Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १
डीसी साठी जे सुपरमॅन आणि बॅटमॅन चे महत्व आहे तेच स्थान स्पायडरमॅनला मार्वल मध्ये आहे. डीसी कॉमिक्स साठ च्या दशकात वॉर्नर ब्रदर्स ने विकत घेतल्यामुळे त्यांना सुपरहिरो वर चित्रपट निर्माण करायला जास्त त्रास झाला नाही. त्यांनी ८०च्या दशकापर्यंत सुपरमॅन वर आधारीत तीन चित्रपटांची निर्मितीही केली आणि मार्वल कडून अजुन काहीच हालचाल होत नव्हती. तिसऱ्या सुपरमॅन चित्रपटास म्हणावे तसे यश मिळाले नाही. सुपर हिरोंवरील चित्रपट आत्ता चालणार नाहीत, अशी सर्व हॉलीवुड मध्ये चर्चा होत होती. ही संधी साधून मार्वलने स्पायडरमॅन वर येन केन प्रकारेण चित्रपट निर्माण करायचे ठरवले होते. आणि ह्या स्वप्नात एका मोठ्या दिग्दर्शकाचा सहभागही होता. तो दिग्दर्शक होता "जेम्स कॅमेरुन".
१९८०मध्ये डीसी मध्ये वन टाईम वंडर म्हणून ओळखले जाणारे जीम शूटर हे मार्वलचे प्रमुख संपादक म्हणून रुजू झाले. त्यांनी मार्वालच्या बर्याच पात्रांची पुनर्रचना करण्याचे ठरवले. मार्वलच्या नवीन विश्वाचे (New Universe) निर्माण करण्यास त्यांनी सांगितले. पण हा प्रयोग म्हणावा तितका सफल नाही झाला. मग त्यांनी परत जुन्याच विश्वाची कथा पुन्हा सुरु केली. शूटर यांचे प्रमुख योगदान म्हणजे "Secret War" ची रचना. यामध्ये आत्तापर्यंत निर्माण केलेल्या प्रत्येक मार्वलच्या पात्राचा समावेश त्यांनी या कथेत केला. हा प्रयोग सफलही झाला. पण त्याचा मार्वलची स्थिती सुधारेल असा फार मोठा काही फायदा झाला नाही.
मार्वल ने टीवी ची ताकत ओळखली होती. त्यांना ह्या क्षेत्रात उतरायचे होते म्हणून १९८१ साली त्यांनी "DePatie-Freleng Enterprises animation studio" विकत घेतला. आणि त्याचे मार्वल स्टुडिओ असे नामकरण केले. अशा रीतीने त्यांनी अॅनिमेशनच्या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरवात केली. त्यांनी त्या काळी बनवलेल्या "G.I. Joe", "The Transformers" ह्या मालिका आजही खूप प्रसिद्ध आहेत. जी.आय.जो आणि ट्रान्सफॉर्मर्स हे प्रथम खेळणी स्वरूपात बाजारात आले होते. ही खेळणी खूपच लोकप्रिय होती. त्यांच्या लोकप्रीयतेचा फायदा घेण्यासाठी मार्वलने ह्या मालिका बनवल्या. ह्या मालिकांबरोबरच मार्वलने स्पायडरमॅनल आणि एक्स मेन ह्याच्यावरील अॅनिमेशन सिरीज बनवली. जरी ह्या सर्व मालिका लोकांना खूप आवडत होत्या तरी अॅनिमेशन क्षेत्रात त्यावेळी खूपच मोठी स्पर्धा चालू होती. डिस्नी ला ह्या क्षेत्रात तोडच नव्हती. त्यांनी पहिला क्रमांक टिकवून ठेवला होता. वॉर्नर ब्रदर्स / डीसी सुधा ह्यात आघाडीवर होते. त्यामुळे मार्वल इथेही मार्केट लीडर बनू शकले नाही.
१९८५साली मार्वल ने Cannon Films बरोबर स्पायडरमॅन वरील चित्रपटासाठी करार केला. हा करार $२२५,००० चा होता, अधिक चित्रपटामधुन मिळणाऱ्या नफ्यातही मार्वलला भागीदारी मिळणार होती. जर १९९०पर्यन्त त्यांनी चित्रपट बनवला नाही तर अधिकार परत मार्वलकडे जाणार होते. त्यावेळी "Menahem Golan" हा Cannonचा प्रमुख होता.
