वाढणी: ५
पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ किलो. गोड्या वालाच्या शेंगा
१ मातीचा माठ
मीठ चवी प्रमाणे
बटाटे ३/४
कांदे ३/४
खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
मसाला (सारणासाठी)
भांबुर्डीची पाने
भरपुर पला-पाचोळा, सरपण
क्रमवार मार्गदर्शन:
पोपटी ही एक गावरान पाककृती (?) आहे. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसुन गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगणे खूप अवघड आहे.
अलिबाग ते रेवदंडा (जि. रायगड) या परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात. अशा वालच्या शेंगा घ्याव्या. ताज्या ताज्या शेतातून काढून आणल्या असतील त फ़ारच उत्तम. (या शेंगा दिसायला थोड्याफ़ार घेवड्याच्या शेंगेसारख्या दिसतात पण आकाराने लहान असतात) या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून घ्याव्या.
बटाटे व कांदे धुवून घ्यावेत. कांदे सोलून घ्यावेत. भरली वांगी करतात त्याप्रमाणे कांदे व बटाटे कापून घ्यावे.
सारण तयार करण्यासाठी खरवडलेला ओला नारळ, मसाला, मीठ, थोडे तिखट चवी प्रमाणे एकत्र करावे. कापलेल्या कांदे व बटाट्यांमध्ये हे सारण भरावे. प्रत्येक कांदा / बटाटा छोट्या सुताने बांधून घ्यावा.
मातीचे मडके घेऊन त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली भांबुर्डीचा पाला भरावा. मग त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि चवी प्रमाणे मीठ टाकावे. उरलेल्या जागेत भांबुर्डीचा पाला ठासुन भरावा.
सगळे सरपण एकत्र करावे. त्यामधे या माठाला ठेवावे (पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतले जिन्नस बाहेर येत नाहीत) आणि बिनदिक्कत आग लावून द्यावी. जाळ करतान एक दक्षता घ्यावी, माठाच्या सर्व बाजूंनी सरपण असेल. ३० ते ४० मिनीटे असाच जाळ राहू द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल. आशा वेळी त्यावर जळत असलेले सरपण थोडे बाजुला करून माठावर ओंजळीतून पाणी शिंपडावे. पाण्याच फ़ेस झाला तर पोपटी झाली असे समजावे.
काठीने तो माठ बाहेर काढावा. काठीनेच वर भरलेला भांबुर्डीचा पाला काढावा. मग़ शेंगा, बटाटे, कांदे काढून घ्यावे. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या. शेंगा खाल्यावर ३० मिनीटे पाणी पिण्याचे टाळावे.
अधिक टीपा:
मी आत्ता माझ्या गावला नागांव येथे गेलो होतो. माझे एक स्नेही श्री. केळकर (रा. चौल) यांच्याकडे गेलो असता पोपटी कशी करतात हे बघण्याचा व खाण्याचा योग आला. तेंव्हाच ठरवलं मिपा (केशवसुमारशेठ यांचा(ची) मान राखुन) वर ही आगळी वेगळी डिश द्यायची. खरं म्हणजे हे सगळं करणं आपल्या शहरात शक्य नाही. तरी पण नुसतं वाचण्यात देखिल मजा आहे.
या प्रांतातील प्रत्येक शेतकरी एकदा तरी पोपटी करतोच. विशेषतः होळी शिमगा यात पोपटीची धमाल असते. लोकांच्या शेतातील वालच्या शेंगा चोरून त्याची पोपटी लावली जाते.
कुणी सदस्य जर अलिबाग रेवदंडा या भागात असतील आणि या व्यतिरीक्त अजून माहिती कुणास असेल तर जरूर द्यावी. कुणी तेथे गेल्यास जरुर चौकशी करावी.
याच वालच्या दाण्यांची भाजी करतात त्याला डाळींब्या म्हणतात. डाळींब्या म्हणजे तेथील पक्वान्न आहे. माझी आई उत्तम डाळींब्या करते, तिच्याकडून पाककृती घेऊन मनोगत वर निश्चीत पाठवेन.
प्रतिक्रिया
14 Jan 2008 - 1:33 pm | प्रशांतकवळे
सुन्दर...
थोड्या सुचना -
मीठाऐवजी शेतामध्ये "खारा दवणा" मिळतो, तो वापरून बघा... सुन्दर चव येते. आम्ही कधी मीठ नाही वापरले (मी अलिबाग - सासवने चा रहिवासी आहे)
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
प्रशान्त
14 Jan 2008 - 1:49 pm | बहुरंगी
प्रशान्त,
पुढे कधी योग आला तर निश्चित खारा दवणा वापरुन बघेन.
कुठल्याही प्राण्याची पोपटी खल्ली तर घरी तिर्थरुप माझाच दवणा करतिल.
