"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
9 Dec 2008 - 5:39 pm

इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो..

ओळख ना पाळख..
लेखक : सुरेश जयराम
दिग्दर्शक : मंगेश कदम
निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन

प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत... आम्हालाच फ़क्त का त्रास ना?

मुंबईच्या प्रथितयश निर्मात्यांनी म्हणे या नाटकाला मुंबईत चांगल्या तारखा मिळू नयेत अशी व्यवस्था केल्याचेही कोणत्यातरी वर्तमानपत्रात ( बहुतेक लोकसत्ता) वाचले होते तरीही त्याचे मुंबईबाहेर प्रयोग करून नाटक तगवायचं असं प्रशांत दामले यांनी ठरवलं होतं असं ऐकलं होतं...त्याबद्दलची परीक्षणेही काही उत्साहवर्धक नव्हती पण त्यामुळेच नाटकावर अन्याय होतोय असं उगीचच वाटलं होतं.. तरीही नाटकाकडून जास्त अपेक्षा न ठेवताच दीडशे ( :( का? का?का?) रुपयांची तिकिटे काढून गेलो होतो प्रयोगाला.

ही एक सस्पेन्स कॊमेडी आहे. हे असले डबल जॊनर निभावून नेणे कठीण असते असं का म्हणतात ते इथे कळते.

कथासूत्र ... एका इन्स्पेक्टरला ( प्रशांत) एक स्मृती गेलेला माणूस ( मंगेश कदम) पहाटे रस्त्यावर सापडतो, त्याच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्याला घेऊन तो पोलीस स्टेशनवर येतो.इथे नाटक सुरू होते.त्याच्या खिशातल्या वस्तूंवरून (पाकिट कार्ड्स वगैरे) तो उद्योगपती अशोक गरवारे आहे असं इन्स्पेक्टरला वाटतं म्हणून तो अशोकच्या उर्मट आणि आक्रस्ताळ्या बायकोला ( परी तेलंग) पोलीस स्टेशनवर बोलावतो...ती येऊन सांगते की हा माझा नवरा नाही..... काही काळाने परत येऊन सांगते की हा माझा नवरा आहे...मग असे दोन तीन वेळा करते.... प्रत्येक वेळी इन्स्पेक्टर तिच्यावर विश्वास ठेवून त्या अशोकला ती म्हणेल ते पटवून देत राहतो... या इन्स्पेक्टरची पत्नी सायकिऎट्रिस्ट असते ( पूर्णिमा तळवलकर) ती पोलीस स्टेशनला येऊन या पेशंटला पहायचे कबूल करते आणि त्याची तपासणी करते.... आणि मग एक माफ़क रहस्यभेद होऊन नाटक संपते...
स्पॊइलर ऎलर्ट.... ( या गरवारेचे झारापकराच्या बायकोशी लफ़डे असते, हा तो रहस्यभेद ).... नंतर प्रत्येकाचे भलेमोठे कन्फ़ेशन, आणि अट्टाहासाने शेवट गोड , त्यात इन्स्पेक्टर झारापकर आपल्या बायकोच्या विनंतीला मान देऊन पोलीस स्टेशनात नाट्यगीत म्हणायला लागतात आणि एकदाचा पडदा पडतो....

नाटक किती भयंकर आहे हे नुसते कथासूत्रावरून कळणार नाही.

हा इन्स्पेक्टर गरवारेची बायको सोडून इतरांना का बोलवत नाही ? तिच्यावरच विश्वास ठेवून नुसतं हो ला हो करत राहतो...आणि अशोक गरवारे हा स्मृतिभ्रंशाचं नाटक करतोय हे आधीच कळल्यावर बघताना असं वाटत राहतं की हा कोणीतरी डेंजर माणूस असणार तर अगदीच टुकार रहस्य निघते. शिवाय हा इन्स्पेक्टर जे इन्टेरोगेशन करतो ते अगदीच उथळ, आचरट... बर्‍याच वेळा रिपीटिटिव्ह....त्याच त्याच हालचाली...