गोलन ह्यांना स्पाइडरमॅन प्रोजेक्ट मध्ये विशेष रस होता. त्यांनी काही लेखक ह्या कामावर लावले. पण काही काळातच Cannon Films ला सुपरमॅन ४ साठी सहनिर्माते बनण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्पाइडरमॅनवर केला जाणारा खर्च कमी झाला आणि तो पैसा सुपरमॅनवर लावण्यात आला. पुढे जाऊन कॅनॉन दिवाळखोर झाले. गोलन यांनी कॅनॉन सोडले आणि २१ सेंच्युरीच्या प्रमुखपदाचा त्यांनी स्विकार केला. २१ ला येता येता त्यांनी स्पायडरमॅनचे अधिकार पण आणले. गोलन यांनी नव्याने स्पायडरमॅनच्या कथेला सुरवात केली. कथा रचनेमध्ये त्यांनी आत्ता स्टेन ली आणि इतर मार्वलच्या लेखकांचा समावेश करू लागले होते. २१ सेंच्युरीने स्पायडरमॅनच्या निर्मितीची तयारी करण्यास सुरवात केली. त्यांनी टेलीविजन अधिकार Vaicomला तर Home Video अधिकार Columbia Pictures ला विकले. ह्या चित्रपट निर्मितीसाठी गोलन यांना सहनिर्मात्यांची आवश्यकता वाटत होती.
ह्या प्रोजेक्टमध्ये आणखी एका दिग्दर्शकाला स्वारस्य होते. तो होता "जेम्स कमेरुन". गोलन ह्यांनी "Carolco Pictures" ला गोलन यांनी तयार केलेली स्क्रिप्ट सादर केला होती. Carolco Pictures ने "Terminator २: Judgement day" ह्या मैलाचा दगड ठरलेल्या जेम्स कमेरूनच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. आणि त्यांनी "True Lies" चे कामही नुकतेच संपवले होते. ह्या निर्माणगृहाचा जेम्स केमेरून सोबत ठराविक चित्रपट तयार करण्याचा करार झाला होता. त्यामुळे स्पायडरमॅन प्रोजेक्ट केमेरुनच्या हातात पडले. त्यानेही ह्या चित्रपटाची संहिता तयार करण्यास सुरवात केली.
कॅमेरुन आधी तयार असलेल्या कथेतील काही भागांपासून प्रेरणा घवून 47 पानांची screeptment तयार केली. ह्या कथेमध्ये प्रमुख खलनायक असणार होते Electro आणि Sandman. कॅमेरुनने स्पायडरमॅनचे तीन भाग निर्माण करायचे ह्या विचारानेच कथा लिहिली होती. इलेक्ट्रो आणि सेंडमॅन बरोबरच Dr. Octopus ह्या पात्राचीही ओळख तो ह्या चित्रपटात करणार होता.
जी स्पायडरमॅनची ओरिजिन स्टोरी आपल्याला माहीत आहे त्याच्यात काहीही बदल होणार नव्हता. स्पायडरमॅनला बायोलॉजिकल वेब शूटर असणार होते. इलेक्ट्रो आणि सेंड मॅन यांच्या कॉमिक्स बुक मधील मूळ कथेचा वापर न करता कॅमेरुनने नवीन ओरिजिन स्टोरी तयार केली होती. (कदाचित कॅमेरुन हा टीम बर्टन च्या "Batman" वरून प्रेरित झाला असावा. ह्या चित्रपटात "Joker" ला "Origin Story" देण्यात आली होती. कॉमिक्स बुक मध्ये जोकरचा इतिहास खूपच संदिग्ध ठेवण्यात आला आहे. आणि त्यामुळेच जोकर खुप प्रभावी वाटतो.) कॅमेरुनच्या इलेक्ट्रोचा अल्टर ईगो कार्लटन स्ट्रेण्ड हा भ्रष्टाचारी भांडवलदार होता. ( कॉमिक्स मधील मूळ कथेत हे मॅक्स डिलिओन नामक पात्र होते).आणि सेंडमॅन हा बोय्ड नामक एक तरुण होता (मूळ कथेत फ्लिंट मार्को).ह्या चित्रपटात फिलिडिलफिया प्रयोग सारख्या एका प्रयोग करणार होते. ज्यामध्ये बायो लोकेशन आणि एटॉम मिक्सिंगचा वापर करत असताना अणु स्फोट होतो. त्यात बोय्ड सापडून त्याला त्याची शक्ती प्राप्त होते. पुढे जाउन तो सर्व "Mutants" ची एक "मास्टर रेस" बनवतो. आणि स्पायडर मॅनला त्यात सहभागी होण्यास प्रेरित करतो. चित्रपटाच्या शेवटी इलेकट्रो इलेक्ट्रिकल वादळ निर्माण करतो. शेवटचा सामना हा वर्ल्ड ट्रेड सेंटर वर होतो. आणि त्यानंतर स्पायडर मॅन आपली पीटर पारकर ही खरी ओळख मेरी जेन ला दाखवतो. डॉक्टर ऑक्टोपसच्या भूमिकेत कॅमेरुनने आपल्या परम मित्र "Arnold Schwarzenegger" ला घ्यायचे ठरवले होते तर पीटर पारकर साठी "Leonardo Dicaprio" ची निवड केली होती.