आपला,
बहुरंगी मिसळे
14 Jan 2008 - 8:53 pm | सुनील
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
लवकर द्या !
अलिबाग भागात पावसाळ्यात शेतात जिताडा नावाचा मासा मिळतो. कधी खाल्ला आहे का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Jan 2008 - 11:49 am | प्रशांतकवळे
खुप वेळा खाल्ला आहे जीताडा..
हा मासा शेतात, तळ्यात आणि खाडीत मिळतो. शेतातला "दि बेस्ट" त्यानन्तर तळ्यातला, नन्तर खाडीतला.
कापणीच्या वेळेला शेतकरी शेतात फक्त भाकरी घेऊन जातात, आणि शेतातला जीताडा पकडून तिथेच शिजऊन खातात....
प्रशान्त.
15 Jan 2008 - 12:16 pm | बहुरंगी
अलिबागला जाताना पोयनाड या गावात रस्त्यालगत एक फलक आहे .... "येथे जिताड्याची पिलले मिळतील." (तेथे पिलले असेच लिहिले आहे). महिन्यातुन एकदा तरी नागांवला जातो आणि जाता येता नित्यनेमाने गाडी हळू करुन हा फलक वाचतो. पोयनाडचे अलिकडे, शहाबाज येथे देखिल जिताड्यची पिल्ले मिळतात. अगदी बारमही ....
आपला,
बहुरंगी मिसळे
28 Jan 2009 - 12:18 pm | केवळ_विशेष
प्रोपायटर धुमाळ नावाचे गृहस्थ आहेत...आणि 'पिलले' हे पांढर्या अक्षरात लाल पाटीवर लिहिलं आहे...अलिबागला जाताना उजवीकडे आहे ते... पण पेण कडे येतांना जी पाटी आहे त्यावर व्यवस्थित पिल्ले असं लिहिलं आहे... :)
14 Jan 2008 - 1:53 pm | नंदन
'पोपटी'बद्दल बरंच ऐकून होतो. प्रत्यक्ष पाककृती आता वाचायला मिळाली. धन्यवाद!
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
14 Jan 2008 - 1:55 pm | केशवसुमार
अधिक टीपा:
मी आत्ता माझ्या गावला नागांव येथे गेलो होतो. माझे एक स्नेही श्री. केळकर (रा. चौल) यांच्याकडे गेलो असता पोपटी कशी करतात हे बघण्याचा व खाण्याचा योग आला. तेंव्हाच ठरवलं मनोगत वर ही आगळी वेगळी डिश द्यायची.
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
बाकी पाककृती उत्तम..
(दक्ष)केशवसुमार
14 Jan 2008 - 2:14 pm | विसोबा खेचर
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
अरे केशवा, चालायचंच! आपल्या मिपाला कापीपेस्टचं वावडं नाही! उद्या बहुरंगीदादांना मिपाबद्दल अधिक प्रेम उत्पन्न झाल्यास ते प्रथम मिपावरच लेखन करू लागतील! :)
बाकी, पोपटीची पाककृती खरंच आगळीवेगळी आणि उत्तम आहे हो! गेल्याच वर्षी पाली-सुधागड येथे शेतात पोपटी खाल्ली होती!
यावर्षी, अजून योग नाही...
तात्या.
14 Jan 2008 - 2:55 pm | बहुरंगी
अहो केशवसुमार शेठ,
आपलं म्हणणं मला अगदी पटलं. २ वर्षांपूर्वी हिच "पोपटी" मी मनोगतावर टाकली होती. कदाचित अजुनही तिथे तुम्हाला सापडेल. मनोगतावर मि फार काही लेखन केल नव्हतं. जे काही केलं होतं ते माझ्या संग्रही आहे. सध्या वालांचा सिझन आहे, त्यामुळे मिपावल्यांना लवकरात लवकर हि पाककृती वाचावयास मिळावी हा उद्देश. त्यात हा तुम्ही म्हणता तो "कापी पेश्ट" चा घोळ झाला खरे. घाई घाईने एकात दुसरं मिसळलं जायचच....
आणि अजुन एक .... शेठ असं काही म्हणू नका ...
अरे तात्या .... हि शेठ, साहेब, राव सगळी अडाण**** भानगड संपव रे एकदा ....
आपला,
बहुरंगी मिसळे
14 Jan 2008 - 7:49 pm | ऋषिकेश
पोपटी हा खास जिव्हाळ्याचा पदार्थ! पोपटीशिवाय माझी एकही थंडी सरली नाही! :) (खरंतर भारतात असेपर्यंत नव्हती.. :( )
बहुरंगी, इथे हा पदार्थ दिल्याबद्दल अनेक आभार.