प्रशांत दामले मन लावून काम करतात.... झारापकर या भोळ्या सरळमार्गी इन्स्पेक्टरचे काम उत्तम होते.... पण एकूणच लेखन इतके सुमार आहे की काही वेगळं करायला वाव नाही...( याच लेखकाचे कुठे ते डबलगेम नाटक आणि कुठे हे...!!) शाब्दिक विनोदाचे प्रमाण कमी..हशे मिळवायला मग उड्या मारणे, जमिनीवर गडाबडा लोळत लहान बाळासारखे हातपाय वर हलवणे असे प्रकार पुष्कळ करावे लागतात. खाकी कापड चढवलेला मोठा लोकरीचा गुंडा हातातून पडल्यावर ज्या लोभसवाण्या हालचाली करेल त्या सर्व हालचाली दामले करत होते त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते....

.....साधारणपणे शाळेच्या स्नेहसंमेलनात ज्या प्रकारचे नाटक पहायला मिळते आणि जसे दिग्दर्शन असते तसे वाटत होते.... एक उदाहरण देतो...इन्स्पेक्टरला कोणीतरी म्हणते तुम्ही माझ्या किल्लीवर बसलाय... मग इन्स्पेक्टर बसल्या जागीच अंग हलवून खुललेल्या चेहर्‍याने म्हणतो ," मला काहीतरी फ़ील होतंय".. मग प्रचंड हशा वगैरे... कायिक विनोद हा एक महत्त्वाचा प्रकार असतो हे मान्य हो, पण सतत तेच ? त्याला काही प्रमाण आहे की नाही ?...

मी पाहिलेल्या प्रयोगात मंगेश कदम यांनी कंटाळलेल्या रिप्लेसमेंट टाकणार्या अभिनेत्याने तालमीत काम करावे तसा प्रयोग केला....त्यात प्रचंड फ़ंबल, बोलता बोलता अडखळणे, चुकीचे बोलून पुन्हा वाक्य म्हणणे अशा प्रकारांमुळे छान तालमीचा फ़ील आला....इतर पात्रे संवाद म्हणत असताना अशोक गरवारे मात्र नाटकात हजर नाहीत असे वाटत होते.किंवा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रत्येक कलाकाराकडे पाहत आहेत असे वाटत होते...

परी तेलंग यांचा आक्रस्ताळा सूर आणि टायमिंग मस्त जमलेलं आहे ... पूर्णिमा तळवलकरांचा अभिनय ठीक पण अत्यंत छोटी आणि आगापीछा नसलेली भूमिका त्याला त्या काय करणार?...

नाटकभर माझ्या मागे एक पाच वर्षांची मुलगी मन लावून नाटक बघत होती आणि लोक हसले की आपल्या आजोबांना विचारत होती की अशोक गरवारे कोण हो? मग तेही तिला सांगत होते... सुरुवाती-सुरुवातीला मी व्यत्ययामुळे वैतागलो मग मंचावरच्या नाटकापेक्षा हे मागचे संवाद अधिक रम्य वाटायला लागले... शिवाय आता ही पोरगी आजोबांना काय विचारणार असा एक सस्पेन्स टिकून राहिला..

एकूणच हे अजिबात न जमलेलं नाटक आहे.... मोठेमोठे हिंदी निर्माते वाईट कथा घेऊन खूप खर्च करतात आणि आपण प्रेक्षक म्हणून म्हणतो की अरे कथा नीट घ्या ना , नुसतं मार्केटिंग करून काय उपयोग आहे का?
तेच आता दामले यांना प्रेक्षकांकडून ऐकावं लागणार आहे... आत्ता नाटक जे काही चाललं आहे ते दामले कदम जोडीच्या पूर्वपुण्याईवर चाललं आहे...

हे असं नाटक घेऊन इतकी वर्षं अनुभव असलेले लोक नाटक करतात आणि रिलीजच्या आधीच हजार प्रयोग करणार अशा गर्जना करतात, हे किती धाडसी आहे..... शिवाय प्रत्येक नाटक चाललंच पाहिजे अशी काही वाक्यं मुलाखतीत फ़ेकतात तेव्हा त्याला जाहिरातीवरचा विश्वास म्हणावं का प्रेक्षकांच्या मूर्खपणाची खात्री म्हणावं ?
......पहा...
http://www.esakal.com/esakal/08092008/Saptarang6D6833BC27.htm
नाटक पाहिल्यावर ही मुलाखत परत वाचली .एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली...

असो..पण प्रेक्षक मूर्ख नसतात ....

२५ डिसेंबरला शंभरावा प्रयोग होणार आहे म्हणे....हे परीक्षण वाचूनही हिंमत असेल तर जरूर जावे.....
प्रशांत दामले यांना पुढल्या प्रयोगासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा...

