युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका किंवा अमेरिका या देशाबद्दल न ऐकलेला माणूस या पृथ्वीतलावर आढळणे कठीण आहे. जवळ जवळ प्रत्येकालाच या देशाचे सुप्त आकर्षण असते. अमेरिकेतील अतिप्रगत पायाभूत सुविधा, थक्क करून टाकणारी वैज्ञानिक प्रगती, आंतरराष्ट्रीय राजकारणात दादागिरी करणारे या देशाचे राजकारण, या देशातील मोकळे सामाजिक वातावरण, वैयक्तिक प्रगतीसाठी न संपणाऱ्या संधी व प्रगतीस पोषक असे वातावरण हि यादी न संपणारी आहे.अमेरिकेला माना अथवा न माना या देशाच्या प्रभावाने आपल्या सर्वांच्याच जगण्यावर परिणाम झालेला आहे. आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तूंपासून आपल्या करमणुकीच्या माध्यमांपर्यंत कुठलाही कोपरा अमेरिकेच्या प्रभावाखाली नाही असे म्हणता येणार नाही. अमेरिकेचे कौतुक करणारा असो वा जगातील प्रत्येक समस्येसाठी अमेरिकेला सतत दोष देणारा असो, अमेरिकेला भेट देण्याची संधी कुणीही नाकारणार नाही.अमेरिकेला भेट न देताही, चित्रपट व इतर माध्यमांद्वारे आपल्याला अमेरिकेबद्दल बरेच माहीत असते. तिथले रुंद रस्ते, वेगात धावणारी वाहने, सार्वजनिक शिस्त, पोलिसांचा कुशल कारभार, नाइट लाईफ वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष भेट दिल्यावर दिसणारी अमेरिका बरीच वेगळी वाटते. आपल्या देशाने केलेल्या जोरदार प्रगतीमुळे बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटेनासे झालेले आहे. पण तरीही अश्या अनेक साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या अमेरिकन समाजाकडून आपल्या समाजाने शिकायला हव्या. विशेषकरून सार्वजनिक ठिकाणांवरील शिस्तपूर्ण आचरण, सौजन्य, स्वच्छता इत्यादी. पण राहून राहून एक प्रश्न माझ्या मनात येतो की हा देश असा कसा महाबलाढ्य बनला, जगातील इतर नावाजलेल्या देशांपेक्षाही पुढे कसा गेला कारण फार नाही पण अडीचशे वर्षांपूर्वी देश अथवा संस्कृती म्हणून दखल घेण्याजोगे अस्तित्वही नव्हते. सुरुवातीला इंग्रज व पाठोपाठ इतर युरोपियन्स अन मग इतर देशातील लोक येतात काय अन हा देश घडतो अन असा घडतो की अलम दुनिया त्याला सलाम करेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी करतोय अन मला जे उमजतंय ते आपल्यापुढे या लेखमालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये आपले सहकार्य फार मोलाचे आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------एका नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी इंग्लंडमधील साहसी दर्यावर्दींनी अटलांटिक महासागर ओलांडून एका भूमीवर पाऊल ठेवले. अन यातून एका राष्ट्राचा जन्म झाला जे पुढे जगाच्या हेव्याचा अन कौतुकाचा विषय बनले. पण तेथे स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मित्रांशी शत्रुत्व घ्यावे लागले. या नव्या राष्ट्राच्या रहिवाशांनी तत्कालीन महासत्तेविरुद्ध युद्ध छेडले जिची लष्करी ताकद जगात अभेद्य होती. व्यापाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी जहाजे भरून व्यापारी अन त्यांचे सवंगडी अटलांटिक महासागर पार करण्यास निघाले. मे १६१० म्हणजे कोलंबस ने अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवल्याच्या १२० वर्षांनंतरही हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. अश्याच एका जहाजावर जॉन रॉल्फ नावाचा एक खलाशी होता. २४ वर्षीय जॉन व्यवसायाने शेतकरी होता. अत्यंत महत्त्वाकांक्षी, आत्मनिर्भर अन द्रष्टा असलेला जॉन एक जन्मजात उद्योजक होता. आज ज्या प्रवासाला विमानाने केवळ ६ तास लागतात त्याच प्रवासाला त्या काळात दोन महिन्यांपेक्षाही अधिक वेळ लागायचा. त्या काळातील ७०% खलाशी