चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत
चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स
चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस)
मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात. आज वाहन चोरीला जाण्यापासून वाचवणे आणि त्यासंबंधीची अधिक माहिती घेऊयात. सेफ्टी आणि सेक्युरिटी हे खरं तर वेगळे विषय- पण आरेखन करताना त्यांचा एकत्र विचार कंपनीला करावा लागतो.
दोन दशकांपूर्वी ब्रिटनमध्ये वाहन चोरी अतोनात वाढली होती. याशिवाय युरोपातल्या गरीब देशांत महागड्या गाड्या चोरीला जात असत. त्यामुळे तिथे गाडीचं मायलेज, आराम पहाण्यापेक्षा चोरांना प्रतिबंध करू शकणाऱ्या गाड्याना मागणी वाढू लागली. इलेक्ट्रोनिक्स गेजेट्स अद्याप फार प्रगत नव्हती, शिवाय गाडीत अंगभूत नसत आणि कमी किमतीला मिळतही नसत. तेव्हा लोकांनी काय काय केलं नाही? कुलूप बंद ग्यारेज, रखवालदार ठेवणे, इतकंच काय, साखळदंड वापरून गाड्या भिंतीतल्या खुंटीला बांधून कुलूप लावत असत. पण चोर त्याला पुरून उरत असत.
विविध देशातल्या सर्वेक्षण आणि विमा दाव्यांनुसार जपानी आणि अमेरिकन गाड्या पळवण्याचं प्रमाण जास्त आहे. १९९२ मध्ये इंग्लंडचे वाहन चोरीचे प्रमाण वर्षाला सव्वासहा लाख गाड्या होते ते विविध उपायांमुळे गेली काही वर्षे लाखाच्या आत आले आहे. या हरवलेल्या गाड्या मुख्यतः मध्यम आणि स्वस्त गटातल्या असतात. निम्म्याहून अधिक वेळा चोरांना मालकांनीच काम सोपे करून दिलेले दिसते. काचा उघडया असणे किंवा लॉक करायला विसरणे हे मुख्य कारण असते. अंधाऱ्या जागेत लावून जाणेसुद्धा महागात पडते. पोलिसांचं रेकॉर्ड आणि विम्याचे दावे यावरून ठराविक कार मॉडेल्स जास्त चोरीला जातात, किंवा विशिष्ट भागातून जास्त चोरीला जातात असे कळते. या माहितीच्या आधारे पुढील काळात सुधारणा केल्या जातात. जालावर वाहन सुरक्षेविषयी आणखी बरीच माहिती मिळू शकेल.
गाडी चोरणारे एकतर ती गाडी विकून टाकतात किंवा सुटे भाग काढून विकत बसतात. शेजारी राज्यात किंवा अगदी शेजारच्या देशात पण नेतात. त्यामुळे चोरांच्या सतत नव्या क्लुप्त्या आणि त्यावर निघालेले उपाय आणि नियम हा खेळ चालू रहातो. त्यासाठी गाडीचं सुरक्षा मानांकन महत्वाचं ठरतं.
मध्यम आणि वरच्या गटातल्या बहुतेक सगळ्या गाड्यांना सुरक्षितता भोंगा बसवलेला असतो. अनधिकृत व्यक्तींनी गाडीत प्रवेश केला, की तो वाजायला लागतो. चोरसुद्धा बराच अभ्यास करून आलेले असतात. सर्वप्रथम हा भोंगा निकामी करायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ब्याटरीची वायर तोडायचा प्रयत्न करतात. दुसरा एक प्रकार गाडी उचलून किंवा ओढत नेण्याचा. त्यासाठी महाग गाड्यांत कलमापक ( inclination ) संवेदक असतात. ओढत किंवा उचलून नेण्याचा प्रयत्न झाला तर गाडीच ओरडायला लागते आणि इंजिन/ स्टीअरिंग बंद पण पडते. दुचाकीनाही असेच आर एफ ट्रान्समीटर्स आले आहेत. त्यात दर सेकंदाला गाडी खिशातल्या किल्लीशी 'बोलते ' गाडीच्या तीन मीटर्स परिघात हे सुरु रहाते. पण गाडीचं इग्निशन बंद केल्यावर वीस सेकंद हा संवाद झाला नाही तर इंजिन बंद रहाते आणि मालक आल्याशिवाय सुरु होत नाही.
