यापूर्वीचे भाग - १, २
१९ मे १७६८ - जॉन रॉल्फ नंतरची सातवी पिढी. बोस्टन शहर जागतिक व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनत चालले होते. तेथील बंदरातून अमेरिकन लाकडाची विक्रमी निर्यात होऊ लागली होती. युरोपियन जहाजबांधणी उद्योगांसाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले अमेरिकन लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले होते.
बोस्टनमध्ये सगळीकडे ब्रिटिशांचाच बोलबाला होता. ब्रिटिश सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी लिबर्टी नावाच्या जहाजावर अचानक धाड टाकली. या जहाजाचा मालक जॉन हॅनकॉक हा होता. जॉन हा त्या काळातला एक अतिश्रीमंत उद्योजक होता. त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी वाइनची १०० पिंपे लपवून ठेवलेली होती कारण त्यावरचे आयातशुल्क त्यांना भरायचे नव्हते. तत्कालीन परिस्थितीनुसार हा सरळ सरळ बंडखोरीचा एक उत्कृष्ट नमुना होता. अन हे बंड होते ५००० मैलांपलीकडे असणाऱ्या ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हॅनकॉकची सगळी जहाजे जप्त केली. अन बोस्टन शहरात ब्रिटिश सत्तेविरुद्ध हिंसक आंदोलन सुरू झाले. ज्या राजदरबारात किंवा संसदेत आमची बाजू मांडणारा कुणीच नसेल तर आम्ही त्यांचे आदेश व नियम का पाळायचे असा धडक सवाल तेथील जनतेचा होता. या सगळ्या गोष्टींची कुणकुण लागताच इंग्लंडहून चार हजार सैनिक पाठवले गेले. त्यांच्या गणवेशाच्या रंगामुळे त्यांना रेडकोट्स असे संबोधले जाई. लौकरच त्यांची बोस्टन शहरातील घनता चार नागरिकांसाठी १ एवढी बनली. म्हणजे शहर पूर्णपणे ब्रिटिश फौजेच्या ताब्यात गेले.
ऑक्टोबर १७६८ - बोस्टन त्या काळातील अमेरिकेचे सर्वात महत्त्वाचे बंदर होते. ब्रिटिश फौजांनी त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. बोस्टन बंदराच्या गोदीमध्ये दर वर्षी २०० मोठ्या जहाजांची निर्मिती होत असे. यामागचा महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकन भूमीवरील मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली वृक्षसंपदा. ब्रिटिश साम्राज्याला लागणाऱ्या जहाजांपैकी एक तृतियांश जहाजे वसाहतींद्वारे बनवली जात असत. कारण भौगोलिक मर्यादांमुळे इंग्लंडमध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या लाकडाची क्षमता कधीच संपली होती. तत्कालीन जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जहाजनिर्मिती व इमारतबांधणीसाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे स्थान होते जसे आज खनिज तेलाचे आहे.
बोस्टनसकट अमेरिकन भूमीवरील १३ वसाहती इंग्लंडच्या आर्थिक भरभराटीत अत्यंत मोलाची भूमिका पार पाडत होत्या. इंग्लंडच्या एकूण निर्यातीपैकी ४०% निर्यात वसाहतींना होत असे. इंग्लिश उद्योगांसाठी लागणारा बराचसा कच्चा माल वसाहतींवरून येत असे. अमेरिकन भूमीवर अंगमेहनतीची कामे करण्यासाठी आफ्रिकन गुलामांची मोठ्या प्रमाणात आयात केली जात असे. अठराव्या शतकात अडीच लक्षांहून अधिक आफ्रिकन गुलाम अमेरिकेत आणले गेले. हि संख्या स्वेच्छेने अमेरिकेत आलेल्या इतर स्थलांतरीतांपेक्षा कितीतरी अधिक होती.
या गुलामांपैकी बहुतांश दक्षिणेकडील भूभागांवर पसरलेल्या शेतीमध्ये काम करीत असत. याखेरीज मजूर म्हणून त्यांची विपुल उपलब्धता उत्तरेकडील वसाहतींकरिताही फार उपयोगाची होती. बोस्टनच्या लोकसंख्येमधील १०% लोक हे कृष्णवर्णीय गुलाम होते
बोस्टनमधला असंतोष दिवसेंदिवस वाढतच होता. पॉल रिव्हिअर - त्या काळातील बोस्टनमधला एक मोठा व्यापारी. त्याची चांदीच्या दागिन्यांच्या व्यापारात मोठी उलाढाल होती. पॉलने स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपला व्यापार उभारला होता. ब्रिटिश फौजांचा प्रमाणाबाहेरचा जाच त्याला सहन होईना.