प्रवासाला निघाल्यापासून वर्षभरातच दगावत असत. पण तरीही हि जोखीम नक्कीच आकर्षक होती कारण उत्तर अमेरिका हि अमर्यादित संधी देणारी भूमी होती. एक भूप्रदेश जो विपुल साधन संपत्तीने भरभरून होता. सर्वप्रथम बहुमूल्य अशी जमीन जी अर्ध्याहून अधिक घनदाट जंगलांनी व्यापली होती. अन त्या जमिनीवर ६ कोटींहून अधिक संख्येने असलेले बायसन प्राणी. अन त्याहून विशेष म्हणजे अमेरिकन जमिनीच्या पोटात सोने चांदी सारखे मौल्यवान धातू बऱ्याच प्रमाणात असल्याची वंदता होती. हे नवे रहिवासी सोन्याचा मोठा साठा मिळाल्याखेरीज थांबणार नव्हते.पण जॉन जेव्हा पूर्व किनाऱ्यावरील जेम्सटाउन वसाहतीवर पोचला तेव्हा त्याला तेथील परिस्थिती नरकाहूनही भयंकर वाटली. त्याच्यापूर्वी ५०० हून अधिक लोक तिथे पोचले होते त्यापैकी केवळ ६० जिवंत राहू शकले होते अन मरणाऱ्यांपैकी बहुतांश भूकबळी होते. जॉन रॉल्फ च्या आगमनापूर्वी जे वाचले ते जवळ असलेल्या घोड्यांचे मांस खाऊन एवढेच नव्हे तर चामड्याच्या वस्तू शिजवून त्यावर कशी बशी गुजराण करत होते. जगण्यासाठी करावी लागलेली अमानवी तडजोड म्हणजे एका माणसाने तर आपल्या गर्भवती असलेल्या बायकोला मारले व तिचे मांस खाण्याची तयारी करत असताना इतरांनी त्याला पकडले व या गुन्ह्यासाठी त्याला मृत्युदंड दिला. हि घटना जॉन येण्याच्या ३ महिन्यांपूर्वीची.नव्याने आलेले ब्रिटिश स्थलांतरित या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. अन कष्टाची कामे करण्याची त्यांची तयारी नव्हती. सोबत मोठा अन्नसाठा आणण्याऐवजी त्यांनी सोने ओळखणाऱ्या रसायनांचा साठा आणला होता ज्याचा उपयोग सुरू करण्याइतकेही सोने त्यांना सापडू शकले नाही. अन हि भूमी त्यांच्यासाठी अजूनही परकीयच होती. जेम्सटाउन वसाहतीची उभारणी स्थानिक नेटिव्ह अमेरिकन्सच्या (Powhatans) साम्राज्याच्या मधोमध झालेली होती. अन्नासाठी तडफडणारे ६० रहिवासी जवळ जवळ २० हजार स्थानिकांनी वेढले गेले होते. नेटिव्ह्जकडे वेगाने वापरता येतील असे धनुष्यबाण होते. त्या तुलनेत ब्रिटिशांकडे असलेल्या बंदुका फारच वेळखाऊ होत्या. अन लौकरच दोहोंमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. या सर्व परिस्थितीमुळे नव्याने आलेल्या रहिवाशांपुढे जिवंत राहण्याच्या प्रयत्नांखेरीज करण्यासारखे काहीच नव्हते.जॉन रॉल्फ मात्र सर्वांहून वेगळा होता. तो येथे आल्यावर साधन संपत्ती लुटून पळून जाण्यासाठी आलेला नव्हता. त्याने बरोबर येताना तंबाखूचे बियाणे आणले होते. त्याने तंबाखूची लागवड सुरू केली. त्यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमध्ये तंबाखूचा प्रसार झाला होता. तत्कालीन तंबाखूंच्या बियाण्यांचा जागतिक व्यापार स्पॅनिश व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. थोड्याच कालावधीत जॉनने लावलेले तंबाखूचे पीक हाती आले. त्याने उत्पादित केलेल्या तंबाखूची आजची किंमत १ दशलक्ष डॉलर्स होते यावरून त्याच्या यशाची कल्पना करता येईल.अन या तंबाखूच्या जोरावर नव्या रहिवाशांनी नेटिव्हांशी मैत्री केली. जॉन रॉल्फने स्थानिक टोळीप्रमुखाच्या कन्येशी (Pocahontas) विवाह केला. साहसी व मुत्सद्दी असलेल्या Pocahontas ने १६०७ मध्ये कॅ. जॉन स्मिथ याचे प्राण वाचवले होते व रहिवाशांना काही वेळा अन्नधान्याची मदतही केली होती. लग्नानंतर काही वर्षांनी तिचे तैलचित्र इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाले. अन या वसाहतीला इंग्लंडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. शेक्सपिअरने त्याच्या नाटकातही वसाहतीचा उल्लेख केला. लंडनमधील मोठे गुंतवणूकदार वसाहतीमध्ये नव्या मोहिमांद्वारे गुंतवणूक करू लागले.
