मला आवडलेले संगीतकार भाग ५ - गुलाम मोहम्मद

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
22 Jun 2015 - 12:21 pm

मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र
मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास
मला आवडलेले संगीतकार :- ४ सज्जाद हुसैन

gulam

शिकायत क्या करू

कलाकार ही सुध्दा एक व्यक्ती असते. त्याची कला ही त्याची ओळख असते. त्यामुळे प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेशी एकनिष्ठ असतोच. पण कलेची साधना करण्याव्यतिरिक्त उरलेल्या आयुष्यात तो एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच जगत असतो. जगाचे सर्व व्यवहार सांभाळून आपले आयुष्य सुखाने जगतात. पण काही कलाकार असे असतात ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या कलेला समर्पित करून टाकलेले असतात. सर्वसामान्य लोकांच्या व्यावहारिक आयुष्याशी कोणतेही लागेबांधे नसलेले हे अवलिया कलाकार आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील हालअपेष्टा, परवड हसतमुखाने सहन करत आपल्या कलेच्या जगात तल्लीन होऊन जगत रहातात. आणि म्हणूनच त्यांचे कलेच्या क्षेत्रातले योगदान इतरांच्या आयुष्यात सुगंध बनून दरवळत रहाते. अशीच एक व्यक्ती म्हणजे संगीतकार गुलाम मोहम्मद.
माहीमच्या एका झोपडपट्टीत दोन खोलीत राहणाऱ्या गुलाम मोहम्मद यांनी आपल्या उभ्या आयुष्यात पैशाची कधी हाव धरली नाही. आपल्या संगीतासाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेल्या या संगीतकारावर लक्ष्मीची कृपा कधीच झाली नाही. अनेक मान्यवर लोकांनी त्यांच्याकडून विनामोबदला काम करवून घेतली. पण गुलाम मोहम्मद यांनी कधीच कशाबद्दल तक्रार केली नाही. दस्तूरखुद्द नौशाद साहेबांकडे ते अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती इतकीच काय ती जमेची बाजू. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी मिर्जा गालिब आणि पाकीझा हे दोन अतिशय गाजले.

1903 साली बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या गुलाम मोहम्मद यांचे वालीद जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांना साधत असे. अगदी आगगाडीच्या शिट्टीचा ही त्यांनी कल्पकतेने वापर करून घेतला आहे. पाकीझा मधील “चलते चलते” गाण्याच्या शेवटी. किंवा “मौसम है आशिकाना” गाण्याच्या आधीचा पक्षांचा किलबिलाट आठवून पहा. अर्थात तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.

पाकीझा हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. त्याची अनेक वेगवेगळी कारणे होती पण या चित्रपटासाठी संगीत दिलेले गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले. या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली तरी या कापलेल्या गाण्यांची HMV कंपनीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. हा सुध्दा एक दैवी दुर्विलासच म्हणावा लागेल. नाही म्हणायला मिर्जा गालिब च्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रचंड गुणवत्ता आणि जीव ओतून घेतलेल्या मेहनतीला यशाने दरवेळी दिलेल्या हुलकावणीचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल.

गुलाम मोहम्मद यांची पाकीझा आणि मिर्जा गालिब व्यतिरिक्त मला आवडणारी काही गाणी खाली देत आहे. वरील दोन्ही चित्रपटातील प्रत्येक गाणे मास्टरपीस असल्यामुळे त्याबद्दल वेगळे सांगायची गरज नाही.

  1. ये दुनिया है यहां प्यार करना किसको आता है (शायर 1949 मुकेश, लता मंगेशकर)
  2. किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ (परदेस 1950 लता मंगेशकर)
  3. अखियां मिलाके जरा बात करो जी (परदेस 1950 मोहम्मद रफी, लता मंगेशकर)
  4. जिंदगी देनेवाले सून (दिल-ए-नादान 1953 तलत मेहमूद)
  5. मोहब्बत की धून (दिल-ए-नादान 1953 तलत मेहमूद, सुधा मलहोत्रा, जगजीत कौर)
  6. चल दिया कारवां (लैला मजनू 1953 तलत मेहमूद)
  7. शिकायत क्या करू दोनो तरफ गमका फसाना है (कुंदन 1955 लता मंगेशकर)
  8. आपसे प्यार हुआ जाता है (शमा 1961 सुरैया)
  9. दिल गमसे जल रहा है जले पर धुआँ न हो (शमा 1961 सुमन कल्याणपूर)
  10. मला आवडलेले संगीतकार :- ६ हंसराज बेहल

कलासंगीतचित्रपटलेख

प्रतिक्रिया

शशांक कोणो's picture

22 Jun 2015 - 12:28 pm | शशांक कोणो

वरील फोटोत ढोलकीवर आहेत ते गुलाम मोहम्मद (चित्रपट - शायर)

बबिता बा's picture

22 Jun 2015 - 1:28 pm | बबिता बा

पाकिजातील ती उरलेली अप्रकाशित गाणी यु ट्युबावर आहेत का ?