तत्त्वभानाच्या दिशेने
- श्रीनिवास हेमाडे
*/
बर्ट्रांड रसेलतत्त्वज्ञानाची चर्चा कशासाठी करायची? ती चर्चा, आपल्या जगण्याशी कशी संबंधित असणार आहे? ज्याचं-त्याचं, जिचं-तिचं तत्त्वज्ञान आपापल्या जगण्यातून आलेलं असतं; त्याला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून पदव्यांवर पदव्या मिळवणाऱ्या अभ्यासूंच्या लेखी काहीच अर्थ नसतो का? तत्त्वज्ञान आणि धर्म यांची सांगड भारतात आहे, त्याऐवजी ती थेट रोजच्या जगण्याशी असती, तर? .. अशा प्रश्नांचा पट मांडून त्यांची उत्तरं शोधणारं हे नवं सदर, दर सोमवारी!
'तत्त्व' ही एक मोठी चमत्कारिक संज्ञा आहे. तत्त्व आणि ज्ञान या दोन शब्दांचा सांधा जुळवून 'तत्त्वज्ञान' ही एक प्राचीन संज्ञा तयार होते. या संज्ञेचे आकलन 'माझे तत्त्वज्ञान' या नावाची स्वतंत्र ज्ञानवस्तू तयार करते. त्यामुळे जगात 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या न्यायाने जगात 'व्यक्ती तितकी तत्त्वज्ञाने' असू शकतात. परिणामी कोणालाही त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त असतो. व्यक्तीचा आचार, विचार आणि अनुभव यांनी रचल्या गेलेल्या त्याच्या अनुभवविश्वातून निर्माण होणारे 'त्याचे तत्त्वज्ञान' ही ज्ञानवस्तू हा अधिकार त्याला जणू काही नसíगक हक्क म्हणून बहाल करते.
या विषयाचा सामाजिक वावर दोन पातळीवर जाणवतो. पहिली पातळी : व्यक्तीच्या जीवनविषयक आकलनाची त्याच्या भाषेतील सहज अभिव्यक्ती- जे 'त्याचे तत्त्वज्ञान' असते आणि दुसरी पातळी : चिंतनाचा अत्यंत काटेकोर कृत्रिम प्रांत- म्हणजे निखळ तत्त्वज्ञान. आधुनिक शिक्षण व्यवस्थेनुसार महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर हा अभ्यासाला असलेला, त्यात पदवी देणारा ज्ञानविषय आहे; तर जगताना भौतिक विश्व आणि समाज याबद्दल जाणिवा विकसित करण्यास गरजेचे असलेले आकलन जागविणारा तो एक सर्वमान्य सामायिक प्रांत आहे. इतर विषयांना हा उभय दर्जा लाभत नाही. जसे की जीव, भौतिक, संगणकशास्त्र तसेच राज्यशास्त्र, समाजशास्त्र अथवा वाणिज्य, व्यवस्थापन हे विषय ज्ञानाची रचना म्हणून रोजच्या जगण्यापासून वेगळे असतात. शिवाय अशा विषयावर केवळ त्यातील जाणकारच (म्हणजे किमान पदवी, पदविकाधारक) बोलू शकतात. पण तत्त्वज्ञानावर कोणीही बोलू शकतो. कारण जगणं आणि त्याबद्दलचं कोणतंही चिंतन हेच तत्त्वचिंतन असल्याने जगणं आणि त्याबद्दलचं ते चिंतन व्यक्त करणं यात फरक उरत नाही. त्यांची सीमारेषा अत्यंत धूसर असते. साहजिकच सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते पीएचडी, डी.लिट असे अत्युच्च शिक्षण लाभलेल्या कोणालाही तत्त्वज्ञानावर बोलण्याचा नैतिक हक्क लाभतो.
पदवीचा अभ्यासविषय म्हणून अभ्यास मंडळ, विद्यापीठ अनुदान मंडळ, शासन यांच्या चौकटीत तत्त्वज्ञान बंद झालेले असते. अशी चौकट जीवनविषयक धारणांना नसते, त्या सतत ताज्यातवान्या असतात. विश्वाचा, निसर्गाचा, जीवनाचा रोज नवा अर्थ या धारणा जागवीत असतात. त्यांना महत्त्व देणारे, त्यांचे मूल्य जाणणारे काही थोडके, मोजके लोक असतात. त्यांच्यातूनच तत्त्वज्ञानप्रेमिक, 'तत्त्वज्ञानाचे अभ्यासक', 'तत्त्वज्ञानाचे भाष्यकार' वा तत्त्वज्ञानाचे सायंकालीन वर्ग/चर्चा मंडळे, शिबिरे निर्माण होतात. यातील सहभागींची संख्या तत्त्वज्ञानाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नेहमीच जास्त असते आणि ते सचोटीने अभ्यास करतात.
