पुस्तक परिचयः हेलिकॉप्टर आणि मी

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
26 Apr 2015 - 12:06 pm

Helico-pter म्हणजे चक्र-पंख ह्या शब्दांनी व्यक्त होणारे आकाशवाहन आपणा सर्वांनाच सुपरिचित आहे. असे वाहन चालवणारे चालक, सांभाळणारे अभियंते, आणि बाळगणारे मालक ह्यांच्याबाबतीत आपल्याला कमालीचे औत्सुक्य असणेही साहजिकच आहे. मात्र त्या उत्सुक्याच्या प्रमाणात, त्यांच्या जीवनकथा प्रकाशित झालेल्या दिसत नाहीत. म्हणूनच हवाईयान देखभाल अभियंते (aircraft maintenance engineer) सुरेश शिवराम गोखले ह्यांच्या ’हेलिकॉप्टर आणि मी’ ह्या पुस्तकावर, मी दिसताक्षणीच झडप घातली. कुठल्याही प्रकारच्या अभियंत्याने आपल्या सुरस जीवनकथा वाचकांना उपलब्ध करून दिल्या जाण्याच्या घटना अजूनही विरळच आहेत. क्वचितच, कधी, कुणी अभियंता आपल्या कहाण्यांना वाचनीय असे मूर्तरूप देत असतो. त्यातही विषय हा असा. त्यामुळे त्यांच्या चक्रपंखी कहाण्यांत मी लवकरच गुरफटत गेलो. त्याच पुस्तकाचा हा अल्पपरिचय. त्याचप्रमाणे सुमारे १,५०० चक्रपंखी उड्डाणांकरता आकाशात झेपावलेल्या एका कुशल अभियंत्रज्ञाची -सुरेश शिवराम गोखले ह्यांचीही- ही सुरस कहाणीही आहे.

धावपट्टीची लांबी कमी करण्याच्या उद्देशाने चक्रपंखाची संकल्पना केली गेली. चालकासह तीन ते सत्तावीस प्रवाशांची वाहतूक चक्रपंख करू शकतात. प्रवासी, लष्करी, आकाशातून पुष्पवृष्टी, फवारणी, सर्वेक्षण व मदतकार्यांकरताची जलदगती वाहतूक करण्याकरता चक्रपंख उपयोगांत आणले जातात. अशा सुरस माहितीने सुरू होणारे हे कथानक, मग चक्रपंखांच्या देखभालीकरता कराव्या लागणार्‍या धावपळीत आपल्याला सहभागी करून घेते.

चक्रपंखांना मुख्यतः तीन प्रकारचे, गतीनियंत्रक असतात. चक्रगती (cyclic), उचलगती (collective) आणि पुच्छचक्र प्रेरक (tail rotor paddles) नियंत्रित करता येतात. चक्रगती नियंत्रकाने पात्यांचे जमिनीशी असलेले कोन बदलले जातात. फिरण्याच्या वेगाचे नियंत्रण करून उचलगती साधली जाते आणि पुच्छचक्र प्रेरक हालवून प्रतिरोध नियंत्रित केला जात असतो. जेव्हा मुख्य चक्रक फिरू लागतो तेव्हा चक्रपंखाचा सांगाडा त्याचे विरुद्ध दिशेने फिरू पाहतो. ह्यालाच प्रतिरोध म्हणतात. मात्र अवांछित असतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजले जातात. पुच्छचक्र प्रेरक (Tail rotor paddles) शेपटीवरील चक्राच्या पात्यांचा कोन बदलतो आणि ह्या प्रतिसदास रोखतो. सह-अक्ष जुळ्या पात्यांद्वारेही हे साधले जाऊ शकते. अशा प्रकारची तांत्रिक माहिती देऊन, पुस्तक मग प्रत्यक्ष आकाशभ्रमणास निघते.