महत्वाची सुचना: :-) पोपटी हा केवळ खाद्यपदार्थ नसून तो कौटुंबिक सोहोळा आहे. तेव्हा घरी करण्याचा हा पदार्थ नसून हा कार्यक्रम किमान १० लोकांनी एकत्र येऊन मस्तपैकी अंगणात/परसात करावा. १-२बीएचके मधे होणारी हि साधीसुधी डिश नव्हे. याची ऐट आणि जिव्हाळा वेगळाच! जितकी मंडळी अधिक तितका हा पदार्थ रुचकर लागतो.
अजुन काहि:
१. भांबुर्डीचा पाला या काळात मुबलक असतो. कोणत्याहि मैदानात गेलात तर मिळेल. बाजारात जो विकायला येतो तो जून असतो.
२. बटाटे व कांदे जितके छोटे तितके रुचकर. पण बेबी पोटॅटोज आणि बेबी ओनियन्स नावाचे जे बेचव संकरीत खाद्य आलं आहे ते मात्र वापरू नका. एकवेळ मोठे बटाटे /कांदे चालतील पण हे बेबीवाले कृत्रिम नकोत
३. पोपटीमधले रताळे, अळूचे मुळ इं कंदही उत्तम लागतात
४. पोपटीच्या शेकोटीत नारळ टाकावा. छान खरपूस खोबरे कोणाला आवडत नाहि :)
५. कृपया शेकोटीसाठी रॉकेल वापरू नये. केवळ सुकापाला, गोवर्या, सुक्या झावळ्या वगैरे वापराव्या. वारा असेल तर फुंकणीने ज्वाळ तयार करावा. रॉकेलने पोपटीला एक वेगळा दर्प येतो.
(पोपटी आवडणारा) ऋषिकेश
14 Jan 2008 - 7:55 pm | स्वाती दिनेश
हे वाचूनच एखाद्या शेताच्या बांधावर गेल्यासारखे वाटले,वर्णनावरून हा पदार्थ गुजराती उंदीओचा भाऊबंद वाटतो आहे.
स्वाती
14 Jan 2008 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोपटी पाककृती पहिल्यांदाच वाचली. पाहणे तर दुर आणि खाणे तर कितीतरी मैलावर :(
पण, अनेकांनी एकत्र येऊन खाण्यासाठी इंजॉय करायचा पदार्थ इतकेच कळले. :)
आमच्या मराठवाड्यात याला दुसरे नाव तर नाही ना ?
पण, आपण म्हणता त्या प्रमाणे पोपटी वाचण्यात सुद्धा मजा वाटली !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
15 Jan 2008 - 10:49 am | बहुरंगी
नमस्कार प्रा.
माझ्या अंदाजाने, "हुरडा" हा पोपटीच्या जवळपास असणारा असावा.
आपला,
बहुरंगी मिसळे
24 Jan 2009 - 1:11 am | भास्कर केन्डे
हुरडा व पोपटी या खाद्यपदार्थांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. हो मात्र, कौटुंबिक खाद्य सोहळा म्हणत असाल तर ऋणानुबंध आहेत असे मानायला हरकत नाहीत. जानेवारीचा महिना म्हणजे तर हुरड्याचा खास हंगाम... त्यातही कुचकुचीचा मऊ-मऊ अन रुचकर हुरडा आणि लसणातल्या खमंग चटण्या.... हातभर जीभ बाहेर आली आठवणीने. ;)
आपला,
(बीड जिल्ह्यातला खेडवळ) भास्कर
14 Jan 2008 - 8:34 pm | प्रशांतकवळे
पोपटी शेतातच करावी. आमच्याकडे शेतात "खळ" करतात (शेणाने सारवून), त्यावरच पोपटी करायची. तिथे बसून पोपटी करण्यात आणि खाण्यात मजा काही औरच असते.
सोबत चोरलेली "नीरा" असेल तर मस्त!!. अलिबाग भागात जी नीरा मिळते ती शिन्दी पासून बनवतात. ती चोरण्याची पण एक कला आहे. सन्ध्याकाळी साधारण ७:३० - ८:०० ला त्या झाडान्जवळ जायचे, मडकी लटकवलेली असतात. ताडीवाले त्या मडक्यात आगोदरच पाणी भरून ठेवतात, ते ओतुन द्यायचे, नन्तर पोपटी लावून झाली कि परत त्या झाडान्जवळ जाउन ताडी घेउन यायचे. चान्गली वेळः १२:०० ते १२:३० रात्रो.. शुद्ध नीरा मिळते.
प्रशान्त
14 Jan 2008 - 8:51 pm | सुनील
पोपटीच्या कथा कुटुंबात वाड-वडीलांकडून ऐकल्या होत्या पण प्रत्यक्ष खाण्याचा योग काही आला नाही. वर्णन वाचून आनंद झाला, तेवढेच समाधान !
