-----------------कण्याचा धड़ा---------------
"26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा."
सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा.
पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे.
12वीत गॅप घेतलेला. शेवटच्या कुठल्यातरी बेंचवर कोपरयात भिंतीकड़च्या बाजूला बसायचो. पोरांच्या नजरा टाळत. साली अपराध करून जेलमधे गेल्यासारखी फीलिंग. 'शिकवायच्या मधेच' सरांनी असे टॉन्ट मारले की सगळे मुलं-मूली हळूच मागे पाहणार. मग आपण खाली मान घालून बसायचं. भयानक एम्बारसमेंट. दहावीत 15ऑगस्ट च्या वेळेला प्रमुख पाहुण्यांकडून दुसरया नंबरचं बक्षीस घ्यायला सर्वांसमोरून पळत जाताना, त्या दोन मिनटात स्वत:चा जेवढा तीव्र अभिमान वाटलेला- त्यापेक्षा कितीतरी जास्त 'लाज' भर वर्गात असले टॉन्ट ऐकताना वाटायची. घरीपण अधनं-मधनं (साहजिक असलेल्या) तिटकाऱ्याचे शब्द कानावर आदळायचे.
'12वीत गॅप घेण्याइतकं' दुसरं मोठं दुःख नसतं -असं त्यावेळी वाटायचं.
पण "आपल्या दुखाची ऊंची कालपरत्वे बदलत असते" हे मात्र आज खरं वाटतं. नापास होणे म्हणजे अटलीस्ट तुम्ही मैदानात लढायला तरी गेलात. गॅप घेतला म्हणजे लढाईआधीच भित्र्यासारखा पळ काढलात. असा एकूण अर्थ.
ते पूर्ण वर्ष भयान गेलं. शाळा सोडून पळून जाऊ वाटण्यापर्यंत विचार पक्के झालेले. आयुष्यातनं उठल्यासारखं वाटायचं. एवढा अपमान करतात म्हणून 'त्या' सरांचा खुप राग यायचा. पण ईगो मात्र अंगात खुप. काही खपवून घ्यायचं म्हटलं की चिडचिड व्हायची. सहामाही पर्यंत असंच चाललेलं. नंतर ते टॉन्ट, अपमान गिळून अभ्यास सुरु केला. 'सरांना एक दिवस राजीनामाच द्यायला लाऊ' असं ठरवायचो. पर्सनल दुश्मनी झाली होती. अभ्यास- परीक्षेला म्हणून कमी अन सरवर चिडून जास्त चालायचा. हे सगळं कोणाला न सांगता -आतल्या आत. 'एक दिवस' आपला नक्की आणु असं वाटायचं. खुप अभ्यास केला. परीक्षा झाली. सरांच्या विषयात-फिजिक्समधे- अन एकूणच बारावीला बरे मार्क पडले. सरांनी मार्कलिस्ट देताना त्यांच्या केबिन मधे बोलवून सांगितलं. तुझ्याबरोबर गॅप घेतलेले अजुन 9 जण होते. कोणीही 50 टक्क्यांच्या पुढं गेला नाही. तुला 80 पडले. "ईगो सांभाळून ठेव. हाच तुला आयुष्यात पुढं नेईल." त्यावेळेला हे नीटसं समजलं नाही. पण नंतर कळून चुकलं होतं की सर शब्द जहरी वापरायचे पण इंटेंशन वाईट नव्हतं. आता प्रश्न पडतो. त्यावेळेला असं सारखा अपमान झाला नसता तर आज इथवर कधी आलो असतो का???
नंतर engg झालं. तिसऱ्या वर्षीच प्लेसमेंट झाली. अजुन आठवतं -रात्री 9 ला रिजल्ट ऐकून बाहेर आलो अन आई वडलांआधी सरांना फ़ोन केला. पूर्ण बारावी अन तो सगळा अपमान उफाळून आलेला. नौकरी लागल्याचं सांगितलं. रडायची गरज वाटली नाही. तसंही माणुस या वयापर्यंत रडणं आवरायचं शिकुन जातो.