प्राचीन भारतात तर धर्म, नीती आणि शुद्ध तत्त्वचिंतन यात फरक केला गेला नाही. असा फरक ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत काटेकोरपणे करण्यात आला. धर्मापासून तत्त्वचिंतन अलग झाल्याने धर्म हा तत्त्वज्ञानाचा शत्रू बनला. 'विज्ञान' रचण्यात वैज्ञानिक रीतीबाबत मूलभूत योगदान देऊनही (अनेक प्रकारच्या श्रद्धांना तत्त्वज्ञानाने अवकाश दिल्याने) विज्ञानानेही तत्त्वज्ञानाशी मत्री तोडली. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल यांच्या मते 'तत्त्वज्ञान हा 'नो मॅन्स लॅण्ड' दर्जाचा असा एक निर्मनुष्य प्रदेश आहे आहे की ज्यावर धर्म आणि विज्ञान या दोहोंकडून सतत हल्ले होत असतात.'
भारतात वैदिक धर्म आणि हिंदू तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले. तसेच बौद्ध धर्म आणि बौद्ध तत्त्वज्ञान आणि जैन धर्म आणि जैन तत्त्वज्ञान यांनाही एकच मानले गेले. त्यामुळे या धर्मामधील 'शुद्ध तत्त्वचिंतन' धर्मापासून स्वतंत्र होऊ शकले नाही. जणू काही धर्म आणि तत्त्वज्ञान यांचे ते अद्वैत होते. भारतात व्यक्तीने धार्मिक असणे हा त्याला त्याच्या धर्माचे तत्त्वज्ञान ज्ञात असण्याचे लक्षण आणि अधिकार समजला गेला. हा नियम प्राचीन हिंदू, बौद्ध, जैन आणि अलीकडील शीख या सर्व धर्माना समानतेने लागू असल्याचे लक्षात येते. या धर्म संप्रदायातील महाराज, गुरू, धर्मगुरू हे तर थेट त्या त्या 'धर्माचे तत्त्ववेत्ता'मानले गेले. ही प्रथा इस्लाम, ख्रिस्ती इत्यादी धर्मातही आढळेल. अशा रीतीने तत्त्वज्ञान हे नेहमी धर्माच्या दावणीला बांधले गेले. परिणामी स्वतंत्र शुद्ध तत्त्वचिंतन आकाराला येऊ शकले नाही. उलटपक्षी जे जे निखळ तत्त्वचिंतन होते, त्यात धर्माची बेमालूम सरमिसळ करून ते धार्मिक बनवले गेले किंवा धर्मशत्रू म्हणून घोषित केले गेले.
आज आपण जो लोकशाही जीवनप्रवास करीत आहोत, तो आधुनिक-अत्याधुनिक तत्त्वांनी भरलेला आहे. न्याय, समता, समृद्धी, शिक्षण, इहवाद इत्यादी ही तत्त्वे आपण राबवत आहोत. लोकशाहीची मूल्यप्रणाली आणि प्राचीन भारतीय धर्म व त्यातील तत्त्वज्ञान यांची सांधेजुळणी कशी करावी, याकडे जणू काही लक्षपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. या विरोधाभासाचे भानही आपणास नको वाटते.
साधे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित करण्यास दोन दशके लागली. तेही एक नरबळी दिल्यानंतरच! पवित्र ऋग्वेद सनातन आहे आणि ऋग्वेदातील पुरुषसूक्तानुसार विराटपुरुषाचा बळी देऊनच वर्ण, जात, लिंगभेदवाला विशाल भारतीय समाज निर्माण झाला आहे. धर्माचे शुद्धीकरणही वैज्ञानिक रीतीने न होता राजरोस वैदिक परंपरेनुसारच होते? राजकीय पक्ष आणि धार्मिक संस्थाने व स्थळे यांना आपण प्राप्तिकरमुक्त करतो, ही एक साधी गोष्टही अनेक प्रकारचा संदेश देते. धर्म, धर्माने प्रभावित असलेले भारतीय तत्त्वज्ञान जनमानसात खोलवर रुजलेले असूनही जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा इतकी नकारात्मक का? वर्ण, जात, लिंगप्रधान राजकारण आणि समाजकारण हे कोणत्या धार्मिक जीवनरीतीचा आविष्कार आहे? 'भारत हा स्वत:लाच लुटणारा देश आहे' ही जागतिक धारणा आणि 'भ्रष्टाचार' हे कोणत्या भारतीय धर्माचे आणि कोणत्या तत्त्वज्ञानाचे 'सामाजिक उत्पादन' आहे, याचे भान आपण विकसित करू शकलो तर काही एका दिशेने जाता येईल, असे म्हणण्यास जागा आहे.