विविध देशातले चोर काय विचार करतात, चोरी कशी होऊ शकते, याचा अंदाज घेण्यासाठी कांही कंपन्यात निवृत्त पोलिस आणि माजी चोरांना करारबद्ध केले जाते. अर्थातच त्यांना ठराविक अंतर राखून कामापुरतीच माहिती दिली जाते. त्यांची मदत मुख्यतः त्यांच्या कार्यपद्धती साठी लागते. उदाहरणादाखल सांगायचं तर एक नियम असा आहे, की वर उल्लेख केलेला भोंगा बॉनेट खाली बसवला असेल तर कुलुपबंद गाडीचे बॉनेट उघडताच तो वाजू लागेल. मालक सावध होईल आणि चोर पकडला जाईल. जर चोराला साठ सेकंदात तो बंद करता आला तर गाडी त्या परीक्षेत नापास होते! कारण त्यामुळे मालकाचं आवाजाकडे दुर्लक्ष्य होण्याची शक्यता राहते. सर्वसाधारणपणे एकशेदहा डेसिबल्स इतका आवाज बॉनेट बंद असताना गाडीच्या बाजूंना तीन मीटर्स पर्यंत आला पाहिजे.
या चाचणीत गाडी फेल झाली तर मग काय- पुन्हा डिझाईन बदलून मंजुरीला आणावी लागते. म्हणजेच अलार्म, त्याची रचना आणि गाडीतले ठिकाण असे असायला पाहिजे, की सराईत चोरही सहजपणे तो निकामी करणार नाही. त्याला सहजपणे वायर्स कापता येणार नाहीत. याशिवाय चोरलेल्या गाडीत एक एल ई डी दिवा पंधरा दिवस सतत लखलखत राहतो. त्यामुळे जागरूक नागरिकांचं लक्ष्य वेधलं जातं.
लंडनच्या पश्चिमेला तासाभराच्या अंतरावर थेचम या ठिकाणी ''थेचम रिसर्च'' नावाची सरकारी संस्था १९६९ मध्ये स्थापन झाली. त्यात १९९२ पासून सुरक्षितता विषयक संशोधन सुरु झालं. त्याचं मुख्य उद्दिष्ट विम्याची जोखीम कमी करणे हा होता. म्हणजे गाडी चोरीला जाणे किंवा अपघातग्रस्त होणे या दोन्ही प्रकारात होणारे नुकसान कमी करण्यासाठी लागणारे संशोधन ते करतात. त्याच बरोबर त्यांनी वाहन उद्योगांना नियम आणि निकष घालून दिले गेले. ते पाळले तरच ती गाडी बाजारात विकायला परवानगी मिळते. इथे अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशिक्षण आणि विविध विमा कंपन्यांचं सुसूत्रीकरण, हे सर्व केले जाते. युरोप बाहेरील कंपनीला इंग्लंडात गाड्या विकायच्या तर याचं प्रमाणपत्र लागतं. त्यामुळे त्यांनी अन्य कांही देशांत पण तपासणी सुविधा ठेवल्या आहेत. त्यामुळे ''थेचम रेटिंग चांगले तर विम्याचा हप्ता कमी'' असं साधं सरळ गणित आहे. आपल्याकडे मानांकनाच्या तपासण्या करण्यासाठी ए आर ए आय ही पुण्याची संस्था काम करते. त्याचं प्रमाणपत्र असेल तरच भारतात कुठलीही गाडी विकता येते.
सुरक्षितता मानांकन कार, ट्रक, मोटारसायकल याना वेगवेगळे असते. कारपुरताच विचार करायचा तर विविध पातळ्यांवर सुरक्षितता द्यावी लागते. चौर्य प्रतिबंधानाच्या किमान दोन व्यवस्था आपल्या गाडीत असायला हव्यात.
