतंय? हे खाऊ घाल चिमूटभर. दात येताहेत? हे पाज. असले उपाय बायकांनीच शोधून काढले असण्याचा संभव जास्त आहे. अन्यथा, किती पुरूषांना रडक्या, गळक्या, हगर्‍या पोरांचा त्रास होत असेल? शक्यता बघू जाता, बायकांचा पुढाकार, गेला बाजार लक्षणिय सहभाग, जास्त असण्याची शक्यता नाकारता येईल का?

पुरूषांकडे शक्ती होती. त्यांचं शरीर जास्त बलदंड होतं. त्या जोरावर त्यांनी समाजावर प्रभुत्व मिळवलं. मग स्त्रियांनी युक्तीचा सहारा घेऊन पुरूषांना कह्यात ठेवायला सुरूवात केली. दीर्घकाळ दबून राहावं लागलेला कोणताही समाजघटक त्यातून मार्ग काढायचा, आयुष्य सुसह्य बनवायचा प्रयत्न करतोच. (अमेरिकेतील काळ्या गुलामांनीही असे अनेक मार्ग शोधून काढले होतेच.) त्यामुळे, स्त्रिया अशा मार्गाने गेल्या असाव्यात हे अगदीच नैसर्गिक आणि लॉजिकल आहे.

आधुनिक काळात अप्लायंसेस बनवण्याकरता केवळ अडचणीवर मात करायची इच्छा असणं किंवा काम सोपं करू बघायची वृत्ती असणं हे आणि एवढंच पुरेसं नाही. त्याकरता विज्ञान, तंत्रज्ञान वगैरेंची गरज आहे. सर्वच समाजांमधून फॉर्मल शिक्षणात स्त्रियांचा सहभाग जवजवळ नव्हताच. प्रगत देशातही गेल्या पन्नास साठ वर्षात स्त्रिया उच्चशिक्षण घेऊ लागल्या आहेत. त्यातही परत कितीही शिकलेली स्त्री असो, तिला (पुरूषाला घरापासून जेवढे मोकळे होता येते तेवढे) घरापासून मोकळे होता येत नाही. म्हणजे, त्यात वेळ, श्रम गेलेच. उरलेल्या वेळातून, पुरूषसत्ताक समाजात वावरताना येणार्‍या आव्हानांशी लढण्यात परत वेळ आणि मानसिक बळ वाया जात असेल तो वेगळाच. एवढी सगळी उस्तवार करून परत वर अप्लायंसेस शोधून काढण्याचे उपद्व्याप करा! इजन्ट इट अ टॅड टू मच टू आस्क?

त्याउप्परही स्त्रियांनी लावलेले शोध शोधण्यात गूगलबाबाची मदत घेतली तर बरंच काही सापडलं. मी 'appliances invented by women' ही फ्रेज सर्च केली. करून बघा. मला वेळ नाहीये फारसा, पण एक सहज नजर मारली तरी बरंच काही दिसलं. वानगीदाखल दोन दुवे देतो. त्यातही, स्त्रियांना येणार्‍या अडचणींशी किंवा सहसा जी कामे त्या करतात त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील.

गूगल सर्च : https://www.google.co.in/search?q=appliances+invented+by+women&ie=utf-8&...

१. https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20081010060308AAkFsd2
२. http://mentalfloss.com/article/53164/19-things-you-might-not-know-were-i...
______________________________________________________________________________
हा प्रतिसाद, कोणत्याही अडचणींवर जिद्दीने मार्ग काढणार्‍या माझ्या अनेक आज्ज्या आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईला समर्पित.

(घाईघाईत टंकलंय. दिवस सुरू करायचाय. त्यामुळे विस्कळित झालंय हं. सांभाळून घ्या.)

तर्राट जोकर's picture

14 Oct 2015 - 10:41 am | तर्राट जोकर

कोणत्याही अडचणींवर जिद्दीने मार्ग काढणार्‍या माझ्या अनेक आज्ज्या आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईला समर्पित.

हजारदा सहमत...