जॉन हॅनकॉक
पॉल रिव्हिअर
५ मार्च १७७० - ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जाचक अटींमुळे अनेक लोक बेरोजगार झाले होते. व्यवस्थेविरुद्ध आत्यंतिक चीड असणारे अनेक लोक रस्त्यांवर उतरून उघडपणे प्रदर्शन करू लागले. बोस्टनच्या मध्यभागी असणाऱ्या एका चौकात ब्रिटिश सैनिकांशी त्यांची गाठ पडली. इशारे देऊनही आंदोलक मागे हटत नव्हते. आंदोलकांमध्ये एक १७ वर्षांचा युवक होता - एडवर्ड गॅरीक. जमाव हिंसक बनत चाललेला होता. जेव्हा जमावातील एका गटाने एका सैनिकाला एकटे गाठून त्यावर हल्ला केला तेव्हा ब्रिटिश सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यासाठी त्यांच्याकडे वरिष्ठांकडून मिळवलेली पूर्वपरवानगी नव्हती. तीन आंदोलक जागीच गतप्राण झाले व इतर दोघे नंतर मरण पावले. त्याखेरीज अनेक लोक जखमी झाले.
हि बातमी संपूर्ण वसाहतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली व लोकांच्या मनातील संतापाने नवी उंची गाठली. हेन्री पेल्हॅम नावाच्या चित्रकाराने हा प्रसंग एका चित्रात रेखाटला. त्या चित्राला शीर्षक होते 'द ब्लडी मॅसेकर' पॉल रिव्हिअरने ते चित्र धातूच्या पत्र्यावर कोरले व त्यावरून त्याच्या अनेक प्रती छापण्यात आल्या. त्याखेरीज बोस्टन गॅझेट नावाच्या नियतकालिकातही हे चित्र छापून आले. त्याद्वारे हि बातमी इतर वसाहतींपर्यंतही पोचली. त्या काळात जवळ जवळ ४० नियतकालिके सुरू झाली होती. बेंजामिन फ्रँकलीन हे टपालखात्याचे प्रमुख होते.
बोस्टन गॅझेट मध्ये छापून आलेले - 'द ब्लडी मॅसेकर'
वेगवान घोडेस्वारांच्या मदतीने टपालासोबत नियतकालिकांचेही वितरण दूरपर्यंत होत होते. ब्रिटिश शासनकर्त्यांच्या या माध्यमाचे उपद्रवमूल्य कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. या वेगवान टपाल व्यवस्थेमूळे कुठलीही बातमी इंग्लंडला पोचायच्या आत सर्व वसाहतींवर पोचलेली असे. या असंतोषाला लष्करी ताकदीने चिरडणे परवडणार नाही हे पाहून ब्रिटिश सत्तेने वसाहतीवरील अनेक कर कमी केले अपवाद चहावरील आयात कर.
१६ डिसेंबर १७७३ - वसाहतीतील जनतेचा रोष कमी झालेला असला तरी पूर्णपणे शमलेला नव्हता. त्या वर्षी ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याद्वारे चहावरील आयातकर अधिकच वाढला. या घटनेमुळे वसाहतवाल्यांच्या असंतोषाचा नव्याने भडका उडाला. या अन्यायकारी कराविरुद्ध आंदोलन करणारे आंदोलक बोस्टन बंदरात उभ्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर गेले ज्यातून चहा आयात करण्यात आला होता व त्यांनी चहाची अनेक खोकी बोस्टन बंदरातील खाडीत फेकून दिली. त्या फेकून दिलेल्या चहाची आजची किंमत जवळजवळ १ दशलक्ष डॉलर्स होते. हि घटना अमेरिकन स्वातंत्रलढ्यात दूरगामी परिणाम करणारी ठरली.
