अर्जंट काम निघाले असून अॉफिसला चाललोय अशी बायकोला थाप मारली.
सगळ कसं गुपचुप व्हायला हवं.
कार न्यायच्या ऐवजी बाईक काढली.
डोक्यावर हेल्मेट घातले.
तिनं दोन वाजता बोलावलं होतं मी अकरालाच निघालो.
रस्त्यातच दोन थंडगार बियर घेतल्या.
एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी.
बियर घेतल्यावर ती कशी सर्वांगात फुलते.
आज तिच्या यौवनाचा पुरेपुर आनंद लुटायचाय.
मेनरोडपासून थोडासा दूर असलेला तिचा प्रशस्त फ्लँट नजरेत आला.
बाईकचा वेग जरासा कमी केला.
तेवढ्यात गेटच्या बाहेर येणारा एक सुटाबुटातला माणुस दिसला.
हे काय? म्हंजे माझ्या आधी तिनं अजुन कुणालातरी बोलावलं होतं.
मी एकटा हिला पुरा पडत नाही काय?
सालीला जाब विचारला पाहीजे.
कोपऱ्यावर थांबून मी त्या सुटबुटवाल्याला नीट न्याहाळले. तो कार मध्ये बसून निघुन गेला.
ती बाहेर आलेली दिसली नाही.
मी बाईक आत घेतली.
मी आल्याची चाहुल बहुदा तिला लागली असावी.
कारण समोरच्या खिडकीचा पडदा हलला होता.
दार उघडेच होते मी आत गेलो.
सोफ्यावर बसलो. टेबलावर दोन्ही बियर ठेवल्या.
तिचा त्रासिक चेहरा बघुन माझा संशय दाट झाला.
"खरं सांग, त्याच्या बरोबर झोपली होती की नाही?" मी सरळ मुद्यालाच हात घातला.
"अरे तो एल आय सी एजंट होता, माझ्यावर असले आरोप करण्यापेक्षा तू इथे येऊच नको" तिच्या डोळ्यांत अंगार दाटला.
मी मुकाट्याने बियरचा निम्मा ग्लास रिकामा केला.
आजपर्यंत ही एवढी कधी भडकली नव्हती, म्हणजे हिला खरचं आपल्यापासून सुटका हवीयं. सालीचा भयंकर राग आला.
बियरची बाटली ऊचलून तिच्याकडे भिरकावली.
खरतर मला राग व्यक्त करायचा होता. पण बाटली तिच्या डोक्यातचं बसली. घाव वर्मी होता.
जागीच कोसळली.
क्षणात माझ्या अक्षम्य अपराधाची जाणीव झाली.
थोडा वेळ सुन्न बसुन राहिलो.
या अघोरी कृत्यातुन आता मार्ग काढायलाच हवा.
थंड डोक्याने विचार करत राहीलेली अर्धी बियर हळुहळु संपवली.
सभोवताली नजर फिरवली. टेबलावर एक कार्ड होते. त्या एल आय सी एजंटाचे. विलास मोरे त्याचं नाव.
डोक्याचा ताण जरासा निवळला.
हे कार्ड या भयंकर प्रकरणातुन बाहेर पडायचा एक यशस्वी मार्ग ठरणार होतं.
त्या प्रशस्त फ्लँट मध्ये आहे ती स्थिती तशीच ठेवुन व माझ्याशी संबधित बहुतांश पुरावे नष्ट करुन मी गेटच्या बाहेर पडलो.
कॉर्नर ला एक पब्लिक टेलिफोन बुथ आहे तिथे बाईक थांबवली.
१०० नंबर डायल करुन पलिकडच्या व्यक्तिस संदेश दिला.
" सौ. मनिषा कदम यांचा नुकताच खून झाला असुन विलास मोरे यांनीच तो केल्याची दाट शक्यता आहे. अमुक तमुक पत्त्यावर या" एवढेच बोलुन फोन कट केला.
मनावरचा ताण अजुनच निवळला. तरी थोडा अस्वस्थ होतोच.
दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली.