आता, 'तत्त्व' म्हणजे काय? या तात्त्विक प्रश्नाचे स्वरूप दोन रीतीने स्पष्ट करता येईल. पहिली, आजपर्यंत कोणती तत्त्वे निर्माण झाली, त्यांचा समाजावर काय परिणाम झाला आणि उलट दिशेने समाजरचनेचा या तत्त्वांवर कोणता परिणाम झाला. दुसरी रीत म्हणजे आज (कदाचित उद्यासाठी) कोणत्या तत्त्वांची गरज आहे, ती निर्माण कशी करता येतील, प्रथमपुरुषी एकवचनी 'मला स्वत:ला या प्रक्रियेत निर्माता, वाहक, प्रसारक-प्रचारक-अभ्यासक इत्यादी नात्याने सहभाग कसा देता येईल,' या दिशेने विचार करणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करणे, हे तत्त्वभानाचे पहिले पाऊल.
निखळ तत्त्वचिंतन आणि धर्म यांना परस्परांपासून अलग न करणे आणि त्यांचा स्वतंत्र विकास न करणे, ही सामाजिक प्रगतीला खीळ घालणारी गोष्ट आहे, हेही भान विकसित होत नाही, हे दुर्दैवाचे आहे. जात, वर्ण, धर्म, लिंगभेद या मूलत: कालबाह्य कोटींच्या निकषांचे उपयोजन करून सामाजिक न्याय, दारिद्रय़ निर्मूलन, समान विकासाच्या संधी, राखीव जागा असे हेतू आपण साधू इच्छित आहोत. साहजिकच चुका वा तात्पुरती मलमपट्टी याखेरीज हाती काही लागत नाही. ज्यांच्या आधारे वास्तवाचे विश्लेषण शक्य होईल, अशा निखळ तात्त्विक तत्त्वांचा शोध घेता येईल का, हे पाहणे हा या सदराचा हेतू आहे. म्हणून हे 'तत्त्वभान'आहे, तत्त्वज्ञान नाही. तत्त्वज्ञान हे सामान्यांपासून दूर जाणारी काही जणांची ठेकेदारी आहे; तर तत्त्वभान हे सामान्यांशी निगडित आहे.
लोकसत्तेत ०२ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.
पुढील भाग - २. भानावर येण्यापूर्वी
प्रतिक्रिया
22 Jun 2015 - 4:13 pm | राही
विवेचन साधारणपने आवडले. मांडणी आणि शैली मुख्यतः आवडली.
ही प्रस्तावना आहे हे लक्ष्यात घेऊन सध्या इतकेच.
22 Jun 2015 - 4:46 pm | मार्मिक गोडसे
तत्त्वभानाची सुरूवात चांगली वाटली.
पहिल्याच लेखात बर्ट्रांड रसेल ह्यांचा उल्लेख आल्यामुळे एकंदरीत पुढिल तत्त्वभान रोचक असेल असे वाटते.
सहमत.
22 Jun 2015 - 5:13 pm | अनुप ढेरे
आवडतय!
22 Jun 2015 - 5:49 pm | बॅटमॅन
छान इंट्रोडक्षन. पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
22 Jun 2015 - 6:15 pm | अस्वस्थामा
छान..!!
हे आवडलं.
22 Jun 2015 - 6:22 pm | चुकलामाकला
पु. भा. प्र.
23 Jun 2015 - 12:55 am | जुइ
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
23 Jun 2015 - 1:06 am | द-बाहुबली
मस्त.
ऑब्जेक्टीव ट्रुथ इज आल्वेज वर्स दॅन सब्जेक्टीव रॅलीटी... हेच कारण आहे तत्वज्ञान नेहमीच धर्माशी मिसळले गेले. पुभाप्र.
23 Jun 2015 - 1:10 am | अत्रुप्त आत्मा
अपेक्षित आणि उत्तम!
पुढल्या अंकाच्या प्रतिक्षेत....
23 Jun 2015 - 9:10 am | श्रीरंग_जोशी
सुरुवात आवडली.
पुभाप्र.