कथेमध्ये म्हणावी तशी प्रगती होत होती. पण वेळ आली होती ती कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची. Carolcoच्या वकिलांनी जेम्स कॅमेरुनचा करार पुढे आणला. ह्या करारानुसार कॅमेरुनच ठरवणार होता की जाहिरात आणि चित्रपट ह्यांच्या क्रेडिट्समध्ये कुणाचे नाव टाकायचे आणि कुणाचे नाही. हा करार वापरून त्यांनी गोलन यांना पूर्णतः बाजूला केले होते. आणि त्यामुळे गोलन ह्यांचे नाव कुठेच येणार नव्हते. पण गोलन यांनीही ह्या कथेवर खूप मेहनत घेतली होती. कॅमेरुनच्या कथेतील बराच भाग गोलन यांच्याकडील कथेवरून प्रेरित होता. त्यामुळे गोलन यांनी Carolco ला कोर्टात खेचले. ह्याचा परिणाम म्हणून Carolco ने Viacom आणि Columbia वर वितरण आणि होम विडीओ हक्क मिळवण्यासाठी केस केली. आणि अशा रीतीने स्पायडरमॅन हा कायद्याच्या कचाट्यात अडकला. आणि स्पायडरमॅनवरील चित्रपट बनवण्याचे मार्वलचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
इकडे स्पायडरमॅनची ही अवस्था आणि तिकडे मार्वलचे दिवसही काही चांगले चालू नव्हते. १९८६ साली मार्वल "New World Entertainment" ला विकली गेली. आणि लागलीच पुढच्या तीन वर्षात त्यांनी ती "MacAndrews and Forbes" चे "Ronald Perelman" यांना विकली. पेरेलमन यांनी $82.5m किंमत मोजली. पुढील दोन वर्षातच मार्वल न्यू योर्क स्टॉक एक्स्चेंज मध्ये लिस्टेड सुद्धा झाली. जी. आय. जो आणि ट्रान्सफोर्मर्स ह्या खेळण्यांचा खपाने प्रेरित होऊन पेरेलमन यांनी "ToyBiz" ही खेळणी बनवणाऱ्या कंपनीमध्ये हिस्सेदारी विकत घेतली. त्याबरोबरच त्यांनी स्टिकर्स, सुपर हिरो पेहराव, टी शर्ट आणि ट्रेडिंग कार्ड्स बनवणाऱ्या काही कंपन्याही विकत घेतल्या. हा सगळा सौदा एकूण $700m ला पडला होता.
रोनाल्ड पेरेलमन
९०च्या काळात न्युज पेपर विताराकांबरोबर कॉमिक्सचे वितरण बंद झाले होते. आत्ता कॉमिक्सची विक्री कोमिक्स बुक स्टोअर द्वारे होऊ लागली होती. इथे कॉमिक्स जगताशी निगडीत शर्ट्स, स्टिकर्स, ट्रेडिंग कार्ड्स, खेळणी सर्व एकाच ठिकाणी मिळायचे. ह्या गोष्टीचा फायदा कोमिक्सना होऊ लागला. ते वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट कव्हर्स असलेले कोमिक्स विकू लागले. सुपरहिरोंचे सीमोल्लंघन (Crossover) ही सातत्याची बाब झाली होती. काही वेळा तर सुपर हिरोंचा "Swimsuit" विशेषांक सुद्धा त्यांनी काढला. कथेकडे दुर्लक्ष करून कोमिक्स खपवायचे वेगवेगळ्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केले गेले होते.