चतुरंग's picture

14 Oct 2015 - 3:22 pm | चतुरंग

एकदम सहमत रे बिका! :)

नीलमोहर's picture

14 Oct 2015 - 4:42 pm | नीलमोहर

तुमच्या प्रतिसादासाठी आणि एकूणच लेखावरील स्पष्टीकरणासाठी हा माझा शेवटचा प्रतिसाद.

मी काही कोणी नवतरुणी नाही जी पहिल्यांदाच आलेल्या एका अनुभवाने बावरून, गोंधळून गेली
आणि लगेच तिने 'सुंदर, संवेदनशील..' शब्दांत लेख लिहून कौतुक, सहानुभूति मिळवण्यासाठी मिपावर दिला.
हा अनुभव इथे देण्यामागे विचारांचे प्रकटीकरण आणि शेअरिंग हे दोनच हेतू होते, आहेत.

१. मी लेखक नाही, मला लिहिता येत नाही.
या लेखातील चुका शोधा असं सांगितलं तर कदाचित सगळ्यात जास्त मीच शोधून देऊ शकेन.
वरील पूर्ण प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आहे पण ते शब्दांत उतरवणं कदाचित नीट जमलं नाही, लेख फार मोठा
झाला होता त्यामुळे बरीच काटछाट केली, त्यात काही महत्वाचे मुद्दे पूर्णच गाळले गेले हे नंतर लक्षात आलं आहे. शब्दरचना, वाक्यरचना यातही चुका असतील, त्यामुळे विचार स्पष्टपणे मांडले गेले नसतील तर ती अर्थातच
माझ्या लेखन (अ)सामर्थ्याची मर्यादा आहे.

विचारांच्या संभ्रमाबद्दल म्हणायचं तर, डोक्यात अनेक विचार असतात, लिहितांना ते ' लॉस्ट इन ट्रांसलेशन' होऊन कन्फ्यूजन शब्दांमध्ये उतरू शकतं, म्हणजेच विचार स्पष्ट असतात फक्त ते शब्दांत मांडतांना गोंधळ होऊ शकतो.

तरी त्या चुकांसकटही काही लोकांपर्यंत लेखामागील भावना पोहोचलेली आहे, त्यातून घ्यायचा तो भाव लक्षात घेऊन त्यांनी त्यानुसार वाजवी प्रतिसादही दिलेत हे लक्षात घ्यावे ही विनंती.

२. " तोल सुटलेला दारुडा, मनोरुग्ण याविषयी एक थोडीफार सहानुभुती वा त्रयस्थ भाव असतात जनरली. दारूडा शुद्धीत नाही म्हणून त्याने बलात्कार केलेला चालेल का? ही नेमकी मर्यादा कशी सिद्ध करायची?"

- हे असं चालेल का तुम्हीच लॉजिकली विचार करुन सांगा,
माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की तो दारुडा त्याक्षणी हार्मलेस होता, बाकी इथे अजून काहीही लिहिले
तरी ते काँट्राडिक्टरी होणार.

इथे मी अजून दोन अनुभव सांगेन,
अ. एकदा आई आणि मी बसमध्ये बसलो होतो, ती बस नादुरुस्त असल्यामुळे ती कॅन्सल करून दुसर्‍या बसमध्ये बसण्यास सांगितले गेले , सगळे पटापट तिकडे निघाले, बसच्या दारात आई चढत असता एक तरुण तिला धक्का देऊन पुढे घुसला, तिथे आई जवळजवळ पडलीच असती. मी तिथे त्याच्या पाठीत जोरात फटका मारला, (हात साफ केल्यानंतरचा तो आनंद अवर्णनीय होता !) त्याच्यावर काहीच परिणाम नव्हता, तो निर्लज्जासारखा आत जाऊन बसला.