सर्व पांच दारे, बॉनेटची इलेक्ट्रोनिक लॉक्स, चतुर किल्ली हे झाले प्राथमिक उपाय. यापुढे घनफळ (व्हॉल्यूमेट्रिक) संवेदक वापरले जातात. हे इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायोलेट संवेदाकावर चालतात. याचा दुहेरी उपयोग होतो. गाडीत चोर शिरला तर अलार्म वाजतोच, पण लहान मूल किंवा कुत्रा गाडीतच राहिले तर गाडी लॉक होत नाही अन त्यांचा जीव वाचायला मदत होते. ग्लास ब्रेक सेन्सर्स मुळे कांच फुटल्याचा आवाज आला तर अलार्म वाजू लागतो. अत्याधुनिक फिल्टर्स मुळे खिडकीची कांच आणि इतर काचेतला फरक गाडीला समजतो. हेही पुरेसे नसेल तर कल-संवेदक, नक्कल प्रतिबंधक किल्ली, इंजिन बंद पाडून जागीच खिळवून ठेवणारी यंत्रणा ( इम्मोबिलायझर ), सुकाणू ( स्टीयरिंग) कुलूप, अस्सल किल्लीशीच गप्पागोष्टी करणारा इंधननळ , बँटरीची वायर तोडल्यास वाजणारा दुसरा भोंगा, आणि आता सिमकार्ड धारक म्हणजे बिल्ट- इन पोलीसही! कित्ती प्रकार- सांगावेत तेव्हढे कमीच!
वाहनचोरी होऊ नये म्हणून आपल्याला हव्या असलेल्या किंमतीत उपलब्ध सर्वाधिक फीचर्स घ्यावीत. जसे प्यासिव्ह एन्ट्री आता कमी किमतीला उपलब्ध आहे. याशिवाय पार्किंग मध्ये सी सी टी व्ही असणे गरजेचे आहे. आपल्या देशात गुन्हेगारी अन अतिरेकी कारवायांसाठी चोरीच्याच गाड्या वापरतात म्हणून अधिक सतर्क रहाणे चांगले. सिमकार्डासह ठावठिकाणा सांगणाऱ्या गाड्या लवकरच येत आहेत. कनेक्टेड गाड्या- म्हणजेच इन्टरनेट ला सतत जोडलेल्या गाड्या मध्यम किमतीला बाजारात येत आहेत. हाय सेक्युरिटी नंबर प्लेट्स (ज्या आपल्याकडे वाजपेयी यांच्या काळात येणार होत्या पण किमतीमुळे बारगळल्या असाव्यात), VIN क्रमांक अनेक ठिकाणी अंशतः छापलेला असणे, यामुळेही शंकास्पद गाडी चोरीची असल्यास लवकर सापडते. आफ्टरमार्केट अलार्म्स थोडे स्वस्त वाटले तरी मूळ गाडीबरोबर मिळालेले जास्त सुरक्षित असतात. असं असलं तरी या चोऱ्या पूर्णपणे संपतील असा गैरसमज कुणाचाही नाही. फक्त आपली गाडी सुरक्षित असल्याची भावना मात्र सुखावह असते!
भारतीय वातावरणात जेव्हा या गाड्या वापरात येतात तेव्हा माहिती नसल्यामुळे काही गंभीर समस्या निर्माण होतात. अलीकडे गाडीत गुदमरून मृत्युच्या घटना ऐकायला मिळतात. पार्किंग मध्ये ठेवलेल्या विशेषतः विक्रीच्या-सेकंडहेंड गाडयांशी खेळताना लहान मुले दार बंद करून घेतात आणि किल्ली बाहेर असल्याने गाडी लॉक होते. मग आवाज बाहेर येत नाही, दार तुटत नाही की कांच फुटत नाही. ५/७ मिनिटांत श्वसन बंद पडू शकते. नव्या गाडीतून जाताना जुन्या सवयी बदलायला हव्यात. प्रत्येक वेळी अगदी पांच मिनिटं गाडीतून बाहेर जाताना चालकानं खात्री केलीच पाहिजे की गाडीत कुणी नाही. किंवा आंत बसलेल्या व्यक्तीकडे एक किल्ली असलीच पाहिजे,
गाडीच्या सुरक्षेचे अजून काही एकदम नाविन्यपूर्ण उपाय तुम्हाला सुचवता येतील? काय बोलता? थांबा थांबा. . बोलायच्या आधी पेटंट टाका ! कदाचित अब्जाधीश व्हाल राव !
(क्रमश:)
प्रतिक्रिया
23 Aug 2014 - 11:31 pm | अन्या दातार
अंमळ उशिर केलात हा भाग टाकायला. उत्तम माहिती मिळतेय. :)
बादवे, मी पयला *db* (?)
23 Aug 2014 - 11:57 pm | बहुगुणी
'लो जॅक' विषयी लिहिणार का?
