मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र
मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास
संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते. पण अशा लोकांना तापटपणा, हेकेखोर वागण्याचा एक शापित स्वभाव पण जन्मजात असतो. अशीच एक व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीत होऊन गेली. आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फक्त 17 चित्रपट करणारे पहिले मि. पर्फेक्षनिस्ट संगीतकार ...... सज्जाद हुसेन ..........
पुरू राजाची गोष्ट आठवते का ? जेव्हा युद्धात हरल्यानंतर पुरू राजाला बंदी बनवून सिकंदर समोर आणले गेले तेव्हा सिकंदरने त्याला विचारले की हे पुरू, तू सांग मी तुला कशी वागणूक देऊ? तेव्हा पुरू राजा सिकंदरच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तरला होता की जशी एका राजाने दुसऱ्या राजाला द्यावी तशी वागणूक तू मला दे. ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे परिस्थितीने आयुष्यात संपूर्णपणे पराभव करून ही सज्जाद हुसेन हे शेवटपर्यंत ठाम होते. कोणत्याही गोष्टीवर त्यांनी कधीच तडजोड केली नाही. याचे एक उदाहरण द्यायचे तर त्यांना वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एक चित्रपट 1983 साली मिळाला. त्यांनी मन लावून तो पूर्ण ही केला. पण त्या प्रोड्युसरने सज्जाद यांच्या नकळत एक दुय्यम दर्जाचे गाणे दुसऱ्या संगीतकाराकडून बनवून घेऊन त्या चित्रपटात घुसडले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जेव्हा सज्जाद यांना ही गोष्ट कळाली त्यांनी त्याक्षणी प्रोड्युसरची कडक शब्दात कानउघडणी केली. पुढे काही कारणास्तव तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज बादशाह होते. जरी त्यांनी मोजकेच चित्रपट केले तरी त्यांच्या दर्जाच्या जवळपास ही कुणी फिरकू शकत नसे. मुठभर हिरे हे ट्रकभर लोखंडापेक्षा मौल्यवान असतात. सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत. पण त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला त्या सोप्या चालीमागची अवघड वाट दिसायची आणि त्यांची तारांबळ उडत असे. त्यातच सज्जाद हुसेन यांना गाण्याची एक ही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहाँ यांना सुध्दा सुनावले होते. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना अतिशय कमी चित्रपटांचे संगीत द्यायचे काम मिळाले. त्यातून अर्धे अधिक त्यांनी आपल्या शीघ्रकोपी स्वभाव आणि इतरांची ढवळाढवळ या कारणास्तव सोडले. मुगल-ए-आझम सुध्दा त्यांनी सोडलेला आणि मग नौशादसाहेबांनी जो इतिहास घडवला तो तर सर्वश्रुत आहेच. हलचल हा सुध्दा त्यांनी तीन गाण्यानंतर प्रोड्युसर के आसिफ यांच्या ढवळाढवळीमुळे सोडला. तीच कथा पुढे मग्रूर, रूपलेखा आणि इतर ही काही चित्रपटांची झाली.
1917 साली जन्मलेले सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलीन, वीणा, बासरी, पियानो सारख्या वाद्ये शिकून घेतली. मेंडोलीन हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. त्यांनी आपल्या संगीतात मेंडोलीनचा सढळ वापर केलेला आढळून येतो. 1963 च्या “रुस्तम सोहराब” या चित्रपटानंतर त्यांना अनेक वर्षे वाट पहावी लागली. त्या काळात त्यांनी आपल्या बाणेदार स्वभावानुसार कुणाकडे काम मागण्याऐवजी आपल्या मेंडोलीनवर अनेक प्रयोग करणे पसंत केले.
सज्जाद हुसेन यांच्या कारकिर्दीची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या स्वभावाविषयी जास्त बोलले जाते. पण त्यांच्या संगीताबद्दल असलेल्या तळमळीविषयी आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाविषयी बोलले जात नाही. पण कुणी त्यांचे कौतुक केले किंवा निंदा केली त्यांना त्याचा कधीच काही फरक पडला नाही. आपल्याच मस्तीत आपल्या संगीताच्या दुनियेत बेधुंद होऊन जगणाऱ्या बादशाहप्रमाणे ते जगले. आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या मृत्यूची दखल सुध्दा कुणी घेतली नाही या गोष्टीची खंत वाटते.