ब . १०-१२ वर्षांपूर्वीची घटना,
नवीन जॉब असल्यामुळे छान टॉप, ट्राऊझर घालून घरातून निघाले होते. शनिपार चौकाजवळ एका तृतीयपंथियांने माझा हात कोपराजवळ धरला आणि पैसे मागितले, त्याचा हात झिडकारून पुढे जाऊ लागले तर त्याने पकड़ अजून घटट केली आणि कपड्यांवरून एक अतिशय वाईट धमकी दिली.
तो एकतर खूपच जवळ उभा होता,त्याचे तांबारलेले डोळे , भडक मेकअप, पानाने रंगलेले लालभडक ओठ पाहून
किळस येत होती आणि घाबरलेही होते, त्यात ती धमकी ऐकून मी हादरले.

त्याचा एकूण खुनशी आवेश पाहता तो जे म्हणतोय ते भर रस्त्यात ही खरं करू शकेल याबद्दल मला त्याक्षणी
अजिबात शंका वाटली नाही. तिथे त्याच्यापासून सुटका हे एकच लक्ष्य समोर होते त्यामुळे मी काही सुट्टे पैसे
काढून देऊ लागले तर म्हटला चिल्लर नहीं लेता मैं, मग वीस रुपये काढून त्याला दिले आणि सुटका करुन घेतली.
त्याक्षणी त्याला प्रतिकार, फटका, लाथ, पर्स इ.मारणे काहीही सुचले नाही, शक्यही नव्हते कारण त्याची शारिरीक ताकद जास्त होती, आणि त्याने कपड्यांना हात लावेपर्यंत मी थांबू शकत नव्हते.

इथे पेठकर काकांचा, "प्रत्येक सबल हा दुर्बलावर अन्याय करू शकतो, करतो. मग तो श्रीमंत/गरीब असो,
ऑफिसातला बॉस/कर्मचारी असो, पुरुषांमध्येही ताकदवान/दुबळा असूदे. सर्वत्र हे अन्याय होतात,"
- हा प्रतिसादही प्रातिनिधिक आहे.

अनेकदा आपली बाजू बरोबर असतांनाही आपण माघार घेत असतो.
उदा. ऑफिसमध्ये सिनियरच्या विरोधात जाऊ नका,
घरी अमुक लहान आहे, तमुक मोठा आहे, तुम्ही समजूतदार आहात, वाद घालू नका
अनोळखी लोकांबरोबर वाद कशाला घालता,
लांब कशाला जायचं, इथे मिपावर अमुक प्रस्थापित आयडी बरोबर वादात पडू नका,
मग काय, घ्या माघार.
कित्येकदा आपली बाजू बरोबर असतांनाही माघार घ्यावी लागत असते,
जिथे योग्य, गरजेचं असतं तिथे आपण माघार घेत असतो, नाही तिथे नाही.

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की समोरील परिस्थितीनुसार माणूस रिएक्ट होत असतो.

३. "आपण सूज्ञ, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहोत असा मोठेपणा सांगून परत पब्लिक मदतीला येत नाही
याबद्दल कांगावाही करायचा."

- इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते,
- एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले,
पब्लिकबद्दल ही दोनच वाक्य लिहिलीत, यात मदतीची अपेक्षा, कांगावा माझ्या मते नाहीय.

४. टिपीकल पुरूषी मनोवृत्ती: त्या दारुड्यास समस्त पुरुष वर्गाचा प्रतिनिधी केलेले नाही, लेखातील तो संदर्भ
ठराविक लोकांसाठीच होता. कदाचित तिथे फक्त 'मनोवृत्ती' लिहिवयास हवे होते, तरी टिपिकल, पुरुषी
या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे.

" वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं,
मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये,
जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये..
एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता.
अर्थात हे सरसकटीकरण नाही"

वर दिल्याप्रमाणे वाचावे.

५. " स्त्रियांनी बोलू नये वा विचार करू नये' असे मी मांडल्याचे तुम्ही म्हणताय ते तर मला कुठेच माझ्या
प्रतिसादात दिसले नाही."
- तुमची बायको बोलत असता तुम्ही 'इग्नोर' मारता असं लिहिलंत त्यासाठी ते म्हटलं होतं.