नाट्यमौजमजाप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते

गेली काही (काही का? बरीच!) वर्षे अनेक विनोदी नाटके विनोदी नसून हास्यास्पद होती - तरीही ती चालली.
'यदा कदाचित'चे किती भ्रष्ट नमुने येऊन गेले आणि लोकांनी पाहिले ते आठवा.
मराठीत मेलोड्रामाचा तर मेलो,मेलो! ड्रामा झाला.
ऐतिहासिक नाटकातही 'जगदंब! जगदंब!' असा पुल्लिंगी जप करणारे शिवाजी महाराज पाहून प्रत्यक्ष जगदंबेलाही आपण 'अंबा'च आहोत का? असा प्रश्न पडला असेल. तरीही ती नाटके मराठी नाट्यसृष्टीत मैलाचे दगड ठरली.

मास्तर, नाटकाची संहिता सुमार आहे सर्व लोकांना कळतेच असे तुम्हा-आम्हाला वाटते हो!
दर्जेदार संहिता,दर्जेदार नाट्यलेखन म्हणजे काय? ते दाखवण्याची आता तुमच्याकडूनच काही अपेक्षा. :)

रामपुरी's picture

9 Dec 2008 - 10:24 pm | रामपुरी

"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली.

(चुकून यदाकदाचित पाहून पस्तावलेला)

छोटा डॉन's picture

10 Dec 2008 - 8:51 am | छोटा डॉन

"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली.

अगदी चोक्कस प्रतिसाद ....
लै भिकार नाटक होते राव, त्यानंतर आलेली तर फक्त "जत्रेत" तमाशा आला नाही तर ऐनवेळी उभा करायच्या लायकेची ...

काही पण म्हणा, मराठी रंगभुमीवर "संतोष पवार" व मराठी चित्रपटात "भरत जाधव" ह्यांना आवरायला हवे ...
उगाच डोक्यात जाईल असा अभिनय किंवा जे असेल ते काम करतात ...
मी तर म्हणेन ही लोकं सध्या चक्क वाट्टोळे करत आहेत दोन्ही क्षेत्रांचे ....

बाकी मास्तरांचे परिक्षण नेहमीप्रमाणे भारी ....!
आपला सध्या "प्रशांत दामले" यांच्यावरही विश्वास राहिला नाही ...

"अंगविक्षेप, पाचकळपणा,अचाट / अश्लिल शाब्दिक कोट्या, ओढुन ताणुन केलेला विनोद, उगाच चेहर्‍याचे भजे करणे" ह्याला कमीत कमी मी तरी "अभिनय" म्हणु शकत नाही. क्षमस्व ...!

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

आपला अभिजित's picture

10 Dec 2008 - 9:27 am | आपला अभिजित

माझ्या मते अतिशय उत्क्रुष्ट दर्जाचे विडंबनात्मक लोकनाट्य होते. संतोष पवारच्या उत्तम कामगिरीपैकी एक. त्यातले विनोद आणि कोट्या म्हणजे तर अशक्य पातळीवरच्या होत्या. मी सात वेळा पाहिले.

अर्थात, काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल.

यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके.

संतोष पवार काही उत्तम विनोदी लेखक नाही. पण तो खूप प्रयोगशील, हुशार, वेगवान दिग्दर्शक आहे. तुम्ही `स्वभावाला औषध नाही', `ए भाऊ, डोकं नको खाऊ' पाहिल्येत काय?

आपला अभिजित's picture

10 Dec 2008 - 9:31 am | आपला अभिजित

`दिवसा तू रात्री मी'देखील असेच एक भिकार नाटक.

पण अशी नाटके पाहतानाही प्रेक्षक खुर्चीतून उसळतात. सध्याच्या प्रेक्षकांची अभिरुची हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत.

असो.

भडकमकर मास्तरांचे यावर मत ऐकायला आवडेल.

टायगर's picture

10 Dec 2008 - 9:54 am | टायगर

भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत.

आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते.
आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते.
शब्दप्रयोग खटकला. आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे
दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 11:10 am | विसोबा खेचर

आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते.

असे म्हणायची पद्धत आहे. याची देहि याची डोळा... यावरूनच ते रूढ झालेले आहे..

आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते.
शब्दप्रयोग खटकला.

