बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Jan 2015 - 1:16 pm

नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ...

"नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर."

मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा). पण दहावीच्या ऐन परीक्षेत दुसर्‍या दिवशी रसायनशास्त्र आणि भुमितीचा पेपर असतानासुद्धा आदल्या रात्री चाळीत भाड्याने आणलेल्या व्हिडीओवर बच्चनचे तुफान आणि जंजीर असे दोन चित्रपट (यातला जंजीर आधी ४-५ वेळा पाहिलेला होता) बघु द्यायला नकार देण्याचा कद्रुपणा आमच्या पिताश्रींनी केलेला नव्हता. कदाचित चित्रपटांचं वेड हे माझ्याकडे त्यांच्याकडुनच आलेलं आहे. अर्थात त्या काळी आमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या. कायम बच्चन, धर्मेंद्र आणि खासकरून लाडक्या मिथुनदांचे चित्रपट पाहणे ही आमची आवड. त्याच बरोबर महेंद्र संधू (हे नाव तरी आठवतय का कुणाला?) , विक्रम हे फायटींग करणारे कलाकार जास्त आवडीचे. अशा आवडींच्या त्या काळात जेव्हा आण्णा, दुरदर्शनवर लागणार्‍या कुठल्यातरी जुनाट चित्रपटातल्या त्या गोर्‍या-गोमट्या, रेशमी केसाच्या शामळु हिरोचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायचे तेव्हा आम्ही भाऊ गपचुप्-गपचुप हसायचो. आण्णांना काही पण आवडतं राव!

मग कधीतरी अकरावीला वगैरे होतो तेव्हा, एका मित्राकडे रात्री अभ्यासाला म्हणून गेलेलो असताना एक चित्रपट पाहण्यात आला. (मित्रांकडे रात्री अभ्यासाला जायचे म्हणजे पिक्चर पाहायलाच जाणे असायचे. अर्थात तेव्हासुद्धा अजुन 'भक्त पुंडलीक'चे वेड लागलेले नव्हते. त्यानंतरही कधी लागु शकले नाही)

त्याच त्या शामळू हिरोची मुख्य नट म्हणून भुमिका असलेला चित्रपट होता तो. १९८६ साली आलेला मुजफ़्फ़र अलीचा ’अंजुमन’. मुजफ़्फ़र अलींच्या नेहमीच्या पद्धतीने स्त्रीयांचे शोषण, उत्पीडन आणि स्त्रीयांच्या हक्कासाठी त्यातल्याच एकीने उठवलेला आवाज असा नेहमीचाच विषय होता. शबाना आझमी आणि "फ़ारुक शेख" हे कलाकार. खय्याम साहेबांचं संगीत, स्वत: मुजफ़्फ़र अलींचीच कथा, राही मासुन रझासाहेबांचे संवाद, शहरयार साहेब तसेच शायरे आझम फ़ैज अहम फ़ैज साहेबांची शायरी, गाणी. शबानाने स्वत;च्या आवाजात गायलेली गाणी सगळाच अदभूत संगम होता चित्रपटात. शबानाच्या आई शौकत कैफ़ी आझमी यांची पण भुमिका होती या चित्रपटात. पण मला या चित्रपटात काही आवडले असेल तर तो होता ’फ़ारुक शेखचा बोलका चेहरा आणि त्यांचा चित्रपटातला सहज-सुंदर अभिनय’ . चित्रपटाची कथा पुर्णपणे शबानाच्या भुमिकेवर ’अंजुमन’वर केंद्रीत होती पण लक्षात राहीला तो ’फारुक शेख’. फिल्म इंडस्ट्रीत मोतीलाल आणि बलराज सहानी यांच्यानंतर इतका सभ्य वाटणारा आणि प्रत्यक्षातही तितकाच सभ्य असणारा असा कलाकार विरळाच असेल. असो.... सांगायचे हे की त्या दिवसापासून मी फारुक शेख या व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलो. आण्णांना हा माणुस इतका का आवडतो हे तेव्हा कळाले.