कॉलेज संपलं. नौकरी लागली, ऑनसाइट्स झाले, अन आता सगळ सेटल झालं. सर ईगोच्या बाबतीत जे बोलले ते किती खरं होतं हे आज जाणवतं. ईगो टिकला , म्हणून मी टिकलो- इतका त्या इगोचा पॉजिटिव फायदा झाला.
----------------------------------------------------------------------
फ़क्त मार्कासाठी म्हणून अभ्यास केलेल्या अन पेपर संपल्या संपल्या कायम विस्मरणात गेलेल्या धड्यांसारखे-- काही शिक्षक शाळा सुटली की आपल्या आयुष्यातुन कायमचे निघुन जातात.
तर काही शिक्षक 'कणा' कवितेसारखे आपल्या आयुष्याभरात अजरामर होऊन जातात...
कित्येकांची आयुष्ये अशी नकळत स्पर्शुन रांकीला लावलेल्या अनेक शिक्षकांना, माझ्यासारख्या आयुष्यात परतून आलेल्या विदयार्थ्यांचा ह्रदयापासून सलाम........
---अर्थहीन...
प्रतिक्रिया
7 Sep 2015 - 11:29 am | एस
वा! मस्त. माझ्या बाबतीत असं व्हायचं की माझं इतरांनी केलेलं मूल्यांकन, मग ते शिक्षक असोत वा पालक, मी फारसं मनावर घ्यायचोच नाही. त्यामुळे कुणी स्तुती करो व टीका, आमचं आम्ही चालत राहिलो. आता तर यश हे ध्येय्य न राहता यशापयश मिळून एक प्रवासच झाला आहे.
लेख सुंदर आहे.
7 Sep 2015 - 11:33 am | उगा काहितरीच
खरंच मनापासून आवडलं !
(डिग्रीला असताना सर बोलले होते - कुठेही गेला तरी नाही पास होणार तू ! तेही वडीलांच्या समोर ! लवकरच त्या सरला फोन लावणार आहे. सांगायला , सर डिग्री पण झाली, पीजी ही झालं डिस्टींक्शनमधे. )
7 Sep 2015 - 11:34 am | सौंदाळा
मस्त लिहिले आहे.
अकरावीच्या फिजिक्सच्या पहिल्याच तासाला सरांनी ५-६ मुलांना दहावीत झालेला ओहम्स लॉ विचारला. दहावीची परिक्षा होऊन ४ महिने झाले होते त्यामुळे त्यांना तो सांगता आला नाही.
सर वर्गातच म्हणाले ओहम्स लॉ येत नसेल तर बारावीला ५०% ची सुद्धा अपेक्षा ठेवु नका. रोजंदारीवर पाट्या टाकायला जा.
तेव्हा फारच खडुस वाटले पण एकदा शिकवायला चालु केल्यावर त्यांची शिकवण्याचे पद्धत बघुन सगळे खुष. कोणीच त्यांचा तास चुकवत नसे.
१०/११/१२ वी, पदवी शिक्षणाच्या सुरुवतीला बरीच मुले आधीच बावरलेली असतात आणि त्यात मास्तरांच्या अशा बोलण्याचा उलटा परिणाम होऊन हाय खाल्लेले विद्यर्थीसुद्धा पाहिले आहेत. म्हणुनच इतकी परखड भाषा वापरु नये असे माझे तरी मत आहे.
7 Sep 2015 - 1:06 pm | मास्टरमाईन्ड
छान लिहिलंय.
अपमान पॉझिटीव्ह घेणं "त्या" वयात हे फार्फार महत्त्वाचं.
7 Sep 2015 - 2:06 pm | मी-सौरभ
कभी कभी घी निकालने को उंगली टेढि करनी पडती हय
7 Sep 2015 - 3:58 pm | हेमंत लाटकर
खुपच छान!