५० वर्षांनंतर त्या घटनेला 'बोस्टन टी पार्टी' असे नाव दिले गेले तरी त्या काळी 'द डिस्ट्रक्शन ऑफ टी' असे म्हंटले जात असे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटिश शासनकर्त्यांनी बोस्टन बंदराला टाळे ठोकले. या निर्णयाने अनेक लोक बेरोजगार झाले.
बोस्टन टी पार्टी
या असंतोषाचे केंद्रस्थान जरी बोस्टन असले तरी त्याचे लोण आतापर्यंत इतरत्रही चांगलेच पसरले होते. वसाहतींमधले अनेक रहिवासी पश्चिमेकडे स्थलांतर लागले होते. परंतु नेटिव्ह्जचे उच्चाटन होवू नये म्हणून ब्रिटिश शासनकर्त्यांनी या स्थलांतरांना मनाई केली होती. न्यू इंग्लंड च्या भागातील असंतुष्ट लोकांनी आता मोठ्या उठावाची तयारी सुरू केली. शस्त्रांची तस्करी करून जागोजाग त्यांची गुप्त भांडारे बनविली गेली.
५ सप्टेंबर १७७४ - ब्रिटिश शासनकर्त्यांचे निर्बंध झुगारून तेराही वसाहतींतील ५६ प्रतिनिधींची एक परिषद फिलाडेल्फिया येथे भरली. या परिषदेला 'फर्स्ट काँटिनेंटल काँग्रेस' असे म्हंटले जाते. अमेरिकन लोकशाहीच्या स्थापनेतील हि प्रथम पायरी होती. त्यामध्ये होते जॉन ऍडम्स, पॅट्रिक हेन्री अन व्हर्जिनियातील एक जमीनदार - जॉर्ज वॉशिंग्टन. या परिषदेतील अनेक प्रतिनिधींना यापुढे सशस्त्र उठाव दिसत असला तरी अजूनही काही जणांना ब्रिटिशांबरोबर शांततामय पद्धतीने वाटाघाटी करता येतील अशी आशा होती. पण सखोल चर्चेअंती परिषदेने ठराव मंजूर केला की ब्रिटिश शासनकर्त्यांचे कुठल्याही वसाहतींवरील लष्करी आक्रमण हे सर्व वसाहतींवरील आक्रमण समजले जाईल. वसाहतींमध्ये निर्माण झालेली एकात्मतेची भावना हे या परिषदेचे मोठे यश होते.
फर्स्ट काँटिनेंटल काँग्रेस
१७७५ चा वसंत ऋतू - मॅसेच्युसेटस मधील कॉंकॉर्ड या ठिकाणी आयझॅक डेव्हिस याने बंडखोर तरुणांना लष्करी धडे द्यायला सुरुवात केली. जर ब्रिटिशांकडून लष्करी हल्ला झालाच तर त्याला उत्तर द्यायला हे बंडखोर तयार होते. त्यांना लागणाऱ्या शस्त्रास्त्र व प्रशिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांकडून वर्गणीद्वारे जमा केला जात होता. हे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये शेतकरी, लोहार, सुतार, दुकानदार अश्या प्रकारची कामे करणाऱ्यांचा भरणा होता. त्याखेरीज गुलामगिरीच्या पाशांतून बाहेर पडलेले काही कृष्णवर्णीयही होते. बहुतांश तरुणांना शस्त्रे चालविण्याचा काहीही अनुभव नव्हता. हळू हळू अश्या अनेक तुकड्या वसाहतींच्या इतर भागात बनू लागल्या. मॅसेचुसेटसमधील १६ ते ५० वयोगटातील एक तृतियांश पुरुष कुठल्याही क्षणी सशस्त्र उठावात भाग घेऊ शकतील एवढी तयारी झाली.
१९ एप्रिल १७७५ - पुढे येऊ घालणाऱ्या लष्करी आव्हानाला वेळीच अटकाव करण्यासाठी ९०० ब्रिटिश सैनिकांची एक तुकडी बोस्टन मधून लेक्सिंग्टनकडे मध्यरात्री निघाली. बंडखोरांना अटक करायची व त्यांचा शस्त्रसाठा जप्त करायचा हे आदेश त्यांना मिळाले होते. पॉल रिव्हिअरला ही खबर लागताच त्याने वेगाने पुढे जाऊन बंडखोरांना सावध केले. पहाटे ५ वाजताच लेक्सिंग्टनबाहेरच्या जंगलात ६० शस्त्रसज्ज बंडखोरांची एक तुकडी सज्ज झाली. त्यांचे नेतृत्व जॉन पार्कर नावाचा एक शेतकरी करत होता. लौकरच त्यांची गाठ शस्त्रांनी व अनुभवांनी सुसज्ज असलेल्या शेकडो ब्रिटिश सैनिकांशी पडली.