कृपया आपले भाषिक ज्ञान वाढवा म्हणजे विविध शब्दप्रयोग, म्हणी यांचा परिचय होऊन आपल्याला मराठी भाषेतले साधे, सोपे व रूढ शब्दप्रयोग खटकणार नाहीत..!

आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे
दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण

वरील वाक्यात विनाकारण वैयक्तिक शेरेबाजी दिसते आहे. कृपया तसे करू नये अशी आपल्याला समज देण्यात येत आहे..

तात्या.

टायगर's picture

11 Dec 2008 - 3:37 pm | टायगर

http://www.misalpav.com/node/5032

यावर उत्तर
वैयक्तिक शेरेबाजीचा प्रश्‍नच नाही तात्या. कारण माझी आणि लेखकाची ओळखच नाही. त्यांचे पुष्कळ लिखाण वाचले आहे. त्यामुळेच त्यांना शब्दप्रभू म्हटले आहे. अगदी निर्मळ मनाने काही शेरेबाजी केली, तर त्यात राग येण्याचे कारण नाही. खेळकरपणे ती स्वीकारायलाच हवी, असे मला वाटते. तसेच मला आपण भाषिक ज्ञान वाढविण्याविषयी सांगावे, अशी काही परिस्थिती नाही. आणि "समज देणे' वगैरे शब्द माझ्या देहयष्टीला पेलणारे नाहीत. ही तर दादागिरी, असे मला वाटते. काहीच मत नोंदवायचे नसेल, तर आपण आपले सदस्यत्व रद्द करा, असा संदेश पाठवून द्या ना....

छोटा डॉन's picture

10 Dec 2008 - 9:56 am | छोटा डॉन

>>अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत.
=)) =))
अगदी खरे, मुळात "गोलमाल" हाच भंगार होता , रिटर्नने त्यापुढची खालची पातळी गाठली ...
प्रेक्षकांची "अभिरुची व आवड" हा आता खरच चर्चेचा व अभ्यासाचा विषय झालेला आहे... :(

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

छोटा डॉन's picture

10 Dec 2008 - 9:57 am | छोटा डॉन

.

भडकमकर मास्तर's picture

10 Dec 2008 - 10:23 am | भडकमकर मास्तर

यदा कदाचित पहिल्यांदा आले तेव्हा त्याचे साप्ताहिक सकाळमध्ये माधव वझे यांनी केलेले परीक्षण वाचले होते ... त्यांनी त्याबद्दल बरेच बरे उद्गार काढले होते त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती...

...... या नाटकाच्या फॉर्ममबद्दल पूर्वीपासूनच कल्पना होती आणि अपेक्षा अति नव्हत्या त्यामुळे पहिला प्रयोग मी अत्यंत मोजक्या शंभर दीडशे लोकांबरोबर पाहिला , आणि तो खूप आवडला... त्यातले कित्येक विचित्र वाटणारे शब्द, गंमतीदार कॉमेंट्स मित्रांच्यात बराच काळ वापरत होतो हे आठवते.... महाभारतात गांधीजी आणि कृष्णाचं शेवटचं आर्ग्युमेंटसुद्धा उत्तम वाटले होते...
( याच आर्ग्युमेंटला एका लेखन कार्यशाळेत परेश मोकाशीने खच्चून शिव्या घातल्या होत्या... "कृष्णाला युद्धखोर दाखवणार्‍या या लेखकाला कृष्णाने शांततेचे सर्व प्रयत्न संपल्यावरच युद्धाचा मार्ग सांगितला होता , हे लेखकाला समजू नये? " असा परेशचा मुद्दा होता... असो, तेव्हा बघताना असं काही जाणवलं नाही हे खरं...)
शिवाय सत्याचा शेवटीच विजय का होतो? असा प्रश्न आणि कालचक्राचे या विंगेतून त्या विंगेत जाणे हे प्रकार लै इन्ट्रेष्टिंग होते...

नंतर हेच नाटक पुन्हा एका गणेशोत्सवात आयोजित केलेले मोफत पाहिले.... बरे वाटले होते.....