६. " उपाय नकोय, चर्चा हवी आहे. समाज आपोआप बदलायला हवाय, त्यासाठी तुम्ही काही करा म्हटलं की
लाख समस्या पुढे येणार"

- उपाय हवेतच, अनेकांनी वर दिलेतही. अर्थात ते उपाय आम्हालाही माहीत असतात, नाही असे नाही,
परिस्थिती पाहून ते वापरले जातही असतात. प्रामाणिक, कंस्ट्रक्टिव्ह चर्चा होत असेल तर त्यालाही हरकत नसावी.

माझी ९ वर्षीय भाची आहे ती मला सांगते बसने जाशील तेव्हा जेंट्स शेजारी बसू नको, लेडीज जवळ बस.
हे तिला कोणी काही सांगितलं, शिकवलं नव्ह्तं पण इतर लोकांचं बोलणं, टीव्ही, आजूबाजूचे ऐकून, पाहून
तिलाही या गोष्टींची समज येऊ लागली आहे. अर्थात तिच्यासारख्याच इतरही लहान मुला-मुलींना आम्ही,
आपण सगळेच सक्षम होण्याबद्दल शिकवत असतो, घरात चांगले संस्कार देऊन वाढवत असतो जेणेकरून
येणारी पिढीही अधिक सजग, समर्थ बनेल.

७." किती स्त्रियांनी यातले अप्लायंसेसचा शोध लावला आहे? "

- स्त्रियांनी लावलेले काही शोध,
http://mentalfloss.com/article/53164/19-things-you-might-not-know-were-i...
याशिवायही इतर बरेच आहेत, गुगलवर शोधल्यास सहज सापडतील.

हे असे अनुभव वारंवार, जिथे-तिथे येत राहतात, एका पॉइंटनंतर त्याकडे दुर्लक्ष करणं हा मार्ग निवडला जाऊ शकतो
हे टीकाकारांनी लक्षात घ्यावं एवढीच अपेक्षा.
काही गोष्टी पुरुष समजून घेऊ शकत नाहीत कारण अर्थातच ते त्या जागी नसतात, काही अनुभव त्यांनी कधीच घेतलेले नसतात, त्यासाठी 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.'
असो.

धन्यवाद
.

तर्राट जोकर's picture

14 Oct 2015 - 6:33 pm | तर्राट जोकर

धन्यवाद! काही मुद्द्यांबाबत सहमती वा मतभेद राहतीलच.

पुढील लेखनास मन:पुर्वक शुभेच्छा!

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2015 - 9:11 pm | प्रभाकर पेठकर

लेख वाचला. प्रतिसादही वाचले. कांही पटले, कांही खटकले. पण असो.