कोमिक्स बुक गोळा करण्याचा छंद वाढला होता. ६० आणि ७० च्या दशकातील कोमिक्स बुक्सना चांगली मागणी होती. ह्या गोल्डन एज च्या कोमिक्सना चांगली किंमत मिळायची. ह्या संधीचा फायदा घेण्याचे मार्वलने ठरवले होते. ९०च्या दशकात स्पायडरमॅन, एक्स मेन यांचा जोरदार खप चालू होता. नवीन एक्स-फोर्स कोमिक्स सुधा तेजीत होते. ह्याला कारण म्हणजे वितरक लोकांना कोमिक्स बुक म्हणजे एक इनव्हेस्टमेंट आहे असे पटवून द्यायचे. दहा वर्षांनी तुम्हाला ह्यांची चांगली किंमत मिळेल असे सांगायचे. एक कोमिक्स बरोबर ते एक ट्रेडिंग कार्ड मोफत द्यायचे. पण ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग कार्ड काढायचे. जर कलेक्टर्सना सर्व ट्रेडिंग कार्ड्स हवे असतील तर त्यांना एकच कोमिक्स पाच वेळा विकत घ्यावी लागत असे. अशा प्रकारचे गिमिक्स वापरून ते विक्री वाढवत होते.
९३ ते ९६च्या काळात कॉमिक्सचा खप कमी होऊ लागला आणि हा फुगा फुटला. कोमिक्स आणि ट्रेडिंग कार्ड्सची विक्री एकदम कमी झाली. आणि मार्वलच्या समभागाची किंमत घसरू लागली. कोमिक्स बुकच्या व्यवसायात मंदी जोर धरू लागली. बरेचजण पेरेलमनच्या या युक्त्यांमुळे वातावरण बिघडले असे म्हणू लागले. कॉमिक्स ज्यावेळी खपत होते त्यावेळी पेरेलमन ह्यांनी चांगले नंबर दाखवले आणि विकत घेतलेल्या पेक्षा ४०% टक्के जास्तने कंपनी पब्लिक केली होती. हि क्लृप्ती जास्त काळ टिकणारी नव्हती.
११९५ साली मार्वल पूर्णपणे कर्जामध्ये बुडाली होती. त्यावेळी पेरेलमन ने ठरवले की ToyBiz चा पूर्णपणे ताबा घ्यायचा आणि दिवाळखोरी जाहीर करायची. ह्या गोष्टीला समभाग धारकांनी प्रचंड विरोध केला. पेरेलमन म्हणत होता की दिवाळखोरी नंतर त्याला कंपनीची पुनर्रचना करता येईल. पण शेअर होल्डर्स ह्याला तयार नव्हते. आणि हा मामला कोर्टात गेला. ह्या भांडणाचा शेवट ११९८ साली झाला. ह्यामध्ये ToyBiz ही पूर्णपणे मार्वल मध्ये सामावून घेतली गेली पण पेरेलमन आणि त्याचे सहकारी ह्याना कंपनीमधून हद्दपार करण्यात आले. हा परिणाम घडवून आणला ToyBiz च्या दोन अधिकार्यांनी. त्यांचे नाव होते Isaac Perlmutter आणि Avi Arad.
अव्ही अराड हा टोय बीजचा सीइओ होता. खेळणी तयार करण्याच्या क्षेत्रात तो अग्रगण्य होता. ज्यावेळी मार्वालने त्याच्या कंपनीचा ४६% हिस्सा विकत घेतला, ते त्याच्या कारकिर्दीचे सगळ्यात मोठे वळण ठरले. ज्यावेळी हा सौदा झाला त्यावेळी अव्हीला मार्वलमध्ये १०% हिस्सेदारी मिळाली. आणि आतातर मार्वलची जबाबदारी त्याच्यावर आली होती.अव्ही अराडला माहीत होते की मार्वलची परिस्थिती सुधारायची असेल तर त्याच्या सुपरहिरोंवर चित्रपट निर्माण करायलाच हवेत. आणि इथूनच मार्वलला नवीन सुरवात मिळणार होती.
अव्ही अराड
प्रतिक्रिया
14 Sep 2015 - 3:00 pm | नया है वह
हाही भाग आवडला !
पुभाप्र.
14 Sep 2015 - 4:00 pm | एस
मस्त. पुभाप्र.