सज्जाद हुसेन यांची काही गाजलेली व काही अप्रतिम गाणी खाली देत आहे.
- बदनाम मोहब्बत कौन करे (नूरजहाँ – दोस्त)()
- वो रात दिन वो शाम की गुजरी हुई कहानिया (लता – सैय्या)
- खयालोमे तुम हो नजारोमे तुम हो (लता – सैय्या)
- ए दिलरुबा ... नजरे मिला (लता – रुस्तम सोहराब)
- ये कैसी अजब दास्तान हो गई ही (सुरैय्या - रुस्तम सोहराब)
- लुटा दिल मेरा हाय आबाद हो कर (लता – हलचल)
- जाते हो तो जाओ हम भी यहां (लता – खेल)
- तुम्हें बागोमें (शमशाद बेगम – मग्रूर)
- तुझे क्या सुनाऊ (रफी – संगदिल)
प्रतिक्रिया
18 Jun 2015 - 9:25 am | मुक्त विहारि
पुभाप्र
18 Jun 2015 - 9:45 am | विशाल कुलकर्णी
'एक लता गाती है बाकी सब रोती है' म्हणणारा सज्जाद !
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर हा विक्षीप्त , सणकी माणुस खरोखर अतिशय उच्च दर्जाचा संगीतकार होता. मेंडोलीन हे परदेशी वाद्य भारतीय संगीतात रुढ करण्याचा मान सज्जादच्या नावावर आहे. आंतरजालावर श्री. अनिल गोविलकर यांचा एक या विषयाला वाहीलेला ब्लॉग आहे. त्यावर असलेल्या सज्जादमियांवरील लेखात अनिलजी म्हणतात ..
सर्जनशीलता हा शब्द जरा फसवा आहे, विशेषत: सुगम संगीतातील सर्जनशीलता, कधीही, सहज जाताजाता,ऐकून समजण्यासारखी नाही. खरतर, हे तत्व सगळ्याचा कलांच्या बाबतीत लागू पडते!! आपल्याला “सर्जनशीलता” हा शब्द ऐकायला/वाचायला आवडतो परंतु याचा नेमका अर्थ जाणून घेण्याची “तोशीस” करीत नाही. इथे या शब्दाची “फोड”करण्याचा उद्देश नाही परंतु, सुगम संगीतातील सर्जनशीलता, हा संशोधनाचा विषय मात्र नक्की आहे, जर सुगम संगीत हे, संगीत म्हणून मान्य केले तर!!
इथे वेगवेगळ्या पातळीवर सर्जनशीलता वावरत असते, म्हणजे चालीचा मुखडा, वाद्यवृंद, कवीचे शब्द तसेच अखेरीस आपल्या समोर येणारे गायन!! या सगळ्या सांगीतिक क्रियेत, संगीतकाराची भूमिका, नि:संशय महत्वाची!! हल्ली, जरा काही वेगळे ऐकायला मिळाले, की आपण, लगेच “सर्जनशीलता” हा शब्द वापरतो आणि या शब्दाची “किंमत” कमी करतो!! हिंदी चित्रपट संगीतात, असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले, ज्यांना, खऱ्या अर्थाने, सर्जनशील संगीतकार, ही उपाधी लावणे योग्य ठरेल आणि या नामावळीत, “सज्जाद हुसेन” हे नाव अग्रभागी नक्कीच राहील!!
हा माणुस खरंच खाण होता कलांची. पण विक्षीप्तपणामुळे या क्षेत्रात अनेक शत्रु निर्माण झाले आणि अगदी बोटावर मोजण्याइतके चित्रपट एवढीच पुंजी त्याच्याकडे राहीली. अगदी 'संगदील' च्या वेळी आपल्या संगीतात काही बदल सुचवणार्या दिलीपकुमारला “तुझ्या चेहऱ्याला ना आरोह, ना अवरोह आणि तू मला संगीताचे धडे देतोस?” असे फटकळपणे त्याच्या तोंडावर विचारणारा हा मनस्वी कलावंत.