पहिली गोष्ट स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत. ज्यात एक दुर्बल आणि दुसरा सबल आहे. ह्याला अपवादही आहेत पण सर्वसाधारणपणे दिसणारे हे सत्यचित्र आहे. प्रत्येक सबल हा दुर्बलावर अन्याय करू शकतो, करतो. मग तो श्रीमंत/गरीब असो, ऑफिसातला बॉस/कर्मचारी असो, पुरुषांमध्येही ताकदवान/दुबळा असूदे. सर्वत्र हे अन्याय होतात.
स्त्रियांची अवस्था अत्यंत वाईट असते कारण त्या पुरुष ह्या ताकदवर वर्गाला टाळू शकत नाही. आणि गर्दीचा फायदा घेत अनेक पुरुष(?) आपल्या अतृप्त शारीरीक इच्छा अंशत: तरी पुर्‍या करताना आढळतात.
इतर अनेक बघ्याची भूमिका घेतात ह्याला कारण पोलीसांची निष्क्रियता आणि गुंडाराज. रागाच्या तिरिमिरीत एखादा त्या अत्याचारी व्यक्तिशी चार हात करेलही. पण बहुतांश विचार करतात आज मी ह्याला धोपटून काढेन पणप्र उद्या ह्याची माणसं येऊन माझी धुलाई करतील. पुन्हा पोलीस केस आधीच आपल्या जीवनात त्रास, व्याप, चिंता, विफलता कमी नसते त्यात अजून स्वतःहून भर का घाला?
अशा माणसांच्या गैरवर्तनाला सुरुवात होते त्याने स्त्रीयांना झटकन राग येतो. कारण त्यांना हे सर्वत्र अनुभवास येत असते. प्रतिकाराची शारीरीक क्षमता नसल्याने आतल्याआत संताप होतो पण असहाय्यता जाणवते. असे प्रसंग पुरुषांवर येत नाहीत त्यामुळे त्यातील दाहकता त्यांना जाणवावी तेव्हढी जाणवत नाही. त्यामुळे ते लगेच अशा प्रसंगात कांही कृती करीत नाहीत (ज्यामुळे अभागी स्त्रीला जास्त संताप येतो.) जसं पुरुषांना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत नसल्याने त्याची दाहकता समजत नाही तसेच मारामारीचे प्रसंग स्त्रीयांवर येत नसल्याने पुरुषांची निष्क्रियता त्यांना अन्यायकारक वाटते. गर्दीत एखाद दुसर्‍या बाईने पुरुषाशी लगट केली (असेही होते) तरी पुरुष सर्व स्त्री जातीला 'चालू' समजत नाही पण एखाद्या पुरुषाच्या गैरवर्तनाने तमाम पुरुष जात बलात्कारी ठरते. ह्याला ही कारण तेच असते, की स्त्रीयांना अशा प्रसंगांना घरातून बाहेर पडल्यापासून घरी परतेपर्यंत ठायी ठायी अनुभव येत असतात. पण जेंव्हा असं सार्वत्रीकरण केलं जातं तेंव्हा असे न वागणारे पुरुष दुखावतात आणि कधी कुठल्या स्त्रीच्या सहाय्याला न जाता 'बघ्याची' भूमिका घेतात.
स्त्रीयांना खुप सोसावे लागते हे मान्य असले तरी स्त्रीयांनी सरसकटीकरण सोडून दिल्यास अजून कांही पुरुष त्यांच्या सहाय्याला येतील.
पण स्त्रीने पुढाकार घेऊन त्या मवाल्याच्या थोबाडावर चप्पलेने प्रहार केला आणि तिथे उपस्थित सर्व स्त्रिया त्या मवाल्याच्या अंगावर धावून गेल्या तर खुप फरक पडेल. पुरुषही अशा वेळी बघ्याची भूमिका घेणार नाहीत. अशी कांही अट नसली तरी वातावरणातील फरक त्यांच्या वृत्तीत बदल घडवू शकतो.
पुरुष नेहमीच गप्प बसत नाहीत. तरूण आणि ताकदवर पुरुष अनेकदा पुढाकार घेतात. ५०+ पुरुषांना ते तितक्या लगेच शक्य होत नाही. पण त्यांनी निदान गर्दीचा फायदा तरी घेऊ नये. पण दुर्दैवाने असे पुरुषही फायदा घेताना दिसतात.
प्रचंड लोकसंख्या, सार्वजनिक वाहतुकीची अपुरी साधनं (त्यामुळे गर्दी), पुरुषांची मानसिकता, स्त्रियांची दुर्बलता (शारीरीक आणि मानसिक) आणि पोलीसांची उदासिनता (तेही त्यांची संख्या कमी, गुन्ह्याचे वाढते प्रमाण, राजकिय हस्तक्षेप) वगैरे वगैरेनी जन्माला घातलेल्या ह्या समस्या कधी हद्दपार होतील असे वाटत नाही.

नीलमोहर's picture

13 Oct 2015 - 3:54 pm | नीलमोहर

अगदी योग्य, मुद्देसूद आणि समंजस प्रतिसाद,
धन्यवाद.