Pocahontas - पारंपारिक वेशातजॉन व PocahontasPocahontas व तिचा पुत्र थॉमसत्यानंतर दोनच वर्षांत वसाहतीतील प्रत्येकजण तंबाखूचे उत्पादन घेऊ लागला अन यामार्गेच जेम्सटाउन ची भरभराट झाली. अजून दोन वर्षांनी हजार नवे रहिवासी आले त्यांनी काही आफ्रिकन गुलामही बरोबर आणले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे जाऊन या गुलामांपैकी काहींनी तेथे जमीन पण खरेदी केली. पुढील ३० वर्षांत व्हर्जिनिया राज्यात बाहेरून आलेल्यांची संख्या वीस हजारांवर पोचली.तंबाखूच्या भरघोस उत्पादनामुळे या प्रदेशाची दखल संपूर्ण जगात घेतली जाऊ लागली. पुढील दीडशे वर्षे उत्तर अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या जिन्नसांमध्ये तंबाखू आघाडीवर होता.सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.क्रमशः
प्रतिक्रिया
12 Sep 2012 - 7:39 am | मुक्त विहारि
वाचत आहे..
12 Sep 2012 - 8:07 am | सोत्रि
मस्त रे रंगा!
सुरुवात मस्त्च झालीय, पुढचे भाग लवकर येऊदे.
- ( महासत्ता होऊ पहाणार्या देशाचा रहिवासी ) सोकाजी
12 Sep 2012 - 9:35 am | मी_आहे_ना
जोशीबुवा, वेलकम बॅक, अगदी मस्त विषय, पु.भा.प्र.
(मिनेसोटा नाईस)
:)
12 Sep 2012 - 9:32 am | मन१
उत्तम सुरुवात.
गाडी पुढे american dream ह्या गाजलेल्या संकल्पनेवरही येइल अशी आशा.
खूप खूप मोठा विषय घेतलात.
पण म आं जा वर ह्यासंदर्भात वाचायला मिळतय हेच खूप आहे.
येनाराय असलेले आणि नसलेलेही बरीच भर घालू शकतील.
12 Sep 2012 - 9:47 am | अक्षया
छान सुरुवात..वाचत आहे.
उत्तम लिखाण . पु.भा.प्र. :)
12 Sep 2012 - 10:04 am | जेनी...
रंगा काका ,
तुम्ही परत आल्याने खुप मस्त वाटतय ,
थँक्स काका .
वाचत आहे ...:)
12 Sep 2012 - 10:07 am | इरसाल
अजुन बरेच वाचायला आवडेल.
पुलेशु.
12 Sep 2012 - 11:30 am | स्वप्निल घायाळ
मस्त लेख आहे ...
12 Sep 2012 - 12:20 pm | तर्री
लेख आवडला.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक,
12 Sep 2012 - 12:44 pm | चिरोटा
वाचतोय.
नुकतेच 'महामंदीच्या उंबरठ्यावर' हे अतुल कहाते ह्यांचे पुस्तकही वाचले.म्हाबलाढ्य देशावर म्हाप्रचंड कर्ज कसे आहे ह्याची त्यात माहिती दिली आहे.
12 Sep 2012 - 2:30 pm | नगरीनिरंजन
मीही ते पुस्तक वाचले आहे (आणि त्यातल्या संदर्भसूचितली आणखी काही वाचली आहेत).
नजिकच्या भविष्यात अभूतपूर्व असे बदल पाहावे लागतील हे नक्की.
लेख माहितीपूर्ण आणि रोचक आहे. पुढे अमेरिकेचा इतिहास एकांगी न होता कसा मांडला जातो याची उत्सुकता आहे (अन्यथा एकांगी-एकांगी म्हणून आक्षेप घेणारे प्रतिसाद या धाग्यावरही दिसतीलच ;-) ).
12 Sep 2012 - 12:46 pm | आनंद भातखंडे
जोशी साहेब ... मस्तच लेख.