दुसर्‍या दिवशी आण्णांना मी हे सांगितले. आण्णासाहेब एकदम खुश. आण्णांची प्रतिक्रिया होती. "मोठा झालास !" अस्मादिकपण खुश :)

त्यानंतर मात्र फारुकजींचे चित्रपट पाहण्याचा धडाका सुरु केला. जमाना अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र, मिथुन यांचा होता. फारुखजींचे चित्रपट बहुतांशी 'समांतर' या श्रेणीतले. त्यामुळे हे चित्रपट सिनेमाघरातुन खुप कमी लागायचे. लागले तरी फार दिवस टिकायचे नाहीत. त्यामुळे आम्ही कायम शोधातच असायचो. कुठे फारुकजींचा सिनेमा लागलाय असे कळले की आम्ही पोचलोच. पुन्हा तिकीटही सहज मिळून जायचे. सगळ्यात पुढचे आठ रुपयांचे तिकीट काढून आम्ही थेटरात दाखल व्हायचो. तिथे मोजुन ३०-४० टाळकी असायची, फार-फार शंभर. त्यामुळे राज्य आपलंच असायचं.

farooq-sheikh-wallpaper_1

अशातच एके दिवशी अशातच एके दिवशी १९७३ साली आलेला, एम्.एस्.सथ्युंचा 'गर्म हवा' पाहण्यात आला. फारुकजींचा हा पहिलाच मोठा चित्रपट होता. फाळणीनंतर भारतात मागे राहीलेल्या मुस्लीम समाजाच्या मनस्थितीचे, अवस्थेचे खोल चित्रण करणारा हा चित्रपट. या चित्रपटात फारुकजींनी सलीम मिर्झाच्या (बलराज सहानी) धाकट्या मुलाची सिकंदर मिर्झाची भुमिका निभावलेली होती. त्या काळातल्या बंडखोर, कम्युनिझ्मकडे झुकलेल्या तरुणाईचे प्रतिक असलेली ही सिकंदर मिर्झाची भुमिका होती. भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरीत व्हायला विरोध करणारा, पित्यावर झालेल्या खोट्या आरोपांनी घाबरून न जाता यंत्रणेच्या विरुद्ध लढायला तयार असलेला सिंकदर मिर्झा फारुकजींनी जीव तोडून रंगवला होता. खरेतर त्यातली फारुखजींची भुमिका तशी दुय्यमच होती. पण ती त्यांनी अतिशय आत्मीयतेने रंगवली होती.

या चित्रपटाचा फ़ारुकभाईंना  आर्थिक पातळीवर नसला तर अभिनयाच्या पातळीवर. एक खुप मोठा फ़ायदा झाला. ’गर्म हवा’ साठी फ़ारुकजींना फ़क्त ७५० रुपये मानधन मिळाले होते. पण नफ्याची बाजु ही होती की पहिल्याच भुमिकेत ’नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनयाचा बादशहा’ म्हणुन ओळखल्या गेलेल्या ’कै. बलराज सहानीं’ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बलराज -साहेबांच्या सहज सुंदर अभिनयशैलीचा पगडा फारुकभाईंसारख्या गुणी व्यक्तीत्वावर पडला नसता तरच नवल. त्यामुळे पुढे आपल्या संपुर्ण कारकिर्दीत फारुकभाईंनी नैसर्गीक अभिनयावरच अधिक भर दिला.

gh1

माझ्यासाठी अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना, देव आनंद, दिलीपकुमार अशी आवडत्या कलावंतांची हायरार्ची असलेली विचारसरणी बदलण्याच्या दिवसांची ती सुरूवात होती. आता अमिताभच्या नावाआधी बलराज सहानी, फारुक शेख, नासिरुद्दीन शाह अशी नावे यायला लागली होती. हो, फ़ारुकभाईंच्या चित्रपटांनी मला नासिरुद्दीन शहा नावाच्या अफाट कलावंताची ओळख करून दिली. त्याबद्दल नंतर कधीतरी....