"एकट्याच राहणाऱ्या मनिषा कदम यांचा खून : संशयित विलास मोरेला १४ दिवसांची कोठडी."
आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते.
या खुनाचा निकाल लागेपर्यंत दिवस प्रचंड तणावाखाली जाणार होते.
कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला मी जातीने हजर राहिलो.
दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या बाजु मी नीट ऐकुन घेत असे.
एखादी वेळ अशी यायची की विलास मोरे निर्दोष वाटायचा. तेव्हा मी प्रचंड भयभीत व्हायचो. रात्र रात्र झोप लागायची नाही. जीवन खरतर ऊध्वस्त झाल्यासारख वाटत होतं.
खटला जसजसा पुढे सरकू लागला तेव्हा खरा गुन्हेगार म्हणजे मीच पकडला जाण्याची शक्यता वाढत चालली.
पण काहीतरी बहुदा विपरीत घडुन अखेर विलास मोरेच्या गळ्याभोवती फास आवळला जाऊ लागला.
शेवटी निकालाचा दिवस ऊजाडलाच.
कोर्टात गर्दी होती. गोंगाट चालू होता.
मी एकवार सगळ्यांकडे पाहीले.
हातातला ठोकळा टेबलावर आदळत शांतता प्रस्थापित केली.
निकालपत्रक समोर धरुन घसा खाकरुन बोललो.
"भारतीय दंडनियम ३०२ अन्वये सौ. मनिषा कदम यांच्या हत्येप्रकरणी श्री विलास मोरे दोषी आढळले असुन त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे"
-आधारित-
प्रतिक्रिया
20 Sep 2015 - 10:00 pm | किसन शिंदे
कथानक चांगले आहे, पण अजून फुलवायला हवे होते. कथा सुरू होता होता संपलीही असे वाटले.
20 Sep 2015 - 11:32 pm | एक एकटा एकटाच
हो खरच
कथाबिज चांगलयं
अजुन फुलवायला हवी होती.
शेवटचा ट्विस्ट आवडला.
21 Sep 2015 - 1:43 am | आदूबाळ
अल्फ्रेड हिचकॉकच्या एका कथेवर आधारित आहे. याचा स्पष्ट उल्लेख हवा.
21 Sep 2015 - 5:50 am | dadadarekar
मर्डर वेपन बीअरची बाटली... तिच्यावरच्या ठशांचे काय झाले ?
21 Sep 2015 - 5:52 am | dadadarekar
मर्डररचा मोटिव्ह .... ? बाइइने पॉइसी घेतली नाही म्हणून खून ?
21 Sep 2015 - 6:56 am | मनीषा
एकाच्या गुन्ह्यासाठी , दुसर्याच कुणालातरी शिक्षा होणे हे धक्कादायक, अनपेक्षित अथवा अशक्य कोटीतली घटना जरी नसली तरी -- विलास मोरे ला कसा अडकवला हे जरा सविस्तर यायला हवे होते असे वाटते आहे. ती एक चांगली रहस्यकथा होऊ शकली असती.
तुमची लेखनशैली आणि कथा सांगण्याची पद्धत खरच चांगली आहे.
तुम्ही जास्तं शब्द संख्येच्या कथा देखिल चांगल्या लिहू शकाल.
21 Sep 2015 - 7:48 am | चाणक्य
कलाटणी आवडली
21 Sep 2015 - 7:48 am | चाणक्य
कलाटणी आवडली
21 Sep 2015 - 8:52 am | प्रभाकर पेठकर
कथा म्हणून चांगली आहे. पण मोरे दोषी ठरणं जरा विचित्र वाटलं. बिचार्याला कोणी चांगला वकिल मिळाला नाही असं दिसतं आहे. अनसॉल्व्ह्ड मर्डर मिस्ट्री म्हणून केस बंद होईल असे वाटले होते पण मोरेला दोषी ठरविलेले पाहून धक्काच बसला. असो.