23 Jun 2015 - 9:30 am | विशाखा पाटील
आवडलं!
23 Jun 2015 - 9:48 am | विशाल कुलकर्णी
उत्तम विवेचन. सुरूवात आवडली. पुढील भागाच्या प्रतीक्षेत :)
23 Jun 2015 - 9:59 am | सुधीर
तुमचे लेख लोकसत्ता मध्ये वाचले होते. आवडलेही होते. काही लेख राहून गेले होते वाचायचे. चला या निमित्ताने पुन्हा वाचले जातील.
24 Jun 2015 - 2:09 pm | निरन्जनदास
धन्यवाद मित्रांनो !
मी आपणा सर्वांचा अतिशय आभारी आहे (हे म्हणणे अर्थात औपचारिक !)
आपण प्रत्येकजण अतिशय मनापासून दाद देत आहात.
आपल्या सर्व प्रकारच्या प्रतिसादाचा अभिलाषी
श्रीनिवास हेमाडे
1 Jul 2015 - 9:01 pm | अर्धवटराव
तत्वभान, या मालिकेचा विषय, त्यात 'भान' म्हणजे काय याची रुपरेषा स्पष्ट करणं गरजेचं होतं... आणि त्याचा चांगला उहापोह या धाग्यात झाला.
लेखमाला आकर्षक होणार अशी खात्री आहे.
3 Jul 2015 - 10:49 pm | निरन्जनदास
धन्यवाद अर्धवटराव !
पण हे काही खरं नाही बरं का ! तुम्हाला अर्धवटराव अस संबोधण मला उचित वाटत नाही.
मजा म्हणून ठीक आहे, पण तरीही नाहीच.
3 Jul 2015 - 10:50 pm | निरन्जनदास
धन्यवाद अर्धवटराव !
पण हे काही खरं नाही बरं का ! तुम्हाला अर्धवटराव अस संबोधण मला उचित वाटत नाही.
मजा म्हणून ठीक आहे, पण तरीही नाहीच.
9 Jul 2015 - 8:08 pm | गामा पैलवान
निरन्जनदास,
या लेखमालेबद्दल धन्यवाद. विचारांना भरपूर खाद्य मिळणारसं दिसतंय. :-)
आपली दोन विधाने मननीय वाटली.
१.
>> निखळ तत्त्वचिंतन आणि धर्म यांना परस्परांपासून अलग न करणे आणि त्यांचा स्वतंत्र विकास न करणे,
>> ही सामाजिक प्रगतीला खीळ घालणारी गोष्ट आहे
ज्याला आपण हिंदू धर्म (= वैदिक परंपरा) म्हणतो तो निखळ तत्त्वचिंतनातून उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे या दोघांची फारकत अशक्य आहे.
भारतीय परंपरेत तत्त्वाचा अनुभव घेण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. भले तत्त्वाबद्दल बोलणे जमेल वा न जमेल. याचं अगदी डोळ्यासमोरचं लखलखीत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस. विवेकानंद उच्चविद्याविभूषित होते, तर गुरूदेव ठार निरक्षर. पण तत्त्व अनुभवण्यात आणि अनुभवलेले तत्त्व आचरण्यात विवेकानंद रामकृष्णांना प्रमाण मानीत.
भारतीय पारंपरिक तत्त्वज्ञानांना दर्शने असंही म्हणतात. उदा : वैदिक दर्शन, न्यायदर्शन, बौद्धदर्शन, इत्यादि. दर्शन या शब्दातून तत्त्वसाधकास (seeker) तत्त्वाची अनुभूती आलेली असावी अशी अपेक्षा आहे. केवळ चर्चा कामाची नाही. अशी अनुभूती ज्याच्या आधारे येते तो साधकाचा धर्म झाला. सबब धर्म आणि तत्त्वज्ञान यांची फारकत होऊ शकत नाही.
२.
>> धर्म, धर्माने प्रभावित असलेले भारतीय तत्त्वज्ञान जनमानसात खोलवर रुजलेले असूनही जागतिक पातळीवर
>> भारताची प्रतिमा इतकी नकारात्मक का?
या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देतो : आपण शिवाजीमहाराजांची शिकवण विसरलो, म्हणून भारताची प्रतिमा नकारात्मक झाली आहे.
तत्त्वज्ञान आचरणे संघर्षमय आहे. म्हणूनच की काय भारतातले नामांकित तत्त्ववेत्ते क्षत्रिय पार्श्वभूमीचे आहेत.
असो.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. :-)
अ.न.,
-गा.पै.