14 Sep 2015 - 5:19 pm | द-बाहुबली
जेम्स कॅमेरुनने जर चित्रपट बनवला असता तर... स्पायडरमॅण अप्रतिमच ठरला असता. जे नोलानने बॅटमॅणसाठी केले त्यासारखेच काही जेम्स स्पायडमॅनसाठी करु शकला असता.
तरीही हॉलीवुडमधे भव्यदिव्य दर्जेदार सुपरहिरोंच्या अत्याधुनीक चित्रपटांची सुरुवात टोबी मॅग्युआयरच्या स्पायडरमॅननेच केली.
14 Sep 2015 - 5:21 pm | प्रचेतस
जबराट लेख.
14 Sep 2015 - 5:55 pm | संचित
छान लेख.
14 Sep 2015 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
काय जबराट लिवल्यान हो! आवाडले बगा.
14 Sep 2015 - 7:50 pm | मुक्त विहारि
क्रमशः असेलच, असे गृहित धरून...पुभाप्र.....
14 Sep 2015 - 7:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जब्बर लिहिलयं.
14 Sep 2015 - 8:30 pm | द-बाहुबली
हे जि आय जो मला फार्फार आवडायचे कारण म्हणजे त्याकाळी दुरदर्शनवर आठड्यात कधी तरी २० मिनीटे एखादे कार्टुन कसेबसे लागत असे (ही-मॅन, स्पायडर मॅण, गायब आया इत्यादी) जे अख्खा समाज क्रिकेट वगैरे सोडुन डोळ्यात प्राण आणून बघत असे.
स्टार प्लस नुकतेच सुरु झाले होते व त्यादीवशी रवीवार होता जि आय जो लागले होते महा अप्रुपाने ते डोळ्यात साठवत होतो. २० मिनीटाने संपले असे वाटले कारण जाहीरात सुरु झाली. पण दोन मिनीटात पुन्हा कार्टुन सुरु. असे चार पाच वेळा झाले तरी कार्टुन संपत न्हवते. सर्वप्रथम हे पाहिल्याने इतका हरखुन गेलो होतो की विचारता सोय नाही. जे व्हायचे त्याला कमार्शील ब्रेक म्हणतात हे उमजायला बराच वेळ गेला तोपर्यंत हा प्रकार अफाट आवडला होता. सलग दोन तास कार्टून..? मायला, क्या बात थी वोह... हेवन.
15 Sep 2015 - 9:52 am | उगा काहितरीच
हा पण भाग मस्तच. पुढील भाग थोडे लवकर लवकर टाका हो.
15 Sep 2015 - 2:11 pm | मदनबाण
सुरेख लेखन... :)
जी.आय.जो. बर्डमॅन आणि निंजा टर्टेल्स आठवले ! :)
काही वेळा तर सुपर हिरोंचा "Swimsuit" विशेषांक सुद्धा त्यांनी काढला.
सेक्स सेल्स ! ;) मला क्षणभर कॅट वूमन आठवली ? शॅरेन स्टोन का कोणीतरी अशीच काहीशी भूमिका केल्याचे आठवते. {हॅली बेरी नाही } बहुतेक म्यँव म्यँव असा गोड संवाद देखील म्हणते. ;) हे कॅरेक्टर नक्की कुठल्या चित्रपटात पाहिल्याचे ते आता आठवत नाही,बहुतेक बॅटमॅन बरोबरच्या एका चित्रपटात आहे का ? ते सुद्धा लक्षात येत नाही.
अवांतर :- हल्लीच The Maze Runner हा चित्रपट पाहिला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
15 Sep 2015 - 2:56 pm | मोग्याम्बो
तुम्ही जी म्हणताय ती Batman Returns मधली Michelle Pfeiffer
15 Sep 2015 - 4:11 pm | मदनबाण
येस्स... येस्स.. येस्स... थांकु ! :)
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :--- कॅट, कॅट वूमन, इनी..मिनी..मनी... मो.
हल्ली एका डेटिंग अॅप्स ची जाहिरात टिव्हीवर फार लागते आहे... या जाहिरातीचे जिंगल आपल्याला लयं म्हणजी लयं आवडले बघा ! { ही जाहिरात नाही. }
मांजरं लयं लबाड असत्यात.... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
16 Sep 2015 - 4:43 pm | कपिलमुनी
कोळीमानवाचा भाग आवडला :)
Tobey Maguire चा कोळीमानव आवडतो . सध्य अॅमेझिंग स्पायडरमॅन मधे जे शेंबडे पोर आहे ते काही खास नाही.