पुलेशु
पुभाप्र
12 Sep 2012 - 1:50 pm | ग्रेटथिन्कर
पण राहून राहून एक प्रश्न माझ्या मनात येतो की हा देश असा कसा महाबलाढ्य बनला, जगातील इतर नावाजलेल्या देशांपेक्षाही पुढे कसा गेला कारण फार नाही पण अडीचशे वर्षांपूर्वी देश अथवा संस्कृती म्हणून दखल घेण्याजोगे अस्तित्वही नव्हत>>>>युरोपातल्या कट्टर धार्मिक,नागरी संस्कृतीला, शिस्तीला न जुमानणारे 'रेकलेस' टगे युवक 'न्यु वर्ल्ड' च्या आकर्षणाने तिथे जात होते. पाठोपाठ एक्स्ट्रोव्हर्ट मानसिकतेचे लोकही तिथे जायला लागले. थोडक्यात हा देश टग्यांचा आहे .त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया हा देश इंग्लंड स्कॉटीश तडीपार नागरीकांच्या वंशजांचा आहे.
13 Sep 2012 - 8:20 am | निनाद
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया हा देश इंग्लंड स्कॉटीश तडीपार नागरीकांच्या वंशजांचा आहे.
असे नाही! हा फार मोठा गैरसमज आहे!!
फक्त तडीपारच लोक येथे आले नव्हते तर त्या बरोबर जहाजावरचे खलाशी, रंगारी, सुतार, लोहार, सरकारी नोकर, घोडे सांभाळणारे मोतद्दार, अनेक प्रकारचे सरकारी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, सोने शोधायला आलेले हरहुन्नरी लोक असे अनेक लोक येथे येऊन थडकले. त्याच सुमाराला पहिल्याच तुकडीत येथे पंजाबी भारतीयही इंग्रजांच्या सोबत आले. दुसर्या महायुद्धा नंतर येथे मॅसेडोनियन, ग्रीक आणि इटालियन आले.
त्यांच्याही आधी सुमारे १४व्या शतकापासून चीनी व्यापारी , ऑस्ट्रेलिया येथील मूलनिवासी लोकांशी व्यापार करतच होते. त्यांनाच येथील सोन्याचा शोध सर्वात आधी लागला.
ऑस्ट्रेलिया हा देश येथील मूलनिवासींचाच आहे. आणि त्याची ग्वाही प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाच्या आधी आणि शेवटी दिली जाते. त्या जमातीतील प्रमुख आणि पुर्वजांना स्मरूनच कार्यक्रम केले जातात. हे सर्व सरकारी कार्यक्रमांनाही लागू असते.
असो,
आवांतरा बद्दल क्षमस्व!
पण गैरसमज दूर करणे आवश्यक वाटले.
12 Sep 2012 - 2:00 pm | मोहनराव
छान सुरवात, पुभाप्र.
12 Sep 2012 - 2:02 pm | गणेशा
आवडला लेख...
12 Sep 2012 - 2:23 pm | मानस्
बरीच नविन माहिती मिळेल असे दिसतेय.
वाचतोय.
12 Sep 2012 - 4:03 pm | प्रचेतस
मस्त हो श्रीरंगराव.
लेखाची सुरुवात छान आणि माहितीपूर्ण.
12 Sep 2012 - 6:06 pm | पैसा
छान सुरुवात झालीय जोशीबुवा, आरामात लिहा!
12 Sep 2012 - 6:24 pm | तिमा
सुरवात व पहिला भाग फारच उल्लेखनीय झाला आहे. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.
भारतीयांना शिस्त कशी लागेल व ते स्वच्छतेचे भोक्ते कधी होतील याच्या प्रतीक्षेत असलेला -- तिरशिंग
12 Sep 2012 - 6:34 pm | मराठे
छान
12 Sep 2012 - 7:38 pm | निशदे
सुरुवात छान........... नावातूनच लेखनमालिकेचा आवाका दिसतो आहे......... अजून येऊदेत.
12 Sep 2012 - 7:49 pm | राजघराणं
पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.
13 Sep 2012 - 12:26 am | निनाद मुक्काम प...
हिरव्या देशातील मिपाकरांचे .प्रतिसाद वाचायला आवडतील.
त्यांच्याकडून अजून माहिती मिळेल अशी आशा बाळगतो.
गोडबोल्यांच्या चष्म्यातून अमेरिका पहिली होती.
आता रंगाच्या ....
12 Sep 2012 - 10:35 pm | एस
पुभाप्र
13 Sep 2012 - 4:24 am | फारएन्ड
पुढे वाचायला आवडेल.
पूर्व किनार्यावर ब्रिटिश येत होते त्याच सुमारास, कदाचित आधी पश्चिम किनार्यावर स्पॅनिश/पोर्तुगीज लोक आले (प्रदेश शोधत आले. ते सगळे तेथे राहिले असे नाही), त्याबद्दलही उल्लेख असायला हवा.