पण वर शशांकजींनी म्हटल्याप्रमाणे 'मुठभर' हिरे ट्रकभर खड्यांपेक्षासुद्धा कधीही अमुल्यच असतात, यानुसार सज्जादचा दर्जा, त्यांचा नंबर कायम वरचाच राहील.
18 Jun 2015 - 9:46 am | विशाल कुलकर्णी
त्याच्या 'रुखसाना' या चित्रपटातली माझी आवडती गाणी इथे ऐकता पाहता येतील..
https://www.youtube.com/watch?v=yGzo0JoIWAY
१. "तेरे जहाँ से चल दिए" - आशा भोसले
२. "तुम्हें हम याद करते हैं - किशोर कुमार व आशा भोसले
३. "यह चार दिन बहार के" - आशा भोसले व किशोर कुमार
४. "तेरे जहाँ से चल दिए" - किशोर कुमार व आशा भोसले
५. "तेरा दर्द दिल में बसा लिया" - लता मंगेशकर
18 Jun 2015 - 12:05 pm | सिरुसेरि
शॉर्ट आणी स्विट लेख . शिरिष कणेकर यांच्या 'गाये चला जा' या पुस्तकातही सज्जाद यांच्याबद्दल माहितीपुर्ण लेख आहे .
19 Jun 2015 - 6:08 am | श्रीरंग_जोशी
सज्जाद हुसैन या अवलिया कलाकाराविषयी मला त्यांच्या नावाखेरीज काहीच माहित नव्हते. तुमच्या या लेखामुळे चांगली ओळख झाली आहे.
एकुणच ही लेखमालिका माझ्यासारख्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. तुमचे लेख अन त्या निमित्ताने इतर मिपाकरांनी लिहिलेले तपशीलवार प्रतिसाद माझ्यासाठी ज्ञानवर्धक आहेत.
तीस चाळीस वर्षांनी जगलो वाचलो तर मला आवडणार्या संगीतकारांबद्दल अशीच लेखमालिका लिहिन. मला संगीतातले काहीच कळत नसले तरीही एक श्रोता म्हणून मला भावलेले शिव हरी, जतीन ललित, नदीम श्रवण, अनु मलिक, शंकर एहसान लॉय, प्रीतम, हिमेश रेशमिया (त्याने स्वतः न गायलेली गाणी) अन ए आर रहमान यांच्याबद्दल आवडीने लिहिन.
24 Jun 2015 - 4:13 am | नितिन थत्ते
क्र ९ ची लिंक चुकीची आहे.
सज्जाद यांच्या संगदिल मधल्या "ये हवा ये रात ये चांदनी" या तलत महमूदच्या आवाजातील गाण्यावरून घेतलेले गीत लिंकमध्ये आहे. ते गाणे आले तेव्हा "आजकल हमारी तर्जे ही नही; उनकी परछाइयां भी चलती हैं" असे उद्गार काढले होते.
24 Jun 2015 - 6:25 am | श्रीरंग_जोशी
ये हवा ये रात ये चांदनी हे ते गीत असावे.
हे गीत मी लहान असताना माझे वडील गुणगुणत असत.
24 Jun 2015 - 5:47 pm | तिमा
सज्जादची वर लिहिलेली सर्व गाणी मी ऐकली आहेत. त्या सर्वांपेक्षा, 'ये हवा ये रात ये चाँदनी' हे गाणे मला मनापासून आवडते. त्या चालीची मदनमोहनलाही कॉपी करावीशी वाटली (तुझे क्या सुनाऊं) यावरुन ते गाणं किती थोर आहे हे कळते. पण सज्जादची बाकीची गाणी जरी गोड असली तरी त्याच्याभोवती जे एक वलय निर्माण करुन ठेवले आहे तितका तो मला ग्रेट वाटत नाही. त्याच्या बर्याचशा गाण्यांवर अरबी चालींची छटा वाटते. अर्थात प्रत्येकाची आवड निवड.
24 Jun 2015 - 7:13 pm | चौकटराजा
सज्जाद यांचे मेडोलिन वाद्नाचा रागदारी कार्यक्रम सवाई गन्धर्व मधे झाला होता.