जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत.
सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला.
कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला. त्यावर विस्ताराने बोलताना एक काकराज म्हणाला की वर्षानुवर्षे, हे गाणं आमच्या कानावर पडत आहे. त्यांत, हेतूपुरस्सर, बदकांची अवहेलना करण्यांत आली आहे. बदकांना सामान्य दाखवून हंसाला मात्र, उगाचच 'राजहंस' म्हणून गौरवण्यांत आले आहे. तो हंस कुरुपच होता, मग त्याला चिडवले तर बिघडले कुठे ? त्यास्तव, या गाण्यावर त्वरित बंदी घालण्यांत यावी. आणि त्याचा कवि जर जिवंत असेल तर त्याला किंवा त्याच्या वंशजांना ताकीद देण्यांत यावी. सर्वप्राणीसमभाव हा आचरणांत आणला गेलाच पाहिजे. काकराजाचे भाषण चालू असताना, मधेच एक बदक, 'रंगारी बदक चाळ' या नांवाविषयी आक्षेप घेऊ लागले, पण, फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा आवाज क्षीण पडला.
दुसरा एक काकराज त्वरेने उभा राहिला आणि त्याने, 'बगळ्यांची माळ फुले' हे गाणे कसे वर्णभेद करणारे आहे ते सांगायला सुरवात केली. बगळ्यांचीच का? 'कावळ्यांची' असे त्याऐवजी लिहायला कवीला काय झाले होते, असा संतप्त सवाल त्याने केला. यावर, कावळे समाज संतप्त झाला आणि त्या कवीला दिसताक्षणी डोक्यावर टोचून टोचून हैराण केले पाहिजे, अशा घोषणा होऊ लागल्या.
गिधाडांनी वेगळाच मुद्दा मांडला. माणसांच्या अनेक सभा, उघड्या मैदानावर होतात तेंव्हा आम्ही झाडावर बसून ऐकत असतो. त्यांत, कोणाच्याही उत्तुंग कामाबद्दल गरुडभरारी असा शब्द वापरला जातो. अशा तर्हेने समस्त गिधाडांच्या भावना दुखावल्या जातात हे माणसांच्या लक्षांत आणून दिले पाहिजे, असे एका गिधाडाने निक्षून सांगितले. आम्ही मानवजातीचे खरे मित्र आहोत. त्यांचे पर्यावरण टिकवण्यासाठी आम्हाला झाडांवर तासनतास ताटकळावे लागते, तेंव्हा कुठे मेजवानीचा लाभ होतो. तर कृतज्ञता म्हणून त्यांनी गृधभरारी असा शब्द वापरला पाहिजे, असा ठराव पास केला पाहिजे हे त्याने पंख-फडफडीच्या गजरांत सांगितले.
गाढवांचा प्रतिनिधी बोलायला उभा राहिला तेंव्हा खुरांचा खडखडाट करुन गर्दभ समाजानी आपली ताकद दाखवून दिली. एक गाढवराज म्हणाले, आमच्याइतकी अवहेलना तर दुसर्या कोणाच्याच वाट्यास येत नाही. आमच्याकडून एवढे काम करुन घेतात पण पोळ्याला फक्त बैलांचीच पूजा करतात. आता आम्हाला जर पुरणपोळी दिली तर काय आवडणार नाही ? ही माणसे तर कायम, 'सिंहगर्जना' वा 'वाघाचे काळीज', असले शब्द वापरुन आम्हाला अनुल्लेखाने मारतात. त्यांना अजून गर्दभ गर्जनेची ताकद माहीत नाही. आमची एक लाथ बसली तर सिंहांची सुद्धा बत्तिशी तुटते.
तरसांचा प्रतिनिधी बोलायला उभा राहिल्यावर, आधी सर्व तरसांनी मनसोक्त हंसून घेतले. ते ऐकल्यावर तो तरसराज ओरडला, "हंसू नका"! कधीतरी गंभीर व्हा.' या सारख्या हंसण्यामुळेच आपण हास्यास्पद ठरतो आहोत. आपल्याला स्वतंत्र शिकार करता येत नाही, हा अपप्रचार आहे. पण आपल्याला पर्यावरणाची खरी काळजी आहे, ती ह्या वाघ्-सिंहांना नाही. भूक बेताचीच आणि शिकार करुन ठेवतात ही अगडबंब! अन्न टाकू नये, एवढेही त्यांना समजत नाही. केवळ ते उरलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून आपल्याला ते खावे लागते. सबब, आपल्यालाही समाजात मानाचे स्थान मिळालेच पाहिजे.
सगळे किरकोळ ठराव संमत झाल्यावर, मुख्य ठराव होता तो 'पशुपक्षीभूषण' हा मान कोणाला द्यायचा? पण त्यावर इतका गोंधळ माजला की कुठलाही निर्णय न होता, सभा संपल्याचे अध्यक्षांना जाहीर करावे लागले. त्यानंतरही, सभेच्या ठिकाणी रात्रभर भीषण हातघाईची लढाई चालूच राहिल्याचे, पळ काढलेल्या एका खबर्याकडून आमच्या प्रतिनिधीस कळले.
प्रतिक्रिया
18 Aug 2015 - 4:03 pm | सस्नेह
भारी कट्टा-वृत्तांत !
18 Aug 2015 - 4:03 pm | जेपी
=))
18 Aug 2015 - 5:16 pm | एस
:-))
18 Aug 2015 - 7:28 pm | विवेकपटाईत
मस्त आवडले
18 Aug 2015 - 9:22 pm | जडभरत
;) ;) ;)
18 Aug 2015 - 10:03 pm | प्रचेतस
अॅनिमल फार्म
18 Aug 2015 - 10:22 pm | नूतन सावंत
सहीच
18 Aug 2015 - 10:26 pm | मधुरा देशपांडे
मस्त लिहिलंय. :)
18 Aug 2015 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी
मार्मिक व समयोचित.
18 Aug 2015 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
तिर्थाशिवाय झालेल्या पशू-पक्षी कट्ट्याचा वृत्तांत आवडला =))
19 Aug 2015 - 12:54 am | एक एकटा एकटाच
मस्त
लई झक्कास
19 Aug 2015 - 2:27 am | संदीप डांगे
मस्त. =))
19 Aug 2015 - 2:30 am | प्यारे१
हॉऑहॉऑहॉ!
19 Aug 2015 - 2:30 pm | gogglya
अजून येउद्यात...
19 Aug 2015 - 4:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
ऑरवेल च्या एनिमल फार्म ची आठवण आली!
19 Aug 2015 - 4:49 pm | मी-सौरभ
आवडेश