नंतर सहा महिन्यांनी आमच्या नाटक मित्र मंडळाला घेऊन मी पुन्हा गेलो , तिकिट काढून.... एव्हाना नाटक चालायला लागलेले होते.....कलाकार मंडळी ष्टार व्हायला लागली होती.... तिकिटाचे दर खच्चून वाढले होते....लवकर हाउसफुल्ल होऊन तिकिटे मिळेनाशी व्हायला लागली होती... या वेळी नाटकात भलताच फरक वाटला.... मुख्य लोक सोडले तर कलाकार पुष्कळ बदललेले होते... नाटक चालू होते पण कलाकारांचे मन नाटकात नव्हते...ज्यांचे संवाद त्या क्षणी चालू नाहीत असे साईडचे कलाकार नाटक चालू असताना आपापसात खाणाखुणा करणे, नेत्रपल्लवी करणे, उगीच हसणे, संगीत संयोजन करणार्‍या आणि समोर बसलेल्या ढोलकीवाल्याकडे वगैरे बघून बोलणे असले पुष्कळ प्रकार चालू होते..हसू आवरत नाही म्हणून पाठ करून काही कलाकार हसत होते.. ते पाहून शिसारी आली.... माझ्या बरोबर आलेल्या मित्रमंडळाने नाटकाला तर शिव्या घातल्याच पण मलाही घातल्या... आजूबाजूला असेच लोक प्रचंड हसत होते , हजार बाराशे प्रेक्षक एन्जॉय करत होते आणि मी मोजक्याच लोकांबरोबर पाहिलेला सिन्सियर प्रयोग आठवून अजून व्यथित होत होतो...

कमी वयात कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली की ती डोक्यात जाते आणि कलाकार असे वर्तन करतात असे मला वाटते... दिवसाला तीन तीन प्रयोगांच्या पाट्या टाकणारे कलाकार होते ते...

.... कलाकार प्रेक्षकांना गृहित धरायला लागले की संपले ..... तुमची कला कशी का असेना , कितीही महान असेल माझ्या दृष्टीने ती सिन्सियरली सादर करणे आवश्यक आहे....( तेव्हा ठरवले की किमान तिकिट काढून तरी आता पवारांचे नाटक काही पहायचे नाही ... त्यानंतर एकदा गणेशोत्सवात आयोजित एक पवारांचे दुसरे मोफत नाटक पाहिले ...नाव आठवत नाही, त्यात सगळे तसेच्..भारत पाक संबंध,आग्रा समिट २००२ वर भाष्य...मुशर्रफचे केरिकेचर होते .. तो कलाकार उड्या मारत होता बगैरे....जोकला जोक जोडून केलेले नाटक... सुमार लेखन.. आवडले नाही)

पण तरीही अभिजितचे म्हणणे मला पटते... संतोष पवार हा लेखक म्हणून भारी नसेल पण दिग्दर्शक म्हणून मला आवडतो...
( ती तिचा दादला आणि मधला या नाटकाच्या एका टीव्ही कार्यक्रमातला एक सीन मला लै भारी वाटला होता... ते नाटक बघायला जावे असे वाटले होते पण अजून पाहिले नाही...)

काँट्ररी टु पॉप्युलर बिलीफ मी पवारांचे आणि यदाकदाचितचे कौतुक करतोय याची मला कल्पना आहे, पण ही माझी सिन्सियर मते आहेत...त्याने नाटकाला एक वेगळेपणा आणला पण लेखक म्हणून तो मात्र त्याच्त्याच प्रकारात अडकलेला आहे , असे वातते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपला अभिजित's picture

11 Dec 2008 - 10:08 am | आपला अभिजित

तुमचे म्हणणे पटले.

तुम्हाला बरीच आवड दिसते नाटकांची.

`ती तिचा दादला आणि मधला' मी मूळ संचात पाहिले. नंतर विजय कदमने ते नाटक सोडले. पण विजय चव्हाण आणि संतोष पवार धमाल करायचे. संतोष उत्तम विनोदी अभिनेताही आहे. त्याचा टायमिंग सेन्स जबरदस्त आहे. त्या नाटकात तो म्हणायचा, `च्यायला, लोक महिना-महिना आंघोळ न करता कसे राहतात, कुणास ठाऊक! मला तर १५ दिवसांतच खाज सुटायला लागते.'
`लगे रहो राजाभाई'ही बरे होते. पण त्याच फॉर्ममधले आणि तेच तेच. त्यातही सूत्रधार म्हणून संतोष पवार धमाल करायचा. त्याच्या बाणकोटी भाषेच्या स्टाईलमध्ये एक दासी म्हणायची...`नंगा महाराज. नंगा!' (नको महाराज, नको!) त्यावर संतोष त्या राजाकडे विचित्र नजरेने बघून म्हणायचा, `नंगा' महाराज???
असो.
`माझा बाप डोक्याला ताप' बघायला मिळाले नाही. तसेच, `पती माझे छत्रीपती'देखील.
बघू..