गुजरातमधल्या अमरोलीत एका खानदानी जमीनदार घराण्यात जन्माला आलेला हा देखणा कलावंत उच्चविद्याविभुषीत होता. लहानपणापासून मुस्लीम जमीनदारी वातावरणात वाढल्यामुळे ती खानदानी अदब, तो रुबाबदारपणा त्यांच्यात चांगलाच मुरलेला होता.

कदाचित म्हणूनच १९८१ साली जेव्हा मुजफ़्फ़र अलीला एका रसिक, खुशमिजाज नवाबाचे पात्र उभे करायचे ठरवले तेव्हा फ़ारुकजींनाच ही संधी द्याविशी वाटली असेल. तेव्हा अलीसाहेबांना वाटले सुद्धा नसेल की हा चित्रपट इतिहास घडवणार आहे. मुझफ्फर अलीचा चित्रपट, त्यामुळे पुन्हा विषय स्त्रीप्रधानच होता. मिर्झा हादी रुसवा यांच्या कथेवर आधारीत 'उमराव जान'ने तत्कालीन रसिकांवर गारुड केलं. इथेही फारुकजींच्या वाट्याला आलेली भुमिका तशी (नायक असुनही) दुय्यमच होती. उमराववर जिवापाड प्रेम करणारा नवाब सुलतान त्यांनी ताकदीने रंगवला होता. उमराववर मनापासून, उत्कटपणे मोहोब्बत करणारा नवाब सुलतान, आपले कुटुंब, खानदान की आपली प्रिया या द्वंद्वात नाईलाजाने आपल्या परिवाराची निवड करणारा एक पराभूत प्रेमी अश्या दोन टोकाच्या दोन तर्‍हा फारुकभाईंनी विलक्षण उत्कटतेने रंगवल्या होत्या.

कै. सत्यजीत रें यांचा ’शतरंज के खिलाडी’ या पुर्वीच येवून गेला होता. फारुकभाईंची कारकिर्द हळुहळू पण विलक्षण ताकदीने बहराला येत होती. मला वाटतं सत्तरचे दशक फारुकभाईंसाठी खुप महत्वाचे आणि भाग्योदयाचे ठरले. या काळात त्यांची जोडी कलात्मक चित्रपटांची तत्कालीन मोठी अभिनेत्री ’दीप्ती नवल’ यांच्याबरोबर जमली होती.

download

या जोडीने एका मागुन एक खुप सुंदर चित्रपट दिले. साथ-साथ, चष्मेबद्दूर, कथा, किसीसे न कहना, रंगबिरंगी, टेल मी ओ खुदा ही त्यातलीच काही नावाजलेली नावे. चष्मेबद्दूर मधला सरळमार्गी, साधा सरळ प्रेमीक असो वा ’कथा’मधला गुलछबू, दिलफेक आशिक असो दोन्ही भुमिका फ़ारुकभाईंनी मनापासून उभ्या केल्या होत्या. ’Listen Amaya' या २०१० च्या दशकात येवुन गेलेल्या चित्रपटात हे दोघे परत एकदा एकत्र झळकले.

Farooq-Shaikh-Deepti-Naval

अशातच कुणाकडून तरी कळालं की फारुकभाई आणि शबाना आझमी मिळून एक थिएटर प्ले (नाटक) सुद्धा करत. "तुम्हारी अमृता" या नावाचा. आणि मग आपोआपच अमृताला शोधणे अपरिहार्य ठरले...

"'लिखना मुझे अच्छा लगता है अमृता। ख़ास तौर से तुम्हें। ये ख़त नहीं हैं।  मेरी जान ये मैं हूं। ये मेरी रुह के टुकड़े हैं। तुम चाहो तो इन्हें टुकड़े-टुकड़े कर डालो।' "