भारतात 'लो जॅक'च्या धर्तीवर काही सोयी उपलब्ध आहेत का? मूळ गाडीबरोबर की आफ्टर-मार्केट?
मध्यंतरी ट्रक मालकांनी त्यांच्या ट्रक्स वर जीपीएस वर आधारित काही ट्रॅकिंग यंत्रणा वापरून त्यांचे ट्र्क ड्रायव्हर्स योग्य मार्गानेच जात आहेत की ट्रक पळवला जात आहे याची शहानिशा सुरू केली आहे असं वाचनात आलं होतं. (नाशिकला ३ वर्षांपूर्वी एका दुकानात ही यंत्रणा खाजगी गाड्यांसाठीही बसवली जात होती, पण मला ती अति-महाग वाटल्याने लावली नाही. आता किंमती कमी झाल्या असतील तर विचारायला हवं.)
2 Sep 2014 - 10:39 pm | खेडूत
LoJack च्या धर्तीवर अनेक उत्पादने भारतात सुद्धा दहा बारा वर्षांपूर्वी आली. तेव्हा ती महाग होती - म्हणजे एका गाडीला वीस हजार वगैरे. आता पाच हजारपर्यंत मिळतात. मूळ गाडीबरोबर अजून नाही पण आफ्टरमार्केट उपलब्ध आहेत. माझाच एक जुना सहकारी नोकरी सोडून १० वर्षे तेच करतो.
एकदम किंमत देण्याऐवजी मासिक भाडेतत्वावर पण मिळतात असं ऐकलं आहे. नुसते हार्डवेअर घेऊन अगदी आवश्यक तेव्हा जीपीआरेस सर्व्हरला एक्सेस घेता येतो.
24 Aug 2014 - 3:00 am | आदूबाळ
नेहेमीप्रमाणेच भारी भाग झाला आहे.
24 Aug 2014 - 9:23 am | मुक्त विहारि
आवडला...
(क्रमशः वाचून आनंद झाला....)
24 Aug 2014 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार
या भागासाठी फार प्रतिक्षा करावी लागली.
मी अस ऐकल आहे की आता बायोमॅट्रीक लॉक पण मिळतात. मालकाने बोट लावले तरच सुरु होतात.
माझ्या पहाण्यात अशी कार अजुन आलेली नाही.
पैजारबुवा,
24 Aug 2014 - 11:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
निसान मायक्रा
2 Sep 2014 - 10:41 pm | खेडूत
बायोमेट्रिक लॉकची कार थेट बाजारात नाही. आफ्टर मार्केट मिळते. याचं मुख्य कारण म्हणजे गाडी हाताळणारे अनेकजण असू शकतात. मूळ मालक, त्याच्या घरचे एक-दोन जण, ड्रायव्हर, सर्व्हिस सेंटरचे तंत्रज्ञ वालेट पार्किंगवाले ई. . . बायोमेट्रिक लॉक इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानावर चालते, ज्यात गाडीला अंगठ्यांचे ठसे शिकवावे लागतात. साधारण यांत्रिक स्मृतीत (memory )तीन जणांचे ठसे लक्षात ठेवण्याची/ पडताळण्याची क्षमता असते. त्याशिवाय इतरांना गाडी चालू करता येत नाही. म्हणून ते इतके प्रचलित नाही. हेच कारण ''मोबाईल म्हणजेच किल्ली'' तंत्रज्ञान न चालण्यामागे आहे.
त्यामुळे सगळे इनोव्हेशन मूळची किल्ली प्रगत करण्याभोवती फिरते!
24 Aug 2014 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
महितीपूर्ण मालिका. या भागाला बराच वेळ लागला. पुभाप्र.
24 Aug 2014 - 9:35 pm | शशिकांत ओक
मित्रा,
रंगतदारपणे विविध पैलूतून वाहनचोरांच्या वाटा शोधून त्यावर मात करायचे तोडगे वाचून मजा वाटली. अर्थात या सर्वांवर मात करणारे शार्विलक असतात....
24 Aug 2014 - 10:28 pm | एस
उपयुक्त लेखमालिका. पुभाप्र.
2 Sep 2014 - 10:55 pm | रेवती
छान माहिती. वाचतीये.
2 Sep 2014 - 11:02 pm | मधुरा देशपांडे
माहितीपुर्ण लेखमाला. वाचते आहे.