लहानपणी स्पायडरमॅनचे कार्टून जबरदस्त आवडायचे
16 Sep 2015 - 4:56 pm | प्रचेतस
मॅग्वायरपेक्षा अॅन्ड्र्यु गारफिल्डचा स्पायडरमॅन जास्त रुचतो पण मार्व्हलने ही सिरीज रिबूट करुन काय साधले हे कळले नाही. किंबहुना एकूणातच सॅम रायमी आणि मार्क वेब दोघांचीही स्पायडरमॅनची मालिका फसल्यासारखीच वाटते. नोलन, ब्रायन सिंगर किंवा झॅक स्नायडरसारखा दिग्दर्शक स्पायडरमॅनचे सोने करु शकला असता.
16 Sep 2015 - 5:21 pm | मोग्याम्बो
"सिरीज रिबूट करुन काय साधले" ह्याचे उत्तर पुढच्या भागात नक्कीच देईन.
12 Feb 2016 - 3:55 pm | नया है वह
पुढचा भाग कधी येतोय?
16 Sep 2015 - 5:29 pm | द-बाहुबली
मॅग्युआयरचा स्पायडरमॅनच सुरेख आहे. फक्त चामायला तिन तिन भाग युन गेले पण त्यांचा तथाकथीत लव ट्रँगल मार्गी लागला नाही म्हणून मात्र डोके आपटावेसे वाटले. पण त्याचा उपयोग होणार नाही म्हणून तो मोह आवरला.
अॅन्ड्र्युचे मला लायन्स फॉर लँम्ब्स व नेवर लेट मी गो छान वाटले होते त्यात सोशलनेटवर्क नंतर तो भारीच वाटु लागला पण त्याला बघताना सतत गुजराथी स्पायडरमॅण बघत आहोत असा भास होतो. आणी सभोवतालशी ते मॅच होत नाही... त्यापेक्षा भोजपुरी इस्पायडरमॅन परवडला ;)
नोलन म्हणे सुपरमॅन सिरीज रिबुट करणार आहे. फिंगर्स क्रॉस्ड...
16 Sep 2015 - 5:36 pm | मोग्याम्बो
सुपरमॅन सिरीज रिबुट होण्याचे लवकर शक्य नाही. आत्ता निवडलेले सुपरमॅन आणि बॅटमॅन ह्यांचेच DC Universe बनवण्याचा विचार चालू आहे.
२०२२ पर्यंतचे प्लानिंग झाले आहे. त्यानंतरच सुपरमॅन रीबूट होईल असे मला वाटते.
16 Sep 2015 - 5:48 pm | प्रचेतस
मॅग्वायरचा स्पायडरमॅन जरा मॅच्युअर वाटतो तर गारफिल्डचा हॅपी गो लकी टाईपचा. पण दोन्ही मालिकांच्या डायरेक्टर्सनी (रायमी आणि मार्क वेब) ह्यांनी अतिशय सरधोपट मार्ग पत्करलेला दिसतो. कुणीतरी एक सुपरव्हिलन मग लोकआंची घबराट आणि सुपरहिरोने येऊन त्यांची सुटका करणे.
ह्याशिवाय स्पायडरमॅनमधील जे हरवण्यास सर्वाधिक कठीण असे व्हिलन्स उदा. कार्नेज, मिस्टेरिओ, किंगफिनसारखा पाताळयंत्री मनुष्य असे ह्या मालिकांमध्ये आलेच नाहीत तर व्हेनमसारख्याला अतिशय अल्प वाव दिला गेला.
नोप.
तो मॅन ऑफ स्टील आणि बॅटमन व्हर्सेस सुपरमॅनः डॉन ऑफ जस्टिस ह्या चित्रपटांचा एक्झीक्युटिव प्रॉड्युसर आहे.
16 Sep 2015 - 6:00 pm | साधा मुलगा
सुंदर भाग, पुभाप्र!
4 Oct 2015 - 11:31 am | कपिलमुनी
मिपावरच्या अपूर्ण लेखमालेत अजून एक भर ??
12 Feb 2016 - 11:12 pm | निमिष ध.
पुढचा भाग नाहीये का ? मस्त चालू होती ही लेखमाला