छोटा डॉन's picture

10 Dec 2008 - 9:50 am | छोटा डॉन

अभिजीतदा, बर्‍यापैकी माझ्या मनात असलेली वाक्ये जशीच्या तशी उतरली आहेत तुझ्या प्रतिसादातुन.
माझ्याकडे "सहमत" म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय नाही...

>> काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही.
एक्झॅक्टली ...
माझे मत ह्यामुलेच खराब आहे, का ते माहित नाही पण मला त्याचा फॉर्म / पॅटर्न आवडला नाही ...

पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल.

+१, ह्याबाबतीत मी बर्‍यापैकी सहमत ...
संतोष आणि केदार ह्यांचे इतर काही प्रकार सोडले तर "साच्याबाहेरचे प्रयोग" ह्यातले यश मान्य करतोच मी ...
त्यांचे काही समारंभातले "प्रयोग" सुद्धा मस्तच होते, उदा : पुरस्कार सोगळे वगैरे ...
इनफॅक्ट केदारच्या "घडलयं बिघडलयं" ह्याचा तर मी डॅम फॅन आहे ....
त्यातल्या टीका / कोट्यांची लेव्हल अक्षरशः अत्युच्चच म्हणावी लागेल ...

यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके.

यु सेड इट ...!
"यदा यदा" तर मी अक्षरशः भंगार-पत्रा-लोखंड ह्या कॅटॅगिरीचे मानतो ...

"स्वभावाल औषध नाही" बद्दल ऐकले आहे, अजुन पाहिले नाही. आता नक्की पाहिन जिकडे मिलेल तिकडे ...

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

आपला अभिजित's picture

11 Dec 2008 - 10:09 am | आपला अभिजित

`श्रीयुत गंगाधर टिपरे' ही निखळ, खुसखुशीत, धमाल मालिका विसरलास काय?

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 6:26 pm | आपला अभिजित

अजून बघण्याचा योग आलेला नाही. (म्हणजे, पाहावेसे वाटलेले नाही.)
पण वाईट असल्याचे आधीच समजले होते.

प्रशांत दामले यांनी फार काही दर्जेदार नाटके हल्लीच्या काळात केलेली नाहीत. मी पाहिलेले त्यांचे शेवटचे बरे नाटक म्हणजे, गेला माधव कुणीकडे. हो....एका लग्नाची गोष्ट' चांगले होते. निदान करमणूक या पातळीवर तरी.
`जादू तेरी नजर'ही वाईट होते, असे कळले. पाहायला मिळाले नाही अजून. सीडीवर बघेन आता.

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 9:25 pm | भडकमकर मास्तर

याच्या तुलनेत जादू तेरी नजर म्हणजे मास्टरपीस म्हटले पाहिजे :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 6:37 pm | आपला अभिजित

स्वत:च्या पैशाने बघेनच. वाईट असे कुणी सांगितले, की आम्ही आधी धावतो!
पण अर्थातच, १५० रुपयांचे तिकीट काढणार नाही. ८० रुपयांचे मिळाले, तर बघू!

(अवांतर : `सही रे सही' मी पहिल्या प्रयोगाला ३० रुपयांत खालच्या शेवटच्या रांगेतून पाहिले होते. गेले ते दिवस!)

कमितकमी ३०० रु. वाचवल्याबद्दल आभारी आहे! :D

चतुरंग

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 10:46 pm | लिखाळ

छान परिक्षण.. नेटावर नाटक आले तरच पाहीन.. तसेही नेटावर आले तरच पाहायला मिळेल.
प्रेक्षक खुर्चीतून उसळ्या मारुन हसत होते ना ! मग झाले तर.. अभिरुचीच्या अनेक वर्गातल्या कुठल्यातली वर्गाला हे नाटक आनंद देत आहे ना.. मग ते चालेल की.. :)
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 10:54 pm | भडकमकर मास्तर

नेटवरही नेटाने बघावे लागेल ....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन's picture

10 Dec 2008 - 1:06 am | नंदन

आवडले. खाकी लोकरीचा गुंडा आणि दिलेली उदाहरणे मस्तच.

>>> एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली
-- कमीत कमी इथे तरी डबल जानराचे ओझे पेलता आले म्हणायचे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

10 Dec 2008 - 8:36 am | सखाराम_गटणे™

प्रेक्षक मूर्ख नसतात ....
हे खरे असले तरी, पण हे सगळे पाकीटाला भोक पडल्या नंतर समजते.