१९९२ मध्ये जावेद सिद्दिकीने हे नाटक लिहीले होते. ए.आर. गर्नीच्या ’लव लेटर्स’ वरून प्रेरीत होऊन. ८ वर्ष वयाची अमृता निगम वय वर्षे १० च्या जुल्फिकार हैदरला पत्रे लिहीते. पुढची पस्तीस वर्षे हा पत्रव्यवहार चालू राहतो. केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढ्या मोजक्या नेपथ्यावर (नंतर काही प्रयोगात दोन टेबल आले) फारुकभाई आणि शबाना हे नाटक सादर करीत. दोघे खुर्चीवर बसून एकामागुन एक , एकमेकांना लिहीलेली पत्रे वाचत असत. पण हा प्रयोग ते दोघेही इतक्या परिणामकारकरित्या सादर करत की या नाटकाचे फ़ारुक आणि शबाना या जोडीने जवळ-जवळ ३०० हाऊसफ़ुल्ल प्रयोग केले.

तुम्हारी अमृता

जवळ-जवळ १२ वर्षे  ’तुम्हारी अमृता’ने रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर २०४ मध्ये सोनाली बेंद्रेच्या साथीत फारुकभाईंनी या नाटकाचा एक सिक्वेल ’ आपकी सोनीया’ या नावाने केला होता. पण तो फ़ारसा यशस्वी ठरला नाही. शबाना आनि फारुक शेख ही जोडी सुद्धा काही मोजक्या पण समर्थ दिग्दर्शकांच्या चित्रपटातून झळकली. यात कल्पना लाजमींचा ’एक पल’ , सागर सरहदीचा ’लोरी’ आणि मुजफ़्फ़र अलींचा ’अंजुमन’ ही नावे ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देतात.

दरम्यान फारुकभाईंचे इतरही चित्रपट पाहणे सुरूच होते. जुन्यापैकी बाजार, नुरी तर नव्यापैकी बीवी हो तो ऐसी, माया मेमसाब, लाहौर, सास बहु और सेन्सेक्स, शांघाय अशा चित्रपटांमधून फारुकभाई आपले प्रसन्न दर्शन देतच होते. लाहौर साठी तर २०१० साली फ़ारुकभाईंना उत्कृष्ट सहकलावंतासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

या दरम्यान फ़ारुकभाई अधुन मधून इडीयट बॉक्सवर सुद्धा झळकत होतेच.१९८५-८६ साली दुरदर्शनची गाजलेली मालिका ’श्रीकांत’ असो, वा त्यानंतर स्टार प्लस वर आलेली ’जी मंत्रीजी’ असो अथवा सोनी टिव्हीवरची ’चमत्कार’ असो फ़ारुकभाई कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत चाहत्यांच्या संपर्कात होतेच. त्याच दरम्यान फारुकभाईंनी चित्रपट क्षेत्रातील कलावंतांच्या मुलाखतीवर आधारीत असलेली  " जीना इसी का नाम है" या नावाची एक मालिका सुद्धा केली. अल्पावधीतच या मालिकेने यशोशिखर गाठले. या मालिकेचे दुसरे पर्व सुरेश ओबेरॊय यांनी केले पण ते काही फारुकभाईंची उंची गाठु शकले नाहीत. फ़ारुकभाईंची विनिदाची उत्तम जाण आणि विनम्र स्वभाव, समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलेसे करत बोलते करण्याची हातोटी हा या कार्यक्रमाचा मर्मबिंदू होता, जिथे सुरेश ओबेरॉय कमी पडले.

२७ डिसेंबर २०१३ रोजी दुबईमध्ये दीप्ती नवलच्याच कुठल्यातरी कार्यक्रमासाठी म्हणून गेलेले फारुकभाई हृदयविकाराच्या धक्क्याने अल्लामियाच्या घरी वर्दी बजावण्यास निघून गेले. हिंदी समांतर चित्रपटांच्या इतिहासातलं एक देखणं, अभिनय संपन्न पर्व नकळत संपलं.......

फारुकभाई, तुम्ही गेलात, पण तुमचे चित्रपट, तुम्ही गाजवलेली गाणी कायम आमच्या हृदयात वास करतील. ती गाणी पुन्हा पुन्हा पाहणे, तुमच्या चित्रपटांची पारायणे करने हीच तुम्हाला आमची श्रद्धांजली असेल, श्रद्धांजली ठरेल.....