लष्करी परिमाणांनुसार ब्रिटिश सैन्यापुढे बंडखोरांचा काहीच मुकाबला नव्हता. पण बंडखोरांसाठी ही चकमक म्हणजे जीवन मरणाची लढाई होती. सूर्योदय झाल्यावर लगेच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अपेक्षेप्रमाणेच ब्रिटिशांसमोर बंडखोरांचा निभाव लागू शकला नाही. काही मिनिटांतच ८ बंडखोर धारातीर्थी पडले व १० जखमी झाले. इतर जीव वाचवून जंगलात पळून गेले. ब्रिटिश सैन्याला लेक्सिंग्टन शहरामध्ये पोचायला सकाळचे ९ वाजले. वसाहतीतील ब्रिटिश सत्तेशी निष्ठावान असणाऱ्यांकडून त्यांना काही शस्त्रभांडारांबाबत माहिती मिळाली होती. परंतु तो शस्त्रसाठा तेथून हलविण्यात बंडखोर यशस्वी झाले होते.
लेक्सिंग्टनची लढाई
ब्रिटिश सैनिकांनी लेक्सिंग्टन शहराचे कसून छाननी केली. या वेळेचा उपयोग बंडखोरांनी या चकमकीबाबत बातमी पसरवण्यासाठी केला. दुपारपर्यंत जवळपासच्या भागांमधून हजारच्या आसपास बंडखोर काँकॉर्ड जवळच्या जंगलात जमा झाले. अगोदरच्या मध्यरात्रीपासून मोहिमेवर निघालेले ब्रिटिश सैनिक दमलेले होते. तशातच वरिष्ठांच्या आदेशामुळे त्यांना २० मैल लांब असणाऱ्या बोस्टनकडे कूच करावे लागले.
जंगलातील वाटेत असताना ब्रिटिश सैनिकांवर बंडखोरांच्या एका तुकडीने अचानक हल्ला केला. त्यात अनेक ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले व जखमी झाले. त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अनेक बंडखोरही धारातीर्थी पडले. त्यामध्ये आयझॅक डेव्हिसचाही समावेश होता. बंडखोरांच्या इतर तुकड्यांनीही ब्रिटिश सैनिकांवर जंगलातील वाटेत जागोजाग हल्ले केले. मरणाऱ्या ब्रिटिश सैनिकांची शस्त्रे त्यांच्या हाती लागली. बोस्टनला पोचेपर्यंत एक तृतियांश ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले होते किंवा जखमी झाले होते.
या लढाईमुळे बंडखोरांना चांगलाच आत्मविश्वास मिळाला. ताकदवान ब्रिटिश फौजेशी आपण दोन हात करू शकतो हि भावना पुढील लढायांसाठी प्रेरणादायी ठरली. याउलट ब्रिटिशांना यातून फारच मोठा धक्का बसला व त्यांनीही बंडखोरांच्या क्षमतेला कमी लेखणे बंद केले. सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.
अवांतर -
- जॉन हॅनकॉक यांच्या स्मरणार्थ डाऊनटाऊन शिकागोमधील एका उंच इमारतीला त्यांचे नाव (जॉन हॅनकॉक सेंटर) देण्यात आले आहे. हि इमारत १०० मजल्यांची आहे. पर्यटकांसाठी असलेल्या ९४ व्या मजल्यावरील ऑब्झर्वेशन डेकवरून शिकागो शहराचे, शेजारी असलेल्या नेव्ही पिअरचे अन विस्तीर्ण पसरलेल्या लेक मिशिगनचे अत्यंत विलोभनीय दृश्य दिसते.
- निर्णय-प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी Pro and Con ची पद्धत सर्वप्रथम बेंजामीन फ्रँकलीन यांनी मांडली जी आजही व्यापकरीत्या वापरली जाते.
पुढचा भाग - वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४
प्रतिक्रिया
7 Oct 2012 - 1:55 pm | प्रचेतस
हा भागही माहितीपूर्ण.