धागा वाचला, प्रतिसादही वाचले. प्रत्येक प्रसंग निराळा, वेळ, मूड, शक्ती, मानसिक अवस्था सगळे निराळे असते. एखाद्यावेळी अचरटपणा करणार्‍या मनुष्यास ठोकून काढणारी महिला पुढीलवेळी तश्याच शारिरिक अवस्थेत असेल असे नाही. मुले लहान असताना रात्रीची जाग्रणे करून दुसरे दिवशीचे आपिस गाठताना कसाबसा आजचा दिवस रेटून रात्री झोप पूर्ण करू हीच आशा असते. मग कोणी बसमध्ये, कामाच्या ठिकाणी असले वर्तन केल्यास राग जसा यायला हवा तसाच येतो पण शक्ती जितकी असेल त्यानुसारच महिलेचे वर्तन असते. एवढ्यात दोन भारतीय हलकटांचा अनुभव घृणास्पद असा आला. सगळ्याच पुरुषांना वाईट म्हणत नाहीये, कारण असे असते तर बाकीच्याही अनेक देशांचे आजूबाजूला रहात असलेले पुरुष असलेच वर्तन करताना दिसले असते. मुलांसाठी हा लांबडा विकांत असल्याने मॉलमध्ये भरपूर गर्दी होती. तेथे काम करणार्‍या एका महिला पोलीसाकडे आपल्या भाषेत दोन भारतीय पंचविशीची मुले ज्याप्रकारे बोलत होती त्यावरून त्यांचे संस्कार दिसत होते. स्त्री हा प्राणी पुरुषांकडून असलेल्या कमेंटा ऐकण्याकरता नक्कीच जन्माला आलेला नाहीये. सगळे भारतीय पुरुष वर्णन केलेल्या प्रकारात मोडत नाहीत पण जास्त टक्केवारी ही असल्यांचीच आहे. त्यातून संस्कारास कमी पडलेले पालक दिसून येतात. शिक्षणात तुम्ही किती हुषार आहात, कोणत्या हुद्द्यावर नोकरी करता याचा आणि चांगल्या, सभ्य वागणुकीचा काडीमात्र संबंध नाही, कारण कित्येक अल्पशिक्षित, अशिक्षित पुरुष सभ्य असतात.

चलत मुसाफिर's picture

13 Oct 2015 - 1:19 pm | चलत मुसाफिर

लेख वाचला आणि मुद्दाही पटला. स्त्रियांना सार्वजनिक अवकाशात वावरताना ज्या दिव्यातून रोज जावे लागत असेल (अर्थात पुरुषांमुळे), त्याची कल्पना पुरुषांना येणे कदापि शक्य नाही. जोवर पुरुषी अहंकार थेटपणे दुखवला जात नाही तोवर तेही अशा वेळी थंड बसतात.

स्त्री-पुरुष आकर्षण हे पूर्णतः नैसर्गिक आहे. समाजाने या सुंदर भावनेची केलेली मोडतोड, त्यावर लावलेले सत्ताकेंद्रित आर्थिक आणि सांस्कृतिक निर्बंध यांमुळे या आकर्षणाचे विकृतीकरण झालेले आहे. परिणामस्वरूप, अन्यत्र हतबलतेची शिकार असलेला पुरुष सार्वजनिकरीत्या स्त्रीचा संकोच करण्यातून आपले गमावलेले पौरुषत्व पुन्हा मिळवू पहात असतो.

सांगणे सोपे, करणे अवघड हे मला माहीत आहे. तरीही सल्ला देतो.

१. गावगुंडांना भिऊन जगावरचा हक्क सोडू नका. शहरातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली यावर पुरुषांएवढाच हक्क स्त्रियांचा आहे. तो भांडून मिळवावा लागला तरी बेहत्तर, पण गाजवा. जे मदतीला धावून येतील, ते तुमचे साथी समजा. जे येणार नाहीत ते मुळातच कुचकामी असणार. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या?

२. असे प्रसंग घडले, तरी निराश होऊ नका. मन मोडून घेऊ नका. गलिच्छ भाषा कानावर आली म्हणून बावरून जाऊ नका. मनातला राग गिळू नका. तिथेच पलटवार करा. स्त्रीच्या मनातली अनाम भीती ही पुरुषाच्या पथ्यावर पडते हे विसरू नका.

३. स्वतःला कदापि दोष देऊ नका. स्त्रीत्व हा तुमचा प्रमाद नसून ती एक अनमोल देणगी आहे.