विशाल कुलकर्णी

कलाचित्रपटआस्वादमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

21 Jan 2015 - 1:24 pm | मृत्युन्जय

फारुख शेख. थोर कलाकार. सहजसाधा अभिनय आणि पडद्यावरचा दिलखुलास वावर या त्यांच्या जमेच्या बाजू.

सुरेख लेखन ! माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

ऋषिकेश's picture

21 Jan 2015 - 1:46 pm | ऋषिकेश

उत्तम लेख!
फारुख यांना आदरांजली!

hitesh's picture

21 Jan 2015 - 1:49 pm | hitesh

तुम्हारी अमृताचे मराठी रुपांतरही झाले होते. त्याचेही प्रयोग होत होते. मराठी कलाकार होते

प्रमोद देर्देकर's picture

21 Jan 2015 - 1:56 pm | प्रमोद देर्देकर

व्यक्ति चित्रण आवडले. आमचे कै. विनायक सर आम्हाला सांगायचे की शास्त्रीय संगिताच्या बैठीकीत वाद्ये (जसे तंबोरा, वीणा, तबला) ही व्यवस्थीत लावावी लागतात तर योग्य तो मेळ जमुन येतो व मैफिल रंगते. तसे हे दोन म्हणजे एक फारुखभाई, दुसरे नसरुद्दिन शाह आणि तिसरा कलाकार मराठी अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्या बाबतीत म्हणायचे की ते अभिनयात तरबेज आहेत. कधीही हे तिघे अगोदरच तयार असतात आणि वास्तवावादी अभिनय करतात.

नाखु's picture

21 Jan 2015 - 1:58 pm | नाखु

अभिनय आणि मला वाटते सई परांजप्याचाही अतिशय आवडता कलाकार.
विकु हे लेखनही अनवट अभिरूचीसंपन्न आहे.अभिनंदन

बोका-ए-आझम's picture

21 Jan 2015 - 2:38 pm | बोका-ए-आझम

फारुख शेख विनोदी अभिनयातही अत्यंत कुशल होते. ' कथा ', 'बीवी हो तो ऐसी', ' तुफान ' सारखे चित्रपट आणि ' चमत्कार ' सारख्या मालिकांमधून त्यांनी आपली विनोदावरची हुकूमत दाखवून दिली होती. समांतर चित्रपटांबरोबरच ' नूरी ', ' फासले' अशा व्यावसायिक चित्रपटांतही त्यांनी सुंदर अभिनय केलेला आहे.

योगी९००'s picture

21 Jan 2015 - 3:06 pm | योगी९००

फारुख शेख विषयी हे सुंदर लिखाण म्हणजे त्याला आदरांजलीच ठरावी...!!

संयत अभिनय (कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता) कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे फारूख शेख..त्यांच्यावर चित्रीत झालेली काही गाणी जर कोठे ऐकू आली तर सर्वात पहिला डोळ्यासमोर येतो तो त्यांचा चेहरा आणि नंतर गायकाचा...(उदा. तुम को देखा तो ये खयाल आया..).

उत्तम लेख विशाल भाई..!!

राही's picture

21 Jan 2015 - 3:18 pm | राही

एका सुंदर अभिनेत्याच्या सुंदर कारकीर्दीवर लिहिलेला तितकाच सुंदर लेख.

राजाभाउ's picture

21 Jan 2015 - 3:40 pm | राजाभाउ

विशालदा, परवाच ईकड नारायण धारपांवर लेख आला आहे त्या वरुन तुम्ही पुर्वी लिहीलेल्या भयकथा (माझ्यामते मी मराठी वर) आठवल्या, आणि तुमचे इतर लेखनही आठवले. त्याचवेळी मनात आले कि तुमचे बर्याच दिवसात काही वाचनात आले नाही, तर आज हा लेख, वा वा दिल खुष हो गया. लिहीत रहा हो, आम्ही तुमच्या पंख्यांपैकी एक आहोत.
बाकी लेख फक्क्ड जमला आहे. फारुक शेख माझ्याही आवडत्या अभीनेत्यांपैकी एक आहे, व वरील बरेचशे चित्रपट बघीतले आसल्याने मजा आली.
घन्यवाद.