21 Sep 2015 - 10:46 am | नाखु
कार्डा बरोबर इतर काही पुरावे "पेरल्याचे" असते तर कथा म्हणून भिडली असती.अर्थात पोलीसही "चमको" प्रकरणात तपशीलाने तपास करतात हे अनुभवले आहे त्यामूळे प्रत्यक्षात निर्दोष भरडला जाऊ शकत नाही हे स्वीकारण्यास मन धजावत नाही हे अनुभवाने सांगू शकतो.
पुभाप्र
21 Sep 2015 - 12:24 pm | जयन्त बा शिम्पि
विलास मोरे ला दोषी ठरविणे एव्हढे काही सोपे नाही. बरेच कच्चे दुवे सुटुन गेलेले जाणवतात. उदा. मोरे निघुन गेल्यानंतर , किती काळ गेला ?, अर्धी बिअर रिकामी करण्यासाठी किती वेळ पुरतो ? ( मला खरोखरच माहित नाही, कारण ' मैने कभी पी ही नही ' ) , अलिकडे सार्वजनिक टेलिफोन बूथ कोठे दिसतात ?, पोलिसांचा तपास किती ठिसुळ होता? थोड्या अधिक विस्ताराने ही कथा , कच्चे दुवे टाळून , सादर करता आली असती. कदाचित पहिलाच प्रयत्न म्हणुन जमले नसावे. पण तरीही पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
21 Sep 2015 - 1:30 pm | द-बाहुबली
बरीच अस्पष्ट. सॉय्कोलोजीकल त्रिलर रंगवताना लोजीकल बाजु सपशेल दुर्लक्षित झाली आहे.
21 Sep 2015 - 6:11 pm | dadadarekar
नुसते कार्ड मिळाले तर तो माणूस अमूक एका वेळी हजर होता हे कसे सिद्ध होते ?
माझ्याकडे दहा कार्डे असतील तर त्या सगळ्या व्यक्तीना अडकवणार काय ?
21 Sep 2015 - 6:29 pm | प्यारे१
सगळ्या आयडींची काढलीत कार्डं????? ;)
22 Sep 2015 - 11:29 am | नाखु
सारा मिपा मुझे (डु) आयडी के नाम से जानता है !!
लॉयन नसलेला अजित.
23 Sep 2015 - 5:26 pm | होबासराव
सगळ्या आयडींची काढलीत कार्डं????? ;)
बेक्कार हसतोय ह्याच्यावर :))
21 Sep 2015 - 7:24 pm | जव्हेरगंज
बहूतेकांनी कथेचा शेवट नीट वाचला नाही असे वाटते.
कथानायक कोण होता हे समजुन घेतल्यावर त्याला विलास मोरेले अडकवणे निश्चितचं अवघड गेलं नसणार.
इथे विलास मोरेला कसं अडकवलं पेक्षा विलास मोरेला कुणी अडकवलं हे महत्वाचे आहे.
कथा लहान ठेवण्याचा प्रयत्न होता.
परंतु ती अजुन फुलवायला पाहीजे होती याच्याशी सहमत.
21 Sep 2015 - 7:42 pm | द-बाहुबली
मला कथानायक कोण होता हेच समजले नाही... :(
22 Sep 2015 - 1:42 am | dadadarekar
.
21 Sep 2015 - 7:52 pm | सटक
जज्जांनी कज्ज्याचा निकालच लावलाय अगदी!! सही!
21 Sep 2015 - 8:38 pm | सुमो
जेफरी आर्चर यांच्या द पर्फेक्ट मर्डर या कथेचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते.
भावानुवादाचा प्रयत्न छान. पुलेशु ...
21 Sep 2015 - 9:13 pm | दिवाकर कुलकर्णी
पूर्वार्ध। द्रुषम ,
ऊत्तरार्ध रत्नाकर मतकरी
21 Sep 2015 - 10:05 pm | वाचक
सुहास शिरवळकरांची अशीच एक गोष्ट आहे एका कादंबरीत
21 Sep 2015 - 10:22 pm | प्यारे१
कोण कुणाचं काय ढापायलंय नक्की????