असाच रिव्ह्यु आपच्या नजरेत आला आहे.

ह घे णे

मेघना भुस्कुटे's picture

11 Dec 2008 - 10:34 am | मेघना भुस्कुटे

खरेच, ती लोकरीच्या गुंड्याची उपमा फार आवडली. प्रशांत दामलेंचा उत्स्फूर्तपणा आणि लोभसवाणेपणा - दोन्ही अक्षरशः डोळ्यांसमोर आले.
सुरेख परीक्षण.
प्रशांत दामलेंना कुठेसे कुणीतरी विचारले होते, की याच प्रकारच्या भूमिका करून तुम्ही एका साच्यात अडकणार नाही का? त्यावर त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते - मी एकसाची भूमिका करत नाही. मी विनोदी भूमिकांमधे स्पेशलायझेशन करतो...
तेव्हा ते उत्तर वेगळे वाटले होते आणि प्रशांत दामलेंबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही.
मास्तर, तुमचे काय मत?

भडकमकर मास्तर's picture

11 Dec 2008 - 3:08 pm | भडकमकर मास्तर

दामले स्टेजवर धमाल करतात...
त्यांची बरीचशी नाटकं पाहिली आहेत... मोरूची मावशी,ब्रह्मचारी,गेला माधव कुणीकडे, चार दिवस प्रेमाचे,एका लग्नाची गोष्ट,पाहुणा,प्रियतमा, श्श्शू...कुठे बोलायचे नाही,जादू तेरी नजर....
म्हणजे राहिली फक्त लग्नाची बेडी, टूरटूर आणि मिसळ्पाव नावाचे काहीतरी हिन्दी इन्ग्रजी प्रकरण आहे ते...
यातली बरीचशी नाटके आवडलीच आहेत....
...
एक गोष्ट सांगावी लागेल की हा माणूस स्टेजवर / टीव्हीवरही आला की छान वाटतं... काहींचं व्यक्तिमत्त्वच लोभसवाणं असतं, त्यातला तो आहे...... त्या खवैय्या कार्यक्रमात तो त्या पदार्थाची चव घतो शेवटी आणि काही निरर्थक बडबड करतो ती ऐकायलाही फार मजा येते...

पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही.
हे मेघनाचे म्हणणे पटते...
विनोदी भूमिकांमध्ये त्याने काही अधिकाधिक वेगळे केले आहे का? जवळजवळ सगळ्याच तशाच भूमिका... 'पाहुणा'मधली भूमिका थोडी वेगळी होती...अर्थात पाहुणा विनोदी नव्हतेच... आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... बाकी सर्व भूमिका या नाटकातून काढून त्या नाटकात घुसवल्या तरी फारसा फरक पडणार नाही.... या अर्थाने मग स्पेशलायझेशन उरते ते काय? ...

याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे " ओळख ना पाळख करण्याचे कारण म्हणजे मी इन्स्पेक्टर कधी केला नव्हता"... म्हणजे एक वेगळी भूमिका म्हणून इन्स्पेक्टर केला ... पण हा इन्स्पेक्टर स्वभावानं तोच इतर नाटकांसारखाच आहे... मग नुसतं पात्र आणि पोषाख बदलून काय होणार? म्हणजे खाकी कपडे घातलेला प्रशांत दामलेच ना तो ?

अर्थात हे सारे त्याला समजत असणारच पण आता व्यवसाय म्हणून वेगळ्या भूमिका करायची रिस्क कितपत घ्यायची ते ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लिखाळ's picture

11 Dec 2008 - 5:29 pm | लिखाळ

>> आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... <<
चार दिवस प्रेमाचे नाटक मला फार आवडले होते.. सर्व प्रवेश मस्त मजेदार होते. शेवटचा प्रसंगात म्हातारा-म्हातारी 'सुखाने' राहात आहेत असे काही होते ते आठवते. तो प्रसंग गंभीर होता. आणि नाटकातल्या विनोदाचा मूड तो प्रसंग बघितल्यावर निवळला. विनोदी नाटकाला अशी गंभीर-कारुण्याची किनार कशासाठी? ('हसता हसता डोळ्याच्या कडा ओल्या' हे कशासाठी ते समजत नाही.)
-- लिखाळ.