काय छान लिहिलंय! चष्मेबद्दूर प्रचंड आवडीचा. पहिलेपहिले चित्रपट माहीत नव्हते - आता पाहीन. आभार!

पिंपातला उंदीर's picture

21 Jan 2015 - 4:52 pm | पिंपातला उंदीर

रणबीर कपुर च्या ये जवानी है दिवानी पिक्चर मध्ये २ सीन पुरता होता हा इसम . अख्खा चित्रपट खाऊन टाकला होता

विशाल कुलकर्णी's picture

21 Jan 2015 - 4:53 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !
फारुकभाईंचे इतके चाहते आहेत हे पाहून मनस्वी आनंद होतोय. धन्यवाद :)

फारुख शेख यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव राहिलेय यायचे अजुन!
Club 60 मधले डॉ.तारिक पण जबरा होते.

कुणी पाहिला नसेल तर जरुर पाहा :)

मितान's picture

21 Jan 2015 - 6:32 pm | मितान

सुंदर लेखन !

तुम्ही दिलेल्या यादीतले काही चित्रपट बघायचे राहून गेलेत. आता आवर्जून बघेन.

रेवती's picture

21 Jan 2015 - 6:38 pm | रेवती

लेख आवडला.

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 6:48 pm | सुबोध खरे

आम्ही पण फारुख शेख साहेबांचे पंखे आहोत आता आपले पण झालो. सुंदर लेखन.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

सौन्दर्य's picture

21 Jan 2015 - 8:16 pm | सौन्दर्य

लेख फार आवडला, खूप छान लिहिला आहे. 'फिल्म इंडस्ट्रीत मोतीलाल आणि बलराज सहानी यांच्यानंतर इतका सभ्य वाटणारा आणि प्रत्यक्षातही तितकाच सभ्य असणारा असा कलाकार विरळाच असेल.' हे वाक्य एकदम पटलं. मोतीलालना पाहण्याचा योग आला नाही, पण बलराज सहानीं इतका सभ्य दिसणारा आणि प्रत्यक्ष असणारा कलाकार म्हणून फारुख शेखची तुलना एकदम परफेक्ट.

विशाल कुलकर्णी's picture

22 Jan 2015 - 10:31 am | विशाल कुलकर्णी

<<मोतीलालना पाहण्याचा योग आला नाही, >>>
जुन्या पैगाम, अनाडी, परख, लीडर,जागते रहो, ये जिंदगी कितनी हसीन है वगैरे चित्रपटात होते मोतीलाल. फार लांब जायचे नसेल तर जुन्या 'वक्त' मधील शेवटचा कोर्ट केस ड्रामा आठवा. त्यात सुनीलदत्तच्या विरोधात सरकारी वकील म्हणून केस लढवणारे 'मोतीलाल' होते.
motilal

विशाल कुलकर्णी's picture

22 Jan 2015 - 10:33 am | विशाल कुलकर्णी

ऊप्स सॉरी चुकून मुकेशचा फोटो पडला

motilal

त्यांची आणी नादिराची प्रमुख भुमिका असलेला 'छोटी, छोटी बातें' मिळाला तर अवश्य पहा. अगदी 'हटके' चित्रपट आहे...एक नेहमीच्या रहाटगाडग्याला कंटाळलेला मध्यमवयीन गृहस्थ आणि एक स्वतंत्र, स्वच्छंद तरूणी ह्यांचे एक वेगळेच कथानक आहे. हे त्यातील माझे एक अत्यंत आवडते गाणे पहा, खास करून गीत -

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2015 - 9:49 pm | स्वाती दिनेश