चक्रपंखातून हवाई प्रवास करणारे लोक, मान्यवर असतात. त्यांच्या दिमतीला वावरणारे इतर सर्वच लोक त्यांच्या सोयीने आणि सोयीकरताच भवताली फिरत असतात. तशांतीलच एक सुरेश गोखले हे आहेत. त्यामुळे त्यांना माधवराव शिंदिया, राजमाता विजयाराजे शिंदिया, अटल बिहारी बाजपेयी, इंदिरा गांधी इत्यादी मान्यवरांच्या निकट संपर्कात येण्याचे भाग्य लाभले. त्यावेळच्या कथा, कहाण्या आणि किस्स्यांनी पुस्तक मनोरंजक झालेले आहे. अशा हवाई प्रवासाच्या प्रत्यक्ष नोंदी करणे, चक्रपंखांची तपासणी करून उड्डाणास सुसज्ज असल्याचे प्रमाणित करणे, बिघडल्यास दुरूस्त करणे इत्यादी कामांच्या सुरस कथाही ह्यात वर्णिलेल्या आहेत.

लांबवर न्यायचे असेल तर (उदाहरणार्थ पाटणा ते मद्रास)चक्रपंख आकाशातून उडवत नेत नाहीत. ते सुटे करून ट्रकमधून घेऊन जातात आणि त्या ठिकाणी मग पुन्हा त्यांची जोडणी केली जाते. सुटे करण्यास चार सहा तास लागतात आणि जोडणीसही सुमारे तितकाच वेळ लागतो. खूप काळजीपूर्वक काम करावे लागते. जोडणी झाल्यावर चाचणी उड्डाण केले जाते आणि मग चक्रपंख वाहतूकीस सज्ज असल्याचे प्रमाणित करतात. अशा अतर्क्य गोष्टीही ह्या पुस्तकात ओघाओघातच वाचायला मिळतात.

“मी खूप भरभर चालतो. पण इंदिराजी माझ्यापेक्षा भरभर चालत होत्या.” अशा आठवणींनी हे किस्से रंगतदार झालेले आहेत. काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून सुरेशजींनी इंदिराजींना, मल्लापुरमला सभा घेण्यास कसे राजी केले त्याचीही हकीकत ह्यात आहे.

हेलिकॉप्टर्स, राजकीय नेते, बस्तर-जंगलाची हवाई पाहणी, स्वपुराण, चंदेरी दुनियाः फिल्म शूटिंग, साधू-संत महात्मे व महत्त्वाच्या व्यक्ती, हवाई फवारणी, सी-किंगच्या व्ही.आय.पी. किटस, जहाजावरील हिलर हेलिकॉप्टरचे मूल्यमापन आणि इतर काही, माझ्या एव्हिएशनच्या काही आठवणी, नेव्हिली लिग्नाईट कॉर्पोरेशन, होम फ्रंट आणि माझी अमेरिका वारी; अशी प्रकरणे असलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.

सौदागर सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी लेखकाने, मनीषा कोईराला आणि विवेक मुश्रन ह्या सिनेमाच्या हिरो-हिरोईनलाच, आधी कधीही पाहिलेले नसल्याने ओळखले नव्हते. शिवाय सोबतच्या तरूणाने आपली ओळख रावण अशी करून दिल्याने आणखीनच गोंधळ झाला. ह्या आणि अशाच अनेक कहाण्या लेखकाने ह्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत.

सत्यसाईबाबांवर छत्र धरण्यास आलेल्या सेवकाचे छत्रच चक्रपंखीच्या पंखांत गुंतून अनावस्था प्रसंग उभा राहिल्याची हकिकतही ह्यात समाविष्ट आहे. चक्रपंखी शेताच्या बंधार्‍याला धडकून एंड्रिनमिश्रित चिखलात सरपटू लागले. चालक बिशू एंड्रिनमिश्रीत पाण्याने भिजून गेला होता. मात्र तो बाहेर पडू शकल्याने बचावला. अशा अवस्थेत, हेलिकॉप्टर चिखलात जवळजवळ अर्धा तास भुतासारखे नाचत होते. त्यावेळी, लेखक आत शिरून ते बंद करण्याच्या विचारांत असतांना, हेलिकॉप्टर तर आपण गमावलेलेच आहे, आम्ही तुला गमावू इच्छित नाही, असे सांगून त्यांना त्यांच्या एरिक नावाच्या गुरूने कसे वाचवले होते; त्याची अद्भूत कहाणीही आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते. एरव्ही जमिनीवर, डोंगरांवर विहार करणार्‍या चक्रपंखीस; कोळशाच्या खाणींत उड्डाण करण्याची पाळी कशी आली होती आणि त्यावेळचे सर्व अनुभवही पुस्तकात उत्तमरीत्या वर्णिलेले आहेत.