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jan 2008 - 9:23 pm | प्राजु
बहुरंगी,
ही पाककृती मी प्रथमच वाचली. खरं सांगायच तर, मला माहीती ही नव्हतं की अशी काही पाककृती असते ते. कदाचित सारवलेल्या जमिनीशी फारच कमी संबंध आल्यामुळेही असेल. पण वाचून सुद्धा खूप मजा आली.
कधी गेले अलिबागला तर बघू. तसे अलिबागला कोणीही नाही माझे. आता मिपा करांपैकी कोणी असेल अलिबागचे, तर मला पोपटी खाण्यासाठी जरूर बोलवा...
- प्राजु.
15 Jan 2008 - 4:31 pm | स्वाती राजेश
बहुरंगी,
तुमची ही पाकक्रुती बहुरंगी आणि बहुढंगी आहे.
मस्त शेतात बसून खाण्यात काही ओरच मजा.
आम्ही आमच्या शेतात हुरडा (जोंधळ्याचा) खातो. पुढ्च्या वेळी पाहु जमते का अशी पाकक्रुती करायला.
29 Jan 2008 - 10:50 am | केशवराव
मि.पा. वरील पोपटी चाहत्यास,
पोपटी हा एकत्र बसुन खाण्याचा आणि एंजॉय करण्याचा सोहळा आहे.
होळीच्या सुमारास एकदम मस्त सिझन. या वर्षी बेत करत असाल तर मी अलीबाग जवळ चोंढी येथे रहातो. एक रात्र बेत करा. साधी आणि कोंबडीची अशा दोन्ही पोपट्या अरेंज करूया.
माझा मोबाईल नं . : ९८२२२४८४७१
30 Jan 2008 - 1:06 am | प्राजु
हे लई बेस बघा केशवराव.
हे तुम्ही समस्त मि.पा. वरील पोपटिच्या चाहत्यांना आमंत्रण दिलंत मन भरून आलं.
दिवास्वप्न दिसायला लगलीत, की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
- प्राजु
30 Jan 2008 - 6:15 am | विसोबा खेचर
प्राजू,
माझंही दिवास्वप्न तुझ्याप्रमाणेच आहे परंतु त्यात,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
हे वाक्य,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावतो आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. प्राजू, गाते आहे. वा वा वा..
असे वाचावे...:)
आपला,
(न्हाणीघरातला गायक!) तात्या.
अवांतर - बाथरुम सिंगर या युजेबल मराठीचं 'न्हाणीघरातला गायक' हे शुद्ध मराठी आहे! :)
30 Jan 2008 - 9:09 am | प्राजु
अहो, तात्या, ती पोपटीची पार्टी म्हणजे शेतातली मैफिल जमवायची आहे.. लोकांना पळवून नाही लावायचं.. त्यामुळे न्हाणीघरातले असले तरी गायन तुमचेच हवे. :)))
- प्राजु
30 Jan 2008 - 10:16 am | प्रशांतकवळे
माझ्या वसई मधल्या मित्राकढून आणखीन माहिती मिळाली ती खाली देत आहे
----------------------------------------------------------
वसई मध्ये ह्या पाककृतीला "उकड हंडी" म्हणतात.
ह्यात मडक्याला आतून केळीची पाने लावतात.
शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, शहाळ्या मधली मलई पण टाकतात.
बर्यापैकी तेल पण ओततात.
30 Jan 2008 - 11:27 am | दीपा॑जली
अस॑ वाटतय आता जावे गावी आणि पोपटी खावी.
असाच आणखी एक पदार्थ म्हणजे 'ह॑डी खिचडी'.
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
30 Jan 2008 - 11:52 am | विसोबा खेचर
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
अहो दीपांजलीताई, हे असे काहीतरी लिहून का उगाच अन्याय करता आहात आमच्यावर? अहो हे नुसते वाचणे देखील सहन होत नाही हो! :)
आपला,
(हावरट) तात्या.
31 Jan 2008 - 1:27 am | llपुण्याचे पेशवेll
पोपटी नावाचा कोकणात मी खाल्लेला पदार्थ याच जातकुळीचा होता. पण तेथे कांदे बटाटे कापून घेण्याची प्रथा नाही. तसेच पोपटी मधे घालावे. मडके मात्र तोंड पक्के बांधून उलटे ठेवण्याची प्रथा तिथे आहे. त्यामुळे अजून खरपूस पोपटी होते अशी समाजमान्यता आहे.
टीप: अशी ही पोपटी मी खारेपाटण ते कणकवली या पट्ट्यात खाल्ली आहे.
(सामाजिक पोपटि खाणारा)
-धन्या.
पुण्याचे पेशवे