हिचकॉक, सु शि, आर्चर, रत्नाकर मतकरी, दृश्यम....
21 Sep 2015 - 10:48 pm | जव्हेरगंज
हा हा बहुतेक त्यांनीच एकमेकांच ढापलं असेल.:)
असो.विनोद बाजुला ठेऊ.
वरील लेखातलं कथाबीज एका मित्राशी चर्चा करताना सापडलं. मुळ कथाबीज कोणाचं हे मलाही माहीत नाही. म्हणुन केवळ आधारित एवढीच टीप दिलीय.
आता आमच्यावर कोणी ढापुगीरीचा आरोप करणार असेल तर धागा अप्रकाशित करण्याची विनंती सं.मं. ला करावी काय?
22 Sep 2015 - 10:54 am | मित्रहो
जज्ज झाला म्हणून तो कुणाला असा सहज अडकवू शकते हे पटत नाही. त्या विलास मोरेची काहीच हिस्ट्री नाही, त्याला मर्डर करण्याचे कारण नाही. कारने येनारा एलआयसी एजंट चांगला वकील करु शकत नाही हे पटत नाही. कदाचित काही भागात कथा करता आली असती असे वाटते.
बी. आर. चोप्राने त्याच्या सुरवातीच्या काळात काही खूप सुंदर चित्रपट बनविले त्यातला एक बहुदा कानून.तो चित्रपट एक सुंदर कोर्ट ड्रामा आहे. त्यात केसच्या शेवटी जजलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.
23 Sep 2015 - 2:04 pm | द-बाहुबली
सस्पेंन्स ड्रामा हा भाग विचारात घेतला तर मला "एक रुका हुआ फैसला" फार आवडतो.
23 Sep 2015 - 4:44 pm | मित्रहो
हा चित्रपट मलाही आवडतो पण सस्पेंस ड्रामा म्हणून नाही.
स्वतःच्या जीवनात आलेल्या अनूभवामुळे किंवा स्वतःच्या गरजांमुळे कुठल्याही गोष्टीकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीकोणातून बघतो. सत्य हे खरोखरच पूर्ण सत्य असते का असा प्रश्न निर्माण होतो. हा गुंता ह्या चित्रपटात छान उलगडत जातो.
23 Sep 2015 - 3:14 pm | जयन्त बा शिम्पि
" एक रुका हुआ फैसला ' मलाही फार आवडतो. मुळात १९५७ साली " १२ अँग्री मेन " या नावाचा इंग्रजी सिनेमा आलेला होता. त्याची ही हिन्दीत रुपांतर केलेली टेलीफिल्म आहे. मी त्याच " १२ अँग्री मेन " च्या स्क्रिप्ट चे मराठीत भाषांतर , लिहुन काढीत आहे. स्वान्त् सुखाय.
23 Sep 2015 - 5:18 pm | तुडतुडी
साला . स्वतः व्यभिचारी . त्याला त्या बाईवर उखडण्याचा काय अधिकार ?
कथा पटली नाही . नुसत्या कार्ड वरून कोणी खुनी सिद्ध होत नाही .
कानून तर मला बाळबोध वाटतो . त्या जज च्या होणार्या जावयाने त्याचा चेहरा बघितलेला नसतो . तरी वकील असूनसुद्धा त्याच्यावर आरोप करतो . केवळ खुन्याचा ड्रेस जज च्या ड्रेस शी म्याच होतो म्हणून
23 Sep 2015 - 5:46 pm | मीउमेश
खुप जास्त वेगात कथा निघुन गेलई.
23 Sep 2015 - 8:30 pm | जव्हेरगंज
ब्रेक फेल झालता मालक.
नीट कराय टाकतू आता. :)
23 Sep 2015 - 6:30 pm | चिगो
कथा जेफ्री आर्चरच्या एका कादंबरीवर आधारीत आहे. मराठीत सुहास शिरवळकरांची 'न्याय-अन्याय' कादंबरी.. ती दुसरी व्यक्ती कशी अडकली, हे या कथेत फारसं स्पष्ट होत नाही.