मला तर हे स्वानुभवांचे छोटेखानी पुस्तक बेहद्द आवडले आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो. तेव्हा अवश्य वाचा, “हेलिकॉप्टर आणि मी”.

अक्र, मूळ इंग्रजी शब्द, पर्यायी मराठी शब्द
१ Helico-pter चक्र-पंख
२ Composite Material संयुक्त पदार्थ
३ Co-axial rotor सह-अक्ष चक्रक
४ Twin rotors जुळे चक्रक
५ Rigid blades दृढ पाती
६ Semi-rigid blades अंशतः दृढ पाती
७ Fully articulated blades संपूर्णतः उमलती पाती
८ Pitch वक्रता
९ Flapping movement हेलकावी हालचाल
१० Dragging विस्तारक्षम
११ Cyclic चक्रगती
१२ Collective प्रवासगती
१३ Tail rotor paddles पुच्छचक्र प्रेरक
१४ Rotating wings aircraft चक्र पंख विमान
१५ Fixed wings aircraft दृढ पंख विमान

संदर्भः

’हेलिकॉप्टर आणि मी’, सुरेश शिवराम गोखले, ग्रंथाली मुद्रणसुविधा प्रकाशन, प्रथमावृत्ती, १४ फेब्रुवारी २०१५, रू.१६०/-.

तंत्रप्रकटनआस्वादसमीक्षामाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

उत्तम ओळख. पुस्तक वाचनीय दिसते आहे.

उत्तम ओळख. पुस्तक वाचनीय दिसते आहे.

अत्रन्गि पाउस's picture

26 Apr 2015 - 1:16 pm | अत्रन्गि पाउस

खरेदी करण्यात येईल

पाहिजे अशी भावना करून देणारे उत्तम रसग्रहण

वाचलेच पाहिजे अशी भावना करून देनारे उत्तम रसग्रहण.

वाचलेच पाहिजे अशी भावना करून देनारे उत्तम रसग्रहण.

चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

बाकी चक्रपंखी हे नाव बेहद्द आवडले.

.रोचक..लगेच ऑर्डर करतो.
..परिचयाबद्दल आभार.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

या पुस्तकाची ओळख आवडली.

ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे का याचा शोध घेतला. लगेच तरी कुठे आढळले नाही. पुन्हा प्रयत्न करीन.

स्वॅप्स, अत्रन्गि पाऊस, सुरन्गी, पिंगू, गवि आणि श्रीरंग_जोशी सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मदनबाण's picture

29 Apr 2015 - 10:32 am | मदनबाण

पुस्तक परिचय आवडला... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

नरेंद्र गोळे's picture

10 May 2015 - 12:39 pm | नरेंद्र गोळे

धन्यवाद, मदनबाणा!

पैंची लायब्ररी मात्र खासच आहे हां, काय ती पुस्तके, सर्वीस... मस्त. पुण्यात यांची शाखा आहे काय ?

पुस्तक ओळख आवडली.

नरेंद्र गोळे's picture

16 Dec 2015 - 8:18 pm | नरेंद्र गोळे

डोंबिवलीकरांनी. त्यांची (बहुधा) कुठेही शाखा नाही (डोंबिवली व्यतिरिक्त).

बोका-ए-आझम's picture

18 Dec 2015 - 6:15 pm | बोका-ए-आझम

तो फ्रेंड्स लायब्ररीचा लाल शिक्का एकदम प्रसिद्ध आहे. उत्तम परिचय!