चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
11 Feb 2015 - 11:49 am

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना...”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

जीवनमानराजकारणमौजमजामाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

11 Feb 2015 - 11:54 am | तुषार काळभोर

लई दिसांनी अड्डा जमवलात!!

बबन ताम्बे's picture

11 Feb 2015 - 12:07 pm | बबन ताम्बे

खुसखुसित . :-)

स्पंदना's picture

11 Feb 2015 - 12:13 pm | स्पंदना

असच काय बाय मनात घोळतयं बघा. तुह्मी इथे मांडलत बर झालं.

राही's picture

11 Feb 2015 - 12:47 pm | राही

सहमत. इथे मांडलत ते बरं केलंत. अशाच भावना अनेकांच्या असतील.

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 1:12 pm | मदनबाण

मस्त ! :)
क्या केजरीवाल ५ साल गद्दी पे बैठे रहेंगे ?
क्या उन्होने किये हुये वादे निभा पायेंगे ?
क्या यह नये नौटंकी सिर्फ शुरुवात है ?

देखेंगे "ह्म लोग" :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

अजून शपथविधी व्हायचा आहे,
पण फुकटे आमदार व त्यांचे महानायक आज पहाटेपासूनच निर्माण भवनावर खेटे मारायला लागले आहेत.

पाहूया ४९ दिवसांचा त्याचा रेकोर्ड कधी आणि कोणत्या कारणासाठी तुटतो!
पण त्यात केंद्र सरकारवरच "AAP च्या शाळेसाठी" जागा दिली नाही म्हणून आरोप येण्याचीच जास्त शक्यता आहे.

तो पर्यंत सर्व फुकट्या लोकांसाठी......... चलो दिल्ली !
फक्त जातांना सोबत झाडू आणि मफलर घेवून जावे, बाकीची सोय फुकट होणार आहेच दिल्लीत.

बर्याच दिवसानी चावडी आली हो.

मस्त लिहिले आहे, एकदम करेक्ट

सर्वसाक्षी's picture

11 Feb 2015 - 3:49 pm | सर्वसाक्षी

चावडी जमली.

साती's picture

11 Feb 2015 - 4:15 pm | साती

लेख आवडला!