13 Sep 2012 - 6:37 am | श्रीरंग_जोशी
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार मानतो व आपल्या सूचनांचे स्वागत करतो. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी व क्लिष्ट आहे. यासारख्या विषयांवर मान्यवर लेखकांचे लेखन वाचणे व स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करणे यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे याची जाणीव मला पहिल्या भागातच झाली आहे. या आव्हानाचा सामना करण्यास आपल्या शुभेच्छांमुळे मला नक्कीच बळ मिळालंय. प्रतिसादांद्वारे या विषयावर अन विषयासंबंधित मिळणाऱ्या अधिक माहितीची उत्सुकता मलाही आहे.
@चिरोटा व ननि - हो अमेरिकेवर फार मोठे कर्ज आहे व सध्याच्या निवडणूक प्रचारामध्ये दोन्ही बाजूंकडून व राजकीय समीक्षकांकडून त्याचा वारंवार उल्लेख होतोय. आम्ही इराक लौकर युद्ध संपवल्यामुळे वाचलेल्या युद्धनिधीतून अनेक लोकोपयोगी कामे करता येतील या डेमोक्रॅटसच्या दाव्यांवर समीक्षकांचे उत्तर आहे की ती रक्कम तशीही कर्जाऊ होती त्यामुळे निधी वळवण्याचा प्रश्नच येत नाही, आता सांगा जगात कशा कशा साठी कर्ज घेतले जाते ;-).
@फारएंड - आपल्या प्रतिसादामुळे या विषयावरचा एक वेगळा ऐतिहासिक मुद्दा लक्षात येतोय. पण विकीवरील माहितीप्रमाणे स्पॅनिश लोक मध्य अमेरिका खंडातील देशांत प्रथम पोचले व थोड्या फार प्रमाणात आजच्या अमेरिका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी जम बसवला. बाकी कॅलिफोर्निया राज्याचा प्रदेश १८४८ अमेरिकेने मेक्सिको कडून १५ मिलियन डॉलर्सला विकत घेतला. या विक्रीबद्दल मेक्सिकन्स आजही हळहळत असावेत.
13 Sep 2012 - 7:24 am | फारएन्ड
श्रीरंग, धन्यवाद. पश्चिम किनार्यावर स्पॅनिश व पोर्तुगीज लोक बहुधा पूर्वेला ब्रिटिश यायच्या आधी जाऊ लागले होते, पण ब्रिटिशांसारख्या वसाहती आधी त्यांनी तेथे स्थापन केल्या नाहीत (आत्ताच्या कॅलिफोर्निया मधे). 'बाहा कॅलिफोर्निया' (Baja California)म्हणजे सध्याच्या मेक्सिको मधे ते राहिले. मग नंतर वरती 'मिशन्स' स्थापन करत गेले, ते बहुधा १७०० नंतर.
मधे असे वाचले की त्या सुमारास कधीतरी पोप ने दक्षिण अमेरिका खंडाच्या नकाशावर एक रेघ ओढून त्याच्या पूर्वेचा भाग पोर्तुगीजांना व पश्चिमेचा स्पॅनिश लोकांना वसाहत करण्यासाठी दिला :)
13 Sep 2012 - 8:08 am | Pearl
लेख चांगला झाला आहे.
नवीन माहिती मिळत आहे. पु.ले.शु.
9 Mar 2015 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
श्रीरंग भौ लैच ख़ास ना हो!!!!, अंतर्राष्ट्रीय वर्तुळात एक म्हण आहे "the only two empires which never needed diplomacy in first place are the Roman empire and the USA"!!!!
बाकी , "वर्जिनिया तंबाकू" ची कुळकथा आवडली ह्या भागातली!! अस्सल वर्जिनिया तंबाकू चुरून खाणे किंवा तो घालून रोल केलेली मार्लबोरो लाइट्स झुराकण्याची मजाच न्यारी
29 Jun 2015 - 1:34 pm | शशांक कोणो
श्रीरंग भाऊ,
शेवटी मुहूर्त मिळाला वाचायला. अतिशय देखणी सुरवात. नुकतेच मीना प्रभू यांचे न्युयोर्क न्युयोर्क वाचले. तुमची लेखमाला त्याहून खूप पूर्वीची. मीनाताई मुळे आता बऱ्याच गोष्टी समजल्या. पण तुमच्या शैलीत हे वाचायला खरेच मजा येतेय.........
29 Jun 2015 - 2:31 pm | पद्मावति
फारच माहितीपूर्ण लेखमालिका. तुमच्या लेखनशैली मुळे ही माहिती वाचायलाही अतिशय इंटरेस्टिंग वाटतेय. अमेरिकेच्या इतिहासाविषयी इतकी माहिती खरोखर नव्हती. पुढचे भाग वाचण्याची अतिशय उत्कंठा लागली आहे.