7 Oct 2012 - 5:35 pm | सोत्रि
व्वा!
पुभाप्र.
- (महाबलाढ्य होण्याचे स्वप्न बघणार्या राष्ट्राचा रहिवासी) सोकाजी
7 Oct 2012 - 6:40 pm | तिमा
या कारणामुळे त्याला 'बॉस्टन टी पार्टी' असे म्हणतात हे आजच कळले. आम्ही वेगळेच समजत होतो.
7 Oct 2012 - 6:57 pm | दादा कोंडके
थोडक्यात दिलेला घटणाक्रम आवडला. यातलं थोड शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा होतं पण इतकं कंटाळवाणं का वाटत होतं कुणास ठाउक?
किंचीत दुरुस्ती:
च्या ऐवजी १७७५ असं हवंय.
7 Oct 2012 - 7:16 pm | श्रीरंग_जोशी
हो, टंकण्याच्या ओघात १७७५ च्या ऐवजी १९७५ झाले. संपादकांना विनंती आहे की हा बदल करावा. यापुढे मी अधिक काळजी घेईन.
7 Oct 2012 - 11:30 pm | सुनील
वाचतोय...
8 Oct 2012 - 1:57 am | अभ्या..
अमेरिकेत जॉन हॅन्कॉक हा शब्द स्वाक्षरीसाठी समानार्थी वापरला जातो तोच हा जॉन हॅन्कॉक दिसतोय. या पठ्ठयाची अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावरची सही इतकी लफ्फेदार आणि सुस्पष्ट होती की सहीसाठीच हा शब्द वापरला जाऊ लागला.
8 Oct 2012 - 12:37 pm | अक्षया
हा भागही खुपच माहितीपुर्ण आहे..:)
बर्याच नविन गोष्टी कळल्या.
वाचनीय..
24 Aug 2013 - 12:51 am | जेसिका ब्राउन
तसं माहीत आहे काय झाला पण तरीही वाचायला आवडेल
24 Aug 2013 - 12:54 am | श्रीरंग_जोशी
पुढील भाग लिहायचे आहेत.
विलंबाबद्दल क्षमस्व.
लौकरच लेखमालिका रुळावर परत आणण्याचा प्रयत्न करीन.
24 Aug 2013 - 1:47 pm | आशु जोग
तुम्ही धागा वर आणलात !
24 Aug 2013 - 12:55 pm | मुक्त विहारि
माहितीपूर्ण.
11 Mar 2015 - 4:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
नव्या कल्पनांना कधीच विरोध न करता डोळसपणे आत्मसात करणारा एक देश!!! एकंदरित असा घडला अमेरिका!! सुंदर लेखमाला, पुढचे भाग कधी देणार??
29 Jun 2015 - 1:51 pm | शशांक कोणो
आवड्या. लई आवड्या.........
29 Jun 2015 - 6:12 pm | पद्मावति
अतिशय जबरदस्त विषय आणि तुम्ही त्याला उत्तम न्याय दिला आहे. बॉस्टन टी पार्टी आणि इतर माहिती फारच रोचक.
30 Jun 2015 - 2:44 am | मयुरा गुप्ते
अतिशय मोठी व्याप्ती असलेला आणि क्लिष्ट विषय ओघवता करुन फक्त कंटाळवाण्या माहिती रुपात न देता गोष्टी रुपात दिल्या मुळे मजा येतेय बाचायला.
लिहित रहा.
-मयुरा.
30 Jun 2015 - 4:37 am | स्रुजा
झकास ! बॉस्टन टी पार्टी बद्दल माहिती होतं पण तुम्ही खुप च बारकावे दिलेत. मजा आली वाचताना. पूर्ण करा की लेखमाला.
30 Jun 2015 - 4:58 am | श्रीरंग_जोशी
सर्व नव्या प्रतिसादकांचे आभार.
काही महिन्यांपूर्वी भाग ४ प्रकाशित केला होता. पुढचा भाग लौकरच प्रकाशित करण्याचा मानस आहे.
18 Feb 2016 - 5:36 pm | मराठी कथालेखक
चार वर तीनची लिंक आणी तीनवर ही चारची हे कस जमवल बुवा ? संम च्या मदतीने की स्वतःच ?