छान लेख.. आवडला.
स्वाती

अर्धवटराव's picture

21 Jan 2015 - 10:55 pm | अर्धवटराव

फारुक साहेबांसारखाच.
का कोण जाणे, पण मला उमराव जान मधे फारुक फारसा आवडला नाहि. उमराव रेखाचा अति भारदस्तपणा असेल कदाचीत...
अभिनयाच्या बाबतीत फारुक साहेबांची रेंज मात्र अफाट. कुठे तो चश्मेबद्दुर मधला मिस चमको म्हणणारा सरळ साधा आशिक, दुसरं टोक ते कथा मधला बाशु, आणि एकदम "तयारीत" असणारा शांघाय मधला सनदी अधिकारी. सगळे रंग तुफान रंगवलेत साहेबांनी.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2015 - 11:03 pm | मुक्त विहारि

आवडला.

माझीही शॅम्पेन's picture

21 Jan 2015 - 11:12 pm | माझीही शॅम्पेन

एक नितांत सुंदर लेख फारुख शेख बरोबरच अमोल पालेकरांच काम खूप आवडत , दोघांचे चित्रपट अफलातून असतात

पण एका चित्रपटात फारुख शेख गंडलेले वाटले तो म्हण्जे "यंगिस्तान" कदाचित तो दिग्दर्शकाचा दोष असावा !!

काय दिवस आहे आज!!! फारुख शेख माझाही अतिशय आवडता अभिनेता आणि त्याचा 'साथ-साथ' माझा अगदीच आवडता चित्रपट. किती मित्र-मैत्रिणींंना तो दाखवला आहे ह्याची गणतीच नाही. थोड्या चित्रपटांचा, पुस्तकांचा आयुष्यावर प्रभाव राहतो - माझ्यासाठी त्यातलाच हा एक चित्रपट.

बाकी मग त्याचे वर उल्लेख केलेले कित्येक चित्रपट पाहिले - अगदी 'गर्म हवा' किंवा 'गमन' पासून आतापर्यंतच्या 'लिसन अमाया' पर्यंत. (अंजुमन राहिलाय :() आणी काही अपवाद वगळले तर त्याचे चित्रपट आवडायचेच. मग त्याच्याविषयी बरेच वाचले - त्याचे सुसंकृत घर, त्याचा स्वभाव आणि शबाना आणि दिप्ती नवल सारख्या त्याच्या सहकलकार आणि मैत्रिणींनी लिहिलेले लेख....त्याच्या सभ्यपणाविषयी एकदम सहमत.

त्याची अभिनय क्षमता खूप ग्रेट नसेलही कदाचित, पण त्याची चित्रपटांची निवड, 'जीना इसिका नाम है' अश कार्यक्रमातून जाणवणारे त्याचे विचार आणि अतिशय अदबशीर असा त्याचा हजरजवाबीपणा..... ह्या माणसाच्या मी प्रेमातच पडत गेलो. इतका की मग तो गेल्यावर २-३ दिवस उगाचच अस्वस्थपणा जाणवत होता, त्याच तिरमिरीत त्यावर काही लिहायला घेतले, आणि मग इतर कित्येक लेखांसारखाच तोही लेख अर्धवाच पडून राहिला. आज हे सगळे आठवले विशालमुळे - धन्यवाद विशाल! :-)

स्पार्टाकस's picture

22 Jan 2015 - 12:57 am | स्पार्टाकस

मस्तंच विशाल.
मायबोलीवर पूर्वी वाचला होता तेव्हाही आवड्ला होता! पुनरानुभूतीही तितकीच छान!

विशाल कुलकर्णी's picture

22 Jan 2015 - 10:34 am | विशाल कुलकर्णी

मनःपूर्वक आभार मंडळी :)

इशा१२३'s picture

22 Jan 2015 - 1:20 pm | इशा१२३

लेख आवडला.सहजसुंदर अभिनय करणार्‍या या अभिनेत्याचे अनेक चित्रपट आवडलेत.काहि बघायचे राहिलेत.

पैसा's picture

24 Jan 2015 - 8:57 pm | पैसा

या निमित्ताने फारूक शेखचे अनेक सुरेख चित्रपट आठवले! धन्यवाद विशाल!!